आमची संगीत यात्रा..

भम्पक's picture
भम्पक in जनातलं, मनातलं
21 Mar 2024 - 11:28 am

काल पोराने ऑनलाईन मागवलेला अँपल चा एअरपोड आला. चेक करू म्हटले तर काय तंत्रज्ञान प्रगत झाले आहे याचा प्रत्यय आला. त्यात नॉइज कॅन्सलेशन चा पर्याय होता .आता नॉइज कॅन्सलेशन म्हणजे त्या एअरपोड मध्ये अशी काही रचना असेल कि ते कानात फिट बसतील अन बाहेरचा गोंगाट कमी होईल अशी माझी भाबडी समजूत.पण या एअरपोड ने तीला मूठमाती दिली.कारण कानात बसवल्या बसवल्या जेव्हा नॉइज कॅन्सलेशन चे ऑप्शन निवडले अन एकदम प्रचंड शांतता पसरली. बापरे हे मात्र जबरीच होते अन संगीत हि एकदम शुद्ध स्वरूपात ऐकायला मिळत होते.अर्थातच इंग्लिश गाणी..आजूबाजूला असलेला गोंधळ कणभरही जाणवत नव्हता.मी प्रचंड प्रभावित झालो.

त्यावेळी मात्र मला माझ्या म्युझिक सिस्टीम ची आठवण झाली. माझ्या लहानपणी आमच्याकडे नॅशनल चा आडवा (पॅनासॉनिक) टेप रेकॉर्डर होता. माझे वडील त्याला एक स्पीकर एक्सटेंशन लावून त्यावर गाणी ऐकत. तो पायोनिर कंपनीचा होता हे अजूनही मला आठवते. वडील त्याला करणा म्हणायचे. त्यावर आम्ही प्रल्हाद शिंदे ,भीमसेन जोशी यांची भक्तिगीते ऐकत असू. वडील राष्ट्र सेवा दलात असल्याने राष्ट्र सेवादलाचीच गाणी सदोदित वाजत असत. त्या टेप अन त्या करण्यामुळे मला संगीताची प्रचंड आवड निर्माण झाली. तो टेप माझा माझ्या इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षांपर्यंत सोबती होता. त्याच्या सदाबहार आठवणींचा एक कप्पा अजूनही माझ्या मनात आहे. असा हा टेप माझ्या स्वतःच्या ताब्यात मी कोपरगावला शिकायला आल्यावर आला.तोपर्यंत त्याची एकदमच अवस्था झालेली होती. पण बिचारा संगीत मात्र ऐकवत होता. पूर्वी तो तारुण्यात असतांना त्याचा पूर्ण घरभर संचार असायचा मात्र सध्या तो जर्जर झाल्याने एका लाकडी कपाटात विसावला होता.
त्याचे पुढचे कव्हर गायब झालेले होते ,त्यामुळे झाले काय कि कॅसेट जशी संपत असे ,हा तुसडा टेप तिला बाहेर फेकून देत असे.माझे मित्र या गोष्टीला खूप हसायचे. त्यामुळे मला कॅसेट संपायची वेळ जशी जवळ येत असे,तसे मी आगाऊ उठून त्याला बंद करीत असे .त्यामुळे बऱ्याचदा माझी इज्जत वाचे परंतु थोडी जरी गफलत झाली तर हा खडूस टेप त्याचा डाव साधायचाच. माझी मित्रमंडळी तुलनेने माझ्यापेक्षा बरीच सधन,त्यांच्याकडे चांगल्या वस्तू होत्या परंतु आमच्या घरातील स्वातंत्र्य ,तसेच माझी अभ्यासाची वेगळी खोली त्यामुळे सगळी माझ्याकडे जमत असत अन पर्यायाने माझ्या अश्या भयंकर गोष्टी त्यांना सहन कराव्या लागत ....बिचारे..
आता तो पूर्वीचा वडिलांचा करणा नव्हता .माझ्या मामाने दिलेला एक स्पीकर होता जो स्टिरिओ ला असायचा. पण हा स्पीकर म्हणजे एक ध्यान च होते.पण मी त्याला व्यवस्थित वापरत होतो अन तोही बिनतक्रार माझी सेवा करीत होता. तसे त्याला मी एक चांगले आसन दिलेले म्हणजे एका मोठ्या माठावर मी त्याला स्थानापन्न केलेले होते. त्यामुळे आनंदून तो सुरात गात असे. हा माठ मी त्या कपाटावरच ठेवला होता. कोणीतरी मठात अर्धे पाणी भरल्यास अजून चांगला आवाज येतो असे सांगून माझी फिरकी घेतलेली पण मी सश्रद्ध असल्याने तोही प्रकार करून पहिला होता.पण आवाज अजूनच खराब झाला ,त्यामुळे पुर्वव्रत च ती व्यवस्था ठेवली गेली.
कधी कधी आवाजात खर खर चर चर असा आवाजही सामील होत असे.त्यावर अर्थिंग नसल्याने असे होत आहे म्हणून कोणीतरी सांगितले.मग बऱ्याच तज्ज्ञांना त्यावर उपाय विचारल्यावर एक तार स्पिकरला बांधून तिचे दुसरे टोक भिंतीत खिळा ठोकून त्यास बांधावे जेणेकरून स्पिकरला ला अर्थिंग मिळेल. आणि काय आश्चर्य ,हा उपाय भलताच परिणामकारक ठरला. फक्त अधून मधून त्या खिळ्यावर पाणी मारावे लागत असे जेणेकरून आवाज पुन्हा व्यवस्थित होत असे. त्यामुळे आम्ही जेव्हा संगीत ऐकत असू अन अचानक खर खर चर चर आवाज यायला लागल्यास आमच्यात असलेला कोणीही उठून काहीही न बोलता त्या खिळ्यावर पाणी मारीत असे अन आवाज पुन्हा व्यवस्थित होत असे. त्यासाठी मी सलून मध्ये जसे फवारा असतो तो मी मिळवलेला होता,अन त्यामुळे हे पाणी मारण्याचे काम सोपे होत असे. याला एक प्रकारचे तेव्हाचे नॉइज कॅन्सलेशन असावे.
आणि हो टेप ला एक घाणेरडी सवय होती ,मधूनच तो बंडाचे निशाण उभारी अन बंद पडत असे.बहुदा मला लहानपणापासून त्याने बघितलेले असल्याने हा अर्धवट काय मला आज्ञा देतो म्हणूनच जाणून बुजून त्याचे वरिष्ठपण दाखवीत असावा.पण मी त्याच्या वरिष्ठ पणाची कवडीचीही तमा न बाळगता त्याला मागून एक हलकासा फटका मारीत असे , मात्र या अपमानानंतर तो मात्र सुरळीत चालू होत असे. असे आमचे अनेक मतभेद होते मात्र दरवेळी माझा विजय होत असे. फक्त मित्र मंडळी जमल्यास तो कॅसेट फेकून तो त्याचा बदला घेत असे. फिदी फिदी हसणाऱ्या माझ्या मित्रांसमोर माझा झालेला अपमान त्याला बहुदा सुखावत असावा .
या टेप सारखीच माझी माझ्या कॅसेट्च्या संग्रहाबद्दल आहे. त्यावेळी बाहेरच्या दुकानात आपली आवडती गाणी कागदावर त्याच्या फिल्म्स सहित लिहून द्यावी लागत ,त्या बरहुकूम तो दुकानदार ती कॅसेट गाण्यांनी भरून देत असे.त्यावेळी या कॅसेट मध्ये गाणी भरून देणाऱ्यांचा वेगळाच तोरा असे. अत्यंत तुसडेपणाने हि मंडळी वागत.जणू पुढच्यावर ते एक उपकारच करीत असत.वेळेत कॅसेट न देणे ,थोडी जागा उरली असल्यास भलतेच गाणे मध्ये घुसडणे अश्या बऱ्याच उचापती हि मंडळी करीत. मी पूर्वी T - सिरीज ची कॅसेट वापरीत असे ,परंतु माझ्या मित्राकडे मी पहिल्यांदा सोनी च्या कॅसेट्स पहिल्या अन त्यांच्या प्रेमात पडलो.६० मनात अन ९० मिनिटांच्या त्या कॅसेट्स.अत्यंत सुमधुर आवाज अन त्यांचा टिकाऊपणा ,त्यामुळे माझ्या कपाटात नंतर मात्र त्याच कॅसेट्स दिसू लागल्या. अन मी अत्यंत कल्पक पणे अन एकाच मूड ची गाणी भरीत असल्याने माझ्या मित्रांमध्ये या कॅसेटची प्रचंड मागणी होती. त्यानांही आवडत असे. मला हि सवय माझ्या मित्राच्या घरी असलेल्या कॅसेट मधील गाण्यांमुळे लागली.त्याने त्यात फक्त चांद शब्द असलेलीच गाणी भरलेली होती. मला हा प्रकार खूप आवडला. अन त्याप्रमाणे मीही तशीच गाणी भरू लागलो. त्यावेळी मी मुकेशच्या गाण्यांचा चाहता होतो. त्याची खूप म्हणजे सर्वच गाणी वारंवार ऐकायचो. त्यामुळे मी मित्रांना म्हणायचो कि मुकेशने नुसती गाण्याच्या सुरुवातीची तान जरी घेतली तरी मी ते गाणे ओळखू शकतो.
त्यावेळी शाहरुख अन काजोलचा दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट आलेला होता.त्यातले "तुझे देखा तो ये " हे गाणे माझे प्रचंड आवडते .त्यामुळे मी एका कॅसेटमध्ये सलग तेच भरले. (जेव्हा दुकानदाराला ते सांगत असतांना तो माझ्या कडे विचित्र पणे पहात असल्याचे मला अजूनही आठवते.) या कॅसेटची एक आठवण आहे. मी कॉलेजला गेलेलो असतांना माझा मित्र विलास ( याने शाळा १० वि नंतर सोडून दिलेली अन अशीच किराणा दुकानात काम करायचा अन माझा लहानपणापासूनच खास मित्र ,याला माझ्या रुम मध्ये कधीही आडकाठी नव्हती ) रूमवर आला. मस्त टेप लावून पलंगावर पसरला.अन नेमकी हीच एका गाण्याची कॅसेट टेपमध्ये होती.विलास माझ्यापेक्षा मोठा पण भयंकर भित्रा. गाणे ऐकतांना बहुदा त्याला झोप लागली असावी. थोड्यावेळाने त्याला जाग आली तेव्हा झोपेच्या आधी जे गाणे चालू होते तेच गाणे आताही वाजत होते. त्याला शंका आली. त्याने थोडे फॉरवर्ड केले तेच गाणे ,मग त्याने कॅसेट उलटी केली तेच गाणे , इकडूनही पुढे मागे घेतली असता तेच गाणे ....बापरे त्याला ती भुताटकी वाटली अन त्याने किंचाळून धूम ठोकली.बरेच दिवस तो इकडे फिरकला नाही ,एकदा भेटल्यावर त्याला विचारले तेव्हा त्याने हे सांगितले तेव्हा माझी हसून हसून पुरेवाट झाली. पण जेव्हा कारण कळले तेव्हा मला त्याचे दोन धपाटे खावे लागले.
बऱ्याचदा हा अवखळ टेप कॅसेट्च्या रिबिनला अडकवीत असे अन बंद पडे,त्यावेळी त्याची मर्जी सांभाळून अत्यंत अलगद ती रिबीन बाहेर काढावी लागत असे. अनेकदा ती तुटे ,परंतु या गीष्टीवर माझे प्रभुत्व होते.एखाद्या शल्यविशारदाप्रमाणे माझी अवजारे बाहेर निघत. पेन्सिल,ब्लेड ,टिस्को टेप. टिस्को टेप व्यवस्थित फितीच्या रुंदीप्रमाणे कापणे अन व्यवस्थित दोन टोकांना चिटकविणे. हे वेळखाऊ तसेच धैर्याचे काम होते. जर फीत जिथे तुटली तिथेच चिटकवली तर गाणे वाजताना थोडासाच फरक जाणवे परंतु जर फीत तुटून चुरगळली गेल्यास कापावी लागे,अन चिटकवावी लागे. त्यामुळे एक गाणे चालू असतांनाच दुसरे गाणे उपटसुम्भासारखे मधेच चालू होई तेही मध्येच कुठूनतरी.पण गाणे ऐकतांना कोणीही याचे आश्चर्य किंवा विचित्र वाटून घेत नसे उलट माझे मित्र अश्यावेळी माझ्याकडे कौतुकाने बघत कि याने हि तुटलेली कॅसेट व्यवस्थित केली. मला अश्यावेळी स्वर्ग दोन बोटे राहत असे. या कौशल्यामुळे माझे मित्र बऱ्याचदा मला त्यांच्या तुटलेल्या कॅसेट ठीक करण्यासाठी आणून देत ,ही मात्र वैतागाची गोष्ट होती.
त्यावेळी कोपरगावात बरीच टेप ची दुकाने होती.विशेष म्हणजे कोपरगाव सर्किट म्हणून पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते.या सर्किट वर ,ज्याने हे बनवले त्याने एक मोठ्ठा बंगला बांधला होता.आम्हाला त्या गोष्टीचा खूप अभिमान होता. मला हा टेप घ्यायची खूप इच्छा होती पण ते कधीच जमले नाही.
काळाच्या ओघात हा टेप कुठे नाहीसा झाला ते कळले हि नाही.सर्व कॅसेट्स सुद्धा कुठे गेल्या हेही लक्षात नाही.परंतु टेपच्या त्यावेळच्या तारुण्यातल्या आठवणी अजूनही मनात गर्दी करतात.आजकालच्या मुलांना खरेही वाटणार नाही अश्या या गोष्टी. आपण यासर्वांचे साक्षीदार असल्याने काळानुसार सगळे कसे बदलले हे पाहून भयचकित होतो.पण त्यावेळी दुनिया हि खरी होती जरी त्यावेळच्या गोष्टी अत्यंत प्राथमिक स्वरूपातल्या असल्या तरी.आताच्या भ्रामक दुनियेत ते एक सुवर्णपान होते. आताच्या गोष्टींना दोष देत नाही परंतु त्यावेळचा जिव्हाळा अन एकत्र बसून संगीत ऐकणे हि गोष्टही आजच्या पिढीला काल्पनिक वाटेल.
असो कालाय तस्मे नमः ,दुसरे काय.....

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

21 Mar 2024 - 5:45 pm | सोत्रि

मस्त, नॉस्टॅल्जिक झालो लेख वाचून!

- (टेपरया) सोकाजी

भम्पक's picture

23 Mar 2024 - 5:30 pm | भम्पक

धन्यवाद सोकाजि....

व्यक्तिगत तपशिलांमुळे लेखाची रंगत वाढली.

भम्पक's picture

23 Mar 2024 - 5:31 pm | भम्पक

धन्यवाद राम चन्द्र जि....

छान लेख, एअरपोड कोणते घेतले आहे ? 3rd gen की 2 gen.

धन्यवाद जिनेन्द्र जि .. प्रो जेन २..

तिमा's picture

25 Mar 2024 - 6:56 am | तिमा

मुकेश तान मारु शकायचा या कल्पनेनेच हंसुन गडबडा लोळलो! सर्व पुरुष प्लेबॅक सिंगर्समध्ये, सर्वात बोजड आवाज जर कुणाचा असेल तर तो या मुकेसभाईचा! हां, त्याचा आवाज युनिक होता, त्याच्या आवाजात दर्द होता म्हणुन मोठ्या संगीतकारांनीही त्याला घेतलं, हे मान्य.

तिमा, मीपण त्यावेळी हसून हसून च सांगायचो......अगदी गडाबडा लोळून नाही मात्र... :)

जवळजवळ सगळे अगदी डिट्टो माझ्या बाबतीतही अगदी शेम टू शेम घडलेले आहे. कोपरगावच्या ऐवजी दिल्लीतील 'जमनापार' भाग. मुकेशची गाणी तर मी अजूनही रोज ऐकतो. पाश्चात्य संगिताची ओळख मला 'मोझार्ट टॉप टेन' या कॅसेटवरून झाली. कुमार गंधर्वांच्या मिळतील तेवढ्या कॅसेटा घेतल्या होत्या. जवळपास चारशे कॅसेटा शेवटी फेकून दिल्या असतील.
शेवटला परिच्छेदही खूप भावला.
माझ्या अगदी लहान नाती मधुबालाची 'देख के तेरी नजर' वगैरे गाणी लावायचा आग्रह रोज करतात.

धन्यवाद चित्रगुप्तजी ...

श्वेता२४'s picture

27 Jul 2024 - 1:04 pm | श्वेता२४

कॅसेटमध्ये गाणी भरून घेणे हा प्रकार साधारण मी 12-13 वर्षाचे असेपर्यंत च्या काळापर्यंत खूप जोरात चालत होता. त्यानंतर सीडी आणि बरेच पुढचे पुढचे प्रकार आले आणि तंत्रज्ञानाने फार मोठ्या प्रमाणात वेग घेतला. आताशी कॅसेट आणि टेप रेकॉर्डर हे सगळं आठवलं तरी गंमत वाटते. आम्ही रिकामी कॅसेट घेऊन टेप रेकॉर्डर वरती स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचो. खूप भारी वाटायचं. जुन्या काळात फिरून आल्यासारखं वाटलं.

धन्यवाद श्वेता ....