नमस्कार मि.पा.कर !
आज १४ मे , एका थोर सेनानींची जयंती ! कुणाची हे आपण ओळखले असेलच असे गृहित धरुन लिहित नाही , पण पुढील लेखावरून त्याची सहज कल्पना येईल !
या अद्वितीय योध्द्यास कोटी कोटी प्रणाम !
उदय गंगाधर सप्रेम-ठाणे.
३५२ वर्षांची तळमळ.....
नमस्कार माझ्या देशबांधवांनो आणि भगिनींनो !
आमचा जन्म आजपासून बरोबर ३५२ वर्षांपूर्वी झाला , आणि आमच्या ध्येयाविषयी किंवा आमच्या कुवतीविषयी काही व्यक्तींना असणार्या शंकांमुळे आम्हाविषयी या व्यक्तींनी फक्त गरळच ओकली आहे किंबहुना आमचा एकमेव दोष फार मोठा करून इतिहासाला दाखवला आहे ! त्यामुळे आपल्यापैकी बर्याच जणांच्या मते आम्ही कुविख्यात असण्याची शक्यता आहे.पण आम्ही केलेल्या एकमेव चुकीचे आम्ही प्रयश्चित्त पण तितकेच कठोर आई भवानीकडून "याची देही याची डोळा" मागून घेतले आणि त्या परम दयाळू मातेने ते दान आंहांस दिलेही !
सांगण्याचा मुद्दा असा की, या सगळ्या गोष्टींमुळे माझा जन्म आपणास लक्षात असण्याची सुतराम शक्यता नाही , पण आमचे मरण मात्र आपल्याला जरूर लक्षात असेल - आधी आमची उंटावरून बसून तख्ता कुलाह लावून विदुषकाच्या पेहेरावातील काढलेली धिंड, मग आमचे हाल हाल करताना आधी डोळे, मग जीभ , मग सार्या अंगाची सालडी , मग हात, मग पाय आणि सर्वांत शेवटी आमचे मस्तक धडावेगळे करून आमचे एक एक अवयव वढू बद्रूक येथे गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर टाकणार्या औरंगझेबास आणि शरीराच्या तुकड्या तुकड्यांनी तुमच्या राज्यांतील नदीकिनारी पडलेल्या स्वराज्याच्या दुसर्या छत्रपतींना तुम्ही कदाचित् ओळखत असाल ,नाही?
काय आहे , की गेली ३२० वर्षे आमचा आत्मा तळमळतो आहे आणि आजचे आमचे वंशज मराठा जे भोगत आहेत , आमचा मराठी माणूस जे भोगत आहे ते बघून आत्मा तडफडतो आहे , पण शरीर नसल्याने आम्ही हतबल आहोत ! पुन्हा एकदा आम्ही आपल्यासाठी मरण पत्करायला तयार आहोत , पण माझ्या मराठ्यांनो , तुम्ही जे निधड्या छातीचे वीर आहात , ज्यांनी दुबळ्यांना संरक्षण द्यायचे तेच असे नेभळट , शेंदाड होऊन आरक्षण मागाताय्?माझी खात्री आहे , की हे कुणीतरी तुमच्यावर लादलेले ओझे आहे , पण मग तुम्ही ते झुगारून का नाही देत? आबासाहेबांनी ज्या महाराष्ट्रात एक अफझल्खान संपवला , तिथेच दुसरा अफझल हजारो निष्पाप जीवांचा बळी घेवून जीवंत राहू शकतो?आणि हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पहाताय? कोण कुठला कसाब हजारो जीवांना ठार मारून अजून जीवंत रहातो आणि हे तुम्ही सारे इतक्या थंडपणे पहाता?मला आज आनंद वाटतोय की हे सारे बघायला आमचे डोळे आमच्याजवळ नाहीत , बोलायला आमची वाचाच नाही , फक्त हे सारे आम्ही आमचा आत्मा आमच्या काही निस्सीम भक्तांपैकी एक - तुमच्य दृष्टीने नगण्य असलेल्या उदय नामक एका माणसाच्या शरीरात शिरून त्याच्या मुखाने बोलतोय इतकेच !
आम्ही वयाच्या आठव्या वर्षी मोंघलांची मनसबदारी पत्करली, राजकारणाच्या सोयीसाठी आम्ही आबासाहेबांचे प्यादे झालो - अरे ज्या देवमाणसाने अख्खा महाराष्ट्र घडवला त्याच्या पोटी आम्ही जन्मलो आणि आमरण फक्त स्वराज्याची सेवाच केली , त्या आम्ही दिलेरखानांस मिळून जी घोडचूक केली ती काही स्वराज्याच्या नरडीस नख लावण्यासाठी नव्हे तर आम्ही पण काहीतरी स्वतंत्रपणे निर्माण करू शकतो आणि ते पण स्वराज्याच्या एकाही छदामास हात न लावता - हे आम्हांस दाखवून द्यायचे होते , पण आमचा होरा चुकला आणि भूपाळ्गड येथील किल्ल्यावरील ७०० निरपराध लोकांचे हातपाय तोडून ते पाप दिलेरखानाने आमच्या माथी एक कधीही न पुसला जाणारा कलंक म्हणून फासून टाकले ! आख्ख्या जिंदगीत केलेले बाकी सर्व स्वराज्यप्रेम आणि सेवा या एका चुकीने झाकली गेली ! पण आमचे आबासाहेब फार थोर मनाचे आणि तितक्याच दूरदृष्टीचे , त्यांनी आमची यातूनही सोडवणूक केली.आमचा हा सवाल आहे तमाम तत्ववेत्त्यांना , की छत्रपती शिवाजी महाराज - जे अन्याय कधीही खपवून घेणारे नव्हते त्यांनी जर का त्यांचा मुलगा बदफैली असता तर त्यांस जिता सोडले असते काय? "आपलेच दात आणि आपलेच ओठ" म्हणून घरच्याच महाराणी साहेबांची जनानी बुद्धी यामागे आहे हे हलाहल पचवत आणि शरीरावर झालेले विषप्रयोग पचवत त्यांनी देह त्यागला ! सख्खा मोठा मुलगा जिवंत असताना वडीलांच्या अंत्यसमयी त्यास न बोलावण्याचे "पुण्य" पदरी पाडून घेणार्या सोयराऊ साहेबांनी उभा जन्म आमच्याशी दावा मांडला ! ज्या दिल्लीश्वर औरंगझेबास थोपवण्यास स्वराज्यात "शंभूराजे" सोडून दुसरे कुणीही समर्थ नाही अश्या विश्वासाने आबासाहेबांनी आम्हांस दिलेरखानापासून सोडवून आणले , त्यांच्या घरातूनच मोठमोठ्या शत्रूंची फळी आमच्याविरुध्द उभी करण्यात आली आणि हे बघण्यासाठी आबासाहेब , थोरल्या आऊसाहेब - जिजाऊसाहेब जिवंत नव्हत्या हे एका दृष्टीने स्वराज्याचे भाग्यच म्हणायचे !
यानंतर आम्हास संगमेश्वरात बेसावध पकडून देण्यात घरचेच जावई गणोजी शिर्के सामील होते हे बघण्यास आबासाहेब तुम्ही नव्हतात हे पण स्वराज्याचे भाग्यच !
यानंतर छत्रपतींचे तीनही जावई - हरजीराजे महाडिक, गणोजी शिर्के आणि महादजी निंबाळकर आमच्या धिंडीत सामील होते , चोर्-चिलटे, रांडा-पोरे-सोरे कुणीही आमच्या आणि कवी कलशांच्या तोंडावर थुकत होते , अंगावर धोंडे मारत होते ....हे पहायला पण आबासाहेब तुम्ही नव्हतात हे पण स्वराज्याचे भाग्यच !
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असेल तर स्वराज्याचा दुसर्या छत्रपतींनी म्हणजे आम्ही , स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" एह्वढे तरी नकीच दाखवले नाही काय?
आज आम्ही - म्हणजे आमचा आत्मा ३५२ वर्षांचा झाला , पण अजून आम्हांस कळत नाही की मराठी माणूस आपल्यावर होणार्या अन्यायाविरुद्ध पेटून कधी उठणार आणि त्यासाठी परत कुणीतरी शिवाजी , संभाजी किंवा "प्रैत्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां , धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगेयुगे"असं सांगणार्या श्रीकृष्णाची वाट पहाण्यात आम्ही मराठी माणसे किती वर्षे अजून थांबणार आहोत? देव निष्क्रिय दुर्बळ्यांची नाही तर प्रयत्न करणारांचीच साथ करतो हे ओळखून जर महाराष्ट्रीय माणूस वागेल तर कदाचित आमचा आत्मा मुक्त होईल सुद्धा , कुणी सांगावं?
आमची मुक्तता आपल्याच पदरात घालून आपला निरोप घेतो , जय भवानी , जय शिवाजी , जय महाराष्ट्र, जय भारत !
प्रतिक्रिया
14 May 2009 - 10:05 am | नवाब अमोल
काही दिवसांपुर्वीच "छावा" वाचले...
पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले .हे खरे पण स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" हे शंभुराजेंनी शिकविले..
हजार प्रणाम........
14 May 2009 - 10:10 am | विसोबा खेचर
शंभुराजांना मानाचा मुजरा...
(थोरल्या राजांचा भक्त) तात्या.
14 May 2009 - 10:13 am | क्लिंटन
संभाजी राजांच्या पवित्र स्मृतीस शतश: वंदन.
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
14 May 2009 - 10:24 am | मैत्र
स्वाभिमानी लढवय्या संभाजी राजांना मुजरा ...
शिवाजी महाराजांचं कर्तृत्व असलेला वा संभाजी राजांसारख्या विलक्षण निधड्या छातीचा नेता परत होणे नाही...
14 May 2009 - 11:23 am | विशाल कुलकर्णी
छत्रपती संभाजीराजांच्या स्मृतीस मानाचा मुजरा.............
आम्हाला माणसे ओळखता येत नाहीत हे महाराष्ट्राचे खुप मोठे दुर्दैव आहे.
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
14 May 2009 - 12:13 pm | सागर
अशा साहसी छाव्याचा एक शतांश जाज्वल्ल्य अभिमान आणि पराक्रम आजच्या समस्त मराठी जनांच्या नसानसातून भिनला
तरी ह्या शूर छाव्याच्या बलिदानाचे सार्थक होईन
उदय मित्रा, छान श्रद्धांजली अर्पिली आहेस शंभू महाराजांना
प्रति शिवाजी अशा शंभूमहाराजांना मानाचा मुजरा
जय भवानी !!! जय शिवाजी
- सागर
14 May 2009 - 12:37 pm | समिधा
मला इथे एक सांगावे वाटते माझी एक खुप जवळची मैत्रिण आहे,तिच्या घरी सभाजी महारांना मरताना खुप हाल सोसावे लागले याची आठवण म्हणुन १ महीना १ वेळाच जेवतात बाकी इतर काही खात ही नाहीत आणि त्या काळात घरी आलेल्या पाहुण्यांसाठी पण हाच नियम असतो.
खुप छान लिहील आहेत तुम्ही.
ससमिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
14 May 2009 - 1:30 pm | धमाल मुलगा
समिधाताई, खरंच तुमची मैत्रिण आणि तिच्या घरचे ग्रेट आहेत.
सिंहाचं काळीज असलेल्या ह्या छत्रपतींच्या छाव्याला आमचाही मानाचा मुजरा.
उदयराव,
खरं आहे आपलं म्हणणं! आज महाराज आणि शंभूराजे नाहीत हेच बरं आहे. त्यांच्या डोळ्यांना सध्या चाललेली मराठी जनतेची विटंबना पहावली नसती आणि जर त्याविरोधात आवाज उठवायचा त्यांनी प्रयत्न केला असता तर आपल्याच मराठी माणसांनी त्यांना ठेचुन काढलं असतं. जाऊ द्या!
आपल्या महाराष्ट्राचे ते सोनियाचे दिन संपले हेच खरं. आता उरलेत ते फक्त 'सोनिया'चे दीन :(
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
14 May 2009 - 2:14 pm | उदय सप्रे
धमाल मुला,
तुमचे अभिप्राय आणि प्रतिसाद नेहेमीच मस्त असतात आणि तसे ते मिपा वरील बहुतेक सगळेच लोक चोखंदळपणे वाचतात त्यामुळे त्यांचे प्रतिसाद वाचायला पण मजा येते.
समिधा ताईंची मैत्रीण आणि त्यांच्या घरचे ग्रेट आहेत यात वादच नाही , नुसते वाचून पण डोळ्यात पाणी आले माझ्या !
असाच म्या पामरावर लोभ असो द्यावा मालक !
उदय सप्रेम
14 May 2009 - 6:03 pm | अनामिका
क्षणभर साक्षात "शंभुराजे " आपली व्यथा शब्दात मांडतायत असा भास झाला.............आपल्या लिखाणाबद्दल काहीही लिहावयास शब्द कमी पडतायत............
निव्वळ अप्रतिम..............
पण शंभुराजांची व्यथा ही फक्त महाराष्ट्रापुरती व मराठी माणसापुरतीच खचितच नसावी .......... हिंदु धर्माचा जाज्वल्य अभिमान बाळगणारा व त्या साठी निधड्या छातीने व बेरडपणे पापी औरंग्याचे अनन्वित अत्याचार निडरपणे सोसणार्या थोरल्या महाराजांच्या ह्या सुपुत्रास मानाचा मुजरा.
फंदफितुरीने एका महान योध्याचा केलेला घात इतिहासात नमुद असतानाही आपण त्यावरुन धडा घेत नाही हेच आपल दुर्दैव..........
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
14 May 2009 - 2:20 pm | मनीषा
अगदी योग्य ...
स्वराज्याच्या पहिल्या छत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असेल तर स्वराज्याचा दुसर्या छत्रपतींनी म्हणजे आम्ही , स्वाभिमानी माणसाने "कसे मरावे" एह्वढे तरी नकीच दाखवले नाही काय?
--- पण अतिशय दुर्दैवी राजा .. बहूतेक कारकीर्द घरातल्यांच्या कुटील कारस्थानां ना नेस्तनाबूत करण्यात गेली ..
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. त्यानी "नखशिखा" नावाचे काव्य लिहिले होते .. (ज्या मुळे महाराणी सोयराबाईंच्या हातात एक कोलीतच मिळाले)
त्यांचे संपूर्ण चरित्र वाचल्यावर असे वाट्ते त्यांना सुद्धा शिवछत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असते तर ...
त्यांनी आपल्या फक्त ९ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्या साठी जे केले ते अनेकांना आपली संपूर्ण हयात खर्ची टाकून सुद्धा करणे जमले नाही .
हल्ली कोणाच्याही जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्या होत असताना छत्रपती संभाजी महाराजांची आपल्याला (म्हणजेच महाराष्ट्राला) आठवण नसावी हा आपलाच करंटे पणा ...
14 May 2009 - 2:35 pm | उदय सप्रे
मनीषा ताई,
आपली कळकळ पोचली.काही स्पष्टीकरण :
--- पण अतिशय दुर्दैवी राजा .. बहूतेक कारकीर्द घरातल्यांच्या कुटील कारस्थानां ना नेस्तनाबूत करण्यात गेली .. : हे मात्र संपूर्णपणे तितकेसे खरे नाही , घरातील कागाळ्या चालू असताना पण त्यांनी गाजवलेले पराक्रम वंदनीय आहेत ! पोर्तुगीजांना तर दे माय धरणी ठाय करून सोडले होते !जे छत्रपती शिवाजी महाराजांना जमले नाही ते त्यांनी केले होते , जंजिरा किल्ल्यावर खाडीत अर्ध्या खाडीत रामाप्रमाणे सेतू बांधला , पण नालायक औरंग्या चालून आल्याने ती मोहीम अर्धीच टाकावी लागली.ज्याच्या हाती समुद्रसत्ता तो राजा - हे महाराजांचे वाक्य त्या छाव्याने लक्षात ठेवून प्रयत्न खूप केला.९ वर्षात एकही किल्ला स्वतःच्या शौर्यबळावर औरंग्याला मिळवता आला नाही ! एक हंबीरराव मोहिते सोडल्यास सगळ्याच अष्टप्रधान मंडळींनी आपापले दात दाखवले ! दुर्दैवानी संभाजी राजे हे शिवाजी महाराजांएव्हढे धूर्त आणि राजकारणी नव्हते त्यामुळे मनातील राग आणि मनातील गोष्ट पोटात ठेवता नाही आली त्यांन आणि त्याचेच परिणाम म्हणून ते पकडले गेले !
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. : होय , नायिकाभेद, नखशिखा , आणि बुधभूषणम् अशी ३ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत !
त्यांचे संपूर्ण चरित्र वाचल्यावर असे वाट्ते त्यांना सुद्धा शिवछत्रपतींनी "जगावे कसे" हे शिकवले असते तर ...ते शिकवले होतेच , फक्त या दिलदार राजांना धूर्तपणा कधीच जमला नाही !
त्यांनी आपल्या फक्त ९ वर्षांच्या कारकीर्दीत स्वराज्या साठी जे केले ते अनेकांना आपली संपूर्ण हयात खर्ची टाकून सुद्धा करणे जमले नाही . : अगदी बरोबर ("नाकी नऊ येणे" हा वाक्प्रचार औरंगजेबापासूनच सुरु झाला असावा असे मी बर्याच वेळा गमतीने म्हणतो पण !)
माझे मिपा वरील इतर लेख , कविता, स्केचेस पण आपण नजरेखालून घालाव्यात अशी विनंती !
हल्ली कोणाच्याही जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजर्या होत असताना छत्रपती संभाजी महाराजांची आपल्याला (म्हणजेच महाराष्ट्राला) आठवण नसावी हा आपलाच करंटे पणा ...एक्दम रास्त !
22 May 2009 - 12:33 pm | विशाल कुलकर्णी
कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: !
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: !!
या ओळी छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या पित्यावर छत्रपती शिवाजीमहाराजांवर लिहीलेल्या चरित्रात्मक काव्यातुन घेतलेल्या आहेत. मुळ संस्कृत भाषेत असलेले हे "बुधभुषणम" नावाचे काव्य आहे.
या ओळींचा अर्थ साध्या शब्दात सांगायचा झाला तर ..
"कलिकालरूपी भुजंग घालीतो विळखा
करितो धर्माचा र्हास
तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल
त्या शिवप्रभुंची विजयदुंदूभी गर्जूदे खास ! "
छत्रपती संभाजीराजांनी या काव्यासहीत आणखी चार काव्यग्रंथ लिहीले आहेत. ते "नृपशंभू" या नावाने काव्यलेखन करीत. बुधभुषणम आणि नायिकाभेद ही त्यांनी लिहीलेली संस्कृत काव्ये होत. तर त्यांनी वृंदावनी ब्रज भाषेत "नखशिखा" आणि " सातसतक" ही दोन काव्ये ही लिहीली आहेत. ज्या हाताने तलवार चालवुन औरंगजेबाला पळता भुई थोडी केली त्याच हातांनी ही नितांतसुंदर काव्येही केली आहेत. गंमत आहे नाही?
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
14 May 2009 - 4:32 pm | सुमीत
शंभू राजे विस्मरणात गेले असतील तर ते नालायक राजकारण्यां मुळे, ज्या राजकारण्यांनी मराठी स्वराज्य तर बुडवलेच आणि आता महाराष्ट्र बुडवत आहेत.
आमच्या सारख्या कैक मराठी जणां साठी ते आज पण छत्रपती आहेत.
कल्पना करवत नाही जेव्हा भूपाळगडा वरच्या शिबंदी चे हाल दिलेरखान ने केले तेव्हा शंभू राजांना काय यातना झाल्या असतील.
पण त्यांनी ज्या तयारीने स्वराज्य लढविले त्याची तुलना केवळ थोरल्या महाराजांच्या डावपेचाशी होऊ शकते.
14 May 2009 - 4:37 pm | उदय सप्रे
सुमीत जी,
अगदी खरे आहे !ज्यांना राजे लक्षात आहेत त्यांच्यासाठी हा लेख नाहीच मुळी , ज्यांना लक्षात ठेवण्याची गरज आहे पण तरी लक्षात नाही त्यांच्यासाठी हे "जोडे" मारले आहेत !
शिव-शंभू आमच्या मनाच्या देव्हार्यात कित्येक युगे रहातील याची खात्री बाळगावी ! माझे इतर ऐतिहासिक लेख पण मिपा वर आहेत ते वाचावेत अशी आग्रहाची विनंती !
उदय सप्रेम
14 May 2009 - 4:52 pm | धमाल मुलगा
अरे बाबा, शंभूराजांच्या नावावर वातावरण तापवून पोळी भाजणं शक्य असतं तर कशाला कोणी सोडलं असतं रे? जेव्हा जमेल तेव्हा हे शित पाहून येतीलच की भुतं !!
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
14 May 2009 - 4:52 pm | दशानन
+१
हेच म्हणतो.
थोडेसं नवीन !
14 May 2009 - 4:57 pm | आम्हाघरीधन
शंभू राजे हे संस्कृत मधे काव्यरचना करित असे ऐकून आहे .. : होय , नायिकाभेद, नखशिखा , आणि बुधभूषणम् अशी ३ पुस्तके त्यांनी लिहिली आहेत !
महान पराक्रमी संस्कृत पन्डीत प्रोढ प्रताप धुरन्धर श्री सम्भाजीराजे भोसले यान्ना मानाचा मुजरा.
शम्भुराजे यान्नी लिहिलेल्या ग्रन्थ सम्पदा : बुधभुषणम (संस्कृत), सात सतक्,नायिकाभेद्,नखशिखा( तिन्ही हिन्दी). दुर्दैव आपले की त्यान्नी लिहिलेल्या ग्रन्थ सम्पदा आपल्याला माहीत नाहीत. सौ. शैलजा मोळक(पुणे) यान्नी महत्प्रयासाने बुधभषणम चे मराठी रुपान्तर आपल्या साठी उपलब्ध करुन दिले आहे.
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.
14 May 2009 - 6:46 pm | अवलिया
शंभुराजांना मानाचा मुजरा...
--अवलिया
14 May 2009 - 7:38 pm | मदनबाण
शंभुराजांना मानाचा मुजरा...
मदनबाण.....
गनिम जे करणार नाही असे वाटते तेच नेमके तो करतो...
15 May 2009 - 3:22 am | हुप्प्या
सईबाई म्हणजे संभाजीची सख्खी आई. ती बाळंतपणातच स्वर्गवासी झाल्यामुळे ह्या मुलाच्या नशिबी असे भोग आले. जर आपले वैद्यकशास्त्र प्रगत असते तर सईबाई वाचली असती तर संभाजीराजांची नीट देखभाल झाली असती आणि नंतरचा इतिहास वेगळाच घडला असता. दैवयोग दुसरे काय?
पण औरंगजेबाचा धर्मपिसाटपणा आणि संभाजीराजांची धर्मावरील धगधगती निष्ठा ह्या दोन गोष्टी त्यांच्या मृत्युमुळे सगळ्या महाराष्ट्राला नीट कळल्या.
माझी त्यांना आदरांजली.