स्मरणरंजन : पिरसा

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
3 Aug 2022 - 11:08 am

पाऊस सुरू झाला की मन आपोआप भूतकाळात जातं. सहावीत आम्ही चोरवणे मराठी शाळेतून नाणीज हायस्कुल ला गेलेलो. सकाळी साडेनऊ वाजता घरातून निघून दहापर्यंत शाळेत पोहोचायचो... पण ओलेचिंब होऊन... रेनकोट, छत्री जे काही असायचं ते जून जुलै मधल्या कोकणातल्या मुसळधार पावसापुढे कधीच धाराशायी ठरायचं...

दफ्तरात एका प्लास्टिक पिशवीत सगळी वह्यापुस्तकं सुरक्षित असायची पण कपडे मात्र भिजायचेच... मग तसंच कुडकुडत शाळेत बसावं लागे... पण तसा मी काही एकटाच नव्हतो, सगळीच मुलं कमी अधिक भिजूनच शाळेत आलेली असत...मी रोज अडीच किलोमीटर चालतं शाळेत जायचा पण आमच्या शाळेत काही मुलं रोज आठ ते दहा किमी चालून शाळेत यायची त्यावेळी! आम्हाला खरंच त्यांचं भारी कौतुक वाटायचं. करंजारी, घटिवळे, नांदवली, शिरंबवली, खानू, कशेळी या गावातली मुलं देखील अक्षरशः धावत पळत शाळेत यायची...

मग दुपारच्या सुटीपर्यंत कपडे अंगावरच वाळत असत. डबा पाच मिनिटात संपऊन एकमेकांच्या खोड्या काढत मधली सुट्टी संपून शाळा परत कधी भरत असे ते समाजायचं ही नाही...

संध्याकाळी साडेचार ला वंदे मातरम झालं किं सगळी वानरसेना तुरुंगातून सुटलेल्या कैद्यानप्रमाणे धावत शाळेबाहेर निघायची... रानवाटा तुडवत अक्षरशः धावत आणि शर्यती लावत आम्ही घरी पोहोचायचो... दुपारचं काही शिल्लक असेल ते जेवण जेवून मग आम्ही सोना गडी रानातून गुरं आणायची वाट बघत असायचो...

सहा वाजेपर्यंत सोन्या यायचा... मग गाईचं दूध काढून गुरांना खाणं घालून तो अंघोळ करायचा. त्यावेळी आमचा वाडा (गोठा ) गायी गुरांनी भरलेला असायचा. मला आठवत त्याप्रमाणे तेव्हा आमच्याकडे 22 गुरं होती... तर आमचं सगळं लक्ष सोन्या अंघोळ करुन कधी येतोय त्याकडे लागलेलं असायचं...कारण होतं पिरसा!

पिरसा म्हणजे तीन बांबू दोन बाजूला दुसऱ्या एका लाकडाने जोडून अधांतरी लटकवले जातं. वरती आढ्याला हे दोरीने बांधत आणि खाली लाकडे पेटवून जाळ करत. या बांबूवर गुराख्याची घोंगडी वाळत घातली जातं असे. पण प्रत्यक्षात त्या पिरश्याचे अनेक किस्से स्मरणात आहेत. भातशेती साठी जे नांगरी म्हणजे गडी असायचे त्यांच्याही घोंगड्या पीरश्यावर वाळत असत...

सोन्याने पिरसा पेटवून घोंगडी वाळत घातली किं आम्ही मुलं लगेच तिकडे जमत असू, मग सोन्या काजू किंवा फणसाच्या वाळवलेल्या आठला भाजायला घेई. आणि हे करताना त्याच्या गोष्टी सुरू होत. आज रानात कायकाय झालं? कुणाची गाय रानात व्यायली? कुणाच्या बैलांची झुंज लागली? कुणाची गुरं कुणाच्या शेतात घुसली? हे सगळं त्याच्या शैलीत तो सांगत असे. तोपर्यंत काजू भाजून होत आणि आम्ही त्या मटकावत असू...

मग आठ साडेआठ ला आजी किंवा बाबा जेवायला बोलवत ... जेवण झालं किं परत आम्ही पिरश्या जवळ. पाऊस इतका प्रचंड असे किं थंडीपासून बचावासाठी पिरश्या जवळ बसावंच लागे. मग सोन्याच्या अफलातून भूतकथा सुरू होत... निलमा आणि शिलमा, पिटुंगली च्या भुताच्या गोष्टी... एकदा तो रात्री उशिरा नाणीज वरून येत असताना चकव्याने त्याला कसा गुंगवला? एकदा पलीकडे डोंगरावर आग लागलेली रात्री दिसली पण दुसऱ्या दिवशी जाऊन बघतो तर काहीच नाही, मग समजले ति वेताळाची पालखी निघाली होती... तो त्याला भुतावळ म्हणे... अशा अनेक गोष्टी ऐकत ऐकत आमचा तिथेच डोळा लागायचा... मग बाबा रात्री उचलून आम्हाला अंथरुणात आणून झोपवायचे....

गेली कित्येक वर्ष घरात पिरसा नाही... कारण सोन्या गेला त्याला आता तीस वर्ष झाली... गुरं ही कालमांनाप्रमाणे कमिकमी होत गेली. आता तर शेतीही नाही...

आज सहज आठवण आली... म्हणून हा लेखनप्रपंच...

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

डोळ्यापुढे उभे राहिले सगळे.
छान लिहीलंय

सिरुसेरि's picture

3 Aug 2022 - 4:03 pm | सिरुसेरि

छान आठवणी . श्री . रविन्द्र पिंगे यांच्या लेखनाची आठवण झाली .

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:23 pm | मंदार कात्रे

धन्यवाद. पिंगे म्हणजे बापमाणूस कोकणावर लिहिणारा

कर्नलतपस्वी's picture

3 Aug 2022 - 4:17 pm | कर्नलतपस्वी

गारूड्याच्या पोतडी आणी जुन्या आठवणी नेहमीच मजेशीर आसतात.

सर टोबी's picture

3 Aug 2022 - 5:05 pm | सर टोबी

बांबूंची घोंगडी वाळत घालण्याची तिकडम कि खाली पेटवलेली शेकोटी असा प्रश्न पडलाय. प्रशस्तीचे प्रतिसाद यायला लागल्यामुळे असा बावळट प्रश्न पडणारे फक्त आपणच आहोत का असा एक दुय्यम प्रश्न पण पडला आहे. शेवटी अज्ञान हे उघड केल्याशिवाय दूर होत नाही म्हणून मग शेवटी हे धाडस केले.

Nitin Palkar's picture

3 Aug 2022 - 7:09 pm | Nitin Palkar

छान लिहिलय. आवडलं.

मुक्त विहारि's picture

3 Aug 2022 - 7:18 pm | मुक्त विहारि

काही ठिकाणी आता, गोठे कमीच होत चालले आहेत....

कंजूस's picture

4 Aug 2022 - 5:40 am | कंजूस

शाळेत जाणेही कष्टाचे होते तेव्हा.
( हल्ली आया मुलांना स्कूटरवर बसवून 'क्लास'ला सोडतात भुरर तेव्हा पोर मागे फोनमध्ये स्टेटस आणि मेसेज पाहात असते हे पाहून गंमत वाटते.)

जेम्स वांड's picture

4 Aug 2022 - 6:34 am | जेम्स वांड

मला कोकणातील रोजच्या जीवनाचा तितकासा अनुभव किंवा आधुनिक पद्धतीने म्हणल्यास एक्सपोजर नाही, अश्या स्मरणरंजन असणाऱ्या लेखांतून ते कळते,

लेखन फारच वास्तवदर्शी आहे, स्वतः धो धो पाऊस सुरू असताना पिरश्यासमोर बसल्यासारखे जाणवले इतके उबदार अन् सालस उत्तम लेखन

सतिश गावडे's picture

4 Aug 2022 - 10:11 am | सतिश गावडे

माझेही बालपण कोकणात काहीसे असेच गेले. मी तर स्वतःच गुरे राखलीत बरीच वर्षे.

तुमच्या वरच्या बाजूच्या जिल्ह्यातील असूनही "पिरसा" असा उल्लेख कधी ऐकला नाही. अगदी तुम्ही उल्लेख केले ते दुसऱ्या नावानेही नाही. बहुतेक रत्नागिरी स्पेशल आहे पिरसा :)

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पिरसा असतोच असतो.. हल्ली हल्ली आता वॉशिंग मशीन आणि एकंदरीत कपड्यांची संख्या वाढल्यामुळे पिरसा अदृश्य झालाय..
पूर्वी कपड्यांचे दोन जोड असायचे, अश्या वेळेस कपडे वळले नाहीत तर उद्या घालणार काय?
मग एखाद्या पडवीत, विशेषतः वासराच्या पडवीत विस्तव घातला जायचा. एक प्रकारे तान्ह्या वासरांची शेकोटी, आणि तिथेच वरती दांडी/दोरी बांधून न वाळलेले कपडे वळायला टाकायचे..
शेकोटी पण झाली आणि कपडे पण वाळले. सकाळी चुरचुरीत आणि धुराच्या वासाचे कपडे घालायला छान वाटायचे..

घरात तान्ही बाळंतीण असेल तर ते मुलाचे लंगोट वगैरे वाळवायला पण हा जुगाड हवाच.

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:20 pm | मंदार कात्रे

अगदी बरोबर

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:22 pm | मंदार कात्रे

हो मीदेखील दहावी नंतर कॉलेज सुरु होईपर्यंत ३ महिने गुरे राखली आहेत. स्थान परत्वे नावात बदल होत असेल

सरिता बांदेकर's picture

4 Aug 2022 - 10:52 am | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे.
काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने.
त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

सरिता बांदेकर's picture

4 Aug 2022 - 10:52 am | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे.
काही शब्द मला नवीन आहेत.ग्रामीण भागाशी तसा कमी संपर्क असल्याने.
त्यामुळे काही गोष्टी कळल्या नाहीत.

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:20 pm | मंदार कात्रे

धन्यवाद

गामा पैलवान's picture

5 Aug 2022 - 2:14 am | गामा पैलवान

मंदार कात्रे,

लेख फक्कड जमलाय. वर्णन अगदी समोर घडतंय असं प्रत्ययी आहे.

पिरसा हा प्रेस चा अपभ्रंश तर नाही ....? clothes pressing वरनं सहज शंका आली.

आ.न.,
-गा.पै.

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:20 pm | मंदार कात्रे

कल्पना नाही. खूप पूर्वीपासून हाच शब्द आहे. आताच्या पिढीत माहित नसेल कोणाला पिरसा

मंदार कात्रे's picture

6 Aug 2022 - 1:19 pm | मंदार कात्रे

सर्व प्रतिसाददात्याना धन्यवाद.

सुजित जाधव's picture

9 Aug 2022 - 6:33 pm | सुजित जाधव

छान लेख...
तुमचा लेख वाचून लहानपणी थंडीच्या दिवसांत आम्ही शेकोटी समोर बसून मोठ्या माणसांच्या राजकारणावर आणि गावातील घडामोडींवर रंगलेल्या गप्पा ऐकत बसायचो त्याची आठवण झाली.