सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
6 Mar 2024 - 8:40 pm

सक्षम स्त्रियांसाठी आधारप्रणाली - सपोर्ट सिस्टीम
८ मार्चला सारीकडे महिला दिनाचे वातावरण असते.प्रत्येकजण आपापला दृष्टिकोन मांडत ससतो. बहुतेकांचे दृष्टीकोन आपापल्या परीने बरोबर असतातही. या दिनाच्या निमित्ताने मी सहज मागे वळून पाहिले की मी स्वतः प्रागतिक चिचारांचा आहे म्हणून मोठ्या गमजा मारतो पण आपण खरेच कसे काय वागलों? अनेक आठवणी जाग्या केल्या, काही आपोआप जाग्या झाल्या, यात एक सुरेख आठवण आली. अबला नसलेल्या कार्यक्षम महिलांपुढे नोकरी करतांना कशी आव्हाने पेलावी लागतात ते आठवले.

एकदा मी नोकरी करीत असे त्या कंपनीतील निर्यात करायचा तयार झाला, थर्ड पार्टी इन्सपेक्शन झाले आणि आता निर्यातीसाठी ठरलेली सरकारी कार्यपद्धती अंमलात आणायची होती. निर्यातीचा माल एक्साईज वा कस्टम निरीक्षकाकडून कागदपत्रांशी ताडून सील करायचा होता. माल होता मशिनरी. आकाराने बराच मोठा माल असल्यामुळे सरकारी निरीक्षकासमक्ष एका कन्टेनरमध्ये चढवून कंटेनर सील करायचा होता. निर्यातीसाठी माल कंटेनरमध्ये भरून बोटीतून पाठवायचा होता.
माल कारखान्याबाहेर काढायच्या सुमारे एक आठवडा अगोदर गेलो एक्साईज कार्यालयात. आमच्या कार्यालयावरील नियुक्त निरीक्षक श्रीमती XXX रजेवर होत्या. त्यांचा अधिकार त्यांच्या सहकारी श्रीमती YYY यांचेकडे होता. हसतमुखाने त्यांनी माझे स्वागत केले. त्यांची माझी तोंडओळख होती आणि त्या श्रीमती XXX सोबत आमच्या कार्यालयात दोनतीनदा येऊनही गेल्या होत्या.

ठरल्या दिवशी बाईसाहेब दुपारी तीनच्या सुमारास कारखान्यात दाखल झाल्या. कारखान्यात फेरफटका मारून उत्पादन कसे होते, चेन्ज पार्टस म्हणजे काय, कसे असतात, ते लाकडी खोक्यात वा पुट्ठ्याच्या खोक्यात पॅक कसे करतात, खोका नंबर कसे देतात, त्यांचे वर्णन पॅकिन्ग लीस्टमध्ये कसे करतात वगैरे त्यांना दाखवले. निर्यातीसाठी तयार असलेली सध्या कन्टेनरमध्ये चढवायची यंत्रे दाखविली. आतां त्यांच्या ध्यानांत आले की या कामाला कमीत कमी पाचसहा तास लागणार. म्हणजे रात्री नऊदहा वाजणार. आणि त्यांच्या चेहयावर चिंतेचे ढग जमले.

आम्ही माझ्या केबिनमध्ये गेलो. मी विचारले की काय झाले. त्यांनी त्यांची अडचण सांगितली. यजमान नोकरीनिमित्त दुबईमध्ये. घरी इयत्ता नववीत शिकणारी मुलगी एकटी. कॉलेजमधला मुलगा क्लासला, तो रात्री आठसाडेआठला घरी येणार. तेव्हा मोबाईल टेलीफोन अस्तित्त्वात नव्हते. त्यांनी घरी फोन लावला. मुलीला सांगितले की घरी यायला उशीर होईल, सांभाळून राहा. मुलगी म्हणाली मी भाताचा कुकर लावून ठेवते..मुलीचा समजूतदारपण पाहून बाईंच्या डोळ्यांत पाणी आले. मी त्यांना जरा थांबायची खूण केली. फोन सुरू होता.

मी भयंकर आगाऊ माणूस. परिस्थिती हाताबाहेर जाऊं शकेल अशी अगदी कमी शक्यता असली तरी सूत्रे स्वतःकडे घ्यायची अतिशय आगाऊ सवय. तुमच्या मुलीशी मी बोलूं का अशी त्यांची परवानगी घेतली. आता मी बेबंद सुटलो. फोन स्पीकरवर टाकला. माझी ओळख करून दिल्यावर त्या सुसंस्कारी मुलीने नमस्ते अंकल म्हटले. मी तिला एखाद्या महत्त्वाच्या वहीचे शेवटचे पान उघडायला सांगितले. अपेक्षेप्रमाणे कोरे होते. आता मी तिला धडाधड सूचना लिहायला सांगितल्या:
१. सगळ्यात आधी घरात येण्याच्या दरवाजाच्या सर्व कड्या लावणे.
२. दरवाजाची घंटा वाजल्यास अगोदर कोण आहे म्हणून विचारणे आणि आई वा भाऊ असेल तरच कड्या काढून दार उघडणे.
३. हा टेलीफोन क्र्मांक xyzxyz लिहून घेणे. आई या क्रमांकावर उपलब्ध आहे. भाऊ आला असला तरी दार उघडण्यापूर्वी आईला फोन करून सुरू ठेवणे व भावाला बोलायला सांगणे. बाबांचा फोन अल्यास त्यांना हा टेलिफोन क्रमांक देणे.
४. कोणत्याही परिस्थितीत गॅस चालू करून, सुरी वगैरे वापरून जेवण करण्याचा प्रयत्न करू नये, फक्त आईच्या समोरच ही कामे करावीत. अगदी चहा देखील करू नये. भूक लागल्यास डब्यातले तयार पदार्थ वा बिस्किटे वगैरे खावीत.
५. इतर कोणतीही अडचण आल्यास दिलेल्या नंबरवर आईला त्वरित फोन करणे.

दिलेल्या सूचना समजल्याची खात्री करून घेतली आणि दूरध्वनी ठेवला. घरी जायला उशीर होणार त्यामुळे घरी जाऊन जेवण करण्याला फाटा द्यावा अशी मी मॅडमना विनंती केली. मुलांच्या आवडीचे जेवणाचे पार्सल एखाद्या हॉटेलमधून मागवून घरी पाठवण्याची जबाबदारी माझी असे मी आश्वासन दिले. आता मॅडम निर्धास्त झाल्या आणि त्यांनी घाईगडबड न करतां शांत चित्ताने एकाग्रतेने कागदपत्रांतले बारकावे समजून घेऊन निर्यात कार्यवाही पूर्ण केली.

यथावकाश त्या तिघांच्या जेवणाची ऑर्डर एका चांगल्याशा हॊटेलात दिली. बाई चार बंगला परिसरात राहणाrर्‍या होत्या. आमच्या कार्यालयातील दोन सदगृहस्थ त्यापुढे वर्सोव्याकडे जाणारे होते. त्यांनी बाईंना जेवणाच्या डब्यासह सुखरूप घरी सोडले.

नोकरी करणार्‍या पुरुषांना सहसा अशा जबाबदार्‍या घ्याव्या लागत नाहीत. परंतु स्त्रीपुरुष समानतेचा आपण कितीही आव आणला तरी स्त्रीला मात्र एकत्र कुटुंब नसल्यास बहुतेक वेळां अशा जबाबदार्‍या घ्याव्या लागतात. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीने काम करणार्‍या स्त्रीला आवश्यक असल्यास अशी आधारव्यवस्था – सपोर्ट सिस्टीम पुरविण्यासाठी प्रयत्न करावेत असे स्त्रीसप्ताहानिमित्ताने आवाहन करून हा लेख संपन्न करतो.

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

माहितगार's picture

6 Mar 2024 - 9:28 pm | माहितगार

एकदम पटलं, चांगला लेख.

बाकी मिपा मालकांनी राजकारण सदरातील लेख मुखपृष्ठावर दिसणार नाहीत याची सोय का केली कोण जाणे तरी पण मोदींनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मिपा महिलांसाठी मिपा-राजकारण सदराचा हा दुवा.

कंजूस's picture

7 Mar 2024 - 6:13 am | कंजूस

पटलं.

चांगलं काम.

श्वेता व्यास's picture

7 Mar 2024 - 4:46 pm | श्वेता व्यास

एका सहकारी स्त्रीची समस्या समजून घेऊन तिचे निराकरण केल्याबद्दल तुमचे अभिनंदन.

सुधीर कांदळकर's picture

7 Mar 2024 - 7:15 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद माहितगार, कंजूसराव आणि श्वेता व्यास ताई.

नठ्यारा's picture

7 Mar 2024 - 8:18 pm | नठ्यारा

मिस्टर सुधीर कांदळकर,

तुम्ही स्त्रीदाक्षिण्यवादी नरडुक्कर अर्थात Male Chauvinistic Pig आहात असंही म्हणता येईल. तथाकथित स्त्रीवादी फेमिनिस्ट नेमका असाच आरोप करतात. त्यांना बायकांना अलग पाडायचं आहे. उद्याचा ८ मार्च हा दिवस कम्युनिस्ट सण असून तो बायकांना अलग पाडण्यासाठीच साजरा करतात. तुम्ही त्यांच्या बेतास सुरुंग लावला हे पाहून आनंद वाटला.

-नाठाळ नठ्या

मुक्त विहारि's picture

7 Mar 2024 - 8:26 pm | मुक्त विहारि

मस्त...

कुमार१'s picture

7 Mar 2024 - 8:35 pm | कुमार१

पटलं, चांगला लेख व कृती.

सुधीर कांदळकर's picture

8 Mar 2024 - 7:15 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद नठ्यारासाहेब, मुवि आणि डॉक्टर कुमार१ साहेब.

वामन देशमुख's picture

9 Mar 2024 - 4:14 pm | वामन देशमुख

सदर लेख, त्यातील आशय, प्रत्यक्ष कृती आणि कृतीमागील हेतू - आवडले.

सुधीर कांदळकर's picture

10 Mar 2024 - 5:18 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद वामन देशमुखजी.