बिहार मध्ये एक म्हण प्रसिद्ध आहे, " जब तक रहेगा समोसे में आलू, बिहार में रहेगा हमारा लालू". ही आहे समोसेची महत्ता. माझ्या आयुष्याचा सुरवातीचा कालखंड जुन्या दिल्लीत गेला. जुन्या दिल्लीत अनेक बाजारांची नावे त्या बाजारात मिळणार्या वस्तूंवर आहे. आम्ही गली तेलियान मधून खाण्याचे तेल विकत घ्यायचो. बतासे वाली गल्लीत साखर, बतासे, गुड, मुरब्बा ते चॉकलेट पर्यन्त गोड पदार्थ मिळायचे. तसेच एका गल्लीचे नाव समोसे वाली गल्ली आहे. या गल्लीत विभिन्न प्रकारचे समोसे मिळतात. त्यात मुगाच्या आणि चण्याच्या डाळीचे समोसे सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. हे समोसे काही महीने टिकतात. लोक किलोच्या भावाने हे समोसे विकत घेतात. डाळींचे समोसे चहा सोबत मस्त लागतात. या शिवाय आजकाल लग्नात डाळींचे समोसे स्टार्टर मध्ये ही ठेवले जातात. दिल्लीत लग्नाच्या मेजवानीत किमान आठ ते दहा स्टार्टर ठेवावेच लागतात. या गल्लीतला सर्वात प्रसिद्ध समोसा मख्खन समोसा आहे. मख्खन समोसेचे कवर शुद्ध लोण्याचे असते आणि आत मध्ये मेवा भरलेला असतो. मख्खन समोसे सदैव बर्फावर किंवा फ्रीज मध्ये ठेवावे लागतात. हिवाळ्यात या समोस्यांना खाण्याची मजा काही औरच आहे. तरीही हा व्हीआयपी समोसा नाही.
उत्तम नगरच्या मेट्रो स्टेशन जवळ संध्याकाळी रस्त्यावर दुकान लावणारा एक विक्रेता आज ही दहा रुपयांचे पाच छोटे-छोटे समोसे विकतो. गरीब मजूर इत्यादि हे समोसे विकत घेतात. समोसा खाण्याचा शौक पूर्ण करतात. आमच्या भागात जीवन पार्कच्या एका गल्लीत कॉर्नरवर समोसा विकणार्याचे दुकान आहे. याचा समोसा सारणात फक्त बटाटे, तिखट, हिरवी मिरची थोडे अमचूर आणि हिवाळ्यात कोथंबीर असते. पूर्वी दहा रुपयांत आता 15 रूपयांचा एक विकतो. तो दिवसातून किमान दोन ते तीन हजार समोसे विकतो. जुन्या दिल्लीत पूर्वी नावेल्टि सिनेमा हाल होता. कधी काळी याचा मालिक मराठी माणूस होता. व्ही शांतारामचे सर्व सिनेमे इथेच लागायचे आणि सहा-सहा महीने चालायचे. याच भागात एका हलवाईच्या दुकानात समोसे मिळायचे. हा दुकानदार उकडलेल्या बटाट्यांना मैश करून त्यात, कुटलेले धने, काळे मिरे, अनारदाना सहित अनेक मसाले टाकायचा. या शिवाय बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथंबीर, काजू, बदाम इत्यादि टाकून समोस्याचे सारण तैयार करायचा. तो हिरवी तिखट आणि खजुराची चटणी समोस्यांसोबत द्यायचा. आजही त्या दुकानातील समोस्याचा स्वाद जिभेवर आहे. पंजाबी दुकानदार समोसे थोडे वेगळे बनवितात. काही दुकानदार समोसा सारणात बटाटे सोबत पनीर आणि मटार ही घालतात. समोसे छोले सोबत सर्व करतात. नागपुर इथे दही समोसा खाल्ला आहे. तिथले समोसे विक्रेता प्लेट मध्ये समोसा तोडून त्यात दही आणि हिरवी चटणी टाकून देतात. या शिवाय समोस्याचे अनेक प्रकार देश भरात विकले जात असतील. पण हे व्हीआयपी समोसे नाहीत. दिल्लीच्या शेकडो सरकारी केंटीन मध्ये समोसा सर्वात जास्त विकणारा पदार्थ आहे. आज ही केंटीन मध्ये पाच ते दहा रुपयांत मिळणारा समोसा सर्वात स्वस्त पदार्थ असल्याने सरकारी बाबूंमध्ये लोकप्रिय आहे. इथे समोसा खात चहावर होणार्या चर्चेत देशाचे भविष्य ठरते, असे बाबूंना वाटते.
समोसा हा आम जनतेचा नाश्त्याचा पदार्थ आहे. असा माझा गोड गैर समज होता. पण आता कळले समोसा ही फाईव स्टार आणि व्हीआयपी असतो. एका व्हीआयपी समोस्याची किंमत किमान दीडशे रुपये असते. हा समोसा खाण्याचा अधिकार फक्त मोठ्या लोकांना असतो. हे व्हीआयपी समोसे चुकूनही आम जनतेने खाल्ले तर त्याचे त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. असाच एक किस्सा शिमल्यात झाला. सीआयडी कार्यालयात मुख्यमंत्रीच्या नाश्त्यासाठी आलेले 21 व्हीआयपी समोसे चुकून त्यांच्याच सेक्युरिटीत असलेल्या पोलिसांच्या जवळ पोहचले. त्यांनी चहा सोबत व्हीआयपी समोसे मिटक्या मारत खाल्ले. व्हीआयपी समोसे त्यांना पचणे शक्यच नव्हते. शिपायांनी व्हीआयपी समोसे खाणे हा मोठा गुन्हा ठरला. ह्या गुन्हाचा तपास सीआयडी ने केला. इथेही तपास रिपोर्ट लीक झाली. सीआयडी ने तपासात या घटनेला "इसे सरकार विरोधी कृत्य" म्हंटले आहे. चुकून समोसा खाणे सरकार विरोधी कृत्य? यावरून व्हीआयपी समोसा किती पावरफुल्ल असतो याची प्रचीती सर्वांनाच आली असेल. आता या प्रकरणाचा गाजवाजा भरपूर झाल्याने, काही कर्मचार्यांवर राज्य सरकार निश्चित कठोर करणार. असो.
प्रतिक्रिया
9 Nov 2024 - 1:56 pm | कंजूस
समोसा विआइपी नसतो. ...
विशेष पाहुण्यांच्यासाठी बनवलेले ,आणलेले पदार्थ हे विआइपी फराळात मोडतात, संबोधतात. ते पदार्थ कितीही क्षुल्लक असले तरीही त्याला विआइपी टॅग लागतो. यजमानांच्या घरच्या नोकरांनी ते खायचे नसतात. विआइपी पाहुण्यांनी पदार्थ खाल्ले नाही आणि यजमान ते टाकून देणार असले तरी ते खायचे नसतात.
9 Nov 2024 - 5:37 pm | धर्मराजमुटके
मस्तच ! समोसा सारखाच खुसखुशीत लेख ! मात्र समोसा फक्त कार्बोहायड्रेटस, कोलेस्ट्रॉलच वाढवतो, त्याचा जीभेला फायदा आहे मात्र शरीराला फायदा काहीच नाही.
9 Nov 2024 - 6:56 pm | कंजूस
नाही पटत.
समोसा गरीबांचं पूर्णान्न आहे. कष्ट करून एक समोसा पाव खाऊन त्यांचं पोट भरतं. ....पोषक आहे.
पण कुणी दिवसभर बसून चरत असतात त्यांनी आणखी तळलेले पदार्थ खाऊन काय होणार? क्यालरीचा हिशोब करतात.
9 Nov 2024 - 7:42 pm | धर्मराजमुटके
नाही पटत.
हरकत नाही. बहुसंख्यांना आपला प्रतिसाद पटावा असे लिहावे एवढा विवेक माझ्याठायी आहे पण त्यात मी अजून पटाईत झालेलो नाही.
10 Nov 2024 - 5:41 pm | विवेकपटाईत
सौ ने कालच ठणकावून संगितले किती ही समोसा पुराण लिहा मी काही तुम्हाला समोसा खाऊ देणार नाही. आधीच दिवाळीचा भरपूर फराळ खाल्ला आहे. काही दिवस जिभेवर नियंत्रण ठेवा. काल रात्री स्वप्नात ही समोसे येत होते.
9 Nov 2024 - 8:37 pm | चित्रगुप्त
समोसा-पुराण मस्त जमले आहे. मलासे वाटते परदेशातही सर्वाधिक लोकप्रिय भारतीय पदार्थ समोसाच असावा.
13 Nov 2024 - 11:07 pm | जुइ
परदेशात भारतीय उपहारगृहातील मेन्यू कार्डही समोसाशिवाय कधी छापले गेलेले आजवर पाहिले नाही.
लेख अगदी झक्कासं झाला आहे, आवडला!
13 Nov 2024 - 11:59 pm | गवि
तसे असेलच. पण सामोसा हा मूळ भारतीय पदार्थ नसून त्याचा उगम मध्य पूर्वेतील आहे. अगदी नावापासून सर्व.
असे बऱ्याच ठिकाणी वाचले होते.
9 Nov 2024 - 9:19 pm | कंजूस
नवी दिल्ली महाराष्ट्र सदनजवळच्याच मौर्य हॉटेलमध्ये राहिलो होतो थंडीमध्ये ते आठवलं.( गिजरे यांनी बुक करून दिलं होतं)
तिथे समोसे छोले खाल्ले होते. छोल्यांमध्ये टामाटो घालून चांगला रंग आणत नाहीत. आमचूर घातल्याने काळपट रंग येतो परंतू चविष्ट लागतात. समोश्यात उगाचच काजू बेदाणे घालून महाग करत नाहीत, वाटाणे आणि काळी मिरीचा तिखटपणा असतो. पोट चांगलं भरतं.
10 Nov 2024 - 12:23 am | नठ्यारा
सामोसा दुकानात तर मिळतोच. पण आजून एक ठिकाण आहे. ते म्हणजे तुमचा फोन. अगदी स्मार्ट नव्हता तेव्हाही सामोसा मिळायचा फोनवर. फक्त चालू असलेलं सिमकार्ड आंत पाहिजे. मग तुम्ही एक रुपयांत कुठेही सामोसा पाठवू शकता. हल्ली मासिक चवड असेल तर त्यात दोनपाचशे सामोसेही अंतर्भूतही असतात म्हणे.
-नाठाळ नठ्या
10 Nov 2024 - 9:55 am | टर्मीनेटर
मस्त लेख! हा माझा आवडता पदार्थ आहे.
वर चित्रगुप्त काकांनी म्हंटल्याप्रमाणे 'समोसा-पुराण' आवडले.
सायनच्या 'गुरुकृपा' मधला समोसा विषेश आवडीचा आणि तिथला समोसा-रगडा तर लै भारी!
हिमाचल प्रदेशातल्या दोन ठिकाणचे समोसे चांगलेच लक्षात राहिले आहेत त्यापैकी एक कुलुचा आणि दुसरा शिमल्याचा.
कुलुच्या बाजारपेठेत तुम्ही उल्लेख केलाय तसा प्लेट मध्ये समोसा तोडून त्यात दही आणि हिरवी चटणी टाकून देतात, छान लागतो तो पण. आणि दुसरा सिमला करार झाला होता त्या बार्नेस कोर्ट (आताचे राज भवन) जवळच्या एका धाबा टाईप 'छपरुट' हॉटेल मधला. ते हॉटेल तिथल्या उत्तम चवीच्या समोश्यामुळे जेवढं लक्षात राहिलंय त्यापेक्षा त्या ठिकाणी मिळणाऱ्या 'अजीबोगरीब' आलु पराठ्यामुळे जास्त लक्षात राहिलंय. आधी तव्यावर व्यवस्थित बनवुन झालेला चांगला १०-१२ इंच व्यासाचा आलु पराठा अक्खाच्या अक्खा भल्या मोठ्या कढईत तळुन लिंबाचं लोणचं आणि हिरव्या चटणी बरोबर सर्व्ह करतात. सकाळी साडे आठ-नऊच्या सुमारास नाश्ता म्हणुन तेलाने थबथबलेला तो 'आलु पराठा' खाणाऱ्यांची त्या दुकानातली गर्दी बघुन थक्क व्हायला होते 😀
10 Nov 2024 - 11:17 am | कंजूस
सायनच्या 'गुरुकृपा' मधला समोसा....
विषेश आवडीचा आणि तिथला समोसा-रगडा तर लै भारी! पण हे कधीचं ? आता तसा मिळत नाही. आमचं शिक्षण बाजूच्याच शाळेत झालं १९७० साली त्याचा प्रसार झाला. रूपं सिनेमात इंटरवलला मिळायचा.
10 Nov 2024 - 11:41 am | टर्मीनेटर
तिथे बसुन समोसा-रगडा खाल्याला आता एखाद वर्ष तरी उलटले असेल, पण कोणी तिकडुन येणार असेल तर अजुनही समोसा पार्सल घेउन येत असतात.
ही अस्मादिकांच्या जन्माच्याही लै आधीची गोष्ट म्हणायची 😀
आता बऱ्याच टॉकिज/मल्टीप्लेक्स मधे मिळतो, आपल्या पुजा, मधुबन आणि गोपी मध्येही पाटी वाचली आहे.
11 Nov 2024 - 1:27 pm | नचिकेत जवखेडकर
खुसखुशीत लेख. सामोसा हा अत्यंत आवडीचा पदार्थ आहे. सामोसा जिथे असेल तिथे ट्राय करून बघायला आवडतो. अजूनपर्यंत माझ्या आठवणीत खाल्लेला उत्तम सामोसा म्हणजे २००९ मध्ये चंदिगढमध्ये. केवळ १० रुपयांना सामोसा आणि छोले. व्वा! मजा आली होती एकदम.
12 Nov 2024 - 8:04 am | nutanm
परळच्या गौरीशंकरचाही समोसा छान असतो .समोरच आमचे प्रसिद्ध कार्या लय असल्याने कधीही कोणाचयाही पार्टीत तोच तो गौरीशंकरचा केशरी पेढाव,समोसा व,जालीवाला वेफर्स असायचेच.किंवा दिवाळीत आफिसचया सर्वांनी काढलेलयि व दिलेल्या वर्गणी त हटकून समोसा वेफर्स व केशरी पेढा असायचेच. क्वचीत तसे परळ टी.टीला खाणयाची मजा असे पेढाचया ऐवजी काजूकतली किंवा पांढरी बर्फी
,छान वाटे. किरतीमहालचे कटलेट, जनताचे फरसाण, ठककरचे अनेक पण महागडे पदार्थ, रुची नविन हाटेलात जेवण छान वाटे. सर्व जण जाऊन एक दिवस एकत्र जेवायला.कोणी पार्टी दिल्यावर.मस्तच वाटे.
16 Nov 2024 - 2:57 pm | diggi12
एफ दक्षिण कार्यालया जवळचे का ?