काहीतरी चुकतंय.इथेच तर होत ते दार..... इथूनच तर महेश खाली गेला. ....... मला त्या बाजूला कुठलंच दार दिसत नाही..... दार जाऊ दे एखादा कोनाडा चौकट असे काहीच दिसत नाही. अरे हे काय झालं? इथली दगडी चौकट कुठे गेली? अर्धवट उजेडात नीट दिसलं नसेल म्हणून मी पुन्हा एकदा नीट पहातो... भिंत हाताने चाचपून बघतो. हाताने थापट्या मारून बघतो. पण तिथे दार चौकट असं काही असल्याची खूणही नाहिय्ये.
मागील दुवा ध्रांगध्रा - १९ http://misalpav.com/node/49827
अखंड दगडी भिंत आहे त्यावर कोरीव काम केलंय.
आपण कदाचित चुकीची बाजू बघतोय. मी त्याच्या बाजूची भिंत पहातो......अरेच्चा इथे ही तेच. त्या अष्टकोनी दालनाच्या प्रत्येक भिंतीला पहातो. वर जायचा जिनी सोडला तर कुठेच दार नाहिय्ये. मग मघाशी पाहिले ते दार कुठे गेलं,खाली जाणार्या पायर्यावालं? अंधारामुळे कळत नाहिय्ये नीट. कदाचित इथे आपण आलो तोच एक दरवाजा असेल, त्या वर नेणार्या जिन्याचा. महेश वरच गेला असेल. आपणंच काहितरी नादात असू..... मी इकडे तिकडे पहातो. खरंच कुठेच कसलं दार दिसत नाही.सग़अं समोर आहे.पण मनात काहितरी चुकतंय ही भावना येतेय. काय ते नक्की समजत नाही.मी माझीच समजूत काढतो.
मोबाईलची बॅटरी उतरत आलीये. पूर्ण डाऊन व्हायच्या आत बाहेर जायला हवं. मी वर जाणार्या जिन्याकडे येतो. महेश......... मी हाक मारतो. वर गाभार्यात असेल तर ऐकू जाइल त्याला. याही वेळेस मला माझाच प्रतिध्वनी ऐकू येतो. त्या पाठोपाठ ऐकू येतो तो हलकासा गुरगुरात. मांजराचा असावा तसा. त्या पाठोप्पाठ एक जोरदार हुंकार. हु....प्प.... हुप्प्या वानराचा असावा तसा. अंगाचा थरकाप उडतो. हातावरचा केस न केस ताठ उभा राहिलाय. मी धीर एकवटून हातातल्या मोबाईलच्या टॉर्चचा उजेड सभागृहात इकडे तिकडे फिरवतो. एका कोपर्यात काहितरी दिसतय. मांजर असावं बहुतेक. उगाच घाबरलो. मांजराला काय घाबरायचं! मी स्वतःलाच हसतो.
जिन्याच्या दगडी पायर्या चढू लागतो. ते मांजरपण माझ्या मागोमाग येतंय बहुतेक. त्याच्या गुरगुरण्याचा आवाज माझ्या मागून येतोय. मी जिन्याची एक एक पायरी चढतोय. मघाशी उतरताना जाणवलं नाही पण दोन पायर्यातली उंची जरा जास्तच आहे. पायरी चढायला अवघड जातंय. मी वरच्या पायरीवर पोहोचलोय. वरच्या पायरी नंतर पाचसहा फूट सरळ पॅसेज आहे. त्या नंतर चौकटीतून गाभार्यात चौकटीतून जाता येते. त्या चौकटीच्या पलीकडे कोणीतरी उभे आहे. कोणीतरी कशाला .... महेशच असणार तो. मी त्याला समजतोय की तो खाली गेला. हा पठ्ठ्या इथे दिसतोय..... " महेश...." मी जोरात हाक मारतो. काहीच उत्तर येत नाही. हा नक्की महेश आहे?
पण मग याने हे असं धोतर का नेसलंय?
मी चौकटीतून आत गाभार्यात येतो.त्या व्यक्तीला गाभार्यात मधोमध उभा पहातो. तो एक उंच धिप्पाड माणूस आहे. काळं धोतर ठळकपणे जाणवतंय. इथे जरातरी उजेड आहे. तो पाठमोराच उभा आहे.
"ओ दादा... तुम्ही माझ्या मित्राला ... महेशला पाहिलं का?
माझ्या प्रश्नावर तो माणूस वळला आणि सामोरा झाला.
एका क्षणात अंगावरचे सगळे कपडे भिजलेत. जीभ टाळ्याला चिकटलीये. डोळे शक्य असूनही बंद करू शकत नाहिय्ये. घशाला कोरड पडली आहे. छातीचे ठोके कुणीतरी ढोल बडवावा इतक्या मोठ्याने ऐकू येताहेत.
मला समोरा आला आहे त्याला मी झोपेतही ओळखेन. राठ कुरळे केस, गोल वटारलेले रागीट डोळे..... फेंदारलेलं नाक. जाड ओठ त्यातून डोकावणारे मोठे दात......... आत्तापर्यंत फक्त स्वप्नात पाहिलंय तो प्रत्यक्ष समोर उभा आहे.
तो खिरलापखिरला आहे. साडेसहा फूट असेल त्याची उंची.तितकाच आडमाप. हातात रुंद पात्याची तलवार आहे. गळ्यात कसलाश्या मोठाल्या मण्यांची माळ आहे. तो माझ्याकडेच पहातोय.
मी जागेवर थिजलोय. पाऊल जमिनीला घट्ट चिकटलंय. तो माझ्या कडे पहातोय.माझे एनजरही त्याच्या चेहेर्यावर चिकटली आहे.
मला माझ्या मानेवर कसलासा थंड पणा जाणवतो. कसलासा थम्ड ओला स्पर्ष.माझ्या डावी कडे आणि उजवीकडे दोन मांजरे येऊन बसली आहेत. रानमांजरापेक्षा मोठी आहेत. त्यांचे तोंड मात्र माकडासारखे आहे. पाठीच्या कण्यातून बर्फाची लादी फिरवावी तशी शिरशिरी जाते. .... मर्कट व्याळ........ कथापुराणातून ऐकलेला , कधी शिल्पात पाहिलेले प्राणी माझ्या आजूबाजूला जिवंत बसलेत. महेश म्हणत होता ते खोटं नव्हतं.. माझ्या बाजूला बसल्यावर त्यांचं गुरगुरणं थांबलंय.
खिरलापखिरला माझ्याकडे थंड नजरेने पहातोय. त्याची ती नजर मी टाळू शकत नाही.
क्रमशः
प्रतिक्रिया
26 Jan 2022 - 11:08 pm | श्रीगणेशा
वाचत आहे...
26 Jan 2022 - 11:47 pm | निनाद
उत्कंठावर्धक चित्रदर्शी लेखन. वाचतो आहे.
27 Jan 2022 - 1:09 am | निमिष ध.
भारी चालू आहे
27 Jan 2022 - 5:53 pm | चौथा कोनाडा
थरारक वर्णन ! वाचत आहे !
27 Jan 2022 - 9:40 pm | गवि
एक वेगळीच स्टोरीलाईन आहे. चित्तथरारक आहेच आणि चित्रदर्शीसुद्धा. क्रमश:चा दैनंदिन ब्रेक वगळता सर्व रोचक आहे. बघू पुढे काय होते. बाकी दोन्ही हिरो डेरिंगबाज आहेत यात शंका नाही. कधी कधी अवास्तव डेरींग वाटते. पण कथा वास्तव असल्याचा दावा नसल्याने तक्रार नाही.
28 Jan 2022 - 9:12 am | शित्रेउमेश
शब्दच नाहित वर्णन करायला.....
29 Jan 2022 - 12:36 am | विजुभाऊ
पुढील भाग ध्रांगध्रा - २१ http://misalpav.com/node/49836