समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं.
त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने जोडले गेलेले बहिण -भावंड यांची कहाणी "नाळ २" सिनेमात आहे.
इथेही चैत्याची तिच तगमग आहे चिम्मी त्याची बहीण त्याला कधी राखी बांधणार.पण इत्तूशी चिमणी मस्त मिरची सारखीच तिखट, नाही म्हणजे नाही ऐकत.हळूहळू चिम्मी चैतू आणि 'मनीदादा' यांच्या नात्याची वीण बांधली जात राहते.पण हे सगळं या चिमुकल्यांच्या विश्वात घडतांना गावातल्या डोंगराच्या जादूई विहिरीने ऐकलं पाहिजे ना तर ते १००% घडणार.तेव्हा चिमूकले मोठं साहस करायला निघतात.
खरं म्हणजे पहिल्या दृश्यापासूनच सह्याद्री मनात बिंबवला आहे.निसर्गरम्य जुन्नर,जीवधन किल्ला, नाणेघाट,तलाव परिसर निसर्गसौंदर्याची उधळण संपूर्ण चित्रपटात आहे.तसचं गावातली चूल, छोट्या छोट्या गल्ली, सारवलेल्या भिंती, पद्धतशीर त्या खोपट्यात मांडणीत मांडलेली भांडी,पाण्याच्या खळखळाट अगदी एकूण एक फ्रेम अप्रतिम आहे.
गाणी डराव डराव भिंगोरी लहान मुलांसाठी आहे पण संगीत आणि गमतीशीर असल्याने परत परत ऐकावी वाटतात.
चिम्मी चैत्याला धावत धावत राखी बांधते.
जादूई विहिरीत मागितलेल्या इच्छांची भिरभिरणारी फुले एकाच नाळेने जोडलेल्या नात्यांना नवा सुगंध देतात..
-भक्ती
प्रतिक्रिया
18 May 2024 - 5:27 pm | चौथा कोनाडा
सुंदर लिहिलंय !
मंजुळ्यांच्या सिनेमातील गाव कायम लक्षात राहिल असं असतं, मग तो पिस्तुल्या असो, फॅण्ड्री-सैराट असो, किंवा पावसातील निबंध असो.
आणि या सिनेमाचा दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंती हा मंजुळे स्कुलचाच प्रतिनिधी आहे !
18 May 2024 - 8:20 pm | Bhakti
धन्यवाद चौको.
18 May 2024 - 11:18 pm | अमरेंद्र बाहुबली
आधी नाळ - १ पाहतो.
29 May 2024 - 8:47 am | कुमार१
सुंदर लिहिलंय !
30 May 2024 - 12:41 pm | चक्कर_बंडा
ऑक्टोबर २०२२ ची सुरुवात, नाळ २ चं चित्रीकरण पिंपळगाव जोगा धरण, खिरेश्वर भागात सुरू होतं त्यावेळच्या हरिश्चंद्रगड वारीवेळी नागराज मंजुळे हे नाव दरवाज्यावर असलेली व्हॅनिटी व्हॅन रस्त्याकडेला दिसली होती, अजून ही एक दोन व्हॅन होत्या आसपास.
पुढे एका ठिकाणी मोठ्या संख्येने बरेचं लोक नाश्ता करीत होते, आम्हाला ते ट्रेकर्स ग्रुपचे लोक वाटले. आम्ही ही तिथे गैरसमजाने घुसलो होतो पण त्यांनी सांगितले की ती सोय फक्त नाळ सिनेमाच्या सहाय्यक लोकांसाठीचं आहे तेव्हा काढता पाय घेतला, त्या लोकांच्या मुक्कामाची सोय ही तिथेच होती बहुदा.
परतताना दुसऱ्या दिवशी दुपारी मंजुळेंची व्हॅन धरणाच्या भरावाजवळ होती पण नेमकं चित्रीकरण कुठे सुरु आहे ते मात्र दिसलं नाही व आम्ही आमच्या मार्गाने निघून आलो.
30 May 2024 - 12:51 pm | Bhakti
ओह, पाहायला पाहिजे होतं थोडं शुटिंग.
31 May 2024 - 8:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सिनेमाची ओळख थोडक्यात असली तरी (अजून दळन मोठं केलं पाहिजे) छान आहे.
आता सिनेमा पाहणे आले. लिहिते राहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. धन्स.
-दिलीप बिरुटे
18 Jun 2024 - 9:40 am | यश राज
छान लिहिलय.
परवाच नाळ २ बघितला, खुप आवडला.
चैतू, चिमी व मणी यांची कामे खुप छान व निरागस. चिमुरड्या चिमीचे मणिदादावर असलेले प्रेम, त्याला इतर मुलांनी दिलेला त्रास तिला सहन होत नाही व त्यांना ती बारिक दगड मारते व ओरडते. एकदमच निरागस. चैत्याला भाऊ म्हणुन घेण्याअगोदर ती त्याला अगदी तावुन सुलाखुन घेते.
चैत्याचे काम पण अप्रतिम, चिमिचे प्रेम मिळण्यासाठी तिळ तिळ तुटणारा चैत्या, तिच्या आग्रहाखातर जादुच्या विहिरीपर्यंत तिला घेवुन जाण्याची धडपड. खिशात राखि घेवुन फिरतो. एकदम मस्त.
सर्व चित्रिकरण स्थळे अप्रतिम. एकंदरित खुप दिवसांनंतर अप्रतिम मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले.
18 Jun 2024 - 6:13 pm | कंजूस
मीही परवा पाहिला. चित्रीकरणाची दृष्ये पाहिल्यावर इकडे गेलो होतो ते आठवलं. पण मंजुळे सोलापुरजवळ करतील आणि तिकडेही असे डोंगर तलाव असावेत असं वाटलं. वरच्या खरडीतून नक्की झालं की तेच धरण आहे.
ही जागा पावसाळ्यात सुंदर असते.