नमस्कार मंडळी. आज मी तुम्हाला. एका पुस्तकाची ओळख करून देणार आहे. त्याचं नाव आहे बाईकवरचे बिऱ्हाड. पुस्तकाचे लेखक अजित हरिसिंघानी हे एक वाचाउपचार तज्ञ आहेत. आणि एन्फिल्ड बाईक चे निस्सिम चाहते किंवा भक्त म्हटलं तरी हरकत नाही. त्यांचे एक पेशंट, जेरेमी डिकोस्टा अर्धांगवायूच्या झटक्याने अर्धी बाजू निकामी झाल्यामुळे त्यांच्याकडे उपचाराला येत असत. जेरेमी एका कंपनीचे सीईओ. परंतु त्यांच्या अशा परिस्थितीमध्ये त्यांना एक साधं वाक्य उच्चारणे किंवा काही अंतर चालणे सुद्धा कठीण झाले आहे. त्यांना दोन मुलगे परंतु दोघेही परदेशात स्थायिक आणि. जेरेमीची सगळी जबाबदारी त्यांच्या ६० वर्षीय पत्नीवर पडली आहे. काही आठवडे जेरेमी बरोबर. उपचारांच्या संदर्भात काम केल्यावर एकीकडे त्यांच्यात थोडीफार सुधारणा दिसु लागते. परंतु दुसरीकडे डॉक्टर आणि पेशंट या नात्यापलीकडे जात अजित आणि जेरेमी यांच्यामध्ये एक मोटरसायकलिस्ट म्हणूनही नाते तयार होउ लागते. बोलता बोलता जेरेमी अजितना त्यांनी आपल्या तरुण वयात बीएमडब्ल्यु मोटर सायकलवर बसून मैत्रिणीबरोबर इटलीत एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. केलेल्या. प्रवासाबद्दल सांगतात. फक्त फरक एवढाच की त्याची बीएमडब्ल्यू तर अजितची आवड एनफील्ड. परंतु. एक भटका मोटरसायकलिस्ट ही जमात दोघांची सारखीच होती. पुढे जेरेमी आपल्या मुलांच्या ओळखीने अमेरिकेत उपचारासाठी जातात आणि जाता जाता अजितना जेआरडी टाटांचे "की नोट" हे पुस्तक भेट देतात. त्यातली एक ओळ अजितच्या मनाचा ठाव घेते. "आयुष्यात किंचित धोका पत्करल्यामुळेच त्यातला थरार आणि स्वान्तसुखाय तृप्ती मिळवता आली" पुढे जेरेमी अमेरिकेला निघायच्या आधीच झोपेत निधन पावतात. पण जाताना हा मोटर सायकलवर प्रवासाचा किडा अजितच्या डोक्यात सोडून जातात.
अजितच्या दृष्टीने रॉयल इनफील्ड आणि इतर बाइक यांची तुलना म्हणजे इंद्राचा ऐरावत आणि शामभट्टाची तट्टाणी या स्वरूपाची होती. त्याबद्दल त्यांनीच सांगितलेला एक गमतीशीर किस्सा पुस्तकात वाचायला मिळतो. एका नव्या जपानी बाईकच्या प्रेमात पडून , (ज्याला ते व्यभिचार म्हणतात) आपल्या घरंदाज बायकोसारख्या एन्फिल्ड ला ते बदलू पाहतात. आणि पुढे एन्फिल्ड त्याचा सूड घेते, हे पुस्तकातच वाचण्यासारखे आहे. १५ वर्षांपूर्वी एकदा अजितनी पुण्याहून निघून हिमालयाच्या पायथ्याशी कुमाऊं पर्यंत एन्फिल्ड ने प्रवास केला आहे .पण आता इतक्या वर्षांनी एवढी लांब फेरी झेपेल किंवा नाही या विचाराने ते प्रथम गोव्याला जायचा बेत आखतात. हा पहिला छोटा प्रवास पुणे, ताम्हिणी घाट आणि गणपतीपुळे. इथे पहिला थांबा घेऊन दुसऱ्या दिवशी. गोव्यात प्रवेश करून अरंबोळ बीचला मुक्काम. पुढे वाळूत बाईक चालवायची हौस करताकरता बाईक तिथे रुतून बसते आणि ती काढण्याच्या निमित्ताने एका नेपाळी माणसाची मदत होते. त्यानेच सुचवलेल्या एका छोट्या साध्या होम स्टेमध्ये ते राहतात. परत अजितच्या शब्दात इथली सगळ्यात वैशिष्टय़पूर्ण गोष्ट म्हणजे खोलीच्या बाहेर डुकरांचा संडास असतो. आता हे काय प्रकरण आहे हे पुन्हा पुस्तकातच वाचण्यासारखे. जुन्या पद्धतीचा विटांचा संडास. त्याची खासियत अशी की जमिनीवर एक छोटासा खड्डा करायचा आणि त्यावर विटांची बैठक. आडोशापुरत्या नारळाच्या झावळ्या लावलेल्या. घाण खाण्याच्या डुकराच्या नैसर्गिक वृत्तीचा फायदा घेणाऱ्या या शौचालयामुळे त्यांना वेगळे काही खायला घालण्याची भानगड राहत नाही. परंतु एक अपरिहार्य गोष्ट अशा ठिकाणी लागते म्हणजे चार फुटी जाड काठी.आणि या काठीचा वापर कसा करायचा हे तिथली मालकीणबाई अजितना विनासंकोच दाखवून देते. अजित याचे तुलना गमतीदारपणे विमान उड्डाणाआधी हवाई सुंदरीच्या सुरक्षेसाठी दाखविल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिकांशी करतात. पुढे टी बाई गोव्यात आलेला आणि प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणारा एक जर्मन कार्यकर्ता हे शौचालय वापरत असताना काठी न वापरल्याने कसा "जखमी" झाला हे सांगते. या गोष्टीची धास्ती घेऊन अजित त्या दिवशी शौचालय टाळण्याचा प्रयत्न करतात. नंतर दुसऱ्या दिवशी कोंडोलिम बीचला पोहचून परतीचा प्रवास सावंतवाडी, आंबोली घाटातून पुढे कोल्हापूर, कराड आणि पुण्याला परत येतात. ही साधारण १००० किलोमीटरची राईड पार पाडल्यानंतर अजितना अजून मोठी ट्रिप खुणावू लागते. ती म्हणजे लडाख. आणि तीच या पुस्तकाचा मुख्य विषय आहे.
यानंतर अजित महिनाभर सुट्टी घेण्याची तयारी करू लागतात. राहिलेली कामे उरकणे शिवाय जोडीने इंटरनेट सर्फिंग करून हिमालयापर्यंत ज्यांनी मोटरसायकल मोहीम केली आहे त्यांच्याकडून माहिती घेने चालू होते.मे ते नोव्हेंबर या काळात मनाली ते लेह रस्ता खुला असतो हे ही त्यांना समजते. समुद्र सपाटीपासून ५६६० मीटर.उंचीवर हा देशातला सगळ्यात दुर्गम प्रदेश आहे. त्यानंतर मग स्वतःची शारीरिक तयारी, मोटर सायकलची तयारी आणि प्रवासाला लागणाऱ्या वस्तू जमा करणे वगैरे गोष्टी चालू होतात. दिल्ली ते लेहपर्यंत बाईकवरुन जाणाऱ्या एका गटाबरोबर त्यांची ई मेलची देवाणघेवाण. सुरु होते. दिल्लीत पाच जणांनी एकत्र यायचे, तिथून लेह गाठायचे, नंतर श्रीनगर आणि शेवटी जम्मूपर्यंत येऊन आपापली परतीची वाट पकडायची असा बेत ठरतो. दिल्लीपर्यंतचा प्रवास. मात्र एकट्यानेच करायचा असतो. अजितची निघायची तारीख १० जून. ठरते. पुणे, डहाणू, अहमदाबाद, माउंट अबू, जयपुर, दिल्ली, किरातपूर, कसोल, मनाली, दारचा. सर्चू ,लेह, द्रास, श्रीनगर, पटनी टॉप, जम्मू. असा हा प्रवासाचा मार्ग असतो.
अखेर प्रवासाचा दिवस उजाडतो.पहिल्या दिवशी पुण्यावरून निघून पनवेल,ठाणे ,डहाणू असा प्रवास करत अजित डहाणूला त्यांच्या बहिणीकडे पोहोचतात. दिवसभराच्या प्रवासानंतर बहिण आणि मेव्हण्याचा उबदार पाहूणचार घेऊन ते डहाणू गावात फेर फटका मारायला बाहेर पडतात. इथे शांततेत वाळूत बसून तंद्री लागलेली असताना त्यांना इगतपुरीला केलेली विपश्यना आठवते. एकूणच या प्रवासात ठिकठिकाणी अजितच्या मनात आलेले विचार वाचताना प्रवासाचा फील येत राहतो. त्याचबरोबर थोडंफार अजितचा जीवनप्रवासही उलगडत जातो.पुढे दुसऱ्या दिवशी डहाणू सोडून अजित पुढच्या प्रवासाला गुजरातकडे निघतात. पहिले बडोदा आणि आणि पुढे अहमदाबाद मुक्कामाला. प्रवासात एका टोलनाक्यावर आलेला गमतीशीर अनुभव अजितच्याच भाषेमध्ये वाचण्यासारखा. एक नवीन लग्न झालेले गलेलठ्ठ गुजराती जोडपे गाडीतून जात असताना अजितची बाईक रस्त्याच्या कडेला दाबतात आणि वर त्यातील नवरोबा (बहुधा बायकोवर इम्प्रेशन मारण्यासाठी)अरेरावीची भाषा करतो. पण अजित त्याच्या वरताण. आपल्या फौजी अवताराचा फायदा घेऊन ते अतिशय शांतपणे त्याला . विचारतात " फौजी से कभी मार खाया है क्या?" बाण बरोबर बसतो आणि त्या माणसाचा चेहरा पुढील संकटाच्या विचाराने बदलतो आणि त्याला अचानक पुढे ज़ाण्याची घाई होते.
जाता जाता अजितना अहमदाबादमध्ये शिरताना , दंगलीच्या निमित्तानेआपल्या आईवडिलांच्या तरुणपणीचा घटना ,फाळणीवेळी कराचीहून भारतात येणे , त्याच्याही आधी आजोबा डॉक्टर असताना अपरात्री त्यांना डेरा गैबी नावाच्या शहरात एका सुलतानाच्या नातवावर उपचार करण्यासाठी बोलावणे येणे अशा सगळ्या घटना आठवतात आणि वाचकही त्यात नकळत गुंतत जातो. अहमदाबाद कॅन्टोन्मेंट मध्ये एका मित्राचे मित्र, मेजर दिनेशकुमार त्यांची रहायची सोय करतात. तेथून पुढे अजित माउंट अबूला पोहोचतात आणि अजून एका साध्या हॉटेलमध्ये मुक्काम करतात. तिथला नोकर खाण्यापिण्याची सगळी. सोयी. होईल , असे सांगताना "जो चाहिये वो मिलेगा" ज्या विशिष्ट पद्धतीने सांगतो त्यात अनेक अर्थ दडलेले अजितना जाणवतात. संध्याकाळी अचानक जोरदार पाउस पडून जातो आणि पाऊस थांबल्यावर अजित नक्की तलावापाशी फेरफटका मारतात. आणि पुढे जयपुरचा रस्ता पकडतात.
याच प्रवासातील अजून एक गमतीशीर आठवण ते सांगतात. पूर्वी एकदा बायकोबरोबर या भागातून प्रवास करताना मुक्कामाची सोय करावी म्हणून ते एका स्काउट कॅम्पमध्ये शिरतात. आणि तिथल्या रखवालदाराला "वर्मासाहेब आहेत का?" असा एक टिपीकल प्रश्न विचारतात. खरेतर कोणीही वर्माना ना अजित ओळखत असतात ना रखवालदार. परंतु अजितना लष्कराचा माणूस समजून तो घाबरतो आणि " इथल्या रखवालदाराची आई आजारी पडली असल्याने तो घरी गेलाय आणि मी बदली रखवालदार आहे." असेही सांगतो. पुढे त्याला अजून थोडेसे दमात घेऊन अजित स्वतःची राहायची सोय करतात. परंतु दुसऱ्या दिवशी खरोखर स्काउटच्या मुली तिथे मुक्कामाला येतात आणि अजितना कोणीतरी साहेब समजून तिथे राहायला त्यांची परवानगी मागतात तेव्हा मात्र त्यांना हसू आवरत नाही.
पुढे घाट चढून जात असताना त्यांची एका फकीराची गाठ पडते .हिरवी कफनी घातलेला हा माणूस सायकलवर चाललेला त्यांना दिसतो. रस्त्याच्या कडेला सिगरेट ओढत असताना त्यांच्यात सहज गप्पा होतात तेव्हा त्यांना समजते की तो वसईहून निघून अजमेरला आणि नंतर मक्केला जाणार आहे. "सायकलवर मक्का? ती तर सौदी अरेबियात आहे. तिथे पोचायला तुम्हाला किती वेळ लागेल ?"असा प्रश्न केल्यावर फकीर आकाशाकडे बघत उत्तर देतो " फक्त शरीरालाच तर तिथं जायचय, आत्मा तर तिथेच आहे." थोडक्यात जिथे शरीर शेवटचा श्वास सोडेल तीच त्याची मक्का असणार होती. "कुठे राहणार?" या प्रश्नाला " अल्लाच्या दुनियेत शरीर टेकण्यापुरती जागा कुठेही मिळतेच" हे त्याचं उत्तर. त्यावर अवाक झालेल्या अजितना तो अजून एक गोष्ट ऐकवतो. हिमालयातीळ मठात वाढलेला एक १२ वर्षाचा मुलगा गुरु आज्ञेवरून बाहेर पडतो आणि भिक्षा मागून निर्वाह करू लागतो. आत एकाच, काहीही साठवायचे नाही. त्याने स्त्री कधीच पाहिली नसते. एका ठिकाणी भिक्षा देणाऱ्या स्त्रीकडून तो जास्तीची भिक्षा घेतो. नंतर त्याची नजर तिच्या छातीकडे जाते आणि तो विचारतो "हे काय आहे? त्यावर तिचे वडील उत्तरतात" अजून काही वर्षांनी हिला मुले झाली की त्यांचे पोषण ती यातून दूध पाजून करेल".
यावर तो विचारमग्न होतो आणि जास्तीचे धान्य घाईघाईने परत करतो. असं का? या प्रश्नावर. तो सांगतो की एका दिवसाला पुरेल इतकीच माधुकरी मागायची असे गुरूंनी सांगितले होते. परंतु उद्याच्या काळजीने मी जास्त भिक्षा घेतली. मात्र आता मला माझी चूक समजली. आजपासून काही वर्षांनी जन्म घेणाऱ्या मुलाची भुकेची व्यवस्था जर आत्ताच केलेली असेल तर उदयाची काळजी मी का करावी? ही गोष्ट सांगून फकीर पुढील प्रवासाला निघतो. परंतु सगळीकडेच इतके भाबडे अनुभव येत नाहीत. एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला बाईक दुरुस्त करत असताना दोन साधू तिथे येतात आणि अजित कडून पैसे उकळायला बघतात.
परंतु त्यांना थोडेफार पैसे देऊन अजित वाटेला लावतात. अजमेर ते जयपुर हा प्रवास मात्र हायवेच्या बेकार अवस्थेमुळे त्यांना भारी पडतो. शेवटी रस्त्याच्या कडेच्या एका गलिच्छ लॉजमध्ये ते मुक्काम करतात आणि शेवटी दिल्ली गाठतात.(क्रमश:)
प्रतिक्रिया
1 Feb 2024 - 3:39 pm | कुमार१
असेच पूर्वीच्या जावा / येझदीचे पण भक्त असायचे.
1 Feb 2024 - 4:50 pm | कर्नलतपस्वी
बाकी 'डुकराचा संडास' पासष्ट वर्ष मागे घेऊन गेला.
1 Feb 2024 - 6:24 pm | वामन देशमुख
रॉली ही माझीही प्रेयसी असल्यामुळे की काय, विषय आवडला. खुशखुशीत निवेदनशैली आवडली.
रॉलीवर लडाख स्वारी हा अनेक तरुणांसारखा माझाही बेत आहे. कधी तडीस जातो त्याची प्रतीक्षा आहे. कदाचित तुमच्या लिखाणातून अधिक प्रेरणा मिळेल!
1 Feb 2024 - 6:46 pm | गोरगावलेकर
भटकंतीतले किस्से मस्तच!
1 Feb 2024 - 7:35 pm | भागो
पुस्तक परिचय आवडला.
1 Feb 2024 - 8:41 pm | कंजूस
मसाला फिल्म होऊ शकते?
1 Feb 2024 - 9:30 pm | मनो
पुस्तकाइतकेच स्वतः डॉक्टर हरिसिंघानी मजेदार आहेत. २००६-०७ मध्ये पुण्यात काही काळ त्यांच्यासोबत घालवता आला, त्यावेळी त्यांची बाईकही पाहीली होती.
2 Feb 2024 - 3:25 pm | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
4 Feb 2024 - 7:36 pm | विजुभाऊ
हे पुस्तक माझ्या आवडीच्या पुस्तकांच्या लीस्ट मधे आहे. कितीही वेळा वाचले तरी मजा येते
5 Feb 2024 - 5:50 am | प्रचेतस
मस्त एकदम. या पुस्तकाविषयी ऐकलं होतंच पण परिचय नव्हता, पण आता छानपैकी परिचित झालोय.
मी ही एनफिल्डचा भक्तच :) पण मी जास्त करून स्प्रिंटर.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
5 Feb 2024 - 3:11 pm | टर्मीनेटर
पुढील भागाच्या प्रतिक्षेत…
6 Feb 2024 - 1:57 pm | श्वेता व्यास
लहान लहान प्रसंगांमधून छान परिचय करून दिलात, पुभाप्र.
11 Feb 2024 - 8:06 am | MipaPremiYogesh
मस्तच परिचय...भारी किस्से आहेत एक एक..