मंदिराबाहेर भेटलेली देवी

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
13 Dec 2022 - 5:58 pm

आज तो ऑफिसमधून घाई गडबडीत परतला. आल्याआल्या कॅमेराची बॅग भरली. घडयाळ बघितलं सहा वाजले होते. मंदिराचा वार्षिक उत्सव चालू व्हायला अर्धा तास होता अजून. प्रसादाचं जेवण असलं तरी सगळे फोटो काढून जेवायला उशीर होणारच . थोडा चहा पोटात गेला तर उत्साह टिकून राहील शेवटपर्यन्त असा विचार करून शेजारच्या हॉटेलात जाऊन चहा घेतला. चहा पिता पिता फोटो कसे काढता येतील ह्याचा विचार केला . चहा पिऊन थेट ममंदिराकडे चालू लागला. जाता जाता नेहमीचे नियम स्वतःला पुन्हा एकदा बजावले - " मन आणि कॅमेरा कुठेही भरकटू द्यायचा नाही. विश्वास ठेवून पुजार्यांनी आपल्याला जबाबदारी दिली आहे, ती चोख पार पाडायची. फोटो काढताना, त्यामुळे कार्यक्रमात कुठलीही बाधा येणार काळजी घ्यायची. फक्त आणि फक्त कार्यक्रमाचेच फोटो काढायचे. बाकी कुठल्याही गोष्टीने मन विचलित होऊ द्यायचं नाही !"

नियमांची उजळणी करत तो मंदिराच्या दारात पोचला. मंदिर रस्त्याच्या डाव्या बाजूला होत आणि उजव्या बाजूला बांधकाम मजुरांची छोटी वस्ती होती. त्या बाजूला मिरवणुकीसाठी ट्रॅक्टर सजवण्याचे काम चालू होत. आणि त्या ट्रॅक्टरच्या भोवती वस्तीतल्या छोटया मुलांचा किलबिलाट चालू होता. तिकडे एक नजर फिरवून तो थेट मंदिरात शिरला . मंदिराचं पटांगण रांगोळ्या, पताकांनी सजल होतं. ते पाहून मन प्रसन्न झालं पण तिथे न रमता तो थेट दर्शनाकरता मंदिरात शिरला. त्याची लाडकी देवी आज कशी दिसत असेल ह्याच मोठं कुतुहूल होतं त्याला.

तशी ती रोजच खूप सुंदर दिसायची - रेखीव चेहरा, नथ घातलेलं ते चाफेकळी नाक ज्याच्या शेंड्यावर कधीच रागाने स्पर्श ही केला नसेल , मळवट भरलेला मोठं कपाळ ज्याच्यावर आठीची रेखा उमटूच शकत नव्हती , ओठावरचं स्मितहास्य ज्याला गर्वाची झालर देखील नव्हती. आणि सगळं पुरेसं नसेल म्हणून ते ममतेने भरलेले कमळाच्या पाकळी सारखे टपोरे डोळे, खूपच बोलके. बघणाऱ्याला वाटावं ही आत्ता माझ्याशी बोलेल. तिच्या त्या दैवी रुपाकडे पाहून सगळ्या चिंतांचा विसर पडायचा.

आज तर वाषिर्क उत्सव , जास्तच सजली असेल ती असा विचार करत तो तिच्यासमोर उभा राहिला. डोळे दिपून जातील असा शृंगार केला होता आज. तिचा पूर्ण पोषाख पांढऱ्या आणि गुलाबी मोत्यांचा बनला होता , त्यावर निळे आणि हिरवे मोती वापरून मोराचं चित्र बनवलं होतं . चांदीचा मुकुट, सोनेरी मुलामा दिलेल्या तिच्या चेहऱ्यावर खूपच उठून दिसत होता. गुलाबी रंगाने तिच्या ओठावरचं हास्य अजूनच खुलल होतं. आणि शेवटी त्याची नजर स्थिरावली ती देवीच्या नेत्र कमलांवर. आज त्या बोलक्या डोळ्यांमध्ये ममते सोबत अजून काही तरी होतं . जणू ती काही तरी सांगू पाहत होती. आज ते डोळे आईचे कमी आणि शिक्षिकेचे जास्त भासत होते .
काय सांगत असेल ही असा विचार करत तो हरवून गेला. पुजारी बुवांच्या हाकेने त्यांची तंद्री भंग पावली . कार्यक्रम सुरु होतोय अस सांगत होते. त्याला कार्यक्रमाची रूपरेखा नीट समजावून सांगितली. तो देवीकडे वळला, नमस्कार केला आणि प्रार्थना केली - "काम नीट होऊ दे माझ्या हातून आणि माझी एकाग्रता भंग नको होऊ देऊस." तिच्या बोलक्या डोळ्यात नेहमीची आश्वस्तता काही त्याला दिसली नाही. "काय मनात आहे हिच्या देवच जाणे" असा विचार त्याच्या मनात आला आणि त्याचं त्याला हसू आल.

कॅमेरा गळ्यात अडकवून त्याने कामाला सुरुवात केली. आधी देवीचे , मग बाहेर पटांगणात ठेवलेल्या उत्सव मूर्तीचे फोटो काढले. मग उत्सव मूर्तीसमोर पूजा करून ठेवलेल्या तलवारी, सनई , संबळ , ढोल ह्यांचे फोटो काढले. त्यानंतर तिथे झालेला यज्ञ , उत्सव मूर्तीची पूजा, तलवारीचे खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम एका मागे एक अविश्रांत टिपत राहिला. आता फक्त उरली उत्सव मूर्तीची, रथामध्ये परिवर्तित झालेल्या ट्रॅक्टरमधून मिरवणूक. पण त्या आधी थोडी विश्रांती घेऊन प्रसाद वाटप चालू झाला.

रथांचे फोटो काढण्यासाठी त्याच्यासाठी ही योग्य संधी होती कारण ट्रॅक्टर सजून झाले होते आणि तिकडे अजिबात गर्दी नव्हती . सगळ्यांना सोडून तो ट्रॅक्टर जवळ पोचला - त्याला जोडलेले धातूचे घोडे, जाम्भळ चकचकीत कापड, शेवंतीची पांढरी आणि पिवळी फुले वापरून केलेली सजावट आणि चारी कडून लखलखणाऱ्या दिव्याच्या माळा . देवीच्या शालीनतेला एकदम शोभून दिसेल असा रथ बनला होता. आणि आजूबाजूला चिटपाखरू देखील नाही. " वाह काय वेळ निवडली आहे मी ह्याचे फोटो काढायला, आतापर्यंत सगळे फोटो छान आलेत आणि माझी एकाग्रता अशीच राहिली तर हे सुद्धा भारी येणार." स्वतःच कौतुक वाटलं त्याला.

वेळ वाया न दवडता त्याने काम चालू केलं. एक दोन फोटो काढले असतील इतक्यात कुठून तरी समोरच्या वस्तीतली डझनभर छोटी मुल-मुली तिथे पोचली आणि त्याला घेरून उभी राहिली आणि त्यातली काही मुलं सारखं सारखं लेन्समध्ये वाकून बघू लागली . थोडा वैतागलाच तो . त्याने सगळ्या मुलांना थोडं आवाज चढवूनच सूचना दिल्या - " मी फोटो काढताना कुणीच कॅमेरा आणि ट्रॅक्टरच्या मध्ये अजिबात यायचं नाही. " तशी ती चिल्लर पार्टि मागे सरकली, सगळेजण दाटीवाटी ने त्याच्या मागे जाऊन उभारले. त्याने परत फोटो काढायला सुरुवात केली. तो कॅमेरा क्लीक करेल तशी मागून हाक येऊ लागली - " काका आम्हाला पण दाखव फोटो ". त्याने थोड्या अनिच्छेनेच पहिला फोटो दाखकवला , लगेच त्या बारक्यांची प्रतिक्रिया - " कसला भारी आलाय फोटो !" हे पुढच्या प्रत्येक फोटो सोबत होत राहिला. असे दहा बारा फोटो काढून झाले.

आता जमिनीवर बसून , त्याने पुन्हा एकदा कॅमेरा डोळ्याला लावला, फ्रेम नीट काम्पोझ केली , तो क्लिक करनार इतक्यात एक चिमुकला हात त्याच्या खांद्यावर पडला आणि सोबत मुलीचा एक तक्रारवजा सूर त्याच्या कानावर पडला - "अजून किती वेळ तू त्या ट्रॅक्टरचेच फोटो काढत बसणार आहेस ?" तो आपल्याच कामात गुंग, तिच्याकडे न पाहताच तो म्हणाला - " भरपूर काढायचे आहेत अजून , तुला काही त्रास होतोय का त्याचा ?" ती बोलली - " मग काय , कधीपासून मी इथे उभारली आहे , तू माझा एक तर फोटो काढशील म्हणून , पन तू नुसता त्या ट्रॅक्टरच्या मागे लागलाय!" तीच ते उत्तर ऐकून तो हादरलाच - "कोण आहे ही महामाया बघू तरी एकदा " असा विचार करत मागे वळला. आणि तिच्याकडे पाहताच राहिला - पाच सात वर्षांची असेल ती चिमुरडी. पानाफुलांची नक्षी असलेला, रंग उतरलेला लिंबोळी रंगाचा फ्रॉक . थोडीशी काळी सावळीच , पण सावळेपणा तिचा गोडवा खुलवत होता , मोठ कपाळ , मधून चापून पाडलेला भांग, लाल रंगाच्या क्लिप लावून दोन्ही कानांवर बांधलेल्या दोन शेंड्या , कानात सोनेरी डूल , रेखीव भुवया, छान सरळ पण थोडस नकटं नाक , थंडीने थोडेसे फुटलेले ओठ , थोडीशी टोकदार हनुवट. द्रिष्ट लागावी असा गोंडसपणा , पण सगळ्यात सुंदर भाग म्हणजे टपोरे डोळे , अगदी देवी सारखे! "काढणार ना माझा एक फोटो?" ह्या प्रश्नाने तो भानावर आला. इतक्या गोड विनंतीसमोर त्याचा नाईलाज झाला. आपले नियम गुंडाळून त्याने तिचा फोटो काढायला कॅमेरा वर उचलला तशी ती छान हसली. तिला फोटो दाखवत तो म्हणाला- "बघ कित्ती गोड आलाय फोटो !" , तिने डोळेभरून तो फोटो पाहिला, लाजली आणि चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत लपवून पळून गेली .

मग इतर मुलांनीही " फोटो काढ" असा सांगितलं , सगळे रांगेत उभं राहून एकेएक फोटो काढून घेऊ लागले. आपले फोटो पाहून आनंदाने उड्या मारू लागली. सगळ्यांचे फोटो काढून झाल्यावर "काकाने आमचे फोटो काढले " असं ओरडत आनंदाने निघून गेले. त्यांचा तो आनंद त्याचा मनाला एक वेगळंच समाधान देऊन गेला . तो विचार करू लागला - " खर तर हि मुले मी ट्रॅक्टर चे फोटो कसे काढतोय हे बघायला इतका वेळ इथे थांबली नव्हती. आपलेही कुणी तरी फोटो काढेल ही छोटीशी अपेक्षा होती त्यांची . पण ते सांगायचं धाडस त्या एकट्या मुलीशिवाय कुणी केलं नाही. तिने सांगितलं नसत तर एकाग्रता, काम चोख करायचे नियम, कर्तव्यनिष्ठा ह्यांच्यात हरवून बसलेल्या माझ्या मनाला काही ते समजलं नसत आणि त्या छोट्या फुलांचं हिरमुस करण्याचं पाप खात्यावर जमा झालं असतं. ध्येय-कर्मपूर्तीच्या मागे धावताना तुझी संवेदनशीलता हरवू नको हेच शिकवायला देवीच त्या मुलीच्या रूपात भेटली आज!"

बालकथाप्रकटन

प्रतिक्रिया

कंजूस's picture

13 Dec 2022 - 7:45 pm | कंजूस

छान जमलंय.

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Dec 2022 - 7:58 pm | राजेंद्र मेहेंदळे

शीर्षक वाचुन कायतरी वेगळेच वाटले होते :) पण देवी छोटी निघाली. ह.घ्या.
उत्सवाचे वर्णन वाचुन जगन्नाथपुरी किवा श्रीरंगपट्टण्ची आठवण आली.

शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?

पॉइंट ब्लँक's picture

14 Dec 2022 - 12:31 pm | पॉइंट ब्लँक

शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?
खरच कित्ती भारी झालं असत ना असं जमलं असत तर. तसा मोह नेहमी होतो, मग प्रयत्नही केला जातो, पण बर्‍याच वेळा तो फसतो. ह्या वेळीही फसला. लेखातला एकसंधपना जात होता आणि तुटक काही तरि होत होतं. म्हणुन मग " तुमसे ना हो पायेगा" असं स्वतःला समजावलं आणि सरळसोट संपवल. ज्यांना हे सातत्याने, प्रत्यक्षरित्या न लिहिता बरच काही सांगता येतं, त्यांची प्रतिभाशक्ती फारच उच्च असली पाहिजे.

सस्नेह's picture

13 Dec 2022 - 8:47 pm | सस्नेह

छान सरळसाधी गोष्ट !

सौंदाळा's picture

13 Dec 2022 - 9:14 pm | सौंदाळा

सुंदरच लिहिले आहे. गोष्ट आवडली.

सौन्दर्य's picture

13 Dec 2022 - 11:44 pm | सौन्दर्य

कथा एकदम सुंदर व मस्त.

कित्येक वेळा मोठे ज्या गोष्टी सहजगत्या बोलू/सांगू शकत नाहीत त्याच गोष्ट लहान बालके सहजपणे बोलून जातात व आपल्याला काहीतरी शिकवून जातात.

गोष्टीचा ओघ फारच छान, देवीचे तसेच छोट्या देवीचे वर्णन सुंदर.

पॉइंट ब्लँक's picture

14 Dec 2022 - 12:33 pm | पॉइंट ब्लँक

शेवटचा ट्विस्ट किवा बोध वाक्य एव्हढे सरळसोट( एक्स्प्लिसिट म्हणायचे आहे मला) जरा बदलुन इंप्लिसिट करता येईल का?

+१, एकदम खरं आहे. त्यांच्या निरागसपनाची ताकद असते ती, जी आपण मोठे झाल्यावर हरवुन बसतो.

पॉइंट ब्लँक's picture

14 Dec 2022 - 12:36 pm | पॉइंट ब्लँक

कित्येक वेळा मोठे ज्या गोष्टी सहजगत्या बोलू/सांगू शकत नाहीत त्याच गोष्ट लहान बालके सहजपणे बोलून जातात व आपल्याला काहीतरी शिकवून जातात.

माफ करा. ह्या वाक्याबद्दल बोलायच होतं. कॉपी-पेस्ट एरर!

छान गोष्ट.. दोन्ही देवींच वर्णन सुरेख केलंय.. डोळ्यासमोर उभं केलं अगदी.

छान गोष्ट.. दोन्ही देवींच वर्णन सुरेख केलंय.. डोळ्यासमोर उभं केलं अगदी.

श्वेता२४'s picture

14 Dec 2022 - 11:03 am | श्वेता२४

देवीचे व उत्सवाचे छान वर्णन. खूप आवडली.

पॉइंट ब्लँक's picture

14 Dec 2022 - 12:47 pm | पॉइंट ब्लँक

सुंदर प्रतिक्रियांसाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार!

उत्खनक's picture

14 Dec 2022 - 2:19 pm | उत्खनक

आवडलं! पुलेप्र. :-)

Bhakti's picture

14 Dec 2022 - 3:30 pm | Bhakti

कर्म + संवेदनशीलता +१११

स्मिताके's picture

14 Dec 2022 - 10:11 pm | स्मिताके

>> ध्येय-कर्मपूर्तीच्या मागे धावताना तुझी संवेदनशीलता हरवू नको
खरं आहे. खूप निरागस आणि छानसं काही शिकवून जाणारी ही कथा आवडली.

प्रचेतस's picture

15 Dec 2022 - 9:50 am | प्रचेतस

सहजसुंदर उत्तम लेखन

श्वेता व्यास's picture

16 Dec 2022 - 4:35 pm | श्वेता व्यास

निरागस कथा आवडली.
उत्सवाचं वर्णन खूपच छान.

गवि's picture

16 Dec 2022 - 9:25 pm | गवि

साधे, सहज, सरळ, सुंदर.

चांदणे संदीप's picture

17 Dec 2022 - 1:27 pm | चांदणे संदीप

अतीव सुंदर!
दोन वेळा वाचलं. पहिल्यांदा घाईघाईत वाचलं आणि प्रतिसाद न लिहिताच गेलो. आज परत येऊन पुनर्वाचनाचा आनंद घेतला.

सं - दी - प

सिरुसेरि's picture

19 Dec 2022 - 2:05 pm | सिरुसेरि

हलक्या फुलक्या वाटणा-या लेखातुन / अनुभवातुन एक वेगळा आणी महत्वाचा विचार मांडला आहे . खुप छान . +१

पॉइंट ब्लँक's picture

26 Dec 2022 - 12:54 pm | पॉइंट ब्लँक

पुन्हा एकदा सर्वांचे आभार