जवळपास १६ -१७ तासांच्या विमान प्रवासानंतर कॅलगरी एअरपोर्टवर पुढच्या विमानाची वाट बघत बसलो होतो. मागचे ७-८ दिवस फारच धावपळीत गेले होते. या आधीही परदेश प्रवास केला होता , त्यामुळे त्याचे नावीन्य नव्हते. परंतु एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा हा पहिलाच अनुभव असणार होता. मुंबईहून निघाल्यापासून झोप नीट न झाल्याने थकवाही जाणवत होता. पुढच्या विमानाला चांगला ३-४ तासांचा वेळ असल्याने लाउंजमधला एक निवांत कोपरा बघून बसलो.सामान आजूबाजूला ठेवले आणि स्टॉल वरून कॉफी घेऊन आलो. कॉईन फोनवरून एक दोन जणांना फोन करायचा प्रयत्न केला पण ते काही जमले नाही.त्यामुळे निवांत कॉफी पीत बसलो. मागच्या काही दिवसांचा घटनाक्रम डोळ्यासमोरून सरकू लागला.
साल होते २००९. पुण्यातील एका मोठ्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत नोकरी करत होतो. जागतिक महामंदीमुळे सर्वत्र घबराट पसरली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नव्हते. मोठमोठे प्रोजेक्ट्स बंद पडत होते किंवा डाऊन साईझ होत होते. आसपास खण्डीनें माणसे बेंचवर दिसत होती.रोज सकाळी ऑफिसला येणे ,इकडे तिकडे करत वेळ काढणे, ओळखीच्या मॅनेजर वगैरे लोकांना भेटून कुठे ओपनिंग आहे का बघणे , जमल्यास वेगवेगळ्या जॉब साईटवर अप्लाय करत राहणे हाच दिनक्रम होता. आज पगाराची चिंता नव्हती, पण उद्याचे सांगता येत नव्हते. एकीकडे घराचे कर्जाचे हप्ते दुसरीकडे शाळेच्या फिया असे सगळे खर्च डोळ्यासमोर नाचत होते. असे चालू असताना एक दिवस एका मित्राकडून ही कॅनडातील प्रोजेक्ट्सची संधी समजली. विचार करायला फारसा वेळ नव्हता. झटपट हालचाल केली आणि प्रोजेक्ट मॅनेजरशी बोललो. प्रोजेक्ट मॅनेजरने अर्धा तास इंटरव्ह्यू घेतला आणि व्हिसा प्रोसेसिंग चालू करायला सांगितले. तो स्वत: आणि सगळी टीम बंगलोरमध्ये होती आणि मी एकटा पुण्यात. त्यामुळे त्यांची सर्वांची प्रोसेस एकमेकांना विचारून चालू होती, तर मी मात्र चाचपडत विचारत पुढे सरकत होतो. अर्थातच व्हिसा डिपार्टमेंट मदतीला होते, पण वेगवेगळी कागदपत्रे जमा करणे, मेल वरून आलेले फॉर्म्स वगैरे भरून देणे, फोटो,झेरॉक्स, सर्टिफिकेट्स एक ना दोन. त्यातच हा दीर्घ काळाचा प्रोजेक्ट असल्याने कुटुंबालाही नेता येणार होते आणि त्यामुळे त्या सगळ्यांचाही व्हिसा आत्ताच काढून घेणे योग्य ठरणार होते. अर्थात जाताना मी पहिले एकटाच जाणार होतो आणि मुलांचे शाळेचे वर्ष संपले की भारतात परत येऊन त्यांना घेऊन येणार असे ठरवले होते.
एकीकडे दिवसा व्हिसा /तिकिटे वगैरे भानगडी चालू होत्या तर दुसरीकडे हा नवीनच प्रोजेक्ट असल्याने रात्री त्याची केटी सेशन्स वगैरे, त्यामुळे एकंदरीतच दिवस फार भराभर निघून चालले होते. अशाच एका केटी सेशनमध्ये क्लायंटने विचारले की तुमचे सपोर्ट मॉडेल कसे असेल? हा प्रश्न विचारायचे कारण असे होते की कॅनडामध्ये त्यांची ३ ठिकाणी महत्वाची ऑफिसेस होती.त्यातील एक स्वत:चे डेटासेंटर, एक बोर्ड ऑफ डिरेक्टर्स वगैरे बसण्याची जागा आणि एक नुकत्याच टेक ओव्हर केलेल्या कंपनीचे डेटासेंटर
अशी विभागणी होती. बाकी महत्वाची ऑफिसेस जिनिव्हा आणि सिंगापूरला होती. शिवाय कॅनडात विखुरलेली छोटी मोठी ३०० ठिकाणे म्हणजे कलेक्शन डेपो,ऑफिसेस, बंदरे वगैरे होते. तोवर आम्हा सगळ्यांचा असाच समज होता की ऑनसाईटला असणारे सर्वजण क्लायंटच्या मुख्य डेटासेंटरला असतील आणि राहिलेले सर्वजण ऑफशोअरला म्हणजे बंगलोरला असतील. पण या प्रश्नाने तो समज खोटा ठरवला आणि दुसऱ्या दिवसापासून आमचे मॅनेजर्स कोण माणूस कुठे बसणार आणि कसा सपोर्ट देणार यावर खल करू लागले आणि प्लॅन बनवू लागले. या सगळ्या प्लॅनिंगचा शेवट म्हणजे मी विनिपेग डेटासेंटरला बसणार आणि बाकी टीम रजायनाला मुख्य डेटासेंटर मध्ये बसणार हे नक्की झाले.
आता आली का पंचाईत? एकतर एखाद्या देशात दीर्घ काळ राहण्याचा माझा पहिलाच अनुभव. त्यात कॅनडाला कधी गेलो नाही, खरेतर नकाशावरही हा देश कधी बघितला नव्हता, कारण उत्तर अमेरिकेमध्ये तो इतका मिसळून गेलेला आहे की तो वेगळा देश आहे असे तोवर समजलेच नव्हते. त्यातच माझे व्हिसा प्रोसेसिंग थोडे रेंगाळले असल्याने मी १५-२० दिवस उशिराने तिकडे पोचणार होतो.सगळी टीम एका ठिकाणी असल्याने नवीन ठिकाणी स्थिरस्थावर होण्यासाठी त्यांना एकमेकांचे सहकार्य मिळणार होते तोही लाभ मला मिळणार नव्हता. थोडक्यात मला एकदमच आभाळ डोक्यावर कोसळल्यासारखे वाटले. काही का असेना मिळालेली संधी तर सोडायची नव्हती त्यामुळे येणाऱ्या प्रसंगाला तोंड देणे भागच होते. त्यामुळे मी एकट्यानेच प्रवास करत आज कॅलगरीला येऊन पोचलो होतो. आतापर्यंत झोपाळलेल्या अवस्थेत ३-४ तास वाट बघून कंटाळा आला होता.पण बरोबर सामानावर लक्ष ठेवायला कोणीच नसल्याने झोपायची हिम्मत होत नव्हती. जांभया देत देत वेळ काढत काढत एकदाचे ते कंटाळवाणे तास सारले आणि विनिपेगच्या विमानाची घोषणा झाली. दोन जड बॅगा ओढत आणि खांद्यावरची सॅक सांभाळत मी योग्य गेटची वाट धरली. यथावकाश दीड तासाचा प्रवास करून विमान विनिपेगला उतरले तोवर अंधार झाला होता. अर्थात मागच्या २४ तासात इतके वेळा अंधार उजेड झाले होते की मला आता वेळच समजेनाशी झाली होती.
बेल्टवरून सामान घेतले आणि बाहेर येऊन रांगेतील एका कॅबमध्ये बसलो.बाहेर थंडी होती पण बर्फ पडायला अजून सुरुवात झाली नव्हती. रस्ते कोरडे होते. सवयीप्रमाणे ड्रायव्हरशी बोलू लागलो. माझे जड सामान बघून सुरुवातच "तू कुठून आलास ?" ने झाली. मी भारतातून आलोय, आलोय म्हणजे काय हा आत्ताच येतोय असे कळल्यावर तो बऱ्यापैकी आश्चर्यचकित झाला. कारण विनिपेग हे काही तसे प्रेक्षणीय शहर नाही की जिथे टुरिस्ट सतत ये जा करत असतात. ड्रायव्हर म्हणाला "तू नशीबवान आहेस. अजून इथे बर्फ पडायला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे तुला सेटल व्हायला जरा वेळ मिळेल. पण लवकरच थंडीचे कपडे वगैरे घे म्हणजे सोयीचे पडेल." भारतीय तोंडावळ्याचा दिसत असल्याने मीही त्याला कोण कुठचा वगैरे विचारले. त्यावर त्याने "मी पंजाबचा आहे" असे उत्तर दिले. अर्थात ते तिकडचे साचेबद्ध उत्तर आहे हे मला नंतर समजले. बरेचसे ड्रायव्हर पाकिस्तानी किंवा बांगलादेशी असतात पण त्यांना तसे सांगायला लाज म्हणा किंवा अजून काही , पण ते इंडियन किंवा सरळ पंजाबी म्हणून सांगतात (पंजाब पाकिस्तानात सुद्धा आहे). माझे हॉटेल शहराच्या मध्यभागी क्लायन्ट ऑफिसजवळच असल्याने काही वेळातच मला मुक्कामी सोडून कॅब निघून गेली.
हॉटेलचे सोपस्कार पूर्ण करून रूमवर आलो आणि सामान टाकून बेडवर पडलो. खरेतर इतक्या प्रवासानंतर अंघोळ करून फ्रेश व्हायची इच्छा होत होती.पण अंगात तेव्हढा उत्साह राहिला नव्हता. थोडी भूकही लागली होती, पण इतक्या रात्री खायला काय मिळणार? थोड्या वेळाने उठलो आणि कॉफी मशीनशी खटपट करून थोडी काळी कॉफी बनवली. त्यात दूध पावडर/साखर वगैरे मिसळून ती पिण्यायोग्य केली आणि ट्रे मधल्याच एका दोन बिस्किटांच्या संगतीने ती संपवली.हातपाय धुवून कपडे बदलले आणि झोपण्यासाठी बेडवर पडलो. मला वाटले होते की प्रवासाच्या थकव्याने लगेच झोप लागेल.खोलीतले घड्याळ रात्रीचे ११ वाजल्याचे दाखवत होते,पण भारतात आत्ता दिवस चालू होता आणि शरीराचे घड्याळ अजून नव्या जागेशी जुळवून घेत नव्हते. त्यामुळे अस्वस्थ झोप लागली, खरेतर लागलीच नाही. दर थोड्या वेळाने उठून किती वाजले हे बघत होतो. डोक्यात वेगवेगळी चित्रे,गाणी आणि विचार असे काय काय रुंजी घालत होते. मधेच कधीतरी उठून टी व्ही सुद्धा लावून बघितला,पण अनोळखी चॅनेल वरचे कार्यक्रम बघून कंटाळलो. शेवटी एकदाचे उजाडले. उठून अंघोळ वगैरे उरकून तयार झालो आणि खाली हॉटेलच्या डायनिंग हॉलमध्ये जाऊन बसलो. वेटर येऊन मेन्यू कार्ड देऊन गेली, पण एकही ओळखीचा किंवा शाकाहारी पदार्थ दिसेना. बराच वेळ गेल्यावर अंड्याचा कुठलातरी पदार्थ निवडून ऑर्डर दिली आणि जे काय पुढ्यात आले ते चुपचाप खाऊन वर कॉफी पिऊन निघालो.
ऑफिस हॉटेलच्या मागच्याच गल्लीत होते , त्यामुळे कॅब वगैरेंच्या भानगडीत ना पडता सरळ चालतच निघालो. विनिपेगमधील सर्वात मोठा म्हणता येईल अशा पोर्टेज अव्हेन्यूवर शहराच्या मध्यभागी ही ३० मजली बिल्डिंग होती आणि तिच्या २७व्या मजल्यावर मला जायचे होते. स्ट्रीट आणि अव्हेन्यूमधला फरक मला आज पहिल्यांदा समजला.स्ट्रीट म्हणजे पूर्व पश्चिम आणि अव्हेन्यू म्हणजे उत्तर-दक्षिण रस्ता. तसेच ब्लॉक म्हणजे बिल्डिंग नसून एका रस्त्याच्या एका छेदनबिंदूपासून दुसऱ्या छेदनबिंदूपर्यंतची जागा. लिफ्ट ऐवजी एलिवेटर , तळमजला म्हणजे ० नसून १ ,असे अनेक धक्के मला बसत होते. सरतेशेवटी मी २७ व्या मजल्यावर पोचलो. माझा क्लायंट मॅनेजर, कर्टीस तिकडे माझे स्वागत करायला येऊन थांबला होता.सुरुवातीचे नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही दोघे एका केबिनमध्ये बसलो. त्याने गप्पा काम माझा इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. मी काय बोलत होतो फारसे आठवत नाही पण मी नेमक्या अशा जागी बसलो होतो की खिडकीतून सूर्यप्रकाश थेट माझ्या डोळ्यांवरच पडत होता. आधीच नीट झोप झालेली नव्हती त्यामुळे डोळे चुरचुरत होते, आणि त्यात अजून हा त्रास. थोड्या वेळाने त्याने मला खालच्या मजल्यावर नेले आणि तिथे बसलेल्या एका इराणी माणसाशी माझी ओळख करून दिली. विचित्र गोष्ट म्हणजे वरच्या मजल्यापेक्षा हा मजला अधिकच उजाड दिसत होता. ऐसपैस जागेत फारच तुरळक लोक दिसत होते. त्याचे कारण मला नंतर समजले. ते असे की माझ्या क्लायंट ने ही कंपनी टेक ओव्हर केली असल्याने तिकडच्या बऱ्याच लोकांना काढून टाकले होते किंवा दुसरीकडे पाठविले होते. थोडक्यात त्या कंपनीचे महत्व त्यांना कमी कमी करत न्यायचे होते. म्हणून अशी अवस्था होती. तर हा इराणी माणूस म्हणजे ताईदशी माझी ओळख करून देऊन कर्टीस नंतर भेटू म्हणून निघून गेला. ताईदशी बोलायला सुरुवात केल्यावर मला प्रथम थोडे दडपण होते, कारण एका अर्थी मी त्याचा जॉब खायला आलो होतो. पण त्याने तसे काही न दाखविता मोकळेपणाने माझे स्वागत केले. बोलत बोलत मला समजले की गम्मत म्हणजे तो काही वर्षे शिक्षणासाठी केरळात राहिला होता आणि त्याचे लग्न पुण्यात झाले होते. त्यामुळे असेल कदाचित पण आम्ही जरा मोकळे ढाकळे झालो. काही वेळाने मी त्याला नाश्ता कुठे मिळेल असे विचारले त्यावर तो मला बिल्डिंगच्या तळात घेऊन गेला. तिकडे एका मोठे फूड कोर्ट होते, म्हणजे चहुबाजूने तऱ्हे तऱ्हेचे पदार्थ विकणारी दुकाने आणि मध्यभागी बसायला बरीच बाके. पुढे मला समजले की ही इमारत आणि आजूबाजूच्या सर्वच इमारती एकमेकांना मोठमोठ्या बोगद्यांनी जोडल्या होत्या त्यामुळे थंडीच्या दिवसात साध्या कपड्यामध्येही निदान शहराच्या मध्यभागातील सर्व इमारतींमध्ये बेलाशक फिरत येई, त्यासाठी बाहेर रस्त्यावर जायची गरज पडत नसे.
एका दिवस विनिपेगला राहून कर्टीस रजायनाला परतला आणि आता ताईद माझा मार्गदर्शक बनला. तिकडे गेल्यावर पहिल्या आठवड्यात काही सोपस्कार जसे की सिन नंबर काढणे,बँक अकाउंट उघडणे ,बसपास काढणे या सर्व गोष्टींसाठी माझे उत्तरे मिळवायचे हमखास ठिकाण म्हणजे ताईद.पहिले मला वाटले की तो मुस्लिम असेल, पण तो बहाई होता. दिल्लीतील लोटस टेम्पल ज्यांना माहित आहे त्यांना बहाई पंथ माहित असेलच. इतकी वर्षे कॅनडात राहून सुद्धा मनाने तो इराणीच होता. त्याची २-३ मुले कॉलेजमध्ये शिकत होती,पण इथल्या मुलांची व्यसनाधीनता, पब संस्कृती ,लाऊड म्युझिक या गोष्टींबद्दल त्याला चीड होती. जगातले सर्वात चांगले वातावरण तेहरानमध्ये आहे असे तो म्हणायचा,त्याचे काही कुटुंबीयही तिकडे होते. पण अर्थातच आपण तिकडे कधीच परत जाऊ शकणार नाही हे तो जाणून होता. त्या भीतीमुळे की काय पण सोशल मीडियाशी तो फार वापरत नसे, जणू कुणीतरी आपला माग काढत इथे येईल अशी त्याला भीती वाटे. हिंदू,मुस्लिम,ख्रिस्ती,यहुदी अशा बऱ्याच धर्मांबद्दल त्याने काय काय वाचले होते, ते आमच्या गप्पात कधी कधी यायचे. ताईदनेच मला विनिपेगमधील हिंदू मंदिराबद्दल माहिती दिली आणि मी तिकडे जावे म्हणजे येथील लोकांशी माझ्या ओळखी पाळखी होतील, त्यातून मला राहायला जागासुद्धा कदाचित मिळू शकेल असेही सुचवले.
विनिपेग मध्ये जागा मिळणे माझ्यासाठी एक महत्वाचा मुद्दा होता. कारण ऑफिसने दिलेली हॉटेलची जागा एक आठवड्यात सोडायला लागणार होती त्याआधी मला एखाद्या ठिकाणी राहायची सोय करणे भाग होते. भारतात असल्यापासून माझा वेगवेगळ्या वेबसाईटवर जागेचा शोध चालूच होता काही ठिकाणी इमेल वर कॉन्टॅक्ट सुद्धा झाला होता परंतु माझी कॅनडाला जायची तारीख नक्की नसल्यामुळे मी कुठेही जागा फायनल केली नव्हती. हॉटेलचा मुक्काम संपत आला होता. कामाच्या गडबडीत आठवडाभर फारसा कोणाशी संपर्क झाला नव्हता . एक दिवस संध्याकाळी मेल चेक असताना एका माणसाचा मेसेज रिप्लाय पाहिला . त्याचा तीन बेडरूम हॉल व किचन असा बंगला होता आणि तो बेडरूम भाड्याने देत होता. त्यांनी दिलेल्या नंबर वर मी संपर्क साधला. सुदैवाने केन घरीच होता जुजबी बोलणे झाल्यावर मी त्याला विचारले की मी घर बघायला कधी येऊ शकतो ? त्याने मला लगेच बोलावले. आणि ऑफिसपासून कुठली बस त्याच्या घरा पाशी पोचते तेही सांगितले. झटपट ऑफिसचे काम उरकून मी खाली उतरलो आणि 14 नंबरची बस पकडून त्याच्या घरी गेलो. केन माझी वाटच पाहात होता. थोड्या वेळानंतर मला समजले की तो एकटाच राहत होता आणि त्याला पैशाची गरजही दिसली त्यामुळे तो आपल्या बेडरूम भाड्याने देऊ करायचा. सध्या त्यांच्याकडे कोणी भाडेकरू नव्हता .आधीचे भाडेकरू त्याने काढून टाकले कारण ते सिगरेट पिणारे किंवा मांसाहारी होते. केन पंडित रविशंकर आणि माता अमृतानंदमयी यांचा भक्त होता आणि मी भारतातून त्याच्याकडे आलो हे ऐकून त्याला फारच आश्चर्य वाटले. आमचे सुदर्शन क्रिया योग आणि इतर काही गोष्टी बद्दल बोलणे झाले आणि आमचे विचार जुळले. त्याच्याशिवाय घरात कोणीच नसल्यामुळे मी कधीही तिकडे जाऊन राहू शकत होतो. शिवाय केन म्हणाला की आपले किचन आणि लॉन्ड्री तुला कधीही वापरता येईल , फक्त शाकाहारी पदार्थच बनवावे आणि घरात सिगारेट ओढू नये. अर्थात या गोष्टींना माझी काहीच हरकत नसल्यामुळे प्रश्न नव्हता. भाडेही परवडण्या सारखे होते त्यामुळे मी दुसऱ्याच दिवशी माझ्या दोन बॅगा घेऊन केन कडे मुक्कामाला आलो. हा हिवाळ्याचा सीजन होता आणि माझ्याकडे अंथरूण पांघरून काहीच नव्हते. घराची लादी लाकडाची असल्याने थंड पडत असे. त्यामुळे माझी दया येऊन केन मला घेऊन सुपर स्टोअर मध्ये गेला आणि एक बॉक्स गादी खरेदी करून आणली. त्यामुळे माझी झोपण्याची सोय झाली आठवड्या भराचे वापरलेले कपडे सुद्धा लॉन्ड्री मध्ये धुऊन झाले. आणि केनच्या घरी मी लवकरच स्थिरस्थावर झालो.
केनचे रुटीन अतिशय शिस्तबद्ध होते. तो पहाटे चारला उठून ध्यान धारणा करीत असे. त्यानंतर खाण्याचे काही पदार्थ जसे ज्यूस सॅंडविच वगैरे बनवून खात असे आणि दुपार च्या डब्यात भरून घेत असे. मग आवरून ऑफिसला जात असे. त्याचे ऑफिस माझ्या ऑफिस जवळच कुठेतरी होते. संध्याकाळी सहा वाजता घरी आल्यानंतर फ्रेश होऊन तो जिम किंवा लायब्ररीत जात असे. किंवा कराटे शिकायला जात असे. घराची एक किल्ली त्याने माझ्याकडे देऊन ठेवली होती त्यामुळे आम्ही दोघे एकमेकांना फक्त पहाटे किंवा शनिवार रविवारी भेटायचो. घराला या किल्ली शिवाय एक पास कोड होता. किल्लीने दार उघडल्यावर आतल्या बाजूच्या मशीन मध्ये तो पासकोड दाबावा लागे. एकदा ऑफिसच्या काही कामाच्या गडबडीत मी तो पासकोड विसरलो आणि दार उघडल्यावर चुकीचा पासकोड टाकला. काही मिनिटे गेल्यावर घरभर अलार्म वाजू लागला. कर्कश अलार्म मुळे मला काहीच सुधरेना. त्यातच फोनही वाजू लागला. स्थानिक पोलीस स्टेशन चा फोन होता .त्यांना असे वाटले की चोरीचा मामला आहे. त्यांना समजावता समजावता माझ्या नाकी नऊ आले. शेवटी कसाबसा मला तो पासकोड आठवला आणि अलार्म वाजायचा बंद झाला. पुढे एकदा पोळ्या करताना पोळी करपली आणि धूर झाल्याने फायर अलार्म वाजू लागला तेव्हाही माझी अशीच घाबरगुंडी उडाली होती.
केनने दिलेल्या माहितीनुसार विनिपेगमधील जुने हिंदू मंदिर त्याच्या घराजवळच होते, पण नंतर जागा कमी पडू लागल्याने इथल्या लोकांनी एकत्र येऊन शहराबाहेर एक मोठी जागा मिळवली होती आणि तिकडे मोठे मंदिर बांधले होते. एका रविवारी केनकडून बस सर्विसची नीट माहिती घेऊन मी ९९९ सेंट एन्स रोडवरील हिंदू मंदिरात पोचलो. तिकडची प्रार्थना आणि प्रसाद वगैरे आटोपून १ च्या सुमारास मी घरी परत यायला निघालो. माझ्याकडे अजूनही भारतातून आणलेलेच कपडे असल्याने शर्ट त्यावर स्वेटर ,मफलर,कानटोपी असे एकावर एक थर चढवले होते. पायात मात्र नेहमीचे चामड्याचे बूट होते. बर्फाने माखलेल्या रस्त्यावर दूरपर्यंत एकही चिटपाखरू दिसत नव्हते आणि काचेच्या बस स्टॉपमध्ये थंडीने कुडकुडत मी बसची वाट पाहत होतो. कॅनडाचा हिवाळा काय असतो ते मला त्या दिवशी चांगलेच समजले. बराच वेळ बस येईना तेव्हा मी काही अंतर पायी जायचे ठरवले. पण पुढच्या स्टॉप वॉर पोचेपर्यंत माझ्या पायाची बोटे गारठून गेली आणि मला पायाच पुढे टाकवेना. शेवटी दूरवर एक शॉपिंग एरिया दिसत होता तिथपर्यंत कसातरी गेलो आणि एका कॉफी शॉप मध्ये उबेसाठी घुसलो. गरज नसताना बळजबरीने कॉफी प्यायलो आणि पायात जीव आल्यावर पुन्हा बाहेर पडून मिळेल ती पहिली बस पकडून घरी आलो. केनला हा अनुभव सांगितल्यावर त्याने पहिले मला भरपूर शिव्या घातल्या आणि असे धाडस पुन्हा करू नकोस असे बजावले. दुसऱ्याच दिवशी मी त्याने सांगितलेल्या एका दुकानात गेलो आणि कॅनडाच्या थंडीला साजेसे कोट बूट वगैरे विकत घेऊन टाकले जे मला पुढे -४० डिग्रीमध्ये सुद्धा अतिशय उपयोगी पडले.
इथे मला एक अजून गंमतशीर प्रकार बघायला मिळाला. एका रविवारी मंदिरात जाण्याऐवजी मी पोर्टेज रोडवर निरुद्देश भटकत होतो. तोच समोरून मला ऑफिसमधील एक सहकारी येताना दिसला.त्याच्या हातात हॉकी स्टिकसारखे कायतरी होते. मी त्याला कुतूहलाने त्याबद्दल विचारले तर तो म्हणाला "म्हणजे काय? तुला इथल्या हिवाळी खेळांबद्दल काहीच माहिती नाही काय?" माझा पडलेला चेहरा बघूनच तो समजून गेला आणि स्वत: बरोबर मला रेड रिव्हर काठी घेऊन गेला .शहराच्या मध्यभागातून वाहणारी ही नदी पूर्णपणे गोठली होती आणि शहरातील बरेच उत्साही लोक तिकडे वेगवेगळे खेळ खेळत होते. काहीजण बर्फावरची हॉकी खेळत होते, तर काही ठिकाणी कर्लिंग च्या स्पर्धा भरल्या होत्या. यात ढोबळ मानाने दोन टीम असतात आणि प्रत्येक टीमचा गोलंदाज एका बिंदूपाशी उभे राहून ते कर्लिंग फेकतो , तर त्याचे सहकारी पुढचा पुढचा बर्फ साफ करत ते जास्तीत जास्त दूरवर कसे पोचेल हे बघतात. ज्याचे कर्लिंग जास्त लांब जाईल तो जिंकला. आणि हे सगळे खेळाडू स्केटिंग शूज घालून खेळतात. इत्तर काही जण नुसतेच प्लास्टिक किंवा काहीतरी कापड घेऊन उतारावरून घसरगुंडी खेळत होते.त्यामुळे एकूणच तिथे धमाल होती. बघता बघता ३-४ तास कसे निघून गेले कळलेच नाही.
आता ख्रिसमस जवळ येत चालला होता आणि शहरातील पोर्टेज मॉल आणि इतर दुकाने सजावटीने झगमगू लागली होती. तऱ्हे तऱ्हेच्या सेल आणि डिस्काउंट च्या पाट्या जागोजागी दिसत होत्या. बाहेरच्या वातावरणात उत्साह वाढत चालला होता. पण त्याचवेळी ऑफिसमध्ये मात्र कंटाळा येऊ लागला होता. ताईदने दुसरी नोकरी पकडल्याने त्याच्याशी संपर्क नव्हता आणि ऑफिसमध्येही फारसे काम उरले नव्हते. सकाळच्या वेळी काहीतरी मीटिंग किंवा बंगलोरच्या टीमशी बोलण्यात वगैरे वेळ जायचा. पण दुपारनंतर काय करायचे ते समजत नसे. कधी कधी तर मी उगाच या मजल्यावरून त्या मजल्यावर किंवा खाली बेसमेंट मध्ये फेरी मारून येत असे.किंवा एखाद्या रिकाम्या मजल्यावरून खिडकीतून खालची रहदारी बघत बसे. बाकीची टीम रजायनाला स्थिर झाली होती आणि भारतातून आपापली कुटुंबे घेऊन आली होती. माझाही तोच प्लॅन होता, पण जोवर माझा प्रोजेक्ट मॅनेजर मला इथून निघायची आणि रजायनाला जायची परवानगी देत नव्हता तोवर ते शक्य नव्हते. शेवटी हे माझे तात्पुरते ठिकाण होते तर रजायना कायमस्वरूपी. एकीकडे विनिपेगचे प्रेम तर दुसरीकडे रजायनाला जायची ओढ अशा विचित्र कात्रीत मी सापडलो होतो. इथे फारसे काम नाहीये तेव्हा मला रजायनाला जाऊदे अशा रोज विनवण्या करण्यात माझे दिवस जाऊ लागले. दुसरीकडे रजायनाचे कामही खोळंबले होते त्यामुळे दिवसेंदिवस क्लायंटकडून दबाव वाढू लागला.शेवटी एक दिवस निर्वाणीच्या मीटिंगमध्ये "हालात को मद्दे नजर राखते हुए" सर्वानुमते मला रजायनाला निघण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आणि लवकरच माझा विनिपेग मुक्काम आटोपता घेऊन मी विमानात बसलो.
पुढच्या कॅनडाच्या एकूण मुक्कामात मी टोरांटो,नायगारा,व्हॅन्कुव्हर ,व्हीकटोरीया अशी अनेक ठिकाणे फिरलो. इतर काही ठिकाणे बघायची राहूनही गेली. परंतु मनाच्या एका कोपऱ्यात मात्र विनिपेगचे ते निवांत दिवस अजूनही कुठेतरी पहुडलेले आहेत. एखाद्या रिकाम्या क्षणी अचानक कुठूनतरी ते उफाळून वर येतात आणि कानात गुलजारच्या "दिल ढुंढता है फिर वही " गझलची धून वाजू लागते. (समाप्त)
प्रतिक्रिया
20 Jan 2022 - 5:53 pm | विजुभाऊ
मस्त. तुमच्या सोबत मी पण विनपेग फिरून आलो
20 Jan 2022 - 5:56 pm | कुमार१
दिल ढुंढता है फिर वही ">>>
+१
20 Jan 2022 - 9:20 pm | सरिता बांदेकर
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं.
तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.
20 Jan 2022 - 9:20 pm | सरिता बांदेकर
मस्त वाटलं. नवीन शहरात फिरताना नवीन गोष्टी समजल्या की खूप छान वाटतं.
तुम्ही जे वर्णन केलंय ते इतकं मस्त केलंय की आम्हीसुद्धा तिकडे फिरून आलो.
20 Jan 2022 - 10:30 pm | श्रीरंग_जोशी
मिपाकरांच्या संख्येत भारतानंतर उत्तर अमेरिकेत राहणार्यांची संख्या सर्वाधिक असली तरी त्यात आम्ही राहतो (मिनेसोटा) तो व आजूबाजूचा अमेरिकेतला व कॅनडातला मनितोबा व ओन्टॅरिओचा पश्चिमी भाग यात जवळपास कुणीच नाही. तुम्ही काही काळ मनितोबा राज्यातील विनिपेग येथे वास्तव्यास होता हे जाणून आनंद झाला.
तुमचे नव्या अन अनोळखी ठिकाणी स्थिरावण्याचे अनुभवकथन खूप भावले. तुम्ही वर्णन केलेले इमारतींदरम्यानचे वॉकवे इथे मिनेसोटातही भरपूर आहेत. तसेच गोठलेल्या तळ्यांवर खेळणे हा इथल्या हिवाळ्यातल्या संस्कृतीचाच भाग आहे.
मनितोबा व पश्चिम ओन्टॅरिओतून पर्यटक बसने आमच्या शहरातल्या प्रसिद्ध मॉल ऑफ अमेरिकेला भेट द्यायला येतात. भविष्यात कॅनडातल्या या भागात रस्त्याने बॉर्डर क्रॉस करुन भटकंती करण्याचा विचार आहे.
विनिपेगबाबत एक रोचक माहिती: Winnie the Pooh came from Winnipeg.
20 Jan 2022 - 11:42 pm | कानडाऊ योगेशु
सुंदर ओघवते लिखाण. सुरवातीला तुमच्या एकट्याचे कसे काय होणार कॅनडात अशी धाकधूक होती. पण अश्यावेळेला ताईद आणि केनसारखी काही माणसे देवासारखीच मदतीला येतात.
21 Jan 2022 - 12:12 am | सौन्दर्य
खूप छान वर्णन. नवीन शहरात जाऊन सेटल होणे हे अनके वेळा फार चॅलेंजिंग असत, पण ते अनुभव मनात मात्र कायमचेच घर करून राहतात ह्यात दुमत नाही. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. लेख आवडला.
21 Jan 2022 - 3:50 am | जुइ
तुमचे विनीपेग येथे स्थायिक व्हायचे अनुभव कथन आवडले. कॅनडाविषयी अजूनही वाचायला आवडेल. जमल्यास काही प्रचीही जोडा.
21 Jan 2022 - 4:42 am | nutanm
छान एका नव़िन शहर व संस्कृततीची माहिती कळली, छान वाटले, पण अर्धवट वाटले , जेवण ,पदार्थ अगदी तेथै मिळणार्या ।instant food pkts ची माहिती मिळालाी असती तर छान वाटले असते, अजून त्यांची सणवार, लग्न संस्कृती कळायला हवी होती असे वाटते आपल्या त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीची माहिती , गंमत म्हणून तुलना करता येते.
21 Jan 2022 - 5:27 am | मनो
नेमक्या याच वेळी २००९ साली तुम्ही विनिपेगमध्ये आणि आम्ही कॅलिोर्नियात उतरलो, त्यामुळं थंडी-बर्फ सोडून आमचाच अनुभव आहे असे वाटले. कारणही तेच, ऑफिस बंद करणे. पण थंडीचा अनुभव ऐन हिवाळ्यात रजायनामध्ये आणि शिकागोमध्ये वाऱ्यासह नंतर आलाच! पुढचा भाग लिहायचे मनावर घ्या, एवढ्यात समाप्त पटले नाही.
21 Jan 2022 - 6:47 am | चौकस२१२
स्थलांतराचे २ अनुभव असतात ( आय टी क्षेत्रात असल्यामुळे कदाचित) भारतातून "ऑफिस बसल्या" असे बाहेर जायला मिळने आणि मग तिथे जम बसवणे आणि दुसरा अनुभव म्हणजे पदवयोत्तर शिक्षणासाठी बाहेर देशी जाणे आणि मग जम बसवणे .
फोटो असते तर अजून मजा आली असती
२००९ नंतर पुढे काय अनुभव आले ?
21 Jan 2022 - 8:38 am | श्रीनिवास टिळक
१९९९-२००० एक वर्ष मी Department of Asian studies, University of Manitoba मध्ये lecturer होतो. आपला लेख वाचून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
21 Jan 2022 - 9:12 am | प्रचेतस
झक्कास आठवणी.
एका भागावर थांबू नका मात्र.
21 Jan 2022 - 10:13 am | Bhakti
मस्त!
21 Jan 2022 - 11:09 am | सौंदाळा
सुंदर लिहिले आहे.
तुमची लिहिण्याची शैली छान आहे.
21 Jan 2022 - 11:39 am | सुबोध खरे
असेच म्हणतो
21 Jan 2022 - 1:05 pm | राजेंद्र मेहेंदळे
कानडाऊ योगेशु--होय, नवीन शहरात/देशात सेटल होताना धाकधुक असतेच आणि अनेक समस्याही येतात, परंतु आपली त्या समाजात सामावुन जाण्याची इच्छा असल्यास आणि प्रयत्न केल्यास ते जमुन जाते.विशेषतः सुरुवातीच्या काळात जर केन आणि ताईदसारखी चांगली माणसे भेटत गेली तर नक्कीच. अर्थात पुढच्या अनुभवातही मला भारतीय लोकांपेक्षा स्थानिक कॅनेडियन माणसांचीच जास्त मदत झाली. टंकन श्रमांच्या कंटाळ्यामुळे आणि वेळेअभावी जास्त लिहिता आले नाही
श्रीरंग_जोशी--कारने नक्की भेट द्या विनिपेगला. १-२ दिवस सहज भटकता येईल.
जुइ- प्रचि गुगल ड्राईव्हवर चढवायची खटपट करावी लागेल, म्हणुन कंटाळा केला.
प्रचेतस- आवाजावरुन टंकन करणारे सॉफ्ट्वेअर शोधत आहे. म्हणजे पुढचे भाग लिहायला सोपे जाईल. https://dictation.io/speech वापरुन पाहिले पण नीट जमले नाही.
काही फोटो सापडले ते देत आहे
केन चे घर
लिप्टन स्ट्रीट
केन- गुरुजीसोबत
केनच्या घरासमोर स्नो मॅन बरोबर मी
बर्फातले विनीपीग
२७ व्या मजल्यावरून
ऑफिसमधून दिसणारी बेल कॅनडाची इमारत आणि इतर
21 Jan 2022 - 11:59 pm | गोरगावलेकर
अनुभव कथन आवडले.
22 Jan 2022 - 6:41 am | सुखीमाणूस
अमेरिकेत किवा परदेशात सुरुवातीला नवीन सन्स्क्रुती आणि हवामान याच्याशी जुळवुन घ्यावे लागते.
परदेश म्हणजे सगळे सोपे असे काही नसते
तुमच्या लेखामुळे परदेशात सुरुवातीला लोकाना किती तडजोडी कराव्या लागतात हे समजले
22 Jan 2022 - 11:52 am | मदनबाण
अनुभव कथन आवडले.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tere Siva Jag Mein... :- Tadap
24 Jan 2022 - 10:41 am | नचिकेत जवखेडकर
खूप छान अनुभवकथन! आम्हाला पण तुमच्याबरोबर घेऊन गेलात विनीपेगला :)
25 Jan 2022 - 10:49 am | टर्मीनेटर
मस्त लिहिलंय!
अनुभवकथन आवडले 👍
27 May 2022 - 3:08 pm | असंका
छान लिहिलंय.
धन्यवाद!!
28 May 2022 - 10:02 am | मुक्त विहारि
आवडले
28 May 2022 - 5:18 pm | सिरुसेरि
वास्तववादी अनुभव कथन .
24 May 2023 - 11:57 am | प्रकाश घाटपांडे
झकास! वर्णन व फोटो पाहून एकदमच स्वप्नवत वाटले. आमच्या सारख्या अप्रवाशांना तर टुकटुक वाटले