पाककृती : बटर चिकन आनि व्हेज बिर्याणी!

भाग्यश्री's picture
भाग्यश्री in पाककृती
6 May 2008 - 12:13 am

ह्म्म.. मिपावर प्रथमच लेख लिहीत आहे.. आणि त्यातून रेसीपी! दोन्ही स्वातीताई आणि पेठकर काकांच्या अंगणात न विचारता घुसखोरी केल्यासारखं वाटतय! :)
असो.. तर ही आमची गेल्या वीकांताची डिश.. नवर्‍याला चिकन खायचं होतं..( मी नॉन्-व्हेज कधीच केलं नाही, येत नाही. त्यामुळे त्याची अगदी उपासमार होत होती नॉन्-व्हेज ची..) त्यातून प्राजूचा अस्सल कोल्हापूरी थाळीचा फोटो पाहील्यावर राहवेच ना त्याला.. म्हणून हा बेत..

बटर चिकन
ही माझ्या सासूबाईंची पाककृती आहे. अस्सल नॉन्-व्हेज नसेल. कारण त्या पण नॉन्-व्हेज करत नव्हत्या. पण निनादसाठी करायला लागल्या. तर त्यांची ही रेसीपी. पण अर्थात 'आम्ही' करत होतो ,त्यामुळे तशी आणि तितकी छान नाही झाली. (असं निनादचं मत.. मला चव खूप आवडली!)
असो.. मला जमेल तशी देतीय रेसीपी. अगदी अचूक प्रमाण नाही देता येणार कारण मी अंदाजेच घालते सगळे मसाले..

IMG_0212

जिन्नस :
१) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन.
२) एक मोठा कांदा चिरून. ( अमेरीकेतला असेल तर अर्धाच. आमचा कॉस्कोचा होता. तो जरा अतीच जास्त आहे..)
३)एक टोमॅटो.
४) खोबरं
५) आलं, लसूण.
६) ३ मिरच्या
७) थोडी कोथिंबीर.
८)चिकन मसाला..
९) थोडासा काळा मसाला..
१०) आवश्यक वाटला तर फूड कलर्.(अर्थात लाल.)
११) दही.
१२) हळद्,तिखट,तेल वगैरे.

कृती :
१. प्रथम चिकन साफ करून त्याचे तुकडे करून ठेवणे. मग दही, हळद्,आणि थोडा चिकन मसाला घालून मॅरीनेट करावे.
२. मग कुकर मधे शिजवून घ्यावे.
३. मसाल्यासाठी : चिरलेला कांदा बटर मधे किंचित परतून घ्यावा. खोबरं परतून घ्यावं(बटर शिवाय :) )
४. आलं , लसूण, मिरची,कोथिंबीर्,टोमॅटो आणि परतलेला कांदा आणि खोबरं हे सगळं मिक्सर मधून बारीक करून घेणे. पेस्ट करावी..(हवा असल्यास फूड कलर घालणे.)
५. एका मोठया कढईत किंवा पॅन मधे बटर गरम करत ठेवावे. थोडीशी हळद घालून, ही वर केलेली पेस्ट घालावी. थोडं परतलं की त्याला तेल सुटते. (वाटल्यास त्यात परत चिकन मसाला ,काळा मसाला घालावा.)
६. तेल सुटले की शिजवलेले चिकन घालून सगळं एकजिव करणे. ग्रेव्ही जरा घट्ट झाली की वरून बटर घालणे.. की झालं बटर चिकन तैयार!! :)

व्हेज. बिर्याणी :
ही हमखास सुंदर होणारी, आणि लवकर होणारी रेसीपी.. अर्थात हैद्राबादच्या बिर्याणीशी तुलना करू नये. पण चव सुंदर लागते.. !

IMG_0213

जिन्नस :
१) १.५ वाटी तांदूळ.(बासमती )
२) अर्धा फ्लॉवर ,२ मोठी गाजरं आणि मटार(फ्रोझन शक्यतो).
३)परंपरा मसाला
४) कांदा
५) काजू

कृती :
१) १.५ वाटी तांदूळ धुवून राईस कुकर मधे लावून ठेवणे. साधा कुकर सुद्धा चालेल. पण भात मोकळा आणि फडफडीत व्हायला हवा.
२) भात तयार झाला की एका परातीत काढून त्याला तूप लावून मोकळा करून घेणे. भात मोकळा पण होतो. आणि तुपाचा वास मस्त येतो.. नंतर भाताला थोडं मिठ लावून ठेवणे.
३) फ्लॉवर चे छोटे तुरे निवडून घेणे. आणि गाजराचे गोल किंवा त्रिकोणी तुकडे करून घेणे. मोठे गाजर असेल तर त्रिकोणी. आणि छोटं असेल तर साधे गोल.
४) एका भांड्यात पाणी घेऊन त्यात गाजर आणि फ्लॉवर चे तुकडे वाफवून घेणे. (फार नाही, १०-१५ मिनीट्स बास होईल..)
५) एका कढईमधे अगदी थोडंसं तेल घेऊन त्यात ह्या भाज्या व फ्रोझन मटार परतून घेणे. व लगेच परंपरा मसाला त्यात घालणे. (परंपरा चा मसाला आधी हाताने कुस्करून घेणे. त्याची ढेकळं राहीली तर भाताला नीट लागत नाही..)
६) मसाला घातल्यावर जरावेळाने तेल सुटू लागते. त्यात भात घालणे. सगळं नीट मिक्स करून घेणे.
७) १० मिनिटे झाकण ठेवून वाफ येऊ देणे.
८) व्हेज. बिर्याणी तयार!! फक्त यात तुपात तळलेले काजू अवश्य घालणे!! अतिशय सुंदर लागतात. शिवाय कांद्याच्या रिंग्स सुद्धा तळून घालता येतील. पण त्यासाठी कांदा चिरून २ दिवस उन्हात वाळवत ठेवावा. व मग तुपात परतावा. असा कुरकुरीत तळलेला कांदा , आणि तळलेले काजू या बिर्याणीवर घालून दिले तर कधी विसरणार नाही चव! :)

अशी ही बिर्याणी, बटर चिकन, गरमगरम मऊसूत पोळ्या आणि सॅलड एका छान डिश मधे सजवून द्या, आणि विकेंड एन्जॉय करा !!

IMG_0214

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 May 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

वा भाग्यश्री!

मिपाच्या रसोईघरात तुझं स्वागत आहे! आधीच मिपाच्या आयाबहिणींनी आणि पेठकर साहेबांनी निरनिराळ्या पाकृ देऊन मिपाच्या रसोईची चूल सतत पेटती ठेवली आहे, घमघमती ठेवली आहे. या मंडळीत आता तुझीही भर पडली याचा खूप आनंद वाटला! :)

दोन्ही पाकृ आणि त्यांचे फोटू सुरेखच! अजूनही अश्याच उत्तमोतम पाकृ मिपावर येऊ देत, ही तुला विनंती!

अशी ही बिर्याणी, बटर चिकन, गरमगरम मऊसूत पोळ्या आणि सॅलड एका छान डिश मधे सजवून द्या, आणि विकेंड एन्जॉय करा !!

मुखपृष्ठावर या पाकृंचा फोटू झळकवून मिपानेही विकेन्ड नव्हे, तरी आठवड्याची सुरवात एन्जॉय केली आहे... :)

तात्या.

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 8:09 pm | रंगीला रतन

+१

शितल's picture

6 May 2008 - 12:56 am | शितल

तुझी रेसेपी छान, आणि पदार्थ ही छान दिसत आहेत, करुन बघायला हवेत.
पण पर॑परा मसाला हा कसा असतो, म्हणजे, बिर्याणी मसाल्या सारखा का ? आणि व्हेज. बिर्याणीत मिरची, आले, लसुण,कोथ्॑बीर याची पेस्ट लागत नाही का ?

ईश्वरी's picture

6 May 2008 - 1:31 am | ईश्वरी

बघूनच तोन्डाला पाणी सुटले.

: पण पर॑परा मसाला हा कसा असतो

परम्परा हा तयार ओला मसाला आहे . US मधे असल्यास तुम्हाला भारतीय ग्रोसरी स्टोअर मधे मिळेल. वेगवेगळ्या डिशेस प्रमाणे हे मसाले मिळतात . उदा. चिकन बटर मसाला, चिकन तन्दूर , व्हेज कोल्हपुरी, तवा फ्राय वगैरे. व्हेज व नॉन्-व्हेज दोन्ही डिशेस साठी वेगवेगळे मसाले मिळतात . हा मसाला म्हणजे थोड्क्यात तयार वाटण असते. (कान्दा , आले , लसूण व इतर गरम मसाले यान्चे.)
--ईश्वरी

भाग्यश्री's picture

6 May 2008 - 1:34 am | भाग्यश्री

बरोबर आहे ईश्वरीचे.. तयार मसाला आहे. त्यामुळेच पटकन होते बिर्याणी..
धन्यवाद सगळ्याना..

वामन देशमुख's picture

23 Oct 2023 - 8:20 pm | वामन देशमुख

जिन्नस :
१) ५०० ते ७०० ग्रॅम हलाल चिकन.

झटका चिकन किंवा सेक्यूलर चिकन घेतले तर चालेल का?

---

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 8:26 pm | रंगीला रतन

झटका चिकन नी जास्ती मजा येईल :=))

वामन देशमुख's picture

23 Oct 2023 - 8:55 pm | वामन देशमुख

झटका चिकन नी जास्ती मजा येईल :=))

माझाही हाच अनुभव आहे. झटक्याची मजा बाकी कशात नाही, मग चिकन असो की बोकड असो की रानडुक्कर!

---

मिपाकर्स, नेक्स्ट टाइम नक्की झटका चिकन / झटका मटण मागा आणि चविष्ट खाद्य अनुभवा!

रंगीला रतन's picture

23 Oct 2023 - 9:07 pm | रंगीला रतन

मला माझी पोरं पुतणे पुतणी अरुण कसाई म्हणुन बोलवतात :=))
कोंबडा असो का बकरा मी झटका श्टाईलने कापतो. हलाल मधे मज्जा नाही शेठ.