सुर्य उगवायच्या आधिच हाक मारतो गजर
लगबगिने उठावे लागते चोळत-चोळत नजर
भांड्यांच्या खणखणाटाने उठते स्वयंपाक घर
कोंडलेला श्वास सोडतो गॅसचा सिलेंडर
उठा-उठा वेळ होईल ओरडा खातात मिस्टर
एकीकडे नाश्ता- डबा सारे काही भरभर
नवरोबाच्या तयारीसही, हाकेमध्ये हजर
डबा नाश्ता निघताना आहोंसाठी टेबलवर
घाईतही निरोप देण्यास स्मितहास्य गालावर
पाय घरात वळताच स्वयंपाकघराची आवरा-आवर
अभ्यंग स्नान आटोपुन नहाणीघरातिल शॉवर
आमची कधी वेळ? वाट पाहते देवघर
पुजा आटोपताच, सासुबाई चहासाठी लावतात नंबर
आई-आई हाक येताच, बाळीला दर्शन बेडवर
तयारी उरकून, नाश्ता- दूध तिला कपभर
निघण्यासाठी घोर लावते ऑफीस मधले मस्टर
घर सोडून बाळीसोबत तिला तिच्या जागेवर
गोड पापा घाई-घाईत, ध्यान सारे बसस्टॉपवर
ऑफीसमधले काम सुरू असते वेळेवर
मित्र-मैत्रीणींच्या हितगुजीने बॉस येतो समोर
काम करता करता डोकावते उद्याचे स्वयंपाकघर
मधे मधे पिल्लाची आठवण, लावते काळजाला घोर
ऑफीस सुटताच सामानासाठी बाजाराची सफर
बाळीला घेऊन सोबत, परतीची वाट पाहते घर
दार उघडताच शांत मन, दिवे लागताच उत्साही घर
सारे घरात जमताच, गप्पा गोष्टींना लागतो बहर
पुन्हा सारे सोपस्कर, स्वयंपाकघराची आवरा-आवर
थकलेल शरीर,निजवण्यासाठी वाट पाहतं माजघर.
प्रतिक्रिया
6 May 2009 - 12:38 pm | अश्विनि३३७९
=D> प्रत्येक होम मिनिस्टर ची धावपळ अशीच असते..
6 May 2009 - 12:46 pm | सँडी
छानच!
सगळ्या आघाड्या सांभाळणं मोठ्ठ दिव्यच असावं.
-संदीप.
काय'द्याच बोला.
6 May 2009 - 3:22 pm | सायली पानसे
सहमत. छान कविता.
6 May 2009 - 12:45 pm | अनंता
क्रिप्टीक उडवल्याबद्दल आभार ;)
टीप : माझी खव,व्यनि सुविधा बंद असल्याने उत्तर देता आले नाही.
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
6 May 2009 - 2:46 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कवितेतलं काही कळत नाही पण कविता आवडली नाही अर्थ म्हणून!
6 May 2009 - 2:49 pm | आनंदयात्री
मस्त कविता आहे. साधी सोपी. गृहिणीची धावपळ दाखवणारी.
6 May 2009 - 3:11 pm | सहज
हेच म्हणतो.
अजुन येउ द्या.
6 May 2009 - 3:13 pm | जागु
अश्विनी, सँडी, अनंता,आदीती, आनंदयात्री, सहज प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आदिती मला तुझ्या प्रतिसादाचा अर्थ नाही समजला, तुझे दैनंदीन जीवन कसे असते ?
6 May 2009 - 3:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतच नाही. :-)
एकट्या स्त्रीने घरात सगळी कामं करायची आणि इतरांनी उशीरापर्यंत झोपून रहायचं, बसल्या जागी चहा आण, पाणी आण अशा ऑर्डरी सोडायच्या हे मी कधी पाहिलं नाही आणि मला पटतही नाही. एकदा मुलं चालायला-बोलायला लागल्यावर त्यांनाही शक्यतोवर स्वावलंबी बनवलेलं बघण्याची सवय आम्हाला लागली गेली.
एक अवांतर किस्सा: माझ्या भावाची होणारी बायको मला एकदा थँक्स म्हणाली. का म्हणे, तर मी त्याला हातात जेवणाचं ताट वाढून आणून देणं, सकाळी त्याच्या मागे लागून त्याला उठवणं इ.इ. सवयी लावून बिघडवलेलं नाही.
"कविता म्हणून सहज, सोपी आहे म्हणून आवडली. पण अर्थ म्हणून नाही" यातून मला हे म्हणायचं होतं.
6 May 2009 - 4:19 pm | विनायक प्रभू
हम्म
6 May 2009 - 3:25 pm | जागु
आत्ता तुझ्या प्रतिसादाचा मला अर्थ कळला. प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात, चालायचंच.
6 May 2009 - 3:31 pm | आनंदयात्री
तुमची कविता का आवडली ?
हे सांगायचा हा प्रयत्न !
कदाचित कुणा एका स्त्रीला गृहिणी म्हणुन हे सगळे करायला आवडत नसेल. काहिंचा फेमिनाईन ऍप्रोच मुळेही मतांतरे होउ शकतात .
पण मला आजुबाजुला अश्याच घरासाठी कष्ट करणार्या स्त्रिया दिसतात अन मला त्यांचे रास्त कौतुकही आहे. माझ्या नवर्याने माझ्याएवढेच काम केले पाहिजे या ऍप्रोचपेक्षा घर माझे आहे, संसार माझा आहे या भावविश्वात त्या सुखी असतात, असे काहिसे सुंदर मतप्रदर्शन तुमच्या कवितेतुन झाले आहे.
6 May 2009 - 3:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या वादासाठी हा धागा योग्य नाही तरीही रहावत नाही म्हणून!
या सुखात तर मी सुद्धा आहे. पण हे सुखसुद्धा इतर सुख-दु:खाबरोबर मी आणि तो वाटून घेतो. "घर माझं आहे, संसार माझाही आहे" हा विचार तो सुद्धा करतो. हे सुख मला इतर गोष्टींपेक्षा खूप महत्त्वाचं वाटत असावं.
थोडं वेगळं उदाहरण देते: गाडी चालवताना 'वे ऑफ राईट' घ्यायचा नसतो, द्यायचा असतो. तसंच संसार दोघांचा आहे हा विचार लादून समानतेचं सुख मिळत नाही.
6 May 2009 - 3:50 pm | आनंदयात्री
पटते. हा तुझा ऍप्रोच झाला. तुझ्या बुद्धिनिष्ठ मानसिकतेला तेच भावणार. याबद्दल यत्किंचितही शंका नाही. वैयक्तिक जाण्याचा विचार नव्हताच.
तरीही तु तुझ्या अनुभवावर कविता केली तर तीही नक्की आवडेल. कारण तु ते तुझ्या भावनांचे केलेले सुंदर प्रदर्शन असेल. व्यक्तिश: जरी मला ती मतं पटली नसतील तरीही. कारण तेव्हा मी तुझी कविता वाचुन तुझे सुख समजुन आनंदित होईल.
6 May 2009 - 3:55 pm | जागु
आनंदयात्रींशी सहमत. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या असतात.
6 May 2009 - 3:45 pm | मराठमोळा
आनंदयात्री यांचा प्रतिसाद आवडला. अशा स्त्रियांना आमचा सलाम (वाकडा नव्हे).
जास्त काही लिहित नाही इथे. खुप वाद होतील.
(अवांतरः यावर एक लेख लिहिण्याचा विचारात होतो बर्याच दिवसापासुन. पण...... ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 May 2009 - 3:57 pm | अवलिया
कविता आवडली.
खरे तर प्रकाशित झाल्या झाल्या वाचली होती, कामामधे प्रतिसाद बाकी राहीला
कविता आवडली, खुप आवडली.
त्यातील भावना थेट पोहोचल्या !
कारण? कारण अगदी सोपे आहे....
काही संदर्भ (जसे हापिसला जाणे वगैरे) वगळता जे वर्णन केले आहे ते वाचुन मला माझ्या आईची आठवण झाली.
बास ! अगदी असेच आयुष्य !!
कामाच्या रगाड्याला सतत जुंपलेली.
म्हातारे सासु सासरे, दिर, नणंदा, यांच्या तालावर नाचत, नव-याची मर्जी संभाळत !
आता हे आयुष्य ती जे काही जगली ( होय ती आता नाही ) ते तसेच जगायला हवे होते का तिने काही बंडखोरी करुन बदल करुन घ्यायला हवा होता या प्रश्नांची माझ्या कडे तरी उत्तरे नाहीत आणि मी शोधणार पण नाही.
अशा कित्येक माता आणि भगिनी माझ्या आजुबाजुला आहेत... त्यांच्या कष्टांना शब्दरुप दिलेत तुम्ही !
पापपुण्य माहित नाही, पण आज एक फार पुण्याचे काम आपण केले आहे.
मला माझ्या मृत आईच्या कष्टांची आठवण करुन देणारी कविता लिहिल्याबद्दल मी आपला आजन्म ॠणी आहे.
--अवलिया
6 May 2009 - 4:05 pm | आनंदयात्री
वाह .. काय सुरेख प्रतिसाद !!
6 May 2009 - 4:06 pm | सहज
हेच म्हणतो.
सुरेख प्रतिसाद.
6 May 2009 - 4:07 pm | दशानन
:)
सुंदर
थोडेसं नवीन !
6 May 2009 - 10:11 pm | प्राजु
अवलियांचा प्रतिसाद आवडला.
कविताही आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 May 2009 - 4:01 pm | मनीषा
सुरेख कविता !
(असच घर सगळ्यांना लाभो.)
6 May 2009 - 4:16 pm | मराठमोळा
मनीषातै,
असच घर सगळ्यांना लाभो
असेच म्हणतो.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
6 May 2009 - 4:11 pm | परिकथेतील राजकुमार
कवीता छानच.
कविता वाचुन चुलत, आत्ये बहिणींचे चेहरे डोळ्यासमोर आले, अगदी तंतोतत वर्णन.
अवांतर :- अदिती आणी आनंदयात्री दोघांच्या प्रतिक्रीया वाचल्या. फक्त येव्हडेच म्हणायचे आहे की नाचुन गाउन कृष्णभक्तीत रंगणारी राधा थोर आणी विष पिउन कृष्णचरणी लीन होणारी मीरा सुद्धा थोरच.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
6 May 2009 - 4:16 pm | जागु
सगळ्यांच्या प्रतिसादाने मन भरुन आले आहे. सगळ्यांचे अगदी अंतकरणापासुन धन्यवाद.
6 May 2009 - 5:01 pm | निखिलराव
मस्त कविता, सुंदर मांड्णी...
6 May 2009 - 5:20 pm | प्रमोद देव
छान आहे कविता.
6 May 2009 - 9:42 pm | क्रान्ति
सुखी संसाराचं सार सांगणारी कविता खूप आवडली. :)
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
7 May 2009 - 12:13 am | भाग्यश्री
कविता आवडली!
स्वानुभव असाच नसला तरी मलाही माझ्या आईची धावपळ आठवली!
घरात सर्वांनी कितीही मदत किंवा कामं केली तरी ती 'आईची' जी धावपळ, सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती असते जनरली आईची, ती दिसली यात..
www.bhagyashree.co.cc
7 May 2009 - 10:59 am | जागु
निखिल, प्रमोदजी, क्रांती, भाग्यश्री तुमचे मनापासुन धन्यवाद.
7 May 2009 - 3:23 pm | काजुकतली
जागु अगदी मस्त कविता आहे.. मला खुप आवडली..
माझे मत अदितीसारखेच आहे, पण घरच्यांचे तसे मत नव्हते आणि मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करुन मग मी 'तसंच संसार दोघांचा आहे हा विचार लादून समानतेचं सुख मिळत नाही' अस म्हणुन सोडुन दिले... :(
.. त्यामुळे मग काही वर्षांपुर्वीपर्यंत माझीही दैनंदिनी वर लिहिल्याप्रमाणेच होती..... त्या जुन्या दिवसांची आठवण झाली.... काय धावपळ आणि काय दमणुक व्हायची त्या दिवसात. जागु तु अगदी सगळ्ळ सगळ्ळ अजुक लिहिलं आहेस...
साधना.
7 May 2009 - 3:42 pm | जागु
साधना :)
7 May 2009 - 3:48 pm | लिखाळ
जागुताई,
कविता चांगली आहे. तुम्ही वर्णन केल्या प्रमाणे अनेक गृहिणी अपल्याला आसपास दिसत असतात. अश्या गृहिणींचे कौतूक आहेच. त्यांचे कौतूकाअपण चांगल्या तर्हेने केले आहे.
पण त्यांच्या वाट्याला आलेल्या या कष्टाचे उदात्तीकरण होऊ नये असे मला वाटते. कामाची योग्य वाटणी असावी असाच विचार सर्वांनी मांडावा आणि त्याचीच भलावण करावी असे मला वाटते. त्या अनुषंघाने मांडलेली वरील प्रतिसादांतील काही मते मला पट्ली.
-- लिखाळ.
7 May 2009 - 4:01 pm | जागु
लिखाळ तुमच्या प्रतिसादाचे स्वागत आहे. तुमचे, आदिती, प्रमोदजी, साधना ह्या सगळ्यांचे म्हणणे बरोबरच आहे. पण काही ठिकाणि परिस्थितीच अशी असते जिथे स्त्रिला सारे सांभाळण्याशिवाय इलाज नसतो. उदा. जर नवरा बाहेरगावी असेल, ड्युटी १२ तासांची असेल, व्ययसायात पुर्ण दिवस बिझी राहायला लागत असेल आणि घरातील वृद्ध सासु-सासरे आजारी, अतिवृद्ध असतील तर संसार सांभाळण्यासाठी स्त्रीलाच पुढाकार घ्यायला लागतो.
माझ्या बाबतीत म्हणायचे झाले तर माझ्या घरी मोलकरीण आहे धुणी-भांड्यांना, मलाही नवरा मदत करतो काही कामांमध्ये कधी कधी मुलीची अंघोळ, बेड लावणे व इतर छोट्या छोट्या गोष्टींत पण इतर कामं असतातच. माझा नवरा पेशाने वकील आहे. सकाळी ७ पासुन दारात क्लायंट येतात. त्याच्यातुन पण वेळ काढुन तो मला थोडीफार मदत करतो. पण बाकीच्या खुप गोष्टी घर सांभाळण्यासाठी कराव्या लागतात ज्याच तंत्र स्त्रियांनाच माहीत असत. जे मी करते त्याची जाणीव माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तिला आहे. त्यामुळे मला शारीरीक कष्ट होत असले तरी मानसिक समाधान खुप आहे.
7 May 2009 - 4:08 pm | मनीषा
जे मी करते त्याची जाणीव माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तिला आहे. त्यामुळे मला शारीरीक कष्ट होत असले तरी मानसिक समाधान खुप आहे.
हे महत्वाचे ...
7 May 2009 - 6:37 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म... हो ना..
चुचु
7 May 2009 - 7:07 pm | जागु
=)) नेने ताई चुचु चा अर्थ मी अरेरे धरला. आणि तुमची व्य.रेखा पाहीली तेंव्हा समजल की ती तुमची स्वाक्षरी आहे. म्हणून थोडा गैरसमज झाला.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
7 May 2009 - 7:26 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म :))
चुचु
7 May 2009 - 9:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
नेने ताई चुचु चा अर्थ मी अरेरे धरला. आणि तुमची व्य.रेखा पाहीली तेंव्हा समजल की ती तुमची स्वाक्षरी आहे.
ठ्यॉ करून हसले! =)) =))
जागुताई, अर्थ आवडला नाही असं मी जे वर लिहिलं आहे ते माझ्या स्वतःच्या परिस्थितीवर भाष्य होतं; ते माझं व्यक्तीगत, खासगी मत आहे. अर्थातच तुम्ही म्हणता तसं ज्याचं त्याचं मत (आणि आयुष्य) ज्याच्या त्याच्या जागी योग्यच असतं.
7 May 2009 - 9:56 pm | श्रीकृष्ण सामंत
जागु,
कविता आवडली अन नावडली. काय फरक पडतो इतराना.?
हा व्यक्ति-व्यक्तिच्या "कल्चर" मधला फरक आहे.
"रांधा,वाडा,उष्टीकाढा" हे एक कल्चर आणि "I don't care it is your problem" हे दुसरं.
हे दोन विचार प्रवाह.
पहिल्यात "माया-ममता ह्या जगतीवर" आहे ह्याची जाणीव.
तर दुसर्यात Business attitude प्रकर्षाने.
दोघातही अधीक-उणे आहे.
वाद होतो जेव्हा कल्चरं मिश्रीत होण्याच्या प्रयत्नात असतात तेव्हा.
नाहीपेक्षा जो तो आपआपल्यात सुखी असतो.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
8 May 2009 - 9:25 pm | चन्द्रशेखर गोखले
वस्तुस्थिती दर्शक कविता ! हे खर आहे !!
9 May 2009 - 12:30 am | जागु
आदीती, सामंत गोखले वैचारीक प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
9 May 2009 - 6:30 am | समिधा
आज काल तु कवितेत दाखवले आहेस तसे किंवा आदिती म्हणते तसे अश्या दोन्ही बाजु वेगवेगळ्या घरातुन दिसत असतात.
मागच्या दोन्-तिन पिढ्यांपुर्वी तु दाखवलेल चित्र बहुतेक घरातुन होतच
आता थोड्याफार ठिकाणी बदललेल पण आहे.
तुझी कविता मात्र खुपच छान आहे. खुप सुंदर लिहील्या आहेस सगळ्या धावपळी. =D>
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
9 May 2009 - 10:24 am | सूहास (not verified)
कवितेतुन प्रकट झालेली एका विवाहीत स्त्री ची मानसिकता दर्शविते.
आजकाल नातेस॑बध त्यागावर कमी व हितावर जास्त अवल॑बुन असतात,आलेल्या प्रतिसा॑दावरुन हिच भावना आणखीच बळकट झाली...
सुहास...
कसे दिवस जातात कोण जाणे......