अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.
डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.
चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.
ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :
डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती त्यांची शुद्ध हरपली होती.
पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी सरकारने दिलेले वकील नाकारून स्वतःच आपली बाजू मांडली. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.
एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.
हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.
दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.
मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.
दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.
विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.
इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.
विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !
दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले (The other Dr. Gilmer).
पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.
दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल. त्यांनी विन्स यांचे कायदेशीर पालकत्व मिळावे यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
( डॉ. बेंजामिनच्या हातातील फोटोमधले विन्स आहेत).
…………
आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.
२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी एखादा वरवर जरी जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
३. खुनाचे कृत्य पूर्वीच झालेले आहे. नंतर HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
प्रतिक्रिया
21 Apr 2022 - 4:47 pm | श्वेता२४
फारच वेगळी व रोचक माहिती.
21 Apr 2022 - 6:06 pm | आनन्दा
HD सदृश किंवा HD च असेल, एका नातेवाईकांच्या संदर्भात अनुभवलेला आहे..
त्यांचा मुलगा 1 वर्ष अक्षरशः दडपणाखाली जगात होता. माणूस प्रचंड हिंसक होतो, आणि त्याच्या हातून खून व्हायची अहक्यात प्रचंड वाढते, कारण बहुधा भावनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या पेशी पहिल्यांदा निकामी होतात.
21 Apr 2022 - 6:17 pm | चौथा कोनाडा
अतिशय रोचक कहाणी !
डॉ बेंजामिन यांनी विन्सच्या प्रकरणात स्वतःला इतके खोल गुंतवून घेतले हे थक्क करणारे आहे !
संतोष माने या एसटी ड्रायव्हरने अपघात करून नऊ जणांचे बळी घेतले हे आठवलं. मला आठवतंय त्यानुसार त्याच्याही मानसिक अवस्थेवर बरेच संशोधन केले होते.
21 Apr 2022 - 6:24 pm | कुमार१
१. फारच वेगळी माहिती >>> +१
मीदेखील ती वाचल्यावर सुन्न झालो. म्हणून लिहीली
.....
२.
,>>>
शक्य आहे. अर्थात समाजातले याचे प्रमाण बरेच कमी आहे
.....
३.
>>>
होय, चांगली लक्षात आहे ती घटना.
भयानक होती.
21 Apr 2022 - 9:25 pm | आनन्दा
मी त्यावेळेस जेव्हढे ऐकले त्यानुसार -
या रुग्णांना रागावर ताबा ठेवता येत नाही. आपल्याला राग आला की आपला मेंदू त्या रागाची किंमत ठरवतो.. म्हणजे समोरच्याला कानाखाली द्यावी असे कितीही वाटत असले, तरी त्याची सामाजिक किंमत आणि अन्य बरेच पैलू लक्ष्यात घेऊन मेंदू निंर्णय घेतो.
यांच्या बाबतीत असले काही होत नाही.
घरातला फोनवर ऐकू येत नाहीये, मला वाटतंय फोन फोडून टाकावा.. ok, आणला दगड आणि घातला फोनवर, असा मामला असतो.
फोनच्या जागी एखादा माणूस जरी असेल तरी फारसा फरक पडत नाही, कारण आपल्या कृत्याची भविष्यात काय किंमत असेल हा विचार करायचाच नसतो.
संतोष मानेच्या बाबतीत मला तसे वाटलेले नाही, तो कदाचित नैराश्यात असेल, पण HD असेल असे वाटत नाही. HD वाले स्वतःच्या हाताने क्रूर कृत्य करतात. संतोष मानेने तसे स्वतःच्या हाताने काही केले नव्हते, तो अपघातच होता असे माझे मत आहे
21 Apr 2022 - 7:16 pm | कर्नलतपस्वी
भारतीय द्रुश्टिकोनातून- -मानसीक आजार हा लवकर समझत नही,समजल्यावर समाज स्विकारत नाही, भोदू बाबा ,तान्त्रिक यान्च्याकडे पहिल्यान्दा लोक जातात. उपचार योग्य न झाल्याने रोग बळावतो. भारतिय दन्ड्विधाना नूसार आशा लोका कडून जर वेडाच्या भरात काहि गुन्हा घडला तर सहान्भुतीपूर्वक विचार करण्याचे प्रावधान आहे. वकील लोक याचा गैरफयदा घेण्याचा प्रयत्न करतात.
लेख माहितीपुर्ण आहे धन्यावाद.
21 Apr 2022 - 9:59 pm | भीमराव
संतोष माने प्रकरणात वरिष्ठांनी कनिष्ठ लोकांवर गुलाम असल्यासारखे दबाव टाकत राहणे हा प्रकार पद्धतशीरपणे दडवण्यात आला होता, पिळवणूक हा प्रकार धडधाकट माणसाला हिंस्र बनवु शकतोच की. त्याला मानसिक रोगी असण्याची गरज नाही.
25 Apr 2022 - 12:48 pm | चौथा कोनाडा
- - - - - - - - वर्षांनुवर्षेची साचून राहिलेली पराकोटीची तिडीक !
22 Apr 2022 - 5:09 am | कुमार१
*१.उपचार योग्य न झाल्याने रोग बळावतो. >>+१११
योग्य त्या तज्ञाचा सल्ला घेणे ही फार महत्त्वाची पायरी असते.
....
*२.पिळवणूक हा प्रकार धडधाकट माणसाला हिंस्र बनवु शकतोच की>>>
चांगला मुद्दा. सहमत
22 Apr 2022 - 8:35 am | sunil kachure
काही गुन्हे हे प्लॅन करून थंड डोक्याने केलेले असतात.कोणताच द्वेष किंवा राग नसतो.
जसे कॉन्ट्रॅक्ट किलर ,किंवा आर्थिक किंवा बाकी कोणत्या तरी फायद्यासाठी.
पण काही गुन्हे ठरवून केलेले नसतात.अचानक असा प्रसंग घडतो आणि माणूस रागाने बेभान होतो.आणि त्याच्या हातून खून होतो.
तेव्हा पण माणसाची मानसिक स्थिती मानसिक विकार असणाऱ्या व्यक्ती सारखीच असते.
त्याला ह्याचा काय परिणाम होईल ह्याचे भान थोडा वेळ नसते.
ही जी मानसिक स्थिती थोड्या वेळासाठी निर्माण होते.
आणि मानसिक विकाराने जी मानसिक स्थिती निर्माण होते ह्या मध्ये काय फरक आहे.
मेंदू मध्ये दोन्ही प्रकारात एक सारख्याच रासायनिक घडामोडी होत असाव्यात का?
रागाच्या भरात केलेले कृत्य ह्याच्या कडे पण कायदा वेगळ्या नजरेने बघतो असे ऐकून आहे
22 Apr 2022 - 8:42 am | कुमार१
*थोड्या वेळासाठी निर्माण होते.
आणि मानसिक विकाराने जी मानसिक स्थिती निर्माण होते ह्या मध्ये काय फरक
>>>>
यासंबंधीचे सविस्तर विवेचन मी या धाग्यावरील लेखात
https://www.misalpav.com/node/49952
'विरेचन आणि समाजविघातकता' या परिच्छेदात केले आहे
22 Apr 2022 - 9:53 am | तुषार काळभोर
असे टोकाचे हिंसक गुन्हे, सिरियल किलर्स अशा गोष्टी अमेरिकेतच जास्त का होतात? आपल्याकडेच नाही, तर इतर आशियाई देश आणि अगदी युरोपात देखील अशा गोष्टी कमी दिसतात.
की हे सिलेक्टीव बायस आहे? १) अमेरिका हा मोठा देश आहे आणि २) तेथील प्रसारमाध्यमे जगभरात सर्वाधिक वाचली/पाहिली जातात, म्हणून अमेरिकेतील अशा गोष्टी जास्त प्रसिद्ध होतात? बाकी जगातसुद्धा अशा गोष्टी होत असतील आणि त्या तितक्याशा चर्चिल्या जात नाहीत, असे असू शकते का?
22 Apr 2022 - 10:16 am | कुमार१
मला
तेथील प्रसारमाध्यमे जगभरात सर्वाधिक वाचली/पाहिली जातात, म्हणून अमेरिकेतील अशा गोष्टी जास्त प्रसिद्ध होतात?
हा मुद्दा अधिक योग्य वाटतो.
आता अशा प्रकरणावर पुस्तक लिहिले जाणे, त्याचा गाजावाजा होणे. व त्याच्या प्रती राज्यपालांच्या कार्यालयात वाटल्या जाणे या बाबतीत ते लोक आघाडीवर दिसतात.
....
हिंसा ही मूलभूत मानवी प्रवृत्ती आहे. आपल्यातील प्रत्येकात ती दडली आहे.
कोण किती टोकाला जातो हाच काय तो फरक
3 May 2022 - 9:36 pm | मुक्त विहारि
हे आपल्या देशातील उदाहरण ....
4 May 2022 - 7:10 am | तुषार काळभोर
आपल्या इथे गावित मायलेकी आणि डॉ संतोष पोळ ही उदाहरणे आहेत की. पण अगदी यादी काढली तरी भारतात जेवढी उदाहरणे असतील तेवढी अमेरिकेच्या एकेका राज्यात असतील. आपल्यापेक्षा दुप्पट आकार आणि तिप्पट कमी लोकसंख्या असून.
22 Apr 2022 - 10:14 am | टर्मीनेटर
लेख आवडला 👍
22 Apr 2022 - 10:22 am | गवि
मानसिक आजारांबद्दल कितीही सहानुभूति बाळगली, आणि ती असावीच, तरी कोणत्याही कारणाने एखादी व्यक्ती अचानक कोणा इतराची हत्या करु शकते हे सिद्ध झालेले असताना त्याचे समाजापासून आयसोलेशन अपरिहार्य ठरते, ठरावे.
ते तुरुंगात की उपचार केन्द्रात ही चर्चा मात्र संभवते. उपचार केन्द्रे तुरुंगाइतकी अभेद्य, बन्दिस्त असतील तर ते शक्य आहे. तुरुंगातच एक वेगळा विभाग ठेवणे हाही पर्याय असू शकतो. तिथेच उपचार करता येईल. सश्रम कारावास न देता पेशंटप्रमाणे वागणूक देता येईल.
मात्र समाजात सामान्यपणे मिसळू देणे हे तर्कात बसत नाही. त्याने पुढे असेच प्रसंग (गुन्हा शब्द टाळला आहे) पुन्हा घडू नयेत हा न्यायसंस्थेचा एक मूळ उद्देशच बाधित होतो.
आणखी एक. या लेखात वर्णन केलेय त्यावरुन त्या रुग्ण डॉक्टरला संधीच दिली गेली नव्हती असं ध्वनित होतंय. त्याला आजाराच्या कारणाने डिफेंस मागण्याची संधी मिळाली होती. वेळोवेळी ते अपील नाकारले गेले. यात परीक्षक डॉक्टर, राज्यपाल आणि सर्व न्यायव्यवस्थेने अक्षम्य वेळ घेतला असेल, पण म्हणून या वैद्यकीय पैलूवर विचार न करताच त्यांनी अपील धुडकावले असे गृहीतक जाणवते.
भारतात तरी अनेक केसेसमधे मानसिक / मनोशारीर आजार / शारिरीक आजार यांचा आधार घेत अपिले होऊन अनेक गुन्हेगारांना सवलत मिळाली आहे. किमान तसे परीक्षण होण्याची संधी मिळाली आहे. कारण जवळपास प्रत्येक वकील हा मेडिकल कारणाचा पैलू हमखास विचारात घेतच असतो. अगदी अतिरेकी हल्ल्यांतही मानसिक अस्वास्थ्य हे पेटण्ट कारण डिफेन्स साईडने दिलेले असते.
बाकी विषय रोचक आहे यात शंकाच नाही.
22 Apr 2022 - 10:33 am | कुमार१
*ते तुरुंगात की उपचार केन्द्रात ही चर्चा मात्र संभवते.
>>>>
यासंदर्भात मी एका मेंदूविकार तज्ञांशी ऑनलाइन संपर्क साधला. त्यांनी एका जवळच्या HDरुग्णाची दीर्घकाळ सेवा केली होती. शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण कसे होतात याचे वर्णन त्यांनी असे केले,
" त्यांची चाल बघवत नाही. वळवळणाऱ्या सापासारखे शरीर हलत असते. अवस्था इतकी दयनीय असते की हा शब्द सुद्धा सौम्य वाटावा. आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ती विकलांगता असते. अशा रुग्णांची देखभाल करण्यासाठी विशेष HDप्रशिक्षित व्यक्तीच लागतात; सामान्य परिचारिका चालत नाही. रुग्णाला मनापासून समजून घेणे हा यातला खूप कठीण भाग असतो".
….
अशा स्थितीत तुरुंगातल्या रुग्णाची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी. भारत किंवा अमेरिके सारख्या मोठ्या देशांमध्ये जिथे तुरुंग अगदी भरलेले असतात तिथे व्यक्तिगत काळजी कितपत घेतली जाईल याबाबत शंका वाटते.
22 Apr 2022 - 10:39 am | कुमार१
>>>
लेखातील हे पहा:
पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी सरकारने दिलेले वकील नाकारून स्वतःच आपली बाजू मांडली.
आरोपीच्या बाजूने वकील नाही म्हटल्यावर फिर्यादी पक्ष एक प्रकारे वरचढ होतोच. तसेच आपल्या वडिलांनी लैंगिक छळ केला या निव्वळ विधानाला अर्थ राहत नाही. यासाठी पूर्वी कधीतरीचे वैद्यकीय दाखले वगैरे सादर करणे अपेक्षित असते. हे तसे कटकटीचे असल्यामुळे आरोपीचा हा मुद्दाही दुबळा पडतो.
22 Apr 2022 - 10:47 am | गवि
पण, खालील दोन मुद्दे लेखात डिस्काउंट होताहेत असे भासले.
मनोविकार तज्ञ, राज्यपाल हे एकेकटे विचार करत असतील असे गृहीतक आहे. शरीरतज्ञ डॉ चा सल्ला घेतलाच गेला नसेल हे गृहीतक आहे. अनेक मनोविकार शारिरीक व्याधिमुळे असू शकतात हे मनोविकार तज्ञाला माहीतच नसेल का?
शिवाय वकील नाकारणे हा सक्तीचा भाग नव्हता. I just mean, we should be fair with justice system too.. हे नवे बेन्जामिन डॉक्टरच काय ते या बाबतीत सर्वज्ञ किंवा प्रथमच या शक्यता पडताळणारे, असे नसावे.
22 Apr 2022 - 11:02 am | कुमार१
>>>
अगदी बरोबर किंबहुना त्यांना प्रकर्षाने वाटले की आरोपीला पुरेशी संधी दिली गेलेली नाही आणि त्याच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून त्यांनी यात उडी घेतलेली दिसते.
पहिले राज्यपाल त्यांच्या निर्णयावर ठाम होते. म्हणजेच त्यांना न्यायाधीशांचा निर्णय योग्य वाटला असावा.
दुसऱ्या राज्यपालांनी स्वतःचा निर्णय फिरवला हेही बुचकळ्यात टाकणारे आहे.
का फिरवला ? ते स्वतः मेंदू विकार तज्ञ होते म्हणून त्यांच्यावर दडपण आले किंवा त्यांना स्वतःच पुनर्विचार करावा वाटला, हे आपल्याला सांगता येणे कठीण आहे.
22 Apr 2022 - 11:15 am | गवि
शिवाय खुनी कृत्य अत्यंत क्रूर प्रकारे (दोरीने गळा आवळून, वरुन प्रेताची बोटे तोडणे) केले गेलेले दिसते. त्याउपर पुरावा नष्ट करुन शांतपणे पुन्हा कामाला लागणे हे सर्व मानसिक किंवा शारिरीक आजाराच्या "अंमलाखाली" घडून आलेले प्रतिक्रियात्मक कृत्य मानणे अवघड आहे. खटल्यात अनेक पैलूंचा विचार होतो. अबोव्ह ऑल, कोणताही गुन्हा पोटेन्शियली कोणत्यातरी आजाराशी जोडणे तात्विकदृष्ट्या शक्य आहे. त्यामुळे शिक्षेचा प्रकार अथवा तीव्रता यात कमी जास्त केल्यास शिक्षा या प्रकाराचा अर्थ नष्ट होईल.
3 May 2022 - 9:37 pm | मुक्त विहारि
आवडला
22 Apr 2022 - 2:51 pm | कुमार१
या अनुषंगाने HDबद्दलची काही माहिती :
१.लक्षणे सुरुवात होण्याचे सरासरी वय 35 ते 44 च्या दरम्यान असते. अशांमध्ये साधारण मृत्युसमयी त्यांचे वय 51 ते 57 च्या दरम्यान पोचते.
२. मात्र वयाच्या बाबतीत वांशिक भेद बऱ्यापैकी आहेत
३. आजाराच्या एकूण पाच अवस्था आहेत. पाचव्या अवस्थेला पोहोचण्याआधीच मृत्यू झाल्यास रुग्णासाठी बरे राहते
४. बऱ्याच जणांमध्ये न्यूमोनिया आणि हृदयविकार होतात आणि त्यातून मृत्यू होतो
५.जगभरात HDचे प्रमाण बरंच कमी आहे. परंतु व्हेनेझुएलातले प्रमाण लक्षणीय आहे. तिथे दर एक लाख लोकसंख्येमागे 700 जणांना हा आजार होतो. इथल्या दहा पिढ्यामधल्या बाधित सुमारे वीस हजार लोकांची रितसर नोंद झालेली आहे.
2 May 2022 - 8:19 pm | कुमार१
ही अन्य सुन्न करणारी ऐतिहासिक घटना :
कालच्या रवि. सकाळ सप्तरंग पुरवणीतील 'फक्त माझा गुन्हा सांगा' हा लेख वाचण्यासारखा आहे.
थोडक्यात घटना लिहितो:
16जून 1944: दक्षिण कॅरोलिना, अमेरिका
आरोपी : जॉर्ज स्टिनी, वय 14 व कृष्णवर्णीय
आरोप : दोन मुलींचा खून
खटला घाईघाईत उरकला गेला. जॉर्जच्या बाजूने कोणाची साक्ष नाही; त्याला त्याची बाजूही मांडू दिली नाही.
देहांताची शिक्षा फर्मावली आणि विजेच्या खुर्चीतून दिली गेली.
सन 2004 : तोच खटला न्यायालयीन पुनरावलोकनासाठी घेण्यात आला.
तो दहा वर्षे चालला
2014 मध्ये जॉर्जला दोषमुक्त ठरविण्यात आलं आणि शिक्षा माफ करण्यात आली !!
3 May 2022 - 9:44 pm | मुक्त विहारि
पहिली शंका... तैमुर लंग, हा पण अशा आजाराने ग्रस्त असावा का?
असे असेल तर, अशा मानसिक रुग्णांच्या हातात, सत्ता आली तर, त्याचे समाजाला वाईट परिणाम भोगायला लागतील...
दुसरी शंका अशी की, हा आनुवंशिक आजार असू शकतो का?
3 May 2022 - 10:12 pm | कुमार१
.
होय, असतो.
त्यांचे वडील किंवा आई या दोघांपैकी एकाला जरी हा आजार असेल तर तो त्यांच्या मुलांपैकी काहींना होऊ शकतो.
या अनुवांशिकतेच्या प्रकाराला डॉमिनंट असे म्हणतात.
....
अन्य शंका व दुसरा मुद्दा उद्या सविस्तर घेतो
4 May 2022 - 8:41 am | कुमार१
>>
खरं आहे. इतिहासात अशी काही उदाहरणे घडलेली आहेत. इंग्लंडचा राजा जॉर्ज-3 याच्या बाबतीत अशा बऱ्याच वदंता आहेत.
त्याने त्याच्या कारकीर्दीत बराच चक्रमपणा केला. तो कित्येकदा स्वतःला राजवाड्यात कोंडून घेई. त्याने आपल्या सल्लागारांचे न ऐकता बरेच निर्णय विचित्र पद्धतीने घेतले. अमेरिकी क्रांतिकारकांच्या बरोबरचे युद्ध त्याने दीर्घकाळ चिघळत ठेवले. त्याच्या असे वागण्यामागे एक अनुवंशिक आजार असावा असा तज्ञांचा कयास आहे. आपल्या लाल पेशींमधील हिमोग्लोबिन निर्मितीत बिघाड होणारा तो आजार असतो. अर्थात त्या काळी अशा आजारांची खात्री करणाऱ्या चाचण्या वगैरे उपलब्ध नव्हत्या.
…
तैमुर लंगबद्दल कल्पना नाही.
14 May 2022 - 10:42 am | कुमार१
एक विचार करण्याजोगा लेख :
शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’
30 May 2022 - 4:14 pm | कुमार१
गेल्या आठवड्यात अमेरिकेत शालेय मुलांवर एका व्यक्तीने बेधुंद गोळीबार करून हत्याकांड केल्याची घटना घडली. या प्रकारच्या घटना जगभरात अधून-मधून घडत असतात.
यासंदर्भात संबंधित खुनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास होत असतो. समूह हत्याकांडाच्या एकूण घटनांपैकी किमान एक तृतीयांश घटनांमध्ये खुनी व्यक्ती गंभीर मनोविकारग्रस्त असल्याचे दिसते.
अर्थात हा विषय व्यापक असून त्याला इतर अनेक पैलू आहेत.
9 Jun 2022 - 9:19 pm | कुमार१
मागचे प्रकरण थंड होत नाही तर अजून एक घटना ओकलाहोमा राज्यात घडलेली आहे.
Michael Lewis या व्यक्तीने AR-15 अशी संहारक बंदुक वापरून दोन डॉक्टर्स व रूग्णालयातील अन्य दोघेजण यांची हत्या केली आणि लगेच आत्महत्या केली.
दोन डॉक्टरपैकी एक सर्जन होते आणि त्यांनी Michael Lewis ची नुकतीच शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची पाठदुखीची तक्रार होती. निव्वळ एवढ्यावरून त्याने इतके भयंकर कृत्य करावे ?....
8 Jul 2022 - 5:47 pm | कुमार१
आज जपानच्या माजी पंतप्रधानांचे बंदुकीच्या गोळीबारामुळे निधन झाले.
आदरांजली !
त्यासंदर्भात जपान मधील बंदूक धोरण आणि गुन्हेगारी संदर्भातील एक माहितीपूर्ण लेख इथे
वास्तविक जपानमध्ये असे गुन्हे अत्यल्प आहेत
20 Jul 2022 - 7:35 pm | कुमार१
Dr.Ralph Newman हे मनोविकार तज्ञ तुरुंगातील कैद्यांवर उपचार करतात. त्यांना एका जीवघेण्या हल्याला नुकतेच सामोरे जावे लागले.
नॉर्थ करोलीना येथील एका तुरुंगातील कैद्याला पॅरोलवर सोडायचे की नाही हे ठरवायचे होते. त्यासाठी डॉक्टर न्यूमन यांचे वैद्यकीय मत घेण्यात आले. त्यांच्या मते तो कैदी बाहेर पाठव ण्यास योग्य नव्हता. परिणामी त्याचा पॅरोल नाकारला गेला. मात्र तो कैदी त्यानंतर सतत डॉक्टरांचा सूड घेण्याची संधी शोधत होता.
एकदा ते त्यांच्या खोलीत रुग्णांची टिपणी लिहीत बसले होते. तेव्हा या कैद्याने तेल तिथल्या मायक्रोवेव्हमध्ये गरम केले आणि ते कढत तेल घेऊन तो त्यांच्या खोलीत घुसला आणि त्याने डॉक्टरांच्या पाठीवरती तेल फेकले.
डॉक्टरांना जबरदस्त जखमा झाल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी ते त्यातून सावरले.
तुरुंगात काम करणाऱ्या डॉक्टरांना फार सावधगिरी बाळगावी लागते
11 Nov 2023 - 9:36 pm | कुमार१
12 जानेवारी 2022 रोजी विन्स गिल्मरच्या तुरुंगातून मुक्ततेचा आदेश निघाला होता.
पण ..
मार्च 2023 पर्यन्त त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नाही.
डॉक्टर बेंजामिन अमेरिकेतील अनेक रुग्णालयांना सातत्याने विनंती करीत आहेत की त्यांनी या रोगी माणसाला स्वीकारावे. परंतु अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही. सर्वत्र नकारघंटाच ऐकू येते आहे..