ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

स्मिता दत्ता's picture
स्मिता दत्ता in जनातलं, मनातलं
21 Aug 2023 - 9:00 pm

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. एक तर महाराष्ट्राचं टोक असलेला चंद्रपूर जिल्हा पहावा असं मनात होतच त्याचबरोबर ते जंगल, तिथले जनजीवन सारं पाहयाची इच्छा होती त्यामुळे जेव्हा माझी मैत्रीण विनयाने ताडोबा च्या सफारीचं आयोजन संदीप आणि रसिका करतायेत तू येणार का विचारल्यावर लगेच नाव दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली आणि नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी साडेपाचची ट्रेन सकाळी नऊच्या दरम्यान नागपूरला पोचणार होती आणि तिथून दोन तीन तासाचा ताडोबाचा रस्ता. ट्रेन साडेपाच वाजता पुण्याहून निघाली. ३ एसीचा डबा अगदी छान होता. सोय आणि स्वच्छता बेडिंग सगळे मस्त होतं. त्यामुळे प्रवास अगदी छान झाला. सकाळी साडेनऊला गाडी नागपूरला पोहोचली तिथून मिनी बस ने ताडोबाला जायचे होते. पण तत्पूर्वी तिथल्याच एका फेमस अशा स्नॅक्स सेंटरला आमच्या टूर ऑपरेटरने गाडी नेली. मस्त पोहे आणि त्यावर चिवडा किंवा पोहे आणि हरभऱ्याची तर्री असा नाश्ता होता. बाकी कचोरी, समोसा, चाट असे खूप सारे प्रकार तिथे होते. पोह्यावर पण वेगवेगळी कॉम्बिनेशन्स होती. सगळे उभारून मस्त ताव मारत होते. प्रचंड गर्दी होती म्हणजे तिथला तो अतिशय लोकप्रिय असा स्टॉल असणार हे नक्की आणि गंमत म्हणजे जरा बाजूला एका टेबलवरती कांदे आणि चाकू ठेवलेले होते. तीन चार टेबलावरती चाकू आणि एका बुट्टीत भरून कांदे! ज्याला हवा त्याने कांदा कापून आपल्या डिशमध्ये घालून घ्यायचा. तिथे पण गर्दी! कांद्याच्या टरफलांचा ढीग लागलेला, एकेका ठिकाणची एक एक खासीयत असते हे खरंच. तिथली जिलबी पण फार सुंदर होती. आम्ही चहा कॉफी वगैरे घेऊन निघालो. एव्हाना ११ वाजलेले. गाडीला थोडा उशीर झाल्याने घाई करावी लागणार होती.
गाडी आता हम रस्त्याला लागली. हैदराबाद हायवेला, रस्ता मस्त होता. दूरवर नुसती झुडपं दिसत होती. क्वचित कपाशीची शेती दिसत होती, बाकी फार काही शेती नाहीच. तशीच सकाळी ट्रेनमधून येताना पण हेच दृश्य होतं. दूरवर बहुतेक सपाट जमीन, तुरळक झाडी आणि क्वचित कपाशीची व हरभऱ्याची शेतं, गावं फार थोडी लागली रस्त्याने, फार गाड्यांची वर्दळही नव्हती. थोड्यावेळाने हायवे सोडून गाडी आतल्या रस्त्याला लागली. एका ठिकाणी आनंदबन 17 किलोमीटर असा बोर्ड दिसला, इतक्या जवळ आहे आनंदवन!! असं वाटलं बाकी वरोरा, चंद्रपूर इत्यादीचे बोर्ड होतेच. आम्ही आता चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केलेला. बहुश: आदिवासी प्रांत.
पांढरे दगड छोट्या टेकड्या त्यावर तशीच झुडपी जंगलं, अगदी बसकी दगडी पत्र्यांची घरं, कसे राहत असतील लोक इतके छोट्या घरात असं वाटलं. घरांना ताट्या लावून कंपाऊंड केलेल्या. दारात कोंबड्या, शेळ्या, गाई, म्हशी, बैल इत्यादी दिसत होते. कुठे बायका ओसरीवर निवांत बसलेल्या, कुठे घोळक्याने. बहुतेक नऊवारी साडी नेसलेल्या दिसल्या बायका. अगदी साधी घरं, माणसं. गावात क्वचित एखादी जीप. छोटी, खोपटी दुकानं वगैरे असं सारं. बाकी जर एखादं मोठं गाव लागलं तर तिथे भांड्याची, खताची कापडाची इ. दुकानं दिसत होती.
छोट्या छोट्या गावातून गाडी जात होती. आता रस्तेही छोटे झालेले. जंगलाचा मागमूस अजूनही दिसत नव्हता. खुरटी जंगलंच दिसत होती मग कसं असेल ताडोबा असं वाटत होतं. आता पहिलं गेट लागलं त्यातून आम्ही आत प्रवेश केला. हा बफर झोन चालू झाला. साधारण पंधरा-वीस किलोमीटरवर ताडोबचं मेन गेट. आम्ही मोहरली गावात प्रवेश केला. लांबूनच गावातल्या तीन-चार मजली इमारती दिसल्या. इतक्या वेळाने याच गावात अशा बिल्डिंग होत्या, त्याही पर्यटकांसाठी. आम्ही साधारण दोन वाजेपर्यंत हॉटेलला पोहोचलो लगेच जेवण करून सफारीला निघायचं होतं. अंमळ उशीरच झालेला, पटापट जेवण करून जिप्सी मध्ये बसलो. आत मध्ये मोबाईल अलाऊड नाहीत त्यामुळे ते घेतलेच नाहीत. फक्त पाणी आणि गॉगल्स, कॅप हेच इत्यादी सामान घेऊन निघालो. उन्हाची वेळ असल्याने थोडी गर्मी होती.
प्रवेशद्वारावर आयडी चेक करून गाडी आत सोडली जाते. आता मात्र दाट जंगलात प्रवेश केला आम्ही. अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं हे ताडोबाचं अभयारण्य तयार केलं आहे, हो तयार केले आहे, मध्ये दहा-बारा फुटाचे डांबरी रस्ते त्याच्या दोन्ही बाजूला बफर झोन, साधारण पंधरा-वीस फुटांचे असावेत मग जंगल सुरू होतं. या बफर झोन मधला पालापाचोळा इत्यादी फेब्रुवारीत गोळा करून व्यवस्थित जाळून टाकला जातो जेणेकरून चुकून कुठेही आग लागली तर ती दुसऱ्या ठिकाणी पसरणार नाही आणि मर्यादित ठिकाणीच राहील याची काळजी घेतली जाते. इथे बहुतेक बांबूची झाडं होती, क्वचित सागवान, जांभूळ आणि बाकीची झाड झुडपं दिसत होती. सपाट असं हे जंगल. पक्षांचे आवाज सतत ऐकू येत होते. मध्येच एखादा सांबर समोर येऊन रोखून पाहत होता आणि झुडपात गायब होत होता. त्याची दृष्टी कमी असते म्हणे, त्याला लवकर दिसत नाही त्यामुळे आणि तो वाघाची सहज शिकार होतो, असं आमचा गाईड आम्हाला सांगत होता. हे गाईड आणि ड्राइवर लोक अतिशय हळू बोलत होते त्यामुळं नीट लक्ष देऊन ऐकावं लागत होतं. एकतर भाषेचा लहेजा थोडा वेगळा आहे, आणि ते थोडं भरभर पण बोलतात. आम्हाला हि अतिशय हळू आवाजातच बोलायला सांगितलेलं त्यांनी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प असं या अभ्यारण्याचं नाव. ताडोबा हे गावाचं नाव आणि अंधारी ही नदी पलीकडून वाहते म्हणून तिचं नाव असं ताडोबा अंधारी!! अशी खूप सारी माहिती हे गाईड लोक देत असतात.
जंगलात सुंदर वास पसरलेला कुठल्या तरी फुलांचा. मध्येच एखादा कोंबडा उडताना दिसत होता. सुंदर करडा लाल रंगाचा पिसारा, रंगबिरंगी करडे ठिपके असेलेले शरीर आणि तुरा. हरणाचा कळप झुडपात चरत बसलेला दिसला. सुंदर गोंडस असं एक हरीण आम्हाला पहात होतं. त्याचे ते निरागस डोळे इतके सुंदर होते की पटकन कवेत घ्यावा त्याला. सीतेला हरणाची उगाच भुरळ पडली नसेल, असं उगाचच वाटलं. अधून मधून मुद्दाम तयार केलेले पानवठे, त्याला सोलरची जोड देऊन पाण्याची केलेली व्यवस्था दिसत होतं. रस्त्याच्या कडेला जाणून-बुजून अशी कृत्रिम तळी तयार करून ठेवली आहेत. सोलरच्या मोटारी बसवून पाण्याची व्यवस्था केली आहे जेणेकरून नैसर्गिक पाण्याचे आटले की प्राणी इथे पाण्या करता येतात आणि सहजच नजरेस पडतात मधून मधून रानगवे दिसत होते. नैसर्गिक तलावाच्या बाजूला दलदलीत खूप सारे पक्षी दिसत होते. एखादा भारद्वाज उडताना दिसत होता. झाडावरच्या खोबणीत बसलेलो घुबड खरंच सुंदर दिसत होतं. एरवी घुबड म्हणजे अशुभ वगैरे समजतो आपण. तलावाच्या काठावर वाढलेल्या झाडाच्या टोकाला सर्प गरुड बसलेला दुर्बिणीतून पाहिल्यावर त्याची बागदार पिवळी चोच अगदी व्यवस्थित दिसली.
येणाऱ्या जाणाऱ्या गाडीतले गाईड ड्रायव्हर कुठे वाघ दिसला का ते एकमेकाला विचारत होते. कुणीतरी सांगितलं की पाणी प्यायला थोड्या वरती गेलाय पण अजून परतला नाही. मग एके ठिकाणी जिथे त्याची दिसायची शक्यता होती तिथे मग सगळ्या गाड्या त्याची वाट पाहत उभ्या होत्या. या भागात पांढरा दगड दिसत होता आणि थोडा टेकडीवजा भाग होता. एरवी ताडोबा तसं सपाटच आहे. जंगल पण जरा विरळच होतं. आम्ही पण तिथे थोडावेळ थांबून पुन्हा निघालो पाच वाजत आले होते. ताडोबा तलावाच्या बाजूला पुढे ताडोबाचे मंदिर पण आहे. या तलावात काही मगरी दिसल्या त्या मंदिराच्या बाजूने मग वन आम्ही वर वनविभागाचा विश्रामगृह आहे आणि तिथे टॉयलेट्स पण आहेत, तिथे गेलो. आत हॉलमध्ये बसायला बाकडी टेबल अशी व्यवस्था केली आहे. इथे तुम्ही बसून खाऊ घेऊ शकता बाकी जंगलात कुठेही गाडीतून खाली उतरायला व इतर विधी करायला पूर्ण मज्जाव आहे.
इथे उंच झाडावर माकड बसलेली दिसली आजूबाजूला पण फिरत होती पण आपल्याजवळ येत नव्हती. इतर ठिकाणी त्यांना खायला देऊन माणूस त्यांची सवय त्यांना करून देतो मग ती आपल्या अंगावर येतात हातातल्या वस्तू पळवतात, प्रसंगी जखमी करतात. पण इथे हा प्रकार अजिबात नाही. ती त्यांच्या विश्वात असतात तिथून आम्ही परत वाघाच्या शोधात निघालो. खड्ड्यात एक नाला होता त्याच्या बाजूने थोडं वरुन आमची जीप निघाली आणि तेवढ्यात आमच्या गाईडची नजर त्या नाल्यात गेली वाघ दिसतोय. आम्ही थरारलो, गाडी रिव्हर्स मध्ये घेतली आणि खरंच वाघ त्या पाण्यातून बाहेर निघत होता. आमची जीप तशीच मागे घेऊन जरा पुढच्या बाजूला येऊन आम्ही उभी केली. आमच्या समोर अजून तीन-चार गाड्या लागल्या होत्या. मागे एक दोन गाड्या लागल्या. पाण्यातून चालत शांतपणे दोन जीपच्या मधून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला वाघ आला. त्याच्या मागचा भाग काळ्या चिखला न पूर्ण माखलेला. तो एका झाडापाशी थांबला तिथे त्या बुंध्यावरती खरा खरा करत मार्किंग केलं. वरच्या वेली त्याने खाली आल्या. मूत्र विसर्जनही करून मार्किंग केले. तो आत निघून गेला. फार फार तर दीड ते दोन मिनिटांचा हा सारा खेळ. आम्ही श्वास रोखून त्याच्याकडे पाहत होतो. दहा-पंधरा फुटांवर तो होता. मनात एक क्षणभर विचारा आला या क्षणी जर त्याचं डोकं फिरलं आणि तो अंगावर आला तर !! पण तसं होत नाही, जोवर माणूस त्याच्या वाट्याला जात नाही तोवर तो काहीच करत नाही आणि गाडीवर सहसा हल्ला करत नाही.
पण पंधरा-वीस दिवसा खाली वाघ असाच रस्त्यात थांबलेला म्हणे आणि फॉरेस्ट ची काही लोक त्यात एक बाई पण होती हा बराच वेळ थांबलेला पाहून गाडीतून खाली उतरून दुसऱ्या बाजूला जायला निघाले वाघाने हल्ला केला आणि मारून टाकला तिला. भयानक आहे हे. माणसाला पण घाई काय असते! असो.
आमची सफारी सफल संपूर्ण झाली. पहिल्याच दिवशी पहिल्याच सफारीत आम्हाला व्याघ्र दर्शन झालेलं त्यामुळे धन्य झालो. ज्यासाठी केला होता अट्टाहास असं वाटलं. आता आम्ही परत फिरलो. येताना दिसणारे बाकीचे प्राणी पक्षी आता आम्हाला साद घालत नव्हते. वाघ डोळ्यासमोरून हटत नव्हता. हॉटेलवर आलो. ६-६. ३० झाले होते. आम्हाला परत लगेच रात्र सफारीला जायचं होतं. हॉटेल वर येऊन पटापट कपडे बदलले, थोडे गरम कपडे घेऊन बाकीचं सामान ठेवले. फक्त पाण्याची बाटली घेऊन निघायचं होतं. चहा घेऊन लगेच निघालो. आता अंधार पडला होता. आम्ही आता दुसऱ्या बाजूने मोहर्ली गेट कडून देवाडा गेटकडे जाणार होतो.
आयडी कार्डचे सोपस्कार करून आम्ही निघालो. एक वीस-बावीस वर्षांची छोट्या चणीची मुलगी गाईड होती आमची आणि सोबत ड्रायव्हर. दुसऱ्या पण गाडीत मुलगीच गाईड होती. बरं वाटलं इथे इतक्या दुर्गम भागात मुलींना हे काम करण्याची संधी मिळते हेच किती छान आहे. मुली धीट झाल्यात. थोड्याच अंतरावर उजव्या बाजूला इरई धरणाचे पाणी दिसत होतं, त्यावर खूप सारे काजवे झाडांवर उडत होते. पाण्यात काही आवाज येत होते. एक घुबड पण उडून गेलं पण नीट दिसलं नाही. रातकिड्यांचे आवाज येत होते. गर्द रानातून चाललेलो गाडी थांबवून काहीतरी बघत होते ते मग थोड्या वेळाने पुन्हा निघालो पण आता आमची जीप सुरू होईना. ड्रायव्हरने दोन चार वेळा प्रयत्न करून बघितला. मग मोबाईल वरून दुसरी गाडी मागवली. पण एवढ्यात परत एकदा ट्राय केल्यावर गाडी सुरू झाली.
त्या गर्द रानातून जाताना भीती वाटत होती. पण तितकी नाही. गाइड काहीतरी माहिती देत होती. रात्री वाघ शिकारीला बाहेर पडतो तर दिसायची शक्यता असते वगैरे. पण तशी ती शक्यता फारच कमी होती म्हणा. वर वटवाघुळ उडत होते. पौर्णिमा जवळ आल्याने चंद्राचा चांगला प्रकाश पडलेला, अन्यथा किर्र्रर्र अंधारात जावं लागलं असतं जे फारच भीतीदायक असतं. मधूनच एक रानससा उड्या मारत पसार झाला. बाकी रात्र पक्षांचे वेगवेगळे आवाज तेवढे येत होते.
ड्रायव्हर गाडी मध्येच थांबवत होता. बघत होता कुठे काही दिसतय का. २-३ दिवसापूर्वीपर्यंत टॉर्च मारून लोकांना प्राणी पक्षी दाखवता येत असत पण आता नवीन रुल लागू केलेत त्यामुळे ते सारं बंद झालाय म्हणाली. त्यामुळं सध्या डोळ्यांना जे दिसेल तेच बघता येणार होतं. खरंतर तेच योग्य आहे रात्रीच्या वेळी आपण वन्य प्राण्यांना असं डिस्टर्ब करणं उचित नाहीच. मध्ये एक जंगलातले रिसॉर्ट लागले. वनविभागानेच बनवले आहे ते, इथे फक्त राहायची सोय आहे. खायला काहीही मिळत नाही. त्यासाठी मोहरलीला जावं लागतं म्हणाला. अति उत्साही आणि धाडसी लोकांसाठी हे छानच आहे म्हणा. कारण अशा गर्द रानात राहायला धाडसच हवं.
पुढे त्यांचं एक चेक पोस्ट पण होतं. मधूनच एका बाईकवर दोन माणसं पास झाली. ही इथल्या गावात राहणारी माणसं, जंगलात अजूनही दोन-तीन गाव आहेत जिथे माणसं राहतात. त्यांना सतत वन्य प्राण्यांचा सामना करावा लागतो. त्यांची गुर व जनावर वाघ ओढून घेऊन जातो. क्वचित माणसांवरही हल्ला होतो. गेल्याच महिन्यात एका माणसाला वाघाने मारलं म्हणे. गाडी थांबत थांबत जात होती बघण्यासारखं खरं तर काहीच नव्हतं, पण रात्रीचे जंगला अनुभवायला मिळत होतं. एरवी आपण अशा घनदाट जंगलात रात्रीच्या वेळी अशा उघड्या जीपमधून प्रवासाची कल्पनाही करू शकणार नाही. त्यात पुन्हा असं मध्येच दहा पंधरा वीस मिनिटे थांबायचं नुसतच गाडीत म्हणजे तर असूनच कठीण. गाडी वेगवेगळ्या रस्त्यांनी तो घेत होता. शेवटी आडगाव गेटला आलो इथे अजून काही गाड्या थांबलेल्या. आमच्याबरोबर एका गाडीला रानात अस्वल दिसलं पण आम्हाला काही दिसलं नाही. रस्त्याच्या पल्याड अगरझरी गेट होतं. मध्ये राज्य महामार्ग आहे जो पुढे चंद्रपूरला जातो. हा सगळा बफर झोन. उद्या दुपारची सफारी अगरजरीची होती. इथे बराच वेळ थांबलो. निघालो तर पुन्हा गाडी पुन्हा बंद पडली. धक्का मारूनही सुरू होईना.
तेवढ्यात तिकडे RFO आले त्यांनी विचारलं काही दिसलं का ते, दोन-चार दिवसांखालीच बॅटरी बंद केली आहे रात्रीची, जंगलात अन्यथा रात्री बॅटरीच्याच झोतात काही दाखवायचं दाखवता येत असतं तुम्हाला, पण नवीन गाईडलाईन आली आहे त्यामुळे आता ते सगळेच बंद झाले म्हणाले. बराच वेळ गप्पा मारत बसले. आमची गाडी बंद पडल्याचं सांगितलं. त्यांनी दुसरी गाडी बोलावली का ते विचारलं. ड्रायव्हरने हो सांगितलं. आमची गाडी काही वेळातच आली.
आता आम्ही परत निघालो. येताना दोन तास फिरत आलो होतो जंगलातून. परतताना मात्र दहा मिनिटात आलो हॉटेलला. हवा चांगलीच गार होती रस्त्याने पण आणि जंगलातही. त्यात ओपन जीपमध्ये जास्तच थंडी लागते. हॉटेलवर आल्यावर मस्त जेवण केलं. रात्रीचे दहा वाजून गेले होते. उद्या सकाळी पुन्हा साडेपाच वाजता तयार होऊन सफारीला जायचं होतं. मग रात्री आंघोळ करून आम्ही झोपून गेलो. पहाटे पाचला उठून तयार झालो. मी तर कपड्याचे तीन लेयर चढवले वर थंडीचा स्कार्फ लावला. पाण्याची बाटली आणि थोडा नाश्ता असं सोबत घेऊन निघालो.
लगेचच एक हरीण दिसलं. बाकी अधून मधून चितळ सांबार दिसत होते. इतक्यात समोरून एक बिबट्या आडवा गेला. बिबट्या सहसा दिसत नाही पण आम्हाला दिसला. आता जरा उजाडलं. थंडी मात्र खूपच होती. सूर्योदयाकडे थंडी जरा जास्तच वाढते. उघड्या जीपमध्ये भणाणणारं वारं लागत होतं. बाजूच्या जंगलात कोंबडा आरवत होता. मध्येच एक लांडोर मोराचा थवा दृष्टीस पडला. गाडी वेगवेगळ्या वाटेने फिरत होती. एक मुख्य रस्ता आणि त्याला खूप सारे रस्ते फुटत होते. मध्येच एखाद्या चौकात दिशार्शक बोर्ड दिसले, त्यावर चार वाटांना चार नावं होती. ताडोबा, मोहर्ली हे एका रस्त्याचं नाव दुसऱ्याला कोळसा आणि पंढरपौनी. हि सारी गावं इथे या जंगलात 55 पूर्वी वसत होती. त्यांनतर हे अभयारण्य जाहीर झाल्यावर त्या लोकांचं पुनर्वसन केले गेले. पण त्या त्या ठिकाणांना ती ती नाव अजून आहेत. कोळसा गावाकडे गेल्यावर एक छोटा तलाव दिसे, तसंच पंढरपौनी हे गवताळ रान आहे. काही काही ठिकाणी क्वचित काही घरांची जोती दिसतात, पण ते तितकंच बाकी फार काही बांधकामं दिसत नाहीत. तसंही कच्ची घरं असणार त्याचे काय अवशेष राहणार? पण याच रस्त्यांवरून सतत गाड्या जायच्या नंतर नंतर आम्हालाही ते पाठ झाले. आता या गाड्यांना त्यांचा नक्क्कीच उपयोग होत असणार अन्यथा जंगलात रस्ता हरवण्याची दाट शक्यता. तसंच मोहर्ली ताडोबा रस्त्यावर एक बाजूने उंच दगडी खांब उभे केलेले दिसले. चौकशी केल्यावर समजलं कि जेव्हा गौड राजाचं राज्य होतं तेव्हा हे उभारले गेलेले. त्यावर रात्री पलिते जळत असत. आता काही सुस्थितीत आहेत तर काहींची डागडुजी केलेली आहे. त्यावर काही मजकूरही लिहिलेला आहे पण तो वाचता ये नव्हता आणि जवळ जाऊन वाचायची सोया नव्हती.
समोरून येणाऱ्या गाडीला काही दिसलं का ते आमचा गाईड विचारत होता पण अजून कोणालाच काही वाघाचा मागमूस लागला नव्हता. सूर्योदय झाला आणि जंगलाच्या पार्श्वभूमीवर लाल भडक सूर्य छान वर येताना दिसला. अप्रतिम दृश्य होतं ते.
आम्ही एका तळ्यापाशी येऊन थांबलो. सकाळी सकाळी पाणी प्यायला वाघ येईल या आशेवर. पण बराच वेळ थांबूनही काही दिसेना. सांबर तेवढे दिसले ते जांभळाची पानं ओरबाडून खात होते. जांभूळ सदाहरित असतं म्हणे त्यामुळे या प्राण्यासाठी ती मेजवानीच. बाकी खंड्या, दयाळ इत्यादी पक्षी आवाज करत उडत होते. पुन्हा भ्रमंती सुरू झाली. पंढरपौनी गावाच्या तळ्याच्या काठाने निघालो. तिकडे खूप सारी बदकं बगळे आणि हरणांचे कळप दिसले. अधून मधून रस्त्याने जाताना रानडुक्कर वगैरे पण दिसत होतीच. सांबर, हरिण, रानडुक्कर, मोर, लांडोर, कोंबडा इत्यादी प्राणी पक्षी पुष्कळ दिसायचे. भरपूर फेऱ्या मारून मग आम्ही वन खात्याच्या गेस्ट हाऊस कडे निघालो. इथे खूप साऱ्या गाड्या लागलेल्या. सोबत आणलेला नाश्ता लोक करत होते. तसेच सारे गाईड आणि ड्रायव्हर पण नाश्ता करत होते. झाडांवर आजूबाजूला माकडांचे थवे होतेच. छोटी माकडं आईला घट्ट बिलगुन धरत होती. मग ती माकडीण त्यांना घेऊन झाडावर चढायची.
तिथं थोडा वेळ थांबून पुन्हा भ्रमंती सुरू झाली. पार टोकापर्यंत जाऊन परत फिरलो. मध्येच एका ठिकाणी खूप सारे पक्षी, मोर होते. हरणे पण होती मग तिथे थांबलो त्यांना बघत. तोही आनंद छानच होता. पण आज काही कोणालाच व्याघ्र दर्शन झालेले नव्हते. पुन्हा परतीचा प्रवास सुरू केला. पूर्वी जिथे ताडोबा गाव होतं तिथे वनखात्याचे ऑफिस आहे तिथेही वॉशरूम्स वगैरे सोय आहे. तिकडे या गाड्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. पुढे काही दिसलं का, काय दिसलं त्याची नोंद करावी लागते. वनखात्याचं कामही त्यानं सोपं होतं. ते करून आम्ही निघालो. जंगलात आता एक सुंदर वास येत होता. कुठल्या फुलांचा माहिती नाही पण फारच सुंदर होता वास.
आमचा गाईड सांगत होता जंगलाचा फक्त वीस टक्के भागच सफारीसाठी राखीव असतो बाकीच्या जंगलात माणसांना जाता येत नाही. त्यामुळे इथे असलेले दहा-बारा वाघ वाघीण तेवढ्या काय ते दिसतात. बाकी जंगलात दीड दोनशे पेक्षा जास्त वाघ आहेत. त्या एरियात फक्त फॉरेस्टच्या लोकांनाच एंट्री आहे.
या वाघांना पण मजेशीर नावं असतात त्यात माया, सोनम, लारा, बिजली अशा वाघिणी तर रुद्र, युवराज, बलराम, छोटा घदियाळ असे वाघ. यातले काही वाघ आता म्हातारे झाले आहेत, काही तरुण आहेत. सोनमला व बिजलीला आता पुढच्या महिन्यात पिल्लं होणार आहेत. मायाला एक बछडा आहे. पण माया फारच केयरलेस आई आहे. असं नीट सांभाळत नाही पिलांना. त्यामुळे तिचे पिक्चर बछडे फार जगत नाहीत. असं आमचा गाईड सांगत होता. मायाने मागच्या महिन्यात एका वनखात्याच्या महिलेवर हल्ला केला त्यामुळे ती सध्या हिंस्त्र झालेली आहे. असा आमचा गाईड सांगत होता.
इथे आता सातभाई दिसले. खरंतर ते सातच नसतात पण नेहेमी थवेच असतात त्यांचे त्यात कधी ५ कधी ७ असतात पण त्यांना एकूणच सातभाई असं नाव पडलंय. काही कावळे बुकबूल पण दिसले चिमण्या मात्र दिसल्या नाहीत. कोतवाल दिसला. पक्षी दर्शन खूप झाले. निरनिराळे पक्षी जवळून बघता येत होते. मोर उडताना दिसत होते. मोरांना बघून खूपच समाधान वाटत होतं. इतके सुंदर मोरपंखी चकाकणारे पिसारे खूप छान दिसत होते. केकारव करत उडत होते. एक मोर तर इतक्या लांब वर उडताना दिसला की मजाच वाटली, की इतका दूरवरपर्यंत मोर उडू शकतो. बाकी खूप साऱ्या पक्षांची नावे आमचा गाईड सांगत होता. तुरेवाला कोतवाल दिसला. हा पक्षी इतर प्राण्यांचे आवाज काढतो म्हणून त्याला मिमिक्री आर्टिस्ट म्हणतात. तसेच टकाचोर नावाचा पक्षी वाघ्याच्या दातातले कण वेचून खातो म्हणजे थोडक्यात त्याचे दात साफ करून देतो. पोपटाचे तीन चार प्रकार आहेत. बाकी दयाळ, धोबी, शिंपी, वटवट्या, हुदहुद, असंख्य पक्षी. थोड्याच वेळात आम्ही परत हॉटेलला आलो. आता दुपारपर्यंत जरा निवांत वेळ होता. व्यवस्थित अंघोळ वगैरे करून जरा वेळ आराम केला. वायफाय असल्याने घरी फोन करून घेतले. तसंच थोडेफार फोटो पण काढलेले टाकले व्हाट्सअप वर.
आज जेवणाचा जरा व्यवस्थित आस्वाद घेता आला. मस्त होतं जेवण. जेवण करून पुन्हा थोड्या वेळाने पाण्याची बाटली वगैरे घेऊन आम्ही निघालो. ही आमची चौथी सफारी होती. आमच्या चार गाड्यांपैकी दोनच गाड्यांना व्याघ्रदर्शन झालेलं होतं. दोन गाड्यातील लोकांना नाही. त्यामुळे आता तरी वाघ सगळ्यांना दिसावा अशी प्रार्थना करून निघालो. आज अगरझरी बफर झोन मध्ये फिरायचं होतं. गेटमधून सोपस्कार पूर्ण करून आम्ही निघालो. हे जंगल जरा वेगळं होतं. एकतर बांबूचं नव्हतं, जास्त करून सागवान होतं. बाकी जांभळ पळस वगैरे उंच वृक्ष आणि गवतही होतं काही ठिकाणी. बाकी छोटी झाडं झुडपं होती. उजव्या बाजूला आंबेजरी तलाव होता. त्याच्या किनाऱ्यावर गाडी उभी केली. तिकडे पानकोंबडा बदक, बगळा, करकोचा, भारद्वाज, हळद्या, काळा करकोचा, खंड्या, नीलपंख, पाण्यात डुंबणारे टिबुकली, चक्रवाक, गढवाल असे पाणपक्षी दिसत होते. असे असंख्य पक्षी त्या दलदलीत त्यांचे भक्ष चोचित पकडून खात बसले होते. पुढे काही मोरही होते. तसंच काही हरणही होती. थोडावेळ तिकडे थांबून दुसरीकडे निघालो.
बफर झोन मध्ये वाघ जास्त आहेत असा आमचा गाईड सांगत होता. त्यामुळे दिसण्याची शक्यता जास्त आहे. बाकी इतर वेळी हे गाईड ते जंगल जंगलातल्या वनस्पती, प्राणी, पक्षी इत्यादी विषयी बरीच माहिती देत असतात. वाघ हा जंगलचा राजा असला तरी त्यालाही जगण्यासाठी खूप झगडावे लागते. शिकार करणे त्याच्यासाठी खूपच अवघड काम असतं. जंगलात एखादं सावज हेरायचं आणि दबा धरून बसायचं, योग्य वेळ आली की झडप घालायची. त्यात बरेचदा ते सावज पळून जातं. वाघ जास्त पळू शकत नाही. त्यामुळे त्याच्या हाती काही लागत नाही. हरणाच्या कळपातलं नेमकं हरीण वाघ शोधून ठेवतो. बाकीच्यांच्या वाटेला जात नाही. ते नेमकं हरीण त्याच्या टप्प्यात आलं कि वाघ झडप मारतो. सांबर हे त्यातल्या त्यात त्याचं सोपं सावज एक तर त्याची दृष्टी कमी असते त्यामुळे त्याला लवकर दिसत नाही आणि हरणासारखे चपळही नसतं त्यामुळे वाघांची हमखास शिकार होतं.
केलेली शिकार वाघ पानापाचोळ्याखाली झाकून ठेवतो कारण कोल्हे लांडगे ते पळवू शकतात. पाणी प्यायला जाताना तोही काळजी नक्की घेतो. तसंच वाघीण आणि तिचे बर्थडे असतील तर मात्र एक दोन दिवसच त्यांना ती शिकार पुरते. शिकार जसजशी कुजत जाते तशी ती त्यांना खायला सोपी जाते. वाघ गव्याची पण शिकार करतो पण ती सोपी नसते. कारण गवा खूपच धिप्पाड असतो आणि त्याची शिंग ही त्याची हत्यार असतं. हजार बाराशे किलोचा गवा मारणं ही वाघासाठी खूपच मोठी गोष्ट असते. पण जर अशी शिकार मिळाली तर मात्र त्याच्यासाठी मेजवानीच. आठ दहा दिवसांची निश्चिती. कधीकधी वाघाला आठ आठ दिवस शिकारच मिळत नाही असेही होतं. वाघ म्हातारा झाला की त्याचं जगणं फारच विदारकी होऊन जातं. म्हणजे तरुणपणी देखणा रुबाबदार भीतीदायक असलेला वाघ वयस्क झाला की फारच केविलवाणा होतो आणि वाईट जीवन जगतो. त्याचे दात, नख पडतात व शिकार करू शकत नाही. अशक्त होऊन जातो. काही खाता येत नाही. शिकार करता येत नाही. म्हातारा वाघ मग आसपासच्या गावात भटकतो. गावकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करतो. क्वचित माणसांवर हल्ला करतो. असा आमचा गाईड सांगत होता. म्हातारे वाघ अन्न पाण्याविना कधी कधी मरून जातात. कधी त्यांची हाडं ,बॉडी सापडते पण बऱ्याचदा घनदाट जंगलात ते मरून पडतात, त्यांना बाकीची जनावर प्राणी खाऊन टाकतात. हाडं हि शिल्लक राहत नाहीत. खूप दिवस वाघ दिसला नाही तर तो मेला असं गृहीत धरलं जातं. 15 ते 18 वर्षांचा त्यांचा जीवनकाळ असतो. ही सगळी माहिती तशी फारच भयानक होती.
वाघाचा वीस पंचवीस किलोमीटरचा परीघ हा त्याचा इलाखा असतो. मग तो झाडावर त्याच्या पंजान खरवडून मार्किंग करतो. तसंच मलमूत्र विसर्जन हे पण मार्किंगच असतं. दर तीन चार दिवसांनी ते तो करतो. त्या इलाख्यात दुसऱ्या वाघाने येऊ नये हा त्याचा इशारा असतो. वाघिण चार-पाच किलोमीटरच्या परिघात राज्य करते. दुसरा वाघ जास्त बलवान असेल आणि त्याचं मार्किंग अजून उंच असेल तर पहिला वाघ तो इलाका सोडून जातो. वाघिणीशी संगावरून हि दोन वाघात लढाई होते. मग बलवान वाघ जिंकतो. दुसरा वाघ सोडून जातो किंवा मारला जाऊ शकतो. वाघ स्वतःच्या मुलीशी संग करत नाही. तसंच वाघिणीचे बच्चे दुसऱ्या वाघाचे सतील तर त्यांना मारून टाकतो. त्यामुळे वाघीण बछड्यांना फार सांभाळते. दोन वर्ष होईपर्यंत बछडे आई सोबत राहतात मग ते वेगळे होतात. त्यातले बछडे जर आई पेक्षा बलवान झाले तर तिलाच हाकलून लावतात. मग ती बिचारी तो इलाका त्यांच्यासाठी सोडून निघून जाते.
वाघाचा संग साधारण सात आठ दिवसाचा असतो. त्या काळात वाघीण उपाशी राहते म्हणे. गरोदरपणाचा काळ साधारण शंभर दिवसाचा असतो. क्वचितच वाघ बच्चे सांभाळायला मदत करतो. बाकी वाघीणच वाढवते. त्यांना शिकार करायला शिकवते. शिकार करायला जाताना त्यांना लपवून ठेवते. प्रत्येक वाघाचे पट्टे हे वैशिष्ट्यपूर्ण असतात ते कधीच दुसऱ्या सारखे नसतात. त्यामुळे त्यांना ओळखता येतं. येणारे पर्यटकच वाघांना नावं ठेवतात. सध्या ताडोबाच्या जंगलात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे त्यांना दुसरीकडे हलवायचं नियोजन चालू आहे. असं आमचा गाईड सांगत होता.
ताडोबा परिसरात दर बुद्ध पौर्णिमेला वाघांची गणना होते. जागोजागी उभ्या केलेल्या मचाणांवर बसून रात्री वाघांची गणना करतात. इतर प्राण्यांची पण नोंद केली जाते. त्यासाठी कुणीही भाग घेऊ शकतो. आम्ही परत जंगलात रपेट मारायला सुरुवात केली. जंगलात जागोजागी उंच असे मचाण उभा केलेले आहेत. ज्याच्या वरती माणसं कंटिन्यूअस वॉच ठेवून असतात की जिथे कुठे जंगलाला आग लागलेली नाही ना आणि लागली तर ते लगेच त्याच्यावरती ॲक्शन घेतली जाते. दोन दिवस फिरलेल्या जंगलापेक्षा हे जंगल वेगळे होतं. एक तर खूप घनदाट होतं मातीतूनच वाटा तयार झालेल्या. अगदी झाडी झुडपातून गाडी चाललेली. अंगावरही येत होती झाडं. कुठेही डांबरी रस्ते नव्हते व ताडोबा सारखा ब्लॉक करून तयार केलेल्या वाटा कृत्रिम पानवठे असं काहीही नव्हतं. सारं नैसर्गिक. एका झाडावरून सुंदरसा स्वर्गीय नर्तक उडून दुसरीकडे गेला. लांबलचक शेपूट आणि तुरा, कतरे पंख असलेला हा पंधरा पक्षी फारच सुंदर दिसत होता.
बऱ्याच बांबूला फुलोरा आलेला ३०- 40 वर्षात बांबूला एकदाच फुलरा येतो आणि बिया येतात आणि बांबूचे जीवन संपते. मग तो बांबू काढून ते विकण्याचं काम बनविभाग करतो. पण ताडोबाच्या जंगलात तो बांबू तसाच सोडला जातो व आदिवासींना दिला जातो तो विकला जात नाही. आताही जंगलात जागोजागी असं काम चालू होतं. माणसं बांबू गोळ्या करण्याचं आणि इतर काम करत होती, त्यामुळे वाघ दिसण्याची सुताराम शक्यता नव्हती. कारण माणसाची वगैरे चाहूल लागली की प्राणी जरा लांबच राहतात. आम्ही खूप रफेट मारून पुन्हा त्याच तलावाच्या काठावर आलो जरा वेगळ्या ठिकाणी, तिथं गव्यांचा एक कळप करत होता. काही हरणं चितळही होते. गव्यांचे शरीर करडं आणि काळपट असतं, पाय गुडघ्यापासून खाली पांढरे असतात. बैलासारखा दिसणारा हा अवाढव्य प्राणी असतो. त्या गव्यातही एखादा म्हातारा झाला की त्या कळपाचे नेतृत्व दुसऱ्या तरुण गाव्याकडे जातं. मग या म्हाताऱ्याला वेगळं सोडलं जातं. तो बिचारा मग एकटाच फिरत राहतो. हे वाघाचं सहज सावज प्रत्येक प्राण्याची त्याच्या कळपाची काही एक विशिष्ट अशी जीवनशैली असते. त्यांचे प्रत्येकाचे नियम असतात त्याप्रमाणे ते प्राणी चालतात मजेदार असतं सगळं.

माकडं आणि पक्षी प्राण्यांना वाघ्याच्या धोक्याची जाणी करून देतात. माकडं उंच झाडावर बसतात त्यामुळे त्यांना वाघ लवकर दिसतो. मग ती आवाज करतात आणि बाकीच्या प्राण्यांना सावध करतात तसेच पक्षीही धोक्याचे इशारे देतात. माकड झाडावरची फळ अर्धवट खाऊन खाली टाकतात. व घारण वगैरे ते खातात विशेषता उन्हाळ्यात त्यांना याची फार गरज असते असं प्राण्यांचा सहजीवन असतं ते एकमेकांना मदत करत असतात आम्ही जीप मधून चकरा मारत होतो आज वाघ दिवसभरात कोणाला दिसला नाही तव्याच्या तळ्याच्या दुसऱ्या टोकाला जंगलात हालचाल दिसली असा आमचा गाईड सांगत होता त्यामुळे दुर्बिन लावून तो तिकडे बघत होता ्या साईडला खूप सार्‍या गाड्या थांबलेल्या होत्या आम्ही पण या काठावरून आम्ही पण दुर्बिणीतनं पहात होतो पण कुठे काही मागून दिसत नव्हता मग पुन्हा मी दुसरीकडे निघालो इकडे एक छोटा तळं होतं तिकडे कुदळे आहात नीलपंख खंड्या सर्पकडून असे पक्षी आम्हाला दिसले मजा वाटत होती. सफारी म्हणजे गाडीत बसायचं आणि गुरगुर गुरगुर फिरत राहायचं. या रस्त्याने त्या रस्त्याने जंगलात उगाचच नजर टाकत राहायचं, निरुद्देश तीन चार तास फिरायचं, तीसच्या स्पीडने गाडी चालत असते. इथल्या जंगलात खड्ड्याकुट्यातून गाडी जात होती. धूळ उडत होती एक ठिकाणी गाडी थांबूवून आम्ही सोबत आणलेलं थोडं खाऊन घेतलं. मग परत फिरस्ती सुरू. असे इतर वेळी आपण फिरलो असतो का असा विचार सहजच मनात आला. दिवसाचे सात आठ तास जीपमध्ये बसायचं आणि चकरा मारायच्या सगळीच मज्जा.
एखादा छोटूकलं छोटू हरिण आमच्याकडे रोखून बघत होतं आणि पटकन उड्या मारून झाडीत गायब झालं. हरणांचे कळप खूप सारे बघायला मिळाले तसेच सांबरही मोठ्या संख्येने बघायला मिळाली. रानडुक्कर पण खूप हे सारं. वाघांचं खाद्य इथे मुबलक असल्याने त्यांची संख्या इथे चांगली आहे. संध्याकाळ झाली तसं आम्ही परतीचा रस्ता पकडला. गेटवरच्या सविनियरच्या दुकानातून टी-शर्ट घेतले आणि चहा पिऊन निघालो. हॉटेलवर परत आल्यावर कुणाला काही दिसलं का विचारलं पण आज दिवसभरात कुठल्याच गाडीला वाघ दिसला नव्हता. ताडोबात आमच्या बरोबरच्या काही लोकांसाठी आता उद्याचा एकच दिवस होता सकाळचा. म्हणजे एकच सफारी राहिलेली तेव्हा तरी तो दिसावा अशी अपेक्षा.
हॉटेलवर त्याने मस्तपैकी कांदा बटाट्याची भजी केलेली ते थोडं खाऊन घेतलं आणि रूमवर आलो कपडे बदलून मस्त आराम केला. रात्री जेवण करून आंघोळ करून घेतली. कारण फिरून फिरून केसात माती बसलेली उद्या सकाळी पुन्हा पहाटे लवकर उठून जायचं होतं, त्यामुळे आताच केस धुऊन घेतले. बॅगा भरून ठेवल्या कारण परत आल्यावर लगेच निघायचं होतं पुण्यासाठी. पहाटे लवकर उठून साडेपाचलाच निघालो. गेटवर पोहोचून आत प्रवेश केला. आम्ही सगळ्यात आधी निघालो होतो. आमचा आजचा ड्रायव्हर म्हणाला आज तुमची शेवटची सफारी आहे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू वाट बघायचा. आमच्या गाडीतल्या एका दंपतीला अजून वाघ दिसला नव्हता बाकी आम्ही चौघांनी पहिल्या दिवशी पाहिलेला त्यामुळे सगळ्यांना जरा जास्तच वाघाची आस लागलेली. आमची गाडी अंधारात रस्त्याने फिरत होती आज थंडी जरा जास्तच वाटत होती . जंगलाच्या शांततेचा अनुभव घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता त्यामुळं तो जास्तीत जास्त मनात साठवायचा प्रयत्न करत होते. फक्त गाडीचा आवाज आणि अधे मध्ये सकाळी अरवणाऱ्या कोंबड्याच्या आवाज येत होता. थोड्या वेळानं बाकीच्या पक्षांचे आवाज यायला लागले. मध्येच कुठे सर्प गरुड, मोर इत्यादी पक्षी दिसत होते. आता बऱ्यापैकी उजाडले सूर्योदय झाला तशी थंडी पण जरा वाढली. पण थोड्याच वेळात अंगावर सूर्यकिरणं यायला लागली तसं जरा बरं वाटाय लागलं.
पुढे दोन सांबरे दिसले. आम्ही पाणथळीच्या जागा बघत फिरत होतो. समोरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना काही दिसले का विचारत होतो. त्यात एक मोठी बस आली ती बरीच जोरात होती. समोर आली त्याच्या ड्रायव्हरने सांगितलं की कॉल झालाय पण काही बातमी नाही. कॉल याचा अर्थ प्राणी आरडाओरडा करून वाघाच्या धोक्याची सूचना बाकीच्या प्राण्यांना देतात विशेषत: माकड आणि पक्षी देतात, त्यावरून आसपास वाघ असल्याची बातमी मिळते आणि मग गाड्या वाट पाहत थांबतात. आम्ही मात्र पुढे आलो होतो. येता जाता काही ठिकाणी मातीत वाघाचे ठसे दिसत होते पण पुढे कुठेतरी ते गायब व्हायचे. पण कुठल्या दिशेला ते गेले ते साधारण कळायचं. दीड दोन तास चकरा मारल्यावर पुढे कुठे ठिकाणी दोन-तीन गाड्या थांबलेल्या दिसल्या. अशा गाड्या थांबल्या म्हणजे काहीतरी असण्याची शक्यता. आम्हाला जरा बरं वाटलं पुढे जाऊन पाहिलं तर मातीत रक्ताचा खच पडलेला. आम्ही थांबून चौकशी केली तर वाघाने शिकार केलेली आणि तो झुडपात जाऊन ती ओढून घेऊन गेल्याचं कळलं त्या गाडीतले लोक बघत होते तिकडे पाहिल्यावर ती शिकार आणि त्याच्या बाजूला निवांत पडलेला वाघ झाडे दिसला आम्हाला अत्यानंद झाला वाघ दिसला एकदाचा त्या दोघांना याचा जास्त आनंद झाला. नाही तर त्यांची सफारी वाया गेली असती. वाघाचा पोटाचा पांढरा भाग, तोंड, पाय व्यवस्थित दिसत होते. बाजूला त्यांनं शिकार केलेल्या सांबराचं तोंड पडलेलं. बघायला बरं वाटत नसलं तरी निसर्गाचा नियमच आहे तो जीवो जीवस्य जीवनम !! अशा शिकारी झाल्या नाहीत तर इतर प्राण्यांची संख्या भरमसाठ वाढेल या साऱ्याचा विचार करून निसर्गाने छान साखळी तयार करून ठेवली आहे. त्यात त्या त्या प्रमाणात प्राण्यांची पक्षांची संख्या निश्चित ठेवली आहे. विचार करा की छोटे प्राणी कमी आणि वाघ जास्त झाले तर ? मरतील उपासमारीनं! त्यामुळे निसर्ग ते व्यवस्थित संतुलित राखतो. फक्त माणसाने त्यात हस्तक्षेप करू नये एवढेच. माणसाचा हस्तक्षेप झाला की सारं बिघडतं. असो. आम्ही आता त्या वाघाला वेगवेगळ्या अँगलने बघायला सुरुवात केली. गाडीमागे पुढे करून जास्त चांगलं कसं दिसेल ते पाहिलं.
एका जीपमध्ये कुणी फॉरेनर मोठाला कॅमेरा घेऊन ते दृश्य टिपण्याचा प्रयत्न करत होता. बाकीही बऱ्याच गाड्या आता समजल्याने इकडे आल्या होत्या. दुर्बिणीतून जास्त छान दिसत होतं. तितक्यात परत एक बस आली. धूळ उडवत, गाडीत बसलेले लोक अक्षरश: धुळीने माखलेले होते. लाल लाल माती कपड्यांवर, डोक्यात सगळीकडे. कशाला इतकी जोरात चालवत असतील हे लोक? जीप सारखं स्पीड लिमिट नसेल का त्यांना? असा प्रश्न सहजच मनात आला.
आमचा गाईड म्हणाला की त्याने रात्रीतून शिकार केली असणार आणि जरा उन्हं वर आली की तो पाणी प्यायला पाण्यावर जाईल. त्या आशेवरच आम्ही मग तिकडेच खूप वेळ बसलो वाट बघत. आम्ही आमच्या बाकीच्या गाड्यांची वाट पाहत होतो. त्यांनाही वाघ बघायला मिळेल म्हणून पण ते लोक नाहीच आले आणि वाघ ही बाहेर पडेना मग तिथून परत एखादी चक्कर मारावी म्हणून ड्रायव्हरने गाडी काढली. आता आम्ही जंगलाच्या आजपर्यंत न पाहिलेल्या भाग बघत होतो तिकडेही काही पाणवठे आहत तर बघू म्हणून. येता जाता हरणाची, चितळाचे थवे चरताना दिसले. इथे नीलगाय पण दिसली. खरतर गायीचा आणि या नीलगायींचा काहीही संबंध नाही पण मागे म्हणे हरयाणात हे प्राणी खूप्पच पिकांची नासधूस करतात म्हणून गावकऱ्यांनी यांची बेसुमार शिकार केली. मग हा प्राणीच नष्ट होईल म्हणून सरकारने त्याचे नीलगाय असे नामकरण केले. त्यामुळे या गायी वाचल्या.
झाडावरची माकडं फळ अर्धवट खाऊन खाली टाकत होती ते हरण मजेत खात होती. एक गवाही दिसला बिचारा एकटाच फिरत होता. कळपातन बाहेर काढला असणार त्याला.
दूर पाण्यावर काही सांबर पाणी पीत होते. आम्ही पुन्हा वाघाच्या ठिकाणी आलो तर गाड्या उभ्याच होत्या, म्हणजे वाघ अजूनबाहेर पडला नव्हता. आता आमच्या बाकीच्याही गाड्या आल्या आणि मुख्य म्हणजे त्यांनाही व्याघ्र दर्शन झालेले, तेही रस्ताने जाणाऱ्या वाघाचे. चला म्हणजे प्रत्येकाला शेवटी वाघ बघायला मिळाला याचा समाधान झालं. आता साडेनऊ झालेले त्यामुळे परत जाणं गरजेचं होतं. दहापर्यंत पुन्हा ताडोबा चेक पोस्टवर चेकिंग करावे लागणार होतं. त्यामुळे आम्ही परत निघालो. आम्ही दोनदा वाघ बघितला, एक चालताना आणि एक झोपलेला. सफारी सफल झालेली. आम्ही त्या जंगलातून निघालो. ही शेवटची ट्रिप आता पुणे वापस. जंगलात वेगवेगळ्या वेळी फिरण्याचा, ते जंगल अनुभवण्याचा मस्त अनुभव या सफारीत आला. सकाळी, सूर्योदयापूर्वी अगदी निरव शांतता, मग सूर्योदय होताना जंगलातल्या पक्षांचे चिवचिवाट, प्राण्यांचं जगणं, दुपारचं त्यांचं जीवन आणि रात्रीचं रातकिडयांच्या आवाजात फिरताना एक वेगळेच विश्व, वेगळे पक्षी, प्राणी! सारं काही अनुभवता आलं. गर्द रानातून जसं फिरलो तसंच व्यवस्थित राखलेल्या ब्लॉगमधूनही फिरलो. बांबूचं, सागाच आणि इतर वृक्षवल्लींचं एकत्रित जंगल. त्याचे कायदे कानून वेगळे. नियम वेगळे स्वच्छ हवा, सुंदर वास अनुभवायला मिळाला. काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्यांना तर वर्षातून एकदा तरी अशा जंगलातून नक्की जायला हवं. जंगलात भ्रमंती करताना त्या जीपमध्ये बसून नुसतं फिरत राहायचं हा अनुभव वेगळाच. एरवी सतत घडाळ्याकडे बघत प्रवासाची सवय असलेले आपण इथे घड्याळ, बाहेरचं जग, घरदार सारं विसरून जातो, जंगलाचाच एक भाग होऊन जातो. हेही एक प्रकारचं मेडिटेशनच. शांत पवित्र वातावरण, माणसाचा फार वावर नाही आणि उद्देश एकच कुठल्या झाडीझुडपात पाण्यावर वाघ दिसतोय ते पाहायचं, बाकीचे प्राणी पक्षी न्याहाळायचं आणि फिरायचं. तीन चार तास गाडीत भुर भुर भुर भुर फिरत राहायचं. मजेदार अनुभव. आजवर इतक्या जवळन हे प्राणी पक्षी आपल्याला कधीच बघायला मिळालेले नसतात आणि तेही नैसर्गिक वातावरणात. जंगलातल्या नैसर्गिक वातावरणात त्यांना फिरताना पाहणं हा आनंद काही वेगळाच असतो. तो सारा अनुभव पूर्ण मनात साठवून ठेवला आणि जंगल सोडलं. खरोखरच त्या गेटच्या बाहेर मोहर्ली गाव जिथे असं जंगल नाही आणि गेटच्या अल्याड जंगल!!! एक पूर्ण वेगळे विश्व.!!!!

स्मिता बगाडे
पुणे
17-03-23

प्रवासअनुभव

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

22 Aug 2023 - 3:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त भटकंती!!

पण फोटोंशिवाय मजा नाही जंगलाबद्दल वाचायला. विशेषतः वाघांबद्दल बोलायचे तर फोटो हवेतच. नसेल तरी नुसते जंगलाचे फोटोही चालतील.

Nitin Palkar's picture

22 Aug 2023 - 7:55 pm | Nitin Palkar

छान वर्णन!

कंजूस's picture

23 Aug 2023 - 9:18 am | कंजूस

भटकंती आणि वर्णन आवडलं. वाघाचे फोटो नसले तरी बिघडत नाही. छोटे छोटे इतर प्राण्यांचे विडिओ आवडतील.

dadabhau's picture

23 Aug 2023 - 7:18 pm | dadabhau

ते बाकी सगळं जावू द्या.. पर्यटकांच्या उघड्या जीप्सयांवर एकदा तरी वाघाने उडी मारावी अशी खूप इच्छा आहे.. सुरक्षेसाठी जाळ्या लावाव्यात हा साधा common sense जर वन खात्याला किव्वा पर्यटकांना ही सुचत नसेल तर वाघानेच आता पुढाकार घ्यावा..

MipaPremiYogesh's picture

23 Aug 2023 - 9:57 pm | MipaPremiYogesh

असं का वाटते तुम्हाला कळेल का? टायगर tourism मुळे खूप प्रमाणात शिकारी कमी झाल्या आहेत.

MipaPremiYogesh's picture

23 Aug 2023 - 9:55 pm | MipaPremiYogesh

मस्त भटकंती झाली. मला तर वाटते IT चे काम बंद करून कायम स्वरूपी गाईड म्हणून काम करावे :)

माया चा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. ती ज्या भागात राहते तो एकदम कोर आणि महत्वाचा आहे आणि सगळ्या वाघांना तिच्या भागात वर्चस्व करायचे असते म्हणून तिचे पिल्ले वाचत नाहीत. ती खूप वेग वेगळ्या युक्त्या करते वाचवण्यासाठी तिला pls careless म्हणू नका आणि aggressive तर अजिबात नाहीये. अगदी गाडीच्या जवळून बिनधास्त चालते कोणाला काही न करता . त्या दिवशीचा incidence वेगळा होता एकतर तिच्या bacchyana वाघाने मारले होते आणि त्यातून ती वन कर्मचारी डायरेक्ट तिच्या बाजूला गेली म्हणून तिने हल्ला केला, तरी लोकं सांगत होती तिला कि माया इकडे बसली आहे पण तिने लक्ष दिले नाही

मित्रहो's picture

24 Aug 2023 - 11:16 am | मित्रहो

माया त्रास देत नाही हे खरे आहे. त्या तुलनेत मटकासुर खूप Aggressive . आता तो आहे की नाही माहिती नाही.
आम्ही जवळ जवळ पंधरा मिनिटे बघितला होता.

बाकी पुण्याहून इतक्या लांब ताडोब्याला मंडळी जातात त्यांनी अजून पुढे दोन तास जाऊन मार्कंड्याचे मंदिर बघावे. मंदिर खूप सुंदर आहे. नदिच्या किनाऱ्यावर आहे. तिथे कुणी गाईड असेल तर छान असते.

चंद्रपूर जिल्ह्यात काही थोडा भाग सोडला तर आदिवासी भाग फारसा नाही. गडचिरोली जिल्हा वेगळा झाल्यापासून बराच आदिवासी भाग गडचिरोली जिल्ह्यात गेला. चंद्रपूर जिल्ह्याला शाप म्हणायचे की वर ते माहिती नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यात खूप जास्ती खाणी (Opencast सुद्धा) आहेत. आणि चंद्रपूरचे औष्णिक उर्जा केंद्र यामुळे वातावरणात धुळ आहे. तसेच लवकर थंड होत नाही.

MipaPremiYogesh's picture

24 Aug 2023 - 3:12 pm | MipaPremiYogesh

मटकासुर तर अजून शांत आहे (होता ) , निवांत गोव्या च्या लोकांसारखा सुशेगात ...माझा आवडता वाघ , खूप हुशार...सध्या अधून मधून दिसतो एकदम गावाच्या टोकाला आहे.

मंदिर कुठे आहे

मित्रहो's picture

24 Aug 2023 - 4:23 pm | मित्रहो

मार्कंडा मंदिर मूल चामोर्शी या रोडवरुन आत गेल्यावर आहे. चंद्रपूरवरुन साधारण दोन तास लागतात. मंदिर सुंदर आहे.
मला वाटते इथे प्रचेतस यांनी त्याची पूर्ण माहिती देणारा लेख लिहिला होता बहुतेक.

मटकासुराने हमला केल्याच्या बातम्या आधी वाचल्या होत्या.

नाही, मार्कन्डा मंदिराला अजून गेलो नसल्याने त्यावर काहीच लिहिलेले नाही. जायची इच्छा तर आहे.

स्मिता दत्ता's picture

25 Aug 2023 - 1:28 pm | स्मिता दत्ता

तुमचं ही बरोबर असेल पण आम्हाला जे गाईडने सांगितलं ते मी लिहिलंय

गोरगावलेकर's picture

24 Aug 2023 - 10:45 am | गोरगावलेकर

वर्णनआवडले. फोटो मात्र हवे होते.
आत मध्ये मोबाईल अलाऊड नाहीत त्यामुळे ते घेतलेच नाहीत.
यामुळे फोटो घेता आले नसावेत किंवा मिपावर फोटो चढवणे जमले नसावे. कोणाची तरी मदत घ्या. लेख भटकंती विभागात हलवला गेल्यास अजूनही फोटो देता येतील.

स्मिता दत्ता's picture

25 Aug 2023 - 1:36 pm | स्मिता दत्ता

मी प्रयत्न करतीये फोटो टाकायचा ..ते दुसर्यांनी घेतलेत त्यांची परवानगी घेऊन टाकेन .

स्मिता दत्ता's picture

25 Aug 2023 - 2:16 pm | स्मिता दत्ता

मी प्रयत्न करतीये फोटो टाकायचा ..ते दुसर्यांनी घेतलेत त्यांची परवानगी घेऊन टाकेन .

स्मिता दत्ता's picture

25 Aug 2023 - 2:06 pm | स्मिता दत्ता

fotos

विअर्ड विक्स's picture

30 Aug 2023 - 12:25 pm | विअर्ड विक्स

लेख आवडला ...

सफारीसाठी सध्या प्रति व्यक्ती जीपसाठी काय दर आहे ? लहान मुलं allowed असतात का सफारी ला ?