दिनांक १० ऑगस्ट २०२४च्या म०टा०च्या मैफल पुरवणीत डॉ० तेजस्विनी कुलकर्णी यांचा "नात्यांमध्ये भावनांचे नियमन" असा लेख प्रसिद्ध झाला आहे. लेख उत्तमच आहे. पण भावनिक नियमनाचा लेखिकेने मानवी नात्यांपुरताच विचार केला आहे (कदाचित लेखाच्या मर्यांदामुळे असेल). पण भावनिक नियंत्रणाचा समाजाच्या स्वास्थ्याशी निकटचा संबंध आहे. या लेखाशिवाय अलिकडेच मेंदूच्या आरोग्याविषयी आणखी दोन पुस्तके वाचनात आली - त्यात Preserving Brain Health in Toxic Age हे पुस्तक लिहिणारे अर्नोल्ड आयझर हे ड्रेक्झेल विद्यापीठात एमिरेटस प्रोफेसर व पेन्सिल्वानिया विद्यापीठात सन्मान्य संशोधक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पुस्तकात मेंदूच्या आरोग्याची हानी करणार्या जीवनशैली, वातावरण संबंधीत संशोधनाचा संपूर्ण पट उलगडला आहे. दूसरे पुस्तक A Toxic Brain – revelations from a health journey हे सान्द्रा स्ट्रॉस यांनी जडधातू आणि जैविकविषांमुळे आपल्या पतीला झालेल्या दूर्धर आजाराची संघर्ष कथा आहे.
वास्तविक सध्या आपल्या आजुबाजूला बघितलं, तर आधुनिक शहरी मनुष्य भावनिक नियंत्रण हरवून बसल्याचे दिसते. हे विधान अनेकांना खटकेल, पण ते मी पूर्ण जबाबदारीने केले आहे. हे चिंताजनक आहे. वास्तविक माझा हा लेख खरं तर एखाद्या चेताविज्ञानाच्या अभ्यासकाने लिहायला हवा. पण व्यावसायिक व्यस्ततेमुळे त्यांना हे जमत नसेल. पण मला नक्की खात्री आहे की बहुसंख्य मस्तिष्क/चेता विज्ञानाचे अभ्यासक माझ्याशी सहमत होतील.
हृदयाचे आरोग्य बिघडले तर अकाली मृत्युचा धोका बळावतो. त्यामुळे हृदयाच्या आरोग्याकडे गंभीरपणे बघितले जाते, मात्र दूर्दैवाने तसे मेंदूच्या आरोग्याक॒डे गंभीरपणे न बघता "हे असेच चालायचे म्हणून दूर्लक्ष केले जाते". कोणतीही दूर्लक्ष केलेली समस्या स्नो-बॉल इफेक्टमुळे हळुहळु उग्र बनते आणि अंतिमत: हाताबाहेर जाते. हरवलेल्या भावनिक नियंत्रणाचे सध्या असेच काही झाले आहे.
क्षुल्लक कारणाने राग अनावर झाल्याने टोकाचे पाऊल उचलणे (खून आणि आत्महत्या), भरधाव गाडी चालवून निरपराध पादचार्यांचा बळी घेणे, सेल्फीच्या हव्यासापायी जीव गमावणे या बातम्यांशिवाय सध्या आपल्या आयुष्यातील एकही दिवस जात नाही. हा लेख लिहीत असताना कलकत्त्यामध्ये एका डॉ० तरूणीचा बलात्कार करून खून केल्याची बातमी फेसबुकवर झळकायला लागली होती.
वर दिलेल्या घटनांच्या मुळाशी असलेल्या कार्यकारणभावाचा आपण टप्प्याटप्प्याने जर विचार केला तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात यायला मदत होते -
०क्षुल्लक कारणाने राग - भावनिक नियंत्रणाचा अभाव - अविचाराने कृती
०भरधाव गाडी चालवून निरपराध पादचार्यांचा बळी घेणे - परिणामांचा विचार न करता बेपर्वाईने वागणे - अविचाराने कृती
०सेल्फीच्या हव्यासापायी जीव गमावणे - सारासार विचार न करता स्वत:चा आणि जीव धोक्यात घालणे - अविचाराने कृती
वर दिलेल्या प्रातिनिधिक उदाहरणांचा लसावि काढला तर असे लक्षात येते की परिणामांचा विचार न करता, स्वत:ला आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी ’अविचाराने’ केलेली कृती यात समान आहे. अविचाराने केल्या जाणार्या कृतींचा/वर्तनाचा पट कमी-अधिक तीव्रतेनेनुसार खुप मोठा आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, वाहतूकीचे नियम धूडकावणे, लाच मागणे-किंवा देणे किंवा एकंदरच कायद्याचा अनादर, असे अविचारी वर्तन जेव्हा मोठ्या संख्येने माणसे करू लागतात तेव्हा ते गंभीर रूप धारण करते, कारण अशा लोकांमुळे समाजाचे स्वास्थ्य हरवते.
माणसे अविचारी वर्तन का करतात? असा प्रश्न आता जर तुम्हाला पडला असेल तर माझा हा लेख लिहीण्याचा उद्देश निम्मातरी पूर्ण झाला असे मी म्हणेन. बहुसंख्य लोकांची अशी धारणा असते की माणसाला विचार करायची क्षमता शिक्षणाने प्राप्त होते. पण हे अर्धसत्य आहे. अविचारी वर्तनाचे उर्वरित सत्य शोधण्यासाठी जीवशास्त्राची मदत घेणे आवश्यक ठरते. ज्याप्रमाणे आडात नसेल तर पोहर्यात येत नाही, त्याचप्रमाणे निसर्गाने बहाल केलेल्या मेंदू या अवयवाचा व्यवस्थित विकास झालेला नसेल, तर शिक्षणाचा योग्य तो परिणाम होत नाही.
मेंदूची उत्पत्ती
पृथ्वीवर विकसित झालेल्या जीवसृष्टीमध्ये मेंदूच्या विकासाचा इतिहास तपासला तर मेंदूची निर्मिती खुप नंतर झालेली दिसतो. सुरुवातीला जन्माला आलेले विषाणू, एकपेशीय जीव यामध्ये मेंदू दिसत नाही. पण जसजसे बहुपेशीय जीव विकसित पावू लागले तसतसे त्यांच्या अंतर्गत यंत्रणेमध्ये सुसूत्रता राहावी यासाठी प्रथम चेतासंस्था (Nervous system) विकसित पावली. अनेक कृमींमध्ये फक्त मेंदूरहित चेतासंस्था असते (उदा० स्टारफिश, जेलीफिश, समुद्र स्पंज, राउंड्वर्म, चपटे कृमी , हैड्रा इ०). जसजसे गुंतागुंतीच्या रचना आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मांचे जीव विकास पावले, तसे त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकाश, ध्वनि, स्पर्श, तापमान इ० संवेदनांना प्रतिसाद देण्याची गरज आणि क्षमता निर्माण झाली आणि संवेदनानुसार योग्य तो निर्णय घेऊन प्रतिसाद देणे, अंतर्गत यंत्रणा चालू किंवा बंद करणारी व्यवस्था म्हणून अत्यंत गुंतागुंतीचा मेंदू हा अवयव निर्माण झाला. मेंदूची उत्क्रांती वेगवेगळ्या जीवांच्या पर्यावरणातील आह्वानानुसार होत राहीली. मग मेंदूच्या मागील भागात प्रकाशरूपी संवेदनाना प्रतिसाद देणार्या चेतापेशींचा समूह विकसित होऊन पार्श्वपिण्ड (Occipital lobe) ची निर्मिती झाली. या प्रमाणेच ध्वनी आणि स्पर्श या संवेदनाना ग्रहण करणार्या (शंखपिण्ड) Temporal lobe) आणि भित्तीपिण्ड (parietal lobe) ची निर्मिती झाली.
मेंदूच्या या खण्डांचे कार्यगत विभाजन (functional differentiation) बंदिस्त कप्प्यांमध्ये झालेले नाही आणि तसे श्रेयस्कर पण नव्हते. प्रत्येक खण्डाची काही मुख्ये कार्ये आहेत आणि काही पूरक किंवा उपकार्ये आहेत. उदा० शंखपिण्डाचे (टेंपोरल लोब) कार्य फक्त ध्वनी या संवेदने पुरते सिमित नसते, तर भाषा,भावना आणि काही प्रमाणात दृष्य संवेदनांचे पण या खण्डात विश्लेषण होते...
मेंदूतील या सर्व भागांची रचना विशिष्ट संवेदनाना अनुलक्षून असली तरी या सर्व भागांमध्ये सुसूत्रता ठेवणे, एखादे उद्दीष्ट गाठण्यासाठी आवश्यक असणारे भविष्याचे नियोजन करणे, आणि तसेच एखाद्या कृतीच्या भावी परिणामांचे मूल्यमापन करणे, किंवा धोक्याचे/जोखमीचे विश्लेषण करणे, मानसिक अथवा शारीरिक आवेगावर नियंत्रण ठेवणे, नैतिक/अनैतिक, धोकादायक/सुरक्षित अशी वर्गवारी करणे, त्याप्रमाणे निर्णय घेऊन इतर संबंधित भागांना आदेश देणार्या भागाचा विकास होत गेला. बहुतेक सर्व जलचर, भूचर आणि पक्ष्यांमध्ये काही ना काही प्रमाणात ही सर्व कार्ये जीवसृष्टीतील अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असतात. पण काहीशी दूर्दैवाची गोष्ट अशी की ज्याला विवेकाचे स्थान म्हणता येईल अशा मेंदूतील महत्त्वाच्या भागाचा विकास मेंदूच्या आकाराच्या प्रमाणात झाला. त्याचे नाव उपाग्रखण्ड (Prefrontal lobe)!
उपाग्रखण्ड हा भाग चेतापेशींच्या अत्यंत दाट जाळ्याने उर्वरित सर्व मेंदूशी, उदा० (बाह्यक (cortex), उपबाह्यक (subcortex), मस्तिष्कदण्ड (brain stem)) इत्यादिंशी जोडला गेलेला असतो. उपाग्रखण्डाचा वरचा भाग हा लक्ष, ज्ञान आणि कृती नियंत्रित करतो. मेंदूच्या या भागाचे अत्यंत गुंतागुंतीच्या आणि आपल्या मनुष्यत्वाशी निगडित असलेल्या नियोजन प्रक्रियेत महत्त्वाचे काम चालते. व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार, निर्णय प्रक्रिया, सार्वजनिक आयुष्यातील संयम या सर्वांवर विकसित उपाग्रखण्डाचे नियंत्रण असते. वेगळ्या तऱ्हेने सांगायचे झाले तर आपली ध्येये आणि विचार, कृती यांच्यामध्ये सुसंवाद ठेवण्याचे कार्य (ज्याला आपण विवेक म्हणतो) उपाग्रखण्ड करतो.
उपाग्रखण्डाचे सर्वात ठळकपणे चालणारे कार्य म्हणजे अधिकारी कार्य. परस्पर विरोधी विचार किंवा कृती जाणणे, चांगले किंवा वाईट यांच्यातील फरक, साधर्म्य आणि वैधर्म्य यातला फरक, एखाद्या निर्णयाचे किंवा चालू कृतीचे भविष्यातले निष्पन्न, ध्येयाच्या दिशेने प्रवास इ० सर्वांवर उपाग्रखण्डाचा प्रभाव असतो. उपाग्रखण्ड नियमांचे (वि० सामाजिक) ज्ञान ग्रहण करतो. उपाग्रखण्डाचा पुढचा भाग (along the rostral-caudal axis) अमूर्त (abstract) पातळीवरील नियमांच्या ज्ञानाचे ग्रहण करतो. योग्य रीतीने काम करणारा उपाग्रखण्ड वास्तवाचे भान देतो आणि अपराधीपणा किंवा पश्चात्तापाची भावना पण देतो. स्वप्नात सृजनशीलता जरी जागी असली आणि काही वेळा ती लाभकारी असली तरी त्यात तर्कसंगती नसते. म्हणून स्वप्नात जे काही वेळा वाटते किंवा दिसते, ते दिवसा जागेपणी प्रत्यक्ष शक्य नसते. झोपेत उपाग्रपिंड फारसा कार्य करत नसल्याने स्वप्नांमध्ये पश्चात्तापाची भावना नसते. यामुळे कायदे मोडून धोकादायक वर्तन करताना पश्चात्तापाची भावना नसणे हे उपाग्रखण्डाचे कार्य बिघडल्याचे लक्षण मानावे लागते. जे अट्टल गुन्हेगारांमध्ये सर्रास दिसते.
उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक (उपाग्रखण्डाचे बाहेरील चेतापेशींचे आवरण) यांच्या विलक्षण विकासामुळे मानवाला विवेकाची देणगी मिळाली, माणूस विचारक्षम बनला आ्णि संपूर्ण जीवसृष्टीत एक वेगळे स्थान प्राप्त झाले. ही विचारक्षमता इतर जीवांमध्ये नसते का? तर नक्कीच असते, फक्त ती पर्यावरणातील आह्वाने आणि उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक यांच्या एकूण आकारावर आणि विकासावर अवलंबून असते. म्ह० ज्या प्रजातींमध्ये मेंदूचा आकार लहान असतो, तिथे "उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक" पण फारसे विकसित होत नाहीत. साहजिक त्यांची कार्ये पण मर्यादित प्रमाणात दिसून येतात.
अविकसित उपाग्रखण्ड, सामाजिक स्वास्थ्य आणि गुन्हेगारी
उपाग्रखण्ड आपल्या वर्तनात आणि जगाशी संवाद साधण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जेव्हा हा भाग पूर्णपणे विकसित होतो, तेव्हा व्यक्ती चांगले निर्णय घ्यायची क्षमता आणि आत्मनियंत्रण हे गुण धारण करतात. आवेगावर नियंत्रण ठेवायचे काम फक्त व्यवस्थित विकसित झालेला उपाग्रखण्ड करतो. तारूण्यावस्थेत संप्रेरकांच्या प्रभावामुळे, मद्यसेवनाने तसेच अमली पदार्थांच्या सेवनाने उपाग्रखण्ड निष्प्रभ होतो. त्यामुळेच माणसामधला अविकसित आणि कार्यभ्रष्ट (dysfunctional) उपाग्रखण्ड हा सामाजिक अस्वास्थ्य आणि गुन्हेगारीचे जीवशास्त्रीयदृष्ट्या मूलभूत कारण आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
अलिकडील ताज्या संशोधानानुसार, उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक यांचा विकास पूर्ण पंचविशीनंतरही चालू राहतो. या टप्प्यानंतर हा विकास पूर्ण होणे हे त्या व्यक्तीला मिळणार्या स्थैर्यावर अवलंबून असते. ज्याना घंटाकृती आलेखाचा नियम (बेल कर्व्ह) नियम माहित आहे त्यांनाच हे पटेल की जसजसे लोकसंख्येच्या ताणाने, पर्यावरणातील असमतोलाने जगणे अवघड बनेल तसे विवेकी आचरण हे अपवाद बनेल. कायद्याची अंमलबजावणी कडक नसेल तर ही समस्या आणखीनच गंभीर बनते. कटु आहे पण सत्य आहे...
त्यामुळे व्यक्ती १८ व्या वर्षी सज्ञान बनते अशी सामाजिक धारणा असली तरी विवेकी बनतेच असे नाही. वर लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या आणि इतर अनेक गुन्ह्यांमध्ये जिथे बेपर्वा/आत्मघातकी वर्तन ठळकपणे दिसून येते, तिथे अविकसित उपाग्रखण्ड हे प्रमुख जीवशास्त्रीय कारण सांगता येते. यावर जगभरच्या सन्मान्य विद्यापीठात भरपूर संशोधन झालेले आहे.
उपाग्रखण्डाच्या विकासावर प्रभाव टाकणारे घटक
आजुबाजुचे वातावरण (वि० गुन्हेगारी), लहान वयात संगोपनाचा अभाव, भावनिक आघात करणारे प्रसंग, रोजच्या जीवन संघर्षामुळे जगण्याचा ताण (विशेषत: विश्रांतीचा अभाव आणि कॉर्टीसॉल सारख्या संप्रेरकांची दीर्घकाल वाढलेली पातळी), समाजमाध्यमांवरील अतिवावराने येणारा ताण, कुपोषण, हवा, पाणी आणि अन्नातून होणारा जैविक-विषांचा हल्ला, मेंदूचे आणि परिणामी उपाग्रखण्डाचे कार्य/आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरतात. स्वमग्नता, अल्झायमर, स्ट्रोक, अपस्मार, कंपवात, दुर्मनस्कता (स्किझोफ्रेनिया) इ० अनेक मानसिक विकारांचे प्राबल्य वाढते. याची किंमत बाधित व्यक्तीचे कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सर्वानाच मोजावी लागते. अलिकडेच वाचलेल्या एका वृत्तानुसार शिसे या धातूमुळे होणार्या विषबाधेमुळे मुलांचा बुद्ध्यंक कमी होऊन मतीमंदत्व येऊ शकते.
याशिवाय एक धक्कादायक गोष्ट सान्द्रा स्ट्रॉस या बाईंच्या उल्लेख केलेल्या पुस्तकात आहे - इतर अवयवांप्रमाणे मेंदूतही चयापचयामुळे पेशीमळाची (Cellular waste products) निर्मिती होत असते. या पेशीमळाचा निचरा करणारी यंत्रणा झोपेत सक्रिय होते. ही यंत्रणा २५% लोकसंख्येत जनुकीय दोषांमुळे विकसित होत नाही. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची समस्या आणखी गंभीर बनते. स्मार्टफोनच्या अतिवापराने झोप नाहीशी झाल्यामुळे मेंदूतील विषद्रव्यांचा निचरा न होणे इ० अनेक कारणांमुळे उपाग्रखण्डाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
हवामानबदल आणि उपाग्रखण्ड
प्रसिद्ध टेड व्याख्यानमालेत नुकताच म्ह० १५ ऑगस्ट रोजी एका नव्या व्याख्यानाचा व्हिडीओ युट्युबवर प्रसृत केला गेला. या व्याख्यानात वर्तवलेले हवामानबदलाचे ताजे भाकीत अतिशय चिंताजनक आहे. २०२३ पासून घसरगुंडीचा वेग एकदम वाढला आहे आणि पृथ्वीची सहनशीलता, स्वत:ला दुरुस्त करायची क्षमता संपली आहे, असा सूर वेगवेगळी संख्याशास्त्रीय मॉडेल्स आळवत आहेत.
देशात यावर्षी झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर भविष्यातील चित्राचा अंदाज बांधणे फार अवघड वाटायला नको.
जागतिक हवामानबद्लामुळे मेंदूच्या रचनेत आणि कार्यात दोन्हीमध्ये बदल होत आहेत, हे आधुनिक चेताविज्ञान आता मान्य करते. पण भारतावर याचा काय परिणाम होईल याचा अंदाज बांधायचा असेल तर विषुववृत्ताजवळील देशांचा अभ्यास करावा. यासाठी फार कष्ट घ्यायची पण आवश्यकता नाही.
समजा जागतिक तापमानात १ अंश सेल्सिअस ची जर वाढ झाली तर भारतातील मोठ्या लोकसंख्येला सुखाची आणि हक्काची झोप मिळणे अवघड बनेल. उकाडा, पूर, वादळे यांना तोंड देताना नागरिकांमध्ये मन:शांति टिकून राहणे अवघड आहे. उदा० मन:स्वास्थ्य हरवल्याने चिडचिडेपणा वाढला की ’क्षीणा: जना: निष्करूणा भवन्ति’ या उक्ती प्रमाणे माणसे पटकन विवेक हरवतात. त्याचा मोठा परिणाम माणसांच्या वर्तनावर, निर्णयशक्तीवर, उत्पादकतेवर, तसेच राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होतो. अशा मोठ्या समस्या हाताळायला जे धाडसी निर्णय घ्यावे लागतात ते लोकशाही राज्यव्यवस्थेत अवघड बनते. या शिवाय आनंदाच्या जागतिक क्रमवारीत भारताचा नंबर बराच खाली आहे, जो नागरिकांच्या सर्वसाधारण मानसिक आरोग्याचा निदर्शक आहे.
याचे भान कुणाला आहे का? सध्या मला तरी तसे अजिबात दिसत नाही...
संदर्भ -
१.https://www.americanbrainfoundation.org/the-effects-of-climate-change-on...
२. https://www.ucl.ac.uk/news/2024/may/climate-change-likely-aggravate-brai...
३. https://www.who.int/news/item/14-03-2024-over-1-in-3-people-affected-by-...
४. https://www.msn.com/en-in/health/health-news/how-lead-poisoning-is-threa...
प्रतिक्रिया
28 Oct 2024 - 11:02 am | कंजूस
मेंदू अति विकसित होत आहे हे मुख्य कारण आहे.
बुद्धीवाद आणि भावनावाद यांमध्ये मेंदू एकीकडे झुकतो आहे.
त्याचबरोबर सगळा लाभ मलाच कसा मिळेल याची खटपट सतत सुरू आहे. त्यातून खोटारडेपणा, स्वार्थ, लबाडी आणि अप्रामाणिकपणा वाढतो आहे.
29 Oct 2024 - 6:08 am | कर्नलतपस्वी
असे भाग मला करावेसे वाटतात.
मुर्त मेंदूत आलेले दोष काही प्रमाणात वैद्यकीय सहाय्याने ठिक करता येतात. काही प्रमाणात अमुर्त मेदूवडे उपचार उपलब्ध आहेत.
निती,अनितीच्या संकल्पना ,पाप पुण्याची वास्तविकता,व्यवहार आणी स्वार्थ या सर्व गोंगाटात भावनिक नातेसंबंध शुष्क झाल्याने आपराधीक गतिविधी वाढल्या आहेत असे वाटते.
इतिहासकार राजवाडे म्हणतात ते खरे आहे. जे काल योग्य वाटत होते ते आज निषिद्ध वाटू शकते.
जे इतरांना आयोग्य वाटते ते कुणाला योग्य वाटू शकते. कायदा सुव्यवस्था एक मर्यादेपर्यंतच....
29 Oct 2024 - 11:12 am | युयुत्सु
प्रतिसादाबद्दल आभार!
आपल्या मुद्द्यांना पुढे दिलेल्या संशोधनात उत्तर मिळेल. प्रदूषणाचे दूष्परिणाम गर्भावस्थेपासूण चालू होतात. परिणामतः सर्वांना समान क्षमता निसर्गाकडून मिळत नाहीत.
29 Oct 2024 - 1:26 pm | कर्नलतपस्वी
कुठपर्यंत ग्राह्य धरावा? प्रातिनिधिक सर्वेक्षणाचे गुणदोष लागू पडतात.
प्रदुषण मोठ मोठ्या शहरात असते. तुलनात्मक दृष्टीकोनातून खेडेगावात ते खुप कमी असते. लोकसंख्येची घनता,वहातूक, रोजगार, शहरातले विविध प्रकारचे आकर्षण ,ताणतणाव इ. निश्चितच प्रदुषण, गुन्हेगारी व अनैतिकता वाढण्यासाठी पुरक,पोषक वातावरण असते यात मला तरी शंका नाही.
खेडेगावात परस्परांबद्दल अपुलकी,संबध , अडीअडचणीत एकमेकाची मदत करणे,सौहार्दपूर्ण वातावरण निश्चितच नैतिकता परंपरा जोपासण्यात मदत करते. लोकसंख्या कमी असल्याने प्रदुषण नसते किंवा असलेच तर नाममात्र.
म्हणून म्हणतो नैतिकतेच्या पतनाला प्रदूषण कितपत कारणीभूत ठरत नसून इतर बाबी जास्त जबाबदार आहेत.
30 Oct 2024 - 4:33 pm | युयुत्सु
म्हणून म्हणतो नैतिकतेच्या पतनाला प्रदूषण कितपत कारणीभूत ठरत नसून इतर बाबी जास्त जबाबदार आहेत.
कृपया मोठ्या विद्यापीठातील वैज्ञानिक संशोधनावर अर्धवट, अभ्यासरहित मते व्यक्त करू नयेत. पुढे हवेतील प्रदूषणाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात, त्याची विस्तृत यादी दिली आहे. ती पहावी-
References
30 Oct 2024 - 10:31 pm | कर्नलतपस्वी
कृपया मोठ्या विद्यापीठातील वैज्ञानिक संशोधनावर अर्धवट, अभ्यासरहित मते व्यक्त करू नयेत.
अर्धवटच काय पण मला कुठल्याच प्रकारचे ज्ञान नाही. परंतु जगातील मुक्त विद्यापीठात गेली सत्तर वर्ष सतत अविरत अनुभवावर मी माझे मत प्रदर्शित केले आहे.
तज्ञांच्या संशोधनावर कुठलेही मत अथवा rebuttal मी व्यक्त केले नाही. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. मला व्यक्तिशः फरक पडत नाही.
हे जे संशोधन झाले आहे याबद्दल मी मत व्यक्त केलेच नाही. मला हे म्हणायचे आहे की संशोधन प्रातिनिधिक सर्वेक्षणावर आधारित आहे. यावर आधारित निष्कर्ष केवळ काही अंशी ग्राह्य धरता येतील. कारण सर्वेक्षणाची पद्धत दोषमुक्त नाही.
त्याच प्रदुषणात राहून किती टक्के प्रभावीत झाले नाहीत व कित्येक जणांनी आपली उन्नती करून घेतली आहे याचे जर सर्वेक्षण केले तर कदाचित निष्कर्ष वेगळे निघतील.
ज्या विद्यापीठांचे दाखले आपण देत आहात त्या देशात प्रदुषण रहीत वातावरणात राहिलेली, वाढलेली लहान लहान मुले शाळेमधे,माॅलमधे गोळीबार करतात याला काय म्हणाल.
प्रदूषणाचे दूष्परिणाम गर्भावस्थेपासूण चालू होतात.
असे जर मानले तर स्लम मधे जन्माला येणारे प्रत्येक मुल गुन्हेगार बनायला हवेत.
अविचारी वर्तनाचे उर्वरित सत्य शोधण्यासाठी जीवशास्त्राची मदत घेणे आवश्यक ठरते.
या विधानाशी सहमत आहे. मनोरुग्ण तज्ञांच्या मताप्रमाणे, There are certain factors which remains letent and surfaces only in certain conditions. When it erupts or surfaces patient need medical aid,help.
If response to any write up taken without prejudice or preoccupied mind then one may reach to right conclusion. It's my perception and may be accepted or not.
30 Oct 2024 - 10:50 pm | कर्नलतपस्वी
सर्वच लोक वरील संशोधनानुसार मेंदूचे अनारोग्य पिडीत व अविवेकी असायला हवेत. परंतू वस्तुस्थिती अशी नाही. चित्र काही वेगळेच आहे.
महानगरातील प्रदुषणा मुळे फुफ्फुसाचे ,यकृत,जठर हे अवयवांच्या व्याधिग्रस्त होण्याची दाट संभावना आहे हे अलिखित सत्य आहे.
30 Oct 2024 - 11:11 pm | कर्नलतपस्वी
सर्वच लोक वरील संशोधनानुसार मेंदूचे अनारोग्य पिडीत व अविवेकी असायला हवेत. परंतू वस्तुस्थिती अशी नाही. चित्र काही वेगळेच आहे.
महानगरातील प्रदुषणा मुळे फुफ्फुसाचे ,यकृत,जठर हे अवयवांच्या व्याधिग्रस्त होण्याची दाट संभावना आहे हे अलिखित सत्य आहे.
31 Oct 2024 - 10:56 am | युयुत्सु
आपल्या वरील तिन प्रतिसादांवरून आपले वय बरेच असावे आणि आपण वयानुरुप "हटवादी" बनला असणार अशी माझी अटकळ आहे. ज्यांची नवे शिकायची क्षमता संपली आहे अशा व्यक्ती अशी ("१.आपण कितीही मोठी यादी दिलीत तरी मी माझ्या मतावर ठाम आहे. २.पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या. ३.मला व्यक्तिशः फरक पडत नाही.") विधाने करतात. वैयक्तिक पातळीवरील चर्चा असती तर मी आपल्याकडे दूर्लक्ष केले असते. पण सार्वजनिक चर्चेत अशा सैल विधानांचा योग्य तो समाचार घ्यावाच लागतो. नाही तर समाजप्रबोधनाचे प्रयत्न अपयशी ठरतात.
"ज्या विद्यापीठांचे दाखले आपण देत आहात त्या देशात प्रदुषण रहीत वातावरणात राहिलेली, वाढलेली लहान लहान मुले शाळेमधे,माॅलमधे गोळीबार करतात याला काय म्हणाल."
या तुमच्या निरीक्षणाने माझ्या मूळ लेखातील दाव्याला बळकटीच मिळाली आहे. लहानवयात उपाग्रखण्डाचा विकास झालेला नसतो. त्यामुळे योग्य/अयोग्य, नैतिक/अनैतिक याकल्पना विकसित होत नाहीत. साहजिक त्यांच्याकडून गोळीबारासारखे गंभीर गुन्हे घडतात.
प्रदूषण फक्त हवेचे नसते तर अन्नाचे आणि पाण्याचे पण असते.
आपणे आपले अज्ञान मान्य केले असल्याने जनुकीय पातळीवर एका पिढीचे दोष पुढच्या पिढीकडे कसे संक्रमित होतात आणि त्यांना पोषक वातावरण मिळाले की ते उफाळून येतात, हे विज्ञान आपल्या आकलना पलिकडचे आहे. याची मला खात्री आहे. सांगायचे तात्पर्य, अगोदरच्या पिढ्या जर प्रदूषणाने "किडल्या" असतील तर पुढची प्रजा पण किडकी बनते.
"असे जर मानले तर स्लम मधे जन्माला येणारे प्रत्येक मुल गुन्हेगार बनायला हवेत."
झोपडपट्टीमध्ये जन्माला येणारे प्रत्येक मूल जरी गुन्हेगार नसले तरी झोपडपट्ट्यामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी असते, हे तुम्ही नाकारू शकत नाही. याशिवाय ’बेल कर्व्ह"चा परिणाम तुम्हाला माहित असेल ही अपेक्षा ठेवणे चूकीची आहे.
1 Nov 2024 - 3:06 pm | रामचंद्र
<जनुकीय पातळीवर एका पिढीचे दोष पुढच्या पिढीकडे कसे संक्रमित होतात आणि त्यांना पोषक वातावरण मिळाले की ते उफाळून येतात...>
यामागे शास्त्रीय सत्य वा तथ्य किती आहे याची कल्पना नाही पण याचा चांगलाच प्रत्यय येताना दिसतो. बरीच उदाहरणे पहायला मिळतात.
1 Nov 2024 - 5:29 pm | युयुत्सु
याचा अभ्यास करणा-या शाखेस अधिजनुकशास्त्र असे नाव आहे.
https://www.misalpav.com/node/42260
1 Nov 2024 - 6:45 pm | रामचंद्र
या विषयाची आणि अर्थातच त्या दृष्टीने एकूणच समाजप्रबोधनाची गरज पदोपदी जाणवते.
31 Oct 2024 - 3:03 pm | कर्नलतपस्वी
आपण जो लेख टंकलात त्यात नवीन काहीच नाही.
मी एक साध्या सोप्या भाषेत मला समजलेले टंकाळले होते. कदाचित मला काय म्हणायचंय ते आपल्या आकलना पलिकडचे असावे अन्यथा आपण व्यक्तिगत पातळीवर उतरला नसतात.
माझे वय जास्त आहे,मी नवीन शिकण्याच्या पलिकडे गेलोय, हटवादी इत्यादी शब्दांचे औचित्य किंवा
लेखनाशी काहीच संबध नाही.माझी बौद्धिक कुवत केवळ काही प्रतिसाद वाचून आपल्याला न पटणार्या, न रुचणाऱ्या शब्दांमुळे काढलीत. यावरून आपला अंहं किती फुगलेला आहे हेच कळते. आपले मत,अर्थात माझ्याबद्दल चे आपल्याला लखलाभ.
सार्वजनिक मंचावर केवळ चान चान म्हणवून घ्यायचे असेल तर लेखना आगोदरच वाचकांना सावध करावे. साद म्हणले की प्रतिसाद आला. नेहमीच प्रतिसाद लेखकाच्या मनासारखा असेल असे काही जरूरी नाही.
मिपावर सहसा कुणी कुणाला व्यक्तिगत पातळीवर ओळखत नाही. व्यक्तिगत पातळीवर उतरून टिका करणे हे उचित नाही. पटले नाही तर सोडून द्यायचे.
शक्य तेव्हढ्या सभ्य भाषेचा प्रयोग केला आहे.
माझ्याकडून पूर्णविराम.
31 Oct 2024 - 3:05 pm | कर्नलतपस्वी
कृपया माझे प्रतिसाद अनुचित असतील तर उडवून टाकावे. धन्यवाद.
31 Oct 2024 - 11:26 pm | रामचंद्र
कोलाहल, पर्यावरणविघातक वर्तणुकीत आनंद वाटणारे बहुसंख्य प्रदूषित भौतिक व वैचारिक वातावरणात वाढलेले असतात हे मात्र नक्कीच प्रत्ययाला येते.
4 Nov 2024 - 11:58 am | विवेकपटाईत
आनंदाच्या जागतिक क्रमवारीत भारताचा नंबर बराच खाली आहे, जो नागरिकांच्या सर्वसाधारण मानसिक आरोग्याचा निदर्शक आहे. ही रिपोर्ट कोणत्याही जागतिक संस्थेचा नाही. एका भारत विरोधी दृष्टीकोण ठेवणार्या संस्थेचा आहे. बाकी भारतीय लोकांचे मानसिक आरोगी यूरोपियन देशांपेक्षा निश्चित उत्तम आहे. भारताच्या विरोधात असे भरपूर रिपोर्ट येत राहतात. उदा. भारतात गेल्या दहावर्षांत गरीबी वाढली. वास्तव 25 कोटी गरीबी रेषेतून बाहेर आले. असो.
4 Nov 2024 - 6:10 pm | युयुत्सु
"ही रिपोर्ट कोणत्याही जागतिक संस्थेचा नाही. एका भारत विरोधी दृष्टीकोण ठेवणार्या संस्थेचा आहे. "
हे विधान बेलगाम आणि बेछूट दाव्याचा उत्तम नमूना आहे. ही क्रमवारी लावणारी संस्था भारत विरोधी आहे याचे पटाईत यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
About World Happiness Report:
The World Happiness Report is released annually around March 20th as part of the International Day of Happiness celebration by the United Nations Sustainable Development Solutions Network (UN SDSN).
The World Happiness Report is a partnership of Gallup, the Oxford Wellbeing Research Centre, the UN Sustainable Development Solutions Network, and the WHR's Editorial Board.
It considers six variables: GDP per capita, healthy life expectancy, social support, freedom, generosity, and absence of corruption.
The World Happiness Report now provides separate rankings by age group.
This year's report ranked 150 countries.
The other top 10 countries after Finland are Denmark, Iceland, Sweden, Israel, Netherlands, Norway, Luxembourg, Switzerland and Australia.
The United States and Germany did not find a place among the list of 20 happiest nations.
The US trailed at the 23rd spot, while Germany at the 24th spot respectively.
Afghanistan remains bottom of the overall rankings as the world's 'unhappiest' nation, followed by Congo, Sierra Leone, Lesotho, and Lebanon
https://www.ksgindia.com/study-material/news/world-happiness-report-2024...'s%20Ranking%3A%20In%20the%20World,at%20108%2C%20Myanmar%20at%20118.
आनंदाच्या जागतिक क्रमवारीची माहिती इथे मिळेल-
https://www.unsdsn.org/our-work/world-happiness-report/
6 Nov 2024 - 5:17 pm | युयुत्सु
वरील लेख लिहून झाल्यानंतर आज अचानक माझ्या लेखातील काही भारतीयांच्या मेंदूच्या आरोग्याविषयी दाव्यांना पुष्टी देणारा संशोधन अहवाल नेचर मध्ये सापडला. पुरेशी झोप आणि मेंदूचे अधिकारी कार्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.
https://www.nature.com/articles/s42003-022-03123-3#Fig1
22 Nov 2024 - 9:24 am | युयुत्सु
पुणे म०टा० ने माझा हा लेख आज पान क्र० ७ वर प्रसिद्ध केला आहे.
22 Nov 2024 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सकाळीच मटा ऑनलाइन छापील अंकात लेख वाचला. अभिनंद्न. लिहिते राहा. शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
22 Nov 2024 - 10:42 am | युयुत्सु
धन्यवाद!
22 Nov 2024 - 12:29 pm | कर्नलतपस्वी
दुर्भाग्य वश मी पण म.टा. चा नियमित वाचक आहे.
असो,तरीही आपले अभिनंदन.
1 Dec 2024 - 4:11 am | सोत्रि
लेख प्रचंड आवडला.
हिंसक गुन्हे करणारे गुन्हेगार आणि त्यांची गुन्हा करतानाची मानसिकता आणि पार्श्वभूमी हा विषय खुप महत्वाचा आहे. त्याअनुषंगाने लेख त्या मानसिकतेवर भाष्य करत असल्याने लेख आवडला.
संवेदना आणि त्यांना दिला जाणारा प्रतिसाद हा आपल्या जगण्याचा मुलभूत पॅटर्न आहे. त्या संवेदनेला कसा प्रतिसाद दिला जातो हे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ह्यानुसार असतो.
व्यक्ति जितकी जाणिवेत असेल तितका विवेक जागृत असेल आणि संवेदनांवर रियाक्ट न होता संवेदनांना रिस्पॅान्स दिला जाईल.
उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक ह्यांचा विकास म्हणजेच व्यक्तीचे जाणिवेत असणे (कॅान्शसनेस आणि अवेयरनेस)
युयुत्सु यांच्या प्राणायमावरच्या लेखात सांगितलेल्या पुस्तकाप्रमाणे प्राणायामाने उपाग्रखण्ड आणि उपाग्रबाह्यक ह्यांचा विकास घडवून आणता येऊ शकतो. तसंच ध्यानाने तो सातत्याने टिकवता येऊ शकतो.
- (मेंदूचे आरोग्य सुदृढ करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी
2 Dec 2024 - 3:48 pm | युयुत्सु
तुमच्या प्रतिसादाने माझे लेख लिहीण्याचे कष्ट सार्थकी लागले. मन:पूर्वक धन्यवाद!