माया

अवतार's picture
अवतार in जे न देखे रवी...
26 Jun 2023 - 1:31 am

अस्पर्शित संध्याकाळ
घनव्याकूळ हे आकाश
मेघांना भिडतो वारा
तुटती थेंबांचे पाश

वाळूत गिरविली स्वप्ने
लाटांनी पुसली जाती
हलकेच उतरतो चंद्र
तिमिराच्या पंखावरती

क्षितिजाने सूर्याचा
मग हात घेतला हाती
अंबरात नक्षत्रांच्या
त्या स्निग्ध बावऱ्या ज्योती

पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनात आठवते मग
आईची प्रेमळ माया

भावकविताकविता

प्रतिक्रिया

अनन्त्_यात्री's picture

26 Jun 2023 - 8:52 am | अनन्त्_यात्री

आवडली!

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2023 - 8:59 am | कर्नलतपस्वी

सुदंर रचना.

तुषार काळभोर's picture

26 Jun 2023 - 9:09 am | तुषार काळभोर

प्रत्येक कडवे स्वतंत्रपणे सुंदर आहे, पण एकाच कवितेतील असल्याचे एकसंधपणे जाणवत नाही. कवितेशी माझा दुरान्वयेही संबंध येत नसल्याने असेल कदाचित.

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2023 - 9:15 am | कर्नलतपस्वी

तेरा वर्षा पेक्षा जास्त पण रचना मात्र फक्त तीन...

असे तीन तेरा का बरे!

चांगले लिहीले आहे. आणखीन कुठे लिहीता का?

पहिल्याच धाग्यावर तुफान हाणामारी करून शेवटच्या चेंडूवर षटकार सीमापार तटवलात. क्षात्रवृत्ती आवडली.

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2023 - 9:31 am | कर्नलतपस्वी

वातावरण निर्मिती पहिल्या तीन कडव्यात सुसंगत वाटली. चौथ्या कडव्यात अनपेक्षित वळण घेतल्याने कविते पासून वेगळे झाल्या सारखे वाटते.

कातरवेळी आईला मुलांची आठवण येते मुलांना नाही.त्यामुळेच आईची प्रेमळ माया हा भाव असंगत वाटतो.
या उलट कातरवेळी दुर गेलेल्या प्रेमी प्रेमिकांना जी हुरहूर लागते आणी ते सुद्धा सागर किनारी ती इथे तर्कसंगत वाटते.शेवटची ओळ पंच लाईन आहे ती मी अशी लिहीली असती.
-

पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनी दाटते हुरहूर
आठवते तुझीच मनमोहक काया

अवतार's picture

26 Jun 2023 - 11:57 am | अवतार

विसंगत वाटू शकते.
गेल्या वर्षी माझ्या आईचे निधन झाले. त्या भावनेतून ही कविता एकसंधपणे सुचली आहे.
ठरवून जुळवून लिहिली असती तर कदाचित वेगळी होऊ शकली असती.
प्रतिक्रियेबद्दल आभार !

कर्नलतपस्वी's picture

26 Jun 2023 - 1:39 pm | कर्नलतपस्वी

सहमत.

अशावेळेस कधी कधी एकांत दुःखावर फुंकर घालतो. आई आणी वडील गेल्याचे दुःख अनुभवले आहे. आपली वेदना समजू शकतो.

ग्रेस यांची " ती गेली तेंव्हा पाऊस निनादत होता" अप्रतिम रचना नेहमीच मला जवळची वाटते.

आपल्या दुःखात सहभागी आहोत.
फार चांगले केले व्यक्त झालात.

सतिश गावडे's picture

26 Jun 2023 - 10:12 am | सतिश गावडे

खूप दिवसांनी एक छान कविता वाचली.

Bhakti's picture

26 Jun 2023 - 10:35 am | Bhakti

सुंदर!

पाण्यावर येई अलगद
ही चंद्रफुलाची छाया
मनात आठवते मग
आईची प्रेमळ माया

कॉमी's picture

26 Jun 2023 - 10:39 am | कॉमी

छान. कविता आवडली.

प्राची अश्विनी's picture

26 Jun 2023 - 10:44 am | प्राची अश्विनी

वाह! अतिशय आवडली.

अवतार's picture

26 Jun 2023 - 12:00 pm | अवतार

सर्वांचे मन:पूर्वक आभार!

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2023 - 2:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

आशयाच्या दृष्टीने सुंदरच, पण खालील बदल केले तर मीटरमध्येही बसेल.

क्षितिजाने सूर्याचा

क्षितिजानेही सुर्याचा

मनात आठवते मग

मग आठवते मनी माझ्या

अवतार's picture

26 Jun 2023 - 6:40 pm | अवतार

धन्यवाद !
'क्षितिजानेही' ह्या शब्दात अजून कोणीतरी सूर्याचा हात धरल्याचा आभास होतो.
म्हणून तो शब्द टाळला.
दुसऱ्या वाक्यात बदल केला आहे.

चांदणे संदीप's picture

26 Jun 2023 - 6:10 pm | चांदणे संदीप

किरकोळ बदल केले तर अजून चांगली होऊ शकेल.

सं - दी - प