एक रुका हुवा फ़ैसला (१९८५)
निर्माता/दिग्दर्शक : बासु चटर्जी
साधारण 1 महिन्यापूर्वी बॉस ने “बघच… छान आहे ” असे म्हणून हा चित्रपट दिला. बॉस ने दिला म्हणजे ऑफिसच्या कामापेक्षा महत्वाचे काम समजून आम्ही तो लगेच ऑफिसमधे बसल्या बसल्या संपवला. आणि खरच आवड़ला चित्रपट. एक सुंदर कोर्ट रूम ड्रामा. तांत्रिक सफाई थोड़ी कमी वाटली. त्याच बरोबर एडिटिंग वर अजून काम करायला पाहिजे होते असे वाटत राहिले. विशेषत: प्रसंग जोड़ून घेताना वगैरे....
पण ठीक आहे. बॉलिवूड मधे ८० च्या दशकात असला प्लॉट घेउन छान चित्रपट काढ़ल्या बद्दल निर्माता दिग्दर्शकाला एवढे माफ़ आहे असा विचार करून सोडुन दिले.
कधी एकदा या चित्रपाता विषयी मिपाकराना सांगतोय असे झाले होते. पण या ना त्या कारणाने राहून गेले. आणि जे झाले ते चांगलेच झाले असे अता वाटते आहे.... कसे ते नंतर पाहुच.
आधी चित्रपटा विषयी थोडेसे:-
२ तास लांबीचा हा संपूर्ण चित्रपट एका रूम मधे घडतो. कथा साधारण अशी की एका लोकल ट्रेन च्या ट्रॅकला लागून असणार्या झोपड़पट्टीत एकाचा खून होतो. त्या माणसाच्या मुलाला खूनी म्हणून पकड्ण्यात येते. आणि विविध साक्षीदाराच्या साक्षितून तोच खूनी आहे हे कोर्टाला पटते. पण जज खटल्यातील १२ जूरींना विचार-विनिमय करून एक मुखाने निर्णय द्यायला सांगतात. दोषी की निर्दोष. दोषी असेल तर त्या मुलाला फाशी होणार , निर्दोष असेल तर सोडुन देणार. पण १२ जणानी एक मुखाने निर्णय द्यायचा!
चित्रपट सुरू होतो तो जजच्या या निवेदनापासून. आणि पाट्या पडत असताना १२ जूरी एका रूम मधे येताना दाखवलेत. १२ जूरींसाठी आणि प्रेक्षकांसाठीही हा खटला अगदीच साधा आणि सरळ असतो. आता ५ मिनिटात एक मुखाने “दोषी” चा निर्णय घ्यायाचा आणि निघायचे अश्या मूडमधे सर्व जुरी असताना सुरवातीला मतदान घेतात आणि एखाद्याच्या आयुषाचा निर्णय कोणत्याही चर्चेवीना घेऊ नये.... काही तरी चर्चा व्हावी ,असे वाटून एक जुरी "निर्दोष" असे मत टाकतो.... ११ दोषी आणि १ निर्दोष.
या एका मुर्ख इसमामुळे आपल्याला आता इथे अडकून पडावे लागणार म्हणून इतर जुरी हमरीतुमरी वर येतात.... भांडणातून हळूहळू चर्चा सुरू होते आणि एकेक मुद्दे निघू लागतात ..... निर्णय घेताना प्रत्तेकाचे स्वत:चे अंतरंग कसे त्यांच्या निर्णयात मिसळलेले आहेत हे दिसू लागते...... आणि एकेकाचे मत डळमळीत होउन “निर्दोष” म्हणणार्यांची संख्या वाढू लागते.एक सुंदर कोर्ट रूम ड्रामा.
या चित्रपटात त्या काळातील एकही यशस्वी/प्रस्तापित , व्यावसायीक चित्रपटातील कलाकार नाही. चित्रपटात नायीका नाही. नाच गाणी नाहीत. यातील सगळेच कलाकार हे फ्रेश न्याशनल स्कूल ऑफ ड्रामा चे पदविधर आहेत आणि ८०च्या दशकातील दिल्लीदूरदर्शन वरील आघाड़ीचे कलाकार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रायोगीक / समान्तर वग़ैरे च्या पंगतीत जाउन बसतो का? हे जाणकारानी सांगावे. कथा मुंबईत घडत आहे असे १-२ उल्लेखावरून समजते. पण मला मात्र हा सिनेमा दिल्लीत घडतोय असे वाटत राहिले. (कदाचीत सर्व कलाकार हे दिल्ली दूरदर्शन वरिल होते त्यामुळे असेल कदाचीत...). पण ८०च्या दशकात असा प्लॉट घेऊन फक्त एका रूम मधे हा चित्रपट केला गेला त्या बद्दल मला खुपच भरून आले .... अन्नू मलिक आणि पंकज कपूरचा अभिनय फारच भडक वाटला , विशेषत: अन्नु कपूरने इतक्या तरूण वयात रंगवलेला म्हातारा..... पण सर्वच कलाकार नविन होते म्हटल्यावर येवढे माफ.... मला हा चित्रपट फारच आवडला आणि वर म्हटल्या प्रमाणे कधी एकदा मिपाकराना सांगतोय असे झाले होते...........
पण ........
४ दिवसापूर्वी मित्राचा फोने आला.... गप्पा मारता मारता तो म्हाणाला “आरे तू १२ अँग्री मेन पाहिलास का? ब्लॅक&व्हाइट आहे पिक्चर , १९५७चा.... पण खुपच छान आहे . बघच. एका मुलावर बापाच्या खुनाचा आळ आलेला असतो आणि १२ लोकाना एका रूम मधे बसुन निर्णय घ्यायचा असतो.......”
मी उडालोच.........
दुसर्याच दिवशी नेट वर तो चित्रपट हुडकला, डाऊनलोडला लावला..... नशिबाने स्पीड ही चांगला मिळाला...... ३-४ तासात डाउनलोड झाला.
अधाश्या सारखा पाहिला.....
अक्षरशः सुन्न झालो.
हॉलीवुड वरून उचलेगीरी आपल्याला नविन नाही. सेंट्रल थीम, एखादा सीन जसाच्या तसा ढापणे , एखादा हिट डायलॉगचे हिंदीकरण करणे इथ पर्यंत ठीक आहे.... पण हा एक रुका हुवा फैसला अख्खाच्या अख्खा १२ अँग्री मेन वरून कॉपी केलेला आहे. अगदी माशी टू माशी कॉपी.
सगळे डायलॉग तर सरळ सरळ भाषान्तर आहेत. कोट काढुन ठेवणे, सिगरेटी पेटवणे, भांड्ताना अंगचटीला जाणे...... सगळे सगळे कॉपी केलय. येवढेच कशाला, "एक रुका हुव फैसला" मधिल कलाकार सुद्धा "१२ अँग्री मेन " मधील कलाकारांशी साधर्म्य असणारे घेतलेत. अगदी अर्ध्या मिनिटाची भूमिका असलेला "एक रुका हुवा फैसला(१९८५)" मधला खूनी मुलगा सुद्धा अगदी "१२ अँग्री मेन (१९५७)" मधल्या खूनी मुलाचा जुळा भाऊ वाटतो.
काही फरक आहेत.... नाही असे नाही, पण ते अगदीच नगण्य आहेत :
"१२ अँग्री मेन " हा कोर्टमधे सुरू होतो. जज बसलेल्या जूरीना निर्णय घ्यायला सांगतात आणि सर्व जुरी त्या खुनी मुलाकडे बघत बाहेर जातात. तर "एक रुका हुवा फैसला" मधे जजचे निवेदन बॅक्ग्राऊंडला ऐकू येते आणि संपूर्ण निवेदन भर भेदरलेल्या खुनी मुलाचा क्लोजप घेतलाय...
७ नंबरचा ज्यूरी, ज्याला कशाचे काहीही देणे घेणे नाही... तो "१२ अँग्री मेन " मधे बेसबॉलची गेम बघायला जाणार असतो.... तर "एक रुका हुवा फैसला" मधे दिलिप कुमारचा मशाल बघायला जाणार असतो.
"१२ अँग्री मेन " मधे म्हातारा लंगडा साक्षीदार , चश्मा न लावलेली बाई किंवा रेल्वे ट्रॅकच्या बाजूचे घर फक्त बोलण्यातून उभे केले आहे. तर "एक रुका हुवा फैसला" मधे (प्रेक्षक फारच बाल बुद्धी आहेत असे समजून) तिघाना अर्ध्या अर्ध्या मिनिटाचे फूटेज दिले आहे.
"१२ अँग्री मेन " मधे एकदा निर्णय झाल्यावर प्रत्तेकजण आपापल्या वाटेने निघून जातो."एक रुका हुवा फैसला" मधे नायक (ज्यूरी न. 8 ,जो पहिल्यांदा निर्दोष म्हणतो) आणि खलनायक (ज्यूरी न.3 जो शेवटपर्यंत त्या मुलाला फाशी द्यावी या मताचा असतो)यांच्यात दिल जमाई होते. नायक खलनायकाला आधार देत बाहेर येतात.... खलनायक, “ माझा मुलगा 2 वर्षे झाली घारातून पळून गेलाय” ,(म्हनून मी असा वागत होतो) असे सांगतो.
"एक रुका हुवा फैसला" मधे कुठल्याही ज्यूरीचे नाव कळत नाही. "१२ अँग्री मेन " मधे सगळ्यात शेवटी म्हातारा ज्यूरी (न. 9) नायकाला नाव विचारतो आणि आपले सांगतो. ("१२ अँग्री मेन " मधे येवढी २च नावे कळतात.)
"१२ अँग्री मेन " विषयी गूगलून काढलेली माहिती ही मनोरंजक आहे:
3 वेगवेगळ्या विभागात ऑस्कर साठी नामांकन.
जॅक वॉर्डन (ज्यूरी नं.७) चे १९ जुलै २००७ ला निधन झाल्यामूळे 12 पैकी जॅक क्लग्मन (ज्यूरी नं. ५) हाच फक्त आता जिवंत आहे.
२००७ मधे अमेरिकन फिल्म इन्स्टिट्यूट ने "१२ अँग्री मेन " ला ऑल टाइम ग्रेटेस्ट मूवीस मधे ८७ वे स्थान दिले.
मला स्वथाला "१२ अँग्री मेन " हा ."एक रुका हुवा फैसला" पेक्षा जास्त आवडला.....
पण वाचकांनी दोन्ही चित्रपट आवर्जून पाहावेत असच जाता जाता सांगेन.
प्रतिक्रिया
20 Apr 2009 - 1:42 pm | मदनबाण
हा. हा. हा... आंबोळ्या पिक्चर ढापुन बनवला आहे आणि फ्रेम टु फ्रम अगदी तसाच आहे हे कळल्यावर हा चित्रपट का बघितला असा विचार येतो...पण यावर काही उपाय आहे असे वाटत नाही कारण असे रिमेक चित्रपट काढुन बक्कळ पैसा मिळतो.
प्रमाणाच्या बाहेर अवांतर :-- बाबा रे कंदीलाचे काय झाले ???
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
20 Apr 2009 - 1:45 pm | भडकमकर मास्तर
८० च्या दशकात शाळेत असताना हा चित्रपट डीडीवरती पाहिला होता...
हा चित्रपट पाहून आपल्याकडे ( भारतात) जूरीची पद्धत असते की नसते यावरून मी आणि एका मित्राने वाद घातला होता हे आठवते....
टिळकांच्या खटल्यात ( राजद्रोह १९०८) त्यात जूरी होते, असे वाचले होते.... बाकी कुठे वाचल्याचे आठवत नाही...
माझ्या मते आपल्याकडे भारतात एकटा जजच निर्णय देतो... बाकी तज्ञांनी प्रकाश टाकावा...
परीक्षण छान झाले आहे...
१२ अँग्री मेन पाहिला नाहीये...
शोधतो...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
20 Apr 2009 - 6:29 pm | मुक्तसुनीत
http://en.wikipedia.org/wiki/K._M._Nanavati_vs._State_of_Maharashtra
20 Apr 2009 - 2:02 pm | स्वाती दिनेश
रुका हुआ फैसला १२ अँग्री मेन वरुन बेतला आहे, अगदी फ्रेम टू फ्रेम..
खूप वर्षांपूर्वी रुका हुआ.. पाहिला होता आणि भन्नाट वाटला होता.
आत्ता मध्यंतरी असेच दोन्ही सिनेमे आधी विंग्लिश आणि मग हिंदी एकामागोमाग एक पाहिले. तेव्हा हिंदी व्हर्जन खूप बटबटीत वाटले.
तरीही दोन्ही सिनेमे पहावेत असेच..
स्वाती
20 Apr 2009 - 3:16 pm | नितीनमहाजन
माझ्या माहितीप्रमाणे नानावटी खून खटला हा भारतातील ज्यूरी पध्दतीने चालवलेला शेवटचा खटला होता. त्यानंतर कायदा बदलून ज्यूरी ही पध्दत कायमची रद्द करण्यात आली.
अवांतरः नानावटी खून खटल्यावर आधारित एक नाटक येऊन गेले. मला नाव, लेखक व कलाकार काहीहि आठवत नाही. कृपया अधिक माहिती द्यावी.
नितीन
29 Apr 2009 - 5:33 pm | विसुनाना
अपराध मीच केला / निष्पाप यांपैकी एक असावे.
20 Apr 2009 - 5:42 pm | चकली
तुम्ही बॉस ला १२ अँग्री मेन ची सीडी दिली की नाही ? :)
चकली
http://chakali.blogspot.com
20 Apr 2009 - 6:24 pm | प्राजु
मी रूका हुआ फैसला पाहिला होता.. पण १२ अँग्री यंगमेन नव्हता पाहिला.
चलता है बॉस!!..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
21 Apr 2009 - 12:26 am | अडाणि
रुका हुवा चांगला जमला आहे... विषेशतः पंकज कपूरचा अभीनय चांगला आहे.. जरूर बघावा असा... '१२..' ह जबरदस्त आहे ह्यात वादच नाही...
-
अफाट जगातील एक अडाणि.
21 Apr 2009 - 12:38 am | बेसनलाडू
एकावरून दुसरा बनवला असताना, पुस्तकावरून चित्रपट बेतलेला असताना (दा विन्ची कोड, एन्जल्स् ऍन्ड डीमन्स् (आगामी चित्रपट)) असे चित्रपट असले की मूळ कलाकृतीशी नव्याची तुलना होणे स्वाभाविक आहे. पणा मी शक्यतो असे करायचे शक्य तितक्या वेळा, शक्य असेल तेथे टाळायचा प्रयत्न करतो. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून आस्वाद घ्यायचा प्रयत्न करतो. पण प्रत्येक वेळी जमतेच असे नाही.
मी १२ अँग्री मेन आणि एक रुका हुआ फैसला दोन्ही पाहिले आहेत. मला दोन्ही आवडले. तांत्रिक सफाईच्या बाबतीत इंग्रजी चित्रपटास तोड नाही हे खरे; पण त्याच वेळी पंकज कपूरच्या, अन्नू कपूरच्या अभिनयालाही तोड नाही, हे सुद्धा तितकेच खरे वाटते :) पंकज कपूर साहेबांचे 'हल्ला बोल' सारख्या टुकार चित्रपटातील अभिनयकौशल्यही बघण्यासारखेच वाटते.
(स्वतंत्र)बेसनलाडू
21 Apr 2009 - 2:48 am | फारएन्ड
मला दोन्ही आवडले. पण बासु चटर्जींनी मूळ चित्रपटाला श्रेय दिले होते का टायटल्स मधे माहीत नाही.
बर्याच जणांची 'एक रुका..' ची आठवण म्हणजे दूरदर्शन ने एका रविवारी (की शनिवारी) हा चित्रपट आहे म्हणून नाव बहुधा आयत्या वेळेला जाहीर केले. जेव्हा संध्याकाळचा पिक्चर कोणता आहे याचा पत्ता ५ मिनीटे आधीपर्यंत दूरदर्शन वाल्यांनाही नसायचा तेव्हाची गोष्ट बहुधा (प्राचीन काळी आधीच्या रविवारी साप्ताहिकीत जाहीर करून तोच दाखवत). आम्ही बरेच जण काही तरी अगम्य पिक्चर दिसतोय म्हणून बाहेर खेळायला वगैरे जाण्याच्या आधी १०-१५ मिनीटे पाहू म्हणून थांबलो आणि शेवटपर्यंत उठलो नाही.
21 Apr 2009 - 7:21 pm | आवडाबाई
पाहिलेला आठवतोय, दूरदर्शनवरच !! आवडला होता, काहितरी वेगळं बघीतल्यासारखं वाटलं होतं, तेव्हा समांतर सिनेमाचं भूतही होतं डोक्यावर !! (पुढे ते उतरलं )
बाळबोध प्रश्न :दुसर्याच दिवशी नेट वर तो चित्रपट हुडकला, डाऊनलोडला लावला.....
नेटवर कुठे हो मिळतात चित्रपट टॉरेंट सोडून? शेअरिंग साठी दुसर्या कुणाचा संगणक ऍक्सेस करावा लागणार नाही, अशी साईट आहे का?
नशिबाने स्पीड ही चांगला मिळाला...... ३-४ तासात डाउनलोड झाला.
३-४ तास लागले ??? किती स्पीडच्या इंटरनेटला ?
22 Apr 2009 - 2:12 am | टायबेरीअस
दोन्ही चित्रपट छान आहेत.
22 Apr 2009 - 5:46 am | विसोबा खेचर
मलाही हा चित्रपट आवडला होता. याची सीडी माझ्या संग्रही आहे. केके रैना, पंकज कपूर, एस एम जहीर, अन्नू कपूर इत्यादी सगळ्यांचीच कामे उत्तम!
तात्या.
29 Apr 2009 - 1:13 pm | अभिज्ञ
१२ एंग्री मेन च्या तुलनेत "एक रुका हुवा फैसला" फारच तकलादू व भडक वाटला.
सर्वच अभिनेत्यांनी फारच ओढून ताणून अभिनय केल्याचे जाणवते.
१२ एंग्री मेन हा चित्रपट मात्र अतिशय सुरेख अन वास्तवदर्शी आहे.
हा चित्रपट परत परत पाहिला तरि तितकाच इंटरेस्टिंग वाटतो.
आयएमडिबी वर देखील हा पहिल्या दहात सापडतो.
असो,
दोन्ही चित्रपटांची उत्तम ओळख करुन दिल्याबद्दल प्रोफेसर साहेबांचे आभार.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
29 Apr 2009 - 2:39 pm | आंबोळी
एक गोष्ट वरच्या लेखात लिहायची राहुन गेली. ती म्हणजे चित्रपट जसाच्या तसा कॉपी केल्याबद्दल निर्माता / दिक्दर्शकाचे आभार.
नुसती थीम उचलून बॉलीवूडी मसाला घातला असता तर काय काय बघायची पाळी आली असती आपल्यावर....
उदा.
हिरो (के.के.रैना) चे व्हिलन (पंकज कपूर) च्या मुलीवर प्रेम....
त्यांची बागेतली २-४ प्रणय गीते...
व्हिलनने त्याच्या व्हिलन मित्राच्या (एस्.एम्.जहिर) मुलाबरोबर हिरोइनचे लग्न ठरवणे...
परत १-२ विरह गीते.
या सगळ्याच्या मधे मधे तोंडी लावल्या सारखे खर्या खुन्याचा शोध....
मग व्हिलनच्या अड्ड्यावर हिरोइनचे आणि व्हि.मि.च्या मुलाचे लग्न ..... त्यात हिरो वेशांतर करून (म्हणजे फक्त मिशी लाउन) (प्रेमनाथ वगैरे तत्सम मित्रा बरोबर)नाचणार आणि गाणे म्हणणार... गाण्यात तो प्रेयसीला "मी आलोय आणि या सगळ्यांच्या नाकावर टिच्चून तुला घेउन जातो" असे सांगणार... पण ते फक्त हिरोइनलाच कळणार... बाकी सगळेजण "वा! काय छान गाण म्हणतोय " अश्या अविर्भावात ग्लासातल्या दारूसंगे डोलणार...
मग व्हिलन हाच खरा खूनी आहे हा गौप्यस्फोट... (त्याच बरोबर हिरोच्या बापालापण व्हिलननेच मारले होते असे ही कळणार)
मग मारामारी... पळापळी...पाठलाग.... पळत पाठलाग, गाड्यांमधून पाठलाग... हेलिकॉप्टर मधून पाठलाग....
मग शेवटी हिरो - व्हिलनची डोंगराच्या कड्यावर मारामारी.
शेवटी हिरो व्हिलनला ठार मारायच्या घायीला आला की पोलिस येणार आणि व्हिलनला पकडून नेणार...
मग तिथेच उभी असलेली हिरोइन हिरोला मिठी मारणार आणि इतकावेळ ही मारामारी बघत उभ्या असलेल्या हिरोच्या आईला जोडीने नमस्कार....
या असल्या फोर्म्युल्यात पोलिसाना कोण बोलवते आणि सगळी स्टोरी सांगते हे मला इतक्या वर्षात न सुटलेले कोडे आहे... का पोलिस लोक तिकीट काढून थेटरातच बसलेले असतात आणि सगळा पिक्चर बघून मग शेवटी येउन व्हिलनला पकडतात?
असो १२ अँग्री मेनची (आणि पर्यायाने प्रेक्षकांची)अशी वाट न लावल्याबद्दल बासू चटर्जींचे अभिनंदन आणि धन्यवाद.
(
धारी)आंबोळी
29 Apr 2009 - 5:43 pm | अभिज्ञ
मला वाटते १२ एंग्री मेन हा चित्रपट एवढा परिणामकारक झालाय कि
जर त्या आरोपीला सर्व ज्युरिंच्या नकळत त्यांची चर्चा ऐकायला बसवले असते तर त्याने तिथेच
आत्महत्या केली असति. ;)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
29 Apr 2009 - 10:52 pm | विकास
मराठी चित्रपट पण आत्ता सर्रास उचलेगिरी करू लागले आहेत. अरे मस्त आहे करत मला घरच्यांनी "कायद्याचे बोला" दाखवले तर काय? - "माय कझीन विनी"! डोकेचे फिरले (साधे उपकार मानले नाहीत म्हणून).
तीच अवस्था अजून एका चित्रपटाची (आत्ता नाव लक्षात नाही पण आठवून येथे लिहीन)...You, Me and Dupree घेतलेला :-(
मग तेच सर्व नट असलेला "तुला शिकवीन चांगलाच धडा" पाहीला तर त्यात मात्र "बासुभट्टाचार्यांच्या चित्रपटावरून - चुपकेचुपके वरून" घेतला असे सांगितलेले... कदाचीत बॉलीवूडने कान पिरगळले असते म्हणून असेल...
5 May 2009 - 6:11 pm | छोटा डॉन
जर मी व्यक्तीरेखा आणि त्यांचा अभिनय ह्यावर तोलले तर मी हा चित्रपट अत्यंत "भिकार" होता असे म्हणेन ...
मिपावरच्या चर्चेमुळे परवाच डाउनलोड करुन, चक्क आयपीएलची मॅच सोडुन, कानाला हेडफोन्स लाऊन शांत आणि एकांतात हा चित्रपट पाहिला. कदाचित माझ्या फार अपेक्षा असाव्यात म्हणुन पण का होईना चित्रपट मला जास्त आवडला नाही, लै भारी वगैरे तर मुळीच नाही ...
काही तर्क, संवाद आणि प्रसंग ह्यांना दाद जरुर देईन पण ह्यात मला "नविन आणि उच्च" असे काही वाटले नाही ...
सिनेमाची पटकथा ज्या पद्धतीने पुढे गेली ती मांडणी अत्यंत तकलादु आणि भिकार होती ...
आम्ही एका झटक्यात ओळखले की पंकज कपुरचा काहीतरी वैयक्तीक शॉट असणार म्हणुन, तसेच निघाले ...
आयला चर्चा वाचली असल्याने कसाबसा पुर्ण पाहिला, नाहीतरी जेव्हा केके रैना त्या म्हातार्याची ऍक्टिंग करुन १५ सेकंदाच्या ऐवजी ४५ सेकंद लागतात हे सिद्ध करतो तेव्हाच आमचा पिक्चरमधला इंटरेस्ट संपला ...
कलाकारांची निवड अत्यंत भिकार, शाहरुखच्या पिक्चरमध्ये ह्यापेक्षा बरे कलाकार असतात ...
पंकज कपुर बहुदा "तारस्वरात ओरडणे आणि विक्षिप्तासारखे चालणे" ह्याला ऍक्टिंग समजत असावेत, पंकज कपुर लै भारी ऍक्टर आहे असे नुसते कित्येक दिवस ऐकतो आहे. कोणी मला त्यांच्या उत्तम चित्रपटांची लिस्ट देईल का ?
अन्नु कपुरने म्हातार्याची भुमिका करुन त्याला तरुणपणापासुन असले पालथे धंदे करायची सवय होती हे सिद्ध केले. अत्यंत टुकार वाटला त्याचा म्हातारा ...
तो उद्योगपती, मशाल पिक्चरचा फॅन, केके रैना आणि झोपडपट्टीच्या पार्शभुमीतुन आलेले अजुन एक ज्युरी एवढेच जरास बरे वाटले.
बाकी इतरांना "जोकर" म्हणावे का "ज्युरी" हाच प्रश्न आहे ...
जो मुख्य ज्युरी होता त्याचा आक्रस्ताळेपणा प्रचंड धक्का आणि निराशा देऊन गेला ...
शिवाय मिनीटा मिनीटाला धुम्रपान आणि एकमेकांच्या अंगावर धावुन जाणे ह्यामागचा हेतु समजला नाही ...
ज्या पद्धतीने ज्युरी एकमेकांशी वागत होते ते तर अकलनीयच, इतका कमालीचा उद्दाम आणि माजोरडेपणा असु शकतो आणि सहन केला जाऊ शकतो ह्याचेच आश्चर्य वाटले ...
कोण बरे "तुम सब साले हरामखोर हो ..." अशी मुक्ताफळे ऐकुन घेईल ???
शिवाय एक ज्युरी दुसर्याला "तुम चुप रहो, तुम्हे क्या समजता है" असे बोलतो तेव्हा आम्हाला धक्का बसला.
असो.
जाउ दे, लिहीन तितके कमीच आहे ...
"एक रुका हुवा फैसला" हा (माझ्यामते) एक फसलेला प्रयत्न होता, अत्यंत सामान्य आणि भिकार पिक्चर ...
अवांतर : "१२ अँग्री मेन्स" डाऊनलोड मारला आहे, विकांताला पाहुन माझे परिक्षण "इथेच" टाकेन.
आमेन...!!!
------
(स्पष्टवक्ता)छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)