नमस्कार. मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे. चूकभूल सांभाळून घ्या :)
२०१० सालची गोष्ट आहे. मी जपान सरकारतर्फे शिष्यवृत्ती मिळून शिकायला आलो होतो. परदेशी विद्यार्थ्यांसाठी वेगळे वर्ग असायचे. त्या वर्गांमध्ये, परदेशीच पण जे पूर्णवेळ शिकत असतील(डिग्री प्रोग्रॅम) अशा विद्यार्थ्यांना पण परवानगी असायची. तेव्हा एका वर्गामध्ये माझ्याबरोबर एक चिनी विद्यार्थी होता, जो
पूर्णवेळ शिकत होता. वर्गात जनरल हाय हॅलो व्हायचं पण मैत्री अशी नव्हती. त्याचं शिक्षण मार्चमध्ये संपलं होतं आणि त्याला दक्षिण जपानमध्ये नोकरी पण मिळाली होती असं सांगत होता. हा अचानक एके दिवशी माझ्या रूमवर आला आणि मला म्हणाला की मी परत येणार आहे जपानमध्ये जूनमध्ये तोवर माझ्या २ बॅग्स ठेवशील का तुझ्याकडे? एरवी सगळे परदेशी विद्यार्थी आपापल्या जूनियर्स साठी म्हणा असं काही ना काही सामान कोणाकडेतरी ठेवत असतात, त्यामुळे मी म्हटलं ठीके हरकत नाही. नंतर मध्ये साधारण ३ महिने गेले तरी हा माणूस मला काही संपर्क करेना! मी त्याला ई-मेल पण करून सांगितलं की मी सप्टेंबरमध्ये परत जाणार आहे भारतात त्याच्या आगोदर ते सामान घेऊन जा. पण एक ना दोन.
एके दिवशी सकाळी मला इमिग्रेशन ब्युरो मधून फोन आला की तुमचं नाव अमुक तमुक आहे का आणि तुम्ही चायनीज आहात का? मी म्हटलं नाही माझं नाव नचिकेत आहे आणि मी भारतीय आहे. तेव्हा त्यांनी माझ्या एलियन कार्डचा तपशील मागितला आणि लगेच त्यांना पण कळालं की मी कोण आहे ते. त्यांच्या बोलण्यावरून मला असं समजलं की, या चायनीज माणसानी व्हिसा स्टेटस बदलायच्या वेळेला नाव फक्त स्वतःचं दिलं होतं पण पत्ता आणि फोन नंबर माझा दिला होता. आणि त्या इमिग्रेशन मधल्या माणसानी मला सांगितलं की आता तो चायनीज माणूस बेपत्ता झाला आहे!!! मी म्हटलं मला खरंच काही माहित नाही त्याच्याबद्दल. ते म्हणाले की ठीके आम्ही तुझी माहिती व्हेरिफाय केली आहे पण काही आम्हाला लागलं तर आम्ही परत तुला कॉल करू. मी ताबडतोब विद्यापीठाच्या ऑफिस मध्ये ही गोष्ट कळवली. त्यांनी मला धीर दिला आणि सांगितलं की त्या बॅग्स तू आधी आमच्याकडे दे. वाईटात वाईट जर का पोलीस आले तर आम्ही पूर्ण जबाबदारी घेऊ. त्या चायनीज माणसानी शेवटच्या सेमिस्टर ची फी पण बुडवली होती. त्यामुळे तो तसाही विद्यापीठाच्या ब्लॅक लिस्ट वर होता.
नंतर विद्यापीठाने इमिग्रेशन ब्युरो ला पण कळवलं की नचिकेतचा याच्यात काही संबंध नाहीये तुम्ही त्याला फोन करू नका. नंतर कोणाचा काही त्या संदर्भात फोन आला नाही पण जून ते ऑगस्ट हा काळ अत्यंत तणावात गेला.
अशातच परत यायची तयारी चालली होती आणि एके दिवशी या चायनीज माणसाचा परत फोन आला. मी त्याला झाप झाप झापलं आणि म्हटलं की तुझ्यामुळे किती तणावात होतो मी काही तरी कल्पना आहे का तुला? तर म्हणायला लागला की मला ते माझं सामान परत हवं आहे तर तुझ्या घराचा पत्ता दे. मला पोलिसांनी अटक केली आहे आणि मी आत्तापण तुरुंगातून बोलतोय म्हणे. मी म्हटलं की तू आधी इकडे ये, आपण विदयापीठाच्या ऑफिस मध्ये जाऊन बोलू. तेव्हा लगेच फोन कट केला.
आमची स्वारी परत ऑफिस मध्ये. तेव्हा परत त्या शिक्षकांनी धीर दिला आणि सांगितलं की तू आता फक्त घरी जायची तयारी कर, आणि मला काही सूचना दिल्या की कोणीही आलं तरी नीट खात्री केल्याशिवाय दार उघडायचं नाही, तुला नसेल खात्री बाहेरच्या माणसाची तर सिक्युरिटीला आधी फोन कर आणि ते आल्याशिवाय दार उघडू नकोस वगैरे :) त्या चायनीज माणसाच्या नावानी एक नोटीस पण दारावर चिकटवली होती माझ्या खोलीच्या, की इथे यायचं नाही आणि काही काम असेल तर ऑफिसमध्येच यायचं अशा अर्थाची.
तीन महिने अशा पद्धतीनी खूप तणावात गेले. घरी पण सांगितलं नव्हतं, उगीचच त्यांच्या डोक्याला कशाला भुंगा लावा असा विचार करून. असंही वाटत होतं की सगळं सोडून परत जावं घरी पण नंतर विचार केला की आपण जर का मुद्दाम काही केलं नाहीये तर का पळून जा? यथावकाश सप्टेंबर मध्ये शिष्यवृत्तीचा अभ्यासक्रम पूर्ण करून परत गेलो पुण्याला. पण अजूनही ते दिवस आठवले की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही!
प्रतिक्रिया
3 Jun 2022 - 9:03 am | कुमार१
परदेशात राहताना अतिसावध असलेले बरे असते. सामान ठेवून घेणे हीसुद्धा एक जोखीम असते
3 Jun 2022 - 9:13 am | विजुभाऊ
मी दक्षीण अफ्रिकेत असताना तेथील घरमालकांशी बोलताना संभाषणात भांग हा विषय आला. भाम्ग आणि त्याचे परिणाम यावर मजेत बोलत होतो.
तिथेच त्या घर मालकांचा भाच्चाही होता. त्याने मला भीम्ग बनवता येईल का असे विचारले. मी म्हणालो की पत्ती मिळाली की बनवता येते.
दोन दिवसांनी तो भांग म्हणजे मारियुवाना ची डबा भरून पत्ती आणली आणि भांग करून दे म्हणाला.
तो डबा पाहून माझी पार तंतरली. त्याला ती पाने ही नाहीत असे सांगून कसे बसे परत पाठवून दिले.
या नार्कोटिक्स चा वास तुमच्या सामानात पस्तीस ते चाळीस दिवस टिकून रहातो. आणि कुत्र्यांना तो ओळखू येतो.
पण त्या नंतर कानाला खडा लावला. भांग या विषयावर कोणाशीही बोलायचे नाही ठरवले
3 Jun 2022 - 9:37 am | ज्ञानोबाचे पैजार
अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवु नये हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.
पैजारबुवा,
3 Jun 2022 - 9:53 am | योगी९००
वाचलात थोडक्यात..
परदेशातच काय पण कुठेही थोड्याफार ओळखीने कुणावरही विश्वास ठेवायचा नसतो. अगदीच जर मदत करावी वाटली तर बॅग उघडून त्यात काय सामान आहे ह्याची खातर जमा करून घ्यावी.
त्या बॅग मध्ये शस्त्र किंवा ड्रग असते तर तुम्ही नक्की अडकला असतात. उर्मिलाच्या "एक हसिना थी" ह्या चित्रपटात असेच दाखवून तिला अडकवण्यात आलेले दाखवले होते.
बाकी तुमची लेखनशैली आवडली. किस्सा शेअर करून इतरांना सावध केल्याबद्दल धन्यवाद.
3 Jun 2022 - 10:14 am | कर्नलतपस्वी
सैनिकांना एतद्देशीय आणी परदेशी दोघांकडून सावध रहावे लागते. लुटपाट किंवा मुखबिरी.
3 Jun 2022 - 11:12 am | तर्कवादी
जपानी विद्यापीठाच्या ऑफिसने तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्हाला सहकार्य केले,धीर दिला हे महत्वाचे. पाश्चात्य देशात अशा प्रकारे सहजपणे सहकार्य मिळाले असते का याबद्दल शंका वाटते.
बाकी नेहमी सावधगिरी बाळगणे योग्यच. सहज कुणावर विश्वास टाकणे जोखमीचे असू शकते. एकवेळ पदरचे काही पैसे बुडालेत तर ते नुकसान सहन करता येते पण इतर आफत नको..
बाकी लेखन चांगलं आहे. अधिक अर्थपुर्ण शीर्षक देता आले असते.
3 Jun 2022 - 12:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
एकदम डोळे उघडणारा अनुभव. कोणालातरी मदत करण्याच्या फंदात पडुन तुमचे मात्र ३-४ महीने उगाच तणावात गेले. विद्यापीठाने तुमची बाजु सांभाळुन घेतली हे मात्र बरे झाले.
3 Jun 2022 - 12:09 pm | श्वेता व्यास
आपण एखाद्याला मदत म्हणून काही करायला जातो आणि आपल्यालाच त्याचे परिणाम भोगायला लागतात. छान अनुभवकथन, आवडले.
3 Jun 2022 - 12:56 pm | गवि
बापरे. फारच वाईट अनुभव. परदेशात तर असे काही फारच तणावकारक ठरते. आपल्या देशात किमान आपल्याला काहीतरी सिस्टीमची ओळख तरी असते. शिवाय अशा प्रसंगामुळे तो देश किंवा ते ठिकाण यांच्याशीच अप्रिय आठवणी जोडल्या जात असाव्यात.
एकूण विश्वास ठेवणे हे तीस चाळीस वर्षांपूर्वी जितके सहज होते तसे आता उरले नाही हे नक्की. पूर्वी लहान मुलेही शेजारी किंवा कोणाच्या घरी सहज सोडली जात असत. एकमेकांकडे हक्काने काही ठेवायला देत, उसने नेत.. गावी, परदेशी जाताना कोणाचेही डबे, पदार्थ, वस्तू पोचवल्या जात. कोणालाही फार खोलात चौकशी न करता आसरा दिला जाई. स्टेशनात सामानाकडे जरा लक्ष ठेवा असे वरकरणी सभ्य दिसत असलेल्या अनोळखी व्यक्तीलाही सांगितले जाई.
आता सर्वत्र सावधानता दिसते.
26 Aug 2022 - 11:55 pm | चेतन सुभाष गुगळे
सूर्यकांत - जयश्री गडकर - राजशेखर यांचा साधी माणसे हा चित्रपट किती जुना आहे? मीच ३५ वर्षांपूर्वी पाहिला आहे. त्यात असेच दुसर्यावर विश्वास ठेवल्याने काय अनर्थ ओढवतो हे दाखविले आहे.
तेव्हाही विश्वास टाकला की गळा कापला जाण्याची बरीच शक्यता असायची पण आजच्या सारखी संवाद सुलभता नसल्याने या बातमा इतरापर्यंत पोचत नसत आणि अर्थातच त्यामुळे फसवणूक करणार्यांची अजुनच चंगळ व्हायची. आता जसे ऑनलाईन फ्रॉड होतात तसे त्याकाळी गणिती कोडे भरुन द्या रेडिओ / टेपरेकॉर्डर बक्षीस देऊ टाईपचे फ्रॉड होत. जालंधर, लुधियानाचा पत्ता असायचा.
3 Jun 2022 - 2:05 pm | Bhakti
महाविद्यालयीन प्रशासनाने तुमची मदत केली,हे चांगले.
3 Jun 2022 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली
असे किस्से अजून येऊद्या.
3 Jun 2022 - 11:33 pm | सौन्दर्य
सावधगिरी ही सर्वत्र घेतलीच पाहिजे. ज्याला कुणाला दुसऱ्याला गोत्यात आणायचे असेल त्याच्याकडे हजारो मार्ग असतात.
मुबईहून अयोद्धेयला जायला (की आणखी कुठे हे फारसे आठवत नाही) एक अवध एक्सप्रेस नावाची गाडी होती. ही गाडी मुंबईहून रात्री साडे आठला सुटायची व बडोद्याला सकाळी पाच वाजता पोहोचायची. ह्यात खूपसे गुजरातचे प्रवासी असायचे. रात्री गाडी सुटली की खूपशी मंडळी जेवणाचे डबे सोडायची व जेऊन झाल्यावर निजायची. ह्या गाडीत भामटे एखादं सावज हेरून त्याच्याशी मैत्री करायचे व जेवताना आपले अन्न त्याच्याशी वाटून खायचे. ह्या भामट्यांनी त्या अन्नात गुंगीचे औषध मिसळलेले असायचे, ते खाऊन असा बेसावध प्रवाशी बेशुद्ध पडला की त्याचे सगळे सामान घेऊन मधल्याच कोणत्यातरी स्टेशनवर उतरून पसार व्हायचे. माझ्या माहितीप्रमाणे दररोज एखादी तरी अशी केस रेल्वे पोलिसांकडे यायची. पोलिसांनी डब्यातला पहारा वाढवला तेंव्हा कुठे अश्या घटना कमी झाल्या. ह्या गाडीला 'बेभान एक्सप्रेस' असे टोपण नाव तेंव्हा पडले होते.
विमान प्रवासात भरपूर खबरदारी घेणे अटळ आहे. विमानातील एखादा सहप्रवासी किंवा मधल्या एखादया स्टॉप ओव्हर मध्ये भेटलेला सहप्रवासी तुम्हाला गोत्यात आणू शकतो आणि जर ही घटना दुसऱ्या देशात घडली तर मग तुमच्या हालाला पारावरच उरणार नाही. कित्येक वेळा भिडस्त स्वभावामुळे किंवा 'ह्यात काय झाले ?' अशा बेपर्वाईमुले देखील त्रास होती शकतो, त्यामुळे 'सुरक्षा हटी, दुर्घटना घटी' हे चिरंतर सत्य आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवासात बॉम्ब, गन, टेररिस्ट असले शब्द सुद्धा उच्चारू नयेत कारण कुठे मायक्रोफोन्स असतील, किंवा साध्या कपड्यातला सुरक्षा अधिकारी वावरत असेल हे सांगता येणं कठीण आहे. माझ्या बाबतीतीला एक किस्सा लवकरच सांगेन.
4 Jun 2022 - 6:47 am | कंजूस
नवख्या माणसाला यामुळे गोत्यात यावे लागते. अगोदर कुणी किस्से सांगितले असले तर साशंक राहू शकतो.
रेल्वे प्रवासाचेही असे आहे.
4 Jun 2022 - 5:57 pm | तुर्रमखान
असल्या मदती (एखाद्या गोष्टीची जबाबदारी [लायबलिटी] घेणे किंवा आर्थिक वगैरे) करताना ओळख किती चांगली (ती व्यक्ती आपल्याबरोबर किती चांगली वागते) आहे त्यापेक्षा ती किती जुनी आहे ते बघावं. हॉस्टेल मध्ये किंवा फेसबुक्/वॉट्सअॅप गृपमधून ओळख झालेले काहे लोक अचानकच चांगले वागू लागले की हल्ली शंका येते.
5 Jun 2022 - 12:13 pm | योगी९००
एक वेगळाच अनुभव फार पुर्वी, म्हणजे २० वर्षापुर्वी आला होता. तो मिपावर एका वेगळ्या टॉपिकच्या धाग्यात लिहीला होता. तो इथे थोडक्यात टाकतो.
दिल्लीवरून मुंबईला राजधानीतुन येताना आम्ही एकाच कुपेतील सहप्रवासी छान गप्पा, विविध विषयांवर वादावादी असे करून छान प्रवास केला. जेव्हा गप्पा मारायचो तेव्हा बाजूच्या कुपेतला एक चाळीशीतला माणूस आमच्या इथे यायचा व प्रत्येकाकडे निरखून पहायचा. नंतर त्याने प्रत्येकाचा नंबर घेतला होता. हा प्रवास झाल्यावर ३-४ दिवसांनी त्याने मला फोन करून घरी मी एकटाच आहे, या जेवायला अश्या टाईपचे आमंत्रण दिले. त्याचा उद्देश वेगळा होता. त्यानंतर प्रवासात कुणाला फोन नंबर द्यायचे शक्य तो टाळतो.
हा किस्सा डिटेलमध्ये खालच्या धाग्यात लिहीला आहे.
https://www.misalpav.com/node/5288
5 Jun 2022 - 1:42 pm | अमरेंद्र बाहुबली
हे असले अनूभव मलाही आलेत. मित्रांना सांगीतले तर प्रत्येकाला कधीना कधी असा अनूभव येऊन गेलाय कळाले.
5 Jun 2022 - 12:39 pm | चौथा कोनाडा
ढुंगणघामफोडू थरारक अनुभव !
तुमच्या तणावाची कल्पना आली, नशिब काही वाईट झालं नाही !
मस्त लिहिलंय, येऊ द्यात असे किस्से, नाहीतरी मिपा बर्याचदा मोनोटोनस होतं !
6 Jun 2022 - 12:13 pm | नचिकेत जवखेडकर
कुमार सर, ज्ञानोबाचे पैजार, योगी, विजुभाऊ, कर्नलतपस्वी, तर्कवादी, राजेंद्र मेहेंदळे, श्वेता, गवि, भक्ती, अमरेंद्र बाहुबली, सौंदर्य, कंजूस, तुर्रमखान,चौथा कोनाडा सर्वांचे आभार.
24 Aug 2022 - 7:09 am | जेम्स वांड
तुम्ही ताण घेण्याची खरंच गरज नव्हती सर, असे मला वाटते.
27 Aug 2022 - 8:59 am | धर्मराजमुटके
ताण नव्हे तान. ( शब्दाला पुरावा हवा असेल तर प्रा. डॉ. बिरुटे आणि उजवे यांच्यातील मिपावरील कोणतीही चर्चा उघडून पाहणे. :)
बाकी वाक्याशी सहमत !
27 Aug 2022 - 11:18 am | Trump
ताण शब्द बरोबर आहे.
तान म्हणजे गायकाची तान.
------------------------
https://www.shabdkosh.com/hi/dictionary/marathi-english/%E0%A4%A4%E0%A4%...
ताण
तणाव (Stress) हा एक मानसिक अवस्थेची व्याधी आहे. कोणताही प्रसंग अथवा प्रासंगिक बदलाला दिलेला नकारात्मक शारीरिक व भावनिक प्रतिसाद म्हणजे 'तणाव' होय. मनातील अनावश्यक व नकारात्मक विचारांच्या गर्दीमुळे मनाची जी स्थिती होते तिला `तणाव' असे म्हणतात. एखाद्या परिस्थितील मागण्या व उपलब्ध साधनसामुग्री यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने शरिराची जी अवस्था होते तिला तणाव असे म्हणतात. परिस्थितीत अचानक बदल झाल्यामुळे अशी अवस्था निर्माण होते. तणाव शारीरिक अथवा मानसिक असू शकतो.
27 Aug 2022 - 5:51 pm | धर्मराजमुटके
तुम्ही वाक्याच्या शेवटी दिलेली स्मायली पाहायचे विसरला वाटते. असो.
प्रा. डॉ. नेहमी अशीच शब्दरचना करतात म्हणून आम्ही एक प्रयत्न करुन बघीतला. असो.
24 Aug 2022 - 12:27 pm | शाम भागवत
अरेच्या हे वाचलेच नव्हते.
खरंच. ताण येण्यासारखीच गोष्ट होती. घरी कळवले नाहीत ते बरेच केले. त्यांनाही ताण आला असता व त्यांनी तुमच्या प्रेमापोटी त्याबाबत तुमच्याकडे चौकशा चालू ठेऊन प्रश्न जिवंत ठेवला असता.
असो. तुमचा भोग तुम्ही भोगून संपवलाय. त्यामुळे तुमची कुंडली तेवढी साफ झालीय.
:)
27 Aug 2022 - 8:37 am | ॲबसेंट माइंडेड ...
छान किस्सा.
2 Sep 2022 - 8:25 am | टर्मीनेटर
हा लेख वाचनातुन सुटला होता! 'एक किस्सा' अशा शिर्षकाचे अनेक लेख मिपावर आले असल्याने जुना लेख वर आला असावा अशा समजुतीतुन कदाचित उघडला गेला नसेल.
मिपावर लिखाणाचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला आहे. लेखातला किस्सा आवडला 👍
16 Sep 2022 - 2:15 pm | नचिकेत जवखेडकर
जेम्स वांड, धर्मराज मुटके, ट्रम्प, शाम भागवत, अबसेन्ट माईंडेड,टर्मिनेटर सर्वांचे आभार! वेळ काढून प्रतिक्रिया दिल्याबद्दल :)