New Edge Entrepreneurs !
चार समवयस्क, समविचारी मित्र खूप दिवसांनी भेटले की काही टिपिकल गोष्टी घडतात. मित्र पिणारे किंवा न पिणारे दोन्ही असू शकतात. किंवा त्यातले दोघे पिणारे आणि बाकीचे नुसता चखना संपवणारे पण असू शकतात. सगळे नोकरीवाले असले की नोकरीत दहा-पंधरा वर्षे घासून झालेली असते. EMI आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना नाकी नऊ आलेले असतात.दुनियाभराचे टेक्निकल स्किल्स आणि करियर ऍस्पिरेशन्स बाजूला ठेवून आपण केवळ आणि केवळ सर्व्हायवलसाठी खर्डेघाशी करतोय ह्याची जाणिव सगळयांना झालेली असते.
या पार्श्वभूमीवर अधूनमधून मित्रांची भेट ही फार अनिवार्य असते. मित्र भेटतात. शिव्यांची देवाणघेवाण होते. आणि ग्लास भरले जातात.
पहिला पेग :
"खूप टेन्शन आहे यार ऑफिसमध्ये. त्यात बॉस तर इतका च्यु** आहे की काय बोलावं...!
यानंतर बॉस, प्रोजेक्ट आणि संपूर्ण भांडवलशाही यावर एक परिसंवाद होतो. ज्यात अनेक आया-बहिणींना उचक्या लागतात.
दुसरा पेग :
"कंटाळा आला बे नोकरीचा. तेच रुटीन सालं. बीपी-शुगरचा त्रास सुरू झालाय मला ह्या फालतू शेड्युलमुळे"
यानंतर वर्क लाईफ बॅलन्स, तब्येत, आलं-लसणाचा काढा, लेमन टी, मॉर्निंग वॉक,आयुर्वेद, योगासने ह्यावर एक परिसंवाद होतो. आणि तिकडे इंट्युशनमुळे रामदेवबाबांना आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात.
तिसरा आणि निर्णायक पेग :
"काहीतरी स्वतःचा बिझनेस सुरू करायला पाहिजे लेका. या नोकरीत काही अर्थ नाही तुले सांगतो..."
बस्स!! हाच तो क्षण....
आता तिकडे अंबानी-अदानी देव पाण्यात ठेवून बसतील ह्या लेव्हलच्या बिझनेस आयडिया डिस्कस होतात..
--एखादा स्टार्ट -अप सुरू करून स्वतःच प्रॉडक्ट लॉन्च करायला पाहिजे.
-- कन्सलटन्सी सुरू करावी म्हणतो. इतका अनुभव आहे आपल्याजवळ.
-- डिपार्टमेंटल स्टोअर टाकू एखादं. बम्म मार्जिन असते रिटेलमध्ये. मी तर जागापण बघून ठेवलीये.
--अबे त्यापेक्षा दहा देशी गायी विकत घेऊ. एक डेअरी चालू करू. मस्त दूध-तूप वगैरे. आपला पनीरचा ब्रँड आणू मार्केटमध्ये. खूप डिमांड आहे म्हणते.
-- अबे डिमांड तर काजूची पण खूप आहे. हा चकना पाय बरं डिशमध्ये. प्रत्येक बारमध्ये लागतो काजू. काजूची मशिन घेऊ मस्त. जागापण कमी लागते.
-- एवढ्या छोट्या गोष्टीत काही मजा नाही. आपला ब्रँड सुरू करायचा कपड्याचा किंवा ज्वेलरीचा. दोन वर्षात आयपीओ आला पाहिजे मार्केटमध्ये असं टार्गेट ठेवायचं. तरच काही होऊ शकते.
ह्यानंतर एकेका आयडीयावर चर्चा सुरू होते. साधारण गुंतवणूक लक्षात आल्यावर आपलं सेविंग अकाउंट, इएमआय, मुलांची फी वगैरे आकडे डोळ्यासमोर नाचू लागतात. मग एवढं काही आपल्याच्याने शक्य नाही हे लक्षात आल्यावर चर्चेचा रोख बदलतो.
"अबे त्यापेक्षा दोन-दोन लाख रुपये सगळ्यांनी द्या. मी शेयरमध्ये टाकतो. आपला एक मित्र मस्त टिप्स देतो. वर्षभरात पन्नास टक्के तर कुठेच नाही गेले!"
लगोलग आपण घेतलेले penny shares, त्याची आज झालेली माती. सुझलॉन अन येस बँकेत झालेला लाल चिखल अन त्याचे आंगभर उडालेले शिंतोडे सगळ्यांना आठवतात. आणि त्या मित्राच्या प्रोपोझलवर कुणी उत्तरच देत नाही.
ह्यानंतर एक मिलियन डॉलर आयडिया समोर येते.
"एक सांगू का, एखादं ऍप बनवू अन त्यावर प्रॉडक्ट ठेवायचे विकायला. च्यामारी गोमूत्रपण अमेझॉनवरून मागवते ना लोकं आजकाल"
"हो..हे एकदम सही आयडिया आहे. त्या OYO वाल्याने काय केलं सालं. काही नाही एक ऍप बनवलं फक्त. आज पाय बरं...!"
आता ह्यातल्या, "काही नाही एक ऍप बनवलं फक्त" या वाक्यावरच होऊ घातलेला बिझनेस संपलेला असतो.
कारण बिझनेस सुरू करायला काय लागते?? तर 'काही नाही' ह्यावर सगळ्यांच एकमत झालेलं असतं.
"बरं..आज आपण सगळे पिऊन आहोत. आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू अन बोलू ह्यावर. तोपर्यंत मी आपला चौघांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप बनवतो. बाकी कोणाला नको ऍड करायला"
New Edge Entrepreneurs नावाचा एक व्हॉट्सऍप ग्रुप बनतो. ज्यावर तीन महिने एकही मेसेज येत नाही.तीन महिन्यांनी पहिला मेसेज येतो.
"आज बसायचं का?"
आणि त्यावर वायूवेगाने तीन अंगठे येतात !!
समाप्त
-- चिनार
प्रतिक्रिया
22 Jan 2022 - 12:01 am | सौन्दर्य
अगदी वास्तववादी चित्रण. लेख आवडला.
22 Jan 2022 - 1:27 am | श्रीगणेशा
उत्स्फूर्त वाटलं लिखाण. विनोदी आणि वास्तववादी.
खूप छान!
22 Jan 2022 - 2:36 am | उन्मेष दिक्षीत
आवडलं !
मिपावर लाईक बटन असावे !
22 Jan 2022 - 6:21 am | विजुभाऊ
स्वानुभव आहे.... अगदी तंतोतंत
22 Jan 2022 - 10:09 am | ज्ञानोबाचे पैजार
मित्रमंडळी भेटली की साधारण याच लायनीवर गप्पा सुरु असतात,
अचूक निरिक्षण चिनारभाऊ,
पैजारबुवा,
22 Jan 2022 - 11:44 am | मदनबाण
मस्त लिखाण ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap
22 Jan 2022 - 12:16 pm | मित्रहो
हाहाहा मस्त लेख हे असच घडतं बऱ्याचदा. स्टार्ट अप सुरु करणे हे फॅशन झाले.
On a serious note माझ्या काही मित्रांनी नोकरी सोडून पूर्वी बिझनेस सुरु केले, व्यवस्थित सुरु होते परंतु करोनाच्या काळात मात्र त्यांना खूप त्रास झाला. पहिल्या पिढीतील उद्योजकांना करोनात झालेला आणि अजूनही होत असलेला त्रास हा स्वतंत्र लेख होईल.
लगेच नोकरी सोडून बिझनेस सुरु करावा का याविषयी एक विडियो या लिंकवर
https://www.youtube.com/watch?v=0xha5eKBCFk
22 Jan 2022 - 12:46 pm | मित्रहो
एक शंका
Age ऐवजी Edge हा शब्द मुद्दाम वापरला काय
they always remain on Edge of Entrepreneurship
22 Jan 2022 - 12:49 pm | चौथा कोनाडा
हा हा हा !
22 Jan 2022 - 12:48 pm | चौथा कोनाडा
हा .... हा .... हा .....
😃
अगदी असंच होतं !
मस्त खुसखुषीत ! +१
22 Jan 2022 - 1:47 pm | कंजूस
बाकी काही फारच यशस्वी स्टार्टपकरांचा आढावा हल्लीच इंडिया टुडे साप्ताहिकाने घेतला आहे.
22 Jan 2022 - 3:08 pm | अनन्त्_यात्री
नावाची वारुणी बाजारात लौकरच आणण्याचा विचार आहे. त्या दृष्टिने दर वीकेंडास ३-४ समविचारी मित्राबरोबर विचारमंथने चालू आहेत त्याचे जणू हे हायलाईट्स वाटले ;)
22 Jan 2022 - 3:23 pm | ॲबसेंट माइंडेड ...
छान लिहिलंय.
23 Jan 2022 - 3:07 am | फारएन्ड
मस्त :)
23 Jan 2022 - 12:16 pm | गवि
हा हा हा. अगदी वास्तवदर्शी.
बाय द वे, सध्या शार्क टँक इंडिया रोज असते टीव्हीवर, आणि बघण्यासारखे आहे.
24 Jan 2022 - 5:38 am | चौकस२१२
वाह अगदी मस्त लिहिलंय ...
शार्क टॅंक आणि लायन्स डेन अश्या कार्यक्रमांचाच भोक्ता असल्यामुळे खूप आवडला
"स्टार्ट अप म्हणजे एक ऍप बनवले कि झाले " असे समजणाऱ्यांनी जरूर वाचावा
चहाची टपरी टाकणे = फुडटेक मध्ये उडी घेतली ! असे म्हणणारे काही धनी बघितले
कोविद च्य आधी स्टार्ट अप फिनतेक जे जे काही सेमिनार असतील त्याला ना चुकता हजेरी लावायचो .. मजा यायची कधी अगम्य कल्पना तर कधी खरंच काहीतरी वेगळे कळायचे
को वोर्किंग स्पेस चे उधाण पण कधी मला समजले नाही ( या स्पेसेस चालवणाऱ्यांचाच मूळ धंदा रिअल इस्टेट आहे अनेकांना समजत नाही !- वि वर्क च्या संस्थापकाने घातलेले घोळ नक्की बघा
24 Jan 2022 - 12:03 pm | प्रसाद गोडबोले
उत्तम लेख!
विनोदी वाटले नाही , वस्तुस्थिती आहे ही !
मी ह्याच कारणां मुळे अनेक लोकांशी बोलणे बंद केले आहे, आणि अगदी जवळचे आहेत त्यांच्याशीही संवाद अत्यल्प केलेला आहे. बोलुन काहीच उपयोग नाही, लोकांचे अनुभव विश्व वेगवेगळे असते , प्रत्येकाला दुसर्याचे प्रॉब्लेम्स सोप्पे अन स्वतःचे अवघड वाटतात . त्यातुन बाहेर पडायचा मार्ग म्हणुन अम्न धडपड करत रहाते , मित्र म्हणुन आपण कोणाला मनातलं बोलुन दाखवलं तर बहुतांश वेळेला चेष्टा मस्करीच होते , शिवाय उगाच आपल्यावरच आपल्याच अपेक्षांचे ओझे वाढत जाते , एक दोन पेग जास्त रिचवले जातात अन नंतर त्याचाही हँगओव्हर होतो .
आहे हे असं आहे , ह्यात काहीही बदल होणार नाहीये , अनलेस यु डू समथिंग ! तस्मात , ओशोची कमांडमेंट फॉल्लो करा - फ्लोट , डोन्ट स्विम !
आणि जर काही करायचंच आहे तर बोलायचं कशाला ?
29 Jan 2022 - 5:16 pm | असंका
वा! मजेशीर लिहिलंयत!
धन्यवाद!!
30 Jan 2022 - 10:35 pm | मुक्त विहारि
प्रत्येक वयांत, दारू तीच असते पण विषय वेगळे असतात ....
20-25 , बापाला अक्कल नाही,
25-35, कुणालाच अक्कल नाही
35-45, नौकरीत राम नाही
45-50 नंतर ते 60..., ठेवीले अनंते .... दुनिया गेली भोकांत ...
60 नंतर, घरच्यांनी साथ दिली नाही म्हणून
75 नंतर, मी आणि माझी मुले आणि नातवंडे ..
बाकी दारू पितांना, मीच तेव्हढा शहाणा आणि घरच्यांनी साथ दिली नाही म्हणून, हे कुठल्याही वयांत
31 Jan 2022 - 6:10 am | सोत्रि
झक्कास!
अगदी मनातलं…
- (स्वप्नाळू आंत्रप्रेन्युर) सोकाजी
31 Jan 2022 - 6:21 am | तुषार काळभोर
मी उत्पादन क्षेत्रातील आयटी मध्ये असल्याने सहकारी बहुतेक मेकॅनिकल इंजिनियर. पण त्यांच्यातही याच्या समांतर गप्पा असतात.
11 Feb 2022 - 9:24 am | सुखी
हेहे मस्त
11 Feb 2022 - 10:57 am | बेकार तरुण
मस्तच... मजा आली वाचायला....
11 Feb 2022 - 11:17 am | टर्मीनेटर
खुमासदार 😀