Thrills on wheels
(Thane - Statue of Unity - Thane)
पहिला टप्पा
प्रवासाचा पहिला टप्पा अर्थात चॅलेंज होत ते म्हणजे चिपळूण - ठाणे प्रवास. याआधी फक्त शेजारच्या सीट वर बसून प्रवास केलेला. आता स्वतः गाडी चालवत जायचं होत. जमेल की नाही? नाही जमलं तर काय? अशी घालमेल चालू होती. गाडी मध्येच पंक्चर झाली तर? निदान थिअरी तरी माहिती आहे. प्रॅक्टिकलची कधी वेळ आली नाही त्यामुळे जरा धाकधूक होती. परत एकदा रिविजन करून घेतली.
घरातल्या मोठ्यांना नमस्कार करून ७ वाजता निघालो. तशी या रस्त्याला गर्दी कमी होती त्यामुळे तिथे कुठेच काही त्रास झाला नाही. खेड क्रॉस करून कशेडी घाट लागला. पहिल्यांदाच कशेडी घाट गाडीने चढवत होते. पण कुठल्याही वळणावर भीती वाटली नाही. नवीन नवीन flyover झाल्याने आमची नेहमीची हॉटेल कुठे गायब झाली कळलंच नाही. त्यामुळे शेवटी महाड नंतर एका नवीन हॉटेलला नाश्त्यासाठी थांबलो. दोघीही गप्पिष्ट असल्याने गप्पा मारण्यात वेळ छान जात होता. ना गाण्यांची गरज पडली ना आणखी कुणाची. अधेमधे फक्त आमच्या चौघांच्या ग्रुप वर अपडेट देत होतो.जाताना २/३ वेळा आम्हाला ट्रेन जाताना दिसली. ट्रेन आपल्या गाडीच्या बरोबरीने जाते तेव्हा मला खूप आवडते. अगदी सुरवातीला ट्रेन खेर्डीच्या पुलावरून आडवी गेली तेव्हा तर आम्ही चेष्टेने म्हटल पण ' ट्रेन आडवी गेली, आता सगळं सुखरूप होणार '.
कळंबोली नाक्याला गुगलने लेफ्ट घेवून जेएनपीटी रोड ला लावलं. इथपर्यंत ठीक होत. पण गुगल वाली बाई काय तिकडून एक्झिट घ्यायलाच सांगेना. सारखं काहीतरी चुकतंय वाटे. पण असो आपल्याला माहीत नाही तर गुगल वर भरोसा ठेवून नेते तसे जाऊया म्हणत जात राहिलो. जवळपास ५ किमी झाल्यावर तिने एक्झिट घेवून ठाणे बेलापूर रोड ला लावलं. हुश्श झालं. निदान ठाण्याचे बोर्ड दिसायला लागले. मग मात्र अगदी सरळ कळवा ब्रीज वरून तिने आम्हाला ठाण्यात ऋतूपार्क ला पोहोचवल. पहिल्यांदाच एकटीने एवढी गाडी चालवत आणली होती. खूप आनंद झाला. हा प्रवास सुखरूप पार पडला. शेजारी अश्विनी navigator च्या भूमिकेत चोख काम करीत होती. लेन बदल, डावीकडे वळ, उजवीकडे घे सगळं गुगल सांगेल तस सांगत, रस्त्यावरचे सिग्नल बघत ती सांगेल तशी मी जात होते. दोघींचं इथे छान जमल म्हणजे पुढच्या प्रवासाची कल्पना आली.
गाडीतून सायकल काढून जोडून घेतल्या. आमची ताई इथे राहते. ती कामाला गेल्याने घर उघडून सामान, सायकल वर नेऊन ठेवल्या. लिफ्ट छोटी असल्याने सायकल उभी करून न्यावी लागली. मैत्रीण केतकिने मस्त बिर्याणी ऑर्डर केली, ती खाऊन जरा तिथल्याच आवारात भटकून आलो. प्रवासाचा पहिला टप्पा सुखरूप पार पडला होता. गाडीने काही त्रास दिला नाही. माझा आत्मविश्वास वाढला.
सुदैवाने गाडी पार्क करायला तिथेच जागा मिळाली. ८ दिवस गाडी पार्क करायला बिल्डिंगच्या आवारात जागा मिळाली म्हणजे नशीब चांगलच जोरावर होत म्हणायचं. थोडा वेळ ताईशी गप्पा मारून, उद्याची तयारी करून, रात्री जेवून शांतपणे झोपलो.
- धनश्रीनिवास
प्रतिक्रिया
9 Feb 2023 - 8:55 am | सुखी
हा भाग पण छान झालाय.. एक सूचना नावामध्ये भाग १, २ असं लिहिलेलं असेल तर नवीन भाग आल्याचे कळेल
9 Feb 2023 - 10:56 am | राजेंद्र मेहेंदळे
हा पण भाग मस्तच!!
चला , नांदी संपली.आता नाटकाला खरी सुरुवात होणार तर.
येउंद्या पटापट पुढचे भाग.
9 Feb 2023 - 11:14 am | धनावडे
लवकर येउद्या पुढचे भाग.
9 Feb 2023 - 12:48 pm | Bhakti
मस्तच!वाचत आहे.