चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता.
कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन"
मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !
चित्रगुप्त थेट कॅबने सकाळी नऊ वाजता मंगलमूर्ती वाड्यासमोर प्रकट झाले !
(आदल्याच दिवशी मी मिपाकर अभ्याला या मिनी कट्ट्याच्या आमंत्रण दिले होते, पण अभ्याच्या काही अडचणींमुळे तो येऊ शकला नाही)
माझा आणखी एक मित्र प्रफुल्ल यालाही आमंत्रण देऊन ठेवले होते.... प्रफुल्लची सविस्तर ओळख नंतर करून देतोच.
मंगलमूर्ती वाड्याचे सुंदर प्रवेशद्वार पाहून चित्रगुप्त खुश झाले सकाळची प्रसन्न वेळ किंचित थंडी त्यामुळे वातावरण अल्हाददायक होते. मग काय, इथं फोटो मस्ट की !
शुभ सकाळ : चित्रगुप्त मी आणि मंगलमूर्ती वाड्याचे सुंदर प्रवेशद्वार
पेशवेकालीन हा वाडा दगडी बांधणीचा आहे आणि आत मध्ये लाकडाचे कोरीव काम केलेले स्तंभ आहेत नक्षीदार कमानी खूपच आकर्षक आहेत. कौलारू छतांमुळे ही वस्तू वास्तु आणखीच लक्षवेधक ठरते. वाड्यातली शांतता मनाला वेगळ्याच वातावरणात घेऊन येते.
मंगलमूर्ती वाड्याचाचे वरून दिसणारे दृष्य
(प्रचिसौजन्य : आंजा )
आम्ही इथल्या मुख्य मूर्तीचं म्हणजे तांदळाचे (महान साधू मोरया गोसावी यांना नदीत मिळालेला शेंदरी स्वयंभू मूर्ती) आणि कोठारेश्वरचे गणेशाचे दर्शन घेतलं. वाड्यातले लाकडी खांब कोरीव कमानी लाकडाचे छत, वरच्या मजल्यावर जायला जुन्या पद्धतीचा लाकडी जिना, तिथे असलेली गच्ची हे सगळं बघितलं…. लोभसवाणं होतं. मुख्य सभागृहात मोरया गोसावी यांच्या जीवनावरचे प्रसंग चित्रे यांचाही आस्वाद घेतला वरच्या मजल्यावर गेलो. तिथेही मोरया गोसावी यांच्या जीवनावरचे अतिशय सुंदर पेंटिंग्स लावलेले होते हे पेंटिंग्स जुने प्रसिद्ध चित्रकार चंद्रशेखर जोशी यांच्या कलाकृती आहेत, साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी काढलेली ही सुंदर पेंटिंग्स पाहताना आम्ही हरवून गेलो.
त्याचवेळी माझा चित्रकार मित्र प्रफुल्लही तिथे आला. त्या पेंटिंग्स वर चर्चा झाल्या, त्यातल्या कलाकारीच्या नजाकती याबद्दलही चर्चा झाली. अर्थातच इथे फोटो काढायला परवानगी नाही. तरी आम्ही आजूबाजूचा अंदाज घेत गपचूप फोटो काढले.
चित्रगुप्त पेंटिंग्स आणि पेंटिंगची माहिती बघताना आणि वाड्याचं सौंदर्य निरखताना रंगून गेले होते.
वरच्या मजल्यावरून जुन्या लांबलचक लाकडी जिन्यावरून उतरून खाली आलो. मागच्या बाजूच्या कोठारेश्वर गणेशाचे दर्शन घेतले. समोरच संस्थेची गोशाळा आहे. सकाळी गो-दर्शन झाल्यामुळे मन प्रसन्न झाले.
तिथला गोशाळेतलाही फोटो टिपला.
वाड्यातून बाहेर आल्यावर “एक तो सेल्फी बनता है” असं म्हणत चित्रगुप्तांनी आमची स्व-छबी टिपली
मंगलमूर्ती वाड्याच्या मागच्या बाजूस चित्रगुप्त आणि प्रफुल्ल
मंगलमूर्ती वाड्याचा मागच्या बाजूचा आडवा फोटो
मंगलमूर्ती वाड्याच्या बाहेरही गप्पा रंगल्या. बोलता बोलता चित्रगुप्त यांना सांगितले की “इथून अगदी जवळ “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ आहे, पाहण्यासारखा सुंदर प्रकल्प आहे. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटक्या विमुक्त जमातीतील मुलांसाठी, विशेषतः पारधी मुलांसाठी हे निवासी गुरुकुल बांधलेला आहे आणि आत्तापर्यंत तिथे अशा शेकडो मुलांना शिक्षण देऊन प्रस्थापित करण्यास सुरुवात केलेली आहे” ही सगळी माहिती चित्रगुप्तांना खूप रोचक वाटले वाटली मग तिथूनच जवळ असलेल्या गुरुकुलम कडे आमचा मोर्चा निघाला.
पुनरुत्थान समता गुरुकुलम मध्ये प्रवेश करताना
पुनरुत्थान समता गुरुकुलम पवना नदीच्या काठीच आहे. इथून पलीकडे जायला रस्ता तयार करण्याचे काम चालू आहे आणि त्याच्यासाठी नदीवर टांगलेल्या पुलाच (बास्केट ब्रिज) काम आता पूर्णत्वास देत आहे. त्यामुळे इथलं जुनं सुंदर असं प्रवेशद्वार पाडावं लागलं आणि त्या रस्त्याच्या खालून अर्ध भुयारातून आम्ही गुरुकुलम मध्ये प्रवेश केला.
गुरुकुलमचा नामफलक आणि कार्यालय
तिथल्याच डाव्या भिंतीवर भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे सुंदर म्युरल आहे आणि अर्थातच त्यात भटक्या विमुक्त जमातीतील वीरांच्या प्रतिमांचाही समावेश आहे.
ही गुरुकुलमच्या आतले प्रचि
दगड, विटा, माती, बांबू, तट्ट्या, वासे असं साधं-स्वस्त साहित्य वापरून विविध खोल्या- कक्ष तयार करण्यात आल्या आहेत
या सर्व खोल्या, कक्ष इथल्याच भटक्या विमुक्त जमातीतील निवासी विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकांच्या आणि कारागिरांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेल्या आहेत हे विशेष !
लाल भिंत, विटांचा पोत, कोनाडे, खिडकीच्या कमानी, त्रिकोणी सवणे
समाजाच्या दातृत्वातून आणि कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नाने ही संस्था उभी राहिलेली आहे.
गेरूचा रंग आणि पारंपरिक चित्रं
भिंतींना गेरूचा रंग आणि त्यावरची पारंपरिक चित्रं या मुळं परिसराला एक नैसर्गिक टुमदारपणा आलेला आहे.
मागे दगडी बुरुज आणि समोर प्रतिभावंत चित्रकार
सुखावणारी झाडी
गुरु-कुलम हे पवना नदीच्या काठीच असल्याने हा परिसरात सुखावणारी झाडी आहे, वेली फुल झाडं आहेत. गुरु-कुलमचा हा रम्य परिसर आपण वेगळ्याच जगात आल्याचा अनुभव देतो.
गुरुकुलम चा परिसर पाहून खुश झालेले चित्रगुप्त
तीन दिग्गज.
प्रफुल्ल हा सामाजिक कार्यकर्ता, कलाक्षेत्रातील संघटक असल्यामुळे त्याचं गुरुकुल मध्ये नेहमी येणं जाणं असतं आणि अर्थातच पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्याशी गेल्या कित्येक वर्षांपासून परिचय आणि स्नेह-बंध आहे. गुरुकुलमच्या विविध कामात ,कार्यात प्रफुल बऱ्याचदा सहभागी असल्यामुळे तिथला कर्मचारी वर्ग सुद्धा प्रफुल्ल आल्यावर आदराने स्वागत करतो. आज सकाळी पद्मश्री गिरीशजी प्रभुणे गुरुकुलम मध्येच होते. प्रफुल्ल आलाय म्हटल्यानंतर त्यांनी भेटण्यासाठी थांबायला सांगितलं ते आल्यावर चित्रगुप्त यांच्याशी ओळख करून दिली आणि गप्पांच्या छोट्या सत्रात गुरुकुल मध्ये काय काय चित्रकला शिल्पकला यांच्या कार्यशाळा होणार आहेत याबद्दल माहिती दिली. याच वेळी मी संधी साधून चटकन या त्रयींचे प्रचि टिपले. वरील प्रचिमध्ये हे तीनही दिग्गज.
इथून बाहेर पडता पडता चिंचवड मधल्या पुरातन काळभैरवनाथ मंदिराचा विषय निघाला. हे मंदिर 200-250 वर्ष जुने असून चिंचवडचे ग्रामदैवत आहे. इथं वर्षातून एकदा बगाड उत्सव आणि दसरा दिवाळीच्या सुमाराला यात्रा यात्रा भरते. हे मंदिर दुमजली असून प्रवेशद्वारावर नक्षीदार कमान कमाल आहे. जुन्या चौसोपी वाड्यासारखी रचना असलेल्या त्या मंदिरात लाकडाचे नक्षीदार खांब आहेत.
लाकडी खांबावरील सुंदर नक्षीकाम
आता या खांबांवर रंग देऊन त्याचं मूळ सौंदर्य लपवून टाकलेला आहे.
हे सौंदर्य चित्रगुप्तांच्या नजरेतून सुटलं नसतं तरच नवल !
मंदिराच्या भिंतीवर पारंपारिक पद्धतीने देव-देवतांची आणि पौराणिक प्रसंगांची चित्र रेखाटण्यात आलेली आहेत. हे एक पेंटिंग, यावरचे रंगाची पोपडी गिलाव्याची निघालेली होती. चित्रगुप्त यांच्या कलाकार नजरेला त्यात एखादी कलाकृती दिसली तर नवल नाही ! त्यांनी त्याचा फोटो काढून घेतला मग पण मी पण फोटो काढला.
मंदिराच्या प्रदक्षिणामार्गावर मागच्या बाजूला असा हा जुना लाकडी दरवाजा दिसला. कडी-कोयंडा बिजागिरी गंजलेला ओलीमुळे लाकडावर वेगवेगळे फॉर्म उमटलेला चित्रगुप्तांच्या कलाकार नजरेतून तिथेही क्लिक. मग माझंही क्लिक.
प्रवेशद्वाराच्या समोरच प्रशस्त पारावर एक मोठा वटवृक्ष होता, त्यामुळे या भागातलं गावपण उठून द्यायचं दिसायचं. तो उन्मळून पडला आणि पाराचा कट्टा ओका बोका दिसायला लागला. एखादी सुकेशा सुंदरी केस निघून गेल्यावर कशी दिसते तसं वाटतं ताई इथे बघितलं की. मी तर या पारावरचा वृक्ष खूपच मिस करतो.
आता अकरा वाजत आले होते पोटात कावळे ओरडत होते. मोरया गोसावी मंदिराच्या कॉर्नरलाच कवी उपहारगृहात मिसळपाव आणि बटाटा वडा याची ऑर्डर देत असताना शेजारच्या बाकावरील कन्येला आमच्या चित्रकलेच्या आणि इतर गप्पा ऐकून आम्ही भारी माणसं लक्षात आलं !
आम्ही, मी मिपावर लिहितो हे ऐकून तिला भारी वाटलं. मग तिनं आनंदाने आमचा तिघांचा फोटो काढला.
चित्रगुप्तांना नंतर मोरया गोसावी समाधी मंदिरा गणेश दर्शनाला न्यायचा विचार होता पण ते म्हणाले "मला टिपिकल मंदिर पाहण्यात इंटरेस्ट नाही दुसरं काही असेल तर बघूया" त्यांना तिथेच जवळ असलेल्या क्रांतिवीर चापेकर वाड्याच्या दिशेने निघालो. या वाड्याचा पूर्ण जिर्णोद्धार करून तिथे आता क्रांतिकारक चापेकर बंधू स्मारक आणि संग्रहालय तयार केले आहे या वाड्याच्या नूतनीकरणाचा काम सुरू असल्यामुळे हा वाडा बंद होता. बाहेरूनच फोटो काढून वाड्याच्या आत साधारण काय काय आहे याची माहिती चित्रगुप्तांना दिली. वाडा बघायचा वेळ वाचल्यामुळे लगेचच मी त्यांना ऑफर दिली "प्रफुल्लच्या घरी येताय का ? त्याची पेंटिंग, कलाकृती सुद्धा बघता येतील" त्यांनी आनंदाने होकार दिला.
लगोलग मी आणि चित्रगुप्त रस्टन कॉलनीत रिक्षाने माझ्या नातेवाईकांच्या घरी निघालो कारण तिथे माझी दुचाकी पार्क केलेली होती. चिंचवडचा हा वृक्षराजी असलेला परिसर बघून चित्रगुप्त खुश झाले. मग माझ्या दुचाकी वर बिजलीनगर आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गे रावेतला प्रफुल्लच्या घरी आलो. तोपर्यंत प्रफुल्ल त्याच्या दुचाकीवरून त्याच्या घरी पोहोचला होता.
प्रफुल्लच घर पीसी-सीओई या इंजिनिअरिंग कॉलेजच्या पुढच्या टेकडाजवळ नवीन भक्ती शक्ती चौक ते रावेत या नवीन झालेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजच्या जवळच आहे. इथे पुढे कुठलीच वस्ती नाही. देहूरोड कंटोन्मेंटचा भाग लागून आहे. इथे छानशी झाडी आणि हिरवळ आहे. प्रफुलच्या घरातून सकाळच्या वेळेला चक्क मोर दिसतात आणि एरवी तर पक्षी कुजन करत असतातच. त्याच्या घरी यायचं म्हणजे छोटी निसर्गातली सहल वाटते मला. आत्तापर्यंत कित्येक सहली झालेल्या आहेत. आमचं एकमेकांकडे खूप येणं-जाणं असतं ! रावेतचा हा वृक्षराजींनी नटलेला निसर्गरम्य भाग बघून चित्रगुप्त आनंदी झाले.
अरे हो, प्रफुल्लची ओळख करून द्यायची राहिलीस ना ! प्रफुल्ल हा चित्रकार, शिल्पकार असून उत्कृष्ट कलासंघटक देखील आहे. वॉटर कलर, ऍक्रेलिक, ऑइल पेंटिंग इत्यादी बरोबरच अनेक माध्यम त्याला वश आहेत. त्याच्या कलेची विशेषता सांगायची म्हणजे दगडी पाठीवरील कोरीवकाम अर्थात स्लेट कार्व्हिंग आणि कोलाज सुतचित्र !
सुंदर सुतचित्रासह देखणा कलाकार प्रफुल्ल
आत्तापर्यंत त्याच्या मार्गदर्शनाखाली आणि संयोजना खाली पुणे पिंपरी चिंचवड मध्ये अनेक कला प्रदर्शने झाली आहेत. तो संस्कार भारती (पुणे, पिंपरी चिंचवड परिसर) हा महत्त्वाचा शिलेदार असून अनेक प्रथितयश चित्रकार-शिल्पकार- कलाकार-कारागीर इत्यादी लोकांशी त्याचा दांडगा संपर्क आहे. शाळेतल्या नोकरीतून त्याने स्वेच्छा निवृत्ती घेऊन कलाक्षेत्रात मुशाफिरी सुरू केली.
त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा त्याचं ऋषीतुल्य असं व्यक्तिमत्व बघून दबून गेलो होतो ... पण हळूहळू आमची मैत्री इतकी खुलत गेली की आम्ही “अरे-तुरे ”वर कधी आलो ते कळलच नाही. त्याच्या नादांनच मला विविध कलाकारांना भेटण्याचा छंद लागला. यावर अधून मधून फेसबुक वर लिहीत असतो.
त्याच्या घरी पोहोचल्यावर सुरुवातीचा चहा-पाणी झाल्यावर आम्ही सैलावलो. आणि त्याच्या एकेक कलाकृती बघायला सुरुवात केली.
स्लेट कार्व्हींग दाखवताना प्रफुल्ल.
आपली जुनी दगडी पाटी असते ना त्याच्यावर चिनी चिनी ब्लेड्स अशा विविध साधनांनी तो त्या दगडी पाटीवर (तीच ती दगडी पाटी जी आपल्यापैकी काहीजणांनी लहानपणी वापरली असेल, काही जणांनी पाहिली असेल) कोरीवकाम करतो. अशा प्रकारचं कोरीवकाम क्वचित कोणीतरी करत असेल !
स्लेट कोरीव कामाची वैशिष्ट्यं सांगताना प्रफुल्ल
भिंतीवरील सुतचित्र दाखवताना प्रफुल्ल
विविध प्रकारचे कागद विविध प्रकारचे टेक्स्चर्स आणि त्याच्या जोडीला पॅचेसची बॉर्डर करण्यासाठी विविध प्रकारचे दोरे सुतळ्या किंवा लोकरी धागे योग्य तो गोंद वापरून चिटकवले जातात. असं हे सुतचित्र तयार होतं !
मोठं जिकिरीचं काम असतं, कारण वळणदार रेषा लयीत येण्यासाठी लक्ष खूप केंद्रित करावं लागतं. आपण जे सुरुवातीचे चित्र बघितलं ज्याच्यात शंकराची पिंड आणि शंकर-पार्वती अशा प्रतिमा आहेत ते चित्र देखील असंच सुत-चित्र आहे. वेळोवेळी त्याला वेगवेगळे भन्नाट फॉर्म सुचत असतात त्याच्या विविध भौमितिक रचना आणि त्यातून व्यक्त होणारा आशय हा थक्क करत राहतो. आपल्याला असं का सुचू शकत नाही असं वाटत राहतं !
एका वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीसह प्रफुल्ल
अशा प्रकारच्या चित्रांना काय नाव द्यावं असा त्याला प्रश्न पडला. मग मीच त्याला सुचवलं की : धागा वापरल्यामुळे याला “सुत-चित्र असं म्हणता येईल” ते त्याला आवडलं आणि तिथून पुढे मग आम्ही सूत-चित्र म्हणू लागलो.
मागील भिंतीवर प्रफुल्लने चितारलेल्या विविध कलाकृती आणि चित्रगुप्त
आणि शेवटी ...... चित्रगुप्त प्रफुल्ल आणि मी
आमच्या गप्पांची मैफिल चांगलीच रंगली होती. प्रफुल्लकडे कलाकारांचे, कलाक्षेत्रातले आणि सामाजिक क्षेत्रातल्या अनुभवांचे विविध किस्से होते. ते ऐकताना मजा वाटत होती. चित्रगुप्तांच्या पेंटिंगचाही विषय निघाला. मोठ्या डेस्कटॉपच्या भव्य स्क्रीनवर आम्ही त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण पेंटिंगचा पुरेपूर आनंद घेतला. पेंटिंग तयार होत असताना मनात येणारे विचार, पेंटिंग करताना केलेले विविध प्रयोग, त्यातून निर्माण होणारे परिणाम आणि चित्र रसिकाला जाणवणारी व्यापक जाणीव, पेंटिंगला प्रदेशातून मिळणारा प्रतिसाद परदेशी रसिकांच्या दर्दी प्रतिक्रिया याच्यावर भरभरून गप्पा झाल्या.
या दोन्ही कलाकारांच्या सहवासात माझा क्षण-न -क्षण संपन्न होत होता. ही महफिल संपूच नये असं वाटत होतं. पण चित्रगुप्तांच्या पुढील कार्यक्रमामुळे थांबणं भाग होतं.
माझा संपूर्ण दिवस मंत्रमुग्ध करून टाकणारा हा "अचानक मिपाकट्टा" खूपच आनंददायी होता !
प्रतिक्रिया
19 Apr 2024 - 8:53 pm | प्रचेतस
मस्त एकदम.
आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो. चित्रगुप्तकाका इकडं चिंचवडात आले आणि भेट नाही झाली.
सर्व वृत्तांत खुपच आवडला.
19 Apr 2024 - 9:01 pm | प्रसाद गोडबोले
+१
24 Apr 2024 - 12:19 pm | चौथा कोनाडा
@प्रसाद गोडबोले,
धन्यवाद !
21 Apr 2024 - 5:29 pm | चौथा कोनाडा
धन्यू वल्ली. वेळेशी मारामारी करत कट्टा पार पडला... एकट्या अभ्याला रात्री फोन करू शकलो.
पुढच्यावेळी नीट नियोजन करुन भेटूयात.
19 Apr 2024 - 9:19 pm | अमरेंद्र बाहुबली
चित्रगुपटक काका परदेशातून आलेही आणी पीसीएमसीत अवतरले ही,?? आणी कट्टेही झाले? :(
मिपाची हेर यंत्रणा फेल झाली.
21 Apr 2024 - 5:42 pm | चौथा कोनाडा
हा ... हा ... हा
लै भारी डायलॉक !
असे झकास योग येतात,
अकस्मात मिपाकर येतात,
अचानक कट्टे होतात,
आनंदून जातात सहवासाने
19 Apr 2024 - 9:25 pm | कंजूस
समविचारींचा कट्टा झकास झाला आहे.
फोटोही सुंदर. सुतचित्र कल्पना आवडली. काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही . तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे.
गुरुकुल रचना पाहून केरळातील बेकर या स्थापत्यकाराची आठवण झाली.
चिंचवड परिसरातील या वास्तू लेखकाबरोबर पाहण्याचा योग आला होता त्याची उजळणी झाली.
कट्टा वृतान्त आवडला.
24 Apr 2024 - 2:21 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कंजूस जी.
असे योग अचानक येतात.
तुमच्याशी भेट हा ही सुंदर योग होता !
तुमचं कौतुक प्रफुल्ल पर्यंत पोहोचवत आहे !
धन्यवाद, पुनश्च !
19 Apr 2024 - 9:50 pm | कर्नलतपस्वी
त्रिगुणात्मक त्रैमुर्ती प्रकट झाल्या, काहितरी गहन विचारविमर्श झाला असेल म्हणून पामरांना निमंत्रण दिले नसावे.
पुन्हा असा दुग्धशर्करा योग आला तर जरूर कळवणे. हातातले काम सोडून पळत येवूच, सध्या फोटोवर समाधान मानतो.
20 Apr 2024 - 7:46 pm | कंजूस
चित्रकार, कलाकार मिपाकरांचा कट्टा होता तो. प्रचेतसलाही गाळले तर .....
कविंचा ग्रीष्मकालीन कट्टा ठेवा. राजकीय टीकाकारांचा ठेवा. अध्यात्मिक पारमार्थिक लोकांचा ठेवा. अंधारात काळे मांजर शोधणाऱ्यांचा ठेवा. उडवून द्या दणका पिंचिंतेपुणेसासवड नगरीत.
20 Apr 2024 - 7:55 pm | कर्नलतपस्वी
पिंचीकरांनी पुढाकार घ्यावा आम्ही अनुमोदन देतो.
कंजूस भौं बरोबर सहमत.
20 Apr 2024 - 10:50 pm | चित्रगुप्त
सुनियोजित नव्हे, तर हा अचानक घडून आलेला कट्टा होता, असे म्हणता येईल.
जानेवारीतील माझ्या पुणे - प्रवासात तसे आणखीही मिनी कट्टे घडून आले, उदाहरणार्थ रामचंद्र यांचेसह तळजाई टेकडी परिसरात भटकंती, कर्नल साहेबांनी दिलेली उच्चभ्रू हाटेलीतली मेजवानी, चौथा कोनाडा आणि बबन तांबे यांचेबरोबर पाषाण तळ्याभोवती भ्रमण आणि खादाडी, प्रशांतबरोबर गप्पा-चर्चा, चित्रकार रंजना यांची चित्रे बघायला त्यांचेकडे चौको आणि प्रफुल्ल यांचेसह जाणे... वगैरे. अबा तेंव्हा आजारी असल्याने अगदी जवळ रहात असूनही भेट झाली नाही.
--- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते.
बाकी चौकोंनी वृत्तांत मस्त लिहीला आहे.
21 Apr 2024 - 12:06 pm | Trump
येथे लोकांना सांगायचे. अजुन काही लोक आले असते.
13 May 2024 - 9:57 pm | चौथा कोनाडा
Trump, पुढच्या वेळी प्रयत्न करूयात जमवायचा ... धन्यू ट्रम्प !
& धन्यवाद चित्रगुप्त जी !
20 Apr 2024 - 8:13 am | कुमार१
कट्टा झकासच . . .
21 Apr 2024 - 5:26 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, कुमार१ जी !
21 Apr 2024 - 12:41 pm | विवेकपटाईत
कट्टा आवडला. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ही आम्हा दोघांचा कट्टा झाला होता. मंडी हाऊस जवळच्या एका कला दिर्घेत शेकडो चित्र त्यांच्या सोबत पहिली चित्रकलेचे थोडे ज्ञान ही मिळाले. या शिवाय या व्यवसाातील राजनीती ही थोडी फार समजली.
3 May 2024 - 5:55 pm | चौथा कोनाडा
सध्याच्या "शॉर्ट अॅण्ड स्वीट' च्या काळात असे झटपट क्वि़क कट्टे बरे पडतात.
मोठ्या कट्ट्यांना बरेच प्लानिंग आधी पासून सुरु करावे लागते जे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही !
आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली.
चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले !
धन्यवाद, विवेकपटाईतजी !
22 Apr 2024 - 11:48 am | गोरगावलेकर
पुण्यातील फक्त एक दोनच ठिकाणे बऱ्याच वर्षांपूर्वी ओझरती पहिली आहेत. त्यामुळे या जागांची ओळख विशेष आवडली.
25 Apr 2024 - 12:50 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, गोरगावलेकर !
24 Apr 2024 - 2:17 pm | नि३सोलपुरकर
24 Apr 2024 - 2:17 pm | नि३सोलपुरकर
24 Apr 2024 - 2:17 pm | नि३सोलपुरकर
24 Apr 2024 - 2:19 pm | अहिरावण
कळाले. तीनदा सांगायची गरज नाही.
24 Apr 2024 - 2:46 pm | नि३सोलपुरकर
काही तांत्रिक कारणामुळे प्रतिसाद अर्धवट आणी चारदा प्रकाशित झालेला आहे.
तसदी बद्द्ल क्षमस्व _/\_
10 May 2024 - 5:49 pm | चौथा कोनाडा
व्वा नि३ यांनी मला ३ दा शाबसकी दिली की !
धन्यवाद अहिरावण!
24 Apr 2024 - 2:32 pm | नि३सोलपुरकर
29 Apr 2024 - 12:38 pm | चौथा कोनाडा
संधी हुकली तरी पुढील संधी नक्की येईल.
वेळेत समजले तर नक्की नियोजन करून भेटूयात.
धन्यवाद !
24 Apr 2024 - 3:14 pm | शशिकांत ओक
भावले. सुतचित्राचे वेगळे आकर्षण वाटले. एक सांस्कृतिक सहल चित्रगुप्तांसमावेत पहायला आणि वाचायला मस्त वाटली. या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समाज कार्याची ओळख झाली. पुढ्च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायला आवडेल.
25 Apr 2024 - 12:50 pm | चौथा कोनाडा
धन्यवाद, शशिकांत ओक सर !
पुढील कट्ट्याचे बघु कसे योग येतात ते !
3 May 2024 - 8:10 pm | नठ्यारा
चौथा कोनाडा,
माहितीबद्दल धन्यवाद. एक लेख येउद्या किंवा चित्रगुप्तांना त्यांच्या वह्या उघडायला सांगा.
आभार!
-नाठाळ नठ्या
5 May 2024 - 8:07 pm | अहिरावण
सध्या ते सामंतांची रद्दी चाळत आहेत काही गावते का ते पहाण्यासाठी !
13 May 2024 - 10:00 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .... !
धन्यवाद, नाठाळ नठ्या _/\_
25 May 2024 - 5:42 pm | चौथा कोनाडा
पुनरुत्थान समता गुरुकुलम वरील दोन व्हिडिओ:
१) गुरुकुलम परिसर :
https://www.facebook.com/reel/292472316999354
२) गुरुकुलम मधलं नविन अॅम्फी थिएटर :
https://www.facebook.com/reel/2705837469575403
10 Jul 2024 - 5:56 pm | चौथा कोनाडा
गुरुकुलम मधील आणखी दोन व्हिडिओ :
१) अॅम्फी थिएटर परिसरातील सजावट :
https://www.youtube.com/watch?v=7BcjCwKlscQ
२) मुखवटे बनवण्याची कार्यशाळा:
https://www.youtube.com/watch?v=TSDch3HNMoo