अत्तर
------------------------------------------------
संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता.
त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती.
राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला.
‘अप्पा काय आणलं ?’ असं कुतूहलाने विचारत त्याने अप्पांच्या हातातली पिशवी घेतली.
तो घरात शिरला . अगदी लगबगीने . त्याने पिशवी जमिनीवर ठेवली अन एकेक वस्तू तो पटापट बाहेर काढू लागला. उत्सुकतेने ! भेळ, चिक्की,आईसाठी कानातलं अन काही काही .
आई थांबत म्हणत होती ,तरी त्याने ऐकलं नाही. त्याने चिक्की तोंडात कोंबली आणि पिशवी उचकणं चालूच ठेवलं . सगळं सामान संपलं. त्याने पिशवीत हात घालून फिरवून पाहिला आणि पिशवीच्या तळाशी लपलेली एक छोटीशी बाटली त्याला सापडली.
भरलेल्या तोंडाने त्याने डोळे विस्फारले.
ती एक अत्तराची कुपी होती . अप्पांनी ते अत्तर लक्षात ठेवून आणलं होतं. त्यांना माहिती होतं - मध्येच राजूला लहर आली की तो देवाचं अत्तर अंगाला लावतो म्हणून. गुपचूप . आईची नजर चुकवून . तिला कळलं, ती ओरडली तरी तो ऐकत नाही .
त्याने ती बाटली उघडली .अत्तर भारी होतं. खास होतं . कडसर वासाच्या जातकुळीतलं. त्याला त्याची काय माहिती ? अप्पा तर देवाला कस्तुरीचं लावत . अर्थातच अस्सल कस्तुरी नाही .पण त्याला तो एकच वास माहिती होता.
त्याने त्या नवीन अत्तराचा दीर्घ वास घेतला . तो पटकन अप्पांना म्हणाला .’ कसला हा वास ? ढेकूण चिरडल्यावर येतो , तस्सा आहे ! ‘
अप्पा काही बोलले नाहीत .
बरीच वर्षे लोटली. राजूचं लग्न झालं होतं . नुकतंच !
एके दिवशी संध्याकाळी तो अंगणात बसला होता .
त्याची बायको आणि आई आतमध्ये आवरत होत्या. त्या दोघींना डोहाळेजेवणाला जायचं होतं.
त्याची बायको आवरून बाहेर आली - अन एक चित्तवेधक , मन सुखावणारा सुगंध हवेत पसरला !
‘ किती मस्त वास ! काय लावलंस तू ? ‘ त्याने तिला विचारलं .
ती ठुमकत, साडी सारखी करत त्याच्याकडे नखऱ्याने पहात म्हणाली , ‘अत्तर !’
तो तिच्याकडे अनिमिष नेत्रांनी पहात राहिला. पलीकडे अप्पा बसले होते… नाहीतर तिच्या अगदी जवळ जाऊन त्याने तो वास नाकात भरून घेतला असता…
‘ कुठून आणलंस ? ’ त्याने विचारलं .
‘आणलं नाही काही ! तुमच्याच कपाटात सापडलं , काल आवरताना . अगदी तळाशी पडली होती ती अत्तराची कुपी.’
…
तो विचारात पडला .
आत्ताही- अप्पा काहीच बोलले नाहीत.
-------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
17 May 2024 - 10:40 am | अहिरावण
अत्तराचे नाव काय?
17 May 2024 - 12:16 pm | सौंदाळा
समजले नाही. अत्तर जुने झाल्यावर त्याचा सुगंध वाढला की काय?
17 May 2024 - 1:17 pm | Bhakti
बहुतेक!
17 May 2024 - 2:41 pm | वामन देशमुख
एखाद्या अनवट अत्तराचा सुगंध अनुभवताना, त्याची पारख करताना, तो कोणत्या note चा आहे हे ठरवायला काही वेळा थोडा वेळ लागतो.
ही कथा अश्याच एखाद्या अनवट प्रकारातील आहे. आवडली आहेच; अजून काही काळाने कदाचित तिची खुमारी अजून कळेल.
17 May 2024 - 5:40 pm | चौथा कोनाडा
जुना वास ते नविन सुवास,
हा भारी प्रवास !
18 May 2024 - 12:52 am | नठ्यारा
दोन्ही वेळेस अप्पा काहीच बोलले नाहीत. कारण की बोलण्यासारखं काहीही नव्हतंच. काही प्रकारचं शहाणपण जगात काळ व्यतीत केल्यावरंच येतं. म्हणूनंच की काय कालाय तस्मै नम: म्हंटलंय.
-नाठाळ नठ्या
18 May 2024 - 1:00 pm | चौथा कोनाडा
राजूला लहानपणी वासांची पारख नसावी असं मला वाटतं.
त्याचे उदगार " हा वास ? ढेकूण चिरडल्यावर येतो , तस्सा आहे ! ‘ त्याला अत्तराचा वास असा यावा ?
एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार !
सांगळेसाहेबांनी ही कथा जरा अॅब्स्ट्रक्ट फॉर्म मध्ये लिहिली असावी की काय असं वाटतं
18 May 2024 - 1:34 pm | गवि
वडिलांनी आणलेल्या अत्तराचा जो वास लहानपणी अजिबात आवडला नाही तोच तरुणपणी तरुण पत्नीने (अजाणता तेच अत्तर ) लावल्यावर भारी वाटला. चालायचेच.. :-))
शिवाय अनेक अत्तरे थेट नाकाला लावून हुंगल्यास तीव्र कडसर वासाची पण दुरून सुगंधी वाटू शकतात, हे आहेच..
मस्त आहे कथा. अप्पांना जिवंत ठेवले हे एक चांगले केलेत. ;-)
20 May 2024 - 12:03 am | बिपीन सुरेश सांगळे
साधीच कथा आहे . पण अनेक अर्थ निघत आहेत , हेदेखील छान वाटतं . प्रत्येकाचा आपला नजरिया !
खूप आभार .
20 May 2024 - 8:56 am | चौकस२१२
याचा मला भावलेले अर्थ तो असा (अप्पांच्या दृष्टिकोनातून )
अप्पा हे बघून निराश झाले असावेत असे वाटते
- आपण जेव्हा याला स्वखुशीने पूर्वी हेच अत्तर आणले होत तेव्हा हा असा वागला आणि आता असा !
किंवा खाली कोणी म्हणल्याप्रमाणे १३-१४ वर्षी एकतर समज कमी किंवा ते अतिबाजारू आणि चीपस्वस्त दर्जाचं असणार !
20 May 2024 - 9:13 am | गवि
ऊद (oud) हे अशा अत्तराचे एक उदाहरण.
23 Jun 2024 - 2:12 pm | बिपीन सुरेश सांगळे
वाचक मंडळी
मी आपला खूप खूप आभारी आहे .
23 Jun 2024 - 5:01 pm | चित्रगुप्त
अत्तराचे गूढ मला समजले नाही पण कथा आवडली.