व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
2 Jun 2022 - 6:56 pm

व्यक्ति, प्रकृती आणि प्रवृत्ती – २
डिपार्टमेंट मध्ये भेटलेल्या विलक्षण व्यक्तींच्या यादी मध्ये जनमित्र ( मराठीत, ‘वायरमन’ ) जाधव मामांचे नाव वगळणे शक्यच नाही !
माझी त्यांच्याशी काही वर्षे आधी गाठ पडली असती तर खात्यातले माझे करियर नक्कीच आणखी ब्राइट झाले असते. पण जेव्हा मी त्यांची वरिष्ठ अधिकारी म्हणून आले तेव्हा त्यांची रिटायरमेंट साठी दोनच वर्षे राहिली होती. त्यातही दीड वर्षे मला त्यांच्या कडून (वरिष्ठ असूनही) खूप काही शिकायला मिळाले. आपल्या कामात तर जाधवमामा अचूक होतेच, शिवाय मनुष्य स्वभाव आणि व्यवहार ज्ञान यात ते अतिशय पारंगत होते. या वयातही त्यांची कामाप्रति जिद्द, चिकाटी आणि समर्पण वृत्ती खरोखर नमस्कार घालावा अशी होती. त्यांच्या भागात बिले आल्यानंतर एक आठवड्याने एकही थकबाकी नसे. त्यांचे कामच संपे.
.. मग ते माझ्याशी गप्पा मारीत बसत. म्हणजे खरं तर माझी शिकवणीच घेत. कोणत्या सेक्शन ऑफिसरला किती आणि कसं धारेवर धरायचं, म्हणजे तो कामं फास्ट करेल हे मला सोदाहरण समजावून द्यायचे. त्यांनी पंधरा वीस वर्षे त्याच भागात काढली होती त्यामुळे गावाचा कोपरा न कोपरा त्यांना ठाऊक होता. तसेच सगळ्या शाखाधिकाऱ्यांचे गुण अवगुण हातावरच्या रेषांसारखे तोंडपाठ.
माझ्या हाताखाली काम करायला लागून त्यांना आठेक महिने झाले तेव्हा मी एकदा त्यांच्या घरी जेवायला गेले होते. तिथे एक कपाटात बक्षिसांच्या कपांची रांग पाहिली.
‘हे हो काय जाधवमामा ?’ मी अचंब्याने विचारले तर खाली मान घालून एवढंसं हसत म्हणाले,
‘मॅडम , अहो आपल्या भागातलं वासुलीचं बक्षीस दरवर्षी मलाच देतात ओ, मी दर वर्षी मोठ्या सायबांना सांगतो या वर्षी दुसरं कुणीतरी बघा, पण ..’
त्याआधी चुकूनही त्यांनी कधी त्याचा उल्लेख केला नव्हता. आपले कौतुक ते कधी आपल्या तोंडाने सांगत नसत आणि कुणी केले तर मागल्या पावली पसार होत.
गप्पा मारता मारता , उद्याच्या मीटिंग मध्ये कुणाकुणाला नावानिशी उठवायचे आणि कुणाची कशी झडती घ्यायची म्हणजे आपल्या विभागाचा कारभार बिनबोभाट चालतो, हे ते मला अगदी बारकाईने सांगत. आणि मग मीटिंग सुरू झाली की स्वत: त्या गावचेच नसल्यागत कोपऱ्यात जाऊन उभे रहात.
एकदा ऑफिस सुटल्यावर नेहमीप्रमाणे मी ‘गप्पा’ मारण्यासाठी त्यांना बोलावले. तर शिपाई सांगत आला की जाधवमामा वसूली साठी गेले. मला आश्चर्य वाटले की यांची तर बिलं केव्हाच झालीत मग कुठे गेले हे आत्ता ?
दुसऱ्या दिवशी विचारले तर म्हणाले ‘नाही ओ मॅडम, माझी तर झाली वसूली.. खरं पण तो उत्तर भागातला घोडके आहे नया, तो गेल्या आठवड्यात दवाखान्यात अॅडमिट होता हो. मग त्याची वसूली मागं राहिलीय. त्याला जरा चार गल्ल्या मारून दिल्या बघा.’
हा त्यांचा गुण ही मला नवीनच कळला !
वीज चोरी हा एक स्वतंत्र विषय असे. प्रत्येक चोरीची पद्धत वेगळी. अनुभवानेच समजायचे की नक्की कुठे गडबड आहे. अन्यथा गळतीचा हिशेब लावता लावता पुरेवाट . आशा वेळी ज्या त्या भागातल्या जनमित्रा शिवाय इतरही एक दोन जाणकार मुरलेल्या आपण त्या भागासाठी अनोळखी असलेल्या वायरमन ना घेऊन जावे लागे. कारण न जाणो, जनमित्र चोराला सामील असला तर ?
जाधवमामा मुरलेले अनुभवी जनमित्र उर्फ वायरमन. सहसा खबर देणारा जनमित्र नसून बाहेरची व्यक्ति असे. बहुधा चोराच्या खुन्नस मधली. पण जाधवमामांचे तंत्र निराळेच. त्या केसमध्ये खबऱ्याच जाधवमामा. भाग त्यांचाच.
त्यांच्या भागातल्या सगळ्या ग्राहकांच्या कुंडल्या त्यांच्या डोक्यात मांडलेल्या .
सहसा ते सकाळी कार्यालयात फिरकत नसत. सकळचा वेळ फील्ड वरच्या कामांचा, हे त्यांच्या डोक्यात पक्के. पण एकदा अकरा वाजताच जाधवमामा आले.
‘मॅडम, मी के सांगतो ते आत्ताच कुणाला बोलायचं नाय. जीप मागवा. चोरी पकडायची.’
‘आ ? कुठे ?’
,हेच की, माझ्या भागात.’
‘तुमच्या भागात चोरी ? मग तुम्ही का गप्प ?’
‘सांगतो. आधी या ग्राहकाचं रेकॉर्ड मागवा.’
संशयित ग्राहकाचा तपशील माझ्यासमोर आणला गेला.
‘हां, सांगा मामा , तुम्हाला काय माहिती इथे चोरी आहे ? ‘ वेळ कमी असल्याने मी थेट विषयाला हात घातला.
‘म्हणजे बघा मॅडम , तो हॉटेलवाला आहे. रोजचं शे-दीडशे गिऱ्हाईक हॉटेलला. आधी त्याचं लाईटबिल महिन्याला चार साडेचार हजार येत हुतं. आणि आता गेले चार महिने सहाशे-सातशे. मला संशय आला. परवा खांबावर चढलो आणि उगं जरा न्यूट्रल ढिल्ली केली अन गप जाऊन झोपलो. सकाळी हॉटेलचा पोऱ्या बोलवाय आला, लाईट बंद पडली म्हणून. मग खोलीत जाऊन आसंच मीटरच्या वायरी खालवर केल्या तर गडबड दिसली. ‘
‘मग काय केलं ?’
‘काय करतोय ? चोरी म्हटलो असतो तर राती माझा पाय गुडघ्यातनं काढला असता त्यानं. गप हापिसात आलो अन सायबाला सांगितलं. ‘ जाधवमामांनी काळेसाहेबाकडे बघून मान हलवली. ते डायरेक्ट माझ्या हाताखाली नसून काळे या शाखा अधिकाऱ्यांच्या भागात काम करत.
‘मग, काळे तुम्ही काय केलं ?’ मी.
‘या आठवड्यात चेकिंग करणार होतो मॅडम..’
‘कधी ? आज शनिवार, आठवडा संपला की !’
‘.....’
‘जाधवमामा, काय करायचं ? जायचं का चेकिंगला ?’
‘चला की ! पण मी तुमच्याबरोबर नाय येणार.’
‘मग ?’
‘असं करायचं, तुमी तिथं जाऊन मला फोन लावायचा. आणि बलवून घ्यायचं.’
‘बरं...’
‘आणि मग बेजान झापायचं... काय गडबड हाय मीटरमधे, तू बघतो का नाही, कुठं ध्यान आसतंय....’
‘हा: हा:..’
‘व्हय, मॅडम !! लई झापायचं ! आणि त्या ग्राहकासमोर. म्हंजे त्याची बोलती बंद होते आन मुकाट चोरीचं बिल भरतो...आणि उद्या जवा आमी परत वसुलीला जाऊ तवा आमच्याव ताव बी काढीत नाही !’
मी काळे, हाताखालचा आणखी एक इंजिनिअर आणि एक दुसरा एक वायरमन आमचे चार लोकांचे पथक नवीन मीटरचे आणि अ‍ॅक्युचेक इत्यादिचे पॅक्ड बॉक्स घेऊन स्पॉटवर म्हणजे हॉटेलवर जाऊन पोचले. धना ड्रायव्हरने गाडी थेट हॉटेलच्या दारातच नेऊन लावली आणि कर्कश्श आवाज करत ब्रेक दाबला. मॅनेजर आणि दोघे तिघे धडपडत दारातून डोकावले.
‘लाईट मीटर चेक करायचे आहे. दाखवा.’
‘कुलपात है. किल्ली मालकांच्याकडे है.’
‘मालकांना बोलवा.’
‘गावाला गेल्यात ‘
‘फोन लावा.’
मग काळेंनी त्या हॉटेलमालकाला मोबाईलवर हग्या दम दिल्यावर म्यानेजरला किल्ली सापडली एकदाची !
आम्ही मीटररूममध्ये गेलो. मीटर रूम मध्ये अंधुकच उजेड. एक मिणमिणता सीएफएल तेवढाच. बाहेरून चेक केले तेव्हा संशयास्पद काहीच दिसले नाही. मग सील तोडून मशीन लावून चेक केले.
‘मॅडम, मशीनच्या आणि मीटरच्या युनिट्समध्ये ६० टक्के फरक आहे.’
‘बाप रे !’
.... मीटरमध्ये प्रत्यक्षापेक्षा ६० टक्के युनिट्स कमी येत होते !!
लगेच काळेंनी म्यानेजरला बोलावले.
‘काय हो हे ?’
‘काय झालं ?’
‘हे मीटर रीडिंग कमी कसं दाखवतंय ?’
‘आम्हाला काय म्हाईत ? तुमचा माणूस येऊन रीडिंग घेऊन जातो !’
‘हे बघा. इथलं रीडिंग आणि तुमच्या मीटरचं रीडिंग.’
‘काय की बॉ. आमी काय मीटरला हात लावायला जात नाही कधी.’
मग मी म्हणाले, ‘काळे, कोण वायरमन आहे हो या भागात ? बोलवा त्याला.’
काळेंनी जाधवमामांना फोन लावला. ते जवळपासच होते. लगेच हजर झाले.
‘काय मामा, कामं करता का हजामती करता ?’
‘काय झालं मॅडम ?’
‘हे बघितलं का ? मीटर टेंपरिंग ! तुमचा भाग आणि तुम्हाला काहीच खबर नाही ? कुठं ध्यान असतं, डोळे झाकून काम करता काय ? काय आपलं पगार मिळाला की झालं ?...’
मी जाधवमामांना ठरल्याप्रमाणे लेकी बोले न्यायाने झाप झाप झापले !!
इकडे म्यानेजर आधीच निम्मा खलास झालेला, तो पुरता गारद झाला !
मग काळेंनी सोबत आणलेले नवीन मीटर जोडले आणि संशयास्पद मीटर ताब्यात घेतले.’ बाहेर उजेडात नेऊन पाहिल्यावर टेंपरिंग केलेले दिसलेच. लगेच पहिला मीटर बॉक्समधे घातला, सील करून सह्या-बिह्या घेतल्या. सील केलेला मीटर बंदोबस्तात गाडीत नेऊन ठेवला. नवीन मीटर जोडून रीडिंग घेतले.
मग जाधवमामांनी आधीच सूचना दिल्याप्रमाणे, मी ताडताड चालत गाडीत जाऊन बसले. इकडे मामांनी म्यानेजरला कोपच्यात घेतले.
‘म्याडम लई तापट हायती. उद्या हापिसात या आणि फरकाचं बिल भरून मोकळं व्हा. नायतर केस झाली तर मी नाय बा मधी पडणार !’
मग म्यानेजरसाहेबमजकूर हळूच गाडीच्या खिडकीशी येऊन उभे राहिले आणि भीत भीत बोलले,
‘मॅडम, चला ना आत, काही थंड घेणार ?’
‘सॉरी मला चालत नाही.’
‘मग चहा ?’
‘मी चहा पीत नाही.’
‘आत तरी या, पाणी बिणी प्या जरा....’
‘त्यावर मी एकदा त्याच्याकडे भेदकपणे पाहून पुन्हा मान काटकोनात वळवली. मग त्याने थंडगार बिस्लेरी माझ्यासमोर धरली.
‘मला थंड पाणी चालत नाही.’
मग नॉर्मल पाणी बाटली मागवण्यात आली. पाणी पिल्यावर ,त्याच्या दृष्टीने, मी जरा थंड झाल्याचे पाहून तो पुन्हा अदबीने म्हणाला ‘मॅडम, उद्या येऊ का ऑफिसात, जरा कोटेशन देताना कृपा करा, लै झाडून काढू नका ...’
‘पण मी नाही उद्या, जिल्ह्याला जाणार आहे..’
‘मग परवा ?’
‘परवाचा कार्यक्रम फिक्स नाही अजून !’
....त्याने बऱ्याच मिनत्या केल्यावर अखेर मी कमीतकमी फरक काढून उद्याच बिल द्यायचे कबूल केले !
‘हम्म.. बघूया, तुम्ही जाधवांना घेऊन या सकाळी नऊ वाजता, करू कायतरी !’
हॉटेलमालकाने दोन दिवसात फरकाचे बिल भरले हे सांगायलाच नको.
आमची मोहीम मुद्देमालासकट फत्ते झाली !!
जाधवमामांच्या रिटायरमेंट चे जेवण मी घ्यावे अशी जारी त्यांची इच्छा होती, तरी माझ्या ‘अतिकार्यक्षमते’ मुळे त्यांच्या रिटायर होण्याच्या सहा महिने आधीच माझी तिथून बदली झाली. त्यांनी आग्रहाने बोलावले असूनही पुनः काही त्या गावी जाणे मंज्याने झाले नाही एवढे खरे.
तथापि अजूनही आम्ही फोनवर मनमुराद गप्पा मारतो.
...अर्थात, साहेब आणि कर्मचारी महणून नव्हे तर अघळ पघळ दोस्ती खात्यात !!

( जाधव मामांचा किस्सा मिपावरच आधी लिहिलेल्या एक लेखात आहे.)

समाजअनुभव

प्रतिक्रिया

वायरमन म्हणजे जर जनमित्र असेल तर तारतंत्री म्हणजे कोण?

कंजूस's picture

2 Jun 2022 - 8:48 pm | कंजूस

पण एकूण महावितरणचा कारभार बराच सुधारला आहे.

कर्नलतपस्वी's picture

3 Jun 2022 - 7:43 am | कर्नलतपस्वी

खुपच.

शलभ's picture

2 Jun 2022 - 9:43 pm | शलभ

मस्त आहे लेखमाला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

3 Jun 2022 - 8:36 am | ज्ञानोबाचे पैजार

ज्यांना आपल्या विभागाची नस अन नस माहित असते,
फार जपायला लागते अशा लोकांना,
त्यांच्या सेंडऑफ ला मात्र तुम्ही आवर्जून जायला हवे होते.
पैजारबुवा,

सुखी's picture

3 Jun 2022 - 10:05 pm | सुखी

हेहे.. मस्त

कानडाऊ योगेशु's picture

3 Jun 2022 - 10:15 pm | कानडाऊ योगेशु

सध्या अश्या वीज बिलाचा अनुभव मी घेत आहे. माझ्या मालकाचे बिल फक्त ३०० च्या आत येते नेहेमी आणि तेव्हाच माझे २-३००० पर्यंत येते. मालकाकडे दोन दोन ए.सी आहेत सध्या फुल टाईम कुलर पण चालु आहे. आणि घरात दळण कांडणांची वीजेवर चालणारी सगळी उपकरणे आहेत. मे महिन्यातले त्याचे बिल फक्त ५०० आणि माझे ४५००.
ह्यावर तोडगा कसा काढावा? तुमच्या काही लाईनी माझ्या वीज मीटरला जोडल्या आहेत असे डायरेक्ट बोलु शक्त नाही.

सस्नेह's picture

4 Jun 2022 - 7:33 am | सस्नेह

मग नक्कीच गडबड आहे.
एकदा विश्वासू वायरमधकडून तुमचे तरी वयरिंग तपासून घ्या. मीटर वेगळे असेल तर तुमची सगळी उपकरणे बंद करा आणि मीटर पल्स पडते का पहा. पडत असेल तर ताबडतोब मालकांना दाखवा. नो लोडला पल्स पडली नाही पाहिजे.

सस्नेह's picture

4 Jun 2022 - 7:34 am | सस्नेह

मग नक्कीच गडबड आहे.
एकदा विश्वासू वायरमधकडून तुमचे तरी वयरिंग तपासून घ्या. मीटर वेगळे असेल तर तुमची सगळी उपकरणे बंद करा आणि मीटर पल्स पडते का पहा. पडत असेल तर ताबडतोब मालकांना दाखवा. नो लोडला पल्स पडली नाही पाहिजे.

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2022 - 10:19 am | कानडाऊ योगेशु

माझ्या पत्रिकेत कदाचित नालायक घरमालक लिहिलेला असावा. संदर्भ
मालकाला सांगुन झाले आणि त्याला विचारले ही कि तुमचे बिल किती येते तो हडबडला आणि म्हणाला कि ५ हजारात येते जेव्हा कि बिल फक्त ५०० होते. तिथेच कळले कि झोल आहे पण बाकी बाबतीत काही त्रास नाही आणि हा विषय काढला कि ठिक आहे आप निकलो इधर से असेही तो म्हणु शकतो म्हणुन बुक्क्यांचा मार सहन करतोय.

प्रचेतस's picture

4 Jun 2022 - 8:04 am | प्रचेतस

लैच भारी किस्सा आहे हा. तुमच्या जीवंत वर्णनामुळे सर्व प्रसंग डोळ्यांसमोर उभे राहतात.

सिरुसेरि's picture

12 Jun 2022 - 9:22 pm | सिरुसेरि

एम एस सी बी चे भन्नाट अनुभव . छान .