कशाला?

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
28 Apr 2009 - 11:23 am

कशाला?

नि:शब्द भावनांचे इमले फुका कशाला?
नसतेच अमृताची गोडी कधी विषाला

या भाबड्या जिवाला केलेस तू निराश
ऐश्वर्य अन् सुखाची सुरई तुझ्या उषाला !

जाणून घेतले कां कधी सांग प्रेम माझे?
नांदीशिवाय सांग , ही सांगता कशाला?

काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास
बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला?

हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा
फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला?

कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी?
शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला?

जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास
मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला?

ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या
ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

चन्द्रशेखर गोखले's picture

28 Apr 2009 - 11:30 am | चन्द्रशेखर गोखले

कधी वाचशील का गं , तू आर्त ही कहाणी?
शब्दांत गुंफलेल्या कविता इथे कशाला?

जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास
मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला?
या ओळी खुपच भावल्या.. अतिशय भावस्पदर्शी कविता मनापसुन आवडली..!!

उदय सप्रे's picture

28 Apr 2009 - 11:43 am | उदय सप्रे

तुमच्यासारख्याकडून वाहवा मिळणे म्हणजे .....

"मल्लिका शेरावत ने "पद्मा खन्ना च्या कपड्यात डान्स आयटम करायची" अभिलाषा मनी बाळगली असतां तिला चक्क "हेलन" चे स्किन कलरचे "तंग" कपडे घालून भावस्पर्शी कॅबरे करायला मिळणे" .....

असेच झाले (हसून घ्या ! गैरसमज नको हां साहेब प्लीज् !)

अतिशय आभारी आहे....कविता २६ वर्षांपॉर्वीची आहे.....मी १२ वी पास(?) झाल्यावरची.....

बेसनलाडू's picture

28 Apr 2009 - 11:51 am | बेसनलाडू

प्रत्येक दोन ओळींमधला विरोधाभास छान जमलाय. पण एकंदर कविता वाचून शब्दांत न सांगता येण्यासारखी काही विचित्र भावना/मन:स्थिती झाली.
(विचित्र)बेसनलाडू

उदय सप्रे's picture

28 Apr 2009 - 12:07 pm | उदय सप्रे

म्हणजे , नीट जमली नाहिये भट्टी असं म्हणायचंय का मित्रा?

बेसनलाडू's picture

28 Apr 2009 - 12:29 pm | बेसनलाडू

तुमच्या लेखनाची जमली की नाही नक्की सांगू शकत नाही; पण माझ्य आकलनाची जमली नाही, हे नक्की. म्हणजे कविता कळली; पण ती वाचून, समजून मला 'कसे वाटले' (बरे वाटले, चीड आली, वाईट वाटले इ. प्रकारच्या भावना) हे नीट/शब्दांत सांगता येत नाहीये.
(सुस्पष्ट)बेसनलाडू

ठीक तर्....म्हणजे कवी सरखे तुम्ही पण अस्वस्थ झालात तर !

सागर's picture

28 Apr 2009 - 12:43 pm | सागर

उदय मित्रा,

सगळीच कविता मनाला भावते.
पण मला पुढील २ ओळी प्रकर्षाने भावल्या...

अगदी अप्रतिम शब्दांची मांडणी

काळीज पत्थराचे , चेहेरा जरी झकास
बेशर्म त्या जिवाचा शृंगार हा कशाला?

हृदयांत कंडलेल्या भावनांचा निखारा
फुकतोय येथ आता , राखेमधे कशाला?

अप्रतिम... असेच छान लिहित रहा... :)
- सागर

अवलिया's picture

28 Apr 2009 - 12:46 pm | अवलिया

जे एकदांच मरती , त्यांच्या परी उदास
मी सारखाच मरतो , अश्रू मला कशाला?

ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या
ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला !

++++

--अवलिया

प्रमोद देव's picture

28 Apr 2009 - 1:10 pm | प्रमोद देव

मस्त आहे कविता!

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

प्राजु's picture

28 Apr 2009 - 7:23 pm | प्राजु

ढाळू नकोस आता अश्रू मढ्यावरी या
ते पेलणार नाही , आता , सखे खिशाला

हे खूपच छान जमले आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अमोल केळकर's picture

28 Apr 2009 - 7:34 pm | अमोल केळकर

मस्त
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

क्रान्ति's picture

28 Apr 2009 - 7:43 pm | क्रान्ति

पहिलाच शेर अगदी भन्नाट! सगळी कविता तर मस्तच.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

उमेश कोठीकर's picture

28 Apr 2009 - 9:11 pm | उमेश कोठीकर

अप्रतिम. बाकी शब्दच नाहीत.