नमस्कार मंडळी
खूप दिवसांनी एक ऐतिहासिक , सत्य आणि कल्पिताच्या सीमेवर रेंगाळणारे , उत्कंठावर्धक पुस्तक हाती आले आणि २-४ दिवसात वाचूनही झाले त्याचाच मिपाकरांसाठी हा परिचय करून देतोय. पुस्तकाच्या संदर्भसूचीमध्ये आपले मिपाकर बिपीन कार्यकर्ते यांचा उल्लेख वाचून अभिमान वाटला तसेच माझे आवडते पुस्तक "नाशिक जिल्ह्याची दुर्गभ्रमंती" लिहून नाशिक बागलाण भागातील किल्ल्यांची आपल्याला ओळख करून देणारे अमित बोरोले यांचाही उल्लेख इथे आला आहे. एकूणच सत्य आणि कल्पनेच्या सीमारेषेवरचे हे पुस्तक लिहिताना लेखकाने ऐतिहासिक,भौगोलिक, सामाजिक,तांत्रिक आणि इतर अनेक बाबींचा काटेकोरपणे अभ्यास केल्याचे संदर्भ चपखलपणे येत राहतात आणि जिगसॉ पझल सारखी कादंबरी उत्तरोत्तर जुळत जाते.
तर कथा सुरु होते सन १६७० मध्ये. शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी खंडणी मिळवायला दुसऱ्यांदा सुरतेची लूट केली आणि त्या सगळ्या खजिन्याचे ३ भाग करून ३ वेगवेगळ्या वाटांनी स्वराज्याकडे रवाना केली . वाटेवर सर्वत्र मोगलांचे राज्य सांभाळणारे सुभेदार त्यांना कडवा विरोध करणार हे त्यांनी गृहीतच धरले होते त्यामुळे प्रत्येक तुकडीबरोबर सैन्याची शिबंदीही दिली गेली. त्यातीलच एका तुकडीचा प्रमुख गोंदाजी नारो हा खूप प्रयत्न करूनही अजिंठा सातमाळा पर्वतरांगेच्या परिसरात अखेर मोगलांच्या तावडीत सापडला.आणि त्याची रवानगी औरंगाबादच्या तुरुंगात केली गेली. पण त्या आधीच त्याने आपल्याकडचा प्रचंड खजिना मोठ्या शिताफीने एका सुरक्षित ठिकाणी लपवला. पुढे संभाव्य परिसरात महिनोन महिने शोध घेऊनही मोगलांच्या हाती तो खजिना लागला नाही. पकडला गेल्यावर हर तऱ्हेने छळ होऊनही गोंदाजीने सुद्धा तोंड उघडले नाही , मात्र नियतीची योजना म्हणा किंवा काहीही --- त्याच वेळी काहीतरी फुटकळ कारणावरून एक इंग्रज अधिकारी रिचर्ड ग्रेन्जर याला मोगलानी पकडून औरंगाबादच्या तुरुंगात डाम्बला. मरणाच्या दारात उभा असलेल्या गोंदाजीची रिचर्डशी मैत्री झाली आणि मग त्याने मनात काहीएक योजना आखली. रिचर्डचा अपराध फार मोठा नसल्याने आणि त्याच्या सुटकेसाठी कंपनी सरकार खंडणी द्यायला तयार असल्याने त्याची लवकरच सुटका झाली. परंतु त्या आधी आपल्या मैत्रीचा उपयोग करून गोंदाजीने त्याला शिवाजीराजांकडे पोचवण्यासाठी काहीएक निरोप लिहून दिला. मोडी लिपीतील हा निरोप एका रेशमी कापडावर लिहिला होता. तो शिवाजीराजांकडे पोचवायचे वचन रिचर्डने गोंदाजीला दिले आणि त्याची सुटका झाल्यावर सुरतला कंपनीच्या वखारीत पोचला. तोवर इकडे गोंदाजीने तुरुंगातच डोळे मिटले. मात्र सुरतेला पोचल्यापोचल्या रिचर्डचे वडील मरण पावल्याची बातमी त्याला मिळाल्याने त्याला तातडीने इंग्लंडला जावे लागले आणि पुढे साप चावल्याचे निमित्त होऊन तोही मरण पावला. त्यामुळे रिचर्ड पुन्हा भारतात आलाच नाही आणि गोंदाजीचा निरोप त्याच्याबरोबरच राहिला. मात्र या काळात त्याने डायरी लिहिणे चालू ठेवल्याने यातील बऱ्याच गोष्टींची त्याच्या डायरीत नोंद झाली.
यावर आता सुमारे ३५० वर्षे उलटली आहेत आणि आता रिचर्डच्या तिसऱ्या/चौथ्या पिढीतील क्लारा ग्रेन्जर एका नाताळच्या सुट्टीत आपल्या मूळ घरी गेलेली असताना तिला रिचर्डच्या जुन्या ट्रँकेत ती डायरी , तो रेशमी कापडावरचा निरोप आणि इतर वस्तू मिळतात. परंतु मोडी लिपितला तो निरोप तिला वाचता येत नाही. क्लारा इतिहास/समाजशास्त्र विषयातच शिकत असल्याने तिला याचे महत्व मात्र लगेच जाणवते आणि ती फेसबुक वरून या विषयाशी संबंधित शोध घ्यायला लागते. तेव्हा एका फेसबुक ग्रुपवर तिला नाशिकचे केतकी, शौनक आणि मुंबईचा निनाद ही मंडळी भेटतात आणि त्यांच्यात माहितीची देवाण घेवाण होते. पुढचिही माहिती मिळवण्याच्या दृष्टीने क्लारा भारतात यायचे ठरवते आणि हे तिघे तिला भेटायला मुंबईत एकत्र येतात. मात्र क्लारा मुंबईत येण्याआधीच तिच्या भोवती जाळे विणले गेले आहे. तिच्या सामानात गोंदाजीचा निरोप आहे हे माहिती असलेले लोक तिचे सामान विमानतळावरच गायब करतात आणि तो निरोप मिळवायचा प्रयत्न करतात. ते जमत नाही तेव्हा त्यांचा हस्तक विकी तिचा हॉटेलपर्यंत पाठलाग करतो आणि जेव्हा क्लारा तो निरोप निनाद, केतकी आणि शौनक ला दाखवत असते तेव्हा जवळून जाताना गुप्तपणे त्याचे फोटो काढून घेतो आणि आबाजींना पाठवतो. आबाजी एका गुप्त संघटनेचे सदस्य आहेत आणि विकी त्यांचा हस्तक आहे.
थोडे विषयांतर ----
गोष्टीतल्या दुसऱ्या एका धाग्यात नाशिकमध्ये सॉफ्टवेअर कंपनी चालवणारा शौनकचा मित्र साहिल ह्याला त्याचे पुराणिक काका त्यांच्या एका मित्राचा जळालेला लॅपटॉप रिकव्हर करशील का? म्हणून विचारतात. हा लॅपटॉप रिकव्हर करताना साहिलला काही संशयास्पद फाईल्स मिळतात ज्या तो डिकोड करू शकत नाही. शंकेपोटी तो ह्याचा उल्लेख पुराणिकांकडे करतो आणि पुराणिक त्यांच्या लॅपटॉपवाल्या मित्राला ही शंका विचारतात. हा मित्र म्हणजे आबाजी. पुढे लवकरच साल्हेर किल्ल्यावर एकटाच ट्रेकिंगला गेलेला असताना साहिलचा दरीत पडून संशयास्पद मृत्यू होतो आणि जवळपास त्याच वेळी इथे पुराणिकांचाही हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू होतो.
पुन्हा मूळ गोष्टीकडे वळूया. डिनर झाल्यावर क्लारा आपल्या रूमवर जाते, आणि केतकी ,शौनक आणि निनाद आपापल्या घरी. पण त्या आधी केतकीने क्लाराच्या खोलीत गुपचूप एका कॅमेरा आणि मायक्रो फोन सेट केलेले असतात आणि समोरच्या हॉटेलात आपली खोली घेतलेली असते जेणेकरून तिला क्लारावर लक्ष ठेवता येईल. इकडे क्लारा च्या खोलीत हॉटेल बॉयच्या रूपात घुसून विकी तिचा खून करतो आणि तिच्य सामानाततील रेशमी कापडावर लिहिलेला संदेश घेउन गायब होतो. केतकी हे सगळे कॅमेरात बघून हॉटेलच्या डेस्कला निनावी फोन करून कळवते आणि हॉटेलवाले झटपट पोलिसांना पाचारण करतात. एका परदेशी तरुणीचा खून ही हाय प्रोफाइल केस गांगुर्डे नावाच्या एका नवशिक्या इन्स्पेक्टर कडे येत आणि तो ताबडतोब हॉटेलवर येऊन चौकशी सुरु करतो, परंतु लवकरच क्राईम ब्रँच चे इन्स्पेक्टर नाईक तिथे पोचतात आणि गांगुर्डेच्या हातून केस आपल्याकडे घेतात. नाईकांना आबाजी नी हाताशी धरले आहे आणि त्यांना मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आहे. त्यामुळे नाईक लगेच केतकी, शौनक आणि निनादला पकडायच्या मागे लागतात. इकडे आबाजी त्या मोदी लिपीतल्या निरोपाचा अर्थ लावायचा प्रयत्न करत आहेत तर तिकडे निनाद आणि शौनकही निनादच्या घरी येऊन तेच करत आहेत. तेव्हढ्यात निनादच्या फोनवर एक अनोळखी नंबरावरून फोन येतो. हा फोन इन्स्पेक्टर गांगुर्डेचा आहे. खरेतर त्याला निनादला फोन करायचा असतो पण तितक्यात इन्स्पेक्टर नाईक त्याला काहीबाही बोलण्यात गुंतवतात आणि फोन त्याच्या खिशात सुरूच राहतो ज्यावरून निनादला अनायासे गांगुर्डे आणि नाईकांचे संवाद ऐकू येतात. त्यावरून त्याला क्लारा चा खून झालाय आणि आपल्या तिघांना संशयावरून अटक होणार असल्याचे समजते. हे ऐकून धक्का बसलेला असतानाच केतकी तिथे पोचते आणि ही बातमी खरी असल्याचे सांगून तिकडून सटकायचा प्लॅन करते. शौनकच्या गाडीतून तिघेही निघतात मात्र वाटेत निनाद पैसे काढण्यासाठी एका ए टी एम पाशी गाडी थांबवायला सांगतो . तितक्यात पोलीस तिथे पोचतात आणि त्याला ताब्यात घेतात. मात्र केतकी आणि शौनक पळून जाण्यात यशस्वी होतात. ते आपली गाडी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी बोरिवली एस ती स्थानकाजवळ सोडतात मात्र तिथून ट्रेन ने दादर ला आणि तिथून कसारा व टॅक्सीने नाशिकला जातात. नाईकांनी या सगळ्या रस्त्यात फिल्डिंग लावली आहे, पण आपल्या अक्कलहुशारीने केतकी आणि शौनक सटकून जाण्यात यशस्वी होतात.
इकडे आबाजींनी आपल्या साने नावाच्या मित्राकडून त्या मोडी लिपीतील निरोपाचा उलगडा करून घेतला आहे आणि त्यावरून त्यांना वणीच्या सप्तशृंग पर्वताच्या माथ्यावर खजिना दडवलेला आहे असे वाटू लागले आहे. त्यांनी या खजिन्याच्या शोधात अजित चौधरी नावाच्या एका श्रीमंत माणसाला सहभागी करून घेतले आहे. अजितच्या स्कायलार्क कंपनीची खाणकाम करणारी टीम पूर्ण ताकदीनिशी अत्याधुनिक साधने घेऊन अजिंठा सातमाळा डोंगर रांगेत शोध घेत आहे. कारण अजितला या प्रचंड खजिन्यात रस आहे. मात्र टीमला असे सांगितले आहे की आपण रोडियम.पालोडियम अशा दुर्मिळ धातूंचा शोध घेत आहोत. आणि आता त्यांच्या शोधाची दिशा आबाजींनी सप्तशृंगकडे वळवली आहे.
इकडे केतकी आणि शौनक गोंदाजीचा निरोप उलगडण्यात यशस्वी होतात तो असा "दरेगावच्या पाटलाकडे एक अभयदान देणारी भयमुक्त चेहऱ्याची कृष्णवर्णी देवी आहे. तिला वंदन करून तिच्या मस्तकाकडे पहा म्हणजे तुम्हाला दिव्य संजीवनीचा रस्ता मिळेल." आता ते शोधत असलेल्या भागात ३ दरेगाव आहेत तेव्हा नक्की कुठे जावे याचा विचार करत ते शौनकच्या नाशिकच्या घरापाशी पोचतात तो त्यांच्या स्वागताला पोलीस तिथे उभेच असतात, त्यामुळे आल्यापावली परत फिरून केतकी आणि शौनक पुन्हा सी बी एस ला येतात आणि एक सुमो भाड्याने ठरवून दरेगावला जायला निघतात. सुमोच्या ड्रायव्हरच्या सल्ल्यावरून ते प्रथम सप्तशृंग गडाजवळच्या दरेगावला जातात. पण या दरेगावच्या पाटलाकडे त्यांना ती देवीची काळी मूर्ती सापडत नाही. हार न मानता ते आपला मोर्चा दुसऱ्या दरेगाव कडे वळवतात. वाटेत त्यांना कोकणा आदिवासी लोकांची एक मिरवणूक दिसते . त्यांचा भाया नावाचा उत्सव चालू असतो. सुमो ड्रायव्हरकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांना जी माहिती मिळते त्यानुसार भाया म्हणजे घरी आलेल्या पाहुण्याला काही दिवस खाऊ पिऊ घालून पुन्हा त्याच्या घरी पोचवण्याचा हा उत्सव असतो. मौखिक परंपरेनुसार भाया म्हणजे वाट चुकून आलेला कार्तिक स्वामी आणि त्याला डोंगरदेवाकडे म्हणजे शंकराकडे पोचवायचे अशी ही परंपरा. त्या दिवसात सगळे- पुरुष गावकरी एका खळ्यात एकत्र राहतात, दिवसातून एकदाच जेवतात, मांसाहार, स्त्रीसंग वर्ज्य थोडक्यात आलेल्या पाहुण्याच्या चालीरीती पाळतात आणि अखेरीस जड अंतःकरणाने त्याला त्याच्या घरी पोचवतात.
तर या दुसऱ्या दरेगावला त्यांना तुळशीराम बाबा हे पाटील भेटतात आणि त्यांच्याकडून त्यांना एक अत्यंत महत्वाची माहिती मिळते, ती म्हणजे त्यांना पाहिजे तशी देवीची मूर्ती त्यांच्याकडे वंशपरंपरागत होती पण इंग्रज कलेक्टर जॅक्सन त्या भागात या भायाच्या उत्सवाची माहिती घेण्यासाठी आला असताना तुळशीराम बाबाच्या आज्याकडून त्यांनी ती नेली आणि बदल्यात एक सर्टिफिकेट दिले. तुळशीराम बाबा केतकी आणि शौनकला ते सर्टिफिकेटही आणून दाखवतो ज्यात स्पष्ट लिहिलेले असते की "ही देवीची मूर्ती मी अनाजी काळोबा गांगुर्डे यांजकडून बॉंबे एशियाटिक सोसायटीच्या वतीने देणगी म्हणू स्वीकारत आहे." हा जॅक्सन म्हणजे १९०९ साली नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये ज्याची क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांनी हत्या केली तोच हे शौनकच्या लक्षात येते.
आता त्यांच्या तपासाला थोडी थोडी दिशा मिळू लागते. त्या देवीच्या मूर्तीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ते आपला मोर्चा नाशिकच्या अभोणकर सरांकडे वळवतात. अभोणकर सर जॅक्सनचे चरित्र लिहीत आहेत आणि त्यामुळे तेच या सगळ्या घटनेवर जास्त प्रकाश टाकू शकतील ही शौनकची अटकळ असते. सरांशी बोलताना त्यांना जॅक्सनच्या शेवटच्या दिवसांबद्दल बरीच माहिती मिळते. कोकणा आदिवासींची माहिती गोळा करून जॅक्सन जेव्हा नाशिकला परतला तेव्हाच त्याची हत्या झाली आणि त्यानंतर त्याची बायको इंग्लंडला परत गेली. जाताना तिने जॅक्सनच्या पुस्तकांचा मोठा संग्रह एशियाटिक लायब्ररीला दान केला. पण त्यात त्या मूर्तीचा कुठेच उल्लेख नाही असे अभोणकर सांगतात. पण तोवर केतकीने एक पाऊल पुढे जाऊन नवीनच गोष्ट शोधलेली असते. अभोणकर सर जॅक्सनवर पुस्तक लिहिता लिहिता एक ब्लॉगही चालवत असतात, आणि त्यावर किरण कुलकर्णी नावाच्या माणसाची प्रतिक्रिया आलेली असते की माझ्याकडे .या संदर्भात खूप सारी माहिती आहे. हा माणूस शहापूरच्या शाळेत शिक्षक असतो जे कसारा घाटाच्या खाली आहे. लगोलग केतकी, शौनक आणि अभोणकर किरण कुलकर्णीशी बोलतात आणि त्याच्याकडे जायला निघतात.
इकडे आबाजी आणि त्यांची टीम सप्तशृंग गडावर पोचली आहे आणि देवीच्या वरच्या डोंगरकड्यावर त्यांची खजिन्याची शोधमोहीम चालू आहे. एक सिकोर्स्की जातीचे चॉपर, २ ड्रोन आणि इतर सामग्री घेऊन त्यांची टीम गडमाथ्यावर कपारीत शिरली आहे. खूप वेळ शोधाशोध केल्यावर त्यानं एका ठिकाणी बरेच धातू असल्याचे सिग्नल मिळतात , तिकडे कड्यावर एक कपार असते.त्यात ते एक ड्रोन सोडतात आणि खालून ऑपरेट करून काही मिळतेय का ते बघू लागतात. पण दुर्दैवाने त्या कपारीत खोलवर गेल्याने त्यांचा ड्रोनशी संपर्क तुटतो. मग दुसरा पर्याय म्हणून ३ जणांची टीम त्या कपारीत शिरते आणि शोध सुरु ठेवते. पण आता दुसरा प्रॉब्लेम होतो. दोन्ही ड्रोन आणि टीम कपारीत, आणि आबाजी व बाकी टीम खाली असते. आणि त्यांचे सिकोर्सकी हेलिकॉप्टर मोठे असल्याने कपारीच्या फार जवळ जाऊ शकत नसते आणि रॅपलिंग करून उतरायला तेव्हढा मोठा रोप नसतो. थोडक्यात तिघेजण रात्रभरासाठी कपारीतच अडकतात. छोटे हेलिकॉप्टर किंवा २ हजार फुटाचा रोप आणल्याशिवाय त्यांची सुटका शक्य नसते आणि या दोन्ही यायला दुसरा दिवस उजाडणार असतो.
इकडे किरण कुलकर्णीला भेटून केतकी आणि शौनकला अजून जास्त महत्वाची बातमी समजते. किरणांचे पणजोबा जॅक्सनचे खाजगी मदतनीस असतात आणि त्याच्या शेवटच्या दिवसात त्याच्या बरोबरच काम करत असतात.त्यांनी आपल्या आत्मचरित्रात्मक अशा ७-८ वह्या लिहून ठेवलेल्या असतात त्या किरण दाखवतो. त्यातील एका पानाकडे केतकीचे लक्ष वेधले जाते. त्यात लिहिलेले असते की जॅक्सनने दरेगावहून आणलेल्या देवीच्या मूर्तीच्या मुकुटाचा भाग निघून त्यातून रेशमी कापडावर काढलेला एक नकाशा बाहेर पडतो.त्याची सुरळी सरळ करण्यासाठी म्हणून तो नकाशा तात्पुरता एका पुस्तकात ठेवला जातो . पण दुर्दैवाने पुढे जॅक्सन मरण पावतो आणि पुढे ती पुस्तके एशियाटिक सोसायटीला दान केली जातात. देवीची मूर्ती मात्र किरणांचे पणजोबा जॅक्सनची आठवण म्हणून घरी घेऊन येतात. पण त्या मूर्तीचीही पूजा होत नसल्याने किरण चे वडील ती मूर्ती नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला भेट म्हणून देऊन टाकतात.त्याचा एक फोटोही दाखवतात. आता मात्र तपासाला वेग येतो आणि केतकी व शौनक तडक मुंबईला एशियाटिक लायब्ररीत जाऊन धडकतात. रात्रभर तिथे गुपचूप राहून ते जॅक्सनचा पूर्ण संग्रह पालथा घालतात आणि हवा तो नकाशा त्यांना सापडतो.
अभोणकर नाशिकला परत येतात तोवर इन्स्पेक्टर नाईक त्यांच्या घरी येऊन गेलेले असतात आणि त्यांना भेटायचा निरोप ठेवलेला असतो. अभोणकर नाईकांना सार्वजनिक वाचनालयात भेटतात आणि सगळे खरे खरे सांगून नाईकांचे समाधान करतात. नाईक लगेच मुंबई पोलिसांना कळवून केतकी शौनक ला पकडायला जाळे विणतात, पण ते याही वेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पुन्हा नाशिकला परत येतात. इकडे नाशिक जिल्ह्यातही पोलीस केतकी आणि शौनक चा कसून शोध घेतच असतात. पुढे नाईक आबाजीच्या हुकुमावरून सार्वजनिक वाचनालयातील ती देवीची मूर्ती ताब्यात घेतात आणि त्यांच्याकडे पोचवतात. आबाजींना त्या मूर्तीमध्ये अजून एक रेशमी कापडाची सुरनळी मिळते ज्यावर एक नकाशा असतो. पण नीट बघितल्यावॉर आबाजींना समजते की हा नकाशा अर्धवट आहे. आतापर्यंत त्यांना हेही समजले असते की केतकी आणि शौनक ला शहापूर आणि मुंबई एशियाटिक मधून बरीच महत्वाची माहिती मिळालेली आहे. उरलेला अर्धा नकाशा त्यांच्या कडेच मिळणार हे ओळखून ते एक डाव टाकतात. केतकीला ते एक ऑफर देतात आणि दोघांनी आपापला नकाशा एकमेकांना द्यायचा असे ठरवतात. पण नकाशा द्यायला केतकी आली असताना पोलीस तिला घेराव घालून पकडायचा प्रयत्न करतात, जो तिच्या हुशारीने फसतो.
दरम्यान केतकी आणि शौनकाची जवळीक वाढत जाते आणि शेवटी केतकी त्याला आपल्याबद्दल सगळे खरे खरे सांगते. केतकी ही खोजनार जमातीमधील आहे आणि तिचे खरे नाव निरुपमा शहा आहे. त्यांच्या एकोणीस पिढ्या पूर्वी सोहनराय हा पहिला खोजनार होता. सुरतेच्या लुटीच्या वेळी शिवरायांचे सैनिक त्यांचे घर लुटतात तेव्हा अतिशय भाग्याचा असा देवघरातील स्यमंतक किंवा शिवमंतक मणी ते घेऊन जातात ज्यामुळे सोहनराय च्या घराण्याला अवकळा येते. आणि मग पुढच्या सर्व पिढीतील एक एक माणूस खोजनार बनून तो मणी शोधायचे काम करत असतो. त्यातील अनेकांनी शिवरायांना किंवा त्यांच्या वंशजांना भेटून तो मणी देण्यासाठी विनंती केलेली असते पण तो मणी गोंदाजीच्या लुटीचा भाग असल्याने शिवरायांच्याही हाती लागला नसतो. केतकी ही सध्याची खोजनार असते आणि तो मणी शोधणे हेच तिच्या आयुष्याचे ध्येय असते.
तर आता केतकी आणि आबाजी दोघांकडेही पूर्ण नकाशा आहे आणि दोघेही त्याचा अर्थ लावण्याचा कसून प्रयत्न करत आहेत. त्या नकाशात अनेक गोल काढून एकमेकाला जोडले आहेत. काही गोलात टिम्ब आहेत तर काहींमध्ये नाहीत. फक्त एका गोलात मोडी लिपीत "मनोहर " असे लिहिले आहे. हा मनोहर किल्ला म्हणावा तर अशा नावाचा किल्ला या पर्वत रांगेत नाही. मग केतकी इतिहास तज्ज्ञ अजित जोशींना भेटते. त्यांच्या सांगण्यावरून या रांगेत असलेला कोळदेहेर किल्ला काही काळ मनोहरगड म्हणून ओळखला जात असे हे त्यांना कळते . इकडे आबाजीच्या टीममधील एकाला हा नकाशा ११ किल्ल्यांचा आहे हे लक्षात येते आणि ते तो आबाजींना कळवतो. पण या नकाशात हातगड किल्ला काढलेला नसतो, त्या ऐवजी अचला किल्ल्याला लागून एक गोल काढलेला असतो आणि तिथेच नकाशा थांबलेला असतो. इकडे केतकी आणि शौनक पहिल्या किल्ल्यापासून , म्हणजे अचल्यापासून शोधायला सुरुवात करायचे ठरवतात आणि अचलाबद्दलचे माहितगार, चौसाळयाच्या शाळेत शिक्षक असलेले अरुण जाखडे यांची मदत घ्यायचे ठरवून त्यांच्या घरी जातात तर तिकडे आबाजींची टीम मनोहर म्हणजे कोळदेहेर कडे आपले लक्ष केंद्रित करते.
केतकी आणि शौनक अरुण जाखडेंच्या घरी पोचतात पण तो जामले वणी गावात असलेला भाया बघायला निघत असतो. इथल्या आसपासच्या प्रदेशात प्रत्येक डोंगरावर असलेली गौळ म्हणजे आदिवासींची देवळे हा त्यांच्या अभ्यासाचा विषय असतो. हे दोघे अरुण बरोबर जामले वणी गावात जायला निघतात कारण तेही अचला किल्ल्याला लागून असते. इकडे पोलीस हात धुवून दोघांचा पाठलाग करत असतात. गावागावात पोलिसांच्या टीम फिरत असतात. त्यांना केतकी आणि शौनक अरुण बरोबर जामले वणी गावात गेले आहेत अशी खबर लागते. आणि नाईक ती तत्परतेने आबाजींना देतात. शिवाय ते अचला किल्ल्यावर जाणार असल्याचीही माहिती देतात. आता आबाजी तातडीने आपले सगळे लक्ष अचला कडे वळवतात कारण त्यांना केतकीच्या आधी तिथे पोचून खजिना हस्तगत करायचा असतो.
जामले वणी गावात केतकी आणि शौनक ला मुंबईचा इन्स्पेक्टर गांगुर्डे भेटतो जो क्लारा ग्रेनजर प्रकरणात पहिले तपास करत असतो. पण नाईकांची एंट्री झाल्यावर तो त्यातून बाहेर पडलेला असतो आणि सध्या रजेवर गावी आलेला असतो. मात्र नाईकांच्या भूमिके बद्दल त्याला कधीच संशय आलेला असतो आणि केतकी शौनकला अडकवायचा त्यांचा प्रयत्न त्याला समजलेला असतो. त्यामुळे तो केतकी आणि शौनकला मदत करायचे ठरवतो आणि रात्रीच भाया चा उत्सव चाललेला असताना ते तिघे चोरवाटेने अचला किल्ल्यावर जायला निघतात. इकडे नाईक पूर्ण फौजफाटा घेऊन जामले वणी गावात पोचतात तर दुसरीकडे आबाजीही पूर्ण टीम घेऊन तिथे येऊन धडकतात.
शेवटी काय होते? केतकीला स्यमंतक मणी मिळतो का? आबाजींना वीस लाख कोटी रुपयांचा खजिना मिळतो का? नाईकांना त्यांचे ठरवलेले पैसे मिळतात का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला पुस्तकच वाचायला हवे. एक मात्र नक्की --एखाद्या हॉलिवूड पटाला शोभेल असे हे पुस्तक वाचताना जागोजागी अंगावर रोमांच उभे करते. पुढे काय होणार? याची उत्सुकता ताणली जाते, आणि जागोजागी आलेले किल्ल्यांचे डिटेलिंग, मुंबई/नाशिक आणि आसपासच्या भागाचे ,रस्त्यांचे , गल्ल्याबोळांचे संदर्भ , हेलिकॉप्टर, ड्रोन वगैरे विषयी तांत्रिक माहिती, पोलिसांची कार्य पद्धती हे सगळे त्यात अजून रंजकता आणत जाते. लेखकाने पुस्तक लिहिण्या आधी केलेला अभ्यास जागोजागी जाणवतो आणि सलाम करायला भाग पाडतो. तर नक्की वाचा शोध.
प्रतिक्रिया
17 Feb 2023 - 12:53 pm | कर्नलतपस्वी
पुस्तकाची ओळख तर मस्त करून दिलीत बरोबर पुस्तक वाचण्याची उत्कंठापण वाढवली. आता हे पण सांगा की पुस्तक कुठे मिळेल किंवा घरचा पत्ता द्या येऊन घेऊन जातो.
17 Feb 2023 - 1:08 pm | राजेंद्र मेहेंदळे
17 Feb 2023 - 2:30 pm | सौंदाळा
जबरदस्त, ओळख वाचूनच खूप उत्सुकता निर्माण झालीय.
ढोबळमानाने 'विश्वस्त' सारखे कथानक वाटतय. पण एकंदर पात्र आणि कथेचा आवाका मोठा वाटतोय.
पृष्ठसंख्या सांगु शकाल का ?
17 Feb 2023 - 9:52 pm | राजेंद्र मेहेंदळे
अंदाजे ५०० पानी पुस्तक आहे.
17 Feb 2023 - 2:43 pm | श्रीगुरुजी
ही कादंबरी वाचली आहे. खूपच रहस्यमय व उत्कंठावर्धक आहे. कादंबरी वाचताना जेफ्री आर्चर, सिडने शेल्टन, फ्रेडरिक फॉर्सिथ अश्या नामवंत लेखकांनी लिहिलेली प्रदीर्घ रहस्यमय कादंबरी वाचल्यासारखे वाटते.
18 Feb 2023 - 9:48 am | प्रचेतस
डॅन ब्राऊनच्या शैलीच्या सर्वाधिक जवळ जाते हे पुस्तक.
18 Feb 2023 - 11:44 am | तुषार काळभोर
इतिहास + कॉन्स्पिरसी थियरी + कल्पना + थ्रिलर + वेग = डॅन ब्राउनच्या रॉबर्ट लॅन्गडन मालिकेच्या शैलीशी तुलना करता येईल.
बिकांसोबत बॅटमॅनचाही उल्लेख आहे.
27 Feb 2023 - 1:40 pm | mayu4u
या सप्ताहांता मध्ये "शोध" वाचून हातावेगळी केली. खूप छान जमून आली आहे. रॉबर्ट लँग्डन मालिकेसारखी वेगवान आणि थरारक!
बिका आणि बॅट्या यांची नावं वाचून छान वाटलं!
पण एक शंका: ही कादंबरी २०१५ मध्ये प्रकाशित झालेली; मग कथानक २०१७ मध्ये घडताना का दाखवलंय? कथेत २०१७ मध्ये शॉन कुणालातरी हजाराची गुलाबी नोट देतो, असा उल्लेख आहे.
18 Feb 2023 - 9:46 am | प्रचेतस
पुस्तक भन्नाटच आहे, परिचय देखील सुरेख. संदर्भसूचीमध्ये मिपाकर बॅटमॅनचा देखील उल्लेख आहे.
20 Feb 2023 - 11:43 am | राजेंद्र मेहेंदळे
सर्व वाचकांचे धन्यवाद!!
27 Feb 2023 - 5:04 pm | सस्नेह
एकदा वाचली होती, आणखी एकदा वाचतेय. पहिल्यांदा वाचताना आलेली शंका पुन्हा आली.
ते अभोणकर पोलिसांना आपल्याच शिष्याचा ठावठिकाणा सांगून हीरो-हिरविणीच्या मार्गात अडचणी का आणतात ??
27 Feb 2023 - 7:13 pm | mayu4u
या कादंबरीचा पुढ्ला भाग लिहायचं खैरनारांच्या मनात असावं; कारण शोध च्या उपसंहारात तसे अनेक संदर्भ आहेत. तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्यात मिळालं असतं.
27 Feb 2023 - 7:41 pm | mayu4u
हा या कथानकाचा पहिला भाग. सगळी मांडणी दोन खंडांमध्ये करायचं माझ्या मनात आहे. पहिल्या भागात ज्या व्यक्तिरेखा काहीशा अधुऱ्या, अस्पष्ट राहताहेत; त्याच दुसऱ्या भागात मध्यवर्ती बनतील. उदाहणार्थ- अभोणकर. माझ्या अभ्यासातून माझ्या मनात उभं राहिलेलं शिवाजीराजांचं जे चित्र- दूर भविष्यदर्शी नजर असलेला, त्या काळात एका पुरोगामी, प्रगतशील समाजाचं स्वप्न पाहणारा अन् ते प्रत्यक्षात आणण्यासाठी झटणारा द्रष्टा राज्यकर्ता- ते चित्र दुसऱ्या भागात जास्त ठसठशीत बनेल. वाचकाच्या लक्षात येईल- खजिना हा द्रव्याचा नव्हता; खरा खजिना वेगळाच होता. खरा झगडा त्या वेगळ्या खजिन्यासाठी होता.’
दोन भागांचा विचार न करता ही कादंबरी संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशी लिहायची. मग नंतर काही काळानं या पाश्र्वभूमीवर दुसरी- अन् तीही संपूर्ण आणि स्वतंत्रपणे उभी राहील अशा कादंबरीचा विचार करायचा.
https://www.loksatta.com/lokrang/lekha/rajhans-publication-editor-dr-sad...
27 Feb 2023 - 8:38 pm | सस्नेह
आता ७-८ वर्षांनंतर दुसरा भाग यायला हरकत नाही..
वाट पाहूया.
27 Feb 2023 - 8:54 pm | प्रचेतस
नाही हो, कादंबरी प्रकाशित झाल्यावर दुर्दैवाने मुरलीधर खैरनारांचा आजाराने अल्पावधीतच मृत्यू झाला.
6 Dec 2023 - 11:33 am | शशिकांत ओक
डॉ अजीत जोशींच्या मनोहर गड संदर्भामुळे मला या कादंबरीचा शोध लागला. त्यामुळे हे मुरलीधर खैरनार कोण वगैरे शोध घेतला. ते निवर्तले असल्याने भेट झाली नाही. सुरतेची १६७० मधील लूट या वरील शिवाजी महाराजांच्या मोहिमेची माहिती मला त्यांच्या लिखाणातून समजली त्याचा उपयोग केला.
राजेंद्र भागवतांनी राजगड आणि तोरणा मोहिमेतील सुंदर माहिती आणि कोलाज मुळे वाचता वाचता शोध कादंबरीचा परिचय वाचला. सर्व कथानक थोडक्यात लिहिले आहे. त्यातून पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. राजेंद्र जी आपले धन्यवाद.