नुकत्याच पार पडलेल्या ‘हर घर तिरंगा, घर घर तिरंगा’ ह्या उपक्रमाला भारतीय जनतेने दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहिला व मन आनंदाने व अभिमानाने भरून आले. ज्या पिढीने १९४७ ते २०२२, हा पंचाहत्तर वर्षांचा कालावधी प्रत्यक्ष पाहिला, अनुभवाला व उपभोगीला ती पिढी भाग्यवानच म्हणायची, त्याच प्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेली आमची पिढी देखील तितकीच नशीबवान म्हणायची. ज्या तिरंग्याने आम्हाला हा बहुमान दिला त्याचे आभार मानावेत तेव्हढे कमीच आहेत.
आता हा उपक्रम समाप्त झाल्यावर ह्या झेंड्यांचे काय करायचे हा प्रश्न मला तसेच माझ्या अनेक मित्र मैत्रिणींच्या मनात उद्भवणे स्वाभाविकच आहे. पंधरा ऑगस्ट, सव्वीस जानेवारीनंतर रस्त्यावर पडलेले अनेक प्लास्टिक व कागदाचे झेंडे पाहिले की मन उद्विग्न होते व भारतीय तिरंग्याला उचित मान न मिळाल्याचे दु:ख होते. मग ह्यावर मार्ग म्हणून अनेक सेवाभावी संस्था, संवेदनशील नागरिक, विद्यार्थी असे रस्त्यावर पडलेले झेंडे गोळा करताना दिसतात, पण त्यांचे श्रम, प्रयासही तोकडे पडत असल्याचे जाणवतात.
आपल्यातले अनेकजण ह्या अमृत महोत्सवाची आठवण म्हणून ह्या तिरंग्याचे अनमोल ठेवीसारखे जतन करतील, पण जे असे जतन करू शकणार नाहीत त्यांनी काय करावे ? ‘Flag Code of India 2002’ प्रमाणे फाटलेले, चुरगळलेले, अस्वच्छ झेंडे जाळून नष्ट करू शकतो परंतु प्रश्न तीन दिवसांनी घरावरून काढलेल्या कापडी झेंड्यांचा आहे. त्याचे काय करायचे ? अनेकजणांनी अशा झेंड्याना जाळून टाकणे, जमिनीत पुरणे किंवा कापून बारीक तुकडे करणे असे उपाय सुचवताना ऐकले, परंतु मनाला ते पटले नाहीत.
जरा जास्त विचार करताना हा उपाय मनात आला, बघा, जमण्यासारखा आहे का ?
तीन दिवस घरांवर लावलेले झेंडे उतरविल्यानंतर एखाद्या सेवाभावी संस्थेने, NGOने, अथवा शासकीय संस्थेने ते गोळा करावेत. असे सर्व झेंडे ब्लिच लावून एकतर रंगहीन, पांढरे करावेत किंवा एखादा गडद रंग वापरून (निळा, हिरवा वगैरे) त्या रंगाचे करावेत. थोडक्यात ध्वजाचे सर्व रंग तसेच अशोकचक्र मिटवून टाकावेत. नंतर असे झेंडे एकत्र शिवून त्या कापडाचे वेगवेगळे उपयोग करावेत. असे उपयोग म्हणजे, शासकीय शाळेतील गरीब विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवणे, शासकीय रुग्णालयात पलंगपोस, नर्सेसचे युनिफॉर्म शिवणे, तुरुंगातील कैद्यांसाठी कपडे शिवणे, हात-पाय पुसायला उपयोग करणे वगैरे. ह्याशिवाय अजून अनेक उपयोग करता येतील. 3’ X 2’ मापाचे एक लाख झेंडे जरी एकत्र झाले तर त्याचे अमाप कापड तयार होईल व ते कापून, जाळून किंवा पुरून नष्ट करण्यापेक्षा अश्या प्रकारे वापरात आणले तर नक्कीच त्याचा चांगला उपयोग झाला असे म्हणता येईल.
वरील उपाय सुचवताना आपल्या भारतीय तिरंग्याचा कोणत्याही प्रकारचा अपमान, उपमर्द किंवा अवहेलना करण्याचा मानस नाही हे ही मी नमूद करू इच्छितो.
आपल्याला काय वाटतं ?
प्रतिक्रिया
16 Aug 2022 - 7:46 pm | खेडूत
चांगला उपक्रम होता. माझ्या आजूबाजूला सर्वत्र तिरंगा ध्वज दिसत होता. ठराविक लोक विरोध करत होते त्यामुळे आवश्यक होता असे वाटते.
यातून शेकडो कोटींची उलाढाल झाली असे म्हणतात. मग कित्येक लोकांना काम मिळाले असणार.
हिंदुस्थान पेट्रोलियम त्यांच्या पंपांवर ध्वज परत घेत आहेत.
याशिवाय घडी घालून अशोकचक्र वरती येईल अशी घडी कशी करावी याचा व्हिडिओ चार दिवस फिरत आहे.
बाकी आपल्या इतर मुद्यावर लोक विचार करत असतात, काही संस्था आज ध्वज जमा करत होत्या. मला आज पन्नास किलोमीटर फिरून आल्यावर कुठेही ध्वजाचा अवमान झालेला दिसला नाही.
16 Aug 2022 - 8:46 pm | कुमार१
उपायाशी सहमत.
16 Aug 2022 - 8:46 pm | मदनबाण
हर घर तिरंगा हा एक स्तुत्य उपक्रम होता, आमच्या सोसाटीनेच सगळ्या घरांसाठी ध्वज वाटले होते. स्सर्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन दर वर्षी होतेच, परंतु या वेळी या उपक्रमामुळे ते घरोघरी केले गेले.
जाता जाता :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tip tip barsa paani- Fingerstyle cover| Mihika Sansare
16 Aug 2022 - 9:07 pm | कर्नलतपस्वी
हा उपक्रम खुप आगोदर व्हायला होता. देर आये दुरूस्त आये.
16 Aug 2022 - 9:07 pm | कर्नलतपस्वी
हा उपक्रम खुप आगोदर व्हायला होता. देर आये दुरूस्त आये.
16 Aug 2022 - 11:21 pm | मित्रहो
लहान असताना आम्ही विटा वगैरे आणून नागपंचमीचे वेळेला नागाचे देऊळ बांधायचो. नागपंचमी झाली की ते मोडायचे. विटा असायच्या जागा पण होती तेंव्हा आपण चबुतरा करुन आपल्याच घरी झेंडा का लावत नाही असे वाटायचे. वडिलांनी सांगितले होते असे कोणालाही झेंडा लावता येत नाही जेलात जाशील. घरावर झेंडा फडकविण्याची इच्छा आता पूर्ण झाली.
आज आमच्या इथे तेलंगणामधे सर्व ट्रॅफिक थांबवून राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झाला.
मी आज झेंडा घडी करुन ठेवून दिला. लेखात सुचवलेला उपाय सुद्धा चांगला आहे.
17 Aug 2022 - 12:11 am | आग्या१९९०
झेंडा घडी घालून जपून ठेवा. २६ जानेवारी ,१५ ऑगस्टला वापरता येईल. सामान्य नागरिकांना झेंडा फडकावला मनाई नाही.
17 Aug 2022 - 9:26 am | श्वेता व्यास
झेंडा घडी घालून ठेवून दिला आहे, पुन्हा कधी लावता येईलच त्यामुळे घरातून नष्ट करावा असं वाटलं नाही.
17 Aug 2022 - 10:01 am | विवेकपटाईत
दिल्लीत 15 ऑगस्टला पतंग उडविले जातात. गल्लीतल्या दुकानदाराने पतंग सोबत झेंडे विकून तब्बल 5000 रुपयांची कमाई केली. तो मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्या छोट्या दुकांदारांचा ही विचार करतात. तिरंगा अभियान मुळे गल्ली बोळ्यातील दुकांदारांनाही 15 ऑगस्ट ही एका सणा सारखा साजरा करता आला.
बाकी माझा एक मित्र म्हणला बहुतेक भविष्यात गुज्जु सेठच्या जगा वेगळा निवडणूक प्रचार हा पीएचडीचा विषय असेल.
17 Aug 2022 - 11:28 am | साहना
विविध राष्ट्रीय सण परत येणार आहेत त्यामुळे झेंडा कशाला उगाच फेकून द्यायचा ? व्यवस्थित घडी मारून कपाटांत ठेवून द्या आणि पुढच्या वर्षी वापरा. दार वर्षी नवीन घ्यायला तो गणपती थोडाच आहे.
17 Aug 2022 - 11:52 am | प्रमोद देर्देकर
इतका बालिश प्रश्न?
पुढल्या प्रत्येक वेळी तो वापरू शकतो हे का समजलं नाही.
संपा मं ने हा धागा काढून टाकावा.
17 Aug 2022 - 6:08 pm | चौथा कोनाडा
धागा बालिश वाटला नाही,
संपा मं ने हा धागा काढून टाकावा असे वाटले नाही.
जेव्हां एखादी वस्तू अतिजास्त संख्येने तयार होते तेव्हा त्याच्या वापरात, साठवणुकीत हलगर्जीपणा होऊ शकतो, सगळेच जण आपल्या सारखे सुज्ञ नसतात. नियम मोडला तर शिक्षा तरी किती जणांना करणार (काही कारणांनी ते व्यवहार्य नसते)
... उलट धाग्याकत्यांने सुचवलेला मार्ग मला योग्य वाटला
शेवटी पसंद अपनी अपनी, सोच अपनी अपनी !
17 Aug 2022 - 6:27 pm | आग्या१९९०
तिरंगा एकतर घडी घालून जमिनीत पुरावा किंवा घडी घालून अग्नीत जाळून नष्ट करावा ( तिरंगा पेटवू नये ) बाकी पद्धतीने तिरंग्याच्या कापडाचा पुनर्वापर करणे हा गुन्हा ठरू शकतो.
17 Aug 2022 - 10:58 pm | चौथा कोनाडा
ही देखील बातमी वाचा ! काय म्हणायचे आता ?
❓
हर घर तिरंगा: एकाही विणकराला राष्ट्रध्वजाची ऑर्डर मिळाली नाही .....
https://www.newindianexpress.com/states/andhra-pradesh/2022/aug/15/har-g...
❓
17 Aug 2022 - 11:22 pm | आग्या१९९०
आलोक इंडस्ट्रीला २ कोटी तिरंग्यांची ऑर्डर दिली होती.
18 Aug 2022 - 5:40 pm | चौथा कोनाडा
ही योजना कित्येक महिने आधी तयार झाली असेल, मग पारंपारिक वीणकरांना हे काम का दिलं नाही हा प्रश्न पडतो !
18 Aug 2022 - 4:02 pm | वामन देशमुख
कार्यकारिणीच्या माध्यमातून आम्ही सोसायटीत घरोघर झेंडे वितरित केले होते. आता ज्यांना परत द्यायचे आहेत त्यांनी परत करावे असे आवाहन केले आहे. अनेकांनी झेंडे परत केले आहेत. काहीजणांनी झेंडे आपापल्या घरी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.