उस्ताद झाकीर हुसेन.
अंदाजे चाळीस वर्षांपूर्वी झाकीर हुसेन यांना सवाई गंधर्व संगीत महोत्सवात पहिल्यांदा पाहिले.अत्यंत आकर्षक व्यक्तीमत्व असलेले झाकीर म्हणजे प्रचंड उत्साह ,आणि चैतन्य.ते मंचावर एकटे येत नसत .त्यांचा श्वासच जणू असलेला 'जीवलग 'तबला' दोन्ही हातात असे. त्यांच्या साठी ती निर्जीव वस्तू नव्हती.ते होते त्यांचे आराध्य दैवत!
झाकीर भाई येण्याची घोषणा होताच टाळ्यांचा कडकडाट सुरू होई तो थांबतच नसे.त्या स्वागताचा स्विकार करताना तेही श्रोत्यांना अभिवादन करत
मंचावरच्या त्यांच्या अस्तित्वाने सगळे वातावरण भारून जात असे. मग पुढचा कितीतरी काळ ते स्वतः सोबत साऱ्यांनाच एका वेगळ्या विश्वात घेऊन जात.
तालवाद्याचे जाणकार असो ,की माझ्यासारखे नुसते संगीतप्रेमी,सारेच त्या स्वर्गीय ताल यात्रेचे प्रवासी होऊन जात.ती वाट कधी संपूच नये असे वाटे.
त्यांच्या तबल्याच्या माध्यमातून,भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरले आहे आणि जागतिक संगीतासोबत जोडले गेले आहे.त्यातून झालेले विविध प्रयोग हे त्यांचे भारतीय संगीतास दिलेले मोठे योगदान मानले जाते.
सुदैवाने त्यांना अनेकदा प्रत्यक्ष पाहायला ऐकायला मिळाले .कधी स्वतंत्र वादन,कधी पं.शीव कुमार शर्मा, पं. हरी प्रसाद चौरासिया,उ.अमजद अलीखां, उ.सुलतान खान ई.सोबत. तर कधी पं.जसराजांना साथ करताना.
पं.भीमसेनजींना साथ करत असतानाचे अविस्मरणीय क्षण पण सुदैवाने अनुभवले आहेत.आणि एकदा पं. रवीशंकर यांच्या सोबतही.
लातूरला त्यांचे तबलावादन सुरु असताना अचानक वीज गेली.पण तबल्यावरची बोटे थांबली नाहीत. मेणबत्त्या लावल्या गेल्या.मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेल्या मंचावर झाकीर भाई,त्यांचा तबला, त्यावर थिरकणारी त्यांची बोटे हे दृश्य, त्यांनी तेव्हा निर्माण केलेल्या ताल विश्वाएवढेच किंबहुना त्याहून जास्त परिणाम करुन गेले.ते आज ही डोळ्यासमोर दिसत आहे. त्याच कार्यक्रमात वाजवताना डग्गा फुटला.दुसरा डग्गा तयार होता.वादन सुरूच राहीले.
त्यांचा तबला जेवढा श्रवणीय,तेवढेच तबला वाजवताना त्यांच्या विविध मुद्रा,चेहऱ्यावरचे हावभाव, प्रेक्षणीय असे. सहकलाकार,श्रोते आणि त्यांचा 'तबल्या प्रतिचा आदर हे केवळ दर्शनी नसून मनापासून आहे हे जाणवत असे.जागतिक किर्ती मिळवलेल्या या असामान्य व्यक्तीचा नम्रपणा तर आपणा सर्वांसाठी मोठी शिकवण आहे.त्यांचा मिश्किल स्वभाव आणि विनोदाची जाण, नजरेतून, देहबोलीतून,मिश्किल शेऱ्याशतून व्यक्त होत असे.
झाकीर भाईंची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ होती.त्याकाळी
अनेक तबलावादक त्यांच्या सारखे केस वाढवून त्यांच्यासारखे 'दिसायचा' प्रयत्न करत.
फक्त कानसेन असलेला मी ही असंख्य तरुणां सारखा झाकीर प्रेमाने झपाटलेला होतो.तेंव्हा दूरचित्रवाणीने आपल्या जगण्याला कवटाळलेले नव्हते.एका नियत कालीकात,एका शर्टच्या जाहिरातीत,झाकीर भाईंची मोहक छबी दिसली.ते छायाचित्र कापून मी श्रध्देने घरी भिंतीवर चिकटवून ठेवले होते.
त्याच सुमारास एका शासकीय योजनेनुसार(चक्क) महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांपर्यंत तबला व संगीत पोहचवण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
झाकीरभाईं त्या निमित्ताने,बीडला येणार होते. कार्यक्रम दुपारी होता.मी तेव्हा सरकारी वकील म्हणून नोकरीत होतो.त्या कार्यक्रमास जाता यावे म्हणून मी कामास दांडी मारली होती. पण दुर्दैवाने काही कारणाने ते आलेच नाहीत.
नंतरच्या काळात ते अनेकदा अप्रत्यक्ष रित्या भेटत राहीले.कधी काही चित्रपटांत,कलाकार, संगीत दिग्दर्शक म्हणून. कधी 'वाह ताज'सारख्या जाहीरातीतून,'देस राग ',मिले सूर मेरा तुम्हारा 'मधून !कॅसेट,सिडी ,व्हीसीडी तर होत्याच. अनेक महान संगीतकारांच्या प्रवासाचा वेध घेणाऱ्या 'साधना 'नावाची दृश्य श्राव्य मालिकेत त्यांच्यावरचा भाग खूप छान होता.
२००९साली मुंबई ला होतो. तेथून औरंगाबाद (तेव्हाचे) जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून दुपारी देवगिरी एक्स्प्रेस मधे बसलो.गाडी सुरू होण्यापूर्वी दरवाजा जवळ एकदम गर्दी झालेली दिसली. रेल्वेचे काही अधिकारी आणि त्यांच्या सोबत निळा फिकट रंगाचा टीशर्ट आणि निळी जीन्स पॅंट अशा वेशातील एक व्यक्ती,सुहास्यवदने ,डब्यात शिरली व माझ्या समोरच्या बर्थवर बसली.त्या व्यक्तीकडे पाहीले अन् आश्चर्याचा व,आनंदाचा धक्काच बसला.चक्क उस्ताद झाकीर हुसेन!जगप्रसिध्द तबलावादक.माझ्या समोर, इतक्या जवळ! इतर प्रवाशांची पण तशीच अवस्था झाली असावी.
ते इथे कसे हा प्रश्न सर्वांना पडलेला. रेल्वे अधिकाऱ्यां कडून कळले की संध्याकाळी झाकीर भाईंचा कार्यक्रम डोंबिवली ला होता.मुंबईतून रस्ता मार्गे डोम्बीवलीला जाणे फार जिकिरीचे व वेळ खाऊ.त्यामुळे रेल्वे ने कल्याणला जायचे व तिथून डोम्बीवली सोयीचे होते. झाकीर भाईंचे चाहते सगळीकडेच आहेत.रेल्वेचे अधिकारी कसे अपवाद असणार? त्यामुळे ऐनवेळी ही रेलयात्रा ठरली होती.
गाडी सुरू झाली आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. मी ऐकत होतो.रेल्वे खात्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही असे एक जण म्हणाला.त्यावर ''हम जैसे लोगोंको मुफ्त मे ले जाओगे ,तो और क्या होगा?",झाकीर भाईनी मिश्किल शेरा मारला.
त्यांची लहानपणापासूनची अनेक दुर्मिळ छायाचित्रे असलेला संग्रह एका अधिकाऱ्याने सोबत आणला होता.
तो पाहून ते खूप खूश झाले.त्यातील 'अब्बाजीं'(वडील
उ.अल्लारखां) सोबतची छायाचित्रे द्या असे त्यांनी सांगितले.
गाडी दादर स्थानकावर थांबली.गाडीत ते आहेत हे अनेकांना आधीच माहिती असावे. खिडकीजवळ गर्दी जमली.कुणीतरी खाद्य पदार्थाची पाकिटे ,शीतपेयाच्या बाटल्या आत दिल्या.एवढे सगळे मी कसे खाणार म्हणत आम्हा सह प्रवाशांना पण त्यातून 'प्रसाद' दिला.
ते बोगीत असल्याची खबर कळाल्याने लोक येऊन पाहून जात होते. कुणीतरी फोटो घेवू देण्याची विनंती केली.ते आनंदानें तयार झाले. मग तो कार्यक्रम सुरू झाला.
एक महिलेला तिच्या छोट्या बाळासोबत फोटो घ्यायचा होता .तर झाकीर भाईंनी त्या बाळाला कडेवर घेतले व फोटो काढून घेतला.माझ्याकडच्या मोबाईल मधे त्यांची छबी टिपू लागलो तर त्यांनी मला जवळ बोलावून खांद्यावर हात टाकला आणि दुसऱ्या कुणाला तरी फोटो काढायला लावले.अनेक वर्षे ती आठवण मोबाईल मधे होती. त्याच्या प्रती काढायचे राहून गेले.पुढे तो मोबाईल खराब झाला.ते फोटो त्यातच गेले.
गाडी सुरू झाल्या पासून त्यांच्याशी बोलावे असे वाटत होते. मनातल्या मनात काय बोलावे याची जुळवाजुळव करत होतो.एवढ्यात कल्याण स्थानक आले.आणि ते अचानक उतरुन गेले.आजही ते अचानकच गेले . पुन्हा परत न येण्यासाठी!
साऱ्याच प्रवासांना शेवटी कुठेतरी विराम असतो.
अलौकिक, असामान्य प्रतिभा असणाऱ्या महान लोकांचा प्रवास सामान्य लोकांसारखा हे आयुष्य जगण्या पुरता मर्यादित नसतो.त्यांची शोधयात्रा वेगळ्या वाटेची असते.आयुष्य ज्या कार्यासाठी समर्पित केले, त्यात ;जे दिसते त्याच्या पल्याड काय आहे याचा शोध घेण्याची त्यांना जिज्ञासा असते.झाकीरभाई त्या शोधात निघून गेले असावेत.एका नव्या प्रवासाला.नव्या साधनेसाठी नव्या शोधासाठी. जाताना ते आपल्यासाठी ठेवून गेले आहेत त्यांच्या असंख्य आठवणी.आणि त्यांचा 'चिरंजीव' तबला.
आनंद चित्रपटातला संवाद आठवला.' आनंद मरा नहीं,आनंद कभी मरते नहीं.'
खरं आहे.' झाकीर मरा नहीं झाकीर कभी मरते नहीं'. उस्ताद झाकीर हुसेन जीवंत आहेत.त्यांच्या तबल्याच्या रुपाने!
नीलकंठ देशमुख
प्रतिक्रिया
19 Dec 2024 - 6:15 pm | मुक्त विहारि
अनुभव कथन आवडले...
ध्यानी मनी नसताना अचानक आपले आराध्य दैवत समोर आले की मन सैरभैर होतेच. निळू फुले, यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे.
19 Dec 2024 - 7:35 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
19 Dec 2024 - 7:25 pm | कर्नलतपस्वी
आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
19 Dec 2024 - 7:35 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद
19 Dec 2024 - 8:07 pm | चौथा कोनाडा
अ ति श य सुंदर अनुभव !
19 Dec 2024 - 9:04 pm | नीलकंठ देशमुख
धन्यवाद. प्रतिक्रिया वाचून छान वाटले.
20 Dec 2024 - 8:14 pm | कंजूस
ओळख आवडली.
मनोगत मलाही लेख वाचला. https://www.manogat.com/node/26938
20 Dec 2024 - 8:15 pm | कंजूस
मनोगतमधलाही लेख वाचला.