श्रोडिंगरची मांजर, एनटॅन्गल्मेंट आणि भारतीय मतपेटी

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
29 May 2024 - 3:17 am

क्वांटम फिजिक्समध्ये श्रोडिंगरची मांजर हा एक अतिशय प्रसिद्ध असा वैचारिक प्रयोग आहे. तुम्ही समजा एखाद्या मांजरीला एका बॉक्समध्ये बंद केले आणि त्यामध्ये जहाल विष यादृच्छिकपणे (randomly) सोडले जाईल अशी व्यवस्था केली तर बॉक्स उघडे पर्यंत ती मांजर जिवंत आहे की मृत हे कळणार नाही. म्हणजे जोपर्यंत आपण बॉक्स उघडत नाही आणि मांजरीचे निरीक्षण करत नाही तोपर्यंत मांजर एकाच वेळी मृत आणि जिवंत आहे. क्वांटम फिजिक्समध्ये ह्या अवस्थेला सुपर पोझिशन असे म्हणतात. (Superposition is the ability of a quantum system to be in multiple states at the same time until it is measured)

भारतीय मतपेटीमध्ये सध्या राजकीय भविष्य दडलेले असल्याने आत्ताच्या सरकारची आणि विरोधकांची स्थिती श्रोडिंगरच्या मांजरीसारखी आहे. दोन्ही बाजूंकडून विजयाचे दावे केले जात आहेत म्हणजे दोन्ही बाजू एकाच वेळी विजयी आणि पराभूत आहेत. मत पेटी उघडल्यावरच कोण जिंकले आणि कोण पराभूत झाले आहे हे उमगणार आहे म्हणजे भारतीयांच्या भवितव्याची मांजर जिवंत की मृत हे कळणार आहे.

क्वांटम फिजिक्समध्ये Entanglement ची संकल्पना आहे. (Quantum entanglement is when two particles link together in a certain way no matter how far apart they are in space) दोन एनटॅन्गल्ड पार्टीकल्स भौतिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी एका पार्टीकलच्या निरीक्षणातून दुसऱ्या पार्टीकलची परिस्थिती समजते आणि एका पार्टीकलमध्ये काही बदल केला तर तक्षणी दुसऱ्या पार्टीकलमध्ये बरोबर विरोधी बदल होतो. मत मोजणी करताना एक उमेदवार पुढे असेल तर त्याचा विरोधक उमेदवार (हिंदीत निकटतम प्रतिद्वंद्वी) मागे पडतो आहे हे कळणार आहे किंवा दुसरा पुढे असेल तर पहिला मागे आहे हे समजणार आहे. एक जिंकला तर तक्षणी दुसरा पराभूत झाला आहे हे कळणार आहे. अशा रीतीने भारतीय मतपेटीत सध्या सद्यकालीन सरकार आणि विरोधक Entangled अवस्थेत आहेत.

नेहेमीच्या क्लासिकल फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्स मध्ये तीन प्रकारचे सिद्धांत* आहेत.
आईन्स्टाईनची थेअरी ऑफ रिलेटिव्हीटी
हायझेनबर्गचे अन्सर्टन्टी प्रिन्सिपल
आणि
गोडलचा इन्कम्प्लिटनेस थेअरम्

हे सिद्धांत मतपेटीला कसे लागू होतात? मत मोजणीनंतर जो कोणी उमेदवार विजयी होईल त्याला तुलनात्मक दृष्ट्या (relatively) इतरांपेक्षा जास्त मते मिळणार आहेत. जो पर्यंत मतपेटी उघडून मत मोजणी होत नाही तो पर्यंत कोण जिंकणार आणि कोण हरणार ह्या बद्दल अनिश्चितता (uncertainty) असणार आहे. विजयी उमेदवारावर त्याचे विरोधक EVM घोटाळा, मतदार यादी घोटाळा, बनावट मतदाते इत्यादी आरोप करून त्याला यशाचा निर्भेळ आनंद मिळू देणार नाहीत आणि जर एखाद्या पक्षाला बहुमताजवळ जाऊन ही पूर्ण बहुमत नसेल तर अपूर्णत्वेची जाणीव होईल ( incompleteness).

सतरंज्या उचलणारे आणि एकमेकांचे डोके फोडणारे विरोधी कार्यकर्ते एकीकडे तर एकमेकांची गळाभेट घेणारे त्यांचे व्यासपीठावरील विरोधी नेते दुसरीकडे, हे बघितल्यावर माझ्या सारख्या सामान्य नागरिकाला राजकारण हे क्वांटम फिजिक्स सारखे दुर्बोध आणि आकलनाच्या पलीकडले न वाटले तरच नवल. आता चार तारखेला मतपेटीतून कोणाची मांजर जिवंत आणि कोणाची मृत निघते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ह्या खरडीचे कवित्व तेव्हढेच.

* शंभर सव्वाशे वर्षांपूवी शास्त्रज्ञ म्हणत असत की पुढील १०० वर्षांत विज्ञानाला विश्वासंबंधी सर्वकाही कळेल. परंतु क्वांटम फिजिक्सच्या शोधानंतर अतिशय विचित्र, अनाकलनीय, अतार्किक, गूढ गोष्टी समोर येऊ लागल्या त्यातून हे वरील सिद्धांत तयार झाले. निश्चित माहिती हाती लागण्याऐवजी अनिश्चीततेत भर पडली.

आमच्या डोंबोलीच्या यू-ट्युबर गुरुदेवांच्या मते "माया, माया" म्हणतात ती हीच.
सब माया हैं ।
जय गुरुदेव _/\_

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

अप्लाईड क्वांटम फिजिक्स! समजाऊन सांगणारा धागा. ह्या वरून स्फूर्ती घेऊन मी गणितात शिरतो.
तुम्हाला मोबिअसचा पट्टा -Möbius strip- माहित असेलच. ह्या पट्ट्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत. एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या मार्गाची जो यात्रा करतो प्रदक्षिणा करून परत येतो त्याच्या मध्ये आमूलाग्र बदल होतात म्हणजे जे यात्रा करायच्या आधी उजव्या हाताने -उजवखरे -काम करत असत ते डावखरे होतात. किंवा डाव्या विचार सरणीचे राजकारणी कट्टर उजवे होतात. आपले हृदय डाव्या बाजूला झुकलेले असते म्हणतात. पण ह्यांचे हृदय डावीकडून उजवीकडे झुकते.
ह्याचे क्लासिक उदाहरण म्हणजे नको इथे कोणाची नावे नको घ्यायला.
काही रेअर राजकारणी तर अनंत काळाचे यात्री आहेत. सर्व साधारण लोकांना ही यात्रा करायला काही वर्ष लागतात. पण काही लोक ही यात्रा महिन्यातच पुरी करतात. आणि लगेच पुढल्या यात्रेचे प्रस्थान ठेवतात.
पुंलभौतिकीच्या सिद्धांतानुसार इलेक्ट्रॉन ह्या क्षणी कुठे आहे हे आपल्याला समाजाने शक्य होत नाही तद्वत हे अनंत काळाचे यात्रेकरू - ह्यांचा काही भरोसा नाही.

निनाद's picture

29 May 2024 - 7:42 am | निनाद

सांगायचे तर हेच ते स्पिन डॉक्टर का?

हो. एका डॉक्टरचा स्पिन clockwise तर दुसऱ्याचा anticlockwise.
एक डॉक्टर म्हणतो कि अबकी बार ४०० पार.
तर दुसरा म्हणतो २००-२२० मिळाले तरी खूप
आपला भेजा मात्र स्पिन-फ्राय!

पुंलभौतिकीच्या ठिकाणी पुंजभौतिकी असे वाचावे.

दोन एनटॅन्गल्ड पार्टीकल्स भौतिकदृष्ट्या कितीही दूर असले तरी एका पार्टीकलच्या निरीक्षणातून दुसऱ्या पार्टीकलची परिस्थिती समजते आणि एका पार्टीकलमध्ये काही बदल केला तर तक्षणी दुसऱ्या पार्टीकलमध्ये बरोबर विरोधी बदल होतो.

एनटॅन्गल्ड पार्टीकल्सचे हे तात्काळ संवाद प्रकाशापेक्षा वेगाने प्रवास करणारी माहिती प्रसारित करण्यासारखे वाटते, जे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार अशक्य आहे.

आहे मनोहर तरी हे पारंपारिक भौतिकशास्त्राच्या नियमानुसार विसंगत आहे. पण काय करणार...

निनाद's picture

29 May 2024 - 7:48 am | निनाद

हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.
कारण जर आपण इलेक्ट्रॉनची स्थिती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची गती अत्यंत अनिश्चित असेल.
जर आपण इलेक्ट्रॉनची गती अत्यंत अचूकतेने मोजली, तर त्याची स्थिती अत्यंत अनिश्चित असेल. म्हणजेच आपण कणाची स्थिती जितक्या अचूकतेने मोजू शकतो, तशी आपण त्याची गती मोजू शकत नाही.

जर सत्ताधारी पक्ष जिंकला तर विरोधी पक्ष हरला हे निश्चित आहे. यात अनिश्चितता कशी?

<<<< हायझेनबर्गचे अनिश्चितता तत्त्व का यात घेतले हे कळले नाही.>>>
आत्ता ह्या क्षणी कोण जिंकणार आणि कोण हारणार आहे हे अनिश्चित आहे (जरी ते आता ठरलेले आहे (मतपेटीत बंद) परंतु माहीत नाही असे आहे).

निनाद's picture

29 May 2024 - 7:50 am | निनाद

गोडल बाबाचे अपूर्णता प्रमेय डोक्याबाहेर आहे... कुणी सोप्या उदाहरणाने समजावणार असेल तर वेगळा धागा काढावा ही नम्र विनंती.

विक्रम आणि वेताळ गोष्टीत येणार.

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2024 - 9:47 am | प्रसाद गोडबोले

सुंदर लेख.

असे लेख पाहिले की आमचेही लेखन समजून घेऊ शकतील असे लोक मिपावर आहेत हे पाहिल्याचे समाधान लाभते .

:)

कर्नलतपस्वी's picture

29 May 2024 - 10:57 am | कर्नलतपस्वी

कुणी तरी फटाफट गंमत आम्हां सांगेल काय?
या टोपी खाली दडलयं काय...
या EVM मधे दडलयं काय.

सांगा दाजिबा,सांगा तात्याबा,

अनामिक सदस्य's picture

29 May 2024 - 12:15 pm | अनामिक सदस्य

आपल्याला माहीत नसले तरी मांजर एक तर जिवंत किन्वा मृत असणार आहे. एकाच वेळी मृत आणि जिवंत दोन्ही असणार नाही.
फक्त आपल्याला अजून माहीत नाही, किन्वा कधीच माहीत होणार नाही.

क्वांटम फिजिक्स मधील कुठल्या सन्कल्पनेचे हे सुलभीकरण आहे?

सुलभीकरणासाठी म्हणून 'बघितले नाही' आणि 'बघता येतच नाही' यात फरक केला नाहीये का?

झालेले पाहण्यास उत्सुक आहे. ४ जूनपर्यंत वाट बघणे अनिवार्य आहे.

कर्नलतपस्वी's picture

29 May 2024 - 5:27 pm | कर्नलतपस्वी

मी बिना गणीत बिना सायन्स वाला. गूगलून qp,Schrodinger cat काय गौडबंगाल आहे ते वाचले.

पण या बाॅक्स मधे एक मांजर जिवंत आणी एक अर्धमेली असणार आहे.

या थिअरीला काय म्हणावे,एक बाळबोध प्रश्न.

अनिश्चितता आहे पण ते मांजर वगैरे उदाहरण लागू नाही.

मुळात विज्ञानाच्या काही घटना कोणतीही उदाहरणे सांगून समजावता येणार नाहीत. उलट ते आणखी अवघड होते. कित्येक शतके द्ष्य गोष्टींची कारणे शोधण्यासाठी विज्ञान पुढे आले. आता विज्ञान जे वर्तवत आहे त्याची प्रचिती शोधायची आहे. पण ते मनुष्याच्या आयुष्यमानाच्या परीघाबाहेरचे आहे.

आता विज्ञान जे वर्तवत आहे त्याची प्रचिती शोधायची आहे. पण ते मनुष्याच्या आयुष्यमानाच्या परीघाबाहेरचे आहे.>>>
कशाबद्दल बोलत आहात, सर?

विज्ञानाने काही भाकीतं केली आहेत. पण ती प्रत्यक्ष पाहायची असतील तर मनुष्याच्या तुटपुंज्या आयुष्यात पाहायला मिळणार नाही.

गवि's picture

29 May 2024 - 8:30 pm | गवि

मनोरंजक तुलना.

बाकी श्रोडिंजरचा काल्पनिक प्रयोग हा ज्या उद्देशाने त्याने सुचवला त्याच्या पेक्षा विपरीत अर्थाने तो वापरला जातो. म्हणजे एकाच वेळी मांजर मृत आणि जिवंत आहे अशी अवस्था त्या पेटीत असते, असू शकते.. आणि निरीक्षकाने निरीक्षण करण्यावर एक फायनल स्टेटस निश्चित होते असा भास निर्माण केला जातो. तसे अजिबात नसते. उलट तसे असणे कसे योग्य नाही हे दाखवण्यासाठी हा प्रयोग (पूर्ण काल्पनिक) त्याने योजिला.

कोण निवडून येणार याचा त्या मांजर कल्पनेची काहीही साम्य नाही.

लोकशाहीत ५१ विरुद्ध ४९ निकाल आला तर ५१ वाला सत्तेत येतो किंवा जिंकतो. टक्केवारीने पाहिल्यास ४९ वाला संपूर्ण चुकीचा नसतो. त्याच्या बाजूनेही एवढे लोक असतातच. तराजूचे पारडे थोड्याशा फरकाने वरखाली होते तसे.

___________________

बाकी डोंबोंलीत किती गुरुदेव आहेत ? चिंचवडपेक्षा , पुण्यापेक्षा अधिक?

धर्मराजमुटके's picture

30 May 2024 - 8:27 pm | धर्मराजमुटके

श्रोडिंगरची मांजर आमच्या अल्पबुद्धीमुळे डोक्यावरुन जाते. मात्र बिरबल अकबराचा पोपट आम्हाला जवळचा वाटतो.

चामुंडराय's picture

2 Jun 2024 - 3:10 pm | चामुंडराय

काही फारसा फरक नाही.
पोपट मेला आहे हे माहीत असूनही कोणी अकबराला सांगत नाही.
श्रोडिंगरची मांजर मेली की जिवंत आहे हेच माहीत नाही.
आता चार तारखेला कळेलच भारतीयांच्या भवितव्याच्या मांजरीचे (किंवा मतपेटीतील बोक्यांचे) काय झाले.

सुरिया's picture

3 Jun 2024 - 11:18 am | सुरिया

फरक आहे,
तुम्हाला माहीत असलेली गोष्ट आणि तो पोपट ह्याच्यात मुख्य फरक आहे.
तुमचा पोपट मेलेलाच असतो, अकबराला कसे सांन्गायचे प्रश्न असतो.
ह्या गोष्टितला पोपट हातात धरुन मागे हात लपवलेले असतात. प्रश्न असतो की पोपट मेलेला का जित्ता.
जित्ता म्हणले की मगच्यामागे पोपट मारायचा असा प्लान असतो.
आता कुणाची कंडीशन कुणासारखी आहे ते तुम्हीच बघा.
जमल्यास एक काव्य जिलबी पाडलीत तरी हरकत नाही. ')

कंजूस's picture

31 May 2024 - 6:00 am | कंजूस

दुकानदार जसे समोर उभ्या असलेल्या गिऱ्हाईकाच्या कपडे, पादत्राणे, हावभाव यावरून कोणत्या किंमतीचे कापड घेणार हे ओळखतो तसे निवडणुका समीक्षा करणारे मतदानाच्या रांगेतील लोक पाहून निकाल वर्तवतात.

द कॅट इज् गोन्ना कम आउट ऑफ द बॉक्स सून !!

धर्मराजमुटके's picture

5 Jun 2024 - 8:04 pm | धर्मराजमुटके

श्रोडिंगर फसला. मांजर ना जिवंत आहे ना मेलं आहे. ते अर्धमेलं झालं आहे म्हणा किंवा अर्धजिवंत आहे म्हणा.

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2024 - 6:35 pm | चौथा कोनाडा

फार कई कळलं नै ,, पण आम्च्या घरी जळू आहे ती एका प्लास्टीक च्या पारदर्शक बाटलीत ठेवली आहे , ती बर्‍याचदा सुपर पोझिशन अवस्थे मध्ये जाते पण नीट बघितलं की जीवंत असते !
आमची खाष्ट भांडकुदळ वाचाळ सासू सुद्धा रहायला आली (चांगली २-४ महिने रहायला येते) की दुपारच्या वेळी जेवणानंतर सुपर पोझिशन ला जाते .. आशा पल्लवित होतात पण जवळ जाऊन पाहिलं की माझा चेहरा काळवंडून जातो, मनात निराशेचे मळभ दाटून येते.. सासू स्टिरीओफोनिक डॉल्बी जांभई देते अन चहा ठेवायला किचनचा ताबा घेते. असतात जगात कै दुर्दैवी माझ्या सारखे !

असो लेख भारी "वाटला"