काका गेले, ते हि शेवटची भेट न होऊ देता हे अजूनही खरं वाटत नाहीये, मात्र ते गेलेच हि वस्तुस्थिती मात्र स्वीकारायलाच हवी आहे. काही विस्कळीत तर काही पक्क्या आठवणी सतत मनात रुंजी घालत आहेत.
तसा चौराकाकांचा आणि माझा परिचय ते मिपावर आल्यापासूनचा, सुमारे नऊ, साडेनऊ वर्षांपूर्वीपासूनचा. त्यांचं घर माझ्या घरापासून अगदी चालत जाण्याच्या अंतरावर. कित्येकदा आम्ही भेटत असू. चिंचवड टेल्कोसमोरच्या गल्लीत असलेल्या इमारतीत ते राहात. "काका, मी येतोय, कट्ट्यावर या" असं मी त्यांना फोन करत असे. ते लगेच येत. तिथल्या आयडिया शोरुमच्या पायर्यांवर आम्ही गप्पा मारत बसत असू. सोबतीला बरेचदा नाखु, कधी प्रशांत, कधी मोदक, कधी धन्या तर कधी बुवा असत. पाचेक वर्षांपूर्वी ते आकुर्डीला नव्या घरी शिफ्ट झाले तरीही गप्पांचा फड त्यांच्या जुन्या घराच्या जवळच बसत असे. कोविडच्या आगमनानंतर मात्र ह्या भेटीगाठी थांबल्या, मात्र त्या कायमच्याच थांबतील असं वाटलं नव्हतं.
काका हरहुन्नरी माणूस, घराचा रंग त्यांनी स्वतः दिला, घराचे वॉलपेपरही त्यांनी स्वतः चिकटवले, घराचं इंटेरियर त्यांनी स्वतः केलंय. अगदी करवतीने लाकडी फळकूटं कापून त्यांना आकार देऊन, त्याच्या पाठीमागे लाईट्स वगैरे सोडून त्यांनी घराला प्रचंड देखणेपण दिलं हे ज्यांनी ज्यांनी त्यांचं घर पाहिलंय ते सांगू शकतात. ते बजाज ऑटोमध्ये नोकरीला होते, नंतर व्हॉलंटरी घेऊन त्यांनी सर्व आयुष्य आपल्या छंदांसाठी झोकून दिलं. त्यांना फिरण्याची फार आवड. जवळपास आख्खा भारत त्यांनी पाहिला आहे. बर्याच सहली त्यांनी कुटुंबीयांसहित तर काही एकट्यानेच केल्या आहेत. कमीत कमी खर्चात त्यांनी युरोप कसा पाहावा हा आदर्श ठेवला. त्यासाठी जवळपास वर्ष दीड वर्ष पुरेपुर अभ्यास, म्हात्रेकाकांसोबत त्याविषयी अनेक चर्चा त्यांनी केल्या व जिद्दीने त्यांच्या पत्नीसहित युरोप सफर पूर्ण केली ज्याचे वर्णन त्यांनी आपल्यासाठी मिपावर ठेवून दिले आहे.. आता मागच्याच महिन्यात ते हंपी, लक्कुंडी आणि चित्रदुर्गला जाऊन आले तेही एकट्यानेच, ती त्यांची शेवटचीच सफर ठरेल असे वाटले नव्हते.
'समानशीले व्यसनेषु सख्यं' ह्या नात्याने आमची मैत्री झाली. खरं तर ते वडीलांच्या वयाचे, मात्र हा वयातील हा फरक त्यांनी कधी जाणवूच दिला नाही. साहित्य, कला, संस्कृती, इतिहास, महायुद्धे, चित्रपट, शास्त्रीय संगीत, शृंगार आधी विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा होत असत. एकदा पुण्यात कुठल्यातरी कट्ट्याला ते माझ्याबरोबर बाईकवर आले होते. येतांना त्यांनी चित्रपटातील विविध गाणी कुठल्या रागांवर आधारीत आहेत आणि ते राग कसे ओळखायचे हे स्वतः गाऊन ऐकवत होते. त्यांचे वास्तुकलेवर नितांत प्रेम. हंपी, हळेबीडू, बेलुरु, ओर्छा हे त्यांच्या विशेष आवडीचे. ते मला खूपदा म्हणत की तू ओर्छा आवर्जून बघ. ओर्छा त्यांच्या विशेष आवडीचे. ते म्हणत 'तिकडे तुझ्या त्या मूर्ती नाहीत, पण तिथले ते भव्यदिव्य प्रासाद, त्यांची जाळीदार गवाक्षे, नक्षीदार सज्जे अगदी आवर्जून बघण्यासारखे आहेत'.
चौराकाकांसोबत कित्येक सहली झाल्या. भुलेश्वर, सासवड, भाजे, बेडसे अशा कित्येक. त्यांचासोबत फिरणे म्हणजे एक अनुभव असायचा, त्यांचं सर्व विषयातलं ज्ञान, नवीन काही शिकण्याची आवड, त्यांचे इरसाल, हिरवट बोलणे. जे जे त्यांच्यासोबत फिरलेत त्यांना माहीत आहेच. काकांचा देवावर विश्वास नव्हता, माझ्यासारखेच ते ही नास्तिक, मात्र मंदिरे, लेणी पाहायला त्यांना खूप आवडत. काकांना खाण्याचं वेड फारसं नव्हतं. अगदी साधं जेवण त्यांना लागत असे. इकडे बरेचदा कट्टे होत असत मात्र ते जेवणासाठी कधी थांबायचे नाहीत. त्यांचे पथ्यपाणी ते करत असल्यामुळे अगदीच अपवाद वगळता ते त्यांच्या घरीच जेवायला जात असत.
चौराकाका एका प्रसन्न क्षणी
गोनीदा आणि ओपी ह्यांच्याविषयी बोलायला चौराकाकांना फार आवडत असे. तळेगावी ते गोनीदांना भेटले होते त्यांचे किस्से ते नेहमीच सांगत असत. ओपींबद्द्लचं त्यांच प्रेम तर इथे सर्वज्ञात आहेच. चौराकाकांना छायाचित्रण करायला देखील फार आवडे. त्यांनी स्वतः ते सगळे शिकून घेतले होतेच शिवाय फोटोशॉप आदी पोस्ट प्रोसेसिंग विषयक कला देखील त्यांनी शिकून घेतल्या होत्या. त्यांच्या घरच्या संगणकावर ते सगळं करत बसत.
मध्यंतरी लॉकडाऊनमध्ये आमच्या भेटीगाठी बंद झाल्या आणि ते ही घरात अडकून बसले तेव्हासुद्धा त्यांनी संगणकावर बसून जगाच्या व्हर्च्युअल सफरी केल्या.
लेबेनॉनमधील बालबेक येथील ख्रिस्तपूर्व १५ ते ख्रिस्ताब्द ३०० काळामधील जी रोमन बांधकामे झाली त्यात वापरलेला सर्वात मोठा दगड ६८ * १४ *१४ फूट असून एकूणात १५०० टनाचा महाप्रचंड ठोकळा आहे तो पाच मैलांवरुन कसा आणला ह्याचे त्यांना नेहमीच कुतूहल वाटे व त्याविषयी आमची चर्चा घडे. कधी ते पनामा, इक्वेडोरच्या व्हिंटेज ट्रेनमधून प्रवास करत तर कधी चितकल, कौसानी येथून हिमालय दर्शन घेत असत, कधी ते थेट एव्हरेस्ट, अन्नपूर्णेच्या शिखरावर जात असत तर कधी मॅकेन्नाज गोल्ड मध्ये दिसलेल्या स्पायडर रॉकवर जात असत. कधी ते अॅरीझोनाच्या ग्रॅन्ड कॅनियनमधून फेरफटका मारत तर कधी ते इटलीच्या मध्ययुगीन कालखंडातल्या लुक्का गावाची सफर करुन येत.
त्यांची एक खंत कायम असे की भारतात नैसर्गिक आश्चर्ये जवळपास नाहीत. एक हिमालय, लोणार सोडल्यास फारसे काही नाही असे त्यांचे म्हणणे असे. ह्या विषयावर मात्र मी सहमत नसे. सांधण दरी, सह्याद्री, निघोजची रांजणकुंडे, लोणावळे, आंबवण्यात असलेली एक सरळसोट २०/२२ किमीची लांबच लांब अशी भूभागाला पडलेली भेग जी फक्त आकाशातूनच दिसते ती मी त्यांना दाखवत असे.
अगदी अलीकडे त्यांनी शिल्पकाम देखील केले होते. ते म्हणाले होते, " माझे आजोबा रत्नागिरी येथील प्रसिद्ध पेंटर व मूर्तीकार होते, ते रक्त आपल्यात आहे की नाही हे आजमावण्याचा ६८ वय चालू असताना माझा प्रयत्न आहे. "
त्यात ते अगदी पूर्णपणे यशस्वी झाले होते. त्यांनी केलेल्या ह्या शिल्पांचे कच्चे काम आणि पूर्ण झाल्यानंतरचे काम पाहा.
त्यांच्या मनात अजून खूप काही करायचे होते, खूप काही बघायचे होते. दुर्दैवाने त्यांना मृत्युने उचलून नेलं, मात्र त्यालाही ते हसत हसत, आनंदानेच सामोरे गेले असतील हे निश्चित. त्यांच्या कुटुंबियांना मात्र हा आघात सहन करायची शक्ती मिळो हीच इच्छा. असा माणूस पुन्हा होणे नाही.
प्रतिक्रिया
21 Nov 2021 - 5:49 pm | चित्रगुप्त
प्रचेतस, चौरांना साजेशी श्रद्धांजली तुम्ही लिहिलीत. त्यांच्या कुटुंबियाना जाऊन भेटण्याची काही योजना आहे का ?
ओर्छाला मी पाच वेळा जाऊन राहिलेलो असलो तरी याबद्दल चौरांशी कधी बोलणे कसे झाले नाही, याचे आश्चर्य तुमचा लेख वाचून वाटत आहे. त्यांनी केलेल्या शिल्पांबद्दलही या लेखातूनच समजले. रोमला जाऊनही पत्नीचा बूट तुटल्याने व्हॅटिकन बघता न आल्याची हळहळ त्यांना वाटत असे.
फोटोंपैकी वरचा पाताळेश्वराचा कट्टा हा मी हजेरी लावलेला एकमेव मिपा कट्टा. तेंव्हाच तुम्हा सर्व मंडळींना पहिल्यांदा भेटलो होतो. त्यानंतर फक्त एकदाच चौरांची भेट झाली पण ते नेहमी म्हणायचे की दोन-तीन दिवसांसाठी या, मग खूप गाना - बजाना, चित्रकला वगैरेवर गप्पा करू. ते ज्या सोसायटीत रहात, तिथले इतर सगळे लोक नीरस, कोणत्याही कलांमधे रूचि नसल्याचेही त्यांना वैषम्य वाटायचे आणि कलासक्त, रसिक मंडळी आपल्याकडे यावीत असे फार वाटायचे. आता वाटते की आपण त्यासाठी मुद्दाम पुण्याला जायला हवे होते.
21 Nov 2021 - 6:02 pm | प्रचेतस
त्यांच्या कुटूंबियांना लवकरच जाऊन भेटणार आहोत.
22 Nov 2021 - 10:13 pm | चौथा कोनाडा
मला ही तपशिल कळले तर मी ही तुमच्या सोबत यायचा प्रयत्न करेन.
21 Nov 2021 - 6:24 pm | शानबा५१२
प्रचेतस, आपण त्यांच्या जवळ होतात, हे आपल्या एका प्रतिसादातुन, 'चित्रगुप्त' ह्याम्च्या धाग्यावरच्या, त्यतुन कल्पना आली होती. मी ल्हान असताना मराठीच्या पुत्सकात 'अरुण बर्वे' हे नाव वाचले होते,ते हेच का? हा प्रश्न येतोय मनात.
21 Nov 2021 - 8:01 pm | प्रचेतस
ते हे नव्हेत.
21 Nov 2021 - 6:25 pm | शानबा५१२
मला हा प्रतिसाद लगेच देने गरजेचे वाटले म्हणुन..ह्याम्चा..त्यतुन..ल्हान
21 Nov 2021 - 7:00 pm | कंजूस
आठवणी येतच राहणार असेच व्यक्तिमत्त्व होते.
21 Nov 2021 - 7:33 pm | मुक्त विहारि
देव दूष्ट आहे
उत्तम लोकांना लवकर नेतो...
21 Nov 2021 - 9:17 pm | कर्नलतपस्वी
प्रचेतस, आपण माननीय काकांचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यांचे व्यक्तिमत्व किती हरहुन्नरी होते याचा अंदाज आला. मिपावर मी तसा नविनच आहे पण हळू हळू हे काय रसायन आहे त्याची कल्पना येऊ लागलीय.
सदस्य एकमेकां बरोबर इतके जवळचे संबंध प्रस्थापित करून ते जपतात हे फार मोठे यश आहे.
काकांच्या आत्म्यास इश्वर शांती आणि सद्गती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
22 Nov 2021 - 1:50 pm | अत्रुप्त आत्मा
@काका हरहुन्नरी माणूस, घराचा रंग त्यांनी स्वतः दिला, घराचे वॉलपेपरही त्यांनी स्वतः चिकटवले, घराचं इंटेरियर त्यांनी स्वतः केलंय. अगदी करवतीने लाकडी फळकूटं कापून त्यांना आकार देऊन, त्याच्या पाठीमागे लाईट्स वगैरे सोडून त्यांनी घराला प्रचंड देखणेपण दिलं हे ज्यांनी ज्यांनी त्यांचं घर पाहिलंय ते सांगू शकतात. --- येस. स्वतः केलेले साधे सुंदर हे काम मला त्यांनी याची डिटेल माहिती दिली होती. त्यातला हिशेब पाहून मी थक्क झालो होतो
22 Nov 2021 - 5:57 pm | सौंदाळा
चौरा काकांचे लेख, प्रतिसाद वाचून त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज आलाच होता. तुमच्या लेखाने त्यात अजून भर पडली आणि हा माणूस किती हरहुन्नरी होता हे समजले.
६८ व्या वर्षी शिल्पकला आणि इतकी सुंदर - हॅट्स ऑफ
चिंचवड मधेच राहत असुन चौराकाकांना न भेटल्याची चुटपुट कायम जाणवत राहील
22 Nov 2021 - 10:11 pm | चौथा कोनाडा
चौरा हरहुन्नरी होतेच हे त्यांच्या लेखनातून जाणवत असेच, पण त्यांची शिल्पकला देखिल एवढी लक्षवेधी होती हे आजच प्रथम कळले.
@प्रचेतस,
चौरा ५ वर्षांपुर्वी माझ्या एवढे जवळ रहायला याची कल्पना नव्हती. तुमचा "अविरत" कट्टा आणि चौरांना मी खुप मिस केले असेच म्हणावे लागेल !
मुवि साहेबांनी मला फोनवर एकादा संभाषणात "चौरांना एकदा भेटून येच, तिथे चिंचवड जवळच रहायला आहेत" असे दोन-तीनदा आवर्जून सांगितले.
व्यनि पाठवून देखील त्यांचा क्रमांक मला मिळाला नसल्यामुळे त्यांच्याशी संपर्क व्हायचा राहून गेला तो गेलाच याची चुटपुट लागुन राहिलीय !
24 Nov 2021 - 9:50 pm | पाषाणभेद
मिपावरील एक रसीक गेला. चौराकाकांना आदरांजली.
24 Nov 2021 - 11:39 pm | राघव
पुन्हा पुन्हा लेख दिसतो, पुन्हा पुन्हा थोडे वाचले जाते.. आणि पुन्हा पुन्हा मन.. असो. :-(
28 Nov 2021 - 11:04 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वल्ली, कधीतरी फेसबूकवर ते डोकावल्यावर मी तुम्हाला विचारल्याचे आठवते की हे कोण ? आणि त्यांचा आयडी कोणता ? या पेक्षा त्यांच्याशी माझी ओळख नव्हती. मिपावर खरड केल्याचे आठवते. बाकी, त्यांचे लेखन मिपावर कायम वाचत राहिलो आहे. माझे एक मिपाकर मित्र त्यांच्या कायम सहवासात होते. सतत वाट्सॅप गप्पा करायचे. तेव्हा त्यांच्याबद्दल ऐकायला मिळायचे.
चौराकाकांची त्यांनी काही गायलेली गाणी मला पाठवली. चौराकाकांनी अनेक गाणी उत्तम गायली आहेत अर्थात तो सर्व हौशीमौजीचा मामला असतो. गाण साम्राज्ञी लता मंगेशकर, मो. रफी, सुमनकल्याणपूर, सुधीर फडके, त्यांची लोकप्रिय गाणी. गाण्यातले बारकावे, तपशील. अशी त्यांची अनेक अभ्यासपूर्ण मतं मित्राकडून वाचायला मिळालीत.
सॅम्यूल अॅपवर त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. आपल्या आनंदासाठी गायलेली ही गाणी आहेत. चौराकाका आपली गाणी, आपला मिपावरील वावर कायम स्मरणात राहील. चौराकाकांना भावपूर्ण श्रद्धांजली
-दिलीप बिरुटे
1 Dec 2021 - 10:05 pm | चौथा कोनाडा
चौरा सॅम्यूलस्टार होते हे प्रथमच कळले.
खरंच, चौरा म्हंजे मल्टीहुन्नरी व्यक्तिमत्व !
30 Nov 2021 - 8:58 pm | जयंत कुलकर्णी
काय लिहायचे ते कळत नाही....
9 Nov 2024 - 5:25 pm | चौथा कोनाडा
ज्येष्ठ मिपाकार चौरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र स्मरणअंजली!
वी मिस यू चौरा.