अलक १५ ऑगस्ट

मालविका's picture
मालविका in जनातलं, मनातलं
15 Aug 2022 - 4:55 pm

अलक १
नेहमी सिग्नल वर सिझनप्रमाणे काही ना काही विकणारा १०/१२ वर्षाचा तो मुलगा. कधी पुस्तक, कधी फुगे तर कधी फुलं. १५ ऑगस्ट जवळ आला तशी १० तारखेपासून झेंडे विकायला लागला. कधी नव्हे ते यावेळी जास्तच झेंडे विकले जात होते.इतके की त्याला दोनदा नवीन गठ्ठा विकत घ्यावा लागला. बरेच जण त्याच्याकडून घेवून गाड्यांवर झेंडे लावत होते. यावेळी लोकं एवढे का खरेदी करत आहे समजत नव्हतं. न राहवून त्याने सिग्नल वरच्या टपरी वाल्याला विचारलं तेव्हा ' हर घर तिरंगा ' बद्दल समजलं. २ दिवस झाले आपण झेंडे विकतोय पण आपल्या घरावर आपण झेंडाच नाही लावला ही जाणीव झाली आणि तडक तो पुलाखालच्या आपल्या पत्र्याच्या घरात आला. वर चढून एका काठीच्या साहाय्याने त्याच्याकडे असलेला झेंडा त्याने दिमाखात फडकवला. त्याच्या नजरेत समाधान तरळल. आजूबाजूच्या पोरांनी ते बघून टाळ्या वाजवल्या. खुश झालेला तो प्रसन्न मनाने परत आपल्या कामाला चालू पडला.

अलक २
' हर घर तिरंगा ' अभियान सुरू झालं तश्या घरात चर्चा सुरू झाल्या. झेंडा कुठून आणायचा, कुठे लावायचा, किती मोठा आणायचा आणि बरंच काही. आजोबा कान देऊन सगळं ऐकत होते. सगळ्यांचं ऐकून घेवून शेवटी ते उठले. त्यांनी जपून ठेवलेली जुनी ट्रंक उघडली. त्यात असलेला खादीचा जरा पिवळट पडलेला राष्ट्रध्वज त्यांनी मुलांच्या हातात दिला. नातवंडांच्या चेहऱ्यावरचे प्रश्न त्यांना दिसले. त्यांनी सांगितलं, " माझ्या वडिलांच्या वेळचा झेंडा आहे हा. अजून पर्यंत जपून ठेवला कदाचित याच दिवसासाठी." स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या पणजोबांच्या वेळचा ध्वज हाती आल्यावर अभिमानाने सर्वांचेच डोळे पाणावले.

- धनश्रीनिवास

कथाप्रकटन

प्रतिक्रिया

यश राज's picture

15 Aug 2022 - 6:37 pm | यश राज

दोन्ही आवडल्या

Bhakti's picture

15 Aug 2022 - 6:49 pm | Bhakti

छान लिहिले आहे.

मुक्त विहारि's picture

15 Aug 2022 - 6:55 pm | मुक्त विहारि

धन्यवाद

श्वेता व्यास's picture

15 Aug 2022 - 8:18 pm | श्वेता व्यास

खूप छान.

सरिता बांदेकर's picture

15 Aug 2022 - 8:44 pm | सरिता बांदेकर

मस्त लिहीलं आहे.

सुजित जाधव's picture

15 Aug 2022 - 9:47 pm | सुजित जाधव

आवडले....

सौंदाळा's picture

15 Aug 2022 - 10:54 pm | सौंदाळा

दोन्ही आवडल्या

नचिकेत जवखेडकर's picture

16 Aug 2022 - 7:14 am | नचिकेत जवखेडकर

दोन्ही कथा छान आहेत!

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Aug 2022 - 12:01 pm | ज्ञानोबाचे पैजार

छान आहेत दोन्ही गोष्टी
पैजारबुवा,

विवेकपटाईत's picture

16 Aug 2022 - 2:24 pm | विवेकपटाईत

दोन्ही मस्त. गल्लीत पतंग ( दिल्लीत १५ ऑगस्ट रक्षाबंधन लोक पतंग उडवितात)विकणारा झेंडे ही विकत होता. मला म्हणाला, मोदीजी आमच्या सारख्यांचीही चिंता करतात. दोन ते तीन हजार रुपये त्याने तीन दिवसात कमविले असतील.

पर्णिका's picture

17 Aug 2022 - 4:29 am | पर्णिका

अलक २ फार आवडली.
लिहीत राहा.

एकनाथ जाधव's picture

24 Aug 2022 - 6:51 pm | एकनाथ जाधव

दोनिहि अलक आवडल्या.