चका-या

नीलकंठ देशमुख's picture
नीलकंठ देशमुख in जनातलं, मनातलं
25 Dec 2021 - 1:21 pm

  'माझ्या मामाची रंगीत गाडी  हो|
तीला खिल्लार बैलाची जोडी हो||
अशी कविता शाळेतल्या पुस्तकात होती.आजोळ
शहरात असल्याने मामाच्या घरी बैल,गाडी वगैरे नव्हते. आमच्या कडे गावी बैलगाड्या होत्या.पण रंगीत नव्हत्या.
साध्या होत्या.बैल खिल्लार नव्हते.साधे,गावरान होते.
आमच्या घरी  कुठल्याही वस्तूचे असणे,चैनीसाठी
वा षौकासाठी नाही तर त्याची उपयुक्तता किती या निकषावर असे.बैल खिल्लार हवे,गाडी रंगीत हवी
असा आग्रह नसे.काम होण्याशी मतलब.
  शेतीकामात बैल आणि गाडी बहुपयोगी. त्यामुळे शेती वाल्याकडे बैल आणि गाडी अत्यावश्यक.कसलीही वाहतूक करा.धान्याचे पोते,गुळाच्या ढेपी,लाकूडफाटा,
काय वाट्टेल ते!अगदी उकीरड्यावरचे खतापासून ते शेताचे बांधावर लावायचे काटेरी फासा पर्यंत.
शेतात धान्य तयार झाल्यावर धान्याची पोते गाड्यावर लादून घरी येत.पहिली गाडी आली की दरवाजात गाडीची पुजा होऊन मगच पोते घरात घेतली जात.
गु-हाळात गुळाच्या ढेपीची पहिली खेप घेउन घरी आलेल्या बैलगाडीला पण हा मान मिळे.
प्रवासी वाहन म्हणूनही बैलगाडीचे मोल कमी नव्हते.
गाव मराठवाड्यात.पुर्वीचे निजामी राजवटीत.सुधारणांचे बाबतीत अर्थातच मागे.रस्ते,सडका,रेल्वे,बस आदी
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नगण्य.त्यामुळे प्रवासाचे
मुख्य साधन बैलगाडी,घोडागाडी हेच असे.आमच्या कडे
घोडा होता.घोडा गाडी(बग्गी)मात्र नव्हती.पण बैलगाड्या
सोबत एक टांगा ( प्रवासी वाहतुकीची टप असलेली छोटी गाडी) होता!
   बैलगाडी लांबच्या प्रवासासाठी किंवा खास प्रसंगी वापरली जाई तेव्हा तीचे रुप पालटत असे.प्रवास लांबचा असला की बैलगाडी हाकणा-या गड्याला (गाडीवान)बरीच पूर्व तयारी करावी लागे.गाडीची चाके,
त्यावरची लोखंडी धाव,दांड्या,जू आणि बैलानां जखडण्यासाठीची शिवळ (लाकडी दांडू),बैलाचे मानेला बांधायचे जोते (तागाचा विनलेला पट्टा) ,इ.गोष्टीची तपासणी करून सारे ठीकठाक असल्याची खात्री करून घ्यायची.गाडीत  बसणा-यास उन लागू नये,म्हणून  साठ्यावर(गाडीत बसण्याची जागा) वेळूच्या कामट्या किंवा फोक अर्धवर्तुळाकार बांधून त्यावर चादर वा घोंगडी टाकून छत करायचे.टांग्याला टप असल्याने त्यासाठी वेगळी तयारी करावी लागत नसे.
      लांबच्या प्रवासासाठी गाडीला चांगले धावणारे बैल जुंपले जायचे.गाडीचे साठयात बैलासाठी वैरण टाकून त्यावर सतरंजी अंथरायची.महत्वाचे प्रवासी असतील तर गादी,तक्क्याही असे.गाडीतील सामान व माणसे मागचे
मागे पडू नयेत म्हणून साठ्याचे मागील बाजू दोराने बांधून बंद करायची.
  एकदा गंम्मत झाली.आमची गाडी माळरानातून जात होती.वाटेवरच्या दगड,धोंडे,गोल गोट्यातून वाट काढत गाडी चाललेली.गाडीचे चाक एका मोठ्या दगडावर आदळले अन  पिशवीतल्या लाडवाच्या डब्याचे झाकण उघडून डब्यासकट लाडू जमिनीवर पडले.डबा दिसला.
पण लाडू दगडा धोंड्यात मिसळून गेले.लाडू कुठले अन गोटे कुठले हे कळेचना.मग काय,रीकामा डबा घेऊन गाडीत बसलो.आमच्या ऐवजी माळानेच लाडू खाल्ले.    
    गाडीवानाचे बाजूला बसून कासरा हाती घेऊन बैल पळवायला मजा वाटे.पण बैल पळवणे म्हणजे गाडी चालवणे नव्हे.वाटेवरचे खड्डे,खाचखळगे,एकारा टाळत बैलगाडी चालवावी लागते.एकारा म्हणजे एक बाजू खोल, दुसरीबाजू वर असलेला रस्ता.तिथे एक चाक खाली आणि दुसरे चाक वरती अशी परिस्थिती होते. अशा ठिकाणी गाडी उलटण्याची भितीअसते.
  गाडी चढावर असते किवा गाडीचे मागील भागात जास्त वजन असते तेव्हा गाडी,आमच्याकडील भाषेत, उल्लाळी येते.म्हणजे,गाडीचा मागचा भाग खाली जाऊन पुढचा भाग वर होऊन जू उचलले जाते.परिणामी बैलांचे गळ्याला  जोत्याचा फास बसतो.अशा वेळी मागच्या भागातील वजनदार मंडळी व सामान खाली उतरवून गाडीचा तोल सांभाळावा  लागतो.अशा प्रसंगी  गाडीवाल्यास कौशल्याने वाट काढावी लागते.कधी कधी समोरून  मोटार वाहन आले तर बैल बुजतात,उधळतात.
तेव्हाही  गाडीवाल्याचा कस लागतो.बैलांना काबूत ठेवण्यासाठी कासरा कधी ढिला करावा,कधी आखडावा,हे अनुभवानेच कळते.
  संसार गाडा हाकताना सुध्दा कासरा केव्हा  खेचायचा,केव्हा ढिला सोडायचा,केव्हा मोकळा सोडायचा हे ज्याला कळते त्याचाच संसार सुरळीत चालतो.एकंदरीत बैलगाडी काय वा संसारगाडी काय,हाकणे सोपे नसते ,ते कौशल्याचे काम आहे ,हेच खरे.असो.
     लग्नाचे व-हाड बहुतेक वेळेस बैलगाड्यातूनच जाई.अनेक बैलगाड्या एकामागोमाग एक निघत.
व-हाडात बैलगाड्या किती त्यावर व्याह्याची पत गावात मोजली जात असे.अमक्याचे लग्नाला इतक्या बैलगाड्यातून व-हाड आले ,वगैरे गप्पा ,लग्नानंतर अनेक  दिवस रंगत. बैलगाड्या व बैलांना सजवले जाई.अंगावर झुल,शिंगांना रंग,कपाळावर रंगीत गोंडे  गळ्यात  घुंगुरमाळा असा थाट केला जाई.उन्हापासून बचावासाठी गाड्यांवर टप टाकले जायचे.लांबचा पल्ला असेल तर वाटेत जेवण व विश्रांती साठी ताफा थांबे.
एखाद्या शेतात झाडाखाली, किंवा नदी ओढ्याचे काठी जेवणे होत.विश्रांती घेउन बैल,माणसं ताजीतवानी झाली की पुढे वाटचाल सुरू.गाड्यांची चढाओढही सुरू होई.
गाडीला तरणे बैल,तरणा गाडीवान,आणि तरणे प्रवासी असले की सगळ्यानांच जोर चढे.ती गाडी सहाजिकच पुढे जाई.या चढाओढीतून काही अनिष्ट प्रकार होउ नये म्हणून म्हातारी मंडळी चिंतित असत.सावधानीच्या सुचना देत,कधी शिव्याही.पण तरणे बैल,गाडीवान,व प्रवाशी सगळ्यांचेच नाकात वारे शिरलेले असे जुमानतो कोण? बैलाना पळवण्यासाठी काही गाडीवाले चाबूक,किंवा अनकुचीदार खिळा असलेली काठी पण वापरत. अघोरी प्रकार !मुके बिचारे बैल !कुणाला सांगणार?पळणे तेवढे त्यांचे हाती !की पायी.एकंदरीत
व-हाड मुक्कामी पोहचेपर्यंत,यजमानाचा जीव टांगणीला असे.
व-हाडाच्या गाड्यांच्या रांगा दिसताच, चित्रपटातून पाहिलेल्या रंगीत संगीत बैलगाड्या,त्या पार्श्वभूमीवर चित्रीत झालेली गाणी आठवत.अनेक चित्रपटातून कथानक पुढे सरकण्यासाठी  बैलगाड्यांचा वापर झालेला दिसतो.चित्रपटच नाही विविध साहित्यातूनही बैलगाड्या दिसतात, शुद्रकाचे 'मृच्छकटीक'पासून ,ते
श्री.ना.पेंडश्यांच्या 'तुंबाडचे खोत'पर्यंत  नाटक कादंब-यात ,बैलगाड्यांना महत्वाचे स्थान मिळाल्याचे दिसते.
अर्थात असे असले तरीही, वास्तवात मात्र लादलेले सामान वाहून नेणे हेच बैलगाड्यांचे नशीब!
  बीडला शिकायला होतो.तिन्ही काकांची घरे तिथे होती.
उन्हाळ्यात वर्षभरासाठीचे धान्याची, (ज्वारी,गहू,दाळी,)
इ.ची पोती भरून गावाकडून बैलगाड्या बीडला येत.
गावा पासून पन्नास पंचावन्न किलोमीटरअंतर.गाड्यांचा
वाटेत एक मुक्काम पडे.गाड्या येण्याची सुचना आधीच
मिळाली असल्याने घरी धान्य साठविण्यासाठी तयारी सुरू होई.गाड्या आल्या की वेगळीच गडबड असे.सोबत आलेले गडी गाड्यातील पोते उतरवून ज्या त्या घरी  पोहचवत.लावून देत.रात्री मुक्काम करून दुसरे दिवशी परत जात.
  गावाकडच्या गाड्या,बैल आणि सोबतचे गडी पाहून खूप आनंद होई.मग गाडीत बसायचे,बैलाना वैरण घालायची,गड्यांशी गप्पा मारायच्या.गावाची आठवण होई.तिथे असलेले आई वडील आठवत.त्याच गाड्यात बसून गावी जावे  वाटायचे.पण ते शक्य नसायचे.शाळेत कोण जाणार?
सुट्टी लागायचे आधी गावी जायचे वेध लागायचे. कुणाबरोबर तरी,अमुक दिवशी येणार असा निरोप गावी  पाठवायचा.सडकेपासून गाव चार किलोमीटर दूर. सामान घेऊन पायी जाणे शक्य नसे.त्यासाठी आधी निरोप देऊन बसथांब्यावर गाडी बोलवावी लागे.
ठरलेल्या दिवशी बैलगाडी घेऊन गडी थांब्यावर येऊन बसलेला असे.गावी जाण्यासाठी बसमधे बसताच ,गावी
निरोप मिळालाअसेल का?गाडी आलीअसेल का?असे विचार सुरू होत.आडगावचा थांबा दिसू लागताच डोळे गाडी शोधू लागत.निर्मनुष्य थांब्यावर लिंबाच्या मोठ्या झाडाखाली चहाची एकमेव झोपडी होती.तिच्या मागे सोडलेली गाडी ओळखीच्या बैलजोडीमुळे ओळखू येई.
बस थांबताच,'मन आनंद आनंद छायो 'या अवस्थेत,
कंडक्टरच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत,घाईघाईत उतरून गाडीकडे धाव घ्यायची.गाडीला बैल केव्हा जुंपतात अन केव्हा निघते असे होई.गाडी सुरू होताच  कासरा हाती घेऊन बैल पळवायचे.केव्हा घरी पोहचू  असे होई.मन मात्र गाडीच्या आधीच पोहचलेले असे .
हे नीत्याचे!बैलगाडीशी भावनिक नाते जुळायचे हे एक
कारण असावे .
  हल्ली अनेक मोठ्या  शहराजवळ ग्रामीण वातावरण असलेले विश्रांतीस्थाने निघाली आहेत.हुरडा फार्म वगैरे.
अशा ठिकाणी बैलगाड्यातून फिरवून आणले जाते. अनेकजण ती  सफर करतात.पैसे मोजून !ग्रामीण जीवनाचा अनुभव पैसे देऊन घेता येत नाही.हे म्हणजे दुधाची तहान ताकावर! बालपण गावी गेल्यामुळे,
मला ग्रामीण जीवन अनुभवता आले.
   गावी बलुतेदारी पध्दत होती.सुतार त्यातला एक. शेतीसाठी लागणारी अवजारे तयार करणे,दुरुस्ती ही कामे तो करत असे.गाडी तयार करायचे काम सुताराचेच. पण ते बलुत्याचे कामात मोडत नसे.शिवाय प्रत्येक सुताराला गाडी तयार करणे जमेलच असे नसे.
बैलगाडी तयार करणे कौशल्याचे काम.ठराविक
कारागिरानांच जमे.तो बलुतेदार असला तरी गाडी बनवण्याचा मोबदला वेगळा असे.त्याविषयी सुतार व खरेदीदारात ठराव होई. गाडीसाठी बाभळीचे लाकूड उत्तम.नाहीतर कडूलिंबाचे.ते शेतकऱ्यांकडे उपलब्ध असले तर ठीक.नाहीतर झाड विकत घ्यायचे .झाडाची कटाई करून मग शहरातील मीलमधून लाकूड हवे तसे कापून आणायचे.लाकडाच्या कापलेल्या जाड पट्टया जोडून चाके तयार करायची.त्यावर लोहाराने तयार केलेली लोखंडी धाव बसवायची.ते चाकाचे सुरक्षा कवच.
गाडीचा भार 'आखावर(एक्सल)असतो.आखामधून
आरपार लोखंडी कांब घुसवलेली असते.त्या कांबेची  दोन्ही कडच्या बाजूची टोके,चाकांच्या मध्यभागाचे (तुंब) छिद्रातून बसवायची .आखाचे समोर, तीन एकत्रित दांड्या(आखरी) जोडायच्या.हा गाडीचा ढाचा .
बसण्यासाठी ,माल ठेवण्यासाठी( साठवण) ,लाकडी
पट्टया व फळ्याजोडून साठा तयार होतो.गाडीच्या
ढाच्यावर साठा बसवून दांड्यांना जाड तारांनी बांधायचा.झाली गाडी तयार.या पूर्ण प्रक्रियेत सांधणी,
बांधणी,जोडणी,उभारणी,ही कामे वेळकाढू आणि बारकाईने करायची असत.ते काम सुरू असताना  पाहायला पण मजा येई.आणि वेळही जाई.वेळ घालवायला आणि फुकटची मज्जा पाहायला इच्छुक मंडळी गावी भरपूर असत.खेड्यांमधे जेवढे श्रम करणारे
असत त्यापेक्षा जास्त संख्येने  रीकामटेकडे असत.आज पण त्यात काही बदल झाला असेल असे नाही.
  चाकांच्या तुंब्याची घर्षणाने होणारी झीज टाळण्यासाठी त्यात 'वंगण'घालायचे.हे काळसर चिकट तेल,एरंडाचे बीया उकळून तयार केले जाते.आमच्याकडे वर्षातून एकदा,घराशेजारीच असलेल्या गायवाड्याचे मोकळ्या जागेत, दगड मांडून केलेल्या चुलीवर वंगण तयार करत असत.तयार वंगण मोठ्या डब्यात साठवले  जाई.त्यातून गाडीला लागेल तेवढे नळ्यात घेतले जाई.बांबूची पोकळ नळी कापून हा बाटलीवजा नळा तयार करतात.जाड तारेला चिंधी बांधून त्याचे  साहाय्याने नळ्यातून वंगण काढून चाकाचे मधल्या पोकळीत घालायचे.नळा कायम गाडीला अडकवलेला असतो.म्हणूनच 'गाडी बरोबर नळ्याची यात्रा' हा वाक्यप्रयोग प्रचलित झाला असावा.
   बैल जोडल्याशिवाय नुसत्या गाडीचा उपयोग नाही.बैल ज्याला जुंपतात ते 'जू 'समोरच्या दांड्याला चामडी नाड्याने (येठण)अथवा जाड दोराने आडवे बांधायचे.
बैलाचे मानेवर जू चढवून जोते मानेला बांधायचे आणि जू मधे घातलेल्या शिवळाला आडकवायचे.मानेवर जू अडकवलेल्या  बैलांना गाडी सोडून जाता येता नाही.
ओढा गाडी निमुटपणे! गाडीच्या  सरंजाम्यात एक छोटी पण अति महत्वाची वस्तू म्हणजे 'कुनी '.चाक निखळू नये म्हणून त्याला लॉक करायची लोखंडी  किल्ली! ही निसटली तर गाडी  उलथनार!
        युध्दभुमीवर राजा दशरथाच्या चालत्या रथाचे  निखळत असलेले चाक सोबत असलेल्या कैकयीने  हाताने सावरले ,म्हणून दशरथ युध्द जिंकू शकला व त्याने  प्रसन्न होऊन तीला दोन वर दिले.त्या वरांमुळेच पुढील रामायण घडले .रथाच्या चाकाची 'कुनी ' निसटल्यानेच तो प्रसंग ओढावला असावा.अशी ही कुनी.तीने वर्तमानातून भूतकाळात नेले.अगदी पुराणकाळात!
गाडी पुढे जाताना मागे सुटणा-या चाकांच्या खुणा  म्हणजे चाका-या किंवा चाको-या!चाक पुढे सरले की उरणा-या!आयुष्य जगताना ,वर्तमान क्षण संपला की तो भूतकाळात जमा होतो.त्याही चका-याच! त्यांचा मागोवा घेत मन मागे जाते.बालपणात.तेंव्हाचा गाव,ती गल्ली,ती माणसे,तो गजबजलेला वाडा आणि आईवडील! सारे सारे दृश्यमान होते.बैलगाड्यासकट!ते फक्त पाहायचे.
मनाने.वर्तमानात मात्र काही आणता येत नाही.
चका-यांना वर्तमान काळ नसतो.
                        नीलकंठ  वसंतराव देशमुख

मुक्तकअनुभव

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

25 Dec 2021 - 1:33 pm | ॲबसेंट माइंडेड ...

छान.

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 9:30 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

सरिता बांदेकर's picture

25 Dec 2021 - 2:11 pm | सरिता बांदेकर

तुमच्यामुळे खेडेगांवातील जीवन कसं होतं ते कळतं.
अगदी डोळ्यासमोर ऊभा राहिला गांव.
मी फक्त कोकणातलं खेडेगांव बघितलंय.
त्यामुळे आणखीन जास्त आवडलं.

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 9:30 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार

Bhakti's picture

25 Dec 2021 - 5:02 pm | Bhakti

खुप छान !

सोत्रि's picture

25 Dec 2021 - 6:26 pm | सोत्रि

झक्कास जमलाय लेख.

आमच्या हिऱ्या - पाखऱ्याचा आठवणी जाग्या होऊन डोळे अंमळ पाणावले. माळावरच्या देवीला, लग्नाला, आठवड्याच्या बाजारासाठी, लग्नानंतरच्या देवदेवासाठी हिऱ्या - पाखऱ्या जोडलेल्या बैलगाडीतून सगळ्या बालपणीच्या उन्हाळी सुट्ट्या सार्थकी लागत!

- (कासरा धरून बैलगाडी चालवलेला) सोकाजी

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 9:34 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. तुम्हीपण कासरा धरून बैलगाडी चालवली आहे..हे वाचून छान वाटले.

सुबोध खरे's picture

25 Dec 2021 - 7:22 pm | सुबोध खरे

त्यात 'वंगण'घालायचे.हे काळसर चिकट तेल,एरंडाचे बीया उकळून तयार केले जाते

कॅस्ट्रोल हे वंगण तयार करणारी कंपनीचे नाव सुद्धा कॅस्टर ऑइल (म्हणजेच एरंडेल तेल) वरून आलेले आहे.

एरंडेल तेलात असलेले रिसिनॉलिक आम्ल यामुळे ते रेचक आहे.

तसेच त्याला किडे मुंग्या लागत नाहीत. शिवाय थंडीत ते गोठत नाही आणि घर्षणाने गरम झाले तरी जास्त पातळ होत नाही यामुळेच चाकातील वंगण म्हणून ते अतिशय उपयुक्त आहे

हे आपल्याला प्राचीन काळापासून माहिती असल्याने वंगण म्हणून एरंडेल तेल प्राचीन काळापासून भारतात वापरले जात आहे.

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 9:35 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. कॅस्ट्रॉल विषयी नवीन माहिती मिळाली

टर्मीनेटर's picture

26 Dec 2021 - 4:01 pm | टर्मीनेटर

फार छान लिहिलंय!
प्रत्यक्षात न बघितलेलं ग्रामीण जीवन डोळ्यांसमोर समोर उभं केलंत 👍

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 6:27 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल

श्रीगणेशा's picture

26 Dec 2021 - 4:37 pm | श्रीगणेशा

खूप छान. "चकाऱ्या" शीर्षकही आवडले.

वडिलांकडून ऐकलेल्या त्यांच्या काळातील बैलगाडीच्या आठवणींशी मिळत्या-जुळत्या.
लहानपणी चुलत भावांसोबत बैलगाडीतून मी केलेला प्रवास, गमतीजमती आठवल्या. कासरा वापरून बैलगाडी वळते कशी याचं मला भारी कौतुक वाटायचं. मी सगळ्यात लहान, त्यामुळे गंमत म्हणून भावंडं मला दोन जू च्या मधोमध बसवायचे, भीती वाटायची खूप.
धावणाऱ्या बैलगाडी मागे पळत पळत जाऊन उडी मारून बसण्यातही एक वेगळीच गंमत असायची.

नीलकंठ देशमुख's picture

26 Dec 2021 - 6:26 pm | नीलकंठ देशमुख

आभारी आहे आपल्या प्रतिसादाबद्दल

चौथा कोनाडा's picture

26 Dec 2021 - 8:42 pm | चौथा कोनाडा

अ ति शय चित्रदर्शी !
अगदी डोळ्यासमोर ऊभा राहिला गांव.

नीलकंठ देशमुख's picture

27 Dec 2021 - 4:43 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद. उत्साह वाढतो अशा प्रतिक्रियांमुळे

ज्ञानोबाचे पैजार's picture

27 Dec 2021 - 9:03 am | ज्ञानोबाचे पैजार

बैलगाडी बद्दल इतकी सविस्तर माहिती पहिल्यांदाच वाचनात आली.

बैलगाडीत बसण्याचे प्रसंग फारच क्वचित आले आहेत, त्या मानाने टांग्यात बर्‍याच वेळा बसणे झाले आहे. बैलगाडी ही टांगा गाडी पेक्षा फारच जास्त वजनदार आणि दणकट असते.

पैजारबुवा,

नीलकंठ देशमुख's picture

27 Dec 2021 - 4:42 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार

गोरगावलेकर's picture

27 Dec 2021 - 7:45 pm | गोरगावलेकर

शेतातला वेचलेला कापूस बैलगाडीत भरून घरी आणतांना त्याच्यावर उंचावर बसून केलेला लहानपणीचा प्रवास डोळ्यासमोर उभा राहिला.

नीलकंठ देशमुख's picture

27 Dec 2021 - 9:38 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद लिखाण वाचून तुमच्या आठवणी जाग्या झाल्या .छान वाटले

कर्नलतपस्वी's picture

27 Dec 2021 - 10:26 pm | कर्नलतपस्वी

लोखंडी धाव आणी घोड्याची नाल,

बैलगाडी जरी सुतार बनवत आसला तरी धाव बसवणे एक जाँईट व्हेन्चर आसायचे.तासंनतास बघत बसणे एक मजेदार काम. तसेच घोड्याला आडवे पाडून चारही पाय बांधायचे आणी त्याच्या खुरांना नाल ठोकायचे हे सुद्धा आम्ही करमणूक म्हणून तासनतास बघायचो.

बैलगाडी बरोबर वंगण हे बांबूच्या पेरात म्हणजे नळीत भरुन ठेवायचे आणी एका जाड तारेला चिध्यां बांधून त्यात बुडवून ठेवायचे. वेळोवेळी चाकात टाकत आसे.

बैलगाडी बरोबरच "गाडा" पण मोठमोठ्या शेतकरी ठेवायचे ते गावातल्या जत्रे मधे शर्यती मधे पळवायचे त्याचे बैल सुद्धा खिल्लारी स्पेशल असायची. त्याची घडण बैलगाडी पेक्षा वेगळी असते. चाक भरीव, छोटे आणी त्याला आरे नसतात. याची उंची खुपच छोटी व फक्त "चँसीस" आसते. या मधे प्रवास करता येत नाही. याचा वापर फक्त जत्रेतील शर्यतीत आणी हे ऐकेकाळी "स्टँटस सिम्बॉल " होते.

गाड्या बरोबर नळ्याची यात्रा ही म्हण बैलगाडी व त्या बरोबर आसलेल्या वंगणाच्या नळ्यावरून प्रचलनात आली आहे.

नीलकंठ देशमुख's picture

28 Dec 2021 - 9:31 am | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. छान वाटले.आपण गाडा म्हटले त्याला विदर्भात रिंगी म्हणत असावेत. आमच्याकडे मराठवाडय़ात किंवा बीड जिल्ह्यात असे गाडे पाहिल्याचे मात्र आठवत नाही.

चौथा कोनाडा's picture

28 Dec 2021 - 6:12 pm | चौथा कोनाडा

नाल ठोकणे हा प्रकार बालपणी एक दोनदा पहिला होता.
रात्री स्वप्नं पडायची, आपलेही पाय बांधून तळपायाला नाल ठोकताहेत.
...... मग नंतर हे असलं पाहण्याचे धाडस झाले नाही !

नीलकंठ देशमुख's picture

28 Dec 2021 - 8:33 pm | नीलकंठ देशमुख

अघोरी प्रकार आहे असे आता कळतय तेव्हा वाटतंय..

सौन्दर्य's picture

28 Dec 2021 - 12:08 am | सौन्दर्य

लेख छान लिहिला आहे. बैलगाडीविषयी व तिच्याशी निगडित ग्रामीण जीवनाची बरीच माहिती मिळाली. माझा जन्म व आत्तापर्यंतचे आयुष्य शहरातच गेले त्यात आम्हाला गाव नाही, त्यामुळे बैलगाडीशी संबंध कधीच आला नाही. नाही म्हणायला मुंबईत चाळीसेक वर्षांपूर्वी केरोसीनची वाहतूक करायला बैलांचा वापर केला जात असे, तेव्हढीच बैलगाडीची ओळख. बाकी पुस्तकातील चित्रे, सिनेमातील दृश्ये वगैरे माध्यमातूनच बैलगाडीचा परिचय.

'गाडी बरोबर नळ्याची यात्रा' ह्यातील नळ्यावर प्रकाश पाडल्याबद्दल धन्यवाद.

एक सूचना - लेखातील परिच्छेद वगैरे नीट मॅनेज करता आले तर बघा. अनेक ठिकाणी अनेक ठिकाणी तीन-चार शब्दानंतर वाक्य पुढच्या ओळीत पूर्ण होते तेथे वाचताना अडखळल्यासारखे होते. बाकी लेख सुंदर. असेच लिहिते रहा.

नीलकंठ देशमुख's picture

28 Dec 2021 - 9:35 am | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. लिखाणातील परिच्छेद व्यवस्थापनाच्या सुचनेचा निश्चित विचार करतो.मोबाईल वर टंकलेखन आणि त्याचे संपादन करताना काही तांत्रिक बाबी अडचणीच्या वाटतात.प्रयत्न करून पण हवे तसे होत नाही. तरीही शक्य ती खबरदारी घेईन.

सिरुसेरि's picture

7 Jan 2022 - 6:19 pm | सिरुसेरि

जुन्या काळातील ग्रामीण जीवनाचे सुरेख वर्णन . पुर्वी सारवट बैलगाडीतुन केलेल्या छोटेखानी प्रवासाची आठवण झाली .

नीलकंठ देशमुख's picture

8 Jan 2022 - 8:41 pm | नीलकंठ देशमुख

धन्यवाद प्रतिसादाबद्दल. चांगले वाटले वाचून

सौंदाळा's picture

8 Jan 2022 - 12:27 pm | सौंदाळा

मस्त लेख
खूप पूर्वी आमच्या कॉलनीच्या एकदम शेवटी (पिपंरी मध्ये) एक कच्चे घर होते आणि त्यांची काही जमीन पण होती. घरी बैलगाडी पण होती. आम्ही शाळेतून येताना ते काका कधी कधी बैलगाडीतून येताना दिसत. आम्ही त्यांना लिफ्ट मागायचो आणि घरी यायचो. बैलगाडीशी आलेला संबंध तेवढाच. आता काका गेले, मुलाने मोक्याच्या जागेवर असलेली जमीन विकली आणि गुंठामंत्री झाला.

नीलकंठ देशमुख's picture

8 Jan 2022 - 8:44 pm | नीलकंठ देशमुख

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
जमीन विकून टाकण्याचे प्रमाण खूप आहे.शेतीची व शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे.
शक्य असेल तर महाराष्ट्रातील किमान पंचाहत्तर टक्के लोक जिरायत जमीन विकायला तयार होतील.

Nitin Palkar's picture

9 Jan 2022 - 8:00 pm | Nitin Palkar

जन्मापासून संपूर्ण आयुष्य शहरात गेलेल्या माझ्यासारख्यांना हे पूर्ण विश्वच अनोखं आहे. लेख खूप आवडला. 'अणकुचीदार खिळा असलेली काठी पण वापरत' याला माझ्या माहिती प्रमाणे 'पराणी' म्हणतात.

नीलकंठ देशमुख's picture

9 Jan 2022 - 8:06 pm | नीलकंठ देशमुख

खूप धन्यवाद.
पराणी,बरोबर असावे. मला तेव्हा आठवले नाही.