यू -ट्युबवरील मराठी नाटके: दृष्टीक्षेप

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
4 May 2023 - 9:01 am

नाटक ही जिवंत कला आहे आणि ती प्रत्यक्ष अनुभवण्यातच खरी मजा असते हे अगदी मान्य. परंतु गेल्या दहा पंधरा वर्षात महाराष्ट्रातील विविध रंगमंदिरांमध्ये होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर एक नजर टाकल्यास बरेच असमाधान जाणवते. अनेक शहरांमधल्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबद्दल वारंवार माहिती प्रसारित होत आहे. नाट्य कलाकारांपासून ते प्रेक्षकांपर्यंत सर्वच घटक या दुरवस्थेमुळे मनातून नाराज आहेत.

मध्यंतरी पुण्यातील तीन महत्त्वाच्या रंगमंदिरांच्या दुरवस्थेबाबत विस्तृत अहवाल ‘सकाळ’मध्ये वाचण्यात आला. त्यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी म्हटले आहे की नाटकांचे प्रयोग करून आम्ही कधीच दमत नाही परंतु रंगमंदिरांबाबतच्या तक्रारी करून मात्र आता खरंच प्रचंड दमलो आहोत ! त्यांचे हे विधान सर्व कलाकार व नाट्यरसिकांचे प्रातिनिधिक म्हणता येईल.

आता एकंदरीत रंगमंदिरांची भाडेवाढ, कमालीची अव्यवस्था आणि अस्वच्छता, घटता प्रेक्षकवर्ग आणि आंतरजालावरील उपलब्ध असलेली व्यापक करमणूक या सगळ्यांचा परिणाम प्रत्यक्ष नाट्यप्रयोगांवर झालेला दिसतो. कोणे एकेकाळी रंगमंदिरातील बाल्कनीमधून कमी दरात नाटक पाहायची सोय असायची. अलीकडे ती बंद झाल्यात जमा आहे. त्यामुळे फक्त खालच्या मजल्यावरील आसनव्यवस्थेतील नाटकांचे वाढीव दर हे सर्वांनाच परवडण्याजोगे नाहीत. मध्यंतरीच्या कोविड पर्वात तर जाहीर नाट्यप्रयोग दीर्घकाळ बंदच होते.

मी काही महिन्यांपूर्वी रंगमंदिरात जाऊन २ नाटके पाहिली. तेव्हा ते नाटक संपल्यानंतर त्यातील चारही कलाकारांनी उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन केले. तसेच त्यांनी त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही अशी केली:

नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास जरूर सांगा, जेणेकरून ही खालची सर्व आसने भरली जावीत.

यावर अधिक बोलणे न लगे.

खऱ्याखुऱ्या नाट्य रसिकाला अधूनमधून नाटक पाहिल्याशिवाय काही चैन पडत नाही आणि नवे नाटक वरील कारणांमुळे पाहण्याचे राहून जाते. मग अशा रसिकासाठी दुधाची तहान ताकावर का होईना पण भागवण्यासाठी आंतरजालावरील युट्युबचा एक बरा पर्याय उपलब्ध आहे. तिथे आपल्याला अनेक जुनी नाटके पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नाटके ही मुळातच चांगल्या अनुभवी कलाकारांना घेऊन व्यावसायिक पद्धतीने चित्रित केलेली आहेत. काही नाटके महाराष्ट्रातील विविध नाट्य स्पर्धांमध्ये किंवा हौशी रंगभूमीवर सादर झालेली आहेत. तर अन्य काही नाटके दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पूर्वी प्रक्षेपित झालेली आहेत.

ok

गेल्या ७ वर्षांमध्ये यू-ट्युबवरील अशा अनेक नाटकांचा मी आस्वाद घेतला. मी पाहिलेल्या नाटकांची यादी एक संदर्भ म्हणून इथे लिहून ठेवतो. यथावकाश प्रतिसादांमधून त्या नाटकांबद्दल अजून माहितीची भर घालत राहीन. ज्या वाचकांनी या माध्यमातून नाटके पाहिली असतील त्यांनीही प्रतिसादांमधून त्या नाटकाबद्दल थोडक्यात लिहायला हरकत नाही. अशा तऱ्हेने या धाग्याच्या निमित्ताने मराठी नाटकांची एक आंतरजाल संदर्भयादी सर्वांसाठी उपलब्ध राहील.

आता थोडे अशा नाटकांच्या चित्रफित-दर्जाबद्दल. काही नाटकांचा दर्जा खरोखरच उत्तम आहे. काहींचा तो मध्यम आहे परंतु त्यातून नाट्य संवादांचा अनुभव चांगला घेता येतो. सह्याद्री वाहिनीवरील जी नाटकं इथे चढवली गेली आहेत त्यांचा दर्जा मात्र साधारण आहे आणि त्यातील ध्वनीमुद्रण फारसे खास नसते.

प्रतिसादांमधून लिहिताना आपणही संबंधित नाटकाचे नाव, लेखक, प्रमुख कलाकार, तुमचे मत आणि चित्रफितीच्या दर्जाबद्दल जरूर लिहावे. आता मी पाहिलेल्या नाटकांची लेखकानुसार फक्त यादी लिहितो. ती गेल्या ५-७ वर्षांपासून पाहत असल्याने आता एकदम प्रत्येकाबद्दल छोटा परिच्छेद लिहीणे अवघड आहे. पण अगदी अलीकडे जी नाटके पाहिलीत किंवा यापुढे जी पाहीन, त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती प्रतिसादांमधून देईन. या नाटकांचा लेखनकाल अंदाजे गेल्या ५०-५५ वर्षांपूर्वीपासूनचा आहे. सध्याच्या तरुण पिढीला आवड असल्यास ही नाटके जरूर पाहता येतील. त्यातले एखादे नाटक आपण पूर्वी प्रत्यक्ष रंगमंदिरात पाहिले असल्यास आता त्याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल.

मी पाहिलेली (चित्रित) नाटके:

* विजय तेंडुलकर
शांतता ! कोर्ट चालू आहे
अशी पाखरे येती
सखाराम बाईंडर
कमला

*जयवंत दळवी
बॅरिस्टर, पर्याय, लग्न, महासागर, नातीगोती

*वसंत कानेटकर
अश्रूंची झाली फुले, अखेरचा सवाल, बेइमान, मला काही सांगायचंय

* पु ल देशपांडे
सुंदर मी होणार

* आचार्य अत्रे
तो मी नव्हेच

* रत्नाकर मतकरी
इथं हवय कुणाला प्रेम, आरण्यक, ब्लाइंड गेम

* शं ना नवरे
सूर राहू दे
धुक्यात हरवली वाट

* मधुसूदन कालेलकर
शिकार

* अशोक समेळ
कुसुम मनोहर लेले
{केशव मनोहर लेले : लेखक आठवत नाही. सध्या उपलब्ध नाही }

* प्र. ल. मयेकर
आसू आणि हसू

* उदय नारकर
खरं सांगायचं तर ( मूळ इंग्लिश; अगाथा ख्रिस्ती)

* शेखर ढवळीकर
नकळत सारे घडले

* डॉ. शिरीष आठवले
मित्र

* समीर कुलकर्णी
तुझ्या माझ्यात

* वसंत सबनीस
कार्टी काळजात घुसली

* मनोहर सोमण
द गेम

* विजय निकम
रघुपती राघव राजाराम

*सुरेश जयराम
डबल गेम

* चंद्रशेखर गोखले
अनोळखी ओळख

* शिवराज गोर्ले
बुलंद

* क्रांती बांदेकर
कोर्ट मार्शल (मूळ हिंदी - स्वदेश दीपक)

*सुरेश खरे
ती वेळच तशी होती

* बाळ कोल्हटकर
वेगळं व्हायचंय मला
..

मागच्या पिढीतील गाजलेले अभिनेते प्रभाकर पणशीकरांच्या वरीलपैकी एका नाटकाच्या शेवटी त्यांची मुलाखत दिलेली आहे. त्यात त्यांनी नाटकांच्या चित्रीकरणाबद्दलचे त्यांचे बदललेले मत व्यक्त केले आहे. एकेकाळी त्यांचा अशा चित्रीकरणाला कट्टर विरोध होता. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आले, की महाराष्ट्रातील मोजकी मोठी शहरे वगळता अन्यत्र जिल्हा पातळीवर देखील चांगली नाट्यगृहे नाहीत. जर नाटकाला महाराष्ट्रातील सर्व इच्छुक प्रेक्षकांपर्यंत पोचवायचे असेल तर आता नाटक चित्रीकरण हाच पर्याय उरतो.

कदाचित, अजून पंचवीस तीस वर्षांनी वरील हेतू साध्य करण्यासाठी सशुल्क आंतरजाल वाहिन्या हेच व्यावसायिक नाटक सादरीकरणाचे महत्त्वाचे माध्यम ठरेल काय? माहित नाही. सच्चा नाट्यप्रेमीला हा विचार मानवणारा नसला तरी भविष्यात तो स्वीकारायला लागू शकतो.
***********************************************************************************

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

4 May 2023 - 9:13 am | श्रीगुरुजी

मी नियमितपणे नाट्यगृहात जाऊन नाटके पाहतो. मागील ३-४ महिन्यात तू सांगशील तसं, ३८ कृष्ण व्हिला, चारचौघी, काळी राणी ही नाटके पाहिली. चारचौघी उत्कृष्ट आहे. काळी राणी नाटकाचे सादरीकरण अत्यंत प्रभावी आहे. तू सांगशील तसं सामान्य आहे. ३८ कृष्ण व्हिला ठीक आहे.

कुमार१'s picture

4 May 2023 - 9:34 am | कुमार१


चारचौघी

जुन्या संचातलं चारचौघी मी ३० वर्षांपूर्वी पाहिले होते.
चांगले आहे.

वाह!अगदी मनातलं लिहिले आहे.परवाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट 'हे प्रशांत दामले या हाडाच्या नाट्य कलावंताचं नाटक पाहिलं.तीस तास निखळ आनंद मिळाला.मी नियमित नाही पाहत.पण आता वर्षाला दोन तरी नाटकं पाहणार.नाटक ही मराठी अस्मिता आहे.यु ट्यूबवरही हौस भागवून घेतात येईल.छान माहिती.

ता क-तेव्हा प्रशांत दामले म्हणाले की या सहकार सभागृहात अनेक वर्षांपूर्वी ते प्रयोगाला आले होते, नाट्यगृहात चांगला बदल झाला आहे.मीही खुप दिवसांनी या नाट्यगृहात गेले होते, उत्तम बदल केला होता, बाल्कनी सुद्धा हाऊसफुल्ल होती.तिकिटाचे दर हाही एक मुद्दा आहे पण व्यावसायिक दृष्टिकोनातून तोही महत्त्वाचा आहे.
नाटक जिवंत राहिले पाहिजे.

कुमार१'s picture

4 May 2023 - 11:12 am | कुमार१

नाट्यगृहात चांगला बदल झाला आहे.

असे काही वाचले की खरंच बरं वाटतं !

कुमार१'s picture

4 May 2023 - 12:26 pm | कुमार१

आता लेखाचा विषय असलेल्या काही चित्रित नाटकांचा अल्पपरिचय टप्प्याटप्प्याने लिहितो.

'उणे पुरे शहर एक'
( मूळ कन्नड) गिरीश कारनाड
मराठी रूपांतर: प्रदीप वैद्य

एक सुंदर नाट्यानुभव !
महानगर... हरतऱ्हेची माणसे... विविध सामाजिक स्तर आणि थर .....
मानवी प्रवृत्ती... भावना... राग, लोभ, आनंद, दुःख,
हव्यास, फसवणूक, नैराश्य...
प्रेम, करुणा ..... या सगळ्यांची एक सुंदर घट्ट वीण बांधलेली आहे !

प्रसंगांमधील नाट्य म्हणजे काय ते छान समजते.

मी यू ट्यूब वर बॅरिस्टर पाहून थोड्या सुरूवाती नंतर मला धक्काच बसला माझ्या कल्पनेप्रमाणे ते सावरकर , नेहरू , आंबेडकर अशां महापुरूषांवर असेल असे वाटले पण पूर्ण पाहिल्यावर ते एका छोट्या गावातील एका बॅरिस्टर झालेल्यावर होते. व शेवटी शेवटी तर रागच आला की जो माणूस हातात सत्ता असूनही पुरूष व कर्ता पुरूष असूनही कधीही योग्य त्या बाजूला उभा राहून आधार देत नाही व स्त्रीयांच्या दुबळेपणाच्या बाजूने ऊभा न रहाता काहीच कृती करत नाही व षंढच रहातो मग शिक्षण सत्ता थोडाफार पैसा असूनही ऊपयोग काय? त्यापेक्षा आम्ही स्रिया हे सर्व नसूनही लहानपणी मोठ्यांच्या जुनाट मतांच्या विरूद्ध आवाज ऊठवत असू घरातच का होईना दुबळा तरी विरोध करत असू व मोठेपणी नोकरीतही छोटा छोटा विरोध का होईना केलाच. ईथे शिकलेला , बॅरीस्टर वसत्ता थोडी असूनही ऊपयोग काय असेच वटले व षंढ पुरूष इतके टोकाचे म्हणावेसे वाटले पाहून 4/5 वर्षे झाली सविस्तर ़आठवत नाही पण हेच वाटले होते हे आठवले.

त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला. धक्कादायी व स्रियांचे प्र
ष्न मांडणारी पिढ्यान पिढ्याचे अत्याचार स्रीयांवरील पुढे आणले व
पुरूषी दांभिकता समोर आणण्याचे धाडस दाखवून थोडे तरी पुरूषांना त्यांची वाईट कृत्ये उघडी करणीरी वाटली दांभिक नुसते. अजूनही ग्रामीण तळखेड्यामधे स्रियांना काय काय भोगावे लागत असेल देव जाणे वाटते व आपण सामान्य अधिकारविहीन स्रिया काय करूया असे वाटते व ज्येष्ठतेच्या वयात .

कुमार१'s picture

5 May 2023 - 7:20 am | कुमार१

त्यापेक्षा शांतता कोर्ट चालू आहे , कुसुम मनोहर लेले ही नाटके यू टूयूबवर बघून त्यांच्या विषयांमुळे धक्का बसला व प्रगल्भ माझी मराठी नाट्यसृष्टी असा अभिमानही वाटला.

+११

शांतता कोर्ट चालू आहे हे मूळ सुलभा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिकेने गाजले होते. इथे असणाऱ्या नाटकात रेणुका शहाणे आहेत.
त्यांनी वठविलेल्या बेणारे बाई या पात्राचे स्वगत अप्रतिम आहे.

कुमार१'s picture

5 May 2023 - 7:22 am | कुमार१

यू ट्युबवर काही नाट्यस्पर्धेतल्या प्रयोगांचे चित्रीकरण आहे. ते पाहताना काही मर्यादा उघड असतात. रंगमंच आणि त्यावरील कलाकार हे आपल्यापासून खूप दूर असल्यासारखे दिसतात; काही वेळेस धूसरही. रंगमंचाच्या पायथ्याशी बसलेल्या तंत्रज्ञांची डोकी आणि त्यांच्या संगणकाचे वरचे भागही दिसतात ! तसेच संवादही स्वच्छ ऐकू येत नाहीत. त्यामुळे अशी नाटके पाहण्याचे सहसा टाळले जाते.
पण अशी काही जुनी नाटके आता चांगल्या व्यावसायिक कलाकारांना घेऊन इथे उपलब्ध होणे अवघड वाटते.

म्हणून हिय्या करून मी तेंडुलकरांचे (स्पर्धेतले) कमला नाटक पाहिले आणि एक चांगला नाट्य अनुभव मिळाला. त्या कलाकारांनी खरंच समरसून अभिनय केलेला आहे. संवाद ऐकताना मात्र इअरफोन्स लावलेले चांगले.

नाटक १९७०मध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. उत्तर भारतातील ढोलापुरात चालत असलेल्या स्त्री-विक्री बाजारातून इंडियन एक्सप्रेसचा एक पत्रकार एका बाईला २३०० रु. ना विकत घेऊन येतो आणि तिला पत्रकार परिषदेत पुरावा म्हणून सादर करतो, ही ती घटना.

नाटकाचा सारांश दोन वाक्यात सांगता येईल:
१. बायकोसह कुठलीही स्त्री ही पुरुषाच्या दृष्टीने व्यवहारातील फक्त एक प्यादे आहे.
२. हुच्च सनसनाटी इंग्लिश पत्रकारितेचा केलेला दंभस्फोट.

पत्रकाराने विकत आणलेली कमला जेव्हा खुद्द त्याच्याच बायकोला विचारते,
“तुला केवढ्याला विकत घेतलेले आहे ?”
हे भेदक वाक्य म्हणजे नाटकाचा आत्मा आहे.

तसेच...
“अहो, मोठ्या पेपरला प्रतिष्ठा नसते, त्यांना असतो तो फक्त खप आणि जाहिराती !”
या वाक्यातून तसल्या पत्रकारितेच्या अक्षरशः चिंध्या उडवलेल्या आहेत.

कर्नलतपस्वी's picture

5 May 2023 - 11:16 am | कर्नलतपस्वी

मुळे आमच्या सारखे महाराष्ट्रा पासून दुर राहाणाऱ्याची चांगली सोय झाली. कथा कथन म्हैस,पानवाला,तुच माझी वहिदा रेहमान इ. तसेच वासूची सासू,मोराची मावशी ,एक डाव भटाचा इ. नाटकांचा आनंद घेऊ शकलो. सुट्टीवर आल्यावर भरपुर कॅसेट्स, सीडीज घेऊन जात असू.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 11:47 am | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 11:50 am | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 11:50 am | राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र मेहेंदळे's picture

5 May 2023 - 11:50 am | राजेंद्र मेहेंदळे

• सुंदर मी होणार
https://youtu.be/L0BD4s5FQgM

• हसवा फसवी
https://youtu.be/v4-MqXYJq6o

• बटाट्याची चाळ
https://youtu.be/5i1xaSZeyOM

• श्रीमंत दामोदर पंत
https://youtu.be/U7350LnlKCk

• शांतता ! कोर्ट चालु आहे
https://youtu.be/QG_Pi051qao

• नटसम्राट
https://youtu.be/yTFPT7-v-Ws

• ती फुलराणी
https://youtu.be/PLHfek5SO_Q

• तो मी नव्हेच
https://youtu.be/8TAToq08YuQ

• पती सगळे उचापती
https://youtu.be/6IZXCmrE09s

• मोरुची मावशी
https://youtu.be/eCOeRK9N7QM

• एका लग्नाची गोष्ट
https://youtu.be/JZl_zwm_IPI

• गेला माधव कुणीकडे
https://youtu.be/1gEZ0WePqV4

• तुझे आहे तुजपाशी
https://youtu.be/sTZGYKAWc_4

• असा मी असामी
https://youtu.be/S38SOv4f95w

• शांतेच कार्ट चालु आहे
https://youtu.be/twOnQ3JCTxE

• श्री तशी सौ
https://youtu.be/N4pwOnoY7zY

• वासु ची सासू
https://youtu.be/-m3iruEQoJE

• अखेरचा सवाल
https://youtu.be/DmuCU9Y33sg

• शूऽऽऽ.. कुठं बोलायचं नाही
Part 1 - https://youtu.be/07R2IFyyJ9E
Part 2 - https://youtu.be/GsOOVwUmqx8

• चल कहितरीच काय
https://youtu.be/blOdn2nbDgw

• चार दिवस प्रेमाचे
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• मी नथुराम गोडसे बोलतोय
https://youtu.be/PD-mBpCvTAw

• कुर्यात सदा टिंगलम
https://youtu.be/LHBWfTRQvvo

• तुझ्या माझ्यात
https://youtu.be/94YChmH9GYo

• खर सांगायच तर
https://youtu.be/uMJ9gA2TFrM

• सखाराम बाईंडर
https://youtu.be/NIMIgL-OLXc

• कुसूम मनोहर लेले
https://youtu.be/2AH8SgZ2qSI

• अशी पाखरे येती
https://youtu.be/kqo2tjug3AU

• सेलीब्रेशन
https://youtu.be/dR6r75iUGXE

• अप्पा आणी बाप्पा
https://youtu.be/2z4ndcpOLJU

• कार्टि काळजात घुसली
https://youtu.be/p_FgFnDnFGc

• बॅरिसटर
https://youtu.be/ZW73zW21eXQ

• मित्र
https://youtu.be/tKpPpGWJTzw

• अश्रूंची झाली फुले
https://youtu.be/5HZYa1s1OXo

• डाॅक्टर तुम्हीसुद्धा
https://youtu.be/SVY0mq7FO1Y

• डबल गेम
https://youtu.be/v3EFucCuMdM

• सूर राहु दे
https://youtu.be/ZeT8mqNDkss

• गोड गुलाबी
https://youtu.be/XZ5pC8x8nQY

• अधांतर
https://youtu.be/ECwRnB8n2z4

• नातीगोती
https://youtu.be/F7dlUMpA5JU

• गाभण
https://youtu.be/LqQWHhxVaK4

कुमार१'s picture

5 May 2023 - 1:25 pm | कुमार१

छान उपयुक्त यादी.

कुमार१'s picture

5 May 2023 - 1:27 pm | कुमार१

छान !
.........
दिवाणखान्यातील नाटकांना कंटाळला असाल तर बदल म्हणून इथले कोर्ट मार्शल हे अनुवादित नाटक (मूळ हिंदी) जरूर पहा.

दिग्दर्शक: प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे.

लष्करी न्यायालयाच्या पटावर हे नाटक घडते. एका जवानाने त्याच्यावर झालेल्या जातिवाचक अन्याय व मानहानीचा बदला म्हणून दोन लष्करी अधिकाऱ्यांवर गोळीबार केलेला असतो आणि त्यातील एक अधिकारी मरण पावतो. त्या जवानावरील हा लष्करी न्यायालयीन खटला आहे.

लष्करी न्यायाधीशाच्या भूमिकेत प्रा. विजय दिवान तर आरोपीच्या वकिलाच्या भूमिकेत डॉ. चंद्रकांत शिरोळे आहेत. या दोघांचीही कामे खूप आवडली.

मला एवढेच सांगता येईल की आज घबाड घावलं आहे.

कुमार१'s picture

7 May 2023 - 5:16 am | कुमार१

सर्वाँना धन्यवाद !
....
महासागर
जयवंत दळवी
गिरीराज, किशोरी अंबिये, अमिता खोपकर व गिरीश ओक

मध्यमवर्गीय एकत्र कुटुंब चालवणारा विमा एजंट. त्याची बायको अगदी काकूबाई गृहिणी.
अन्य एक अविवाहित पुरुष आणि नटव्या बाईबरोबर त्याचे संबंध.
दळवींच्या प्रथेनुसार नाटकात एक वेडे पात्र आहे: नायकाचा भाऊ.
शोकांतिका !

मला गिरीराज हा कलाकार या नाटकामुळे माहीत झाला.

चौकस२१२'s picture

17 May 2023 - 7:27 am | चौकस२१२

पहिले महासागर
विक्रम गोखले / नाना पाटेकर / नीना कुलकर्णी / भा रती आचरेकर

डॉक्टर तुम्ही सुद्धा
निना कुलकर्णी / सुहास जोशी/ शेंडे / महेश मांजरेकर

शिवाजी साटम, नीना कुलकर्णी/ महेश मांजरेकर नाटक नाव आठवत नाही प्रसिद्ध होते

Hamidabai Chi Kothi ? कुठे आहे का चित्रित केलेले

कुमार१'s picture

17 May 2023 - 7:31 am | कुमार१

हिंदी आवृत्ती इथे दिसते आहे

https://m.youtube.com/watch?v=gFWD5aS4oOY&pp=ygUmaGFtaWRhYmFpY2hpIGtvdGh...
मराठी शोधावी लागेल

कुमार१'s picture

7 May 2023 - 4:11 pm | कुमार१

अशी पाखरे येती
विजय तेंडुलकर

संजय नार्वेकर, लीना भागवत, ज्योती सुभाष आणि हेमू अधिकारी या सर्वांचा अभिनय एकदम खास.
संजय हा प्रेक्षकांना त्याची जीवनकहाणी सांगतोय या पार्श्वभूमीवर नाटक पुढे सरकते. प्रेक्षकांकडे बघून केलेली त्याची स्वगते तर लाजवाब आहेत. किंबहुना त्याने संपूर्ण नाटक आपल्या करंगळीवर तोलले आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वीचे कौटुंबिक वातावरण. मुलगी उपवर आहे. तिचा बाप स्थळासाठी ‘जोडे झिजवतोय’. तेव्हा फक्त मुलाचा होकार म्हणजे अंतिम उत्तर असायचे. मग मुलीने फक्त मान डोलवयाची. मुलीचे लग्न जमत नसल्यास आईवडिलांच्या जीवाला काय तो घोर. अशा कुचंबणा झालेल्या मुलीची भूमिका लीनाने समर्थपणे पेललीय.

नाटकातील शेवटचा अर्धा तास तर अगदी उत्कंठापूर्ण. शेवट काय होईल याचा प्रेक्षकांचा अंदाज सतत चुकत राहतो. पण एक गोष्ट मनात येत की शेवटी हे ‘’तें’’ चे नाटक असल्याने अगदी गोग्गोड शेवट नक्कीच होणार नाही.

जर आपण मनात ‘अशी पाखरे येती...’ या गाण्याची संपूर्ण ओळ म्हटली तर मग शेवटाचा अंदाज येतो.
‘’तें’’ चे हे हळुवार नाटक पाहिल्यानंतर बाईंडर व गिधाडे लिहीणारे तेंडुलकर हेच का ते, असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
….

श्रीगणेशा's picture

8 May 2023 - 2:33 pm | श्रीगणेशा

छान धागा व चर्चा! वाचनखूण साठवली आहे.

अजून कधीच नाट्यगृहात जाऊन नाटक पाहण्याचा योग आला नाही.
लहानपणी, दूरदर्शनवर कधी कधी दाखविली जायची नाटकं, त्यावेळी चित्रपटांपेक्षा नाटकांना जास्त लक्ष दिलं गेल्याचं आठवतं.

कुमार१'s picture

8 May 2023 - 2:45 pm | कुमार१

धन्यवाद !
....
नातीगोती
*जयवंत दळवी.
*दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब.

एका मध्यमवर्गीय पांढरपेशा जोडप्याचा मंदमती मुलगा ही मध्यवर्ती कल्पना. त्या मुलाला सांभाळण्यासाठी बायको दिवसा व नवरा रात्री नोकरी करतात.

बायकोचा बॉस आणि त्या दोघांचे तरल संबंध हे एक उप-कथानक. परंतु हे संबंध अगदी निखळ मैत्रीचे राहतात हे वैशिष्ट्य.

तो मुलगा वयात येताना त्याच्या आईशीच लगट करायला बघतो हा प्रसंगही सुरेख व संयमित दाखवला आहे.

नाटकाचे लेखन, दिग्दर्शन व कलाकारांचा अभिनय हे सर्व रसायन झकास जमल्याने नाटक एक वेगळीच उंची गाठते.

त्याच्या आईशीच लगट करायला बघतो.... हे बरोबर आहे पण त्या मंदमती ('आत्म मग्न' हा अलिकडचा शास्त्रीय शब्द) मुलाला लाल रंगाचे वस्त्र दिसले की तो हिंसक होतो अशी एक शास्त्रीय डूब दिलेली आहे.
दिलीप प्र., रीमा, मोहन जोशी व अतुल परचुरे या सर्वांचाच अभिनय लाजवाब. हे खरेच, तरीही त्यात अतुल परचुरेचा 'मंदमती' मुलगा भाव खाऊन जातो.

कुमार१'s picture

9 May 2023 - 4:42 pm | कुमार१

आसू आणि हसू
प्र ल मयेकर
*मोहन जोशी, रिमा लागू आणि इतर.

नामांकित डॉक्टर व त्याचे मोठे रुग्णालय.
या प्रेमविवाहित पती-पत्नीमधील ताणेबाणे आणि भांडणे.. डॉक्टरांच्या रुग्णालयात आलेली एक तरुण स्त्री डॉक्टर.. त्यातून निर्माण झालेल्या कटकटी.. एकमेकींच्या झिंज्या ओढण्यापर्यंत..

अखेरीस नवरा बायकोमधील हृद्य संवाद..
प्रेम, लग्न, मैत्री, संसार, प्रेयसी, सहनिवासी.. अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत तरल शेवट.

सुंदर नाट्य !

श्रीगणेशा's picture

12 May 2023 - 5:07 pm | श्रीगणेशा

नाटक आवडलं. यात दोन वेगवेगळ्या बाजू दाखवल्या आहेत, पात्रे, कथा तीच. फरक हा की -- एका बाजूला संशय, नकारात्मकता, तर दुसरीकडे स्वीकार, समर्पण, सकारात्मकता. आसू आणि हासू.

आवडलेलं वाक्य -- शेवटच्या संवादात, डॉ. हेमंत, पत्नी वर्षाला म्हणतात, "शब्दांनी स्पर्श करणं जमतं तुला"

कुमार१'s picture

12 May 2023 - 5:09 pm | कुमार१

तो शेवटचा संवाद खरेच हृदयस्पर्शी आहे !
तिथे आपल्याला खरा नाटककार जाणवतो.

कुमार१'s picture

12 May 2023 - 11:08 am | कुमार१

नाटक या विषयावरचे एक छान काव्यमय स्फुट:

त्यातले हे खूप आवडले:

नाटकाच्या शेवटी नाटक,
लेखकाला खडसावतं.
मी आहे म्हणून तू आहेस,
असं सांगून भेडसावतं.
लेखकापेक्षा नाटक मोठं असतं
नाटक सोडून, सगळं खोटं असतं.

कुमार१'s picture

13 May 2023 - 6:00 am | कुमार१

जरा वेगळे कलाकार बघायची इच्छा असल्यास हे एक चांगले आहे:
द गेम
ले. : मनोहर सोमण
प्रमुख भूमिका : रेवती केतकर

विषय : एक उद्योगपती स्त्री राजकारण्यांना कशी नमवते.

डॉक्टर व कामगार हितचिंतक असलेल्या तरुणासंदर्भातील पहिल्या अंकाच्या अखेरचा धक्काबिंदू चांगला.

तिमा's picture

13 May 2023 - 6:59 am | तिमा

मराठी नाटक हे नाट्यगृहात पहा वा यु ट्यूबवर. काही मोजके अपवाद वगळता, सर्वच मराठी कलाकारांचा अभिनय अजून बाल्यावस्थेत आहे. फिल्म फेस्टिवलचे विविध देशांचे चित्रपट पाहिल्यावर याची जाणीव झाली.

कुमार१'s picture

14 May 2023 - 11:41 am | कुमार१

'मित्र' नाटक मस्त आहे.
लेखन (डॉ. आठवले ) व दिग्दर्शन ( वि. केंकरे) उत्तम !
श्रीराम लागू फैय्याज यांच्या अभिनयाची जुगलबंदी लाजवाब !

नाटकाची सुरवात लागूंवर दलित तरूण हल्ला करतात त्याने होते. रुग्णालयात लागूंना 'स्ट्रोक' होतो व त्यामुळे शरीराची उजवी बाजू लुळी पडते. त्यांना घरी आणल्यावर त्यांच्या देखभालीसाठी एका प्रशिक्षित नर्सची (फैय्याज) नेमणूक होते. या बाई दलित आहेत. रुग्ण कडवा ब्राह्मण.
सुरवातीस हे दोघे अगदी एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात. नाटकाच्या शेवटी 'मित्र' झालेले असतात.
दोघांच्याही अभिनयास हजार सलाम !

नाटकात राखीव जागांच्या सामाजिक प्रश्नास हात घातला आहे पण अतिशय हळूवारपणे. किंबहुना ही दरी मिटावी असाच संदेश दिला जातो.
जरूर पाहावे असे नाटक.

कुमार१'s picture

15 May 2023 - 11:44 am | कुमार१

धुक्यात हरवली वाट
शं ना नवरे
सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर
मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध.

मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते.
आवडले.

कुमार१'s picture

17 May 2023 - 6:50 am | कुमार१

धुक्यात हरवली वाट
शं ना नवरे
सुबोध भावे, सृजा प्रभूदेसाई रवी पटवर्धन व इतर
मध्यवर्ती विषय: विवाहबाह्य संबंध.

मध्यमवयीन पुरुषाने एका तरुणीला रखेल म्हणून ठेवलेले.. सुरुवातीस चोरून परंतु नंतर ते त्याच्या पत्नीला समजते. पत्नी व रखेलीची भेट आणि पत्नीने मांडलेला प्रस्ताव. त्यावर पूर्ण विचारांची रखेल तिचा निर्णय घेते.
आवडले.

चौकस२१२'s picture

17 May 2023 - 7:03 am | चौकस२१२

वाडा चिरेबंदी
अग्निपंख
संपूर्ण घाशीराम
संपूर्ण गिधाडे
आहे का कुठे

कुमार१'s picture

17 May 2023 - 7:46 am | कुमार१
कुमार१'s picture

17 May 2023 - 12:50 pm | कुमार१

आता वारंवार हेच ऐकायला मिळते आहे:

नाट्यगृहांतील गैरसोयीबाबत अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त फेसबुक पोस्ट लिहिली आहे. वैभव यांचा अलिकडेच ‘संज्या-छाया’ या नाटकांचा पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग झाले. तिथं आलेल्या अनुभवावर ही पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ' टपुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग 'संज्या छाया'चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती. रंगमंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला.
प्रेक्षक देखील डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले...'

सिरुसेरि's picture

17 May 2023 - 4:14 pm | सिरुसेरि

मराठी नाटक म्हणले की तिस-या घंटेनंतर प्रेक्षाग्रुहात होणारा अंधार , त्यानंतर नाटकाच्या सुरुवातीस होणारे "रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करुन सादर करीत आहोत दोन अंकी नाटक ----------" हे लक्षात आहे .

या निवेदनाला पार्श्वसंगीताची साथ असे. राहुल रानडे , अनंत अमेंबल यासारखे मातब्बर संगीतकार या पार्श्वसंगीताची धुरा सांभाळत असत .

अनेकदा नाटक सुरु होण्यास उशीर होत असेल तर सुजाण प्रेक्षक टाळ्या वाजवुन नाटकाच्या ग्रुपला वेळेची जाणीव करुन देत असतात .

नाटक सुरु होण्यापुर्वी व मध्यंतरात प्रेक्षक एकमेकांशी गप्पा मारताना " मी इथे दोन वर्षांपुर्वी ---- या कलाकाराचे ------- हे नाटक पाहायला आलो होतो ." अशा आठ्वणी सांगतात .

या गप्पांमधुन अनेक नव्या जुन्या नाटकांच्या व कलाकारांच्या आठवणींना उजाळा मिळतो . डॉ. काशीनाथ घाणेकर , प्रदीप पटवर्धन , डॉ. श्रीराम लागु , बबन प्रभु , फैयाज , आशालता अशा अनेक नव्या जुन्या कलाकारांच्या आठवणी सांगितल्या जातात .

काही वर्षांपुर्वी "निर्णय तुमच्या हाती" या नावाचे रहस्य कथे वर आधारीत दोन अंकी नाटक सादर होत असे . या मधे पहिला अंक संपल्यानंतर मध्यंतरात नाटकाच्या कथेतील गुन्हेगार कोण असावा हे ठरवण्यासाठी काही ठराविक प्रेक्षकांना कोरे कागद देत असत . त्यामधे प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते .

यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे . कदाचित हे नाटक माउसट्रॅप या इंग्रजी नाटकावर आधारीत असावे .

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2024 - 2:11 pm | चौथा कोनाडा

प्रेक्षकांनी त्यांच्या मते कोण गुन्हेगार आहे ते मत लिहुन द्यायचे असते .
यामधुन प्रेक्षकांच्या बहुमताद्वारे गुन्हेगार कोण आहे हे ठरवले जात असे . व त्याप्रमाणे ते पात्र गुन्हेगार असणे व त्याचा गुन्हा पकडला जाणे अशा कथानकावर दुसरा अंक सादर होत असे

.
हे भारीचं होतं

कुमार१'s picture

17 May 2023 - 5:20 pm | कुमार१

वा, खूप छान आठवणी !
एक भर घालतो.
आपण खुर्चीत बसून नाटक सुरू होण्यापूर्वी जेव्हा पडद्याकडे पाहतो तेव्हा त्याच्या डोक्यावरती लिहिलेले नाटक किंवा संस्कृती संबंधीचे बोधवाक्य देखील अविस्मरणीय असते. त्यापैकी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात असलेले,

"काव्यशास्त्र विनोदार्थं श्रीशाय जनतात्मने .."

हे वाक्य माझे अगदी पाठ झालेले आहे.
बालगंधर्व मंदिरात बहुतेक काहीतरी कालिदासासंबंधी आहे; ते जरा क्लिष्ट असल्याने पाठ झाले नाही.

कुमार१'s picture

18 May 2023 - 8:12 am | कुमार१

लग्न
जयवंत दळवी
माधव अभ्यंकर, लालन सारंग व इतर.

या नाटकाचा सारांश त्यातल्या शेवटच्या दोन वाक्यातच आलेला आहे:
लग्न न करता माणूस सुखी असतो का ?
आणि
लग्न केलेला माणूस सुखी होतो का ?
( ज्याने त्याने या प्रश्नांची उत्तरे आपापल्या मनात द्यावीत !)

नाटकात खुद्द एक नाटककारच मध्यवर्ती भूमिकेत. त्याची पत्नी आणि दोन मुली ही प्रत्यक्ष दिसणारी पात्रे. इतर न दिसणारी पात्रे म्हणजे, मोठ्या मुलीची सासरची मंडळी आणि धाकटीचा ज्या वृद्धाशी शरीरसंबंध आलेला आहे तो माणूस आणि नाटककाराच्या मैत्रिणी.

अनेक अर्थपूर्ण वाक्यातून लग्नसंस्थेला मारलेले जोडे. लग्नाविना सहजीवनाची कल्पना.
नाटक छान !

कुमार१'s picture

19 May 2023 - 12:42 pm | कुमार१

आज (19 मे) विजय तेंडुलकर यांचा स्मृतिदिन.

राष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या या थोर नाटककारास विनम्र अभिवादन !

कुमार१'s picture

20 May 2023 - 11:03 am | कुमार१

कालच युट्युब वर आलेले हे नाटक पाहिले:
ब्लाइंड गेम
रत्नाकर मतकरी

प्रत्यक्ष प्रयोगाचे चित्रीकरण आहे.
कोव्हिड नंतर प्रथमच नाट्यगृहात साकारलेला 'ब्लाइंड गेम'चा हा प्रयोग..मास्क आणि ५०% प्रेक्षकांच्या उपस्थितीत झाला होता.
चित्रीकरण ठीक परंतु संवाद नीट ऐकण्यासाठी हेडफोन्स लावलेले बरे.

ब्लाइंड’ चे इथे दोन अर्थ आहेत- मुख्य कलाकार भाग्यश्री देसाई अंध भूमिकेत आहे आणि दिवाणखान्यातील खोलीला बसवलेले पडदे venetian blinds या प्रकाराचे आहेत. काही पात्रे त्या पडद्यांची उघडझाप करतात तो एक संकेत आहे.

एका अंध स्त्रीने तीन बदमाश्यांशी दिलेला लढा असे नाटकाचे कथानक आहे. नाटक बरे आहे.

कुमार१'s picture

21 May 2023 - 6:14 am | कुमार१

सूर राहू दे
शं ना नवरे
संजय मोने, शुभांगी गोखले व सुनील बर्वे

शहरातून खेड्यात आलेला डॉक्टर. त्याची बायको नाईलाजाने त्याच्याबरोबर आलेली पण मनातून सतत कुढत राहणारी. तिचा एक पूर्वाश्रमीचा प्रियकर.. त्याच्याबरोबर ती मुंबईला निघून जाते पण तिकडे तो तिचा धंदा मांडतो. मग ती ‘आपल्या’ घरी परतते.. तेव्हा तिचा नवरा तिला स्वीकारतो का, हे नाटकात बघा.

श्रीगुरुजी's picture

21 May 2023 - 8:28 am | श्रीगुरुजी

सखाराम बाईंडर नव्या संचात तूनळीवर उपलब्ध आहे. सखारामच्या भूमिकेत सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, सोनाली कुलकर्णी व चंपाच्या भूमिकेत चिन्मयी सुमित असा नवीन संच आहे.

कुमार१'s picture

21 May 2023 - 8:38 am | कुमार१

मी ते पाहिले आहे.
नाटक म्हणून छान आहे. ते 1972 मध्ये गाजले ते त्याला आधी दिलेली परवानगी आणि 13 प्रयोगानंतर काढून घेतलेली परवानगी आणि एकूणच सामाजिक गोंधळ यामुळे. एकंदरीत त्यातील आशय, रांगडी भाषा व अर्वाच्च शिव्या इत्यादी गोष्टी समाजाला मानवल्या नसाव्यात.
कलाकारांचा अभिनय तर उत्तमच आहे.

गिरीश कार्नाड यांनी तर, ‘गेल्या एक हजार वर्षात असे नाटक झाले नाही’, असा त्याचा गौरव केला आहे.

कुमार१'s picture

22 May 2023 - 7:38 am | कुमार१

आत्मचरित्र (एकांकिका)
दीपक कुलकर्णी
विजय केंकरे, सुनील तावडे.

आडगावात येऊन कडेकोट बंदोबस्तात राहिलेला एक लेखक- स्वतःमध्येच बुडून गेलेला व लेखनाच्या सर्व व्यावहारिक लाभांपासून दूर राहणारा.
या लेखकाने आत्मचरित्र लिहावे असा आग्रह धरणारा त्याचा 'मित्र ' आणि प्रत्यक्षात लेखक मात्र, आता लेखन संपवून चित्रकार होण्याची मनीषा धरणारा.
दोन्ही प्रमुख कलाकारा च्या अभिनयाची आणि संवादांची सुरेख जुगलबंदी.
शेवटाची कलाटणी सुंदर.

कुमार१'s picture

23 May 2023 - 7:01 am | कुमार१

सुमित राघवन आणि चिन्मयी सुमित हे दोन चांगले नाट्य कलाकार आहेत.
नुकतीच त्या दोघांची एकत्रित मुलाखत "ग गप्पांचा" या मुलाखत मालिकेच्या १० व्या भागात प्रसारित झालेली आहे

इच्छुकांनी जरूर लाभ घ्यावा.

चिन्मयीने इथल्या 'सखाराम बाईंडर' मध्ये काम केलेले आहे.
त्या संदर्भात तिच्या विजय तेंडुलकरांशी झालेल्या चर्चेबद्दल तिने काही सांगितले आहे.

कुमार१'s picture

24 May 2023 - 1:45 pm | कुमार१

गुलमोहर
म. कालेलकर
मोहन जोशी, प्रदीप पटवर्धन, अशोक शिंदे आणि इतर

गुलमोहर नावाचा बंगला…. त्याचे हॉटेल रूपांतर… तिथे राहायला आलेले विविध लोक…. त्यातला एक लैंगिक कादंबरी लेखक….एक प्रेमभंग झालेली मध्यमवयीन बाई व तिची भाची…बंगल्याचा मालक तिथे येणे…
त्या तरुण भाचीचे प्रेमप्रकरण….

दुसरे मध्यमवयीन प्रेम प्रकरण…. होकार…… नकार…… गैरसमज…. दुर्घटना आणि…. गोड शेवट.

कुमार१'s picture

25 May 2023 - 7:06 am | कुमार१

आवड नसल्यामुळे पौराणिक नाटक कित्येक वर्षात पाहिले नव्हते. परंतु नुकतेच रत्नाकर मतकरी यांचे 1974 मधील आरण्यक पाहिले. ते पाहायला एक कारण घडले, 'गोष्ट खास पुस्तकाची' या पुस्तकात मतकरी यांनी त्या नाटकावर एक लेख लिहून त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. ती वाचल्यावर नाटकाबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. महाभारतातील विदुर, कुंती, ध्रुतराष्ट्र आणि गांधारी यांच्या वानप्रस्थाश्रमातील आयुष्यावर बेतलेले हे नाटक आहे; एक प्रकारचे उत्तरकांड.

नाटक मुक्तछंदात असून शब्दप्रधान आहे. त्यातील एकेक वाक्य इतके सुरेख आहे की काय विचारू नका. अनेक वाक्यांमध्ये खोल अर्थ आणि जीवनतत्वज्ञान भरलेले आहे. अरण्यामध्ये गांधारीच्या डोळ्यावरची पट्टी सोडतानाचा प्रसंग केवळ हृद्य आहे. तो संपताच प्रेक्षागृहातील प्रेक्षक टाळ्या वाजवताना दिसतात. आपणही सुन्न होतो.

एक सुंदर नाट्य अनुभव ! सुमारे अडीच तासांचे हे नाटक मी पाच टप्प्यांमध्ये विभागून पाहिले. ते एकदम बघूच नये हे माझे मत. सावकाश रवंथ करीत बघण्यात आणि ते समजावून घेण्यात खरी मजा आहे !

दिलीप प्रभावळकर (विदुर), रवी पटवर्धन (धृतराष्ट्र), प्रतिभा मतकरी (गांधारी) या दिग्गज कलाकारांसहित इतर सर्व कलाकारांच्या भूमिकाही उत्तम झाल्यात.

कुमार१'s picture

28 May 2023 - 6:26 am | कुमार१

शिल्लक
सागर देशमुख.

डॉ. विवेक बेळे, रूपाली भावे आणि इतर.

एक निम्न मध्यमवर्गीय नायक आणि त्याचे चौकोनी कुटुंब.
पत्नी एक सामान्य नोकरदार आणि गृहकृत्यदक्ष गृहिणी.
मुलगा चार वेळेस बारावी नापास होऊन आता छोटी मोठी संगणक हमाली करतोय.
मुलगी शाळेत आहे…

सतत आर्थिक तंगी.. थकलेली उधारी..
या सगळ्या वातावरणात नाटक तसेच शांतपणे पुढे सरकते. परंतु शेवटच्या पंधरा मिनिटात जरा वेगळीच कलाटणी मिळते.

नायक भ्रमिष्ट झालाय आणि काही वेळासाठी त्याच्यात ‘डोंबिवली फास्ट’ संचारलाय.
काहीसा गूढ शेवट.

नाटक जास्ती करून प्रकाशापेक्षा अंधारातच चालते. सामान्य घरातलं नेपथ्य अगदी उत्तम.
सर्व कलाकारांचे उच्चार स्वच्छ आणि स्पष्ट.

एक तास वीस मिनिटांचा चांगला नाट्य अनुभव !

सिरुसेरि's picture

29 May 2023 - 6:37 pm | सिरुसेरि

सौभद्र हे संगीत नाटक नाट्यगृहामधे बघताना जाणवलेल्या नाट्यानुभवाबद्दल पुर्वी अन्य एका धाग्यावर प्रतिसाद लिहिला होता . हा धागाही नाट्यानुभवाशी संबधीत असल्याने ती प्रतिक्रिया येथेही मुद्रीत करत आहे . संगीत सौभद्र हे नाटक तुनळीवरही आहे .

" कृष्ण आणी मराठी नाट्यसंगीत म्हणले की "सौभद्र " , "स्वयंवर" , "देव दिनाघरी धावला " , "सुवर्णतुला " अशी अनेक गाजलेली संगीत नाटके आठवतात . श्रीकृष्णाच्या खेळकर , चतुर व तितक्याच बलशाली व्यक्तीमत्वाच्या अनेक छटा या संगीत नाटकांमधुन पहायला मिळतात .

नाटकाचा पहिला अंक संपला आहे . तीर्थयात्रा करत असलेल्या अर्जुनाला नारदमुनींकडुन बलरामाने सुभद्रेचे लग्न दुर्योधनाशी ठरवल्याची वार्ता कळते . अत्यंत निराश झालेला अर्जुन एक शेवटचा प्रयत्न म्हणुन यतीवेश धारण करुन मथुरेला निघाला आहे . त्याचे सुभद्रेशी लग्न होईल का याची प्रेक्षकांनाही काळजी वाटु लागली आहे .

अशा चिंतामय वातावरणात नाटकाचा दुसरा अंक सुरु होतो . आणी रंगमंचावर श्रीकृष्णाचे आगमन होते . प्रेक्षकांना हसतमुखाने विश्वासात घेउन कृष्ण त्यांना आपण चतुराईने रचलेल्या नाट्याची या नाट्यपदामधुन कल्पना देतो - "तस्करा हाती द्विज गोधन हरिले ..तयां पार्थाशी शरण आणिले ..नारदा ते मी त्यास भेटविले ..इकडचे वृत्त जाणविले ..".

सर्व काळजी दुर झालेला प्रेक्षक मोकळ्या मनाने श्रीकृष्णाचे नाट्य अनुभवु लागतो . श्रीकृष्णाच्या "कोण तुजसम सांग गुरुराया " , "लाल शालजोडी ", " बहुत दिन नच भेटलो सुंदरीला " , " नच सुंदरी करु कोपा " , "नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी" अशा स्वरांच्या , सुरांच्या जादुमधे हरवुन जातो .

अखेर या नाट्यामधे बलरामही सापडतो आणी अर्जुन सुभद्रेच्या लग्नास "नांदा सौख्यभरे" अशी मान्यता देतो .

पडदा पडतो आणी प्रेक्षक "सौभद्र"चे , मास्तर कृष्णरावांचे आणी श्रीकृष्णाचे कौतुक करत आनंदाने बाहेर पडतो . "

** मास्तर कॄष्णराव - माननीय संगीतकार श्री. कॄष्णराव फुलंब्रीकर .

कुमार१'s picture

31 May 2023 - 7:45 pm | कुमार१

"नभ मेघांनी आक्रमिले " , "प्रिये पहा ..रात्रीचा समय सरुनी"

छान आहेत ती पदे.

कुमार१'s picture

31 May 2023 - 7:46 pm | कुमार१

पर्याय
जयवंत दळवी
* उषा नाडकर्णी, सुधीर जोशी, जयंत सावरकर व इतर.

एकत्र कुटुंब:
कजाग सासू , मनमिळाऊ सासरा. मुलीचा नवरा ठोंब्या
हुंडाबळी हा नकोसा आणि अंगावर येणारा विषय.
शोकांतिका !

कुमार१'s picture

3 Jun 2023 - 7:26 am | कुमार१


इथं हवय कुणाला प्रेम

रत्नाकर मतकरी
* राजन भिसे, चिन्मयी सुमित, स्वाती चिटणीस, वैभव मांगले व इतर

एक नाटककार आणि त्याला प्रेमाचे नाटक लिहायचा आग्रह करणारी एक प्रसिद्ध नटी ..
प्रेमाचे नमुने दाखवणाऱ्या विविध प्रसंग नाटिका. त्यांतून प्रेम, लग्न, संसार, निव्वळ सहजीवन, व्यापताप, घटस्फोट आणि जुन्या व नव्या जमान्यातील प्रेमाच्या व्याख्या या सगळ्यांवर मार्मिक भाष्य.

श्रवणीय गीते आणि प्रेक्षणीय समूह नृत्ये.

अखेरीस, “प्रेम असतं की नसतं” या पेचात पडलेला नाटककार आणि त्याच्या बायकोने त्याला एका प्रेमाच्या ‘नाटका’तूनच दिलेले उत्तर .
सुंदर नाटक व संगीतिका !

कुमार१'s picture

24 Jan 2024 - 4:01 pm | कुमार१

अधांतर
जयंत पवार
ज्योती सुभाष, भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, लीना भागवत

*गिरणी कामगारांच्या लढ्याची पार्श्वभूमी.. त्या बंद पडणे ... वैफल्य
* एका विधवेची तीन मुले आणि एक मुलगी
*एक गुंड - सतत टाडा आणि मोकाची भाषा; दुसरा बेकार आणि तिसरा लेखक.

* देशी-विदेशी साहित्यावर तात्विक चर्चा... ती देखील मुद्द्यावरून मुद्यावर येणारी
* मुलगी कुमार्गाला लागलेली

* बहुतेक सर्व संवाद चढया आवाजातील... तीव्र कौटुंबिक कलह.. शोकांतिका
सर्वांचा अभिनय उत्तम !

कुमार१'s picture

24 Jan 2024 - 4:03 pm | कुमार१

५ नोव्हेंबर रोजी झालेल्या मराठी रंगभूमी दिनानिमित्तचा
" आणि नाटक सुरू असतं" हा कार्यक्रम छान आहे

मराठी रंगभूमीची स्थित्यंतरे छान दाखवली आहेत.

चौथा कोनाडा's picture

24 Jan 2024 - 6:19 pm | चौथा कोनाडा

या धाग्याच्या प्रेरणेने "डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?" पाहिले. कड्क आहे एक्दम ... लेखन, अभिनय, दिग्दर्शन एक नंबर !

एकच प्याला देखिल पाहिले : सुरुवात - अंशुमन विचारे, संग्राम संमेल यांच्या संचात आणि उत्तरार्ध : चित्तरंजन कोल्हटकर, रवि पटवर्धन यांच्या संचात !
भारी आहे !

एक नंबर सुंदर आहे हा धागा !

कुमार१'s picture

24 Jan 2024 - 6:39 pm | कुमार१

डॉक्टर, तुम्ही सुद्धा ?

+१११
अनेक वर्षांपूर्वी रंगमंदिरात पाहिले होते.

सर टोबी's picture

24 Jan 2024 - 7:39 pm | सर टोबी

गिरीश ओक आणि उत्कर्षा नाईक यांची आभास नावाची एक जुनी थरारक मालिका होती. आपल्या पत्नीला वेगवेगळे भास होतात असे वातावरण तयार करून तिला मानसिक रुग्ण ठरविणे आणि मग घटस्फोट घेऊन मैत्रिणीशी लग्न करणे असा नायकाचा डाव असतो. राजन वाघधरे यांनी ही मालिका दिग्दर्शित केली होती. हि मालिका मी युट्युबवर शोधण्याचा प्रयत्न केला पण काही सापडली नाही. कुणाला त्याची लिंक माहिती असल्यास त्याची माहिती द्यावी.

कुमार१'s picture

28 Jan 2024 - 5:23 pm | कुमार१

२ व्या राज्यनाट्य स्पर्धेतले नाटक (२०२३) :

एक्झिट
लेखक - अरविंद लिमये
दिग्दर्शक - उषा धावडे, मृणाल ढोले
कलाकार : मृणाल ढोले, किशोर तळोकार

एक गाजलेली अभिनेत्री नैराश्यात जाते. तिला बाहेर काढण्यासाठी तिच्या चाहत्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने रचलेले एक 'नाटकातले नाटक'.
ठीक आहे. ध्वनीमुद्रण सामान्य.

अगदी बघितलेच पाहिजे असे नाही…….

कुमार१'s picture

2 Feb 2024 - 4:20 pm | कुमार१

गहिरे रंग
शं. ना. नवरे
दि. : राज कुबेर
गिरीराज, जयंत सावरकर, शकुंतला नरे, शशिकांत गंधे व इ.

एक जोडपे.. नवऱ्यात प्रजननक्षमतेचा दोष.. बायकोवर झालेला बलात्कार आणि गर्भधारणा.. ते पापाचे मूल नको हा पुरुषी अहंकार...अखेर शोकांतिका.

प्रमुख कलाकारांचा अभिनय उत्तम. जयंत सावरकरांचा बेरकी काडयाघालू ‘मामा’ देखील लक्षात राहण्यासारखा.

स्मिताके's picture

3 Feb 2024 - 12:04 am | स्मिताके

ओझ्याविना प्रवासी
https://www.youtube.com/watch?v=5KsQA-bP4qQ
कलाकार - तुषार दळवी, भक्ती बर्वे, सुनीला प्रधान, किशोरी शहाणे, संदीप मेहता.
हा एका फ्रेंच नाटकाचा अनुवाद आहे. भूतकाळ विस्मृतीच्या पडद्याआड हरवलेल्या एका तरुणाचं खरं कुटुंब शोधण्याचा प्रयत्न आणि त्यातून उघडकीला येणारे कौटुंबिक कलह अशी साधारण कथा आहे. जुन्या धनाढय फ्रेंच कुटुंबातली एकंदर विचारधारा आणि त्या ओघाने झालेला शेवट दाखवताना, खिळवून ठेवणारे संवाद आणि सर्व कलाकारांचा सुरेख अभिनय यामुळे नाटक प्रभावी वाटलं. मूळ नाटकातली नावं, वेशभूषा वापरल्यामुळे वेगळेपण जाणवलं.

चौथा कोनाडा's picture

3 Feb 2024 - 1:22 pm | चौथा कोनाडा

या धाग्यामुळे "अशी पाखरे येती" आवर्जुन पाहिलं.
सुंदर आहे. संजय नार्वेकर, हेमू अधिकारी, लीना भागवत, ज्योती सुभाष यांचा रंगमंचीय अभिनय किती ताकदीचा होता ते दिसुन येते.
(यातला सं ना तर भलताच आवडला ... आणि लीना भागवत (पेशल बदाम, (( आपला क्रश :० ))
दोन तीन उत्कट प्रसंगामुळे नाटक वर उचलले जाते.
(सुरुवातीचे स्वगत बोर वाटले.. कालबाह्य म्हटले तरी चालेल.. पण त्यावेळाच्या नाटकाची गरज असावी)

तर ... सांगायचं म्हणजे हा धागा लै भारी आहे .. नेहमी वर येत रहावा हीच इच्छा !

कुमार१'s picture

3 Feb 2024 - 3:58 pm | कुमार१

"अशी पाखरे येती"

प्रेमात पडावे असे आहेच !!
वातावरणनिर्मिती उत्कृष्ट .
आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..

चौथा कोनाडा's picture

7 Feb 2024 - 5:32 pm | चौथा कोनाडा

आनंद इंगळेचा बंडा देखील झकास आहे ..

हा ... हा .... हा .... हा .... ! अगदी ... भारी "संस्कारीत" गप्पा ठोकणारा !
टिपि़अल हाफ पॅण्ट संघ दक्ष !

कुमार१'s picture

8 Feb 2024 - 8:32 pm | कुमार१

अतिथी देवो भव
दिग्दर्शक : विजय केंकरे
विनय येडेकर, राजन भिसे, लेखा मुकुंद.

दिग्दर्शकांचे नाव बघून बघायला घेतले. ठीक आहे. शेवटच्या पंधरा मिनिटात दिलेली भावनिक कलाटणी चांगली आहे परंतु मुख्य ३/४ नाटक विशेष पकड घेत नाही.

अतिथी म्हणून कुटुंबात आलेल्या एकजण शेवटी ‘भलताच’ निघतो.
दोन्ही पुरुष पात्रे काहीशी आक्रस्ताळी वाटली. त्या मनाने लेखा मुकुंद यांचा वावर सहज आणि चांगला आहे.

कुमार१'s picture

11 Feb 2024 - 7:39 am | कुमार१

आपल्याकडे प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकांबद्दल वेगळा धागा नसावा असे वाटते. म्हणून इथेच लिहीतो. क्षमस्व !

217 पद्मिनी धाम
काल पाहिले. एक उत्कृष्ट नाट्य अनुभव !

रत्नाकर मतकरी यांच्या ‘कामगिरी’ या कथेवर आधारित नाटक. नाटकाचे नेपथ्य अतिशय सुंदर व प्रकाशयोजनाही गूढ वातावरणाला पूरक.

ज्येष्ठ कलाकार मिलिंद शिंदे (माजखोर बेरकी रावराजे) आणि इतर सर्व तरुण कलाकारांची कामे उत्तम झाली आहेत. उद्योगपती रावराजे यांनी पोसलेले एक कॉलेज. त्यातल्या प्रयोगशाळेतला एक सहाय्यक. त्याचे व रावराजे यांच्या मुलीचे-पद्मिनीचे प्रेम असते. परंतु अखेर ते असफल राहते आणि शोकांतही. नंतर रावराजांनी दुष्टबुद्धीने घेतलेला ‘बदला’ हे नाटकाचे मुख्य सूत्र.

दुसरा अंक सुरू होताना रंगमंचावर जो टांगा दाखवलाय तो केवळ अप्रतिम. टांग्यात बसलेला तो सहाय्यक आणि त्याच्या जोडीला कॉलेजला देण्यासाठी म्हणून दिलेली “भीतीदायक भेटवस्तू” असते. हे दृश्य अप्रतिम ! ती भेटवस्तू कॉलेजला पोचवण्याची ‘कामगिरी’ त्याला पार पाडायची आहे. परंतु वास्तवात काहीतरी भलतेसलतेच घडते. ते प्रत्यक्ष पाहण्यातच थरार आहे ..

नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.
नेपथ्य लाजबाब व संस्मरणीय !!
….
नाट्य अवलोकान युट्युबवर इथे आहे.

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2024 - 5:43 pm | चौथा कोनाडा

सुंदर रसग्रहण.

प्रत्यक्ष पाहिलेल्या नाटकाविषयी इथं लेखनाचं स्वागत !

वाचून पहायलाच हवे असं वाटतंय !
असं सुंदर नेपथ्थ्य नाटकात वेगळेच जबरदस्त वातावरण निर्माण करते

चौथा कोनाडा's picture

4 Mar 2024 - 5:58 pm | चौथा कोनाडा

नाटक संपल्यानंतर सर्व कलाकार तर रंगमंचावर येऊन उभे राहतातच. परंतु त्याच बरोबर नाटकाचे निर्माते, दिग्दर्शक आणि सर्व पडद्यामागील तंत्रज्ञानाही रंगमंचावर बोलावले जाते आणि प्रेक्षकांना अभिवादन केले जाते. हा सुद्धा एक सुरेख पायंडा म्हणावा लागेल.

.... खूपच स्वागतार्ह आहे हे.
आजकाल बर्‍याच नाटकांच्या शेवटी हे सत्र करतात ... याच वेळी रसिकांना त्यांच्यासमवेत फोटो काढायला मिळतात.
नाटक व्यवसायाला टॉनिक मिळण्यासाठी हे खूप आवश्यक आहे !

कुमार१'s picture

1 Mar 2024 - 9:42 pm | कुमार१

फ्रान्सिस ऑगस्टीन
प्र. भू. : मोहन जोशी, स्मिता जयकर

अनाथालयात वाढलेला एक मुलगा आणि एक मुलगी मोठे झाल्यावर लग्न करतात. आता आपल्याला मूल होण्याआधी आपल्या घरात आजी-आजोबा पाहिजेत हा त्यांचा विचार. दोघेही अनाथ, त्यामुळे त्यांना त्यांचे आई-वडील माहित नाहीत. मग ते जोडते आपण समाजातून आई-वडीलच दत्तक का घेऊ नयेत असा विचार करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात.

यानंतर घरात त्या चौघांच्या गमती जमती आणि एकंदरीत कौटुंबिक नाटकाचा बाज.
नाटक पूर्वार्धात पारशी पकड घेत नाही. तसेच,
“तिच्या मनात आलं म्हणून तिने चहात आलं घातलं” यासारखे बाष्कळ विनोद अधूनमधून आहेत.

शेवटच्या 25 मिनिटात नाटकाला कारुण्याची छान किनार दिलेली आहे. तसेच एका जोडीचे गुपित उघड झाल्याने कलाटणी मिळते. त्यामुळे नाटक काहीसे वर उचलले जाते.

कुमार१'s picture

28 Mar 2024 - 10:39 am | कुमार१

काचेचा चंद्र
सुरेश खरे
* शरद पोंक्षे, हर्षदा खानविलकर, जयंत सावरकर

कर्मठ कुटुंबातील उपवर तरुणी. आईबाप तिचे लग्न जमवायच्या खटपटीत आहेत. त्या दरम्यान तिला एका चित्रनिर्मात्याकडून चित्रपटात काम करण्याची मागणी येते. त्यावरून घरात वाद होतो. त्यांच्या घरात तिचा एक सावत्र भाऊ देखील नांदत आहे. चित्रपटात जाण्यासाठी आई-वडिलांचा विरोध तर सावत्र भावाचा हट्ट असा तो पेच असतो.

एकंदरीत कुटुंबाची हलाखीची परिस्थिती पाहून वडिलांना कर्जमुक्त करण्यासाठी ती चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेते. त्या क्षेत्रात वावरताना तिचा सावत्र भाऊ तिचा व्यवस्थापक अर्थात पुरुषी मालक बनतो. पुढे त्याच्या अहंकारापुढे ती पार कोमेजून जाते. तो तिला मद्यव्यसनी बनवतो आणि तिचे पूर्ण दमन करतो.
.... शोकांतिका !

(आवडले होते व ४ वर्षांनी काल दुसऱ्यांदा पाहिले)

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2024 - 12:33 pm | चौथा कोनाडा

खूप छान नाटक. आवडले.

कुमार१'s picture

14 Apr 2024 - 9:30 am | कुमार१

आईशिवाय घर नाही
लेखक : राजन लयपुरी व इतर
कलाकार : विलास व क्षमा राज, आकांक्षा वनमाळी आणि इतर

तरुणांमधील गर्दचे घातक व्यसन या सामाजिक-आरोग्य विषयावर.
उद्योगपती पुरुष आणि त्याची आमदार बायको यांचे आपल्या एकुलत्या एक मुलाकडे लक्ष नसल्यामुळे त्याला लागलेले व्यसन.
शोकांतिका

सुधीर कांदळकर's picture

15 Apr 2024 - 7:29 pm | सुधीर कांदळकर

Shauryawaan

हा डब्ड हिंदी सिनेमा तू-नळीवर दिसला. अर्धा पाहिला. उरलेला उद्यापरवा पाहीन. जबरदस्त आहे. डॉक्टर तुम्हीसुद्धा आवडले. सखाराम बाईंडर, अधांतर पाहिली. फारच अंगावर आली. खूप अस्वस्थ झालो. मित्र, वेड्याचे घर उन्हात, काचेचा चंद्र, लागूंचे नटसम्राट,ऑक्टोपस पूर्वी पाहिली होती. छान आहेत.

नाट्यगृहात जाऊन पाहिली त्यातले सुधा करमरकर आणि फैयाजचे वीज म्हणाली धरतीला आवडले. एकदोन गाजलेली नाटके सुमार दर्जाची निघाली. तेव्हापासून हे धारिष्ट्य करीत नाही. त्यापेक्षा तू-नळी बरी. नाही आवडले तर सोडून देता येते.

छान धागा. धन्यवाद.

अवांतरः तू-नळीवर पाहिलेले लघुपट मात्र मोठ्या संख्येने चांगले निघाले. अनेक लघुपटात प्रथितयश कलाकार भूमिका करतात हे पाहून बरे वाटले.

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2024 - 5:46 pm | चौथा कोनाडा

मासा ही अमृता सुभाष यांचा लघुपट आवर्जून पहा.
एक वेगळाच आनंद देऊन जाईल.
https://www.youtube.com/watch?v=orayV2fpOmY&t=15s

चौथा कोनाडा's picture

16 Apr 2024 - 5:47 pm | चौथा कोनाडा

अर्थात पाहिली नसेल तर !

कुमार१'s picture

16 Apr 2024 - 7:46 pm | कुमार१

मी तो आधीच पाहिलेला असून त्याची नोंद लघुपट असल्यामुळे इथे केली होती :)
छानच . . .

चौथा कोनाडा's picture

19 Apr 2024 - 2:16 pm | चौथा कोनाडा

धन्यवाद कुमार१... छान संदर्भ !
आता त्या धाग्यातले फिल्म्स / नाटक सवडीसवडीने पाहतो.