पावसाळी भटकंती - कमळगड

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
25 Jun 2023 - 2:06 am

मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड

मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं . विमुक्त नावाचा एक जण होता तो असं लिहायचा , माबो वरचे यो रॉक्स आणि रोहित ह्यांचे लेखन वाचुन वाटायचं की हा ट्रेक व्हायलाच पाहिजे . आता असं लेखनही दृष्टीस पडतं नाही .
नजरेस पडतात ते युटुब व्हिडीओ अन एव्हन वर्स इन्स्टाग्राम रील्स . हे रील्स पाहुन अक्षरशः किळस वाटायला लागते. हरिहर , देवकुंडची जत्रा पाहुन तिथे जायची इच्छाच उरली नाहीये , नुकताच सांदणदरी येथील खचाखच गर्दीचा रील पाहुन वाटलं की कसारा लोकल लाईन सांदण दरी पर्यंत वाढवण्यात आली आहे की काय ! त्यामुळे कुठेही गेलो तरी शक्यतो इन्स्टावर काहीही टाकायचे नाही असा एक नियम केलेला आहे तुर्तास!
पण एका ज्येष्ठ मिपाकरांचा फार पुर्वी आलेला मेसेज पाहिला - जुन्या मिपाकरांनी लिहित रहायला हवं . मग मिपावर लिहावेसे वाटले. कोणजाणे त्या निमिम्त्ताने ह्या वर्षी अजुन चांगले ट्रेकस होतील!

गेल्यावर्षी केलेला कमळगडचा हा पावसाळी ट्रेक :
संक्लिद्य ग्रुपवर मेसेज टाकला - पावसाळी ट्रेक - ज्यांना जमेल त्यांनी चला . नेहमीप्रमाणेच - कट्टर मावळा किसनदेव, गावडे सर अन अस्मादिक असा तीन जणांचा कंपु जमला अन जास्त काही प्लॅन्ड नाही असा प्लॅन ठरला!

१. कमळगड- धोम धरणाच्या वरच्या अंगाला असलेला छोटुसा गड . खुप काही खास किल्ला वगैरे असेल असे वाटत नाही . काही विशेष इतिहासही मला तरी माहीत नाही. पण नितांत सुंदर . मुळात तो धोम धरण परिसरच नजर लागावा इतका सुंदर आहे ! मध्ये धोम धरण , अलिकडे पाचगणी अन पलिकडे कमळगड ! पण इथे गर्दीचा लवलेषही नाही . कमळगड च्या पायथ्याशी कोढिवली की काय नावाचे छोटुसे गाव आहे , पण तिथे काही खायची प्यायची सोय होईल असे दिसत नाही. आम्ही तुडुंब नाष्टा करुन गेल्याने आम्हाला जेवणाची चिंता नव्हती!
आता फक्त पाऊस ,जंगल आणि हिरवळ ( खरी हिरवळ) एन्जॉय करायचे होते >
1

२. घनदाट ढगांनी भरुन आलेलं आभाळ आणि दुरवर दिसणारे बलकवडी धरण !
2

३. बाकी गड वाटतो तेवढा सोप्पा नाही , खुप चालायचे आहे , चालुन चालुन दम लागला की मध्ये एक भगचा धवज दिसतो अन तिथं पोहचुन हुश्श केलं की आपल्या लक्षात येते कि आत्ताशी एक तृतीयांश ट्रेक झालेला आहे ! तिथे तांबलो , थोडी विश्रांती घेतली !

निसर्गदेखाव्याचे निवांतपणे अवलोकन करताना गावडे सर
3

४. कमळगड माडवणी तुपेवाडी
4

५. "तो दिल्लीपती औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लॅस्टिकची बोटल त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पुर्ण करते !"
>>> आयेम टोटली स्टम्प्ड ! काय लॉजिक ? म्हणजे बस मध्ये रुमाल टाकुन जागा पकडयचे तसे औरंगजेब प्लॅस्टिक च्या बॉटल टाकुन गड किल्ले जिंकायचा का ? टाक बिसलरी की घे अजिंक्यतारा , टाक किनले की घे सिंहगड , टाक अ‍ॅक्वा की घे पन्हाळा !
पण जाऊ दे , आम्ही काय बोलणार ? मला दहशत बसली आहे "ह्या" लोकांची. आपण काहीही न बोललेलेच उत्तम ! तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||

5

६. घनदाट धुक्यात अन जंगलात हरवलेली वाट शोधताना किसनदेव
6

८. हे खालील मश्रुम पाहुन माझे डोळे चमकले , पण मी ह्या विषयातील तज्ञ नाही , त्या मुळे मी येथे काहीही बोलायचे टाळत आहे. तुमच्या माहीतीतील कोणी मश्रुमतज्ञ असल्यास "मला जे वाटत आहे ते हे मश्रुम आहे का" हा प्रश्न जरुन विचारा अन मला कळवाही !
8

९. कावेची विहिर ! गडाच्या कातळात खोलवर खणलेली कावेची विहिर ! किती खोल असेल देव जाणे पण १०० फुट तरी नक्की असावी.
9

१०. खोल खोल विहितीत उतरताना सांभाळुन उतरावे लागते अन वर येताना चांगलीच कसरतही होते .
10

११. जंगल घनदाट . त्यात धुके . त्यामुळे व्ह्यायचे तेच झाले , वाट चुकले . जिथवरं पोहचलो तिथुन पुढे खोलदरीशिवाय काहीही दिसत नव्हते अन मागे जावे तर परत वाट सापडेल ह्याची शाश्वती नव्हती , अन अंधार झाला तर काय ही भितीही होती . वन डे ट्रेक म्हणुन काहीही प्लॅन न करता केलेला ट्रेक होता . शेवटी डेरींग करुन दरीच्या कड्यावरुन , पार्श्वभाग घासत घासत कसे बसे खाली उतरलो . वेडे धाडस होते ते पण करण्याशिवाय पर्यायही नव्हता . खाली पोहचलो तेव्हा तेथील गावकरी भूत पाहिल्या सारखे आमच्याकडे पहात म्हणाला - काय इकडुन उतरलाय तुम्ही , ही काय वाट आहे का ? तो डिसेन्ड इतका डेंजरस होता की त्याचे फोटो काढले असते अन चुकुन घरी पाहिले असते तर पुढच्या सगळ्याच ट्रेक्स प्लॅन्सवर गृहखात्याकडुन काट मारण्यात आली असती , तस्मात मीतरी उतरताना फोटो काढले नाहीत . किसनदेव आणि गावडेसरांनी काढले असतील तरी ते शेयर करणार नाहीत ह्याची मला खात्री आहे !

हीच ती धुक्यात हरवलेली चकवा देणारी वाट >
11

अजुन खुप फोटो काढले , पण किती शेयर करायचे ! बाकी गडमाथ्यावर चर एक एककर जंगल साफ करुन शेतजमीन बनवलेली दिसली , त्याच्या मध्ये २-४ कुटुंबं राहातील असे साधेसे घर दिसले. घनदाट धुक्यात हरवलेले. नितांत सुंदर . अक्षरशः माझ्या स्वप्नातील घर ! पण प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे म्हणुन अन कोणाची नजर लागायला नको म्हणुन त्याचे फोटो काढण्याचा मोह आवरला. त्यांच्याकडे संध्याकाळी नाष्त्याची अन गरमागरम चहाची उत्तम सोय झाली ! पावसात भिजल्यावर गरमागरम चहा सारखं सुख नाही !

अहाहा . लेख लिहिला. माझं मलाच भारी वाटलं . एकदम पावसात भिजल्यासारखं. एक वेळ मते जुळत नसली तरी मने जुळणारे दोन चार जरी मित्र असले की असे असे ट्रेक करायला भन्नाट मजा येते ! मिपाच्या कृपेने असे मित्र इथे भेटलेत ह्याचं खरेच मला समाधान आहे . बाकी आता ह्या वर्षी अजुन काही मोजके पावसाळी भटकंतीचे बेत आहेत , बघुया कसे योग जुळुन येतात ते !

मर्यादेयं विराजते !
लेखनसीमा
_______________________________________________________________________

प्रवासआस्वाद

प्रतिक्रिया

कंजूस's picture

25 Jun 2023 - 5:00 am | कंजूस

हल्ली गर्दी वाढली आहे मान्य. पण मिपा,माबोवर लिहीत नाहीत हे खरंय.
कारण मर्यादित वाटसप ग्रूप तयार झाले आहेत. तिकडे फोटो आणि विचारांची देवाणघेवाण लगेच होते. लिहायचा त्रास कोण घेणार?
तरीही हल्लीच्या पद्धतीने यूट्यूबवर विडिओ टाकून लिंक देत जा. दोन दोन मिनिटांचे विडिओ क्लिप्स करून जोडून वीस मिनिटांचा विडिओ खूप काही दाखवेल.
आगामी ट्रेक्सच्या प्रतिक्षेत.

मार्कंण्णा, लिहिते झालात ते बरं केलं, येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती. आपल्या अशाच ताम्हिणीतल्या चिंब भटकंतीची आठवण आली.
लिहिते रहा.

प्रसाद गोडबोले's picture

25 Jun 2023 - 10:55 am | प्रसाद गोडबोले

ताम्हीणी भटकंतीवर देखील लेख लिहिला होता छोटेखानी.
https://www.misalpav.com/node/39632
जुन्या लेखनावरील फोटो गायब कसे होता हे मला न सुटलेले एक कोडेच आहे.

फेसबुकवरून सामायिक केलेले फोटो (fbcdn server)गायब होतात. माझेही गेले. ते मी पुन्हा दुसरीकडून टाकले. संपादन बटण वापरून परत टाकता येतील.

सतिश गावडे's picture

25 Jun 2023 - 2:14 pm | सतिश गावडे

येताना झालेल्या घसरगुंडीची चक्षुवैसत्यं हकिकत तुम्ही आणि गावडे सरांकडून ऐकलीच होती.

हा थरार आठवला की अजूनही थरकाप होतो, वेडे धाडस होते ते पण दुसरा काही पर्याय नसल्याने करावे लागले होते.

Bhakti's picture

25 Jun 2023 - 6:14 am | Bhakti

मन चिंब पावसाळी...

मराठीत कुत्र्याची छत्री म्हणतात. मशरूम कुटुंबातील आहे पण खात नाहीत, बहुदा विषारी असावेत.

मशरूम तज्ञ नाही पण अनुभवाने सांगतोयं.

गड भटकंती मस्तच.

सतिश गावडे's picture

25 Jun 2023 - 2:19 pm | सतिश गावडे

अचानक ठरलेला ट्रेक, आनंददायी प्रवास, गप्पा मारत घुके अंगावर घेत झालेली चढाई, गडावरील बेभान वारा आणि वाट चुकल्याने तीव्र उतार असलेल्या सोंडेवरुन खाली उतरण्याचा थरार.. शहारे आले अंगावर ते सर्व आठवून.

सौंदाळा's picture

26 Jun 2023 - 10:20 am | सौंदाळा

पावसाळ्याच्या सुरुवातीलाच सुंदर लेख आणि फोटो.
या शनिवारी सहकुटुंब रायरेश्वरला जायचे ठरत आहे.

गोरगावलेकर's picture

26 Jun 2023 - 11:10 am | गोरगावलेकर

बाकी आता ह्या वर्षी अजुन काही मोजके पावसाळी भटकंतीचे बेत आहेत
येऊ द्या त्यावरही लेख. आवडेल वाचायला.

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2023 - 1:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

भटकंती मस्तच!! लेख आणि फोटो भन्नाट आलेत!!

रच्याकने-- ७/८/९ जुलै ला एकदिवसीय पन्हाळ-विशाळ ट्रेक आहे. कमीत कमी ४०(अक्षरी चाळीस) कि. मी. चालावे लागेल पांढरपाणीपोत्तुर. कोणी येणार असल्यास कळवा मला.

माहीती--मुंबई चे चंद्रकांत साटम सर दरवर्षी हा ट्रेक काढतात. बोरिवली,सायन्,वाशी,पुणे,कोल्हापुर,पन्हाळा अशी बस जाते. वाटेत मेंबर येत जातात.

यावर्षीचा कार्यक्रम--
शुक्रवारी ७ जुलै ला सायंकाळी बोरिवलीहुन प्रस्थान. साधारण १०-११ वाजेपर्यंत पुणे. ८ तारखेला पहाटे ४ पर्यंत पन्हाळा. तिथुन हर हर महादेव करुन चालायला सुरुवात. जेवण खाण आपले आपण बरोबर घेणे. वाटेत जिथे वेळ मिळेल तिथे जेवणे. सायंकाळी ५-६ वाजेपर्यंत पांढरपाणी. ईथे बस येउन उभी राहते. ज्यांना बसमध्ये बसायचे ते बसतात. उरलेले विशाळगडाकडे कूच करतात. ९ तारखेला पहाटे ३-४ पर्यंत विशाळगड पायथा. तिथुन बसने परतीचा प्रवास. वाटेत एक एक मेंबर ड्रॉपणे.

मी जाणार आहे. साटम सरांचा नंबर ९८१९० २८०१२

सौंदाळा's picture

26 Jun 2023 - 3:17 pm | सौंदाळा

साटम सरांबद्दल आणि या ट्रेकबद्दल माहिती आहे.
एकदा चालू केल्यावर फक्त पांढरपाणीलाच बाहेर निघू शकतो किंवा मग ट्रेक पूर्ण करुन विशाळगडला. पण पांढरपाणीपर्यंत पोचतानाच कित्येकांच्या नाकी नऊ येतात.
शिवरायांच्या पावलांवरुन त्याच दिवशी, त्याच वेळी त्याच मार्गाने जाणे निश्चितच रोमांचित करणारे आहे पण लोकांचे अनुभव वाचले / ऐकले आहेत त्यावरुन हे आपले काम नाही याची खात्री पटली आहे.
रच्याकने मिपावर याबद्दल कोणी लिहिले आहे का?
तुम्ही जाणार आहे का? किंवा आधी गेला आहे का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2023 - 3:38 pm | राजेंद्र मेहेंदळे

जाहिरात- हा लेख वाचा

http://www.misalpav.com/node/28324

मी हा ट्रेक ३ वेळा केला आहे. २०१४/१५ आणि २०१७. यावेळी जायचा विचार आहे.

सौंदाळा's picture

26 Jun 2023 - 4:42 pm | सौंदाळा

तुम्हाला त्रिवार मुजरा आणि दंडवत __/\__

किल्लेदार's picture

27 Jun 2023 - 6:55 am | किल्लेदार

छान. कमळगडाचा ट्रेक खरं तर कितीदा ठरवला असेल. पण कधी प्रत्यक्षात करता आला नाही. महाबळेश्वर, केंजळगड, रायरेश्वर आदी ठिकाणांहून नेहमी बघितला पण राहूनच गेला. तुमच्यामुळे घरबसल्याच झाला :). गर्दीमुळे खरंच कुठे जावसं वाटतंच नाही. केंजळगडावर गर्दी नव्हती हे ऐकून त्यातल्या त्यात समाधान वाटलं.

प्राची अश्विनी's picture

27 Jun 2023 - 7:47 am | प्राची अश्विनी

+११
घरबसल्या अनुभवला.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2023 - 5:07 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

चित्रगुप्त's picture

28 Jun 2023 - 6:41 am | चित्रगुप्त

एवढी रोमांचक, साहसी सफर केलीत आणि त्याबद्दल इथे लिहीलेत हे खूपच कौतुकास्पद वाटले.
कधीकाळी अशी अचानक ठरवून केलेली साहसं, तेंव्हाचे ते रोमांचक अनुभव वगैरे आठवले. मात्र त्याकाळी चारचाकीच काय पण स्कूटरी वगैरे पण फारच कमी जणांकडे असायच्या. किल्ल्यांवर वगैरे शुकशुकाट असायचा. ट्रकवाल्यांना थांबवून टपावर बसून किंवा सायकलीने अश्या अनेक सफरी करायचो. बहुतेक वेळी एकटाच असायचो... गेले ते दिवस. आता तर गर्दी वगैरे मुळे कुठे जावेसेच वाटत नाही.
असेच फिरत-लिहीत रहावे. जुन्या मिपाकरांनी पुन्हा लिहीते झाले पाहिजे.