गुरू आतला

रोहन जगताप's picture
रोहन जगताप in जे न देखे रवी...
14 Dec 2024 - 12:47 pm

नसे भोवती छत्रछाया वडील
गुरू आतला सावली ती वसे
नसे सोबती पितृमाया वडील
गुरू लाभला प्रेम पाठी तसे

उरी पोकळी पोरकी राहिलेली
भरूनी जिवाला मनी पाविले
नदी कोरडी आटली वाहिलेली
भिजूनी किनारा तृषा भागिले

नसे पाहिले धैर्यशाली वडील
गुरू राखला हात माथी असे
नसे जाहले आप्तवाली वडील
गुरू जागला साथ जन्मा जसे

मने कोवळी कोंडली घुस्मटून
करी मोकळा बंध जे राहिले
फुले पाकळी सांडली कुस्करून
सुवासास वेचू गुरू वाहिले

वडीलवृत्तबद्धकविता

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

14 Dec 2024 - 1:54 pm | मुक्त विहारि

उत्तम गुरू मिळायला भाग्य लागते.

कारण, काही गुरू हे "आपण गुरू आहात.." ह्याच लायकीचे असतात.

रोहन जगताप's picture

14 Dec 2024 - 4:02 pm | रोहन जगताप

अगदी बरोबर आहे. बाकी प्रत्येक माणसाच्या आत एक गुरू असतो. वरील कविता ही त्या गुरूला वाहिलेली आहे. ‘कळते पण वळत नाही’ असे आपण म्हणतो. त्यातले जे कळतेपण आहे, तोच आपल्यातील गुरू आहे. पण त्याकडे लक्ष न दिल्याने कळूनही वळत नाही.

मुक्त विहारि's picture

15 Dec 2024 - 5:29 pm | मुक्त विहारि

माझे एक मार्गदर्शक होते..

त्यांनी एक गोष्ट सांगितली आणि आज देखील ती गोष्ट मी पाळतो.

रात्री झोपण्यापूर्वी , स्वतः साठी १० मिनिटे काढायची आणि त्या १० मिनिटांत, आज दिवसभरात केलेल्या सर्व गोष्टी आठवायच्या.

झोपेतील, अर्धजागृत अवस्थेत, मेंदु कुठल्या गोष्टी चुकीच्या केल्या आणि त्यावरची उपाय योजना शोधून काढतो आणि ही निरंतर चाललेली साधना आहे.

काही उपाय लगेच मिळतात तर काहींना प्रत्यक्षांत यायला , बेंझीन काळ लागतो. (Benzene Time, हा माझ्या मार्गदर्शन करणाऱ्या गुरूंचा आवडता शब्द.)

Benzene Time बद्दल माहिती हवी असेल तर, खालील लिंक बघा..

https://www.acs.org/molecule-of-the-week/archive/b/benzene.html#:~:text=....

रोहन जगताप's picture

17 Dec 2024 - 10:22 am | रोहन जगताप

माहितीसाठी आभारी आहे.

मातृतत्त्वाच्या उल्लेखावाचून काव्य अपूर्ण वाटते...

रोहन जगताप's picture

14 Dec 2024 - 4:12 pm | रोहन जगताप

मानवी आयुष्यात केवळ वडीलांचीच असे नव्हे, पण वडीलकीची अशी एक पोकळी असते. कोणीतरी आपल्याला सांभाळून घ्यावे, मार्गदर्शन करावे, दिशा दाखवावी अशी प्रत्येकाची कळत-नकळत इच्छा असते. परंतु अनेकदा ही पोकळी भरून येत नाही. अशावेळी माणसाच्या आतील गुरूच ही पोकळी भरून काढण्यास सक्षम असतो अशा अर्थाने वरील कविता लिहिलेली आहे. तरी कवितेच्या पहिल्या कडव्यात पुढील प्रमाणे बदल केल्यास कदाचित कविता आपल्याला परिपूर्ण वाटेल अशी आशा आहे.

नसे भोवती छत्रछाया वडील
गुरू आतला सावली ती वसे
नसे सोबती पितृमाया वडील
गुरू लाभला माय पाठी तसे

छत्रछाया वडिलांची आणि पाठीशी माया आईची... आता पूर्णत्व लाभले असे वाटते.

रोहन जगताप's picture

15 Dec 2024 - 4:52 pm | रोहन जगताप

आभारी आहे.

कर्नलतपस्वी's picture

14 Dec 2024 - 4:41 pm | कर्नलतपस्वी

त्यावर कवीचे स्पष्टीकरण कवितेचा आयाम बदलून पूर्णत्वास नेते.

कविता आवडली.

रामचंद्र's picture

14 Dec 2024 - 6:24 pm | रामचंद्र

नेमकं सांगितलंत.

रोहन जगताप's picture

15 Dec 2024 - 4:52 pm | रोहन जगताप

मनःपूर्वक आभारी आहे!

चौथा कोनाडा's picture

24 Dec 2024 - 10:25 pm | चौथा कोनाडा

सुंदर रचना ! गुरुचे महत्व कालातीत आहे !

म्हणुनच म्हटले आहे :
गुरु ब्रह्मा, गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा:,
गुरु साक्षात परम ब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नम:।

गुरू म्हणजे परम !

रोहन जगताप's picture

26 Dec 2024 - 10:12 am | रोहन जगताप

मनःपूर्वक आभार! मानवी जीवनास जसा गुरूचाच आधारस्तंभ असतो इतके त्याचे महत्त्व आहे.

वामन देशमुख's picture

26 Dec 2024 - 10:45 am | वामन देशमुख

गुरुमहात्म्य सांगणारे मुक्तक आवडले.

रोहन जगताप's picture

29 Dec 2024 - 1:01 pm | रोहन जगताप

मनःपूर्वक आभार