"मला वाटतं, तुला खरंच वेड लागलं असलं पाहिजे. अशा हवेत फिरायला जायचंय तुला? गेले दोन महिने बघतोय, काहीतरी विचित्र कल्पना येताहेत तुझ्या डोक्यात. माझ्या इच्छेविरुद्ध मला समुद्रकिनाऱ्यावर आणलंस. आपल्या लग्नाला चव्वेचाळीस वर्षं झाली, पण इतक्या वर्षांत कधी असली लहर आली नव्हती तुला! त्यातून गाव कोणतं निवडलंस, तर फेकाम्प. कसलं बेक्कार कंटाळवाणं आहे हे गाव. मला विचारायचंस तरी आधी. आता काय तर म्हणे, गावात फिरायला जाऊ. एरव्ही कधी पायी चालत नाहीस ती! दिवस तरी कोणता निवडला आहेस? वर्षात कधी नसतो इतका उकाडा आहे आज. जा, त्या द अप्रवॅलला विचार . तू सांगशील ते करायला तयार असतो तो. मी मात्र आता परत एक डुलकी काढणार आहे."
मादाम दि कादूर आपल्या जुन्या मित्राच्या दिशेने वळल्या. "मि. द अप्रवॅल, याल का तुम्ही माझ्याबरोबर?"
त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्यांचा जुना मित्र स्त्रीदाक्षिण्य दाखवत आदराने झुकला, आणि हसून म्हणाला, "तुला जिथे कुठे जायचं असेल, तिथे यायला मी तयार आहे."
"जा तर मग! होउदे उष्माघात!" मि. दि कादूर म्हणाले, आणि तास दोन तास झोप काढण्याच्या इराद्याने हॉटेल देबे च्या दिशेने निघून गेले.
मादाम दि कादूरनी आपल्या मित्रासोबत चालायला सुरुवात केली.
एकांत सापडताच त्यांनी आपल्या मित्राचा हात हलकेच दाबला, आणि म्हणाल्या, "चला. आलं जुळून एकदाचं."
"वेड लागलं आहे तुला." त्यांचा मित्र हळूच कुजबुजला, "नक्कीच तुझं डोकं फिरलं आहे. त्या माणसाला शंका जरी आली ना... "
"काय हे? हेनरी, असं परक्यासारखं तो माणूस म्हणू नकोस ना त्याला."
"ठीक आहे. आपल्या मुलाला म्हणतो. त्याला शंका जरी आली ना, किंवा जरासा सुगावा लागला ना, तर काही खरं नाही. मग आपल्या डोक्यावर मिरे वाटेल तो. गेल्या चाळीस वर्षांत कधीच पाहिलं नाहीयेस तू त्याला. मग आजच काय झालं आहे तुला?"
समुद्रापासून गावाकडे जाणाऱ्या लांबसडक रस्त्यावरून दोघं चालले होते. एत्रेतात शहराच्या दिशेने ते उजवीकडे वळले. आता पुढचा पांढरा रस्ता कडक उन्हात तळपत होता. जीवघेण्या उकाड्यात ते संथपणे चालत होते. मादामनी आपल्या मित्राचा हात धरला होता. त्यांची नजर सरळ समोर होती. त्या भ्रमिष्टासारख्या दूर कुठेतरी एकटक बघत होत्या. शेवटी त्या म्हणाल्या, "म्हणजे तूदेखील त्याला त्यानंतर कधीच पाहिलं नाहीस तर.."
"छे. कधीच नाही."
"कसं शक्य आहे?"
"माय डियर.. आता पुन्हा ती चर्चा सुरु करू नकोस. मला बायको आहे, मुलं आहेत. तुलाही तुझा नवरा आहे. त्यांना काय वाटेल याची भीती नको बाळगायला?"
मादामनी उत्तर दिलं नाही. त्यांचं मन पार मागे, आपल्या तारुण्याच्या दिवसांत जाऊन पोहोचलं होतं.
त्यावेळी घडलेल्या अनेक वाईट घटना त्यांना आठवत होत्या. दोघांच्या मैत्रीची सुरुवात... आपल्याकडे बघून हसणारा हेनरी..आपण दिसावं म्हणून रेंगाळणारा हेनरी.. किती सुखाचे दिवस होते ते. आयुष्यातले सर्वात सुंदर दिवस. किती लवकर संपले होते ते! आणि त्यानंतर.. त्या सुखासाठी मोजलेली किंमत ध्यानी आली होती.. त्यानंतर झालेला मनस्ताप.. मग देशाच्या दक्षिण टोकाकडे केलेला तो प्रवास.. किती मोठा होता तो प्रवास, आणि किती त्रासदायक. सतत भीती वाटत होती. भूमध्य समुद्राकाठच्या सुनसान जागी त्या छोट्याशा घरात एकांतात काढलेले दिवस. तिथून बाहेर जाण्याचा प्रयत्नही केला नव्हता कधी. त्या बागेच्या एका टोकाला, संत्र्याच्या झाडाखाली पडून काढलेले दिवस... वर दिसत फक्त हिरवी पानं आणि त्यातून डोकावणारी लाल, गोल संत्री. बाहेर जायची किती इच्छा होत होती! समुद्रावर जावंसं वाटत होतं.. भिंत ओलांडून येणारा तो समुद्रावरचा वारा... किनाऱ्यावर आपटणाऱ्या त्या लाटा...सूर्यप्रकाशात चमकणारी समुद्राची निळाई.. छोट्याछोट्या बोटींची पांढरी शिडं.. क्षितिजावर दिसणारा डोंगर..हे सगळं स्वप्नात पाहिलं त्या वेळी. पण प्रत्यक्षात फाटक ओलांडून जायची हिंमत नव्हती. कोणी ओळखलं असतं तर?
आणि ते शेवटचे दिवस.. प्रतिक्षा, अपेक्षा, वेदना.. ती शेवटची भयानक रात्र. त्या रात्री काय काय सहन करावं लागलं होतं. किती कळा सोसल्या होत्या.. त्या किंकाळ्या..क्षणोक्षणी आपल्या हातावर ओठ टेकवणारा प्रियकर..त्याचा फिकट पडलेला चेहरा..डॉक्टरचा नीटनेटका दाढी केलेला चेहरा...आणि नर्सची पांढरी टोपी. मग बाळाचं हलकेच रडणं..मानवी आवाजाचा त्याने केलेला पहिला क्षीण प्रयत्न. बस्स. त्या एकाच दिवशी त्यांनी आपल्या बाळाला पाहिलं होतं, त्याचे मुके घेतले होते. त्यानंतर त्यांना त्या बाळाचं नखसुद्धा कधी दिसलं नव्हतं. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. बाळाचा विचार आला नाही असा एक क्षणही गेला नव्हता. त्यांचा पोटचा गोळा त्यांच्यापासून दूर नेण्यात आला होता. त्याला लपवून ठेवलं गेलं होतं. त्या दिवसानंतर तो कधीच त्यांना दिसला नव्हता. नॉर्मंडीमधल्या एका शेतकरी कुटुंबात त्याला ठेवण्यात आलं आहे, इतकंच त्यांना त्या वेळी समजलं होतं.
आता तोदेखील एक शेतकरी होता. त्याचं लग्न झालं होतं. आपले वडील कोण, हे त्याला ठाऊक नव्हतं. पण त्यांनी त्याच्यासाठी एक मोठी रक्कम राखून ठेवली होती. हे सगळं मादामना ठाऊक होतं. गेल्या चाळीस वर्षांत कितीदा त्यांना वाटलं होतं, की जाऊन त्याला भेटावं, पोटाशी धरावं. तो आता एक प्रौढ गृहस्थ आहे, ही कल्पनाच त्यांना करता येत नव्हती. त्यांना अजूनही तो छोटासा बाळ आहे, असंच वाटत होतं. एकच दिवस का होईना, ज्याला आपण जवळ घेतलं होतं, तो आपला बाळ!
कितीदातरी त्यांनी मि. द अप्रवॅलना म्हटलं असेल, "मला आता अगदी राहवत नाही. आत्ताच्या आता जाऊन त्याला भेटावंसं वाटतं आहे."
पण दरवेळी द अप्रवॅलनी त्यांना रोखलं होतं. "तुला भावना आवरता येणार नाहीत. मग त्याला सगळं समजेल. तो तुझा गैरफायदा घेईल, धमक्या देऊन तुला ब्लॅकमेल करेल. तू फसशील."
"कसा दिसतो तो?" मादामनी विचारलं.
"मला ठाऊक नाही. त्या दिवसानंतर मीही त्याला पाहिलेलं नाही."
"किती अशक्य गोष्ट आहे ही. पोटचा मुलगा असूनही त्याला आपण ओळखत नाही. त्याची भीती वाटते. एखादा कलंक असल्याप्रमाणे त्याला दूर ठेवावं लागतं. किती भयंकर आहे हे सगळं. "
धुळीने माखलेल्या रस्त्यावरून ते दोघं चालत होते. उन्हाने भाजून निघाले होते. रस्त्याला चढाव होता. त्यावरून वर चढत निघाले होते.
"ही एक प्रकारची शिक्षाच म्हणायला हरकत नाही. त्यानंतर मला आणखी मुलं झाली नाहीत. आणि या मुलाला पाहण्याची इच्छा गेली चाळीस वर्षं माझ्या मनात सतत येत राहिली. तुम्हां पुरुषांना ते कळायचं नाही. माझं आयुष्य आणखी किती शिल्लक आहे, कोण जाणे. तितक्या वेळात मी माझ्या मुलाला पाहूच शकले नाही, तर? कसं शक्य आहे हे? इतकी वर्षं मी कशी काय थांबले? दररोज मी त्याची आठवण काढत होते. किती भयंकर आहे माझं आयुष्य! तुम्हाला ठाऊक आहे का, एकही दिवस असा नसेल, की रोज सकाळी उठल्याबरोबर मला त्याची आठवण आली नाही. कसा असेल माझा बाळ? मी त्याचा फार मोठा अपराध केला आहे. अशा परिस्थितीत जग काय म्हणेल याची पर्वा मी करायला हवी होती का? की सगळं काही सोडून त्याच्यामागे जायला हवं होतं? त्याला प्रेमाने लहानाचं मोठं करायला हवं होतं? मग खूप आनंदात आयुष्य गेलं असतं. पण माझ्यात ती हिंमत नव्हती. मी खूप भित्री होते. त्याची शिक्षा मिळाली आहे मला. खूप सोसलं आहे मी. ज्या गरीब बिचाऱ्या मुलांच्या आया त्यांना सोडून जातात, ती मुलं त्या आयांचा किती तिरस्कार करत असतील!" एवढं बोलून मादाम थांबल्या. हुंदके दाटून आल्यामुळे त्यांना बोलणं अशक्य झालं होतं.
तो निर्मनुष्य परिसर प्रखर उन्हाने भाजून निघत होता. भगभगीत सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांची आग होत होती. सगळं कसं शांत शांत होतं.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना विरळसं गवत होतं. ते सुकून पार पिवळं पडलं होतं. गवतातले नाकतोडे अखंडपणे कर्कश आवाज करत होते.
"थांब जरा. थोडा वेळ बस इथे." मि. द अप्रवॅल म्हणाले. त्यांनी मादामचा हात धरून त्यांना रस्त्याच्या कडेला नेलं. मादाम मटकन खाली बसल्या, आणि त्यांनी आपला चेहरा हाताच्या ओंजळीत धरला. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना महिरपीसारखे दिसणारे त्यांचे पांढरे केस विस्कटून एकमेकांत गुंतले होते. दुःख अनावर होऊन त्या रडू लागल्या. मि. द अप्रवॅल अस्वस्थ मनाने मादामच्या समोर उभे राहिले. काय बोलावं, ते त्यांना समजत नव्हतं. शेवटी ते फक्त इतकंच पुटपुटले, "चल आता. धीर धर.. मन घट्ट कर." मादाम उठल्या. "होय." म्हणाल्या, आणि डोळे पुसून पुढे चालू लागल्या. त्यांची पावलं काहीशी अस्थिर पडत होती. त्या चालीत त्यांचं उतार वय दिसून येत होतं.
पुढे एका ठिकाणी काही झाडं रस्त्यावर सावली धरून उभी होती. त्यांच्या मागे अगदी मोजकीच घरं लपलेली होती. लोहाराच्या ऐरणीवरचे लयबद्ध आवाज ऐकू येत होते. समोर रस्त्याच्या उजवीकडे एका ठेंगण्याठुसक्या बंगलीसमोर एक बग्गी उभी होती. शेजारी एका टपरीखाली दोन माणसं घोड्याला नाल लावत होती.
मि. द अप्रवॅल त्या दोघांजवळ गेले. "पिएर बेनेडिक्टचं शेत कुठे आहे?" त्यांनी विचारलं.
"हॉटेल लागलं, की डावीकडे वळा आणि सरळ पुढे जा. पोरेट्स च्या नंतरचं तिसरं घर. फाटकाजवळ एक लहानसं स्प्रूस फरचं झाड आहे. सहज सापडेल तुम्हाला."
डावीकडचा रस्ता लागला. मादाम आता अतिशय संथ चालत होत्या. पाय जणु मोडून पडायच्या बेताला आले होते. त्यांचं हृदय इतकं जोरात धडधडत होतं, की आपण आता गुदमरणार अशी भीती त्यांना वाटू लागली. प्रत्येक पावलागणिक त्या तोंडातल्या तोंडात पुटपुटू लागल्या, "देवा! अरे देवा!"
मि. द अप्रवॅलसुद्धा बावरून गेले होते. त्यांचा चेहरा फिकट पडला होता. तरीही कठोर आवाजात ते म्हणाले, "तुला भावनांना आवर घालता येत नसेल, तर लगेचच सगळं उघडकीला येईल. जरा प्रयत्न कर आणि आवर स्वतःला."
"कशी आवरू?" मादाम म्हणाल्या. "माझा बाळ! आज मी माझ्या बाळाला भेटणार आहे!"
आता ते दोन शेतांमधल्या एका अरुंद अशा पायवाटेवरून चालले होते. दुतर्फा लावलेल्या बीच झाडांच्या दुहेरी ओळींच्या मधोमध ती पायवाट दडली होती. अकस्मात त्यांना समोर फाटक दिसलं. फाटकाशेजारी स्प्रूस फरचं एक रोपटं होतं.
"हेच ते!" मि. द अप्रवॅल म्हणाले.
मादाम चालताचालता एकदम थांबल्या आणि त्यांनी सभोवती पाहिलं. अंगण मोठं होतं. पार त्या शाकारलेल्या छोट्याशा घरापर्यंत पोहोचलं होतं. अंगणात सफरचंदाची झाडं होती. दुसऱ्या बाजूला गोठा, धान्य साठवायचं गोदाम, आणि कोंबड्यांचं खुराडं होतं. आऊटहाऊसजवळ बग्गी, एका घोड्याची गाडी, आणि शेण वाहून न्यायची ढकलगाडी होती. झाडांच्या खाली सावलीत चार वासरं चरत होती. काळ्या कोंबड्या बंदिस्त अंगणात इकडेतिकडे फिरत होत्या.
सगळं कसं शांत शांत होतं. घराचं दार उघडं होतं. पण घरात कोणी दिसत नव्हतं. ते दोघं आत जाऊ लागले. तेवढ्यात अंगणातल्या नासपतीच्या झाडाखाली ठेवलेल्या पिंपामधून एक भलामोठा काळा कुत्रा बाहेर आला, आणि रागारागाने भुंकू लागला. घराच्या भिंतीवर लावलेल्या फळकुटांवर मधमाशांची चार पोळी दिसत होती.
मि. द अप्रवॅल बाहेरच थांबले, आणि म्हणाले, "कोणी आहे का घरात?"
अगदी साधे सुती कपडे घातलेली दहाएक वर्षांची एक लहानखुरी मुलगी घरातून बाहेर आली. तिचे पाय धुळीने माखले होते. ती जराशी बावरलेली दिसत होती खरी, पण चेहऱ्यावरचा बिलंदर भाव लपत नव्हता. कोणी आत जाऊ नये म्हणून दार अडवल्याच्या अविर्भावात ती दारातच उभी राहिली. "काय पाहिजे?" तिने विचारलं.
"तुझा बाबा आहे का घरात?"
"नाही."
"कुठे गेलाय?"
"मला नाही माहीत."
"आणि आई?"
"ती गेलीय गायींच्या मागून."
"येईल का ती इतक्यात?"
"मला नाही माहीत."
मादाम एकदम म्हणाल्या, "त्याला बघितल्याशिवाय मी जाणार नाही." आपला मित्र आता परत जायची घाई करतो की काय, अशी भीती त्यांच्या शब्दांतून डोकावत होती.
"तो येईपर्यंत थांबू आपण, माय डियर."
मग दोघं दारातून मागे वळले. तितक्यात एक खेडूत स्त्री घराच्या दिशेने येताना त्यांना दिसली. तिच्या हातांतल्या दोन जड बादल्या उन्हात चमकत होत्या. ती उजव्या पायाने लंगडत होती. उन्हामुळे विटलेलं, आणि अनेकवार पावसाने झोडपलेलं असं मातकट रंगाचं एक जॅकेट तिने घातलं होतं. एखाद्या गरीब बापड्या मोलकरणीला शोभेल असा तिचा कळकट अवतार होता.
"आई आली." मुलगी म्हणाली.
ती स्त्री घराजवळ पोहोचली. काहीसं त्रासिकपणे आणि संशयाने तिने या अनोळखी लोकांकडे पाहिलं. आणि मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ती घरात गेली. जणु काही ते तिला दिसलेच नव्हते. निबर, सुरकुतलेला, फिकुटलेला चेहरा तिचं वय सांगत होता. होता. साधारणपणे गावाकडच्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसतो तसा एक निर्विकार भाव तिच्याही चेहऱ्यावर होता. मि. द अप्रवॅलनी तिला हाक मारली. "माफ करा, बाई. दोन कप दूध विकत मिळेल का? तेवढ्यासाठीच आलो होतो आम्ही."
बादल्या घरात ठेवून ती काहीशी अनिच्छेनेच पुन्हा दारात आली. "मी दूध विकत नाही." तिने उत्तर दिलं.
"आम्हांला खूप तहान लागली आहे. या मादाम फार थकून गेल्या आहेत. दूध नाही, तर प्यायला दुसरं काहीतरी देऊ शकाल का?"
त्या खेडवळ बाईने अस्वस्थ मनाने एक जळजळीत कटाक्ष त्यांच्यावर टाकला. मग मनाशी काही ठरवून ती म्हणाली, "इथवर आलाच आहात, तर देते थोडं."
आणि मग ती आत गेली. त्याबरोबर लगेच ती छोटी मुलगी बाहेर आली. तिने दोन खुर्च्या आणून सफरचंदाच्या झाडाखाली मांडल्या. मग तिच्या आईने फेसाळत्या दुधाचे दोन वाडगे आणून पाहुण्यांना दिले. हे पाहुणे कोण, कशासाठी आले, ते पाहावं, म्हणून ती घरात परत न जाता तिथेच त्यांच्याजवळ उभी राहिली.
"तुम्ही फेकाम्पहून आला आहात का?" तिने विचारलं.
"हो. आम्ही या उन्हाळ्यापुरते फेकाम्पला राहायला आलो आहोत." मि. द अप्रवॅल म्हणाले. मग थोडं थांबून त्यांनी तिला विचारलं, "तुम्ही कोंबड्या विकता का? आम्ही दर आठवड्याला एक घेऊ."
ती क्षणभर घुटमळली. मग म्हणाली, "हो, मला वाटतं, असतील काही कोंबड्या. तुम्हाला पिल्लं हवीत ना?"
"हो, अर्थात."
"बाजारात केवढ्याला घेता?"
मि. द अप्रवॅलना बाजारभावाची कसलीच कल्पना नव्हती. ते आपल्या मैत्रिणीकडे वळले.
"फेकाम्पमध्ये कोंबड्यांचा काय भाव आहे डियर?"
"चार फ्रँक्स.. चार फ्रँक्स आणि पन्नास सान्तिम्स." मादाम म्हणाल्या. त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते.
हा सगळा वेळ ती स्त्री मादामकडे संशयाने, तिरस्काराने पाहत होती. तिने विचारलं, "या बाईसाहेब रडताहेत.. त्यांना बरं वाटत नाही का?"
यावर काय बोलावं, ते मि. द अप्रवॅलना पटकन सुचेना. मग जरासे अडखळत ते म्हणाले, "नाही.. तसं नाही.. इथे येताना वाटेत त्यांचं घड्याळ हरवलं. तेच त्यांच्या मनाला लागून राहिलं आहे. फार सुंदर घड्याळ होतं ते. इथे कोणाला सापडलं, तर कृपा करून सांगा. "
हे उत्तर खोटं असल्याचं तिला कळलं, पण त्याबद्दल आणखी काही न बोलता ती एकदम म्हणाली, "हे पहा, आलेच हिचे वडील."
ती एकटीच फाटकाच्या दिशेने पाहत होती, त्यामुळे तिला एकटीलाच तिचा नवरा येताना दिसला होता.
मि. द अप्रवॅल गडबडीने उठले. मादाम दि कादूर खुर्चीत भर्रकन वळतावळता पडायच्या बेताला आल्या.
त्यांच्यापासून दहा यार्डांवर एक माणूस उभा होता. त्याच्या हातात गाईची वेसण होती. ती तो खच्चून ओढत होता. दमून त्याला धाप लागली होती. श्रमामुळे तो कमरेत वाकला होता. पाहुण्यांकडे अजिबात न पाहता तो ओरडला, "नालायक! नाठाळ कुठली!"
तसाच गाईला ओढत तो त्यांच्या शेजारून पुढे गेला आणि गोठ्यात जाऊन अदृश्य झाला.
मादाम दि कादूर आश्चर्यचकित होऊन, एक शब्दही न बोलता खुर्चीत तशाच बसून राहिल्या. त्यांच्या मनात आलं, "हा आपला मुलगा!" त्यांचे अश्रू तिथल्यातिथे विरून गेले होते. मि. द अप्रवॅलना सुद्धा हाच विचार छळत होता. ते वैतागून म्हणाले, "हेच का मि. बेनेडिक्ट?"
"तुम्हाला कोणी सांगितलं त्यांचं नाव?" त्याच्या बायकोने विचारलं. तिला अजूनही काहीतरी संशय येत होता.
"त्या कोपऱ्यावरच्या लोहाराने." मि. द अप्रवॅल म्हणाले.
नंतर थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. सगळ्यांचे डोळे गोठ्याकडे खिळले होते.
घराच्या भिंतीला जोडून असलेल्या त्या गोठ्याच्या दारामुळे जणु तिथे एक काळाकुट्ट भगदाड पाडलं होतं. आतलं काही दिसत नव्हतं. पण आवाज ऐकू येत होते...पावलांचे, खुरांचे. मग ते जमिनीवरच्या वाळलेल्या गवतामध्ये दबून गेले. मग तो पुन्हा दारात अवतीर्ण झाला. कपाळावरचा घाम पुसून लांब लांब पावलं टाकत संथपणे घराकडे आला. पुन्हा एकदा अनोळखी पाहुण्यांकडे दुर्लक्ष करून तो पुढे गेला आणि बायकोला म्हणाला, "जा, भांडं भरून सफरचंदाचं सायडर घेऊन ये माझ्यासाठी. मला खूप तहान लागली आहे." मग तो घरात परत गेला. त्याची बायको तळघरात गेली. आता पॅरिसचे पाहुणेच फक्त तिथे उरले.
"चल, हेनरी, आपण जाऊया. चल लवकर." मादाम दि कादूर म्हणाल्या. त्या दुःखाने बेभान झाल्या होत्या. कोणत्याही क्षणी त्या शुद्ध हरपून कोसळतील की काय, असं वाटत होतं. मि. द अप्रवॅलनी हात धरून मादामना खुर्चीतून उठवलं, आणि सर्व शक्तीनिशी त्यांना आधार दिला. मग त्यांनी एका खुर्चीवर पाच फ्रँक्स फेकले, आणि मादामचा हात धरून त्यांना तिथून बाहेर नेलं.
फाटकाच्या बाहेर येताच त्या जोरजोरात हुंदके देऊ लागल्या. दुःखाने थरथर कापू लागल्या. "हेनरी! हेनरी! हे काय केलंस तू आपल्या बाळाचं?"
मि. द अप्रवॅलचा चेहरा अगदी फिकट पडला होता. त्यांनी थंडपणे उत्तर दिलं, "मला जे करणं शक्य होतं, ते मी केलं. आज त्याच्या शेताची किंमत ऐशी हजार फ्रँक्स आहे. कित्येक मध्यमवर्गीय लोकांच्या मुलांकडेसुद्धा इतकी संपत्ती नसते."
मग अवाक्षरही न बोलता, संथपणे पाय ओढत दोघं परत आले.
मादाम अजूनही रडत होत्या. थोडा वेळ त्यांच्या गालांवर अश्रूंनी संततधार धरली, आणि मग हळूहळू ते थांबले.
ते दोघं फेकाम्पला पोहोचले, तेव्हा मि. दि कादूर रात्रीच्या जेवणासाठी त्यांची वाट बघत होते. त्यांनी दोघांना पाहिलं मात्र, ते हसत सुटले, आणि म्हणाले,
"चला, एकदाचा माझ्या बायकोला उष्माघात झाला तर! छान झालं. गेले काही दिवस डोकं फिरलं होतं तिचं!"
यावर कोणी काही उत्तर दिलं नाही.
मग मि. दि कादोरनी हातांचे तळवे एकमेकांवर घासले आणि विचारलं, "काय? निदान तुमचा फेरफटका तरी चांगला झाला असेल. हो ना?"
मि. द अप्रवॅलनी उत्तर दिलं, "होय. अगदी चांगला झाला. खरोखर, एकदम मस्त!"
*******
मूळ फ्रेंच कथा - Abandoned by Guy de Maupassant
इंग्रजी भाषांतर - Albert M. C. McMaster
प्रतिक्रिया
21 Jan 2023 - 8:18 pm | टर्मीनेटर
नेहमीप्रमाणेच उत्तम अनुवाद! 'मादाम दि कादूर' ह्यांच्या मनाची घालमेल/मनस्थिती कथा वाचताना जाणवते, हे तुम्ही केलेल्या भाषांतराचे यश आहे 👍
पुढील कथेच्या प्रतीक्षेत आहे!
21 Jan 2023 - 8:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सुंदर कथा आणि सुंदर अनुवाद. आपल्या नकोशा मुलाला भेटण्याची ओढ आणि पुन्हा आलेलं एकटेपण. सुंदर....!
-दिलीप बिरुटे
23 Jan 2023 - 4:43 pm | श्वेता व्यास
खूप छान अनुवाद.
कथा आवडली.
23 Jan 2023 - 5:11 pm | चांदणे संदीप
कथा आणि भाषांतर दोन्ही आवडले.
सं - दी - प
24 Jan 2023 - 7:26 am | तुषार काळभोर
मूळ कथा सुंदर आहेच, तुमचे भाषांतर कौशल्यही छान आहे.
नकोसा शीर्षकाने 'नकुशी' शब्दाचा संदर्भ असेल, असे वाटले होते. पण तो अगदीच वेगळा निघाला. आईची ओढ, घालमेल, नंतरची निराशा आणि दुःख अतिशय छान आलं आहे.
धन्यवाद!
24 Jan 2023 - 10:34 pm | स्मिताके
होय, मलाही शीर्षक देताना हा संदर्भ आठवला होता. कथेशी आणि मूळ शीर्षकाशी हा अर्थ अगदी तंतोतंत जुळत नाही हे खरं.
पण abandoned साठी दुसरा सुटसुटीत प्रतिशब्द जमेलसं वाटलं नाही. परित्यक्त, टाकलेला हे शब्द शीर्षक म्हणून बरोबर वाटेनात.
तुम्ही किंवा आणखी वाचकांनी आणखी पर्याय जरूर सुचवा.
तसंच ब्लॅकमेल हा शब्द एक दोन प्रतिशब्दांत सांगता आला नाही म्हणून तसाच ठेवला.
24 Jan 2023 - 10:23 pm | स्मिताके
टर्मीनेटर, प्रा. डॉ., श्वेता व्यास, चांदणे संदीप, तुषार काळभोर
नेहमीप्रमाणे आपलं मोलाचं प्रोत्साहन मिळाल्याचा आनंद झाला आहे. आभारी आहे.
25 Jan 2023 - 8:54 am | कुमार१
सुंदर कथा आणि सुंदर अनुवाद.
1 Feb 2023 - 7:48 pm | स्मिताके
डॉ. कुमार१
प्रतिसादाबद्द्ल आभारी आहे.