अघमर्षण :
संध्येमधील एक महत्वाचा विधी. अघमर्षण म्हणजे पापाचा नाश करणे , त्याग करणे !
पण मुळात पाप म्हणजे काय ?
पाप, शिक्षा आणि प्रायश्चित्त म्हणजे नक्की काय ?
शिवशक्ती हे द्वैत आहे असं वाटणं हेच एक पाप.
त्या पापाची शिक्षा म्हणजेच द्वैत.
शिवशक्ती अद्वैत आहे असं वाटणं हेही एक पापच.
त्या पापाची शिक्षा म्हणजे असं "वाटणं".
अरे पण मग ह्याचे प्रायश्चित्त काय ? कसा त्याग करायचा ह्या पापांचा ?
तर मनाच्या, बुध्दीच्या , विचारांच्या पापाला विचार हेच प्रायश्चित्त .
म्हणून आता अघमर्षण.
https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk
झाला विचार . कृती संपल्याचे प्रतीक म्हणून त्याला शारीरिक विधीची जोड, बस, त्या शारिरिक विधीला विशेष अधिक असा काही आधार नाही.
उजव्या हातात पाणी घ्या , ऋतं च सत्यं ... म्हणा , ओंजळीतील पाण्यावर उछ्वास टाकून ते डाव्याबाजूला टाकून द्या.
झालं अघमर्षण।
आता पापं संपली.
आता तुला द्वैताचे पापं नाही
आणि
अद्वैत आहे हे असं "वाटण्याचे" ही पाप नाही.
सोहमपापो विरजो निर्मुक्तो मुक्तकिल्विषः |
तो अपाप अर्थात पापासुन अलिप्त , विरजो अर्थात कसलाच कलंक नसलेला , मुक्त किल्बिश अर्थात आधीच्या किल्बिश अर्थात पापांपसुन मुक्त झालेला असा तो मी आहे !
आता विष्णू, लीला नाही
आणि विष्णू ही नाही.
शिव, शक्ती नाही
आणि शिव ही नाही.
द्वैत नाही आणि अद्वैतही नाही.
आता बस " मी आहे" !
ऋतं च सत्यं चाभीद्धात्तपसोऽध्यजायत ।ततो रात्रिरजायत ततः समुद्रो अर्णवः ॥ ६३॥
समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत ।अहोरात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी ॥ ६४॥
सूर्याचन्द्रमसौ धाता यथापूर्वमकल्पयत् ।दिवं च पृथिवीं चान्तरिक्षमथो सुवः ॥ ६५॥
रात्री , दिवस, समुद्र, काल, आकाश, चंद्र, पृथ्वी, आणि सूर्यही हेही निर्माण व्हायच्या आधी जो होता ,
तो हिरण्यगर्भ,
तो सवितृ,
तो भर्ग,
"तो"
तोच मी आहे.
पण मग तो तर अपरिवर्तनीय, सर्वव्यापी, आहे.
हे जे जे काही म्हणून दिसतंय ते सारेच तो आहे.
सर्वं खल्विदं ब्रह्म।
हा प्रत्यक्ष डोळ्याला दिसतोय तो सूर्यच ब्रह्म आहे !
वडिला अव्यक्ताचिया वंशा । उद्योत्कारु सूर्य जैसा ।
येणें येके गुणें आकाशा । अंबरत्व ॥ अमृतानुभव 6.3.
अव्यक्त परब्रह्माच्या रुपाची अनुभुती करवुन देणारा जो हा सूर्य आहे , तोच मी आहे !
असावादित्यो ब्रह्म । ब्रह्मैवाहं अस्मि ।।
.
आर्द्रं ज्वलति ज्योतिरहमस्मि । ज्योतिर्ज्वलति ब्रह्माहमस्मि ॥ योहमस्मि ब्रह्माहमस्मि । अहमस्मि ब्रह्माहमस्मि ॥ अहमेवाहं मां जुहोमि स्वाहा ॥
पाण्याचा पाणीपणा ज्या मुळे लक्षात येतो, ती ज्योति अर्थात ज्ञान मी आहे. ज्या ज्योति अर्थात ज्ञानाचे ज्याच्यामुळे ज्ञान होते ते ब्रह्म मी आहे.
हा जो मी आहे , तोच ब्रह्म , मी आहे.
मी आहे तोच हा ब्रह्म आहे !
आता ह्याव्यतिरिक्तही अजुन दुसरे काहीतरी मी आहे अशी शंका , असा अध्यास असेल तर त्या अध्यासासकट तसे वाटणाराही तो , त्याला मी माझ्या ब्रह्मस्वरुपात स्वाहा करतो , अर्पण करतो.
पूषन्नेकर्षे यम सूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन् समूह तेजः । यत्ते रूपं कल्याणतमं तत्ते पश्यामि योऽसावसौ पुरुषः सोऽहमस्मि ॥ १६॥
यश्चकिंचित जगताचे सृष्टीचे पोषण करणार्या, ती सृष्टी पाहणार्या , त्या सृष्टीला सूर्यारुपाने प्रकाशित करणार्या , नियमीत करणार्या , रश्मी अर्थात प्रकाशकिरणांचा तेजाचा समुह असणार्या परमपुरुषा , तुझे हे कल्याणतम रूप मी पहात आहे ! हा जो तू पुरुष आहेस , तो च मी आहे !
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
__________________________
संदर्भ :
सार्थ यजुर्वेदीय त्रिकालसंध्या विधी : संपादक श्री. विनायक प्रभाकर चंद्रात्रे ,वेद प्रकाशन, नाशिक
अघमर्षण सूक्त : https://vignanam.org/hindi/aghamarshana-suktam.html
अघमर्षण सूक्त व्हिडीओ : https://www.youtube.com/watch?v=aa2LM2tLnlk
महानारायणोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/mahanarayana.html
इशोपनिषद : https://sanskritdocuments.org/doc_upanishhat/iisha.html
आणि
मी.
|| श्री कृष्णार्पणमस्तु ||
प्रतिक्रिया
20 Dec 2024 - 5:25 am | चित्रगुप्त
साष्टांग दंडवत प्रगो.
हे सगळे मजसारख्या पामरांना कळेल अश्या सोप्या पद्धतीने उलगडून सांगावे ही नम्र विनंती.
20 Dec 2024 - 9:36 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद चित्रगुप्त काका.
आपण नेहमी आवर्जुन प्रतिसाद देता हे लेखनाचा हुरुप वाढवणारे आहे.
सगळ्यांना सगळं कळलेच पाहिजे असा दुराग्रह नाही. ह्या इथे मला अमृतानुभवातील ३ ओव्या उधृत कराव्याश्या वाटतात :
समजा राजाला तुम्ही तुम्ही राजा असे नाही म्हणालात तरी तो राजाच असतो. त्याचे राजेपण तुम्हाला जो प्रत्यय येतोय किंव्वा येत नाहीये ह्यावर अवलंबुन नसते. तसेच शिवस्वरुपाला तुम्ही समजुन घेतले काय किंवा नाही समजुन घेतले काय , त्याने काहीच फरक पडत नाही !
आहे हे असं आहे. :)
दोन्ही पैकी काहीच वाटत नाही हे अनध्ययनाचे प्रतीक आहे, आता सगळ्यांनी अध्ययन केलेच पाहिजे असा आपला हट्ट नाही. तुम्हाला हौस असल्यास करा , नसल्यास नका करु.
हे समजुन घ्यायची हौस आहे पण कळत नाहीये असे म्हणत असाल तर मात्र मी तुम्हाला शंकराचार्य उपनिषदभाष्य वगैरे वाचण्याआधी, लोकमान्यांचे गीतारहस्य वाचन करा असे सुचवेन कारण त्यांनी एकदम उत्तम पध्दतीने स्टेप बाय स्टेप विवेचन केले आहे !
:)
पुनश्च एकवार धन्यवाद !
20 Dec 2024 - 9:51 am | चित्रगुप्त
मुळात 'पाप' म्हणजे (नेमके) काय ?
विविध धर्मात वेगवेगळ्या कृत्यांची गणना 'पाप' म्हणून होते. तुमच्या मते पाप कशा - कशाला म्हणावे ?
20 Dec 2024 - 10:23 am | प्रसाद गोडबोले
>>> उत्तर वर लेखातच आहे अगदी सुरुवातीलाच !
20 Dec 2024 - 5:20 pm | कॉमी
अध्यात्म वैगेरे फारसे समजत आणि पटत नसल्याने बाकी काही नाही.
पण लेखात पाप म्हणजे काय हे सापडले नाही. पापाची दोन उदाहरणे मात्र आहेत.
20 Dec 2024 - 9:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अध्यात्म वगैरे मरू देत पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करतो...
-दिलीप बिरुटे
21 Dec 2024 - 8:00 pm | चौथा कोनाडा
प्राडॉ ..... पण फूल टू करमणूक असते म्हणून असे विषय इंजॉय करण्याशी असहमत ..
असं वाचन करत हळूहळु समजुन घेणं, प्रगल्भ होत जाणं ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे.. गंभीरपणेच घ्यायला हवी असं मला वाटतं !
20 Dec 2024 - 10:04 am | मुक्त विहारि
ह्या बद्दल धन्यवाद....
नक्कीच वाचीन...
अहंकार कमी करायला, ह्या पुस्तकाचा उपयोग होऊ शकतो का?
कारण, कमी अधिक प्रमाणात, प्रत्येक व्यक्तीला थोडा तरी अहंकार असतोच.
20 Dec 2024 - 10:29 am | प्रसाद गोडबोले
आपल्याला अहंकार कमी करणे जास्त करणे वगैरे सव्यापसव्य करावयाचे नाहीत, आपल्याला फक्त ह्यातील "अहं" कोण आहे एवढाच शोध घ्यायचा आहे .
तुम्हाला गीतारहस्यातील चौथ्या प्रकरणात "आधिभौतिक सुखवाद" ह्या प्रकरणात उत्तर मिळेल अशी आशा आहे !
20 Dec 2024 - 1:40 pm | मुक्त विहारि
बाय द वे,
तुम्ही "गीता रहस्य" ह्या पुस्तकाचा सखोल अभ्यास केला आहे, असे वाटते.
21 Dec 2024 - 12:38 am | प्रसाद गोडबोले
सखोल अभ्यास असे नाही पण वाचन मात्र नीट केले आहे.
माझ्या मते गीतारहस्य हा इतका लोकोत्तर ग्रंथ आहे लोकमान्यांनी त्यांच्या संपुर्ण जीवनात स्वदेश स्वराज्य ह्या विषयी काडीमात्र काम केले नसते तरीही केवळ हा एक ग्रंथ लिहिला म्हणुन त्यांचे नाव इतिहासात कोरलेच गेले असते !
अवांतर : गीतारहस्याच्या , त्यातील सिध्दांतांच्या , अनुमानांच्या काही मर्यादा आहेत , पण वेदांताचा , आचार्यांच्या भाष्याचा सखोल अभ्यास केलेल्या व्यक्तींनाच त्या जाणवु शकतात . तस्मात त्याविषयी मी बोलणे टाळतो . अन केवल माऊलींची ज्ञानेस्वरीतील ही ओवी उधृत करतो :
जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणौनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥ १७२ ॥
जे तान्हे बालक मोठ्या कष्टाने आईचे दूध पिते, ते पक्वान्न कसे खाणार ? म्हणून अर्जुना ती पक्वान्ने ज्याप्रमाणे तान्ह्या मुलाला देऊ नयेत ॥ १७२ ॥
धन्यवाद !
20 Dec 2024 - 5:59 am | मुक्त विहारि
पण डोक्यावरून गेले... जाऊ द्या, तुम्ही नका टेन्शन घेऊ...
20 Dec 2024 - 6:23 am | प्रचेतस
तुमच्या विधानात "मी" आणि "ब्रह्म" यांना समानार्थी मानले आहे, मात्र यामध्ये तर्कसुसंगती आवश्यक आहे.
"मी" म्हणजे व्यक्तीचे अहंभाव किंवा आत्मचेतना.
"ब्रह्म" म्हणजे विश्वव्यापी, शाश्वत, निर्गुण सत्य.
व्यक्तीचा "मी" (अहं) मर्यादित असतो, तर ब्रह्म अमर्यादित आहे.
मग मर्यादित "मी" अमर्यादित "ब्रह्म" कसा होऊ शकतो? शिवाय ज्ञान ही निर्जीव गोष्ट नाही, तर ज्ञान हे अनुभवातून साकार होते. मग फक्त "मी" ला ज्ञान कसे म्हणता येईल?
"मी ब्रह्म आहे" असे विधान करणे म्हणजे "मी" च्या अहंभावाची एक बाजू दर्शवते.
खऱ्या ब्रह्मानुभवात "मी" चा अहंभाव लयाला जातो, आणि त्यावेळी "मी" व "ब्रह्म" यातील द्वैत संपते. उपनिषदांमध्ये "अहं ब्रह्मास्मि" असे विधान आहे, परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीचा अहंकार म्हणजे ब्रह्म. येथे "मी" म्हणजे शुद्ध आत्मा आहे, जो ब्रह्माशी एकरूप आहे.
शेवटी हा द्वैताद्वाचा खेळच झाला.
20 Dec 2024 - 10:19 am | प्रसाद गोडबोले
धन्यवाद वल्ली सर !
अगदी अगदी एकदम योग्य बोललात ! ही साधनेच्या स्तरावरील शेवटची पायरी मानतात . तुमच्या पायात लोखंडाची बेडी होती, त्याची तुम्हाला किल्ली सापडली, ती किल्ली मात्र शुध्द सोन्याची आहे ! आता तुम्ही ह्या किल्लीने लोकांडाच्या बेडीतुन मुक्त झालात तर किल्लीचीही गरज नाही ना ! बेडी काढुन टाकली तशी किल्ली ही टाकुन द्या !
किल्ली सुंदर आहे, मौल्यवान आहे, असे वाटते त्यांची अवस्था दयनीय आहे . #माय_प्रेशियस
इये विषयी आपल्याला इशोपनिषदात एक सुंदर विधान सापडते
जे लोक "मी ब्रह्म नाही , काहीतरी भिन्न देह वगैरे आहे " ह्या अज्ञानाचा आश्रय करुन राहतात ते अंधःकारात भरकटालेले आहेत, मात्र जे "मी ब्रह्म आहे" ह्या ज्ञानात गुंतुन पडले आहेत ते त्याही पेक्षा गहन अंधःकारात भरकटलेले आहेत ! !
ह्यावर ओशो ने अतिषय सुंदर प्रवचन दिलंय पण मला आत्ता त्याची लिंक सापडत नाहीये .
अगदी बरोबर.
ह्या ब्रह्मानुभवात, अनुभव , अनुभाव्य आणि अनुभाविक राहातच नाहीत ! काय बोलणार ! जे जे काही ह्या वस्थेचे वर्णन करणारे साहित्य आहे ते सारे त्या लोकांनी लिहिलेले आहे जे ह्या शुध्द ब्रह्म अवस्थेतेतुन एक पातळी खाली उतरले आहेत . आणि संस्कृतमध्ये खाली उतरणे ला काय म्हणतात ?
अव + तर = अवतार !
शुध्द अनुभव हा शब्दातीत आहे - त्या साठी आचार्यांनी अपरोक्षअनुभूती असा शब्द वापरला आहे, समर्थांनी अनुर्वाच्च समाधान असा शब्द वापरला आहे , माऊली म्हणतात >
मीही हे जे काही लिहितोय हा सगळा शब्देविण संवादु , दुजेविण अनुवादु आहे. "ज्यांना कळतं, त्यांना कळतं" , ते माझ्याकडे पाहुन फक्त हसतात गालातल्या गालात. त्यांना माहीती आहे मी कोण आहे , मला माहीती आहे ते कोण आहेत . :)
21 Dec 2024 - 12:17 pm | प्रचेतस
प्रगो सर, काही तात्विक चर्चा-
किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे.
"विद्या आणि अविद्या" यांचे उदाहरण दिले गेले आहे, परंतु दोन्ही अवस्थांमध्ये अंधःकार असल्याचे विधान चुकीचे वाटते. ज्ञान (विद्या) हे नेहमीच प्रकाशाचा स्रोत मानले जाते, आणि त्यामध्ये गहन अंधःकाराचा उल्लेख करण्याचा अर्थ आत्मज्ञानाच्या संकल्पनेलाच विरोधाभासी ठरतो. त्यामुळे इथे उपनिषदातील विधानाचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे.
तुम्ही नंतर अवताराचा उल्लेख केलात त्याच्याच व्याख्येनुसार
"अवतार" म्हणजे खाली उतरणे असे मानले गेले आहे, पण शुद्ध ब्रह्मानुभवातून खाली येणे म्हणजे तो अनुभवच भंग पावतो. खाली उतरलेल्या व्यक्तीला त्या अवस्थेचा पूर्ण सत्यभाव कसा सांगता येईल?
आता तुम्ही म्हणता तुम्ही म्हणता की "शुद्ध अनुभव हा शब्दातीत आहे." हे विधान योग्य आहे, परंतु अनुभवाची संकल्पना मांडण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा लागतो. तुम्हीच श्लोकांचा, वाक्यांचा उपयोग करत आहात, म्हणजे स्वतःच्या विधानाचाच विरोध करत आहात.
21 Dec 2024 - 10:58 pm | धर्मराजमुटके
किल्ली ही शुद्ध सोन्याची आहे, परंतु तिचाही त्याग करायला सांगितला जातो. हा दृष्टांत एका अर्थाने फसवा आहे. जर किल्ली उपयोगी आहे आणि तीच तुम्हाला बेडीतून मुक्त करते, तर किल्ली टाकून देणे म्हणजे साधनेलाच टाकून देणे. साधनेचा हा टोकाचा निषेध म्हणजे व्यक्तीला भ्रमित करणे आहे. साधनाशिवाय साध्य गाठणे अशक्य आहे.
काही अंशी सहमत | एकदा बेडीतून मुक्त झाल्यावर किल्लीचा उपयोग नाही म्हणून किल्ली सोन्याची असली तरी (नव्हे सोन्याची असल्यामुळेच टाकून द्यावी, नाहीतर तिचा देखील मोह होतो) अशा अर्थाने वाचावे.
मात्र एकदा बेडी सुटली म्हणजे परत मनुष्य बेडीत अडकणारच नाही असे देखील नाही. मात्र नवीन बेडीला पुर्वीचीच किल्ली लागेल काय याची शाश्वती नाही. (किंबहुना न लागण्याचीच शक्यता अधि़क) त्यामुळे कदाचित किल्लीचा त्याग करावा असा विचार असावा.
अहंकारमुक्त होण्याचा साधनेचाच माणसास अहंकार येतो अशी उदाहरणे जागोजागी सापडतात. मानवदेह म्हटला की अहंकार, मोह मरेपर्यंत सुटत नाही. साधूला लंगोटीचा देखील मोह पडतो अशी देखील उदाहरणे आहेत.
मात्र आपण प्रयत्न करावे. अपयश देणे न देणे दुसर्या कोणाच्या तरी हाती आहे असे समजले की कर्माचा अहंकार आणि साधनेचा भार होत नाही.
असो.
20 Dec 2024 - 9:10 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चला लागा कामाला...! =))
-दिलीप बिरुटे
(पापमुक्त)
20 Dec 2024 - 9:43 am | प्रसाद गोडबोले
संध्या विधि आणि त्यातील हा उपविधी अघमर्षण हे काही केवळ ब्राह्मणांची मक्तेदारी नव्हते. त्याचा अधिकार त्रैवर्णिकांना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ह्या द्विजांना होता , आजही आहे ! आपण द्विज असल्यास आपले स्वागतच आहे . जे द्विज नाहीत , शुद्र , म्लेंच्छ आहेत त्यांना हे सगळे विधी करण्याची आवश्यकताच नाही !
पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे , मोठ्ठ्या माश्याने छोट्या माश्याला खाल्ले म्हणुन त्याला पाप लागत नाही :) ज्याला पाप म्हणजे काय माहीतच नाही त्याला त्याचा त्याग करण्याचा प्रश्नच उध्भवत नाही !
धन्यवाद !
20 Dec 2024 - 10:18 am | चित्रगुप्त
रूढीप्रमाणे 'द्विज' जरी असलो तरी 'पाप म्हणजे काय माहीतच नाही' या क्याट्यागरीत 'मी' येत असल्याने या भानगडीत पडण्याचे कारण नाही. धन्यवाद.
20 Dec 2024 - 10:48 am | प्रसाद गोडबोले
एक्झ्यॅक्टली काका एक्झ्यॅक्टली !
मनुस्मृती अन अन्य अनेक ठिकाणी हे जे काही म्हणले आहे की "वेदाध्ययनाचा , उपनिषदांचा अधिकार केवळ द्विजांना आहे , इतरांना नाही. " त्याचा अर्थ हाच होता जो तुम्ही वर लिहिलेला आहे. इतरांना गरजच नाही ह्या भानगडीत पडायची !
आता द्विज म्हणजे फक्त ब्राह्मण . कारण क्षत्रिय वैश्य असं कोणी राहिलंच नाही.
आता ह्या ब्राह्मणातही तुम्ही म्हणालात तसे बहुसंख्य हे "रूढीप्रमाणे 'द्विज' " असल्याने त्यांनाही गरज च नाही वेदाध्ययन उपनिषद वगैरे अभ्यासण्याची !
ह्याला उच्च्नीचता किंवा भेदभाव म्हणुन बघुच नका. ही केवळ अनावश्यकता आहे ! as simple as that !
अगदी पटकन सहज सुचले म्हणुन एक मजेशीर उदाहरण सांगतो - तुम्हाला चित्रे काढताना कॅलक्युलेटर ची गरज पडते का ? तसे काहीसे आहे हे :)
20 Dec 2024 - 1:37 pm | चित्रगुप्त
यावरून आठवले, 'सैराट' च्या दोनतीन गाण्यांचे रेकॉर्डिंग अमेरिकेत झाले. भलामोठा सिंफनी ऑर्केस्ट्रा होता. त्यांना वाजवण्यासाठी दिलेले लिखित संगीताचे 'स्कोअर्स' अजय-अतुललापण दिले गेले, त्यांनी संगितले की आम्हाला यातले काहीही समजत नाही. तिथले वादक थक्कच झाले की यांना काहीही कळत नसता एवढी सुंदर संगीतरचना मुळात यांनी केलीच कशी ?
https://youtu.be/yo4E0tWGcV4?si=tB-nNrYzTh_29bmx
20 Dec 2024 - 2:33 pm | तुर्रमखान
कै कै गोष्टींचं फारच शैक्षणिकीकरण झाल्यामुळे एका विशिष्ठ साच्याच घालून त्याला कैतरी नाव देवून शिकवणं सुरू झालं. एखाद्याला तो प्रकार माहीत नसणं म्हणजे ती संकल्पनाच माहीत नसणं असं होत नाही. एकही भाषा ज्ञात नसलेली व्यक्ती विचार करू शकतेच की. 'एखादी गोष्ट पाप आहे हे माहीत नसेल तर पाप लागत नाही' म्हणजे तर हैट आहे.
20 Dec 2024 - 5:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाप पुण्य कर्म अकर्म ह्या संकल्पना फक्त 'द्विजांसाठी ' आहेत, इतरांकरिता नव्हे....
=))
-दिलीप बिरुटे
21 Dec 2024 - 12:30 am | प्रसाद गोडबोले
होय, मलाही धक्का बसलेला हे लक्षात आल्यावर . सध्या धर्मशास्त्राचा इतिहास वाचत आहे आमचा भारतरत्न पां.वा. काणे सरांनी लिहिलेला. त्यात काही प्रकर्षाने जाणवलेली उदाहरणे लिहितो इथे .
समुद्रउल्लंघन हे पाप मानले जायचे . धर्मशात्रानुसार हे पाप फक्त ब्राह्मणांच्या करिता होते , क्षत्रिय वैश्य शुद्रांना मुक्त संचार करण्याची मुभा होती.
मद्यपान हे पाप मानले जायचे - पण हे फक्त ब्राह्मणांच्या आणि वैश्यांच्या करिता, क्षत्रिय आणि शुद्रांना मद्यपानाची मुभा होती.
धनसंचय करणे हे ब्राह्मणाच्यासाठी पाप मानले होते मात्र क्षत्रिय वैश्यांना आणि शुद्रांना त्याची मुभा होती.
धर्मशास्त्रात त्रैवर्णिकांना घटस्फोट नावाचा विधीच नाही, पण शुद्रांना काडीमोड घेण्याची मुभा होती.
थोडक्यात काय तर पाप आणि प्रायश्चित्त हे बहुतांश करुन द्विजांकरिताच होते , शुद्रांना बहुसंख्य वेळा हे नियम, ह्या संकल्पना बांधील नसत !
खुप उदाहरणे आहेत. सर्वच लिहित बसत नाही. धर्मशास्त्राचा इतिहास संपुर्ण वाचुन झाल्यावर सारांश रुप लिहिण्याचा मानस आहे तेव्हा लिहिन नक्की !
21 Dec 2024 - 10:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धक्का वगैरे काही बसवून घ्यायचे नाही. वाचन आणि समज वाढली की, हळुहळु सगळं लक्षात येत जातं. साक्षात ज्या विधात्याच्या मुखातून द्विजन उत्पन्न झाल्यामुळे, आणि त्याच्या श्रेष्ठत्वामुळे जे सर्व वर्णाचे जे स्वामी बनले आहेत त्यांना खरं तर, पाप पूण्य वगैरे नसायलाच पाहिजे होतं. क्षत्रीय वैश्य शूद्र यांच्या जिविताचे मोल तसं ही धर्मशास्त्रानूसार अल्प समजल्या जात होतं. गतजन्मातील पाप-पुण्य कर्म-आणि पापांमुळेच तर, त्यांना अपवित्र अशा क्षत्रीय-वैश्य किंवा शुद्राचा जन्म त्यांना मिळाला असावा. (अवघड आहे सगळं )
ज्या कोणी बिचा-या सुत्रकारांनी द्विजनांना समुद्रौल्लंघन पाप ठरवले असेल त्यांचा अभ्यास कमी पडला असावा असे वाटते. आणि ज्यांनी कोणी असे समुद्रोल्लंघन केले असेल ते डाव्या-उजव्या बाजूला पाणी शिंपडून तसेही पापमुक्त झालेच असतील. शास्त्रे -सुत्रे ही आजच्या भाषेत त्याकाळातील सर्वोच्च कायदे असल्यामुळे त्यांनी जे लिहिले आहे, इतरांनी तितकेच फॉलो करायचं. विधात्याच्या मुखातून निर्माण झालेले ऑलरेडी पवित्र आणि सर्वोच्च होते. शास्त्रांच्या नियमांनुसार वागतांना इतर आणि स्ववर्णांवर वचक राहिला पाहिजे, इतरत्र जगभ्रमण करु नये म्हणून त्याला पाप ठरवले असावे.
बाकी चालू द्या.
-दिलीप बिरुटे
20 Dec 2024 - 6:29 pm | टर्मीनेटर
च्यामारी ब्राह्मण कोण? क्षत्रिय कोण? वैश्य कोण? आणि शुद्र कोण? ह्यावर प्रचंड वैचारिक गोंधळ माजला आहे माझ्या डोक्यात!
जात्याधारित वर्णव्यवस्था मानावी तर अस्मादिकांचा जन्म कोकणस्थ ब्राम्हण परिवारात झाला आहे त्यामुळे 'ब्राम्हण' असे म्हणता येईल!
कर्माधारित वर्णव्यवस्था मानावी तर मी एक व्यापारी/व्यावसायिक असल्याने वैश्य, माझ्याकडे नोकरीवर रुजू होणाऱ्यांना काम कसे करावे ते शिकवतो म्हणजे अध्यापन करतो म्हणुन ब्राम्हण, (पूर्वी समाजातील कोणासाठीही रस्त्यावरही उतरणारा) पण आता फक्त परिचयातील कोणावरही अन्याय होत असेल तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उभा राहतो त्यामुळे क्षत्रिय, की घरी नेमलेले सफाई कर्मचारी अनुपस्थित असतील त्यादिवशी किंवा विकएंड होमवर कोणी मदतनीस उपलब्ध नं झाल्यास आपल्याच घरातील संडास साफ करावा लागल्यास, किंवा फार्म वरील एखाद्या पाळीव प्राण्याचा अंत्यसंस्कार आपल्याच हातानी करावा लागल्यास शूद्र ठरणार असीन तर मी नक्की कोण आहे?
त्यामुळे माझ्या मते मी आणि माझ्या आजूबाजूला राहणारे / वावरणारे / बोलणारे सगळे मनुष्यप्राणी आहेत... त्यांची जात कुठली आणि धर्म कुठला ह्याला माझ्यादृष्टीने तरी काही महत्व नाही आणि त्याच्या तपशीलात जायची मलातरी गरज वाटत नाही.
माझे काही गैरसमज असल्यास ते जरूर दूर करावेत... पण कृपया बोली/व्यावहारिक भाषेत... ती वेद आणि उपनिषादांची भाषा मज पामराच्या आकलनाच्या पलीकडची आहे साहेब!
21 Dec 2024 - 12:21 am | प्रसाद गोडबोले
नमस्कार टर्मिनेटर !
ब्राह्मण - ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण
क्षत्रिय - आपल्या भूमीची देशाची धर्माची देवाची संस्कृतीची रक्षा करतो तो क्षत्रिय
वैश्य - जो देशात वास करतो , दैनंदिन व्यवहार चालावेत म्हणुन कामे करतो शेती , पशुपालन , कोणत्याही प्रकारचा व्यापार करतो वैश्य
शुद्र - वरील त्रैवर्णिकांना त्यांच्या कामात मदत करतो तो शुद्र .
वैदिक कालात कर्माने ठरत होते वर्ण , नंतर जन्माने ठरायला लागले , आता वृत्तीने ठरतात असे माझे मत आहे. सो सोप्प्या शब्दात बोलायचं तर तुम्हाला चॉईस आहे तुम्हाला कोणता वर्ण निवडा ! कोणी उच्च नाहीये कोणी नीच नाहीये , जो तो आपापल्या कामात महत्वाचाच आहे. पुरुषसुक्तात म्हणलं आहे तसे - एका देहाचे अवयव !
बाकी धर्माची उतरंड जातींचे पिरॅमिड ही संकल्पनाच चुकीची आहे. उपमा द्यायचीच झाली तर गोएथिक आर्च ही उपमा देता येईल
ह्यात की स्टोन शीर्षस्थानी आहे म्हणुन तो उच्च असे ठरत नसते , ह्या कमानीतील अन्य कोणताही दगड त्या की स्टोन इतकाच महत्वाचा असतो. कारण कोणताही काढला तरी आर्च ढासळणारच आहे ! असे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शुद्र एकामेकांवर अवलंबुन आहेत !
थोडक्यात काय तर तुम्हाला तुमचा वर्ण कोणता हे ठरवायची मुभा आहे ! लोकं काहीही का म्हणेनात - इट्स युवर लाईफ, युवर चॉईस !
21 Dec 2024 - 8:30 am | मुक्त विहारि
अगदी हेच डोक्यात आले होते....
धन्यवाद....
21 Dec 2024 - 8:57 am | प्रचेतस
हे कितीही आदर्शवादी वाटत असलं तरी वास्तवात तसं नसतं.
कर्माधारीत वर्णव्यवस्था असती तर उच्चकुलीन क्षत्रिय विश्वामित्राला ब्राह्मण बनण्यासाठी इतका संघर्ष करावा लागता ना.
इथं तर वैश्य शूद्रांचा विषयच नाही.
21 Dec 2024 - 9:05 am | कॉमी
आज शंकराचार्य आणि त्यांचे लोक वारंवार वर्णव्यवस्था जन्माधारित आहे असे सांगत असतात.
21 Dec 2024 - 11:13 am | Bhakti
असे लोक धर्माचे रक्षक नाहीत,धर्माचे भक्षक आहेत.ज्ञान साधना जन्माधारित वर्णव्यवस्थेवर आता नक्कीच नाही.
आजच्या ही काळात ज्ञान व कर्म यांच्यापेक्षा वर्ण मानणारे फेल गेले आहेत.हेच लोक( अशुद्ध विचारसरणी) सनातन बुडवणार....
21 Dec 2024 - 10:01 am | प्रसाद गोडबोले
अरे वा !
सर्वच जण इतक्या श्रध्देने जन्माधारित वर्णाश्रम व्यवस्था मानत असतील तर त्यात मला आनंदच आहे ! वर्णाश्रमव्यवस्थेने घालुन दिलेली कर्माची बैठक हाच चारही पुरुषार्थांचा आणि विशेषकरुन मोक्षाचा सर्वात सुलभ मार्ग आहे . इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मन:। संवादमिममश्रौषमद्भुतं रोमहर्षणम् ॥
आणि विश्वामित्रांच्या विषयी आपण स्वतंत्रपणे बोलु कारण तो मोठ्ठा विषय आहे. तुर्तास इतकेच म्हणतो कि विश्वामित्रांची वृत्ती क्षत्रियच होती. त्यांची ब्राह्मण होण्याची मनीषा मुळातच वसिष्ठांच्या प्रति असलेल्या असुयेतुन निर्माण झाली होती. कामधेनु आपल्याकडे असावी ह्या इर्ष्येतुन झालेली होती . ही मुळ वृत्ती बदलल्या शिवाय कसे ब्राह्मण होता येईल ?
मात्र एकदा ती वृत्ती बदलल्यावर ब्राह्मण विश्वामित्रांना जो अधिकार प्राप्त झालेला आहे तो अक्षरशः लोकोत्तर होता -
गायत्री मंत्र जो सर्वात पवित्र मंत्र मानला जातो त्याचे ऋषी हे विश्वामित्र आहेत ! वसिष्ठ नाहीत !!
असो.
अवांतर : आमचे गोत्र कौशिक आहे ! So now you know where 'all this' is coming from !
:)
21 Dec 2024 - 10:35 am | टर्मीनेटर
कर्मधर्मसंयोगाने आमचेही गोत्र कौशिक आहे 😀 So now you know where 'all this' is going to... 😂
BTW आत्ता सहज 'कौशिक गोत्र' असे गुगलवर टंकले तर खालील AI जनरेटेड रिस्पॉन्स आला. त्यातल्या ठळक केलेल्या गोष्टी वाचुन गंमत वाटली...
कौशिक, ब्राह्मणों का एक गोत्र और उपनाम है. इसका नाम ब्रह्मर्षि विश्वामित्र के नाम पर रखा गया है. कौशिक गोत्र से जुड़ी कुछ और बातेंः
जनरेटिव एआई की सुविधा फ़िलहाल एक्सपेरिमेंट के तौर पर उपलब्ध है.
😀
21 Dec 2024 - 11:39 am | मुक्त विहारि
आमचे पण गोत्र कौशिक...
कदाचित त्यामुळेच, तुझे आणि माझे, पहिल्याच भेटीत, विश्वासाचे नाते तयार झाले असावे का?
21 Dec 2024 - 11:51 am | प्रचेतस
आमचे गोत्र अत्री त्यामुळे सगळ्यांशी मैत्री.
21 Dec 2024 - 1:13 pm | मुक्त विहारि
Yes....
21 Dec 2024 - 12:12 pm | टर्मीनेटर
हा हा हा... असुही शकेल तसे, ब्रम्हर्षी विश्वमित्रांनाच ठाऊक 😀
बाकी ह्यावरुन वरती जो AI जनरेटेड रिस्पॉन्स दिला आहे त्यात
असेही एक वाक्य असायला हवे होते असंही वाटायला लागलंय, कारण आपल्यातही अनेक बाबतीत पराकोटीची मतभिन्नता आहे आणि प्रगो त्यांच्या लेखनातुन/प्रतिसादांतुन जे विचार मांडत असतात त्यातल्या कित्येक विचारांच्या अगदी विरुद्ध टोकाचे माझे विचार असतात! गंमतच आहे सगळी 😂 😂 😂
21 Dec 2024 - 1:12 pm | मुक्त विहारि
पण, विश्वास आणि मैत्री, ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.
प्रगो ह्यांचे विचार माझ्या डोक्यावरून जातात. त्यामूळे मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही...
21 Dec 2024 - 1:37 pm | टर्मीनेटर
अर्थातच... आणि मतभेद असुनही विश्वास आणि मैत्री पण आहे म्हणुनच तर "गंमतच आहे सगळी 😂 😂 😂" असे लिहिले होते!
त्यांचे तत्वज्ञानावर आधारीत विचार माझ्याही पार डोक्यावरून जातात, पण सर्वसामान्य किंवा सामाजिक विचार जे सहज 'समजतात' त्यातल्या काही (किंवा बऱ्याच म्हणा हवंतर) बाबतीत वैचारीक मतभेद आहेत असे म्हणयचे होते 😀
21 Dec 2024 - 5:19 pm | मुक्त विहारि
मैत्रीच्या नात्यात अशीच गंमत असते...
21 Dec 2024 - 11:57 am | मुक्त विहारि
मान्य आहे... सामजिक स्तरावर हे मान्य होणे कठीण आहे...(पण अशक्य नाही. कारण तसे असते तर, वाल्या कोळी याला, वाल्मिकी ऋषीं, हे पद नसते मिळाले.)
आपण आपला वैयक्तिक पातळीवर विचार करायचा.. आपल्या पुरती तरी जात पात पाळायची नाही. इतर जनतेला जसा विचार करायचा असेल तसा करू देत..
आमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात की, प्रत्येकाचे वैयक्तिक कपाट वेगळेच असते.आपली कापडे त्यात कोंबायला जाऊ नये.
20 Dec 2024 - 4:30 pm | कंजूस
ज्यांना गणितातील सेट थिअरी. सेट डायग्राम्स माहिती आहेत त्यांना चित्रे काढून दाखवता शक्य आहे. शब्द जंजाळाशिवाय.
एका विश्वात अनेक विश्व असतात. त्यांचा एकमेकांशी संबंध नसतो. ती संपूर्ण वेगळीच असतात. राजाचं राज्य आणि त्यातली प्रजा एक विश्व धरलं तरी अरण्यात शिकारीला गेल्यावर तिथल्या भिल्ल, अरण्यवासीयांवर त्याचा आदेश चालत नाही. ते अरण्य त्याच्याच राज्यात असलं तरी.
21 Dec 2024 - 1:36 am | प्रसाद गोडबोले
गणितातील सेट थिअरी
>>>
होय होय. मलाही संख्याशास्त्रचा विध्यार्थी असल्याने असा विचार करायला आवडते ! ह्याला अॅनालिटिकल फिलॉसॉफी म्हणतात . मी एक दोन दा तसा प्रयत्न केला होता , सर्व काही गणिती भाषेत लिहायचा . पण त्यावर एक मित्र बस मला इतकेच म्हणाला - Gödel's incompleteness theorems !
"Any consistent formal system F within which a certain amount of elementary arithmetic can be carried out is incomplete; i.e. there are statements of the language of F which can neither be proved nor disproved in F."
आता ह्यावर काय बोलणार !
आम्हाला आता शब्दजंजाळाशिवाय पर्यायच नाही !
21 Dec 2024 - 12:53 pm | कंजूस
'मी' नावाचा एक गोल दुसऱ्या एका मोठ्या गोलात काढला आणि त्या मोठ्या गोलाला ' ब्रह्म' हे नाव दिले तर मी आणि ब्रह्म यांचे स्पष्टीकरण खूप शब्दजंजाळापेक्षा सोपे होईल समजायला. अशीच चित्रे काढून विविध कल्पना समजावता येतील.
परंतू 'ज्ञान' किंवा 'विद्या' यांचे गोल कुठे आणि कसे दाखवायचे हे फार कठीण आहे कारण त्यांच्या व्याख्याच स्पष्ट होत नाहीत. सर्व गोल हे एकाच प्रतलावर आहेत असं समजून आपण चित्र मांडायला बसतो तेव्हा काही गोल वेगळ्याच प्रतलांत असण्याची शक्यताही लक्षात घ्यावी लागते. यातून तो ' Gödel's incompleteness theorems !' मांडला जात असणार.
20 Dec 2024 - 7:40 pm | Bhakti
चैतन्याला पाप पुण्याचा भोग नसतो.तो जीवात्म्याला असतो.चैतन्यस्वरूपाचा ध्यास असावा,चैतन्याचा आदर असावा.
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.
21 Dec 2024 - 1:08 am | प्रसाद गोडबोले
यासाठी अजून उदाहरणे द्याल का?नीट समजेल.
>>
एक खुप सुंदर उदाहरण आठवलं - समजा तुम्ही झोपलेले आहात. अगदी गाढ झोपेत . इतके गाढ झोपेत की तुमच्यासाठी तुमचे स्वप्न हेच सत्य झालेले आहे . आता कल्पना करा की स्वप्नात तुमच्या मागे वाघ लागलाय , तुम्ही जीवाच्या आकांताने पळाताय , तरीही वाघाने तुम्हाला पकडलेच , वाघाची नखं तुमच्या बरगड्यात घुसत आहेत , वाघ तुमच्या नरडीच्या घोट घेत आहे , आता तुम्ही झोपेत जीवाच्या आकांताने ओरडताय , वाचवा .... वाचवा !
आता तुम्हाला ह्या वाघापासुन वाचवण्याचा सगळ्यात सोप्पा उपाय काय ?
तुम्हाला झोपेतुन जागे करणे !
दॅट्स इट !
मी जीवात्मा आहे, ह्या देहात अडकलो आहे , हे भोग भोगतोय, वगैरे वगैरे स्वप्नातील भास असल्यासारखे आहे, त्यापासुन तुम्हाला तुम्हीच वाचवु शकता ! बस विचाराने विचार बदलुन !
समर्थ म्हणातात :
इतुकीं वेडें लाविलीं । ते माथा खेळे खेळ येकली । ते मायेनेंच विराली । पाहिजे माया ॥ श्रीराम
मी जीवात्मा आहे , असे वाटणे ही माया आहे , भास आहे , माया तीची ती एकटीच खेळत आहे , तिचा नाश कसा करणार ? मी शिव आहे ह्या धारणेने , ह्या विचाराने . पण हा विचारही मायाच आहे की !
मायेचे बळें ब्रह्मज्ञान । मायेकरितां समाधान ।मायाचि गोंवी आणि बंधन । तोडी , तेही माया ॥ श्रीराम
आणि माऊलींचे काय बोलणार , त्यांनी तर कहर उपमा दिली आहे !
जैसीं दंपत्यें परस्परे । तोडोनि पालटिलीं शिरें । तेथें पालटु ना पण सरे । दोहींचें जिणें ॥
जसे पती पत्नीने आपला अनुभव घ्यायचा म्हणुन आपपली मस्तके छाटली अन दुसर्याला बसवली तरी तिथे पालट होतच नाही , उलट दोघांचाही जीव जातो !
तसेच "अहं ब्रह्मास्मि" ह्या ज्ञानाने , विचाराने, "मी देहधारी जीवात्मा आहे" ह्या अज्ञानाचे, ह्या विचाराचे खंडन करायला गेल्यास तिथे अज्ञानही रहात नाही आणि ज्ञानही रहात नाही !
.
.
.
माया योग्याची माउली । जेथील तेथें नेऊन घाली । कृपाळूपणें नाथिली । आपण होय ॥ श्रीराम !
अवांतर : हे असं काही आठवलं की कोल्हापुरला जाऊन अंबाबाईचे दर्शन घ्यायची फार इच्छा होते !
पण मागच्यावेळेस दर्शनाला गेलेलो तेव्हा खुप रुसलो होतो जगदंबेवर. महाद्वारात उभा राहुन कडक नवस बोललो , आता तो पुर्ण जाल्याशिवाय तुझ्या दर्शनाला येणार नाही असं म्हणालो.
तस्मात, आता बघु कधी बोलावणे धाडते ती ते !
21 Dec 2024 - 7:06 am | Bhakti
गाढ झोप (स्वप्नावस्था) आणि जागृत याचे तुम्ही दिलेले पहिले उदाहरण तर खुप प्रसिद्ध आहेच.आदि शंकराचार्य आणि अद्वैत यांचा अभ्यास करतांना ही पोस्ट मागे एकदा लिहिली होती,ती देते.यात तेच पुन्हा समजते शुद्ध ब्रम्ह... शुद्ध चैतन्य..हेच अद्वैत..पाप पुण्य परे आहे _/\_मलापण काहीतरी सापडलंय..पण नीट मांडता येत नाही.तुम्ही इतक अभ्यासपूर्ण मांडता ,हेवा वाटतो :) धन्यवाद!
एक गंमत सांगते याविषयावर एक लेख वाचला होता. याला hallucinations म्हटले जाते???(लोकांना विचारावर विचार करणाऱ्यांना सिक म्हणावं वाटतं, आश्चर्यच आहे ;)
#अद्वैत
#consciousness
अद्वैत तत्त्वज्ञान जाणतांना जनक राजाची गोष्ट समजते.
जनक राजाला स्वप्न पडते.त्यात शत्रूंनी त्याच्या राज्यावर आक्रमण केले आहे.तो हरतो,अन्नान दशेत फिरतो.कोणी त्याला शत्रू भीतीने खायला देत नाही.राजा भुकेलेल्या लोकांच्या रांगेत उभा राहतो.जेव्हा त्याची वेळ येते तेव्हा अन्न संपते.त्याला उरलेली खरवड मिळते.या सगळ्या अपमानामुळे राजा कोलमडतो आणि रडत देवाचा धावा करत कोसळतो.
या दरम्यान झोपेत त्याचा ह्रदय वेग वाढतो, तो जागा होतो.आरडा ओरडा करतो.राणी , सेनापती सर्व राजाला समजावतात.पण राजा बडबडत राहतो.
शेवटी अष्टावक्र ऋषी येतात.
राजा त्यांना विचारतो" सर्व म्हणत आहे ते स्वप्न होते,पण मी तो अपमान ती अन्नाची भूक सगळं अनुभवलय मग ते खोटं कसं?आता ते कसं नाही?"
अष्टावक्र म्हणतात "राजा आता इथे तुला राणी दिसत आहे.सगळ्यांनाही दिसते.ही जागृत अवस्था मना बाहेर पाहते,ही सत्य आहे.स्वप्नात घडलेल्या गोष्टीं मधले शत्रू ,राणी,तुझी भूक याच साक्षीदार तू आहेस तीही स्वप्न अवस्था सत्य आहे.हेही सत्य तेही सत्य.जगत मिथ्या,दोन्ही अवस्थेत तू खरा आहेस."
याच्या पुढेच सोन्याचे उदाहरण दिले जाते.सोन्याचे दागिने हार,बांगड्या केल्या जातात.पण हे सर्व वितळवलं तर राहते सोनं राहतेच.
ही स्वप्नं,जागृत अवस्थेत आपणच असतो.तेच ब्रम्ह तत्व ,तीच ब्रम्ह अवस्था सतत जाणून राहिल्यास आपण कधीही स्थिर राहू शकतो.
चेतनेची एकच कायमस्वरूपी अवस्था आहे आणि ती म्हणजे ब्रह्म.
यात जगत मिथ्या म्हटलं गेलंय.पण शंकराचार्यांनी जगाला मिथ्या मानलं नाही.तर जगत आहे,मायाने जग बुद्धीवर आवरण चढून ब्रम्ह अवस्थेचा विसर पडतो.
-भक्ती
21 Dec 2024 - 10:09 am | प्रसाद गोडबोले
वाह भक्ती ताई !
मलाही अष्टावक्रगीतेची आठवण आलेली . त्यातील एक श्लोक उदृत करतो :
मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धाभिमान्यपि । किवदन्तीह सत्येयं या मतिः सा गतिर्भवेत् ॥
आणि म्हणुनच एकदा 'अघमर्षण ' केले की तुम्ही सुटलेले आहात ! त्यानंतर तुमचे सर्व प्रापंचिक व्यवहार हे खेळ आहेत बस्स ...
तुका म्हणे आता खेळतो कौतुके । जाले तुझे सुख अंतर्बाही ॥५॥
___________/\____________
22 Dec 2024 - 9:46 pm | प्रसाद गोडबोले
---
https://youtu.be/FJcjr8hw-sM?si=mXKFWFUopj8zsWmL
I know exactly how it feels like ! And you know it too !
22 Dec 2024 - 10:02 pm | Bhakti
अहाहा!
खूपच सुंदर!
20 Dec 2024 - 10:04 pm | वामन देशमुख
एकदा वाचून झालंय; विशेषतः प्रतिसादांच्यासोबत समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे.
द्विजाची कल्पना प्रतिसादातून कळली आणि पटली.
21 Dec 2024 - 12:36 am | राजेंद्र मेहेंदळे
२-३ वेळा वाचला--पण झेपत नाहीये. असो. आपल्याला सगळे समजलेच पाहीजे असा आग्रह नाही.
ते रमण महर्षी आणि नीमकरोली बाबा यांच्यामधे कोण आहेत हो गालातल्या गालात हसणारे?
21 Dec 2024 - 1:11 am | प्रसाद गोडबोले
अवतार मेहेर बाबा
https://en.wikipedia.org/wiki/Meher_Baba
21 Dec 2024 - 7:14 am | Bhakti
हे नगरचे अवतार मेहेरबाबा! नक्की भेट द्या ,इतके शांत स्थळी आहे.यावरचा आधीचा लेख
https://www.misalpav.com/node/49208
फोटो गेले आहेत.विकिपिडिया सर्च करा फोटोसाठी मेहेराबाद,अहिल्या नगर.
21 Dec 2024 - 7:29 am | कर्नलतपस्वी
+१
मातुल घराण्यात दत्तसंप्रदायाच्या अधिकारी,अनुग्रहित व्यक्ती होऊन गेल्यात. माझी पणजी,पणजोबा आणी आजोबा मामा देशपांडे. प्रेम मिळाले पण ज्ञान नाही.
मी चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या साधू सारखा.
साधू तपस्या करत असताना त्यांना देव भेटला. महाराजांनी विचारले ,देवा मोक्ष कधी मिळणार?देव म्हणाला, या झाडावर जीतकी पाने आहेत तितक्या वर्षानंतर.
सध्या पाने मोजत आहे.
लिहीत रहा वाचत राहू. जेव्हां उजाडेल तेव्हां उजाडेल. काही घाई नाही.
21 Dec 2024 - 12:56 pm | कंजूस
आपला इतरांशी संपर्क करण्याची कुवत नष्ट होते तोच मोक्ष.
21 Dec 2024 - 1:02 pm | Bhakti
करेक्ट करूणा (जो जसा आहे,जे जसं आहे तस स्वीकारणं) आणि अलिप्तता हा मोक्षाचा मार्ग!
21 Dec 2024 - 1:25 pm | प्रचेतस
ह्या विषयी शांतिपर्वातील जनक-पंचशिख संवाद व तद्नुषंगाने होणारे बौद्धमताचे खंडन मुळातून वाचणे आवश्यक आहे.
21 Dec 2024 - 7:13 pm | कंजूस
यावर एखादा लेख पाडावा फावल्या वेळात.