फार फार वर्षांपूर्वी एका पर्वताच्या माथ्यावर एक भलाथोरला पाषाण राहत होता. त्याच्या आजूबाजूला खूप हिरवळ, झाडे आणि वेली असल्यामुळे तिथले वातावरण नेहमीच प्रफुल्लित असायचे. वसंत ऋतूत तर तिथे कोवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी बहार यायची. तो पाषाण तिथल्या सर्व झाडवेली आणि फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्या सर्वांची एकच भाषा होती, स्पर्शाची. असेच दिवस मजेत चालले होते. सर्वजण सुखाने आजूबाजूला नांदत होते.
पण एकदा घडले असे की, त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून काही माणसे पर्वत चढून वर आली आणि त्यांनी त्या पाषाणाला उकरून वर काढला. मोठमोठ्या लाकडाच्या ओंडक्यावरून घरंगळत त्याला त्यांनी खाली गावात आणले. गावाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या मैदानात त्यांनी त्याला ठेवले.
पर्वताला आपल्यापासून खूप दूरवर पाहून पाषाणाला अतीव दु:ख झाले. त्या गावात त्याच्या आजूबाजूला गप्पागोष्टी करायला एकही झाड नव्हते का हिरवळ नव्हती. दिवसभर काही उनाड मुले त्याच्यावर चढून उड्या मारायची आणि त्याच्या आजूबाजूला खेळ-खेळून दंगा करत राहायची. तो बिचारा अगदीच हवालदिल झाला.
साधारण आठवड्यानंतर एका सकाळी चार माणसे त्याच्याजवळ आली. त्यांच्या जवळच्या पिशवीत काही अवजारे होती. त्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या आकाराची छन्नी, हातोडा व घण होता. त्या लोकांनी लगेचच हातात घण घेऊन चारही बाजूंनी त्याच्यावर घाव घालायला सुरूवात केली. पाषाणाला भयानक वेदना होऊ लागल्या. तो किंचाळू लागला, आक्रोश करू लागला. पण त्याचा आवाज त्या माणसांना ऐकू येत नव्हता. एक महिनाभर ते सर्वजण त्या पाषाणाला फोडत राहिले. छन्नीने त्याला कोरून कोरून त्यांनी त्याचा आकारच बदलला.
पुढे काही दिवसांनी त्यांनी त्याच्यापासून जवळच एक चबुतरा बनवला व त्याला उचलून त्या चबुतऱ्यावर ठेवले. तिथेच आजूबाजूला त्यांनी रांगेत बरीचशी झाडे लावली. चबुतऱ्याच्या चोहीकडे लुसलुशीत गवताची हिरवळही लावली. आता तो परिसर सुंदर बनला. पण पाषाण मात्र दु:खीच होता. आता तो हळूहळू आजूबाजूच्या झाडांशी बोलून त्याचे दु:ख व्यक्त करू लागला. रोज तो त्यांना त्याच्या पर्वतावरील जीवनाविषयी अश्रू ढाळून सांगे व ज्या माणसांनी त्याला तिथून काढून इथे गावात आणले व ज्यांनी त्याचे असंख्य तुकडे केले त्यांना शिव्याशाप देई. त्याच्या अंगावर झालेले प्रत्येक घाव तो विसरू शकत नव्हता. आपल्या आधीच्या रूपाला आठवून त्याला अजूनच रडू येई. तिथल्या झाडांना त्याची दया यायची पण ते सात्वंनाव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हते.
एके दिवशी त्या परिसरात सकाळपासून माणसांची लगबग उडाली. खूप माणसे तिथे जमा झाली. त्या सर्व लोकांनी त्या पाषाणावर दूध, दही, तूप ओतून त्याचा अभिषेक केला व नंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावर नवीन कपडे चढवले. तिथे जमलेला प्रत्येकजण त्याच्या अंगावर फुले उधळून त्याच्या पायावर मस्तक ठेऊन नमस्कार करून जात होता. पाषाणाला काहीच कळेना हा काय प्रकार आहे ते. मग रात्री जेव्हा तिथे कोणीही माणूस उरला नाही तेव्हा त्याने हळूच बाजूच्या एका झाडाला विचारले तेव्हा त्या झाडाने त्याला सांगितले की ज्या माणसांना तो इतकी दूषणे देत होता त्यांनी त्याचे रूपांतर एका देवतेच्या सुबक मुर्तीमध्ये केले होते आणि यापुढे ते सर्वजण कायमच त्याच्या पायाशी लोळण घेऊन त्याला आदराने वागवणार होते. हे ऐकून पाषाण आनंदित झाला व आजवर झालेल्या प्रत्येक वेदनेचा त्याला क्षणात विसर पडला.
- संदीप चांदणे
प्रतिक्रिया
21 Mar 2023 - 12:10 am | चित्रगुप्त
खास लहान मुलांसाठी असलेल्या या बालकथेतून नेमका काय बोध घ्यावा ते आमच्या बालबुद्धीस समजले नाही. कृपया खुलासा करावा.
21 Mar 2023 - 12:51 pm | चांदणे संदीप
तात्पर्य : टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. :)
सं - दी - प
23 Mar 2023 - 2:33 pm | राजेंद्र मेहेंदळे
टपोरी बोलीभाषेत "टाकी" चा अजुन एक वेगळाच अर्थ होतो बरं!! :) (अट्ट्ल बेवडा)
21 Mar 2023 - 8:01 pm | चित्रगुप्त
लिखाण म्हणून खूपच छान आहे. मात्रः
--- तथाकथित 'देवपणा' पेक्षा हे कितितरी चांगले होते, असे नाही वाटत? निसर्गाने दगडाला दिलेल्या 'दगडपणा' पेक्षा माणसाने त्याला जबरदस्तीने दिलेले कृत्रिम 'देवपण' हे मलातरी अजिबात श्रेष्ठ वाटत नाही.
--- यावर काथ्याकूट होण्यासारखा आहे.
22 Mar 2023 - 11:34 am | टर्मीनेटर
ललित लेखन विभागात पुन्हा एकदा स्वागत कविराज!
छोटीशी बालकथा आवडली, आता आमच्या सारख्या किशोर वयीनांसाठी एखादी 'किशोर कथा' पण लिहुन सोडा की म्हणतो 😀
23 Mar 2023 - 1:08 pm | चौथा कोनाडा
सुंदर ... कथा आवडली !
खरे आहे, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
खडतर परिस्थितून जात असताना येणारा काळ आनंदाचा असू शकतो हा खुप छान बोध या कथेतून मिळतो !
25 Mar 2023 - 11:13 am | कर्नलतपस्वी
निसर्ग बोलतो, ऐकावयास कान हवे
वाट चालताना,भोवतालचे भान हवे
संदीप भो छान लिहीले आहे.
26 Mar 2023 - 4:15 pm | श्रीगणेशा
आवडली कथा!