तात्या ......... !

चौथा कोनाडा's picture
चौथा कोनाडा in जनातलं, मनातलं
20 May 2024 - 10:39 pm

तात्या वारला !

चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.

काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस. तो फोरास रोडच्या वेश्यावस्ती पासून सुधीर फडकेंच्या गाण्यापर्यंत कशावरही लिहायचा. मी अति पुरोगामी लिखाण सुरु केले की ढुंगण वर करून झोपलेल्या नागड्या बाळाचा फोटो टाकायचा - वर म्हणायचा हे आस्तिक नास्तिक विज्ञान वगैरे - वाद विवाद संपेपर्यंत तात्या ढुंगण वर करून झोपला आहे.

तात्या शिवसैनिक होता . आमची मैत्री झाली ते आम्ही दोघंही शिवसेना असल्याने. तात्या शिवसैनिक होता हे कौतुक नाही, मी पण होतो, मुंबई ठाण्यातली निम्मी मराठी माणसं शिवसैनिकच असतात. संघ भाजप विरुद्ध मनापासून दंड ठोकणारा तो शिवसैनिक होता. तात्याची शिवसैनिक गिरी समजण्यासाठी मुंबईचा कनिष्ठ मध्यम वर्गीय गरीब मराठी माणूस समजून घेतला पाहिजे. मुबईतला भाजपा गुजराथी मारवाडी श्रीमंतांचा पक्ष आहे. डाळीच्या भावाची चिंता असलेला मराठी माणूस मुंबई भाजपात नाही. मागे डाळीचे भाव वाढले तेव्हा कचकून शिव्या खाल्ल्या मोदीने तात्याच्या. पुढे तो स्वतःला काँग्रेसवाला म्हणायचा कधी बहुजनसमाजमावादी चित्पावन म्हणायचा !

तात्या अभ्यंकर चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण . तात्याच्या जातीचा उल्लेख करण्यामागे एक महत्वाचं कारण आहे. लेखाच्या शेवटी ते देणार आहे. आटपाट नगरात एक गरीब ब्राम्हण राहत होता अशा गोष्टी आपण लहानपणापासून वाचल्या आहेत. 1990 नंतर जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत आटपाट नगराच्या कथा गेल्या. मुंबई पुण्यातले गरीब ब्राम्हण सुद्धा गेले. शिकले इंग्लिश बोलले ते बाहेर गेले. काळाच्या मागे राहिलेले , न शिकलेले अडाणी मूंबईतून बाहेर फेकले गेले. मुंबई अडाणी अंबानींची झाली. थोडक्यात उद्याच्या अन्नाची चिंता असलेला ब्राम्हण शिल्लक राहिला नाही. तात्या राहिला.

त्याच वडिलोपार्जित लहान घर ठाण्यात होतं त्यात राहिला . हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली . दोन पेग नी घसा ओला करत कोणत्याही बार मध्ये बाबूजींचं , माडगूळकरांचं - गीत रामायण गात राहिला . तात्याच्या आवाजात भारदस्त पणा होता . प्रेम वासना गाणं दारू वेश्यावस्ती या सगळ्यावर लिहिताना आणि बोलताना त्याच्या व्यक्तिमत्वातला भारदस्त पणा दिसत असे . तात्या वेश्या वस्तीत फिरायचा . पण त्याचं पुरुष म्हणून स्खलन झालं नाही आणि प्रेमाची किंमत त्याच्या लेखी कमी झाली नाही . उलट वाढली.

एक काळ असा होता की , बरेचसे गरीब ब्राम्हण ट्रॅफिक लायसन्स आणि एलआयसी चे एजन्ट असायचे . तात्या ते होताच . शिवाय तो शेअर मार्केट चा पण एजन्ट होता . इंट्रा डे शेअर मार्केट हा जुगार आहे . पैसे छापायचे मशीन कोणी विकत नसतो . बौद्धिक आणि शारीरिक कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत हे अर्थशास्त्र कळण्याची बौद्धिक कुवत त्याच्यात निश्चित नव्हती . निष्पाप आणि निर्मळ नसला तरी तो जाणून हलकट निश्चित नव्हता . तो त्या शेअर मार्केट च्या दुष्टचक्रात गेला . मग लोकांकडून पैसे उधार घेणं आलं . दुप्पट करतो आलं . त्याच्या नावाने पेपरात नोटिसाही आल्या . पण तात्याने अनेकांचे पैसे बुडवले तसे अनेकांना दुप्पट करून सुद्धा दिले होते.

तात्याची पिसं काढता येतील - ते सोप्प आहे . त्याचं गरीब ब्राम्हण असणं मात्र समजून घेणं अनेकांना अवघड आहे . तात्या अविवाहित होता . त्याचा जबरा प्रेमभंग सामाजिक कारणामुळे झाला असावा . तितकं मोकळं आणि खरं तो नेहमी बोलेल याची खात्री नाही . तो दुःखी नव्हता पण त्याच्या अडाणचोट रांगड्या वृत्तीत एक एक घाबरलेला आणि हरलेला माणूस होता.

माझी तात्याशी पहिली भेट 2013 साली झाली असावी . त्याच्या आधी फक्त इंटरनेट वर ओळख होती . मला त्याचं लिखाण भारी वाटलं होत . कोणी दुढाचार्य चष्मांवाला, शर्ट इन केलेला अभ्यंकर मला अपेक्षित होता . जे पाहिलं - तो सरळच पेशन्ट होता शर्टाच्या गुंड्या खालीवर लावल्या होत्या . तोंडात गुटखा तंबाकू खाऊन पांढरे घट्टे पडले होते . वजन जास्त . ब्लड प्रेशर मुळे हाताला किंचित कंप होता.

पहिल्याच भेटीत त्याने माझ्याकडे पैसे मागितले . शेअर मार्केट मध्ये लावून डबल करतो बोलला . त्याची बुडणाऱ्या पैशाबद्दलची कीर्ती आधीच ऐकली होती . गरिबी सुद्धा माहीत होती . पैसे बुडणार हे निश्चित होतं . पण त्याची नड पण समजत होती . जितके मागितले तितके दिले . पण एक अट घातली दुप्पट कर पण परत देऊ नको. त्यानंतर तात्याने मला कधी पैसे मागितले नाहीत.

त्याची बार मधली गाणी ऐकली . भीमसेन जोशी आणि बाबूजींचे किस्से ऐकले . तात्या थोरामोठयाच्या संगतीत राहिला . पण मोठा झाला नाही लहान मुलासारखाच राहिला . तात्याची एक आई आहे . तात्या मेला तो त्या आईच्या साक्षीने . आई खूप म्हातारी आहे . तात्याने तिची वर्षानु वर्ष सेवा केली आहे . तात्या तिचं सगळं नित्यनेमाने प्रेमाने करायचा . लहान मुलासारखाच आई आई बोलायचा .

तात्याने लग्न केले नाही , स्त्री प्रेमासाठी तो आसुसला होता. विषय काढला लग्नाचा तर म्हणायचा लग्न करून सुद्धा तुम्ही तसेच भोंगळे रहाणार लेको ! तात्या मेला तेव्हा त्याची आई जिवंत होती. आई आजारी आहे - तिला नीट चालता सुद्धा येत नाही. तात्याला हार्ट अट्याक येऊन तो जमिनीवर कोसळला. त्यावेळी आईने माझा श्रावणबाळ म्हणून हंबरडा फोडला. एक गरीब ब्राम्हण मेला. त्याच्या आईचं बघायला कोणी नाही.

- डॉ अभिराम दिक्षित एन.

----------------------------------------------------------------------------------
मिपा मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर आपल्यातून जाऊन ५ वर्षे झाली.
दि. १५ मे २०१९ ही ती तारिख.

फेसबुक चाळता चाळता मिपाकर अतृप्त आत्मा यांच्या वॉल वर हा लेख दिसला.... अन काळजात चर्र झालं, मी तात्या अभ्यंकर यांना कधी भेटलो नाही तरी !
मिपा सुरू झाल्या पासुन तात्याचं लेखन वाचत होतो.. अन आपसु़क या व्यक्तिमत्वाचा फॅन झालो. भेटायची इच्छा झाली पण योग नाही आले. तात्यांचं लेखन जेव्हा फॉर्म मध्ये होतं तेव्हां मिपाकर नव्हतोच फक्त एक्स्टर्नल वाचक .. पण मनातून पक्का मिपाकर झालो होतो. पुढे २०१४ ला मिपा सदस्यत्व घेऊन कमेंटायला अन लिहायला लागलो,

अतृप्त आत्मा यांनी अभिराम अभिराम यांचा लेख शेअर करताना " मी दरवर्षी हा लेख वाचतो आणि शेवटच्या चार ओळींना भरपूर रडतो ! एक तात्या आपल्यात अजूनही आहे .याची नम्र जाणीव होते ." अश्या भावना व्यक्त केल्यात.

तात्या अभ्यंकर यांच्या व्यक्तिमत्वाचा आरपार वेध घेणारा हा लेख मला इथं शेअर करावासा वाटला.
तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_

व्यक्तिचित्रविचार

प्रतिक्रिया

थांबलो. लेख वाचला. पुन्हा वाचला. काय अफाट व्यक्तिमत्व. लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
उद्या पुन्हा वाचेन. आणि पुन्हा लिहीन! मी तर ह्या ठिकाणी नवीन आहे. तरी देखील लेख मनाला भिडला.
तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

चित्रगुप्त's picture

21 May 2024 - 12:24 am | चित्रगुप्त

मिसळपावबद्दल विग कमांडर ओकांकडून कळल्यावर लगेचच सदस्यत्व घेतलं आणि काहीबाही लिहिणं चालू केलं. तात्याची दाद आणि कौतुक मिळू लागल्यानं हुरुप वाढला आणि आणखी चांगलं लिहावसं वाटू लागलं. खरंच तात्या अफाट रसिक, दर्दी, मनमोकळा आणि जे जे भावेल त्याचं अफाट कौतुक करणारा गडी होता. त्याला अश्रूपूरित श्रद्धांजली.

हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली .
हे माहिती नवहते .. यावरून एक आठवण झाली ... एक मित्र होता नाकासमोर बघून चालणारा लागण झालेला , पेशाने अकाउंटंट , त्यामुळे गुंतवणुकीवर चर्चा व्हायची .. एकदा नोकरी व्यतिरिक्त तो छोट्या उद्योगांची अकाउंटिंग ची कामे थोडी करायचा .. एक दिवसं म्हणाला मी एका उद्योगात गुंतवणूक केलीय .. काय विचारला तर म्हनाला " गे नाईट क्लुब .. मी उडालोच
तो म्हणाला मी हिशोब तपासायला फक्त रात्री क्लब उघडा असताना जात नाही
तात्या चे वर्णन ऐकुणी अ जून एक लहानपणची आठवण ,,, वडिलांचा एक मित्र, असाच देहाने मोठा, हुशार सिव्हिल इंजिनेर , पण सगळं कारभार अघळ पघळ संसाराकडे लक्ष नाही .. पैंसे कमवयाचा आणि घालवयाचा पण,
सतत एक ब्रिफ केस बरोबर ,
घरी आला कि म्हणायचा " वाहिनी भरपूर तूप द्या आणि बका बका खायचा " जरा अघोरींचं वागणं त्यामुळे घरच्या बाई माणसांना आवडायचा नाही ... लवकर मेला ...

लागण झालेला ऐवजी लग्न झालेला असे वाचावे , ( क्षमा भलताच अर्थ निघाला )

https://www.misalpav.com/node/629
वरील दुव्यात भाग १-५ आहेत. त्यानंतरचे भाग आहेत की नाही लक्षात नाही. जाणकारांनी कृपया खुलासा करावा.

आभार! पहिले दोन भाग वाचून झाले. वाचतोय.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2024 - 11:36 am | प्रकाश घाटपांडे

http://tatya7.blogspot.com/ इथे जरुर भेट द्या.

अमरेंद्र बाहुबली's picture

21 May 2024 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली

तात्या अभ्यंकरांशी कधी संबंध आला नाही कारण त्यांच्या खूप नंतर मिपावर आलो. श्रधांजली.

कंजूस's picture

21 May 2024 - 9:59 pm | कंजूस

हूं.

मूकवाचक's picture

22 May 2024 - 10:09 am | मूकवाचक

तात्या अभिजात संगीताचे मर्मज्ञ जाणकार होते. व्यक्तिगत परिचय नसला, तरी यमन सारख्या एखाद्या रागाबद्दल किमान तासभर तरी एकही मुद्दा पुनरूक्त न करता भरभरून बोलू शकेल अशी व्यक्ती म्हणजे तात्याच अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात घर करून आहे. तात्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2024 - 5:25 pm | अत्रुप्त आत्मा

मी तात्या अभ्यंकर ला त्याचा विसोबा खेचर बहुतेक हे मिपावरचं नाव होतं . तात्या अभ्यंकर नी मीपा स्थापन केलेल्या काळातली आयडी नेम देखील प्रचंड अस्सल होती .
मला त्या आयडी नेम्स मुळे मिपाबद्दल एक प्रकारचं प्रचंड गोड कुतूहलात्मक असं आकर्षण निर्माण झालेलं होतं . नंतर कळलं की स्वतः खुद्द तात्या अभ्यंकर ही व्यक्ती मिसळपावरून दूर होऊन त्याचा सर्व भार आपले आत्ताचे मिपाचे चालक-मालक नीलकांत यांचे कडे आलेला आहे .
पण फेसबुक वरती मी तात्या अभ्यंकर या व्यक्तीला वाचत पहात अनुभवत होतो . त्याच्याविषयी सगळं बरं वाईट ऐकत होतो .आणि त्याचा तरीही फॅन होतो .
त्यांनी सुरू केलेल्या एका पेज वरती पण मी होतो . - शिळोप्याची ओसरी !
तात्यांनी मलाही एकदा," काही कामाची रिक्वायरमेंट आहे का मी एवढ्या एवढ्या प्रकारची कामे करतो ",असं विचारलेलं होतं .
मी थंड रिप्लाय दिल्यानंतर पुन्हा त्यांनी मला या विषयात कधीही काही विचारणा केली नाही .
पुण्यात आलेला असताना टिळक रोड च्या बादशाही बोर्डिंग या प्राचीन मेस ला त्याच्या पुण्यातल्या काही मित्रांबरोबर तो व्यक्ती जेवायला जाणार हे मला कळलं होतं .
आणि त्यांना भेटायची संधी मी वेळेच्या आणि कामाचा व्यस्ततेमुळे घालवली याचा मला नंतर वाईटही वाटलं .
मला त्या व्यक्तीला भेटायची ओढ एवढ्यासाठी की अशा पद्धतीची अतरंगी व्यक्तिमत्व मी माझ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप जवळन पाहिलेली आहेत .
ही माणसं आपल्याला पडद्या आडून बोलता लिहिताना जशी भासत असतात ,तशीच प्रत्यक्षातही भेटताना दिसतात . त्यांच्यात आत एक आणि बाहेर दुसरं ,हा प्रकार अजिबात नसतो . मग ती चांगली असोत, वाईट असोत , बेतालअविचारी असोत, व्यसनी असोत, काहीही असोत !
पु . लं .च्या नारायण' हरी तात्या' ही जी व्यक्तिचित्रण आहेत, तशा या व्यक्ती एक संपूर्ण पॅकेज असतात ! आणि पॅकेज म्हटलं की एकतर ते संपूर्ण स्वीकारायचं , किंवा संपूर्ण नाकारायचं ,हा एकच मार्ग असतो . त्यात निवडून वेगळं काढून स्वतःपुरतं बाजूला घेता येत नाही काही !
म्हणूनच तात्या अभ्यंकर ही व्यक्ती कितीही शिव्या दिल्या तरी कुठेतरी पुन्हा जवळची वाटायला लागते . हिमालयाला उंची जशी असते ओढ लावणारी तशीच भीती वाटायला लावणारी खोल दरीही असते . आणि या दोन्ही बाजू मिळून संपूर्ण हिमालय असतो . त्यामुळे हिमालयाची उंची अनुभवताना दरी टाळता येत नाही ,हे ज्यांना समजत नाही ,ती माणसं त्याच्या दरीच्या नावाने कांगावा करत बसतात . आणि उंची मधला थरार लोभसपणा इत्यादी सर्व गोष्टींचा आनंद हरवून बसतात .
तात्याचे सामाजिक विषयामध्ये फेसबुक वर पडणारे अश्लील गलिच्छ विनोदी डायलॉग हा तर रोजच्या आनंदाचा विषय होता .
एखाद्या व्यक्तिमत्त्वाची टवाळी उडवताना तो स्वतःच नाव लावून त्या व्यक्तीमत्त्वाचं आडनाव पुढे लावायचा , आणि "ह्या ह्या ह्या " या अश्या शब्द मुद्रा पुढे लिहायचा .
(या शब्दमुद्रा आपल्या मिपाचीच देन आहेत ! )
रॉबर्ट वड्रा याच्या प्रकरणावरती उपहासक लिहिताना - शेवट " तात्या वड्रा ", अशा शब्दसमूहानी तो करायचा .
(त्याच्या लेखन शैली आणि लेखन विचारावर आत्ताच्या काळात तात्या असता तर त्यांनी चालू समाज परिस्थितीवर लिहिताना कसं लिहिलं असतं ? असं म्हणून माझ्याकडं एक अख्खा लेख पाडून होईल . )

लिहिण्यासारखं बरच काही आहे . पण आता कामाच्या वेळेच्या मर्यादेमुळे इथेच थांबतो .

प्राची अश्विनी's picture

24 May 2024 - 9:26 am | प्राची अश्विनी

असे प्रतिसाद वाचल्यानंतर मिपावर लाईक बटन नसल्याची खंत वाटते. करणं प्रतिसाद प्रचंड आवडलेला असतो. आणि आपण तो वाचून मूक होतो त्यामुळे त्यावर काही लिहायला जमत नाही.

रामचंद्र's picture

24 May 2024 - 11:45 am | रामचंद्र

<त्याच्या लेखन शैली आणि लेखन विचारावर आत्ताच्या काळात तात्या असता तर त्यांनी चालू समाज परिस्थितीवर लिहिताना कसं लिहिलं असतं ? असं म्हणून माझ्याकडं एक अख्खा लेख पाडून होईल>

अशा लेखाच्या प्रतीक्षेत...

नठ्यारा's picture

23 May 2024 - 9:13 pm | नठ्यारा

ती माणसं त्याच्या दरीच्या नावाने कांगावा करत बसतात . आणि उंची मधला थरार लोभसपणा इत्यादी सर्व गोष्टींचा आनंद हरवून बसतात .

एकदम सटीक!

-नाठाळ नठ्या

त्यातले कुमार गंधर्व पाहून थेट तात्याची आठवण झाली...... वल्लीच होता बुवा !

१.५ शहाणा's picture

26 May 2024 - 12:05 pm | १.५ शहाणा

तात्या शी थेट कधी बोलणे झाले , नाही पण १५ -१६ वर्ष पासून लेख वाचत आहे., त्यांना विनम्र श्रद्धांजली

पाषाणभेद's picture

3 Jun 2024 - 4:34 pm | पाषाणभेद

तात्या होता तेव्हा मिपावर येणे झाले अन दुरून का होईना तात्याशी बोलणे होत गेले. तात्या आज हवा होता असे वाटते.

मदनबाण's picture

28 Jul 2024 - 5:04 pm | मदनबाण

१६ वर्ष मागे गेलो ! तात्या आणि मिपा हे कधीच वेगळं होऊ शकत नाही. काल बलवान होता है, याच काळाच्या उदरात आता मराठी आतंरजालावरची तात्या आणि इतर अनेक मंडळी समावुन गेलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीमत्व एक पिंपळ पान ! तात्या गेल्यावर हा लेख मिपावर आला होता, कोणी लिहला होता ते आता स्मरत नाही [ भडकमकर मास्तर आणि सहज या आयडीज डोक्यात आले पण नक्की होत नाही. ] पण लेखाच्या दोन ओळी वाचताच जेव्हा हा लेख लिहला गेला होता अगदी तिथेच मला घेऊन गेला.
असो... तात्यां बद्धल लिहावे तितके कमीच आहे.या लेखाने तो पुन्हा स्मरणात आला. फोकलिच्यांनो.... असे लिहणारा तो एकमेव होता.
असो... स्वतःला मिपाच्या भूतकाळात अधिक रमण्या पासुन रोखतो,काय माहित मला परत मिपाचे व्यसन लागेल !

मदनबाण.....