जीभ आपल्या शरीराचा महत्वपूर्ण अवयव आहे. जीभ नसेल तर जेवणाचा स्वाद घेता येणार नाही. जीभ नसेल तर आपण बोलू ही शकत नाही. पण काय बोलावे आणि कसे बोलावे हेच जर आपल्याला कळत नसेल तर मौन राहणे उत्तम. कधी-कधी जीभेतून सुटलेले कटुवचन सर्वनाशाला ही कारणीभूत ठरतात. श्री सार्थ दासबोधात समर्थ अश्याच लोकांसाठी म्हणतात:
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥ 1९/३/१३॥
याचेच एक उदाहरण: महाभारतात राजसूय यज्ञाचा एक प्रसंग आहे. महाराज युधिष्ठिराने राजसूय यज्ञात येण्यासाठी कौरवांना ही निमंत्रण दिले होते. या आयोजनाचा एक उद्देश्य कौरवांशी मैत्री संबंध्द दृढ करणे ही होता. पण झाले काय मय दानवाने बांधलेल्या मायावी महालात दुर्योधन सहित सर्व कौरव पाण्यात पडतात. त्यांना असे पाण्यात पडताना पाहत द्रोपदी त्यांचा उपहास करत आपल्या सखींना म्हणाली पहा "आंधळ्याचे पुत्र आंधळे" कसे सर्व पाण्यात पडले हा! हा! हा!". जिभेचा हा वार दुर्योधनाला जिव्हारी लागला. त्याच क्षणी त्याने पांडवांचा सर्वनाश करण्याचा प्रण केला. पांडवांच्या सर्वनाशासाठी त्याने नाना षड्यंत्र केले. परिणाम, महाभारताच्या युद्धात संपूर्ण कुरुवंशाचा संहार झाला. जर द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो कुणालाही तो कितीही दीनहीन किंवा मूर्ख का असेना, जिभेने कधीच चुकूनही कटू वचन बोलले नाही पाहिजे.
प्रतिक्रिया
25 Jan 2023 - 5:03 pm | सुरिया
जनासीं मीत्री करीना।
कठिण शब्द बोले नाना।
मूर्खपणें आवरेना।
कोणीयेकासी॥
.
पटले अगदी सर्वच लेखन वाचून
25 Jan 2023 - 6:22 pm | श्वेता व्यास
खरं आहे.
27 Jan 2023 - 9:17 pm | कर्नलतपस्वी
जीभेचा बोलविता धनी वेगळाच आहे. जीभ तर आज्ञाधारक मजूरच नाही का! बिचारी उगाच बदनाम आहे.
द्रोपदीने मूर्खतापूर्ण कटू वचन बोलले नसते तर पांडव इंद्रप्रस्थात आणि कौरव हस्तिनापुरात सुखाने नांदले असते. या प्रसंगावरून एकच धडा मिळतो
महाभारत कुठल्याच एका घटनेमुळे झाले असे म्हणणे चुकीचे ठरेल.
2 Feb 2023 - 9:36 am | विवेकपटाईत
ही पण एक घटनाकारणीभूत होती. बाकी हे एक उदाहरण आहे.