सिग्नल (भाषांतर)

स्मिताके's picture
स्मिताके in जनातलं, मनातलं
6 Dec 2022 - 10:07 pm

सिग्नल

------------------
मूळ कथा - The Signal By Vsevolod M. Garshin.
अवघ्या वीस कथा लिहिणारे रशियन लेखक गार्शिन (१८५५ - १८८८) हे अतिशय हळव्या मनोवृत्तीचे लेखक म्हणून ओळखले जात. १८७७
च्या टर्किश रशियन युद्धकाळात सैन्यात भरती होऊन, ते एका लढाईत जखमी झाले होते. त्या काळात घेतलेला युद्धाचा अनुभव त्यांच्या कथांमधून दिसून येतो.
एक वर्स्ट = १.१ किमी
एक देसियातीन = जवळपास एक हेक्टर
सॅम्हावार 0
------------------

सेमयॉन इव्हानोव्ह रेल्वेचा रूळ राखणदार होता. त्याची झोपडी एका स्टेशनपासून दहा वर्स्ट तर दुसरीकडच्या स्टेशनपासून बारा वर्स्ट अंतरावर होती. चार वर्स्टवर एक कापूस गिरण होती. गेल्या वर्षीच सुरु झाली होती ती. जंगलाच्या मागे तिचं काळवंडलेलं उंच धुरांडं दिसायचं. सेमयॉनच्या झोपडीपासून दूरवर इतर रूळ राखणदारांची घरं होती.

सेमयॉन इव्हानोव्हची तब्येत आता पार खालावली होती. नऊ वर्षांपूर्वीच्या युद्धात त्याने सैन्यातल्या एका अधिकाऱ्याच्या हाताखाली काम केलं होतं. त्यावेळी ऊन, पाऊस, उकाडा, थंडी कशाची पर्वा न करता दिवसाला चाळीस पन्नास वर्स्ट चालावं लागे. त्या काळात त्याला उन्हाने भाजण्याचा, थंडीने पोळण्याचा आणि उपासमारीने व्याकुळ होण्याचा पुरेपूर अनुभव आला होता. बंदुकीच्या गोळ्याही चाटून गेल्या होत्या. पण देवाच्या कृपेने त्याला एकही गोळी लागली नव्हती.

एकदा सेमयॉनची रेजिमेंट युद्धाच्या आघाडीवर गेली होती. आठवडाभर टर्किश सैन्याशी चकमकी झडत होत्या. दोन्ही सैन्यांच्या मध्ये फक्त एक खोल अरुंद दरी होती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत गोळीबार सुरू होता. दिवसातून दोन वेळा सेमयॉन छावणीतल्या भटारखान्यातून दरीपर्यंत आपल्या साहेबांसाठी वाफाळता चहा भरलेला सॅम्हावार आणि जेवण घेऊन जायचा. आजूबाजूला गोळ्या सणसणत जात, आणि निर्दयपणे दगडांवर आपटत. सेमयॉनचा थरकाप उडायचा. कधीकधी त्याला रडू यायचं. पण तरीही तो आपलं काम करत राहिला. अधिकारी त्याच्यावर खूष होते. कारण त्याच्यामुळेच तर नेहमी गरमागरम चहा तयार असायचा ना!

तो युद्धावरून हातीपायी धड परतला खरा, पण संधिवाताने त्याला अपंगत्व आलं होतं. त्यानंतर मात्र दुर्दैवाचे दशावतार सुरु झाले. घरी परतताच त्याला समजलं, की आपले वृद्ध वडील आणि चार वर्षांचा मुलगा दोघेही मरण पावले आहेत. आता सेमयॉन आणि त्याची बायको, दोघंच उरली. शेत नांगरणीच्या कामात हातपाय साथ देईनासे झाल्यामुळे त्याच्याकडून फारशी कामं होत नव्हती. गावात राहणं कठीण झाल्यावर, नव्या जागी जाऊन नशीब काढावं म्हणून दोघं गाव सोडून निघाले. काही काळ ते जवळपासच्या खेर्सन, दोनश्चिना अशा गावांमधून राहिले. पण कुठेच नशीब उजाडलं नाही. मग त्याच्या बायकोने नोकरी धरली, आणि सेमयॉनने आजूबाजूला प्रवास सुरु ठेवला. एकदा तो एका इंजिनमधून प्रवास करत असताना एका स्टेशनवरच्या स्टेशनमास्तरचा चेहरा त्याला ओळखीचा वाटला. दोघांनी एकमेकांना क्षणभर पाहिलं, आणि.. ओळखलं! सेमयॉनच्या रेजिमेंटमधला तो एक अधिकारी होता.

"इव्हानोव्ह ना रे तू?"
"होय, सर."
"इथे कसा काय आलास?' सेमयॉनने त्याला आपली कहाणी सांगितली.
"मग, कुठे चालला आहेस आता?"
"सांगता येत नाही, सर."
"मूर्खा! सांगता येत नाही म्हणजे काय?"
"खरंच सांगतोय, साहेब. मला जायला अशी जागाच नाही. मला नोकरी शोधली पाहिजे, सर."
स्टेशनमास्तरने त्याच्याकडे पाहिलं, जरासा विचार केला, आणि म्हणाला, "बरं तर, मित्रा, इथे या स्टेशनात राहा थोडे दिवस. मला वाटतं, तुझं लग्न झालंय. हो ना? बायको कुठाय तुझी?"
"होय साहेब. माझं लग्न झालंय. माझी बायको कुर्स्कमध्ये आहे. एका व्यापाऱ्याने नोकरी दिली आहे तिला."
"बरं. तिला पत्र लिहून बोलावून घे. तिच्यासाठी मी फुकट प्रवासाचा पास देतो. इथे रूळ राखणदाराची जागा भरायची आहे. मी वरच्या साहेबांशी बोलतो तुझ्या वतीने."
"आपले खूप उपकार झाले, साहेब." सेमयॉनने उत्तर दिलं.
मग सेमयॉन स्टेशनात राहिला. त्याने भटारखान्यात काम केलं, जळाऊ लाकूड फोडलं, आवार स्वच्छ केलं, फलाट झाडला. पंधरवड्यात त्याची बायको आली. मग सेमयॉनने एका झोपडीत मुक्काम हलवला. ही झोपडी नवी होती, आणि ती उबदार राखायला हवं तितकं लाकूड होतं. भाजीपाला पिकवायला एक छोटा बगीचा होता. हा पूर्वीच्या रूळ राखणदाराने ठेवलेला वारसा. रेल्वेच्या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला सुमारे अर्धा देसियातीन कसलेली जमीनसुद्धा होती. सेमयॉन खूष झाला. त्याच्या मनात आलं, आता थोडी शेती करावी. एक गाय, एक घोडा घ्यावा.

नोकरीसाठी आवश्यक ते सर्व सामान त्याला देण्यात आलं. एक हिरवा बावटा, एक लाल बावटा, कंदील, एक कर्णा, हातोडी, पाना, पहार, फावडं, झाडू, खिळे. शिवाय नियमावलीची दोन पुस्तकं आणि रेल्वेचं वेळापत्रक. सुरुवातीला सेमयॉनला रात्री झोपच लागत नव्हती. मग त्याने ते वेळापत्रक तोंडपाठ करून टाकलं. एखादी गाडी यायच्या दोन तास आधी तो आपल्या सेक्शनमध्ये जाऊन तिथल्या खोपटाजवळच्या बाकावर बसायचा. रुळांना हादरे बसताहेत का, गाडीचा खडखडाट ऐकू येतो आहे का, ते कान देऊन ऐकायचा, आणि नीट लक्ष देऊन पाहायचा. तसं त्याला नीट वाचता येत नव्हतं, पण एक एक अक्षर लावून त्याने नियमावलीसुद्धा वाचली आणि पाठ करून टाकली.

उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तितकंसं काम नव्हतं. रुळावरून बर्फ काढून टाकायला नको, आणि त्या लाईनवर तशा गाड्याही तुरळक. दिवसातून दोनदा सेमयॉन आपल्या सेक्शनवर जायचा. खिळे तपासून ठोकाठोकी करायचा. रुळाभोवती खडीचा भरणा करायचा. पाण्याचे पाईप्स तपासायचा. एव्हढं झालं, की खुशाल घरी जावं आणि काय हवं ते करावं! अशा या नोकरीत फक्त एकच कटकट होती. काहीही करावंसं वाटलं, मग ती किती छोटी गोष्ट का असेना, त्याला इन्स्पेक्टरची परवानगी घ्यावी लागायची. सेमयॉन आणि त्याची बायको, दोघांनाही जरा कंटाळाच येऊ लागला होता.

दोन महिने उलटून गेले. सेमयॉनने शेजाऱ्यांच्या ओळखी करून घ्यायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या दोन्ही बाजूंना राहणारे दोन रूळ रखवालदार. त्यातला एक अगदी वृद्ध होता. रेल्वेचे अधिकारी, त्याला नोकरीवरून काढून कधी टाकता येतंय याची वाटच बघत होते. तो आपल्या झोपडीबाहेर फारसा पडत नसे. त्याची बायकोच त्याचं सर्व काम करत असे. दुसरा शेजारी स्टेशनच्या जास्त जवळ राहायचा. तो तरुण होता. दिसायला बारीक, पण ताकदवान. सेमयॉनची त्याच्याशी भेट झाली ती दोन्ही झोपड्यांच्या मध्ये असलेल्या भागात. सेमयॉनने टोपी काढून अभिवादन केलं. "काय, कसं काय?"
शेजाऱ्याने त्याच्याकडे संशयाने एक तिरपी नजर टाकली. "कसं काय?" एवढं बोलून तो मागे वळला, आणि निघून गेला.
मग दोन्ही बायकांची भेट झाली. सेमयॉनच्या बायकोने प्रयत्न करूनसुद्धा शेजारीण तिच्याशी फारसं बोलली नाही.
पुढे एकदा सेमयॉन शेजारणीला म्हणाला, "काय ग, तुझा नवरा फारसा बोलत नाही?"
ती आधी गप्पच राहिली, पण नंतर म्हणाली, "आहेच काय बोलण्यासारखं? जो तो आपल्याच कामात. जा पाहू आपल्या वाटेने. देव तुमचं भलं करो."

कसं का असेना, महिन्याभराने त्यांची ओळख झाली. मग सेमयॉन आणि वासिली रुळांमधून चालत जात, एखाद्या पाण्याच्या पाईपलाईनच्या कडेवर बसत, पाईप ओढून धूर सोडत आणि आपल्या आयुष्याबद्दल बोलत. त्यातला बराच वेळ वासिली गप्पच राहायचा. पण सेमयॉन आपल्या गावाबद्दल, युद्धाच्या अनुभवाबद्दल बोलायचा. "आयुष्यात मी पुष्कळ दुःख पाहिलं." तो म्हणायचा, "आणि तेही तरुण वयात. देवाने मला आनंद कसा तो दिलाच नाही. पण देव जे देईल, तेच आयुष्य खरं, वासिली स्तेपानिच, मित्रा."

वासिली स्तेपानिचने आपला पाईप रुळावर ठोकून त्यातली राख झटकली. तो उभा राहिला, आणि म्हणाला, "आयुष्यभर दैव नव्हे, तर माणसं आपली पाठ सोडत नाहीत. या पृथ्वीवर माणसापेक्षा क्रूर प्राणी नाही दुसरा. लांडगा लांडग्याला खात नाही. पण माणूस अगदी झटक्यात माणसाला खाईल. "
"असं म्हणू नकोस मित्रा, लांडगा खातो लांडग्याला."
"मनात आलं ते बोललो मी. कसंही असो, माणसापेक्षा क्रूर कोणीच नाही. माणूस इतका लबाड आणि स्वार्थी नसता ना, तर जगणं शक्य झालं असतं. प्रत्येकजण दुसऱ्याच्या वर्मी घाव घालायला बघतो. दुसऱ्याला खाऊन, गिळून टाकायला बघतो."
सेमयॉनने थोडा विचार केला. "कोण जाणे," तो म्हणाला, " कदाचित तू म्हणतोस तसं असेल, नाहीतर मग देवाची इच्छा असेल."

"आणि कदाचित, " वासिली म्हणाला, "तुझ्याशी बोलणं म्हणजे माझ्या वेळेचा अपव्यय असेल. सर्व दुःखदायक गोष्टींचा दोष देवावर ढकलायचा, आणि नुसतं बसून सहन करत राहायचं, हे माणसाचं नव्हे, गुराढोरांचं लक्षण आहे मित्रा. एव्हढंच सांगतो." मग तो मागे वळला, आणि निरोपही न घेता निघून गेला.
सेमयॉनही उठला. "अरे, पण तू का चिडतोस?" पण त्याच्या शेजाऱ्याने मागे वळून पाहिलं नाही. तो आपल्या वाटेने जात राहिला.
वळणावरून तो दिसेनासा होईपर्यंत सेमयॉन त्याच्याकडे पाहत राहिला. मग तो घरी गेला, आणि आपल्या बायकोला म्हणाला, "अरिना, आपला शेजारी दुष्ट आहे. माणुसकी नाही त्याला."

पण दोघा शेजाऱ्यांचं भांडण मात्र झालं नाही. ते पुन्हा भेटत राहिले, आणि त्याच विषयांवर चर्चा करत राहिले.

"चल, आता कबूल कर बघू. माणसं अशी नसती ना, तर आपण या झोपड्यांमधून सडत पडलो नसतो." वासिली एकदा म्हणाला.
"अरे, पण झोपड्यांत राहिलो म्हणून काय बिघडलं? तसं काही वाईट नाही त्यात. माणसं जगतात झोपड्यांतून."
"होय तर! जगतात म्हणे! तू पण ना.. इतकी वर्षं जगलास, पण फारसं काही जाणून घेतलेलं नाहीस. पुष्कळ गोष्टी नजरेस पडल्या असतील तुझ्या, पण न्याहाळल्या नसशील. झोपडीत राहणारा गरीब बापडा माणूस कसलं आयुष्य जगणार रे? ते नरभक्षक ताव मारताहेत आपल्यावर. रक्त शोषून घेताहेत आपलं. आणि वय झालं ना, की फेकून देतील आपल्याला. डुकरांना खायला फोलफटं घालतात ना, तसं. तुला पगार किती मिळतो रे?"
"फारसा नाही मिळत रे, वासिली स्तेपानिच.. बारा रुबल्स."
"आणि मला, साडेतेरा रुबल्स. का? नियमाप्रमाणे आपल्याला पंधरा रुबल्स मिळायला हवेत. तुला बारा आणि मला साडेतेरा, हे कोणी ठरवलं? स्वतःलाच विचारून पहा! आणि तू म्हणतोस या पगारात जगता येतं? तुला कळतंय ना, हा फक्त दीड रुबल किंवा तीन रुबल्सचा प्रश्न नाहीये - पूर्ण पंधरा रुबल्स दिले ना, तरीसुद्धा! मागच्या महिन्यात मी स्टेशनवर गेलो होतो. त्यावेळी गाडीतून आपले साहेब गेले. मी पाहिलं त्यांना. हो, केवढा हा माझा सन्मान! त्या गाडीचा एक डबाच खास त्यांच्यासाठी होता. काय थाटात बाहेर आले..फलाटावर उभे राहिले.. मला आता इथे फार राहायचंच नाही. जातो मी कुठेतरी. कुठेही. वाट फुटेल तिकडे."
"पण कुठे जाशील, स्तेपानिच? इथे ठीक चाललंय तुझं, तसंच चालेना का. घर आहे. घराची ऊब आहे. छोटासा जमिनीचा तुकडा आहे. तुझ्या बायकोला नोकरी आहे."

"जमीन! माझ्या जमिनीकडे नीट बघ एकदा. एक फांदीसुद्धा नाही तिथे.. काहीच नाही. वसंत ऋतूत मी कोबी पेरले होते. नेमका इन्स्पेक्टर आला. म्हणाला, "काय आहे हे? आधी का कळवलं नाहीस? परवानगीशिवाय का केलंस हे? चल, खणून काढ ते आधी. मुळांसकट काढ." दारूच्या नशेत होता तो. एरव्ही काही बोलला नसता कदाचित, पण त्यावेळी ते डोक्यात गेलं त्याच्या. तीन रुबल्स दंड झाला!"वासिली थोडा वेळ पाईप ओढत गप्प राहिला. मग हळूच म्हणाला, "आणखी काही बोलला असता ना तो, तर पार वाट लावली असती मी त्याची."
"किती भडकू आहेस रे!"
"नाही. मी भडकू नाही. मी सत्य बोलतो आणि विचार करतो. अजूनही त्याचं थोबाड फोडीन मी, बघच तू. साहेबांना तक्रार सांगेन मी. बघूया मग." आणि वासिलीने साहेबांजवळ तक्रार केली.

एकदा साहेब त्या रेल्वेमार्गाची तपासणी करायला आले. तीन दिवसांनी कोणी अतिमहत्त्वाचे लोक सेंट पीटर्सबर्गहून येणार होते. त्या मार्गावरून प्रवास करणार होते. कसलीतरी चौकशी करायला येत होते ते. त्यामुळे ते येण्याअगोदर सर्वकाही ठाकठीक करायला हवं होतं. मग खडी आणून ओतण्यात आली, ती एकसारखी पसरण्यात आली. रुळांचे स्लीपर्स काळजीपूर्वक तपासले गेले. खिळे ठोकले गेले. स्क्रू घट्ट झाले. रंगरंगोटी झाली. क्रॉसिंगजवळ पिवळी वाळू फवारायचा फतवा निघाला. शेजारच्या झोपडीतल्या बाईने, नवऱ्याला तण उपटायला पाठवलं. सेमयॉनने आठवडाभर काम केलं. सगळं काही ठीकठाक केलं. गणवेषाला रफू ठिगळं केली. छातीवरचा पितळी बिल्ला साफ केला, आणि चमकेपर्यंत घासून काढला. वासिलीनेसुद्धा खूप मेहनत केली. मग एका ट्रॉलीवर बसून साहेब आले. ट्रॉलीची सहा चाकं हलवायला तरफा लावल्या होत्या. त्यांचे दांडे फिरवून चार माणसं ती ट्रॉली चालवत होती. तासाला फक्त वीस वर्स्ट अशा वेगाने ट्रॉली चालली होती, पण चाकांचा करकर आवाज येत होता. ट्रॉली सेमयॉनच्या झोपडीजवळ आल्याबरोबर तो बाहेर धावला, आणि त्याने सैनिकी सॅल्यूट ठोकला. सगळं काही ठीक दिसत होतं.

"काय रे, कधीपासून आहेस इथे?" साहेबांनी विचारलं.
"दोन मे पासून, साहेब."
"बरं. थँक यू. आणि १६४ नंबरच्या झोपडीत कोण आहे?"
"वासिली स्पिरिदोव्ह." ट्रॅफिक इन्स्पेक्टर म्हणाला. तो साहेबांबरोबर ट्रॉलीत होता.
"स्पिरिदोव्ह, स्पिरिदोव्ह.. ओह! गेल्या वर्षी तुम्ही त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती, तोच ना?"
"होय साहेब."
"अस्सं! बघून घेऊ त्याला. चला." ते चार कामगार पुन्हा कामाला लागले, आणि ट्रॉली पुढे चालू लागली. हे पाहताना सेमयॉनला वाटलं, "आता या साहेबांचं आणि माझ्या शेजाऱ्याचं नक्कीच वाजणार."

दोनेक तासांनी वासिली आपल्या फेरीवर निघाला. वळणाजवळ रुळांवरून कोणीतरी येताना दिसत होतं. त्याच्या डोक्यावर काहीतरी पांढरं होतं. सेमयॉन नीट लक्ष देऊन पाहू लागला. हा तर वासिली! त्याच्या हातात एक काठी होती. खांद्यावर एक छोटं गाठोडं होतं. तोंडावर रुमाल बांधला होता.
"कुठे निघालास?" सेमयॉन ओरडला.
वासिली अगदी जवळ आला. तो अगदी फिकट पडला होता. खडूसारखा पांढरा दिसत होता. त्याची नजर हिंस्त्र दिसत होती. गुदमरल्या आवाजाने तो पुटपुटला, "शहराकडे .. मॉस्कोला.. हेड ऑफिसला."
"हेड ऑफिस? ओह, तक्रार करायला चालला आहेस वाटतं. सोड रे. वासिली स्तेपानिच, विसरून जा. "
"नाही मित्रा. मी विसरणार नाही. खूप उशीर झाला आहे. हे बघ! माझ्या थोबाडीत मारलं त्याने. रक्त काढलं. जीवात जीव असेपर्यंत विसरणार नाही मी. हे प्रकरण असं सोडणार नाही मी!"

सेमयॉनने त्याचा हात हातात घेतला. "स्तेपानिच, सोडून दे. ऐक माझं, यातून काही निष्पन्न होणार नाही."
"होय. मला ठाऊक आहे ते. कदाचित तू नशिबाबद्दल म्हणालास ते खरं असेल. कदाचित मी हे न करणंच चांगलं ठरेल. पण आपल्याला जे योग्य वाटतं, त्याची बाजू घेतलीच पाहिजे."
"पण मला सांग, हे कसं काय घडलं?"
"कसं घडलं? त्याने सगळं तपासलं. तो ट्रॉलीतून उतरला, झोपडीत डोकावला. तो खुस्पटं शोधणार हे मी आधीच ताडलं होतं. म्हणून मी सगळं ठाकठीक ठेवलं होतं. तो परत निघालाच होता, तेवढ्यात मी माझी तक्रार सांगितली.
ताबडतोब तो किंचाळला, "इथे सरकारी चौकशी होणार आहे. अशावेळी भाज्यांच्या वाफ्याची कसली तक्रार करतोस? इथे कौन्सिलचे गुप्त अधिकारी येणार आहेत, आणि तुला कोबी सुचताहेत. त्रास देऊ नकोस." माझी सहनशक्ती संपली, आणि बोललो मी काहीतरी. तसं फारसं काही नाही, पण त्याला लागलं ते. आणि सरळ माझ्या थोबाडीत मारली त्याने. मी काहीच हालचाल केली नाही. जणू त्याने योग्य तेच केलं, असा गप्प उभा होतो. ते निघून गेले. मग मी भानावर आलो. तोंड धुतलं, आणि निघालो."
"अरे, पण तुझ्या झोपडीचं काय?"
"माझी बायको आहे ना तिथे. ती बघेल सगळं. त्यांचं रस्त्यांचं काम गेलं खड्ड्यात."
वासिली उठून तयार झाला. "गुड बाय, इव्हानोव्ह. हेड ऑफिसमध्ये माझं कोणी ऐकणार आहे की नाही कोण जाणे."
"चालत तर नाही ना जाणारेस?"
"स्टेशनवर जाऊन बघतो, मालगाडीत घुसता येतंय का. उद्या पोहोचेन मॉस्कोला."
दोघा शेजाऱ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्यानंतर काही वेळ वासिली गायब होता. त्याची बायको दिवसरात्र, झोपसुद्धा न घेता त्याच्याऐवजी काम करत होती. नवऱ्याची वाट बघून ती झुरू लागली होती. तिसऱ्या दिवशी चौकशी कमिशन आलं. एक इंजिन, एक सामानाची बोगी आणि फर्स्ट क्लासचे दोन डबे. पण वासिली अजून परतला नव्हता. चौथ्या दिवशी सेमयॉनला वासिलीची बायको दिसली. रडून रडून तिचा चेहरा सुजला होता, आणि डोळे लाल झाले होते. "तुझा नवरा परत आला का ग?" त्याने विचारलं. पण तिने नुसताच हात हलवला, आणि एक शब्दही न बोलता ती तिच्या वाटेने निघून गेली.

सेमयॉन लहानपणी एक प्रकारच्या बांबूपासून बासरी बनवायला शिकला होता. त्या खोडाचा आतला भाग तो जाळून काढायचा, नेमक्या ठिकाणी भोकं पाडायचा, आणि एका बाजूला ओठ टेकवायला तुकडा बसवायचा. तो बासऱ्या इतक्या सुरात लावायचा, की त्यांच्यावर कोणतंही गाणं वाजवता यायचं. फावल्या वेळात तो अशा कितीतरी बासऱ्या बनवायचा. मालगाडीच्या ब्रेक्समनपैकी काही त्याचे मित्र होते. त्यांच्याबरोबर तो शहरांतल्या बाजारांत त्या पाठवायचा. एका बासरीमागे त्याला दोन कोपेक्स मिळत.

चौकशी कमिशन येऊन गेल्याच्या दुसऱ्या दिवशी, संध्याकाळच्या सहा वाजताच्या गाडीचं काम आपल्या बायकोवर सोपवून सेमयॉन बांबूचे वासे आणायला जंगलाकडे निघाला. तो आपल्या सेक्शनच्या टोकापर्यंत गेला. तिथे रूळ एकदम वळण घेत असत. तिथून तो भिंतीवरून खाली उतरला, आणि डोंगराच्या पायथ्याजवळच्या जंगलात शिरला. अर्धाएक वर्स्ट अंतरावर दलदल होती. बासरीसाठी लागणाऱ्या बांबूची भरपूर झाडं तिथे होती. त्याने काही वासे तोडून एक मोळी बनवली आणि तो परत निघाला. सूर्य मावळू लागला होता. सगळीकडे नीरव शांतता होती. ऐकू येत होता फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि त्याच्या पावलांखाली चुरणाऱ्या वाळक्या काटक्यांचा आवाज. भराभर चालता चालता, त्याला काही लोखंडी वस्तू आपटल्याचा आवाज ऐकल्याचा भास झाला, आणि त्याने आपला वेग दुपटीने वाढवला.

त्याच्या सेक्शनमध्ये तर काही दुरुस्तीचं काम नव्हतं. मग हा कसला आवाज? तो जंगलातून बाहेर पडला. रेल्वेची भलीमोठी भिंत त्याच्यासमोर उभी होती. वर एक माणूस उकिडवा बसून रुळाजवळच्या खडीच्या ढिगाऱ्यात काहीतरी करत होता. सेमयॉन हळूहळू रांगत त्याच्याजवळ सरकू लागला. त्याला वाटलं, रूळ जोडणारे खिळे चोरायला कोणीतरी आलं असावं. पाहता पाहता तो माणूस उभा राहिला. त्याच्या हातात एक पहार होती. त्याने एक रूळ मोकळा केला. आता हा रूळ एका बाजूला सरकला असता. सेमयॉनच्या डोळ्यांसमोर धुकं जमा झालं. त्याला मोठ्याने ओरडावंसं वाटलं, पण आवाज फुटेना. वासिली होता तो! सेमयॉन वर चढला. तेवढ्यात पहार आणि पाना घेऊन, वासिली मुसंडी मारून दुसऱ्या बाजूला खाली घसरत गेला.

"वासिली स्तेपानिच! मागे फिर, मित्रा! ती पहार मला दे. आपण रूळ परत होता तसा बसवू. कोणाला पत्तासुद्धा लागणार नाही. ये, मागे फिर! असं पाप करू नकोस रे!" पण मागे वळून न पाहता वासिली जंगलात नाहीसा झाला.

सेमयॉन त्या उखाडलेल्या रुळासमोर उभा राहिला. त्याने आपली मोळी बाजूला टाकली. गाडीची वेळ होत आली होती. मालगाडी नव्हे, प्रवासी गाडी. गाडी थांबवायला त्याच्याजवळ काहीच नव्हतं, बावटाही नव्हता. नुसत्या हातांनी त्याला रूळ बसवता आला नसता, खिळे जोडता आले नसते. काहीतरी हत्यारं आणायची तर धावत झोपडीत जायला हवं होतं. "मदत कर रे, देवा." तो पुटपुटला.

सेमयॉन आपल्या झोपडीच्या दिशेने धावू लागला. त्याला धाप लागली होती. अधूनमधून तो धडपडत होता, पण तरीही धावत होता. जंगल मागे पडलं, आणि आता झोपडी काही शेकडो फुटांवर होती. अंतर तसं फार नव्हतं, पण तेवढ्यात त्याला दूरच्या कारखान्याचा भोंगा ऐकू आला.. सहा वाजले! आता दोन मिनिटांत सात नंबरची गाडी येणार!

" देवा! त्या निरपराध प्रवाशांवर दया कर!"

सेमयॉनच्या मनात भयानक चित्र उभं राहिलं. इंजिनचं डावं चाक त्या उखडलेल्या रुळावर धडकतं आहे, हेलकावे खाऊन भेलकांडत जातं आहे, रुळाच्या स्लीपर्सच्या चिंधड्या उडताहेत. नेमक्या त्याच जागी वळण होतं, आणि तिथली भिंत सत्तर फूट उंच होती. इंजिन त्या भिंतीवरून खाली कोलमडत जाईल. थर्ड क्लासच्या डब्यांतून माणसं गच्च भरली असतील.. लहानगी मुलं असतील.. सगळे आता गाडीत निवांत बसले असतील, असला धोका त्यांच्या स्वप्नात सुद्धा आला नसेल.

" देवा! मला सांग मी काय करू! छे. झोपडीपर्यंत जाऊन वेळेत परत येणं अशक्य आहे. "

मग झोपडीकडे जाण्याऐवजी सेमयॉन मागे वळला, आणि पूर्वीपेक्षा जास्त वेगाने धावत सुटला. यांत्रिकपणे. आंधळ्यासारखा . आता यापुढे काय करायचं हे त्याला स्वतःलाही ठाऊक नव्हतं. तो त्या उखडलेल्या रुळापर्यंत धावत गेला. त्याच्या मोळीतल्या काठ्यांचा ढीग तिथे पडला होता. तो खाली वाकला, आणि नकळत त्यातली एक काठी उचलून पुढे धावू लागला. गाडी येत असल्याचा त्याला भास झाला. दूरवरून गाडीची शिटी ऐकू आली. रुळांची निःशब्द, लयबद्ध थरथर ऐकू आली. पण आता त्याची ताकद संपली होती. आणखी धावणं अशक्य वाटून, त्या दुर्दैवी जागेपासून सुमारे सहाशे फुटांवर तो थांबला. अक्षरशः प्रकाशाचा किरण दिसावा, तशी एक कल्पना अचानक त्याच्या डोक्यात आली. त्याने डोक्यावरची टोपी काढली, आणि तिच्या आतून एक सुती स्कार्फ ओढून बाहेर काढला. बुटाच्या वरच्या भागात ठेवलेला चाकू काढला. कपाळावर, छातीवर, खांद्यावर हात लावून क्रॉसची खूण केली, आणि पुटपुटला, "देवा, मला वाचव!"

मग त्याने आपल्या डाव्या हातात, कोपराच्या वर चाकू खुपसला. रक्ताचा जोरदार उष्ण प्रवाह उसळला. त्या रक्तात त्याने आपला स्कार्फ भिजवला. मग तो स्कार्फ उघडून नीट पसरला, काठीला बांधला, आणि लाल बावटा तयार झाला. मग तो लाल बावटा हलवत तो उभा राहिला. पण आता गाडी दृष्टीपथात आली होती. चालकाला तो बावटा वेळेवर दिसला नसता. गाडी पुढे येत राहिली असती. गाडीचं ते प्रचंड धूड सहाशे फुटांमध्ये थांबवणं अशक्य होतं.

रक्त वाहतच होतं. सेमयॉनने जखमेच्या कडा आवळून ती बंद करण्याचा प्रयत्न केला. पण रक्त कमी होईना. वार खूप खोलवर गेला होता. त्याचं डोकं गरगरू लागलं. डोळ्यांसमोर काळे ठिपके नाचू लागले, आणि त्याला अंधारी आली. त्याच्या कानांत घंटेसारखा आवाज घुमू लागला. त्याला गाडी दिसत नव्हती, तिचा आवाजही ऐकू येत नव्हता. एकाच विचाराने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. "मी आणखी उभा राहू शकणार नाही. मी पडणार. माझा बावटाही पडणार. गाडी माझ्या अंगावरून जाणार. देवा, मला मदत कर!"

त्याला अंधारून आलं. मनातले विचार पुसले गेले. हातातला बावटा खाली पडला. पण रक्ताळलेला तो बावटा जमिनीवर पडला नाही. एका हाताने तो अलगद पकडला, आणि समोरून येणाऱ्या गाडीला दिसेलसा उंचावर धरला. गाडीच्या इंजिनियरने तो पाहून रेग्युलेटर बंद केला, वाफ थांबवली. गाडी बंद पडली.

गाडीच्या डब्यांमधून लोक बाहेर आले, आणि गर्दी करून उभे राहिले. रक्ताने माखलेला एक माणूस तिथल्या पायवाटेवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या जवळ दुसरा माणूस उभा होता. त्याच्या हातातल्या काठीला एक रक्ताने माखलेलं फडकं लावलं होतं.

वासिलीने सर्वांकडे पाहिलं. मग डोकं खाली झुकवून तो म्हणाला, "मला अटक करा. हा रूळ मी उखाडला आहे."

----------------

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

सुचिता१'s picture

6 Dec 2022 - 11:39 pm | सुचिता१

कथा खुप तरल, आणि भावस्पर्शी आहे. भाषांतर ही व्यवस्थीत केले आहे. तुमची शैली आोघवती असल्याने वाचतांना मजा आली.
पुलेशु!!!

कंजूस's picture

7 Dec 2022 - 4:38 am | कंजूस

भाषांतर चांगलं झालं आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

7 Dec 2022 - 9:49 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली कथा
भाषांतरही उत्तम झाले आहे
पैजारबुवा,

Bhakti's picture

7 Dec 2022 - 10:50 am | Bhakti

छान कथा!

श्वेता२४'s picture

7 Dec 2022 - 11:07 am | श्वेता२४

कथा छान आहेच पण खूपच ओघवतं भाषांतर केलं आहे तुम्ही. त्यामुळे वाचताना मजा आली.

स्वधर्म's picture

7 Dec 2022 - 2:10 pm | स्वधर्म

छान जमलं आहे भाषांतर. आणखी कथा येऊ द्या.

सौंदाळा's picture

7 Dec 2022 - 3:13 pm | सौंदाळा

मस्तच
वसिलीच्या डोक्यात गुन्हा कबूल करताना काय विचार चालू असतील?

सुखी's picture

8 Dec 2022 - 11:33 am | सुखी

छान कथा

मस्तच! येउद्यात अजुन अशा छान छान कथा 👍

स्मिताके's picture

9 Dec 2022 - 7:57 pm | स्मिताके

सुचिता१, कंजूस, पैजारबुवा, Bhakti, श्वेता२४, स्वधर्म, सौंदाळा, सुखी, टर्मीनेटर
आपण सर्वजण आवडीने वाचता त्यामुळे आणखी लिहायला प्रोत्साहन मिळतं.
प्रतिसादांबद्द्ल खूप खूप आभार.
चुकीची मिष्टेक होऊन सॅम्हावारचं प्रचि नको तितकं मोठ्ठं दिसत आहे हे उशीरा ध्यानात आलं.

सौन्दर्य's picture

10 Dec 2022 - 12:10 am | सौन्दर्य

मूळ कथा तसेच भाषांतर एकदम सुरेख. जगात अजूनही जास्त टक्केवारी चांगल्या लोकांची आहे आणि त्यामुळेच जग चालले आहे.
अजून कथा येऊ द्या.

Nitin Palkar's picture

11 Dec 2022 - 7:32 pm | Nitin Palkar

सुंदर कथा, तितकेच सुंदर भाषांतर. एक कुतूहल..... रशियन मधून मराठी भाषांतर केलत की रशियन - इंग्रजी - मराठी?
पुलेशु.

Thomas Seltzer यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरावरून केलं आहे.

सौन्दर्य आणि Nitin Palkar प्रतिसादांबद्द्ल आभारी आहे.
सॅम्हावार छोटा केल्याबद्द्ल सा.सं. यांना धन्यवाद. पुन्हा अशी मिष्टेक होऊ नये अशी काळजी घेईन.

मार्गी's picture

12 Dec 2022 - 11:43 am | मार्गी

खूपच सुंदर कथा, अगदी वेगळ्याच काळात व ठिकाणी घेऊन जाणारी आणि खूप अर्थपूर्ण कथा!! अनुवाद वाटत नाहीय, इतकी जीवंत केलीत आपण! अनुवादाबद्दल व इथे पोस्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Dec 2022 - 1:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वाह क्या बात है. नंबर एक. भाषांतर आवडलं. सुंदर कथा. कथाही चांगली निवडली. कथा वाचतांना वासिलीवर जो अन्याय झाला त्याची चीड येत होती, त्याचा तक्रार करण्याचा चिवटपणा आवडला. अन्याय झाला की सुड घ्यावा असे वाटणे साहजिकच आहे, पण तो कसा असावा नसावा आणि शेवटी त्याची कबूली देणे. रंगून गेलो कथा वाचतांना.

क्लास.

-दिलीप बिरुटे

सिरुसेरि's picture

12 Dec 2022 - 2:52 pm | सिरुसेरि

सुरेख कथा आणी सुरेख भाषांतर .

श्वेता व्यास's picture

13 Dec 2022 - 12:39 pm | श्वेता व्यास

खूप छान अनुवाद. अनुवाद वाटतच नाही, नावे सोडली तर मातीतीलच कथा वाटते आहे.

स्मिताके's picture

14 Dec 2022 - 10:14 pm | स्मिताके

मार्गी, प्रा. डॉ., सिरुसेरि, श्वेता व्यास
प्रतिसादांबद्द्ल आपले अनेक आभार.

धर्मराजमुटके's picture

19 Dec 2022 - 8:13 pm | धर्मराजमुटके

उत्कृष्ट भाषांतर ! खरे तर कथा वाचताना अनावधानाने कोणी लिहिलीय ते वाचायचे राहूनच गेले. कथा वाचेपर्यंत ही जयंत कुलकर्णी यांनीच अनुवादित केली आहे असे समजत होतो. नंतर लेखिकेचे नाव वाचून आश्चर्याचा सुखद धक्का बसला. मिपावर ताज्या दमाच्या लेखिका लिहित्या झाला ही आनंदाची गोष्ट आहे.