रिपोर्ट (कथा - पात्रे व प्रसंग काल्पनिक)

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
7 Sep 2023 - 1:35 pm

रिपोर्ट

दीपक पळत पळत एकत्र जमायच्या ठिकाणी आला. वर्गातली मुलं वाट पाहतच होती. आणखी एक दोघं बाकी होती. ते आल्यावर सगळे बसमधे बसले. सरांनी मोजणी केली. दहाच्या दहा हजर होते. केशरी सूर्य हळहळू वर सरकू लागला व बसही वेगाने धावू लागली.
भेंड्या खेळताना प्रवास लवकर संपला. बस वाडीच्या आधी असलेल्या गावाशी पोचली. सरांनी आधीच गावातल्या लॉजचं बुकिंग केलं होतं. उतरल्या उतरल्या सगळ्यांनी चहा घेतला आणि आपापल्या खोल्यांमधे जाऊन बॅगा टाकल्या. दीपक, शेख, हरवंदे, गोखले यांचं सूत जास्त जमलेलं होतं. सगळे लॉजमधून बाहेर आले व सरांच्या पुढच्या सूचनेची वाट पाहू लागले. दुसरा ग्रुपही आपापल्या गप्पांमधे दंग होता. सर तयार होऊन आले.
"मित्रहो, टूरचा सगळा प्रोग्राम तुम्हाला माहीत आहे. थोडं ब्रीफ करतो. घरवाडी आतापर्यंत तशी दुर्लक्षित राहिलेली आहे म्हणून आपण या वाडीची निवड केली आहे. तीन दिवस सगळ्यांनी लॉजवरून निघून दिवसभर वाडीवर जायचं आहे. नेमून दिलेल्या बीटवर काम करायचं आहे. संध्याकाळी सहाच्या आत कुठल्याही परिस्थितीत लॉजवर परतणं बंधनकारक आहे. स्वेटर, पाणी, टोपी स्वतःजवळ ठेवा. चौथ्या दिवशी आपलं प्रस्थान असेल. घरी परतल्यावर सगळा रिपोर्ट लिहायचा व सबमिट करायचा आहे. महत्त्वाचं म्हणजे प्रिंट फाईल्स घेतल्या जाणार नाहीत. मेल करायच्या आहेत.
...होप एव्हरीथिंग क्लिअर."
एक दोघांनी काही प्रश्न विचारले. शंकांचं निरसन झाल्यावर सगळे निघाले. दोन गटांना दोन बीटस दिल्या होत्या. दीपकच्या ग्रुपला प्राथमिक सुविधा विषय दिला होता. दुसऱ्या ग्रुप प्राथमिक शिक्षण हा विषय दिला होता. दीपकचा ग्रुप निघाला. त्यांनी आपल्याबरोबर आणखी एकाला घेतलं. दीपकने पाण्याबाबत सरपंचाशी बोलायचं ठरवलं. शेखने वीज विषय घेतला. हरवंदे, गोखले व पाचव्या मेंबरने गावातल्या रस्त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचं ठरवलं.
दीपक सरपंचांच्या घरी पोचला. सरपंच येतील पाच मिनिटात, असा निरोप घेऊन दीपक पंधरा मिनिटं ओसरीवर बसला. काही वेळानं मोठं कुंकू लावलेली बाई आली.
"बोला."
"वाडीतल्या पाणी प्रश्नाविषयी तुमच्याशी बोलायचंय."
"आता काय सांगायचं, स्वातंत्र्य मिळून इतकी वरसं..."
दीपकने बाईंना वेळीच थांबवलं. नेमके प्रश्न विचारले. बोलणं सुरु असताना दुसरी एक बाई आली. तिला खोकल्याची उबळ येत होती. सरपंचांनी तिच्याशी बोलायला सुरुवात केली. बोलण्यात मधे उसंत मिळाली म्हणून दीपकने रिपोर्ट कसा लिहायचा याची जुळवाजुळव मनातल्या मनात केली. करत असताना त्या दोघींच्या संभाषणाकडे त्याचं लक्ष जात होतं. दूषित पाण्यामुळे तिला व तिच्या कुटुंबाला त्रास भोगावा लागतोय असं दीपकचं आकलन झालं. प्राथमिक आरोग्य केंद्र हा शब्द त्या दोघींच्या बोलण्यात सारखा येत होता.
ती बाई गेली. सरपंचांशी बोलणं आटोपतं घेऊन पटकन त्या बाईला गाठायचं, असं दीपकनं ठरवलं.
"आता मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो. एवढा मोठा पाणीप्रश्न असताना तुम्ही सरपंच म्हणून काही करत का घेत नाही ? "
"सगळं साहेबच बघतात. मी फक्त सही करते."

दीपक लगोलग घराबाहेर पडला. त्या बाईचा माग काढला. घरी दोन मुलं खेळत होती. तिनं डोळ्यांत पाणी आणून सांगितलं की, इथून सात आठ मैलांवर तळं आहे. तिथून पाणी आणायच्या योजना राबवणार, राबवणार असं सारखं कानावर येतं. सरपंचांचा नवरा यात सगळीकडं असतो पण तो कधीही काही करताना दिसत नाही.
दीपकनं आणखी काही प्रश्न तिला विचारले. बाई बोलत असताना दोन चार आया बाया जमल्या. त्यांनी काहीबाही सांगितलं. एक पुरुषही आला. कशाला करताय हे सगळं, असा भाव त्याच्या चेहऱ्यावर होता. दीपकनं तो ओळखून आपला निरोपाचा भाग बोलायला घेतला.
"तुमच्या गावातले प्रश्न मांडण्यासाठी आम्ही आलो आहोत. एकदा ते मांडले गेले की, सुटायला मदत होईल. बरीच माहिती गोळा केली आहे आम्ही. काळजी करू नका."
तिथून निघाल्यावर दीपकनं तिथल्या काही विहिरी, पाईपलाईन्सची माहिती खेळणाऱ्या पोरासोरांना गाठून विचारली. मधे एक ग्रामसेवक भेटला. त्यानं माहितीत भर टाकली. तो तिथल्या सरपंच आणि मंडळींविषयी अंमळ जपूनच बोलला. अशी माहिती देणं त्याच्या रुटीनचा भाग होता, असं दीपकला वाटलं. ग्रामसेवकाला इन्स्टिट्यूटची माहिती होती. परतताना वाडीबाहेरच्या पान टपरी कम चहा टपरी दुकानापाशी दीपक थांबला. दुकानदारानं विचारलं, "रिपोर्ट लिव्हताय ?" "हो", असं तुटक उत्तर दीपकनं दिलं.
दीपक लॉजवर अस्वस्थ अवस्थेतच परतला. उरलेल्या चौघांनीही आपापल्या विषयातला मजकूर आणला होता. त्यांनी बरंच काही सांगितलं. ग्रुपच्या गप्पा रंगल्या. प्रत्येकाने दिलेल्या बीटवरचे बरे वाईट अनुभव सांगितले. सुधारणा होतील, अशा जागा प्रत्येकाने हेरून रिपोर्टमधे मांडल्या होत्या.
"आपण सरांना सांगून पेपरमधे छापायला लावू." दीपक म्हणाला.
"अरे, ही स्टडी टूर आहे. जणू तुला माहीतच नाही." गोखले म्हणाला.
"नया है यह. रिपोर्ट करून देणं हा टूरचा भाग आहे. अभ्यासाचा भाग आहे. रिपोर्टची बातमी होणार नाही. तरी, विचार पाहिजे असेल तर." शेख हसून म्हणाला.
"अरे पण, गावातले प्रश्न किती मोठे आहेत कळलं ना आपल्याला. दुसऱ्या ग्रुपच्या त्या सुयोग कडून मला तिसरी चौथीचे प्रॉब्लेम कळले. एका वर्गात तर फळाच नाहीये. हे सगळं आपण मांडायला पाहिजे. रिपोर्ट असला तरी त्याची बातमी करता येऊ शकते." दीपक म्हणाला.
हरवंदे म्हणाला, " तुला फारच उत्साह आहे. अरे, आपण सध्या फक्त विद्यार्थी आहोत. आपल्या कोर्सचा भाग म्हणून आपण फील्ड व्हिजिट करतोय. खरी पत्रकारिता सुरु होईल ती जेव्हा आपण ट्रेनी म्हणून जॉईन होऊ कुठेतरी तेव्हा. कोर्स संपताच आपण कुठेतरी लागूच. जिथे तू जॉईन होशील तिथे छापून आण. आमचेही इनपुटस टाक त्याच्यात."
"जॉईन व्हायची कशाला वाट पाहायची ? अरे, वाडीची किती भीषण अवस्था आहे ! तुम्हाला नाही वाटत का लगेच बातमी व्हावी ? प्रत्येकवेळी टूरपुरता रिपोर्ट बनवून द्यायला पाहिजे, असा नियम आहे का ? शिकता शिकताच आपल्या एखाद्या नव्या रिपोर्टची बातमी होऊन समाजात नक्कीच बदल होऊ शकतो. विचारतोच सरांना. आपल्या रिपोर्टमुळे घरवाडीचा नाही विकास झाला तर बघ. ‘लोकनेता’ चा सुर्वे आपल्या सरांच्या ओळखीचा आहे. आपल्या इथूनच तर बाहेर पडलाय. तिथेच छापून आणू." दीपकनं स्वतःचा फायनल मनसुबा जाहीर केला.

चौथ्या दिवशी सकाळी बस परतीच्या वाटेला लागली. पुन्हा भेंड्या सुरु झाल्या. दोन्ही गटांनी यावेळी ड्रायव्हरला सामील करून घेतलं होतं. ज्या गटाला गाणं सुचणार नाही, त्या गटाला ड्रायव्हरने गाणं सांगण्याची परवानगी घेण्यात आली. दुपारच्या जेवणापर्यंत बस इन्स्टिट्यूटपाशी पोचली.सगळ्यांनी एकत्र जेवण घेतलं. ‘भेटूच दोन दिवसांनी’ सांगून सगळ्यांनी एकमेकांना बाय बाय केलं आणि घरचा रस्ता धरला. फील्ड वर्कवरून आल्यावर दोन दिवस सुटी देण्यात आली होती. दिवसभर आराम करून दीपकनं रात्री त्याच्या ग्रुपचं एकत्रित टाईपिंग करायला घेतलं. वीज, रस्ते, पाणी असा एकत्रित रिपोर्ट बनवताना दीपकला फार समाधान वाटत होतं. दुसरा ग्रुप शैक्षणिक क्षेत्राचा स्वतंत्रपणे रिपोर्ट देणार होता. दोन दिवसांनी पूर्ण टायपिंग झालं. सरांच्या सह्या झाल्या. बाडाचं देखणं बाईंडिंगही झालं. .
पुढच्या आठवड्यातलं लेक्चर संपल्यावर दीपक ग्रंथालयात गेला. सांस्कृतिक, राजकीय असे विषय मागे टाकत टाकत तो समाज या विषयापाशी आला. एक रिपोर्ट हाती लागला. नाव वाचलं आणि तो चमकलाच.
घरवाडी – एक अभ्यास,
पदवी, डिपार्टमेंट ऑफ जर्नालिझम, भोसले-इनामदार कॉलेज, पुणे.
विद्यार्थी – प्रकाश घाडीगावकर.

दीपकनं पटकन एक पान उलटून अनुक्रमणिका पाहिली. ती त्यानं तयार केलेल्या अनुक्रमणिकेसारखीच होती.
प्रकरण एक – घरवाडी इतिहास,
प्रकरण दोन – शिक्षण,
प्रकरण तीन – मूलभूत प्रश्न.
प्रकरण चार...

दीपकनं सहज शेवटचं पान उघडलं. शेवटचा 'निष्कर्ष' हा उतारा वाचला. उताऱ्यातलं शेवटचं वाक्य अगदी दीपकच्या रिपोर्टमधे लिहिलेल्या वाक्यासारखंच होतं - राजकीय इच्छाशक्ती असेल तर घरवाडीचा विकास सहज होऊ शकतो.
दीपकनं कव्हरवरचं वर्ष पाहिलं.
तारीख दहा वर्षांपूर्वीची होती.

(समाप्त)

जीवनमानप्रतिभा

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

7 Sep 2023 - 3:23 pm | विजुभाऊ

अशी अनेक गावे आहेत. पण त्यांचे प्रमाण कमी होते आहे.
पण बर्‍याच गावांत सरपंच म्हणून तरुण पिढी येते. ती शिकलेली असते.
गावातली तरुण पिढी देखील शिकून शहरात कामाला जाते. तेथून जागरुकता सोबत घेऊन येते.
गावाचा विकास होत आहे. सगळेच काही इतके नकारात्मक नाहिय्ये.

केदार पाटणकर's picture

7 Sep 2023 - 4:03 pm | केदार पाटणकर

ही काल्पनिक कथा आहे, हे नमूद आहे. अशा गावांचे प्रमाण कमी होत आहे, हे बरोबर.

छान विषय व कथा .शेवट अतिसामान्य.