हर किसमी मै है किस !!!

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
12 Jan 2024 - 9:47 pm

हर किसमी मै है किस !!!

यंदा गणपतीत मित्राच्या घरी आरतीला गेलो होतो. आरती झाल्यावर त्यांनी प्रसाद म्हणून चक्क Hershey's Kisses वाटले. दिसायला मोदकांच्या आकाराचे असतात पण म्ह्णून गणपतीचा प्रसाद अमेरिकन चॉकलेट्स?!! बाप्पा ऐवजी प्रसाद वाटणाऱ्या यजमानांनाच 'घालीन लोटांगण वंदीन चरण' करावसं वाटलं.

आपल्याकडे पूर्वी सणासुदीला एकमेकांना मिठाई देण्याची पद्धत होती. त्याची जागा आधी हल्दीरामच्या 'सोनपापडी'ने आणि मग अलगद 'कुछ मीठा हो जाए' च्या जाहिरातीद्वारे "कॅडबरीने घेतली आहे.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी 'इंपोर्टेड चॉकलेट्स'चं बरंच अप्रूप होतं. माझी मावशी चार वर्षांतून एकदा अमेरिकेवरून भारतात यायची तेव्हा तिथली स्पेशल च्युईंगगम आणि चॉकलेट्स आणायची. त्याचं फार कौतुक वाटायचं. आता जवळजवळ प्रत्येक बिल्डिंगमध्ये किमान पाच-सहा मुलं अमेरिकेत असतात. भारतात सुट्टीवर येताना Hershey's, Ferrero Rocher, Lindt इत्यादी उत्तमोत्तम ब्रॅण्डची चॉकलेटस घेऊन येतात. आता तर हे सर्व ब्रॅण्ड्स भारतातील शहरात मॉल्समध्ये तर मिळतातच, पण कोपऱ्यावरच्या किराणा दुकानात देखील असतात.

एखादी गोष्ट मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यावर त्याचं विशेष कौतुक रहात नाही. तसंच काहीसं माझं ह्या चॉकलेट्सबाबत झालंय. Hershey's Kisses बघून फारसा ‘हर्ष’ झाला नाही. मन मात्र भर्रकन भूतकाळात गेलं आणि आयुष्यातील पहिल्या किस ची गोड आठवण ओठांवर आणि जिभेवर तरळली .... हीच ती माझी एकेकाळची आवडती 'पारले किसमी' टॉफी !

Kissme

अगदी लहानपणी शाळेच्या ट्रीपला जाताना (तहान लागू नये म्हणून) पहिल्यांदा संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या लिमलेट गोळ्यांनी झाली. वास्तविक ह्या गोळ्या चघळून जास्त तहान लागते! लहानपणच्या गोळ्या-चॉकलेटच्या गोड आठवणीत पार्ले पॉपीन्स, मँगो बाईट, मेलडी, कॉफी बाइट, 'रावळगाव' लिहिलेल्या पारदर्शक कागदामधल्या लाल, ऑरेंज, गोळ्या आणि पान पसंद ह्याचा सिंहाचा वाटा आहे. ''पान पसंद'' ची अर्चना जोगळेकरची "शादी और तुमसे, कभी नही' जाहिरात प्रचंड आवडायची. 'हारनिक' च्या सिगारेटच्या गोळ्या ओढण्यात थ्रिल वाटायचं. परंतु काळची सर्वात आवडती टॉफी 'किसमी'. त्या काळी इमरान हाशमी नावाचा इसम नव्हता. नाहीतर 'किसमी' ब्रॅण्ड साठी ह्याच्यापेक्षा आदर्श ब्रॅण्ड अँबेसेडर सापडणे अशक्य ! 'हाशमी' नसल्याने 'किसमी'ला ह्या सुवर्णसंधी पासून 'मुका'वं लागलं.

चौथी-पाचवीत असतांना पहिल्यांदा 'किसमी' खाल्लं असेन. त्या वयात ‘किस’ हा विषय केवळ रताळे किंवा बटाट्या पुरताच मर्यादित होता. नाही म्हणायला मंगळागौरीच्या गाण्यांत 'किस बाई किस दोडका किस' माहिती होता. ‘किसमी’च्या रॅपरवर 'काळा माणूस पांढऱ्या बाईचे चुंबन' घेतानाचे चित्र आहे. किसमी टॉफी हातात पडल्यावर कधी एकदा खातोय असं व्हायचं. त्यामुळे रॅपरवरील चित्राकडे फारसं लक्ष जायचं नाही. लक्षपूर्वक पाहिलं तरी त्या निरागस वयात 'काळा इसम गोऱ्या बाईबरोबर कानगोष्टी करतोय' असंच वाटलं होतं.

सुरुवातीला ‘किसमी’ १ रुपयाला ४ मिळायची. शिवाय २ रुपयांचा ‘किसमी बार’ ही मिळायचा. तेव्हा चॉकलेटी रंगाची गोड वडी म्हणजे चॉकलेट असंच वाटायचं. कोको पावडर असेल तर चॉकलेट आणि नसेल तर 'टॉफी' एवढी समज नव्हती. किसमी टॉफीची चव आवडायची आणि दीर्घकाळ जिभेवर रेंगाळायची ती ह्याच्या अफलातून वेलदोड्याच्या चवीमुळे. गोडपणा आणि वेलदोड्याची चव ह्याचे प्रमाण एकदम परफेक्ट !!!

SmartSelect_20231228_102029_Facebook

गेले अनेक वर्षे मी मस्कतमध्ये आहे. इकडे देखील अमेरिका, युरोप, मलेशिया इ. सर्व देशांची प्रसिद्ध चॉकलेट्स मिळतात. इतकी प्रचंड व्हरायटी मिळत असूनही चॉकलेटी 'मोदक' Hershey's Kisses मुळे 'किसमी' ची आठवण आली आणि मी जाम बेचैन झालो.

‘किसमी’ अजूनही मिळतात का हे देखील माहिती नव्हतं. आता पुण्याला जाईन तेव्हा लक्ष्मी रोडच्या 'शांती स्टोअर्स' किंवा 'खाऊवाले पाटणकर' अश्या ठिकाणी विचारावे असं ठरवलं. ऑफिसमधला मित्र म्हणाला, आपल्या अमेझॉनवर आता वाट्टेल त्या गोष्टी मिळतात. आणि काय आश्चर्य!! भारताच्या अमेझॉन वेबसाईटवर 'किसमी' लगेच सापडली देखील. आता भारतातून मस्कतला कशी मागवता येईल हा विचार डोक्यात फिरू लागला. असं म्हणतात कि 'अगर किसी चीज़ को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने में लग जाती है। माझा ऑफिसमधील मित्र चार दिवसांसाठी भारतात सुट्टीवर जाणार होता. ताबडतोब त्याच्या घरी पार्ले किसमीचा ५० टॉफीचा पॅक ऑर्डर केला. इकडे यंदा दसऱ्याला सोनं लुटता आलं नाही परंतु दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी माझा मित्र इकडे हे चॉकलेटी सोनं घेऊन मस्कतला आला. लालचुटुक ओठांच्या रंगाचे रॅपर उघडून ती टॉफी अधीरतेने तोंडात टाकली. वीस-बावीस वर्षानंतर खाल्ली तरीही तीच ती अवीट गोडी आणि वेलदोड्याची जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव ! ह्याचसाठी केला होता अट्टाहास!

अनेक दिवस बाहेरचं जेवल्यानंतर घरचा वरण-भात खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही तसं काहीसं माझं झालं. देशोदेशींची कॅडबरीज, मिल्क, डार्क, मिंट चॉकलेटे खाऊन जे समाधान नाही लाभलं ते एवढयाशा टीचभर किसमीने मिळालं ☺

पारले कंपनीने हा ब्रँड इतके वर्षे टिकवल्याबद्दल त्यांचा कायमचा ऋणी आहे. त्यांनी नुसता टिकवला नाही तर नेहेमीच्या (इलायची) फ्लेवर व्यतिरिक्त आता या किसमीमध्ये रोझमिल्क, राजभोग, मिठा पान, कुल्फी असे फ्लेवर्सही उपलब्ध केले आहेत. चॉकलेटचा आकार मात्र आधीपेक्षा थोडा लहान केलाय.

Flavours

असं म्हणतात कि जसं प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे असतात, तसं प्रत्येक आंब्याच्या झाडाचे पान देखील एकासारखे दुसरे सापडणार नाही. हीच गोष्ट किसमीच्या बाबतीत लागू होते. रॅपर उघडल्यावर समजतं कि प्रत्येक टॉफी वेडीवाकडी कापलेली ओबड-धोबड ! एकासारखी दुसरी शोधूनही सापडणार नाही. 'आमच्यासारखे आम्हीच'. मला तर कधीकधी शंका येते कि शबरीच्या बोराप्रमाणे पार्लेच्या क्वालिटी कंट्रोलची पोरं पॅक करण्यापूर्वी प्रत्येक टॉफी चाखून बघतात कि काय म्हणून असली 'खीस पाडलेली 'किसमी’ आपल्या वाट्याला येते.

SmartSelect_20231228_102119_Facebook

संत चोखामेळा म्हणून गेलेत 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा | काय भुललासी वरलिया रंगा'. ऊस भले दिसायला वेडावाकडा असेल पण त्यामुळे त्याचा रसाचा गुणधर्म बदलत नाही. तस्मात, पारले किसमी बाबत "काय भुललासी वरलिया रंगा (आणि अंगा)' करू नये. दिसायला भले वेडेवाकडे कापलेले दिसेल, परंतु चव केवळ अफलातून.

पारले ने आता किसमी गोल्ड आणि किसमी इलायची (मेलडीच्या आकारातील) काढले आहेत. मला वाटतं ह्याची चव काही वेगळी नसेल, फक्त नेहेमीच्या किसमी पेक्षा नीट कापलेले असावेत. मुळात ज्याची चव इतकी परिपूर्ण आहे त्याच्यात अजून सुधारणा काय करणार म्हणा !!

'बालपणीचा काळ सुखाचा' असं म्हणलं जातं. तो गोड सुखाचा करण्यात 'रावळगाव' च्या कॅंडीज, श्रीखंडाच्या गोळ्या, ‘अनुपम’ चे 'काजुकंद, पारले पॉपीन्स आणि खास करून 'किसमी' चा मोठा वाटा आहे. आता इतक्या भारी टॉफीज मिळत असूनही एक रुपयाची टीचभर ‘किसमी’ जास्त आवडण्याचं कारण वेलदोड्याच्या चवीखेरीज त्यात मिसळललेल्या "बालपणीच्या गोड आठवणी' हेच असावं.

~ आशिष सुभेदारl

SmartSelect_20231228_102628_Chrome

साहित्यिकआस्वाद

प्रतिक्रिया

अधिक माहितीसाठी: किस्मी आणि पार्ले जी यांचे मिश्रण करून आता किस्मी बिस्किटे देखील निघाली आहेत. स्मरणरंजन आवडले.

छान गोड आठवणी,मला मेलडी आवडायचं.आकर्षक वेष्टण आणि चॉकलेटी स्वाद !अर्थात अजूनही मेलडी खात असते.मेलडी नसेल तर मेंगो बाईट.इक्लेरसचा पण एक मोठा चाहता वर्ग असायचा.

सर टोबी's picture

13 Jan 2024 - 11:30 am | सर टोबी

पार्ले कंपनीचा पॅापिन्स हा एक बराच लोकप्रिय ब्रॅंड होता. चांगले घसघशीत पंचवीस पैसे, पाहुणे किंवा तत्सम मार्गाने, मिळाले तरच पॅापिन्स घेणं परवडायचं. त्यावेळेस कुठली तरी कॉमिक्स पार्ले पॅापिन्स प्रमोट करायची. त्यातला तो फास्टर फेणे टाईप मुलगा त्याच्या चौकस बुद्धीने गुंडांचा अड्डा किंवा तत्सम कारणामे उघड करायचा. शेवटच्या धुमश्चक्रीत तो त्याच्याकडील बंदुकीतून पॅापिन्स झाडायचा आणि पाळणारे गुंड त्यावरून घसरून पडायचे असं काही तरी दाखवलेलं असायचं.

चॉकलेट्स म्हणाल तर आजही रावळगावची चॉकलेट्स आवडतात आणि ती ग्राहक पेठेत मिळतात देखील.

पार्ले कंपनीचं विशेष म्हणाल तर त्यांनी निदान दोन पिढ्या तयार खाद्य प्रकारातील बाजाराचे नेतृत्व केले आहे. पार्ले ग्लुको आणि मोनॅको तर कल्ट लेव्हल ची उत्पादने आहेत. पहिला टेट्रा पॅक मधला ज्यूस, पहिली पाण्याची बाटली (ही देखील कल्ट लेव्हल ला असलेली. म्हणजे कोणत्याही ब्रँडची बाटली ही बिसलेरी असते), पहिल्या टब मधल्या शेवया. पार्लेनं जवळपास अडतीस वर्षापूर्वी पिटा ब्रेड बाजारात आणला होता. अगोदरच भाजलेल्या पिटा ब्रेडमध्ये पॅटी, टोमेटो, ढोबळी मिरची भरून वेगवेगळे सॉस टाकून परत एकदा छान गरम करून दिला जाणारा हा प्रकार होता. काळाच्या खुपच अगोदर आलेला हा ब्रँड फारसा टिकला नाही पण अजूनही आठवण टिकवून आहे.

आता पॉपिन्स आणि त्या कॉमिक स्ट्रिपचा विषय निघालाच आहे तर बोलणे आले.. डुप्लिकेट पॉपिन्स ही त्यावेळी पार्लेसाठी एक डोकेदुखी होती. आणि अस्सल पॉपिन्स कशी ओळखायची हे सांगण्यासाठी ते अशा कॉमिक्स आणि अन्य मार्गांनी जाहिरात करायचे. ते जे सर्पिलाकार रेषांचे डिझाईन असते त्याच्यात एक रुपेरी रेष असलेला रॅपर असेल तीच अस्सल पॉपिन्स हे त्यावेळी लोकांच्या मनावर ठसवले जात होते.

सरनौबत's picture

14 Jan 2024 - 11:43 am | सरनौबत

धन्यवाद गवि, भक्ती आणि सर टोबी. किसमीची बिस्किटे नाही खाल्ली अजून. नक्की ट्राय करण्यात येतील.

मुक्त विहारि's picture

14 Jan 2024 - 11:53 am | मुक्त विहारि

लेख आवडला...

टर्मीनेटर's picture

14 Jan 2024 - 8:57 pm | टर्मीनेटर

"शो स्टॉपर" लेख!
दिवाळी अंक प्रकाशित झाल्यावर एखाद-दोन महिने मिपावर प्रकाशित होणाऱ्या (काही सन्माननीय अपवाद वगळता) दर्जेदार लेखांची संख्या रोडावते असा माझा आजवरचा अनुभव आहे.
दर्जेदार लेखांच्या बाबतीत सुप्तावस्थेत गेलेल्या मिपाला पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी एका "शो स्टॉपर" लेखाची आवश्यकता असते, आणि ह्यावेळचा "शो स्टॉपर" लेख माझ्यालेखी हा आहे!
खूप छान स्मरणरंजनात्मक लेख सरनौबतजी, वाचून अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👍

चॉकलेट हा अत्यंत आवडता पदार्थ असल्याने त्याच्याशी निगडित अनेक देशी-विदेशी चॉकलेट्सच्या आठवणी आहेत, त्या यथावकाश शेअर करीनच.

ह्या "शो स्टॉपर" लेखानंतर आता पुन्हा मिपावर दर्जेदार लेखनाचा सिलसिला सुरु होणार ह्या आशेवर असलेला...
'टर्मीनेटर'

श्वेता व्यास's picture

15 Jan 2024 - 1:26 pm | श्वेता व्यास

लहानपणीचं आवडतं चॉकलेट!
चॉकलेटचा आकार मात्र आधीपेक्षा थोडा लहान केलाय.
अजून लहान केलाय :(
आम्ही याच्या रॅपरच्या अंगठ्या, बाहुल्या करायचो, मजा यायची :)

सिरुसेरि's picture

15 Jan 2024 - 7:32 pm | सिरुसेरि

सुरेख लेख आणी आठवणी . किसमी टॉफीच्या टिव्हीवर कधी फारशा जाहिराती पाहिल्याचे आठवत नाही . ( मेलडी , कॅडबरी या इतर टॉफीजच्या तुलनेत ) . तरीही किसमी टॉफीने आपले स्थान टिकवुन ठेवले .

पेपरमिन्टच्या गोळ्यांमधे पोलो गोळीची जाहिरात प्रसिद्ध होती. ( खाओ पोलो थोडासा तो खालो .. )

राजेंद्र मेहेंदळे's picture

15 Jan 2024 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

छान स्मरणरंजन!!
या लेखाच्या निमित्ताने आठवलेल्या गोळ्या म्हणजे---
लहानपणीची पहीली आठवणीतील गोळी म्हणजे श्रीखंडवडी. मग सॉफ्ट काजु चॉकलेट, मग मेलडी -मेलडी खाओ खुद जान जाओ,पान पसंद-पान का स्वाद गजब की मिठास, कॅडबरी एक्लेअर, जरा मोठे झाल्यावर बूम बूम बूमर बबलगम. ह्या झाल्या ब्रँडेड.

याशिवाय कल्याणच्या लक्ष्मी मार्केट मध्ये एका दुकानात डॉलर चॉकलेट, झेब्रा गोळी, आणि एक शिट्टीवाली गोळी मिळायची(म्हणजे ऑरेंज गोळीच्या मटेरीयलची पण लांबुडकी नळी सारखी आणि काडीवर लावलेली, शिवाय चौकात एका पानवाल्याकडे जिरा गोळी,चिंच गोळी वगैरे देशी गोळ्या मिळत. आहाहा तोंपासु!!

गवि's picture

15 Jan 2024 - 8:05 pm | गवि

सॉफ्ट काजु चॉकलेट

तुम्हाला अनंत आठवले यांची काजू वडी म्हणायचे आहे का? गुलाबी, पांढरी अशा रंगात आणि पारदर्शक प्लास्टिकमध्ये चौरस आकाराचा लहान साईज. मध्ये सोनेरी गोल स्टिकर.

लाल शिट्टी लॉलीपॉप आठवणीमुळे अं ह झालो. मी ज्यांना म्हणून ती आठवण सांगितली त्यातील कोणालाही असे लॉलीपॉप आठवत नव्हते.

सर टोबी's picture

15 Jan 2024 - 10:44 pm | सर टोबी

हे परंपरागत पद्धतीने स्थानिक आणि ब्रँडेड स्वरूपात मिळायचे आणि आताही मिळतात. तुम्ही म्हणता तशी शिट्टी असलेलं लॉलीपॉप मी पाहिलेलं आहे. पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत.

त्या काळी म्हणजे साठच्या दशकात साठे बिस्किट्स मिळायची. त्यांची ऑरेंज क्रीमची बिस्किट्स केवळ लाजवाब. सत्तरच्या दशकात ब्रिटानियाने ऑरेंज आणि नारळ यांच्या स्वादाची दोन वेगवेगळी बिस्किट्स आणली. ती जवळपास दहा वर्षापेक्षा जास्त काळ बाजारात होती. याच सुमारास किवामचा स्वाद असणारी गोळी मिळायची. ती फार मस्त लागायची.

सायकलवर ट्रंक लादून वजनावर विकली जाणारी बिस्किटं हा अजून एक प्रकार. मात्र ती तयार करतांना टॅलो वापरला असण्याच्या शक्यतेने फक्त एकदाच चाखून बघितली.

चावटमेला's picture

17 Jan 2024 - 8:58 pm | चावटमेला

पण पक्षी, प्राणी यांच्या आकाराची बिस्किटं मला आमच्या नगरव्यतिरिक्त कुठे दिसली नाहीत.
मी खाल्लीयेत लहानपणी सांगलीत. शनिवार च्या बाजारात मिळायची. चव यथातथाच असे, फक्त प्राणी , पक्ष्यांचे वेगवेगळे आकार हे आकर्षण असायचं

राजेंद्र मेहेंदळे's picture

17 Jan 2024 - 9:06 pm | राजेंद्र मेहेंदळे

मला काजू वडीच म्हणायचे होते, फक्त "आठवले" ब्रँड "आठवला" नाही :)

लाल शिट्टी लॉलीपॉप- हे ही नाव बरोबर

प्राण्यांचे आकार असलेली बिस्कीटे- ही सुद्धा कल्याणला देवीच्या देवळापाशी एका दुकानात मिळायची

नठ्यारा's picture

16 Jan 2024 - 2:41 am | नठ्यारा

पानपट्टीच्या गोळ्या आठवताहेत कोणास? ५ पैशास १० मिळायच्या. नंतर महाग झाल्या. आता दिसंत नाहीत फारशा. मात्र बडीशेपेच्या गोळ्या आजूनही मिळतात म्हणे.

-नाठाळ नठ्या

खास वैदर्भीय म्हणावे असे बोरकुट, उकडलेली अन् चाट मसाला लावलेली छोटी बोरं, राजमलई.. ! वाह क्या बात है! तोंपासु! :-)
मँगो बाईट, कॉफी बाईट च्या काळात एक कॉफी टोज नावाचं स्ट्राँग कॉफी फ्लेवरची टॉफी देखील होती.. जाम आवडायची!

वामन देशमुख's picture

17 Jan 2024 - 8:58 am | वामन देशमुख

स्मरणरंजन आवडले.

त्या निमित्ताने एकेकाळच्या दोन रुपयांच्या किस्मी बारच्या गोडगुलाबी आठवणी जाग्या झाल्या.

काल आमच्याकडे बोरन्हाण होतं,किसमी चे वेगवेगळे फ्लेवर्स आणले होते.नवीन लहान मुलांनी खुप डल्ला मारला ,जेली चोकलेट चक्क नाकारले .हेच (किसमी) द्या म्हणाले :)

चौथा कोनाडा's picture

18 Jan 2024 - 2:37 pm | चौथा कोनाडा

मस्त ... स्मरणरंजन फारच अप्रतिम !
खुसखुशीत लेखन वाचताना त्या दिवसांची आठवण होत होती !
इतकं क्युट लिहिलं आहे की "किस यू "करावसं असं वाटल !

NCLqw23456
कीसमी ऑनलाईन मागवून खाल्ले तो किस्सा भारी आहे !

सरनौबत's picture

21 Jan 2024 - 1:29 pm | सरनौबत

आभारी आहे चौथा कोनाडा. मलादेखील 'किसमीचे किस्से' आठवताना छान वाटलं. इतक्या प्रचंड आठवणी वर्षानुवर्षे मेंदूत असतात त्या अश्या अचानक वर येतात ती प्रोसेस विशेष मजेदार आहे.

सरनौबत's picture

21 Jan 2024 - 1:25 pm | सरनौबत

धन्यवाद टर्मिनेटर इतक्या सुंदर प्रतिक्रियेबद्दल