महात्मा फुल्यांचे फलज्योतिष विषयक विचार
फलज्योतिषाकडे पहाण्याच्या सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीकोनामध्ये उत्सुकता युक्त आदर असतो. कुतुहल असते. काहींच्या मते फलज्योतिषावर विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा जोपासणे. पण तरीही बहुतेकांच्या मते ते शास्त्र आहे.श्रद्धेपोटी काहीजण फलज्योतिषाच्या माध्यमाद्वारे आपला भविष्यकाळ ज्ञात करुन घेण्यासाठी यथाशक्ती,यथाबुद्धी प्रयत्न करतात.अशिक्षित अडाणी समाजामध्ये सुद्धा फलज्योतिषाचा उपयोग सोयरिक जुळवण्यासाठी केला जातो. यासाठी जन्मनावाचा उपयोग केला जातो.
खेडेगावात शेतकरी, बलुतेदार लोक अपत्य झाल्यानंतर नाव ठेवण्यासाठी ग्रामजोशी, भटजी, पुराणीक अशा धर्माचे प्रतिनिधित्व करणा-या मंडळींकडे जातात. जोशी जन्मनांव काढुन देतो.हे जन्मनाव हीच या बालकाची कुंडली बनते. उच्च वर्णियांसारखी जन्मवेळेची घटीपळांमध्ये नोंद ठेवण्याची गरज या समाजात नसते."पुनवेच्या आदुगर दोन दिवस सांच्या वक्ताला, 'कासराभर दिवस वर आला आसन तव्हा" अशा माहितीतुन जन्मवेळेची अंदाजाने निश्चितीकेली जाते. त्यावरुन ग्रामजोशी नक्षत्र काढून जन्मनावाची आद्याक्षरे पंचांगातुन काढतो व जन्मनाव ठरते.ते कधी कधी निरर्थकही असते. कधी कधी जन्मनावाच्या आद्याक्षरांवरुन एखादे देवाचे नांव ठेवण्यात येते.महात्मा फुल्यांनी फलज्योतिषाची जनमानसावरील पकड अचुक पद्धतीने ओळखली. आपल्या 'सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक' मध्ये त्यांनी ज्या प्रकारचे स्पष्टीकरण दिले त्यावरुन फलज्योतिषाच्या मुळ सिद्धांताचा त्यांनी चांगला अभ्यास केला होता हे स्पष्टपणे जाणवते. प्रथम अभ्यासक व नंतर टीकाकार अशी त्यांची भूमिका होती. प्य्हलज्योतिष हा धर्माचा एक भाग मानला जात असल्याने त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकात फलज्योतिषासंबंधी टीका केली.फुल्यांच्या काळातील म्हणजे शतकापुर्वीची असलेली सामाजिक परिस्थिती व सामाजिक मानसिकता या पार्श्वभूमीवर जर आपण विचार केला तर फलज्योतिषाला सामाजिक शोषण व अंधश्रद्धा म्हणणारे म.फुले काळाच्या किती पुढे होते हे समजते. फलज्योतिषी लोकांच्या अज्ञानाच्या फायदा उठवुन भरभक्कम दक्षिणा उकळतात असे ते स्पष्टपणे म्हणतात. ग्रहांची पीडा टाळण्यासाठी ग्रहशांतीचे यज्ञयाग केले जातात. ज्या धर्मग्रंथात ग्रहपीडानिवारणाचे कर्मकांड सांगितले जाते त्याविषयी तीव्र भाषेत टीका करतात."अहो त्यांच्या या भूमंडळावरील चतुष्पाद भाउबंदास म्हणजे बैलास जन्म देणा-या गायांसह मेढ्यांस अघोरी आर्यभट ब्राह्मण त्यांस खाण्याच्या निमित्ताने यज्ञामध्ये त्यांचा बुक्क्यांनी वध त्यांचे मांस गिधाडासारखे खात होते, त्यांच्याने त्यावेळी आर्यभट ब्राह्मणांचे काही नुकसान करवले नाही. तथापि हल्लीच्या सत्ययुगामधे जर गायामेंढ्यास जर ईश्वरकृपेने वाचा फुटली असती तर त्यांनी धूर्त आर्यातील ग्रंथकारांची नांवे ठेवण्यास कधीही मागेपुढे घेतले नसते."
अशाच जन्मनांव प्रकरणाचा समाचार महात्मा फुल्यांनी शंभर वर्षांपुर्वी घेतला. "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक" मध्ये फुल्यांनी बळवंतराव हरी साकवळकर यांच्या जन्मवेळेवरुन जन्मनांव कसे काढतात? यावरुन जन्मरास पत्रिका कशी मांडतात? याविषयींच्या प्रश्नाला विश्लेषणात्मक उत्तर दिले आहे. त्यावरुन त्यांना फलज्योतिषविषयक चांगली जाण होती हे दिसुन येते. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर " मानव स्त्री पुरुष जन्म होताना त्यावेळी नक्षत्रांचे कोणते चरण होते म्हणुन समजणारे लोक फारच विरळा. त्यातुन नक्षत्रांचा पहिला व दुसरा चरण संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर 'चे' याची 'ची' अथवा 'चु' याचे 'चे' होण्याचा संभव आहे. त्याच प्रमाणे अश्विनीची चार चरणे, भरणीची चार चरणे आणि कृत्तीकाचे पहिले चरण अशी एकंदरीत नउ चरणे मिळुन एक मेष रास होती. आता मेष व वृषभ राशीचा संधी होताना एक शतांश निमिषाची घालमेल झाल्याबरोबर वृषभ राशीची मेष रास अथवा मेषराशीची वृषभ रास होण्याचा संभव आहे. त्या सर्वांवरुन स्त्री पुरुषांचा जन्म होतेवेळी घंगाळाच्या पाण्यात वाटी टाकून घटका पहाणारे फारच थोडे. परंतु वाव अथवा कास-याने सुर्य अथवा रात्रीच्या तपा मोजणारे बहुत सापडतील.यावरुन आर्यातील ग्रहशास्त्रवेत्ते मुली मुलांच्या जन्मपत्रिका कोणत्या त-हेने वर्तवतात याविषयी एखादा अनुभव असेलच. याशिवाय आपण पेशवे सवाई माधवराव यांची जन्मपत्रिका वाचुन पहा. म्हणजे आर्य जोशांची ठकबाजी तुमच्या सहज लक्षात येईल."
वरील विवेचनावरुन फुल्यांनी केलेली टीका तर्कसंगत आहे हे लक्षात येते. नियतकालिकांच्या स्थळांच्या जाहिरातीत 'पत्रिका हवी' असा आग्रह धरणारे उच्च शिक्षित माणसे बघितली कि फुले काळाच्या अजुन ही पुढे आहेत की ही उच्चशिक्षित माणसे गतकाळात चालली आहेत. असा प्रश्न पडतो. सुशिक्षित माणसे मात्र पत्रिका जुळत नाही म्हणुन वधु - वरांना प्राथमिक फेरीतच बाद करतात.ज्या पायावर पत्रिकातयार होते तो पायाच किती डळमळीत आहे हे फुल्यांनी आपल्या विवेचनात दाखवुन दिले आहे. तत्कालीन समाजात तर फलज्योतिषाचे बडे प्रस्थ होते.. अशा परिस्थितीत लोकांची तर्कबुद्धी जागृत करण्याचा फुल्यांनी प्रयत्न केला. मोठी मोठी माणसे सुद्धा फलज्योतिषावषयी उघड टीका करीत नसत. कारण हा जनसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने फलज्योतिषात तथ्य नसल्याचे सांगणे त्यांच्या प्रतिष्ठेच्या, प्रतिमेच्या दृष्टीने हितावह नव्हते.
आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनातील सुख दु:खावर परिणाम होतो का? अशा आशयाचा प्रश्न जेव्हा फुल्यांना विचारला तेव्हा फुले म्हणतात," या सर्व विस्तीर्ण पोकळीत अनंत तारे आहेत. त्यापैकी आपल्या एका संनिध चे सुर्य आणि चंद्र हे उभयता या पृथ्वीवरील एकंदर सर्व जलचर,भुचर आणि वनचरांसह प्राणजिवन आहेत म्हणुन निर्विवाद आहेत व तसेच बाकी शनी वगैरे ग्रह एकट्या मानव स्त्री पुरुषांस पीडा देतात म्हणुन सिद्ध करता येत नाही. तसेच शनी वगैरे ग्रहांच्या संबंधाने एखादे वेळी या आपल्या पृथ्वीवरील एकंदर सर्व प्राणिमात्रास काही एक त-हेने हित अथवा अनहित होण्याचा जरी संभव आहे तरी ते एकंदरीत सर्व प्राण्यांपैकी फक्त मानव स्त्रीस अथवा पुरुषास पीडा देतात, म्हणुन सिद्ध करता येणार नाही. कारण शनीवरील एकंदरीत सर्व प्रदेश इतका विस्तीर्ण आहे की त्याच्या निर्वाहाकरिता चार चंद्र आहेत. व त्यास आपल्या सर्वांच्या निर्मिकाने नेमुन दिलेले उद्योग एके बाजुला ठेउन तो या भुमंडळावरील एखाद्या मानव व्यक्तीस पीडा देण्यास येतो, आणि ती पीडा टाळण्याकरिता अज्ञानी लोकांनी धुर्त आर्य भट जोशास भक्कम दक्षिणा दिल्याने दुर होते., ही सर्व पोटबाबु आर्य जोशांची लबाडी आहे."
फुल्यांनी फलज्योतिषाच्या मूळ सिद्धांतावर हल्ला चढवला. त्याकाळी फुल्यांनी स्वीकारलेला वैज्ञानिक दृष्टीकोण आज आपल्याला स्वीकारणे जड जाते. फुल्यांच्या काळात नउवारी साडी नेसणारी स्त्री शनी पीडा देईल साडेसातीत शनीला तेल घालण्यासाठी ज्या भीतीपोटी जात होती त्याच भीती पोटी आजची स्लीवलेस ब्लाउज घालणारी, बॊबकट केलेली ललना शनीला जाते.
जन्मवेळ कुठली मानावी याविषयी प्रतिपादन करताना फुले म्हणतात," याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी या कामी केवळ आपली पोटे जाळण्याकरिता ज्योतिषशास्त्रात हे मनकल्पित थोतांड मुख्य उभे केले आहे. कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
यावरुन फुल्यांनी फलज्योतिषविषयक आपली भुमिका किती स्पष्ट व तर्कशुद्ध मांडली आहे हे दिसते.आपला फलज्योतिषावर विश्वास नाही अशि साधारण भुमिका न घेता इतरांनीही विश्वास ठेउ नये म्हणुन कारणमिमांसा करुन लोकांमध्ये चिकित्सक दृष्टीकोन जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. महात्मा फुल्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्याकाळी टीकेसाठी लागणा-या शब्दांसाठीही तडजोड स्वीकारली नाही. युवापिढीने त्यांचे विचार आचरणात आणणे हीच त्यांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल.
पुर्वप्रसिद्धी- महात्मा फुले विचार आणि वारसा -संपादक युनिक फिचर्स
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 2:24 pm | विसोबा खेचर
परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
हम्म! थोडक्यात म्हणजे मांडीवर डोके ठेऊन झोपण्याच्या वेळांची नोंद करून ठेवायला हवी..! ;)
आपला,
(वक्तशीर!) तात्या.
23 Apr 2009 - 2:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
म. फुल्यांचे नाव आधीही "गुरूस्थानी" होतेच, आता असं करण्याला "शास्त्राधार" मिळाला.
म. फुल्यांची पुस्तकं कुठे दुकानात मिळतात का अजून?
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
23 Apr 2009 - 4:37 pm | प्रकाश घाटपांडे
फुले आंबेडकरी साहित्य हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे
प्रा विलास वाघ, उषा वाघ, सुगावा प्रकाशन ५६२ सदाशिव पेठ,चित्रशाळा बिल्डिंग भानुविलास चौक पुणे
दुरध्वनी ०२० २४४७८२६३
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Apr 2009 - 5:47 pm | विसुनाना
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अनेक द्रष्टे समाजसुधारक होऊन गेले. सनातन मतांच्या दबावाला न जुमानता प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस त्यांनी केले.
त्यांच्या पाऊलखुणांवर हमरस्ता बांधायचे सोडून आजचे गावगन्ना पुढारी त्यांवर देवळे बांधत आहेत, अज्ञानी भाविकांची गर्दी त्या पादुकांची पूजा बांधण्यात मग्न आहे आणि धूर्त पुढारी त्या थोर समाज सुधारकांचे लबाड पुजारी बनलेले आहेत -समाजातले नवे बडवे.
विचारवंत व्यक्तीचे विचारहीन विभूतीकरण हा या मातीला असलेला शाप आहे.
23 Apr 2009 - 8:44 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी मनातल बोल्ला ईसुनाना! आणि थोर विभुती ही देखील माणसेच आहेत.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Apr 2009 - 6:07 pm | शितल
म. फुले यांचे फलज्योतिष विषयक विचार छान मांडले आहेत.
:)
23 Apr 2009 - 10:32 pm | प्राजु
:)
म.फुल्यांच्या बद्दल आदर होताच. पण आता द्विगुणीत झाला असंच म्हणेन.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Apr 2009 - 11:37 pm | टिउ
खरंय!
24 Apr 2009 - 12:39 am | बेसनलाडू
कारण मानव स्त्रीयांच्या उदरात अथवा उदराबाहेर आलेल्या बालकाच्या मुख्य जन्मकाळाच्या दोन्ही वेळा नव्हेत. परंतु स्त्री पुरुष जेव्हा एकांत स्थळी रमतात, तेव्हा स्त्रीच्या उदरात मानव पुरुष आपल्या स्वत: स्वयंभु अवताराचे बीजारोपण करतो, त्याविषयी आर्यातील ग्रहशास्त्रवेत्त्यांनी स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते."
अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. नवजीवजन्म अशा एकाच बीजारोपणयत्नातून होईल, असे आहे का? मग अशा एक वा अनेक प्रयत्नांपैकी कोणत्या प्रयत्नाची वेळ ग्राह्य मानावी (नवजीवजन्म नक्की कोणत्या यत्नाचे फलित आहे, हे व त्यानुसारची वेळ हे कसे ठरवायचे)?
(जिज्ञासू)बेसनलाडू
अर्थात, ज्या काळात फुल्यांनी हे मत मांडले तो काळ, व त्या काळातील वैज्ञानिक प्रगती वगैरे मुद्दे विचारात घेता जास्तीत जास्त अचूक उत्तर मिळणे शक्य झाले नसेल, हेही खरेच! तरी गर्भधारणेची वेळ विरुद्ध प्रचलित, लौकिकार्थाने सर्वमान्य जन्मवेळ हा वाद रंजक आहे. त्याबाबतीत तरी गर्भधारणेची वेळ जन्मवेळ मानणे ही तर्कसंगती समजून घेता येईल. मात्र तेथे गर्भधारणानिश्चिती व त्यामागील प्रयत्नांची संगती यांबाबतचा वर मांडलेला मुद्दा बाकी उरतोच.
(समजूतदार)बेसनलाडू
24 Apr 2009 - 1:49 am | धनंजय
फुले यांनी अर्थापत्तीने सांगितले आहे, की पत्रिका उपयोगी असणार नाही.
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे.
"अतिरोचक/अतिधीट विधान वाटते. [=विधान म्हणते तसे नसावे]" ही फुल्यांनी सांगितलेली अर्थापत्ती आहे. फुले यांची तार्किक चूक मुळीच नव्हे!
(येथे "रेडुक्टियो आड आब्सुर्डुम" या तर्कपद्धतीला मी ढोबळमानाने "अर्थापत्ती अलंकार" म्हटले आहे.)
24 Apr 2009 - 2:05 am | बेसनलाडू
स्त्री-पुरुष संगाची वेळ बघून पत्रिका मांडावी, असा अर्थ काढणे योग्य नव्हे.
बरोबर! मलाही हेच वाटले सुरुवातीला की मी जे समजलो आहे, ते फुल्यांना म्हणायचे नसावे/त्यांचे मत अगर विधान नसावे. पण मी मूळ मजकुरातल्या स्त्री पुरुषांपासुन त्यांच्या रमण्याच्या वेळकाळांची नक्की बरोबर माहिती काढुन जर त्यांनी जन्मपत्रिका करण्याची वहिवाट घातली असती, तर त्यासर्वास गंमतीकरता या प्रसंगी बरे म्हटले असते या विधानाने सर्वाधिक गोंधळलो आणि समजण्यात चूक होऊन माझे मत मांडले, असे वाटते. असो.
(समजूतदार)बेसनलाडू
24 Apr 2009 - 7:09 am | प्रकाश घाटपांडे
खरी जन्मवेळ कुठली मानावी या मुद्यावर ज्योतिषीलोकांतच वाद होते. तर्कदृष्टीनं विचार केला तर ज्या क्षणी गर्भधारणा होते ती खरी जन्मवेळ मानली पाहिजे. पण ती वेळ खुद्द आईबापांनासुद्धा माहीत नसते! ;) बालक रडते म्हणजे पहिला श्वास घेते ती जन्मवेळ मानावी, असे आता मान्य केले आहे. पूर्वी बालकाचे डोके दिसणे, मूल पूर्णपणे बाहेर येणे, नाळ कापणे, अशा अनेक गोष्टीवरून जन्मवेळ ठरवीत असत.
या जन्मवेळेवरुन तयार केलेली पत्रिका ही ९ महिने ९ दिवस मागे सरकवायची आणि जी जन्मकुंडली बनेल त्याला आधान लग्न कुंडली म्हणायचे असा विचार ज्योतिषशास्त्रात काहींनी मांडला होता. परंतु तो वापरात नाही.
आमच्या माहिती नुसार स्त्री-पुरुष फलबीजनाची वेळ ही वैद्यक शास्रालाही अचुक काढता येत नसावी. धनंजय यावर अधिक विचार मांडु शकेल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Apr 2009 - 10:44 am | विसुनाना
आय. व्ही. एफ. करताना शतांश सेकंदापर्यंत अचूक वेळ (आण्विकीय घड्याळाशी ताडून) नोंदवता येईल.
अरे वा! प्रकाशराव, हा प्रयोग तुम्ही करून बघायला हरकत नाही.
वीस बालकांच्या आयव्हीएफ जन्मवेळ आणि ठिकाणानुसार पत्रिका बनवून त्यांचे भविष्य कितपत अचूक वर्तवता येते?
24 Apr 2009 - 11:45 am | प्रकाश घाटपांडे
आय व्ही एफ बद्द्ल जरा सविस्तर माहितीपर एखाद्या वेगळा लेख देता येईल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
24 Apr 2009 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
लवकर लिहा, वाट पहात आहे.
अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?