टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)-- भाग २

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
13 Jan 2023 - 4:56 pm

आधीचा भाग

टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न -माझा प्रवास (सॅम पित्रोदा)

तर मागच्या भागात आपण पाहिले की ६० च्या दशकात अमेरिकेत काही स्वप्ने घेऊन आलेले सॅम आता चांगलेच स्थिरावले होते, अमेरिकन नागरिकत्व ,दोन मुले आणि पत्नी असे सुखी कुटुंब, शिवाय भाऊ बहिणी आई वडील बहुतेक सर्वजण एक एक करून अमेरिकेत आलेले होते. वेसकॉम विकल्यामुळे तर इतका पैसा मिळाला होता की पुढचे सर्व आयुष्य केवळ त्या पैशांच्या व्याजावर जाऊ शकत होते. पण त्यांना आता भारतातील टेलिकॉम क्षेत्र सुधारण्याचा किडा चावला होता. इंडिया फोरम मध्ये झालेल्या चर्चेनुसार त्यांच्या असे लक्षात आले की या कामासाठी दिल्लीत एक विचारवंतांचा गट स्थापन केला पाहिजे जो सरकारवर दबाव टाकू शकेल. त्यानुसार ते पुढच्या भारतभेटीत त्यांच्या एका मित्राला भेटायला गेले. त्याच्या ऑफिसमध्ये या विषयावर चर्चा सुरु असताना त्याची खुर्ची सतत करकरत होती, आणि त्यामुळे सॅम अस्वस्थ होत होते. शेवटी त्यांनी मित्राला विचारले "मला लक्ष केंद्रित करता येत नाहीये. ही खुर्ची अशी किती दिवस करकरते आहे? तुला त्रास होत नाही का?" त्यावर तो म्हणाला "मला ते कधी लक्षातच आले नाही." सॅमनी तेल मागवले आणि ते लावून तो आवाज बंद केला. हा त्यांच्यासाठी एक धडा होता. त्यांची अमेरिकन मानसिकता विरुद्ध इथली "सब चलता है " ही वृत्ती असा तो संघर्ष होता. मग पुढचे काही महिने सॅम भारतभेटी करत राहिले, प्रत्येक भेटीत त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेने इथली निष्क्रियता जाणवत राहिली. आणि टेलिकॉम बद्दल काहीच प्रगती होईना.

मग त्यांना कोणीतरी सांगितले की इंदिरा गांधींना भेटलात तर काहीतरी प्रगती होऊ शकेल, ताबडतोब सॅम सासऱ्यांच्या ओळखीने त्यांच्या एका वजनदार मित्राला भेटायला दिल्लीला गेले. आणि काही भेटीनंतर त्यांच्या मनात एक स्थान निर्माण करू शकले. त्यांना इंदिरा गांधींची १० मिनिटांसाठी भेटीची वेळही मिळाली. पण सगळी योजना समजावून सांगायला तेव्हढा वेळ पुरेसा नव्हता. त्यामुळे सॅमनी ती नम्रपणे नाकारली आणि १ तास वेळ मागितला. पुढे त्यांना समजले की राजीव गांधींच्या मार्फत ते इंदिराजींना भेटू शकतात, आणि त्यांनी तसे प्रयत्न सुरु केले. आणि शेवटी २ वर्षे चाललेल्या या सगळ्या खटपटींना यश येऊन सॅम ना १ तास भेटीची वेळ मिळाली. ही सॅम च्या आयुष्यातील अतिशय महत्वाची वेळ होती आणि त्यासाठी त्यांनी आपल्याकडून एकदम जय्यत तयारी केली. इतकी किती प्रोजेक्टरचा दिवा गेला तर पंचाईत नको म्हणून जास्तीचा दिवाही बरोबर आणला. याच बैठकीत सॅमची राजीव गांधींशी तार जुळली. भारतात संपर्क व्यवस्था सुधारणे कसे जरुरीचे आहे आणि त्याचे काय फायदे आहेत, तसेच हे सर्व परदेशी कंपन्यांवर अवलंबून न राहता देशातच उत्पादन करून आपल्याला हवी तशी यंत्रणा उभारणे कसे गरजेचे आहे हे सगळे मुद्दे सॅम नी प्रभावीपणे मांडले. सगळ्यांनाच सगळे मुद्दे कळले असे नाही पण या बैठकीतील प्रभाव आणि इंदिराजींचा मिळालेला पाठिंबा यामुळे पुढील घटना वेगाने घडू लागल्या आणि प्रत्येक खात्याचे मंत्री सॅम शी बोलायला धडपडू लागले. लवकरच तज्ज्ञ लोकांचा एक गट सॅम ची पार्श्वभूमी वगैरे पडताळणी करायला शिकागोला येऊन गेला आणि कामाने गती घेतली. पुढच्या भारतफेरीत राजीव गांधींच्या भेटीत सी डॉट म्हणजे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स स्थापन झाले. आणि ३६ कोटी रुपये त्यासाठी मान्यही झाले. ही एक कंपनीप्रमाणे काम करणारी संस्था असणार होती जी डिजिटल स्विचेस तयार करून दूरसंचार खात्याला विकेल. पण हे इतके सोपे नव्हते. सिमेन्स, अल्काटेल,एरिक्सन वगैरे सारख्या परदेशी महाकाय कंपन्या भारतात आपापली उत्पादने विकायला कसोशीने प्रयत्न करत होत्या आणि त्यांना असे देशी प्रतिस्पर्धी उत्पादन नको होते. त्यांनी राजकारणी लोकांवरही येन केन प्रकारेण दबाव आणायचे किंवा प्रलोभने दाखवायचे प्रयत्न चालू केले. मात्र सॅम ने आपले घोडे पुढे दामटायला एक मुद्दा मांडला कि सी डॉट सध्या फक्त खेडेगावात लागणारे छोटे १२८/२५६ लाईन्सचे स्विचेस बनवेल आणि त्यामुळे या मोठ्या कंपनीना शहरी मार्केट मोकळे राहील. खरेतर भारतात त्यावेळी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर दोन्ही क्षेत्रात तज्ज्ञ लोकांची कमतरता होती त्यामुळेही सध्या छोटे स्विचेस बनविण्यातूनच मग पुढे मोठे स्विचेस बनवता येणे शक्य होते.

पण इथली आव्हाने वेस कॉम पेक्षा फारच वेगळी होती. तिथे फक्त नवे उत्पादन बनवणे आणि त्याला मार्केट शोधणे हेच मुख्य काम होते. तर इथे उत्पादन तयार करण्याबरोबरच त्यामागील राजकारण, जनमत, सॅम यांचे अमेरिकन नागरिकत्व, त्यांचा यामागे नक्की उद्देश काय (नफा कमावणे किंवा इतर) याबद्दलचे संशय असे अनेक कंगोरे होते. त्यावर मत करत आता सॅम ची जागा शोधण्यासाठी पाहणी सुरु झाली. पण समोर कम्प्युटर ठेवून शेकडो तंत्रज्ञ मात्र काम करू शकतील अशी वातानुकूलित जागा मिळेना. हाती फक्त ३६ महिने होते. तेव्हा बऱ्याच चर्चेअंती चाणक्यपुरीतील सरकारी मालकीच्या अकबर हॉटेलमधील दोन मजले ताब्यात घेऊन तिथे फर्निचर,वायरिंग वगैरे कामे सुरु झाली. अशीच एक जागा बंगलोरमध्ये भाड्याने घेतली गेली. पुढचे महत्वाचे काम म्हणजे मनुष्यबळ. त्यासाठी सॉफ्टवेअरचे काम करणारे लोक दिल्लीत, तर हार्डवेअरचे काम करणारे लोक बंगलोरमधून निवडले गेले. दोन वरिष्ठ शास्त्रज्ञ त्यांचे नेतृत्व करणार होते. साल होते १९८४. फक्त नवीन कर्मचारी घेऊन भागणार नव्हते तर त्यांना प्रशिक्षण, नवी कार्य संस्कृती, गुणवत्ता राखणे, किंमत राखणे अशी अनेक आव्हाने होती. युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम आणि सी लँग्वेज वापरात येऊ घातली होती तिचा वापर सी डॉट च्या डिजिटल स्विचमध्ये होणार होता. तेव्हा प्रशिक्षणापासुन सुरुवात झाली. गटागटाने हे तरुण नवशिके इंजिनीयर्स शिकागोला जाऊ लागले आणि युनिक्स व सी /सी ++ शिकून येऊ लागले. दुसरीकडे प्रसार माध्यमांना हाताशी धरून या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचतील याची (मार्केटिंग) काळजी घेतली गेली. ही सर्व तरुण मुले जितकी अन अनुभवी होती तितकीच उत्साही होती, त्यामुळे दिवसरात्र एक करून सगळे कामाला भिडले होते. बंगलोरला हार्डवेअरचे बांधणी तर दिल्लीत त्याला लागणारे सॉफ्टवेअर तयार होत होते. पण त्याच बरोबर वेगवेगळ्या कार्य संस्कृती एकत्र आल्याने होणाऱ्या गमती जमतीही खूपच होत्या, त्यात दिल्ली /बंगलोर, अमेरिका/भारत असे अनेक फरक होते. पहिल्यांदा ३० मुलींची भरती केली गेली तेव्हा या मुलींबरोबर कामाच्या ठिकाणी कसे वागायचे हेही त्या मुलांना माहित नव्हते, "सर कल्चर" म्हणजे बॉस आले की उठून उभे राहायचे, लिफ्ट वाले सलाम करायचे अशा अनेक तऱ्हा. मग त्यांचे वर्तणुकीविषयीचे काही धडे सॅम यांनी घेतले.

अशा रीतीने काम गती घेतच होते तोवर इंदिराजींची हत्या झाली. पुन्हा सगळे अनिश्चित झाले, पण मग मध्यावधी निवडणूक झाल्या आणि राजीव गांधी पंतप्रधान म्हणून निवडून आले. मात्र आता त्यांना मागे राहून नाही तर भारताच्या जडण घडणीत चालकाच्या सीटवर बसून गाडी चालवायची होती. "विकासासाठी तंत्रज्ञान " हा सॅम आणि त्यांच्या बोलण्यात कळीचा मुद्दा होता. आणि आता असे शिकागो-दिल्ली फेऱ्या मारून फारसे काही हाती लागणार नाही, आपला सहभाग वाढवण्यासाठी भारतात येऊन राहणे अधिक गरजेचे आहे हे सॅम ना कळून चुकले. साल होते १९८५. इथे राहूनही त्यांना सी डॉट च्या जबाबदारीबरोबरच एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करता आली असती पण सी डॉट तर देश घडविण्याचे काम करत होती जे या सगळ्यापेक्षा प्रचंड महत्वाचे होते. अखेर सॅम नि कुटुंबासहित भारतात यायचा निर्णय घेतला. यथावकाश त्यांच्या डिजिटल स्विच चे प्रात्यक्षिक झाले आणि आता त्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करायची गरज निर्माण झाली. पण त्यासाठी सॅम कडे तेव्हढ्या मोठ्या फॅक्टरी कुठे होत्या? मग त्यांनी उद्योजकांची एक बैठक घेऊन प्रत्येकी ४ लाख रुपये डिपॉझीटच्या बदल्यात आपले उत्पादन बनवायचा परवाना विकायची योजना केली. एकूण ४८ लोक तयार झाले. या सगळ्या कामात राजीव गांधी प्रत्यक्ष सहभागी नसले तरी सॅम वेळोवेळी त्यांना भेटून या सगळ्याची कल्पना देता होतेच.

अखेर पहिले देशी बनावटीचे १२८ लाईन्सचे स्वयंचलित दूरध्वनी केंद्र (डिजिटल स्विच) बंगलोरच्या ताज वेट एन्ड हॉटेलमध्ये समारंभ पूर्वक दाखविले गेले. दर दिवसाला एक केंद्र उभारण्याची घोषणा किंवा आश्वासनही त्यात दिले गेले. पण भारतात सहा सात लाख खेड्यांमध्ये ती पोचवायची तर दिवसाला एक या हिशोबाने १०-१५ वर्षे लागली असती. पुन्हा वृत्तपत्रांनी टीका सुरु केली. पण तरुण इंजिनियर्सच्या साहाय्याने सॅम नी हेही आव्हान स्वीकारले आणि हळू हळू रोज १० केंद्र उभारण्यापर्यंत मजल मारली. दुसरीकडे गावोगावी गल्लो गल्ली एस ती डी बूथही उभे राहू लागले आणि त्या द्वारे रोजगार निर्माण होऊ लागला. दुसरीकडे ५१२ लाईन्सचे केंद्र तयार करायची धडपडही चालू होतीच, पण आता अजून एक नवीन प्रश्न निर्माण होऊ लागला. ब्रेन ड्रेन. इथे तयार झालेल्या इंजिनियर्सना काही प्रमाणात बाहेर मागणी येऊ लागली आणि ते सोडून जाऊ लागले. अर्थात अनेक समस्यांपैकी हि सुद्धा एक. आता हळूहळू सॅम ना सी डॉट च्या दैनंदिन कामात लक्ष घालणे आवश्यक राहिले नाही आणि राजीव गांधींबरोबर राहिलेल्या वेळात त्यांच्या अनेक विषयांवर चर्चा झाडू लागल्या. त्यात मुख्यतः; दारिद्र्य, विषमता निर्मूलन,मूलभूत गरजांची पूर्तता आणि तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती , ऊर्जा, दळण वळण, आरोग्य,पाणी,साक्षरता अशा गोष्टी असत. हळूहळू सॅम राजीव यांच्या हरेक योजनेत सल्लागार किंवा तंत्रज्ञ किंवा इतर काही भूमिकेत दिसू लागले. प्रत्येक योजनेचा सखोल अभ्यास करणे, त्यातील व्यवहार्यता तपासणे , प्रोजेक्ट प्लॅन बनवणे किंवा पारखणे अशी एक ना अनेक कामे. आणि मग त्यांना तंत्रज्ञान मिशनखाली मंत्रिपदाचा दर्जा दिला गेला. पाणी,साक्षरता,लसीकरण,खाद्यतेल आणि टेलिकॉम याकडे हे खाते तंत्रज्ञान वापरून लक्ष ठेवणार होते. पुढे त्यात दुग्ध उत्पादनाचाही समावेश झाला. या सगळ्या खात्यांचा समन्वय होऊन कामे प्रचंड गतीने सुरु झाली.

पण अजून एक नवा अध्याय पुढे वाट पाहत होता. पुढे आलेल्या काही अडथळ्यांमुळे किंवा अपघाताने सॅम टेलिकॉम खात्याचे सचिव बनले. तिथे सगळी अनागोंदी होती. जवळपास ५.५ लाख कर्मचारी व त्यांच्या १७ संघटना. ४० लाखाच्यावर टेलिफोन लाईन्स असा अवाढव्य पसारा आणि वर्षानुवर्षे बाहेरच्या कंपन्यांकडून यंत्रे विकत घ्यायची सवय होती. धुळीने भरलेल्या खोल्या, फायलींचे गट्ठे, वास मारणाऱ्या बाथरूम्स, आवाज करणारे पंखे असे काय नि काय. सर्वप्रथम सॅम नी सगळ्या सफाई कामगारांना एकत्र केले आणि ताज सारख्या मोठमोठ्या हॉटेलात ट्रेनिंगला पाठविले. दुसरा मुद्दा होता कामगार संघटना आपलेसे करण्याचा. त्यांच्या पुढाऱ्यांना विश्वासात घेऊन सॅम ने अजून एक बाजी मारली. पुढे हळूहळू नवीन नोकर भरती कमी आणि काही योजना आणून जुनी माणसे कमी करणे असे उपाय योजायला सुरुवात केली. शिवाय एक फाईल, तिच्यामागे आठवण द्यायला अजून एक फाईल, त्यावर सही करायला अजून एक फाईल, अशी वेळखाऊ फाईलींची सिस्टीम हळूहळू बंद कशी होईल याकडे लक्ष दिले,भारतात फायबर ऑप्टीकचे उत्पादन सुरु करण्याकडे लक्ष दिले असे अनेक. याचवेळी जी इ कंपनीबरोबर घडवून आणलेली विप्रो, इन्फोसिस,टी सी एस या सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नवीनच रांगू लागलेल्या कंपन्यांची भेट हाही प्रसंग वाचण्यासारखा आहे. जी इ ने त्यांना १० दशलक्ष डॉलर्सची ऑर्डर दिली, मग टेक्सस इंस्ट्रुमेंट्स त्यांचा कारखाना काढण्यासाठी बंगलोरला येण्याचा प्रस्ताव घेऊन आले. पण त्यासाठी त्यांना डलासला जोडणारी सॅटेलाईट लिंक हवी होती. ती ही दिली गेली. त्याच काळात अमेरिकेने भारताला महा संगणक देण्याचे फेटाळले आणि मग इरेला पेटून इथे सी डॅक ची स्थापना झाली ज्याचे विजय भाटकर आणि त्यांनी बनविलेला परम महा संगणक सर्वांनाच माहित आहे. कामानिमित्ताने मग सॅम यांचे देशोदेशीच्या राजकारणी लोकांशीही ओघानेच संबंध येऊ लागले ज्यात अगदी मिखाईल गोर्बाचॉव्ह यांचाही समावेश होता.

पण चढत्या कमानीला उतारही असतोच. १९८९च्या निवडणुकीत बोफोर्स प्रकरणावरून राजीव गांधींचा पराभव झाला आणि राजीव गांधी विरोधी पक्षात आले. त्याबरोबरच टेलिकॉम खाते सॅम कडून गेले आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप व्हायला लागले. सगळीकडून टीका आणि आरोप होऊ लागले. त्यातही ते अमेरिकन नागरिक असल्याचा मुद्दा उचलला जाऊ लागला. पण त्यांनी आधीच भारतीय नागरिकत्व घेतले होते . मात्र पत्नी व मुले अमेरिकन नागरिक राहिले. पुढे लवकरच हे सरकार कोसळले आणि नवीन आघाडी सरकार आले व परिस्थिती सुधारली. मात्र मुले या सगळ्याला कंटाळली होती आणि त्यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत परतायचा निर्णय घेतला. या सगळ्या दगदगीमुळे की काय सॅम ना हृदय विकाराचा झटका आला. साल होते १९९०. पण लवकरच एप्रिल १९९१ च्या निवडणूक जाहीर झाल्या आणि सॅम राजीव गांधींच्या प्रचारात गुंतले. जोरदार मोहीम चालू होती आणि राजीव गांधींची हत्या झाली. पुन्हा सॅम यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला. राजीव गांधींशिवाय भारतात राहण्याची कल्पनाच त्यांना करवेना. आणि ते शिकागोला परतले. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे या १०-१२ वर्षात त्यांनी आपली सगळी पुंजी खर्च केली होती आणि त्यांच्याजवळ फार काही शिल्लक राहिले नव्हते. आता ते अमेरिकन नागरिकही नव्हते. सगळीकडून अंधार दाटून आला होता.

अशातच सॅम ला वृत्तपत्रातून समजले कि इलेक्ट्रॉनिक डायरी फार लोकप्रिय होत आहेत आणि मोठ्या कंपन्या त्या तयार करून बक्कळ पैसे मिळवत आहेत. त्यात तोशिबा,शार्प,कॅसिओ,एच पी असे बरेच होते. पण सॅम ने तर जी टी इ मध्ये असताना १९७४ मध्ये हे पेटन्ट घेतले होते, आणि या कंपन्या त्याची परवानगी ना घेताच हे उत्पादन करत होत्या. सॅम ने त्यांना पत्र पाठवून जाब विचारला पण अर्थातच त्यांनी त्या पत्राला भीक घातली नाही. मग सॅम ने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. खटला सुरु झाला. कंपन्यांनी मोठे मोठे वकील उभे केले. पण शेवटी २० लाख डॉलर्सवर तडजोड झाली आणि सॅम पुन्हा मूळपदावर आले. पुढे सखोल विचार करून त्यांनी मोबाईल वोलेटचेही एक पेटंट फाईल केले. आणि मग त्याच्या उत्पादनासाठी धावपळ सुरु झाली. कंपनीचे नाव ठरले सी-सॅम . त्यातून पुढे केवळ खाजगी टेलिकॉम आणि आय टी कंपन्यांना कर्ज देणारी वर्ल्ड टेल बँक निर्माण झाली. त्या बँकेचे एक संस्थापक म्हणून सॅम ची पुन्हा जग भ्रमंती सुरु झाली. वेगवेगळ्या देशातील आय टी आणि टेलिकॉम क्षेत्र गुंतवणूक करून फायदा मिळवणे हे वर्ल्ड टेलचे काम होते. या सगळ्यात २००० साल उजाडले आणि सॅम ना प्रोस्टेट कँसरची लागण झालेली लक्षात अली. अर्थात यावेळीही झटपट उपचार झाले आणि सॅम घरी परतले. पुन्हा २००४ मध्ये सोनिया गांधींच्या आग्रह खातर सॅम प्रचारात उतरले आणि मनमोहन सिंग सरकारचे घटक बनले. पुन्हा डोक्यात रुंजी घालणाऱ्या अनेक नवनवीन संकल्पना त्यांनी मांडायला आणि राबवायला सुरुवात केली. एकीकडे सी सॅम चे काम, दुसरीकडे वर्ल्ड टेल चे काम, तिसरीकडे सरकारी कामे अशी सर्व आघाड्यांवर लढाई सुरु असल्याने सॅम ने निर्णय घेऊन सी-सॅम मास्टर कार्ड कंपनीला विकून टाकली.
========================================================

आता ही कथा पुढे रेल टेल ची स्थापना, आधार बायो मेट्रिक ची कल्पना, आय टी क्रांती, उदारीकरण, पल्स पोलिओ मोहीम, फायबर ऑप्टिक क्रांती, जी आय एस मॅपिंग, नॅशनल इन्फर्मेटिक सेंटची स्थापना अशा अनेक स्टेशनांमधून पुढे पुढे सरकते. आणि थोडीशी "फिलॉसॉफिकल" सुद्धा बनते. खूप सारी माहिती थोड्या पानांमध्ये भरायचा प्रयत्न केल्यामुळे त्यातील बरेच तपशील कदाचित डोक्यावरून जाऊ शकतात. पण एक माणूस आपल्या आयुष्यात काय काय करू शकतो आणि एक देश ३०-४० वर्षात कुठून कुठवर जाऊ शकतो याचे भान या पानांमधून आपल्याला येते. आणि शेवटी सॅम यांची नात अरियाच्या जन्माशी येऊन हे वर्तुळ पूर्ण होते. (समाप्त)

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

मित्रहो's picture

13 Jan 2023 - 6:20 pm | मित्रहो

या भागात भारताच्या टेलिकॉमचा प्रवास होता. त्या प्रवासाची बरीचशी कल्पना होती. विशेषत: नव्वदीनंतर. सी डॉटची स्थापना होतपर्यंतच्या बऱ्याच गोष्टी नवीन होत्याआणि रोचक माहिती होती. सॅम पित्रोदा आणि त्यांचे राजीव गांधीसोबत असलेले घनिष्ट संबंध याविषयी सुद्धा माहीती होती. कदाचित पुस्तकात असेल मला आठवते अंशीच्या दशकाच्या शेवटी आणि नव्वदीच्या सुरवातीला बऱ्याच सरकारी नोकरदारांमधे एक भावना होती की सॅम पित्रोदा या माणासामुळे भारतात संगणक येत आहे त्यामुळे त्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. त्यांचा विरोध होता.
वैयक्तीक मला सी डॉट आणि सी डॅक मधे काम करणाऱ्या खूप व्यक्तींसोबत काम करण्याचा योग आला. नव्वदीत इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे आधी याच संस्थामधे जॉइन होत असत. त्यांचे मत सी डॉट मधे काम वेगळे असले तरी काम करण्याची पद्धत मात्र खूप हळू होती.
खुप सुंदर पुस्तक परिचय. धन्यवाद

सौंदाळा's picture

13 Jan 2023 - 7:46 pm | सौंदाळा

सर्वच माहिती नविन होती.
खूपच ओघवत्या भाषेत लिहिले आहे. दोन्ही भाग आवडले. शेवट मात्र पटकन केल्यासारखा वाटला.

वाह,एका अवलियाची ओळख झाली.तंत्रज्ञानाने प्रगती कशी झाली हेही समजले. सी डॅक विषयी पहिल्यापासून उत्सुकता आहे.

कुमार१'s picture

14 Jan 2023 - 3:51 pm | कुमार१

सुंदर पुस्तक परिचय.
हा पण भाग उत्तम !

कंजूस's picture

14 Jan 2023 - 5:32 pm | कंजूस

धन्यवाद!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Jan 2023 - 3:05 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खूप छान माहिती. नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरची स्थापनाही त्याच काळातील आहे ना ? सी.डॅकबरोबर एन सी एस टी ह्या संस्थेचीही स्थापना जुहु- मुंबई येथे झाली होती. १९८५-८७ च्या दरम्यान बहुदा. १९८५ साली टेक्सास इन्स्त्रुमेंट्सची स्थापना बेंगळुरु येथे झाली होती. तेव्हा बैलगाडीतून संगणक व ईतर सामुग्री नेतानाचा एक फोटो गाजला होता.
bail

श्रीगुरुजी's picture

16 Jan 2023 - 3:19 pm | श्रीगुरुजी

हे चित्र १९८१ मध्ये APPLE हा उपग्रह व त्याचे भाग बैलगाडीतून नेतानाचा आहे. तेव्हा उपग्रह नेण्यासाठी धातूचे नसलेले, अचुंबकीय वाहन आवश्यक होते व बैलगाडी शिवाय असे दुसरे कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते.

तर एन सी एस टी ची स्थापना २००४ मधील आहे. दोन्हीची उद्दिष्टे वेगवेगळी आहेत. परंतु सॅम पित्रोदांच्या पुस्तकात त्याचा उल्लेख बहुतेक नाहिये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Jan 2023 - 11:11 am | माईसाहेब कुरसूंदीकर

आपण एन सी एस टी म्हणताय ते National Commission for Scheduled Tribes
मी म्हणतेय ते National center for software technology हे १९८५ मध्ये जुहु येथे सुरू झाले होते.
https://www.cdac.in/index.aspx?id=MB

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

17 Jan 2023 - 11:16 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मग ह्या बातमीत काहीतरी गडबड आहे. कारण चित्राखाली हे लिहिलय.
The satellite dish being unloaded at Texas Instruments, Bangalore in 1985.
https://www.deccanherald.com/content/98795/high-tech-bangalore-arrived-b...

शेखरमोघे's picture

18 Jan 2023 - 9:49 am | शेखरमोघे

भारतात प्रथम (१९६०/७० च्या दशकात) आलेल्या सन्गणकान्बद्दल देखील असेच काहिसे झाले असणार उदा. IIT Kanpur मध्ये प्रथम आलेल्या सन्गणकाबद्दल वाचल्याचे आठवते की हा विमानाने कानपूरच्या (वायुदलाच्या) विमानतळावर पोचल्यावर लक्षात आले की तिथून पुढच्या रस्त्याची स्थिती लक्षात घेता तो विमानतळावरून बैलगाडीने पुढे नेणे हे सगळ्यात सुरक्षित ठरेल. एका मुम्बईत आणण्यात आलेल्या सन्गणकान्बद्दल खाजगीत बोलताना त्याकाळच्या एका धुरन्धराने त्याची आठवण सान्गितली होती की काही दिवस जरी लाकडी खोक्यात भरलेली सगळी यन्त्रणा त्यान्च्या कार्यालयात पोचली तरी ती बाहेर काढून आणि जोडणी करून वापर सुरू करणे वेळोवेळी लाम्बणीवर टाकावे लागत होते कारण अजूनही कस्टम्स् खात्याची काही तपासणी शिल्लक होती. शेवटी त्यानी लाकडी खोक्यान्ची मागची बाजू सोडवली, आपल्याला हवी ती जोडणी मागच्या बाजूनी करून चाचणी करून घेतली आणि त्यामुळे कस्टम्स् खात्याची तपासणी (त्यानी अपेक्षेप्रमाणे पुढची दारे original seal किन्वा तत्सम काहे आहे एवढेच पाहिले) झाल्यावर वेळ न दवडता त्याना काम सुरू करता आले. एके काळी "कस्टम्स् खात्याची कडक तपासणी" झाल्याखेरीज SEEPZ मधील canteen मधले खरकटे, शिळे अन्न किन्वा कार्यालयातील जुनी वर्तमानपत्रे फेकून देता येत नसत.

शेखरमोघे's picture

18 Jan 2023 - 9:54 am | शेखरमोघे

छान पुस्तक परिचय, पित्रोदा यान्ची

करामत

मोजक्या आणि ठळक घटनात सुन्दर वर्णन केली आहे.

टर्मीनेटर's picture

28 Jan 2023 - 8:45 pm | टर्मीनेटर

अतिशय माहितीपूर्ण झाली आहे हि दोन भागांची पुस्तक परिचय मालिका! खूप आवडली 👍
सॅम पित्रोदांबद्दल इतकी रोचक माहिती पहिल्यांदाच वाचायला मिळाली, ते मूळचे भारतीय होते हे मला ठाऊकच नव्हते. तुम्ही मालिकेतल्या दोन्ही लेखांतून त्यांनी घेतलेल्या कष्टांबद्दल, त्यावेळच्या राजकीय आणि प्रतिकूल व्यावसायिक परिस्थितीतीबद्दल दिलेल्या माहितीमुळे ज्ञानात बरीच भर पडली. एकंदरीत त्यांना आपले 'टेलिकॉम क्रांतीचे महास्वप्न' प्रत्यक्षात आणताना किती 'पापड बेलावे' लागले होते हे लक्षात आले.

पहिल्या भागावर मी दिलेल्या एका प्रतिसादात लिहिले होते कि,
"खुप छान माहीतीपुर्ण मालिका वाटत असल्याने धाग्याला राजकिय वळण लागेल कि नाही ते माहीत नाही, पण शेवटच्या भागावर दिल्या जाणाऱ्या माझ्या भावी प्रतिसादात 'पार्टी विथ द डिफरन्स' च्या एका 'India Shining' सुपरस्टारने सॅम पित्रोदा ह्यांनी घडवलेल्या 'टेलिकॉम क्रांती'ची माती करत 'दुनिया मूठठीमें' कशी केली ह्यावर मी टिप्पणी मात्र नक्की करीन"

असे लिहिण्यात माझा राजकीय दृष्टिकोन शून्य असून व्यक्तिगत दृष्टिकोन जास्त होता. मुळात 'टेलिफोन' हा बालपणापासूनच जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे अनेक आठवणी त्याच्याशी निगडित आहेत.

माझे आजोबा सुमारे शंभर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या 'बॉम्बे टेलिफोन कंपनी' मध्ये इंजिनिअर होते. ब्रिटिशांच्या काळात दळणवळण 'पोस्ट अँड टेलिग्राफ' विभागाच्या अखत्यारीत होते. माथेरान येथे टेलिफोन यंत्रणा उभारण्याची जवाबदारी आजोबांवर होती. ते काम सुरु असताना आजी -आजोबांचे माथेरानच्या सरकारी बंगल्यात वास्तव्य असतानाच्या काळात माझ्या वडिलांचा जन्म झाला होता 😀

तिथले काम संपल्यावर मग पुन्हा मुंबई आणि पुढे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कल्याण विभागाची जवाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आल्यावर १९५६ साली आजोबा डोंबिवलीला येऊन स्थायिक झाले ते कायमचेच. डोंबिवलीत जेव्हा फक्त ३ टेलीफोन्स होते तेव्हा त्यातला एक आमच्या घरात होता आणि फोन नंबर दोन अंकी होता हे जेव्हा आजोबांकडून ऐकले होते तेव्हा उगाचच छाती अभिमानाने फुलून वगैरे आली होती! अर्थात त्याचे फायदे जसे होते तसेच काही तोटेही होते (ओळखीपाळखीचे लोक आणि शेजाऱ्यांचा फार उपद्रव होत असे 😂) त्यामुळे रिटायरमेंट नंतर फोन सरेंडर करून टाकण्याचा विचारही अनेकदा त्यांच्या मनात डोकावला होता.

सुरुवातीला अत्यंत मर्यादित संख्येत असलेली टेलिफोन कनेक्शन्स, नोंदणी केल्यावर कनेक्शन मिळण्यास लागणारा काही वर्षांचा काळ, न संपणाऱ्या प्रतीक्षायादी बद्दल ऐकले होते तसेच सॅम पित्रोदांनी घडवलेल्या टेलिकॉम क्रांती नंतरही कनेक्शन लवकर मिळण्यासाठी लाईनमन पासून अधिकाऱ्यांपर्यंत द्यावी लागणारी लाच अशा गोष्टी थोड्या कळत्या वयात बघितलेल्या असल्यामुळे तुमचे लेख मनाला थेट भिडले. आज नवीन गाडी घेतल्यावर एखाद्याला जसा आनंद होतो तसा आनंद घरात टेलिफोन आल्यावर तेव्हा लोकांना होत असे.

नव्वदच्या दशकात शहरी भागातील बहुतांश मध्यमवर्गीयांच्या घरात टेलिफोन येण्यात सॅम पित्रोदांचे प्रचंड योगदान होते आणि त्यातून मुंबई आणि दिल्लीत एम.टी.एन.एल. तर उर्वरित भारतात बी.एस.एन.एल. ची प्रचंड व्यवसायवृद्धी झाली होती पण दुर्दैवाने भ्रष्ट राजकारणी आणि उद्योगपतींच्या अभद्र युतीला सार्वजनिक उपक्रमांचे हे यश पाहवले नाही.

९६-९७ मध्ये देशभर सेल्युलर फोन सेवा सुरु झाली होती पण तिचे दर तसे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेरचे होते त्यामुळे वाजवी दरात सेवा देणाऱ्या एम.टी.एन.एल. आणि बी.एस.एन.एल. चा ग्राहकवर्ग केवळ टिकूनच नव्हता तर वाढतही होता. पुढे 'पार्टी विथ द डिफरन्स' सत्तेत आल्यावर २००१ ते २००३ ह्या काळात केंद्रीय दूरसंचार व सूचना मंत्री असणाऱ्या एका 'India Shining' सुपरस्टारने 'करलो दुनिया मुठ्ठी मे' म्हणत मोबाईल फोन क्षेत्रात उतरलेल्या कंपनीची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लँडलाईन महाग पण त्या कंपनीची WLL (Wireless Local loop) तंत्रज्ञानावर आधारित सेवा स्वस्त करून दाखवण्याचा चमत्कार करून देशभरात प्रचंड मोठे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कोट्यवधी ग्राहक असलेल्या एम.टी.एन.एल. आणि बी.एस.एन.एल. ह्या सार्वजनिक उपक्रमांचा ऱ्हास होण्याची मुहूर्तमेढ रोवली. आज त्यांची काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतोच आहोत.

अर्थात पुढे अल्पावधीतच 'नियतीचा न्याय'ही बघायला मिळाला. सदर मंत्र्याची सख्ख्या भावाने गोळी झाडून हत्या केली तर दीडेक दशकानंतर ती सेवा पुरवणारी कंपनीही कर्जबाजारी होऊन बंद पडली. "बुरे काम का बुरा नतिजा..." अजून काय!

असो, ह्या माहितीपूर्ण लेखमालिकेसाठी आपले आभार 🙏

श्री टर्मीनेटर, तुमचा प्रतिसादातील भावना मी समजु शकतो. सर्वसाधारणपणे सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या अवलंबित माणसांचा कोणत्याही खाजगी उद्योगाच्या स्पर्धेला विरोध असतो.
सर्व सामान्य माणसे मात्र अलिकडे ज्या पध्दतीने दुरध्वनी आणि आंतरजाल क्रांती झाली आहे त्याबद्दल आनंदी आहेत.
सरकारी कर्मचारी किती प्रामाणिकपणे आणि मन लावुन काम करतात ते मी जवळुन बघितले आहे. त्यामुळे त्या कंपन्या संपुन कोणी बेकार झाल्याचे दु:ख नाही.

अर्थात पुढे अल्पावधीतच 'नियतीचा न्याय'ही बघायला मिळाला. सदर मंत्र्याची सख्ख्या भावाने गोळी झाडून हत्या केली तर दीडेक दशकानंतर ती सेवा पुरवणारी कंपनीही कर्जबाजारी होऊन बंद पडली. "बुरे काम का बुरा नतिजा..." अजून काय!

श्री प्रमोद महाजन यांच्यावर व्यकिगत टिप्पणी करण्याची काही गरज नव्हती. ह्याच न्याय तुम्ही श्री राजीव गांधी, श्री इंदीरा गांधी यांना लावला असता का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

29 Jan 2023 - 8:09 am | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद टर्मिनेटर!!

मला हे पुस्तक आवडण्याचे एक कारण हेच आहे की मी स्वतः सुद्धा या क्षेत्राशी संबंधित आहे आणि या घटना जवळुन अनुभवल्या आहेत. तुम्ही म्हणता तसेच काहीसे माझेही मत आहे. २००३-२००४ मध्ये मी एका प्रॉडक्ट कंपनीत काम करत होतो जी "करलो दुनिया मुट्ठीमे" वाल्या कंपनीला आपले फायबर ऑप्टिक्स वाले स्विचेस आणि मध्यवर्ती सॉफ्टवेअर असे सोल्युशन विकत होती. "मुट्ठीमे" वाल्यांनी त्यावेळी दुनियाभरच्या काळ्या,गोर्‍या,हिरव्या,पिवळ्या लोकांना आवताण दिले होते आणि एकाच फूड कोर्ट्मध्ये अमेरिकन्,इझराएली,जपानी,युरोपियन असे सगळे लोक जेवताना दिसायचे. आपापली टेल्को प्रॉडक्ट विकण्यासाठी अर्थातच तिथे मोठी स्पर्धा असायची. आज ह्याला १०० मिलियन ची ऑर्डर दे मग उद्या त्याला गंडव आणि "तो दुसरा" मला ७०% डिस्काउंट देतोय असे म्हणुन ऑर्डर काढुन घे, मग परवा परत पहील्याकडुन ८०% डिस्काउंट घेउन त्याची ऑर्डर नक्की कर, असे भयानक प्रकार चालायचे. शिवाय ३-४ महीने क्रेडिट किवा आधीचे पैसे देण्याची वेळ आली की त्याऐवजी अजुन १०० मिलियन ची ऑर्डर देतो असे गाजर दाखवणे असे वाट्टेल ते ऐकायला मिळायचे. टेस्ट लॅबमध्ये एकेका कंपनीचे सेट अप लागलेले असत आणि महिनोन महिने त्यांचे टेस्टींग चालत असे, त्याच्या जाड जुड फायली त्या त्या प्रॉडक्ट्चे भविष्य ठरवत असत असे मला वाटे पण हे वरचे कमर्शियल प्रकार समजल्यावर तो भाबडेपणा होता हे कळले.

दुसरीकडे तुम्ही म्हणता तसे यांचा धंदा चालावा म्हणुन सरकारी टेलिकॉम कंपन्यांचे पद्धतशीर खच्चीकरण करण्यात येत होते. आधीच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या या कंपन्या हळुहळु मागे पडत गेल्या. त्यांच्याकडचे हुशार लोक १५ वर्षे नोकरी झाली की रिटायरमेंट घेउन पेन्शन घेउन या खासगी कंपन्यांमध्ये नोकरी करु लागले आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग या नव्या सावत्र आईला करुन देउन सख्ख्या आईचा गळा घोटु लागले. कितीही वाईट वाटले तरी हे सत्य आहे.

तरीही आजसुद्धा मला सरकारी टेलिकॉम कंपन्यांवर विश्वास आहे. त्याच्याकडे आजही जी पायाभूत सुविधा/ईन्फ्रा आहे ते कोणाकडेही नाही. आजही एखादा जाणकार, बुद्धिमान, स्वच्छ चारित्र्याचा नेता /आय ए एस अधिकारी मिळाला तर फिनिक्स पक्षाप्रमाणे या कंपन्या कात टाकुन उभ्या राहु शकतात आणि जनतेला स्वस्त आणि मस्त सुविधा देउ शकतात. तीच गोष्ट पोस्टाची. जुन्या खोडांना रिटायर करुन, संगणकाचे ज्ञान असलेले तरुण भरले आणि असलेल्याच गुंतवणुक योजना उत्तम प्रकारे चालवल्या तर आजही पोस्ट कुठल्याही कंपनीला मागे टाकेल. जे एल आय सी ने करुन दाखविले ते पोस्टाला का नाही जमणार?

असो, मी फार लहान माणुस आहे हे सगळे बोलायला, पण तुमचा प्रतिसाद वाचुन माझ्याही भावना मांडायचा मोह आवरला नाही.

तो दुसरा" मला ७०% डिस्काउंट देतोय असे म्हणुन ऑर्डर काढुन घे

कोणतीही मागणी नोंदवताना (ऑर्डर ) काही कागदपत्रे दोन्ही बाजुने सह्या करावी लागतात. त्यात ऑर्डर कोणत्या वेळी रद्द करता येईल आणि त्यासाठी कधी नुकसान भरपाई द्यावी लागेल असे सगळे नमुद असते. त्यामुळे जसे तुम्ही लिहीले आहे तसे असेल असे वाटत नाही.

ह्या विषयी अधिक जाणुन घ्यायला आवडेल.

तरीही आजसुद्धा मला सरकारी टेलिकॉम कंपन्यांवर विश्वास आहे. त्याच्याकडे आजही जी पायाभूत सुविधा/ईन्फ्रा आहे ते कोणाकडेही नाही. आजही एखादा जाणकार, बुद्धिमान, स्वच्छ चारित्र्याचा नेता /आय ए एस अधिकारी मिळाला तर फिनिक्स पक्षाप्रमाणे या कंपन्या कात टाकुन उभ्या राहु शकतात आणि जनतेला स्वस्त आणि मस्त सुविधा देउ शकतात.

असे कधीच होणार नाही. त्यासाठी स्पर्धा करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती लागते. तीच त्या सरकारी कंपन्याकडे नसते. आणि उद्योग ऊभे करुन ठराविक लोकांच्या हितासाठी ते उद्योग चालवणे हे सरकारचे काम नाही.

राजेंद्र मेहेंदळे's picture

30 Jan 2023 - 11:38 am | राजेंद्र मेहेंदळे

श्री. ट्रम्प---तुम्ही म्हणता तेही बरोबर आहे. पण
१. मी त्या विभागाशी प्रत्यक्ष संबंधित नव्हतो, फक्त कानगोष्टी ऐकुन माहिती होती की असे प्रकार होतात.
२. तोंडी काँट्रॅक्ट पक्के होणे, आणि फायनान्स्/लीगल वागिरे विभागांच्या सह्या शिक्के होउन ते फायनल होणे या दरम्यान असे काही होत असावे. पुढे मिळणारा धंदा लक्षात घेउन व्हेंडर कंपन्या कायद्याचा बडगा दाखवित नसतील कदाचित (मिळेल ते पदरात पाडुन घ्या ही वृत्ती)

तुषार काळभोर's picture

29 Jan 2023 - 5:07 pm | तुषार काळभोर

उत्तरार्धाचा हा लेख आवरता घेतल्यासारखा वाटला. कदाचित मूळ पुस्तकातच "खूप सारी माहिती थोड्या पानांमध्ये भरायचा प्रयत्न केल्यामुळे" लेखातही तसेच झाले असण्याची शक्यता आहे.
मलाही 'सॅम', 'पित्रोदा', त्यांचा लुक, मानेपर्यंत रुळणारे केस यामुळे ते अभारतीयच वाटत!

९७-९८ पर्यंत मी शेजारच्या घरात जाऊन त्यांना तीन किंवा पाच रुपये देऊन (त्या घरातील तरुण मुलगा असेल तर तीन रुपये, त्याचे आईवडील असतील तर पाच रुपये) भारत गॅसला फोन करून सिलींडर बुक करायचो. घरी फोन घ्यायचा विषय काढला की, वडील म्हणायचे, फोन घेऊन सगळा पगार त्याच्या बिलात घालवायचा का? तेव्हा सरासरी किती बिल होतं माहिती नाही.
पुढे २००० मध्ये मोठा भाऊ नोकरीला लागल्यावर त्याने फोन घेण्याचे प्रयत्न सुरू केले. गाडीतळावरच्या टेलीफोन एक्सचेंजमध्ये खेटे घालायचा. पुढे २००१ च्या जुलै की ऑगस्टमध्ये त्यांनी सांगितलं, की तुमच्या इथे लॅण्डलाइन नाही देता येणार. हा नवा वायरलेस टेलीफोन आला आहे. तो घेतला तर एका आठवड्यात चालू होईल. मग आमच्या घरी तो WLL टेलीफोन आला. जो २००७ पर्यंत होता. तोपर्यंत भाऊ, मी आणि वडील, तिघांकडे मोबाइल आले असल्याने टेलिफोनची गरज राहिली नाही आणि तो काढून टाकला. हडपसरचे नंबर आधी ६ ने सुरू होत, नंतर आधी २ जोडला जाऊन २६८१. २६९९ या सिरीज हडपसरच्या असत. तेव्हा आमचा नंबर आधी ५१२ आणि नंतर २५१२ ने सुरू व्ह्यायचा. त्यामुळे नंबर सांगितल्यावर ऐकणार्‍याला ते चुकीचे वाटायचे :)

अथांग आकाश's picture

30 Jan 2023 - 2:14 pm | अथांग आकाश

पुस्तकाची ओळख आवडली! चांगली माहीती मिळाली!!

1