क्रिसकडे रहायची सोय झाल्यामुळे एक मोठा प्रश्न सुटला होता. आता ऑफिसमध्ये कामाकडे लक्ष देणे भाग होते. खरेतर मला घाईने विनिपेगहुन इथे बोलावण्याचे कारणच ते होते. रेव्हेन्युच्या हिशोबाने आमच्या प्रोजेक्ट्चा एक पंचमांश हिस्सा असलेला टेल्को म्हणजे टेलिफोनी किंवा व्हॉइसचा जो भाग होता त्याचा क्लायंटच्या टीमकडून हॅन्ड ओव्हर घ्यायचा होता. आणि त्याची कोणालाच नीट कल्पना नव्हती. खरेतर मलासुद्धा....
झाले असे की जेव्हा आम्हाला प्रोजेक्ट मिळाला तेव्हा सगळ्यांना असे वाटले की हे काहीतरी टेक्निकल फोन्स, इ पी बी एक्स मेंटेनन्स, व्हॉइस रेकॉर्डिंग अशा प्रकारचे काम आहे. आणि माझ्याकडे तशा प्रकारचे ज्ञान असल्याने मला या प्रोजेक्टमध्ये निवडले होते. विनिपेगला असेपर्यंत ते मला खरेही वाटले कारण तिकडचे काम खरोखरीच तांत्रिक म्हणता येईल असे होते. तिथेही मला कोणी नीटसा हॅन्ड ओव्हर दिला नव्हता. पण धडपडत का होईना मी ते शिकून घेतले होते. मात्र रेजिनाला येऊन माझा भ्रमाचा भोपळा फुटला. हे तांत्रिक काम नव्हते तर कारकुनी काम होते.क्लायंटच्या सर्व साईटवरच्या टेलिफोन लाईन्स चे बिलिंग करणे, त्यांना फोन, ब्लॅकबेरी वगैरे हवे असल्यास कुरियर करणे वगैरे थोडक्यात बॅक ऑफिस ऍडमिन प्रकारचे होते. क्लायंट कडे हे काम करणारी ३ बायकांची जी टीम होती टी फारच हुच्च आणि आपल्या कामात तरबेज अशी होती. सगळ्याजणी हे काम वर्षानुवर्षे करत आलेल्या होत्या आणि त्यांची मुख्य डेबी एकदम स्मार्ट होती. मी इथे यायच्या आधी आमच्या २ वेगवेगळ्या टीममधील लोकांनी हे काम शिकून घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण त्यांनी या लोकांना काही कळत नाही वगैरे शेरेबाजी करून पळवून लावले होते.आणि आता "अभि नाही तो कभी नाही" अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रोजेक्ट चालू होऊन ३-४ महिने झाले होते, आणि बाकीच्या टीम सेटल झाल्या होत्या. पण हि टेल्को टीम काही आकार घेत नव्हती. त्यामुळे रेजिनाला आल्या आल्या इथल्या मॅनेजरने क्लायंटला घोषणा करून टाकली की आता आमचा एक्स्पर्ट माणूस आलाय आणि आता आम्ही टेल्को टीम सेट करणारच. त्यानंतर लगेच मला केबिनमध्ये बोलावून घेऊन फर्मान सोडले की कसेही करून तुला हे काम यशस्वी करायचे आहे. कारण यावर आपला एक पंचमांश रेव्हेन्यू अवलंबून आहे.
या सगळ्या गडबडीत १ तारीख आली आणि मला आधीच बुक केलेला फ्लॅट ताब्यात मिळाला.त्यामुळे तो प्रश्न सुटला. पण ऑफिसातले प्रश्न काही सुटेनात. मला टेल्को टीम मध्ये मदत करायला दोन स्थानिक मुली आणि एक बेंगलोर मधील मुलगी अशी टीम दिली होती. त्या दोन्ही स्थानिक मुलीना या कामातले कितपत समजत होते, कोणी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता कोण जाणे. बंगलोरच्या मुलीला तरी कॉलसेंटरचा अनुभव असल्याने थोडीफार माहिती होती. पण तिला बिचारीला रोज रात्रपाळी करावी लागत होती आणि ती तिच्या ३ महिन्याच्या मुलीला घरी आजीजवळ ठेवून येत असे.आता या तीन जणी आणि मी असे मिळून क्लायंटच्या टेल्को टीमच्या ३ बायकांच्या बरोबर काम करू लागलो. कल्पना अशी होती की काही दिवस आम्ही त्यांच्या बरोबर काम करून अनुभव घ्यायचा आणि हळूहळू स्वतंत्र पणे काम करायचे.खरेतर मला हे काम बिलकुल आवडले नव्हते. असे काम आहे माहित असते तर मी या प्रोजेक्टमध्ये आलोच नसतो. पण आता हे सर्व विचार करून फायदा नव्हता.शिवाय इथल्या मॅनेजरने मला लालूच दाखवली की थोडे दिवसांचा प्रश्न आहे. हे काम यशस्वी करून दाखवलेस ,म्हणजे या मुलींची टीम सेट करून दिलीस तर मग तुला ह्यातून बाहेर काढून दुसरे तुझ्या आवडीचे आणि लायकीचे टेक्निकल काम देईन. त्यामुळे मी मन लावून काम करायचा निश्चय केला. पण लवकरच मला समजून चुकले की मला वाटते तेव्हढे हे सगळे सोपे नाही. खरेतर कामाचा प्रश्न नव्हता. ते हळूहळू जमले असतेच,. तिन्ही मुली मन लावून प्रयत्न करत होत्या. त्यातला ब्लॅकबेरी सेट अप करणे वगैरे टेक्निकल भाग मी शिकून घेतला. गेलाबाजार निरनिराळ्या साईट वरच्या लोकांशी बोलणे, त्यांना कुठला फोन पाहिजे त्यांचे पॅकेज तयार करून कुरियर करणे वगैरे शेलकी कामेही मी करू लागलो. पण क्लायंटकडील तीन बायकांचे काहीतरी वेगळेच राजकारण शिजत होते. आम्ही यशस्वी झालो तर त्यांची नोकरी जाणार हे तर उघड होते. बाकीच्या सगळ्याच टीममध्ये तसेच झालेले त्या बघत होत्या. फक्त त्या त्या टीमची मॅनेजमेंट आपल्या आउटसोर्सिंग च्या निर्णयावर ठाम होती त्यामुळे प्रश्न इतका गंभीर झाला नव्हता. इथे मात्र क्लायंटच्या मॅनेजमेंट पैकी एक दोन जण या बायकांना सपोर्ट करत होते. कदाचित कर्मचारी संघटना वगैरे काही दुसरेही कारण असेल, पण या बायकांना हात लावायला कोणी धजावत नव्हते असे हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले. मी तसे माझ्या स्थानिक आणि भारतीय मॅनेजरला बोलूनही दाखविले. पण त्यांचे एकच पालुपद. हे काम आपल्याला यशस्वी करायचे आहे. तू प्रयत्न चालू ठेव.
इकडे मात्र घाणेरडे राजकारण चालू होते. एखाद्या साईटकडून इमेल आले की या तीन बायका झटपट त्याचे उत्तर देऊन मोकळ्या होत.किंवा आम्हाला सहभागी न करताच काम करून टाकत. आमच्यासाठी काही काम बाकी ठेवत नसत. किंवा आम्ही केलेल्या कामांमध्ये फालतू चुका शोधत राहत. दर आठवड्याला क्लायंटची आणि आमची टीम मीटिंग असे, त्यात आमच्या चुका पुराव्यासकट म्हणजे इमेलच्या प्रिंट वगैरे दाखवून चर्चिल्या जात. थोडक्यात हे काम आम्हाला जमत नाहीये असा देखावा केला जाई. या सगळ्या प्रकरणात मला अक्षरश: नैराश्य येऊ लागले. रोज सकाळी मी कसाबसा पाय ओढत ऑफिसमध्ये जाई. मला जेवण गोड लागेना. दुपारच्या शांत वेळेत तर मला डुलक्या येत आणि पुन्हा पुन्हा मी वॉशरूम मध्ये जाऊन तोंडावर पाणी मारून येई. पण दुसरा दिवस उजाडला की पुन्हा येरे माझ्या मागल्या. नको ती नोकरी आणि काम असे वाटू लागले.
या सगळ्या प्रकाराला कंटाळून मी एक दिवस माझ्या स्थानिक मॅनेजरला निर्वाणीचे सांगितले की हे बघ, क्लायंटला हे काम आपल्याला द्यायचेच नाहीये. त्यामुळे इतकी नाटके चालू आहेत. इतर टीम पहा. ते काही खूप छान कामे करत आहेत असे नाही, पण क्लायंटने एकदा आउटसोर्स करायचा निर्णय घेतला आणि पार पाडला. मग टेल्कोबाबत तसे का होऊ शकत नाही? खरेतर ही गोष्ट त्यालाही कळून चुकली होती, पण पैशांचा प्रश्न असल्याने तसे उघडपणे बोलून कोणाला वाईटपणा घ्यायचा नव्हता इतकेच. आता मात्र चक्रे फिरू लागली. क्लायंट आणि आमच्या कंपनीमध्ये जो माणूस कन्सल्टन्ट म्हणून काम करत होता त्याला ह्या निर्णयप्रक्रियेत सामील करण्यात आले. हे एक अतिशय चलाख मध्यस्थ माणूस होता. दोन्ही बाजूंना न दुखावता दोघांच्या खिशातून पैसे कसे काढायचे हे त्याला चांगले अवगत होते. अर्थातच त्याच्या जोडीला लागणारी इतर स्किल्स सुद्धा होतीच. शेवटी एका शुक्रवारी या कन्सल्टन्टने क्लायंट आणि आमची निर्णायक मीटिंग ठरवली. या मीटिंग मध्ये टेल्को या विषयावर बरीच हाणामारी झाली आणि अखेर टेल्कोचा भाग आमच्या प्रोजेक्टमधून वगळायचा निर्णय झाला. म्हणजे आता तो भाग आउट सोर्स होणार नव्हता.अर्थातच त्या ३ बायका यामुळे फारच खुश झाल्या , आणि रेव्हेन्यू कमी झाल्याने आमचे मॅनेजर दुःखी झाले. त्याचबरोबर आमची ४ जणांची टीम फुटली. एका स्थानिक मुलीला क्लायंटने आपल्या टेल्को टीममध्ये घेतले, दुसरीला काढून टाकले , बंगलोरची मुलगी दुसऱ्या टीममध्ये गेली आणि अखेर माझी रवानगी माझ्या आवडीच्या नेटवर्क टीममध्ये झाली. अशा तऱ्हेने हा तिढा एकदाचा सुटला , मुख्य म्हणजे माझ्यावर काही ठपका न येता सगळे जमून आले.आणि मी सुटकेचा निश्वास टाकला.
समाधानाची बाब हीच होती की या सगळ्या धामधुमीत मी एक आठवडा सुट्टी घेऊन भारतात आलो होतो आणि फॅमिलीला रेजिनाला घेऊन आलो होतो. त्यामुळे निदान घरी आल्यावर बायको पोरांचे चेहरे बघून काही काळ त्रासाचा विसर पडत असे. घरच्या आघाडीवर सगळे छान चालले होते. मुलांना भारतातल्या शाळेत सुट्टी होती आणि इथेही सध्या शाळेचा प्रश्न नव्हता. कारण ते ५-६ महिने इथे राहून भारतात परत जाणार होते.नवा देश, नवे वातावरण ,संस्कृती यांच्याशी ते जुळवून घेत होते.सध्या उन्हाळा चालू असल्याने दिवस मोठा होता. आणि संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावर कधीतरी बाहेर फिरायला जाणे जमत असे. काहीच नाहीतर शनिवार रविवार काहीतरी कार्यक्रम असे. आम्ही सगळे एकाच कंपनीचे लोक एकाच इमारतीत राहत होतो, त्यामुळे सगळे नवरे कामावर गेले की दुपारी महिला मंडळ जमत असे आणि गप्पा टप्पा चालत असत. वॉशिंग एरिया सर्वात वरच्या मजल्यावर होता आणि तिथे नाणी टाकून वॉशर/ड्रायर वापरता येत. २-३ बायका एकदम कपडे धुवायला घेऊन गेल्या की तिथेही मीटिंग भरत असे. शिवाय एकमेकांकडे काही वेगळा पदार्थ केला की देवाण घेवाण होई. सणावाराला गावातल्या हिंदू मंदिरात जाणे होई, तिथे बाकीची भरपूर भारतीय लोक भेटत. नवरात्र गणपती दिवाळी वगैरे सण मंदिरात साजरे केले जात.अर्थात मंदिर फक्त रविवारीच उघडत त्यामुळे जो कुठला जवळचा विकांत असेल तेव्हाच जाणे होई. मंदिरात येणारे बहुतेक जण तिथे कायमचे स्थायिक झालेले होते, आमच्या सारखे तात्पुरते वर्क परमिट वर आलेले नव्हते. त्यांना आमच्या बद्दल नवल वाटे. ती सर्व पहिल्या दुसऱ्या पिढीची कॅनडात आलेली लोक होती. त्यात कोणी डॉक्टर ,कोणी व्यापारी किंवा सरकारी नोकरी करणारे असे लोक असत. बहुतेकजण गुजराथी ,पंजाबी होते. एकच मराठी फॅमिली भेटली ते डॉक्टर होते आणि रेजिनाजवळ फोर्ट क्यू ऍपल गावी राहत होते.
रेजिना शहर तसे खेडेगाव म्हणता येईल असे होते. शहराच्या मध्यभागी कॉर्नवाल मॉल, जिथून शहराच्या चारी टोकांना जाणाऱ्या बसेस मिळत. तीन टोकांना अशीच वेगवेगळी मॉल्स होती . साऊथलॅन्ड मॉल , नॉर्थ गेट मॉल ,पूर्वेला सुपर स्टोर, तिकडे जातानाच वाटेत कॉस्टको म्हणून एक होलसेल दुकान. पश्चिमेकडे विमानतळ आणि कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचा ट्रॅक असल्याने फारस विकास झाला नव्हता. रोज लागणारे दूध ब्रेड अंडी वगैरे जवळच सेवन इलेव्हन किंवा शॉपर्स ड्रग मार्ट मध्ये मिळे. आठवड्यातून किंवा दोन आठवड्यातून एकदा सुपरस्टोरला चक्कर टाकल्यास सगळे सामान भरता येई. किंवा एस्क्ट्रा फूड वगैरे दुकानात चांगल्या वस्तू मिळत. इतर वेळेस काही ठराविक भारतीय पदार्थ किंवा मसाले हवे असतील तर टोनी नावाच्या पंजाबी माणसाच्या दुकानात मिळत असत. बायकांच्या दुपारच्या चर्चेत हे विषय हटकून येत. कुठे काय चांगले मिळते, कुठून काय आणि कितीला खरेदी केले, कुठून काय घेऊ नये हे सगळे बायकांना पहिले समजत असे आणि त्यावर येणाऱ्या विकांताला कुठे जायचे तो बेत ठरे. बहुतेक सर्वांकडे अजूनही कर नव्हती त्यामुळे सर्वजण ड्रायव्हिंगचा परवाना काढायला धडपडू लागले. पण तोवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरून कुठे कुठे फिरता येईल याचीही चाचपणी सुरु असे. त्यानुसार एका विकांताला सगळे मिळून मूस जॉ नावाच्या गावी ट्रीपला गेलो जिथे गरम पाण्याचे झरे आणि कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे बांधताना बळी गेलेल्या चिनी मजुरांचे बंकर्स वगैरे बघण्यासारखे होते. खरेतर कोणीच अजून रेजिनाच्या बाहेर फारसे पडलेले नसल्याने जे काही बघायला मिळेल तो बोनसच होता. पण ७-८ फॅमिली एकत्र येऊन केलेली ती ट्रिप मनाला एका समाधान नक्कीच देऊन गेली.
आमच्या इमारतीपासून चालत १० मिनिटांच्या अंतरावर रेजिना विदयापीठ आणि वासकाना तळे होते. विकांताला तिथेही फेरी होई. अजून इथे बऱ्यापैकी झाडी टिकून असल्याने ससे बागडताना दिसत. खेळायला थोडीफार खेळणी असल्याने मुलांचाही वेळ मजेत जाई. या तळ्यात उन्हाळ्यात बरेच व्यावसायिक लोक बोटिंगचा सराव करताना दिसत. दहा लोकांची एका टीम अशा स्पर्धाही भरत. बरेचदा त्यात विद्यापीठातील विद्यार्थी भाग घेत, पण एकुणात तरुण लोकांचा भरणा जास्त असे. इतर वेळी ताशी १० किंवा २० डॉलर भाडे भरून त्या बोटी कोणालाही चालवता येत. उन्हाळ्यातील अजून एक कार्यक्रम म्हणजे बार्बेक्यू. वासकाना तळ्याकाठी अनेक ठिकाणी बार्बेक्यू करण्यासाठी मोठमोठ्या दगडी चुली होत्या. विकांताला आपापले सामान, कोळसे वगैरे घेऊन फॅमिली किंवा ग्रुप तिकडे जाऊन बसायचे आणि उबदार वातावरणात एकीकडे मुले बागडताहेत,आईबाप गप्पा टप्पा करत आहेत , बार्बेक्यूचा धूर निघतोय आणि काहीतरी शिजते आहे असे दृश्य दिसायचे. कुठे स्केटिंग तर कुठे इतर काही खेळ चालू असायचे. याचवेळी रविवारी शहराच्या मध्यभागी मोकळ्या जागांमध्ये कधी प्रदर्शन तर कधी शेतकरी बाजार , कधी छोटी जत्रा असे काही ना काही चालू असे.थोडक्यात उन्हाळ्याच्या दिवसांचा पुरेपूर उपभोग घेतला जायचा. कारण नंतर जवळपास सहा महिने हिवाळा म्हणजे घरात बसून राहण्याची शिक्षा.
या सगळ्या आनंदी दिवसांचा आनंदी शेवट म्हणजे आमची टोरांटो आणि नायगारा ट्रिप. अर्थातच माझ्याकडे कारचे लायसन्स नसल्याने ही सर्व ट्रिप आखताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विचार करूनच आखली होती. प्रथम विमानाने रेजिना ते टोरांटो, मग ग्रे हाऊंड बसने तिथून नायगारा , एक दिवस मुक्काम करून नायगारा दर्शन आणि पुन्हा टोरांटो, मग २-३ दिवस मुक्काम करून टोरांटो दर्शन आणि परत रेजिना अशी मस्त ट्रिप होती. नायगारा हे एक स्वतंत्र प्रकरण असल्याने त्यावर लिहू तेव्हढे थोडेच आहे. प्रचंड उंचीवरून पडणारा जलौघ, त्याच्या आत शिरू पाहणाऱ्या मेड ऑफ द मिस्ट बोटी , धबधब्याच्या पाठीमागून , हेलिकॉप्टरमधून आणि स्कायलॉन टॉवरवरून वेगवेगळा दिसणारा नायगारा , नायगारा च्या आसपास निर्माण केलेली पर्यटन स्थळे असे बघायला दोन दिवसही पुरणार नाहीत. पण स्थानिक कॅनेडियन लोकांना मात्र नायगारा म्हणजे पर्यटकांनी उगाच निर्माण केलेली हाइप वाटते हे ऐकून गम्मत वाटली. ऑफिसातील अनेक कॅनेडियन लोकांनी वयाच्या पन्नाशीतही नायगारा पाहिला नव्हता. जसा मी सुद्धा ताज महाल किंवा गेट वे ऑफ इंडिया बघितला नव्हता.
टोरांटोला हॉप ऑन हॉप ऑफ बसमुळे शहर फिरणे बरेच सोपे झाले. अर्थात बसचा मार्ग शहराच्या मध्यभागातील काही ठराविक पर्यटन स्थळेच दाखवत होता. हे म्हणजे गेटवे ऑफ इंडिया ते फोर्ट, महापालिका आणि सी एस टी स्टेशन,नरीमन पॉईंट ,कुलाबा ,क्रॉफर्ड मार्केट वगैरे दाखवून हीच मुंबई म्हणण्यासारखे होते. परंतु आमच्या सारख्या नवख्यांसाठी तेही पुरेसे होते. कारण तसेही टोरांटोमध्ये स्थायिक लोकांनी कधी पूर्ण शहर पहिले असेल असे मला वाटत नाही. त्यातल्या त्यात मला आवडलेली ठिकाणे म्हणजे सी एन टॉवर,कासा लोमा ,बाटा संग्रहालय आणि यंग डूंदा चौक.एकुणात आमची ही ट्रिप पैसे वसूल झाली आणि स्वतः आखून केलेल्या परदेशातील एका ट्रिपचा अनुभव गाठी जमा झाला.
प्रतिक्रिया
10 Jun 2022 - 5:20 pm | श्वेता२४
.
10 Jun 2022 - 6:06 pm | शाम भागवत
तीनही भाग वाचून काढले. छान लिहीत आहात. जोपर्यंत सांगण्यासारखे तुमच्याकडे काही आहे, तोपर्यंत लिहीत रहा.
10 Jun 2022 - 9:36 pm | सुखी
छान झालाय लेख
10 Jun 2022 - 11:37 pm | हणमंतअण्णा शंकर...
तुमचे लेखन विस्तृतरित्या येऊ द्या.
तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत. मी झरझर वाचून संपवले आणि ते लगेच संपले म्हणून खंतावलो.
असे अनुभव, उगाचच भावनाबंबाळ आणि शब्दबंबाळ न करणारे, काय घडलं कसं घडलं ते सरळ सांगत राहणारे. मी असे लेखन वाचण्यासाठी आतुर असतो.
कृपया लिहित राहा.
10 Jun 2022 - 11:48 pm | फारएन्ड
आवडत आहे वाचायला.
11 Jun 2022 - 8:38 am | सुक्या
नॉस्टेलॉजीक लेखमाला. भारतातुन १९९० - २००० च्या दशकात इथे आलेल्या बहुतेक माहीती तंत्रज्ञाची कहानी कमी अधिक अशीच आहे. कधी कधी कामापेक्षा राजकारण वीट आणते. सगळे जण आपल्या जागी बरोबर असतात. नोकरी गमावणे कुणालाच नको असते मग लोक राजकारणाचा आधार घेतात.
तीनही भाग खूप वाचनीय झाले आहेत.
12 Jun 2022 - 5:15 pm | सिरुसेरि
सुरेख अनुभव कथन .
13 Jun 2022 - 10:48 am | राजेंद्र मेहेंदळे
वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे एक एक भाग लिहायला हुरुप येत आहे. कामाच्या गडबडीत थोडे थोडे लिहुन काढतोय. पुरेसे लिखाण झाले की पुढचा भाग टाकेन.
13 Jun 2022 - 12:13 pm | सौंदाळा
हा भागही मस्तच. अशाच अनुभवातून गेलो होतो. अमेरिकेतुन काम ऑट्सोर्स होणार होते. त्यांनी सुरुवातीला ट्रायल म्हणून काही काम दिले होते. ते व्यवस्थित झाले. कारण त्यात दोन्ही बाजूचे मॅनेजमेंटचे लोक होते. नंतर ट्रेनिंगसाठी ओनसाईट गेल्यावर मात्र तिकडच्या एंड युजर्स बरोबर काम करताना त्यांनी पण खूप त्रास दिला होता.
मुद्दाम चुकीची किंवा अपुरी माहिती देणे जेणेकरुन कामात चुका होतील आणि नंतर त्या चुका त्यांच्या मॅनेजमेंटसमोर हायलाईट करणे वगैरे. शेवटी आम्ही पण तयार झालो. आधी त्यांनी केलेल्या कामाचे रेफरन्सेस मागायचो, ओरल कम्युनिकेशन झाले असेल तरी त्यातले मुद्दे ईमेल करायचो. काम पूर्ण झाल्यावर दोन्ही साईडच्या मॅनेजमेंटसमोरच प्रेझेंट करायचो. असे करुन करुन शेवटी घडी बसली आणि त्यांचे काम इकडे यायला लागले. ते दिवस खूपच तणावपूर्ण होते.
तुमचा लेख वाचून सगळे आठवले. लेख नेहमीप्रमाणेच मस्त. प्रवासवर्णन, जागेचा शोध, ऑफिसच्या घडामोडी, कौटुंबिक असे वेगवेगळे पैलू लेखातुन वाचताना खूपच छान वाटतय.
पुभाप्र