दोन शशक- घरी बसून कमवा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
9 May 2023 - 3:46 pm

मागच्या आठवड्यात मला एका मुलीचा व्हॉट्सअप मेसेज आला होता.मग कुठल्यातरी अमेरिकेतल्या नंबरावरून फोन आला.म्हणाली घरून काम करा आणि पैसे कमवा.म्हणे फेसबुक,इंस्टाग्राम,युट्युबवर वगैरे बघून ते सांगतील त्या अकाउंटला लाईक करायचे पैसे मिळणार. म्हटले घरबसल्या काय वाईट आहे? ती म्हणाली तसे पहिले ५०० रुपये भरून अकाउंट उघडले.पहिल्याच दिवशी १०० रुपये मिळाले कामाचे. मी खुश. रोज साधारण तेव्हढेच मिळत होते.२-३ दिवसांनी मी कॉल करून विचारले की जास्त पैसे मिळवायला काय करावे लागेल? ती म्हणाली ५० हजार रुपये भरून प्रीमियम अकाउंट काढावे लागेल. तेही काढले. आता मला दररोज ५०० रुपये मिळू लागले. मजाच आहे, हे असेच चालत राहिले तर लवकरच मी नवी गाडी घेऊन टाकणार.
=====================================
काल पुन्हा तिचा फोन आला.म्हणाली १० लाख रुपये भरून गोल्ड अकाउंट काढलेत तर रोज साधारण ५ हजार रुपये कमवाल. कुठेत माझ्याकडे एव्हढे पैसे? काहीतरी जुगाड करायला हवा. २-३ मित्रांना विचारून पहिले. सगळेच कंगाल. शेवटी बाबांनी एक एफडी मोडला आणि थोडे पैसे दिले. बाकी पैसे आईने दागिने विकून दिले.ताबडतोब त्या मुलीच्या अकाउंटला ते पाठवले.रात्रभर झोपच आली नाही. मी आता माझी कुरियर बॉयची नोकरी सोडून हेच काम करणार. घरबसल्या दिवसाला ५ हजार रुपये मिळणार असतील तर अजून काय पाहिजे? घरही बांधायचे आहे. पुढच्या वर्षी गावी जाऊन लग्नाचा बार उडवणार.
पण सकाळपासून त्या मुलीचा फोन बंद येतोय.आज कामही मिळाले नाहीये.नक्की काय झाले असावे?

मांडणीविचार

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

9 May 2023 - 4:39 pm | कुमार१

आवडली...

सुबोध खरे's picture

9 May 2023 - 6:46 pm | सुबोध खरे

नाही पटलं

१० लाख रुपये भरण्यासाठी आई दागिने विकेल आणि बाबा एफ डी मोडतील हे केवळ अशक्य वाटतं

राजेंद्र मेहेंदळे's picture

9 May 2023 - 8:02 pm | राजेंद्र मेहेंदळे

मुलगा कुरियर बॉय आहे. त्याचे भविष्य सुधरावे म्हणुन आणि त्याच्या हट्टापायी आईवडील पदरचे पैसे देतील असे म्हणायचे आहे.

श्रीगणेशा's picture

9 May 2023 - 11:31 pm | श्रीगणेशा

आवडली कथा!

>>>पण सकाळपासून त्या मुलीचा फोन बंद येतोय.आज कामही मिळाले नाहीये.नक्की काय झाले असावे?

त्या मुलीचा फोन बंद होऊन चार दिवस झाले, पुरता फसलो. काल मनाची तयारी करून व्हॉईस चेंजर अँप डाउनलोड केले. एकाच दिवसात दोन जण गळाला लागले. पूर्वीचे नुकसान, आता उचल घेईन त्या रकमेचे व्याज आणि नवीन सिम कार्ड वगैरे भांडवलाचा हिशेब करून नवीन लोकांना योग्य वेळी १५ लाखाचा "प्लॅटिनम प्लॅन" विकावा लागणार..

कर्नलतपस्वी's picture

10 May 2023 - 6:35 am | कर्नलतपस्वी

सापळे इथे माणसाचे माणसाला धरावया
वैखरीतून पेरती मोती सावजाला घेरावया

दिवसातून दहा बारा फ्राॅडस्टर चे काॅल येतात. माझ्यासारख्या सर्वसामान्य सेवानिवृत्त माणसाकडे काय मिळणार पण म्हणतात ना ,भागते चोर की लंगोटी

अजुन तरी रूळ सोडून सुटला नाही डब्बा.

आजच्या काळात चमडी आणी दमडी दोन्ही वाचवणं कठीण झालयं.

विवेकपटाईत's picture

10 May 2023 - 6:04 pm | विवेकपटाईत

कथेत रक्कम मोठी होती. बाकी अश्या मोहात लाखो युवक फसतात ज्यांना मेहनत न करता घरी बसल्या काम करायचे असते. एमएलएम कंपन्या अॅमवे , vestige इत्यादि ही अशीच हजारो रुपयांचे आमिष दाखवितात. वर्षाच्या आत मोह भंग होतो. तो पर्यन्त हजारो रूपयांचा स्वसतातला कचरा महागात विकत घेतला असतो.