“दीपशिखा कालिदास”

नागनिका's picture
नागनिका in जनातलं, मनातलं
26 Aug 2021 - 12:15 pm

वैशाखाच्या उष्मादाहानंतर वर्षाऋतूची मोहक चाहूल लागते. आकाशामध्ये ढग दाटीवाटी करतात. कविमन उद्युक्त नाही झाले तर नवलच! पावसांच्या सरींबरोबर कविता, चारोळ्यांच्या सरी देखील बरसू लागतात. पर्वतीय प्रदेशामध्ये जलभारामुळे नभ जणू काही डोंगरावरच उतरले आहेत असा भास होतो. परंतु या नियमित घडणाऱ्या भौगोलिक घटनेकडे पाहून शंभर सव्वाशे श्लोकांचे नितांत सुंदर विरहकाव्य रचणाऱ्या महाकवी कालीदासांची काव्यप्रतिभा हजारो वर्षांपासून रसिक मनांना भुरळ पाडत आली आहे. प्रिय पत्नीच्या “अस्ति कश्चित् वाग्विशेष:? ” या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघालेल्या कालिदासांकडून रघुवंश, मेघदूत, कुमारसंभव यासारख्या काव्यांची निर्मिती होणे हि दैवी घटनाच वाटते!
कवी कालिदासांच्या चरित्राबद्दल सांगणारे कोणतेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यांच्या स्थल-काळाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते त्यांचा काल गुप्तशासक विक्रमसंवतस्थापक विक्रमादित्याच्या समकालीन म्हणजे इ. स. ४थ्या किंवा ५व्या शतकामध्ये असावा. कालिदासांच्या अनेक रचनांमध्ये तत्कालीन समृध्द जीवनशैलीचे वर्णन आढळते. मानवी भाव-भावनाचे वर्णन व त्यांना दिलेली चपखल उपमा यामुळे कालिदासांची प्रत्येक रचना वेगळी ठरते. रघुवंश या महाकाव्यामध्ये इंदुमती स्वयंवर प्रसंगीचा एक श्लोक आहे...

<strong>संचारिणी दीपशिखेव रात्रौ यं यं व्यतीयाय पतिंवरा सा।
नरेन्द्रमार्गाट्ट इव प्रपेदे विवर्णभावं स स भूमिपालः।।</strong>

या श्लोकामध्ये कवी कालिदासांनी राजकुमारी इंदुमतीस रात्रीच्या प्रहरी मार्गामध्ये येणारा प्रदेश उजळून टाकणाऱ्या दिपाशिखेची (मशालीची) उपमा दिली आहे. राजकुमारी इंदुमती हातामध्ये वरमाला घेऊन ज्या राजासमोर उभी राहते, तेंव्हा राजकुमारीच्या अभिलाषेमुळे त्या राजाचे मुख उजळते. परंतु जेंव्हा राजकुमारी राजाला अव्हेरून पुढे सरकते तेंव्हा त्या राजाचे मुख म्लान होते असा या श्लोकाचा अर्थ आहे. उपमा अलंकाराचा असा सौन्दर्याविष्कार निव्वळ अद्वितीयच आहे! उपमेतील या सौंदर्यामुळे कालीदासांना पुढे “दीपशिखा कालिदास” असे संबोधन मिळाले. स्वयंवर प्रसंगी वधूच्या मनातील लज्जा, भिती, कुतूहल, संकोच इ. भावना कवीने अप्रतिमरीत्या टिपल्या आहेत. कालिदास रचित रघुवंश महाकाव्य म्हणजे संस्कृत साहित्यातील उत्कृष्ट रासाविष्कारच म्हणावा लागेल. यातील सीतात्याग, राम निर्वाण इ. प्रसंग करुणरसाने ओतप्रेत भरलेले आहेत. वनवासी सीता, वसिष्ठाश्रम इ. चे वर्णन करतांना शांत रस प्रकर्षाने जाणवतो. तर राम परशुराम, राघूचा दिग्विजय अश्या प्रसंगामध्ये वीररससागर खळाळतो. रघुवंश हे महाकाव्य म्हणजे आर्यधर्माचा श्रुतिस्मृतिपुराणोक्त अविष्कार!
महाकवी कालिदासरचित आणखी एक काव्यरत्न म्हणजे “कुमारसंभव”. कुमार कार्तिकेयाच्या जन्माची हि कथा. एकूण १७ सर्गांचे हे काव्य असून ८व्या सर्गामध्ये शंकर-पार्वती याच्या रतिक्रीडेचे वर्णन केले आहे. देवतांचे वैयक्तिक जीवन सार्वजनिक केल्यामुळे कालीदासांना तत्कालीन जनसमुदायाच्या टीकेला सामोरे जावे लागले होते, त्यामुळे त्यांनी हे काव्य ८व्या सर्गानंतर अर्धवट सोडले. उर्वरित ७ सर्ग प्रक्षिप्त असावेत असे अभ्यासकांचे मत आहे. संस्कृत अभ्यासकांमध्ये “उपमा कालिदासस्य” हि लोकोक्ती प्रसिद्ध आहे. त्याचे कारण म्हणजे त्यांनी काव्यामध्ये वापरलेल्या समर्पक उपमा. उदाहरणार्थ कुमारसंभव मधील पुढील श्लोक..
अनंतरत्नप्रभवस्य यस्य हिमं न सौभाग्यविलोपि जातम्।
एको हि दोषों गुणसन्नितीनिमज्जतिन्दो: किरणेष्विवाङ्क:॥
याचा अर्थ असा आहे कि.. ज्याप्रमाणे हिमकणामुळे हिमालयाची शोभा कमी होत नाही त्याचप्रमाणे व्यक्तीमधे पुष्कळ उत्तम गुण असतील तर एखादा अवगुण दिसून येत नाही. जशी चंद्रावरील डागांमुळे त्याच्या किरणांची शोभा कमी होत नाही. अवतीभवती असणार्या नैसर्गिक गोष्टींची उपमा मानवी स्वभावाला देण्याचे कसब वाखाणण्यासारखे आहे. सृष्टीतील ऋतुचक्राचे वर्णन कालिदासांनी “ऋतुसंहार” या खंड्काव्यामध्ये केले आहे. ऋतूंच्या बदलांचा पर्यावरणावर तसेच तरुण मनावर कसा परिणाम होतो याचे प्रतिभाशाली वर्णन ऋतुसंहार मध्ये पहावयास मिळते.
कालीदासांची प्रतिभा विशेष खुलली आहे ती संस्कृत काव्यामालेतील मेरुमणी असलेल्या “मेघदूत” या खंड्काव्यामध्ये ! मंदाक्रांता वृत्तामध्ये रचलेले हे विरहकाव्य अतिशय नादमधुर आहे. या काव्यामध्ये कवी कालिदासांच्या ओघवत्या व रसाळ लेखणीची प्रचीती येते. शापित यक्षाचा संदेश पत्नीकडे घेऊन जाणार्या मेघाचे प्रवासवर्णन करतांना कवीने अनेक अलंकाराचे आणि रसांचे अप्रतिम मिश्रण केले आहे. मेघदूतामध्ये उत्तर-मध्य भारतामधील अनेक स्थळांचे वर्णन करतांना भौगोलिक रुक्षता येऊ दिली नाही हे विशेष! शृंगार रसाने ओतप्रेत भरलेल्या या काव्यामध्ये कोठेही नैतिकतेची कास सोडलेली आढळत नाही.
बहुतांशवेळेस कालिदासांच्या साहित्याची तुलना भवभूतींच्या साहित्याशी केली जाते. परंतु दोघाही साहित्यकारांच्या रचनेचा लहेजा वेगवेगळा आहे. भवभूतींच्या साहित्यामध्ये बह्यासौन्दर्यापेक्षा अंत:सौंदर्याला विशेष महत्व दिले गेले आहे. त्यांचे साहित्य प्रामुख्याने करुणरसभरीत आहे तर कालिदासाची काव्ये विविधरसमिश्रीत आहेत. कवी भारवि हे कालिदासांच्या समकालीन होतेअसे म्हणतात. त्यांच्या रचनांमध्ये केलेले निसर्ग वर्णन तसेच मानवी स्वभावाचे पैलू यामध्ये कालिदासांच्या शैलीची छाप असल्यासारखी वाटते.
कालिदासांच्या रचनांमध्ये नैसर्गिक वैविध्य आणि मानवी जीवन यांच्यातील साम्यस्थळे दाखवली गेली आहेत. व्याकरणदृष्ट्या उपमा, रूपक, उत्प्रेक्षा, अर्थान्तरन्यास अलंकाराने परिपूर्ण असलेले त्यांचे साहित्य म्हणजे संस्कृत अभ्यासकांसाठी मेजवानीच आहे! वरील साहित्यकृती व्यतिरिक्त गंगाष्ट्क, विक्रमोर्वशीयम, शृंगारतिलक, मालविकाग्निमित्रम् या रचना देखील अजरामर आहेत. राजशेखराने त्याच्या काव्यामिमांसेमध्ये शब्द्कवी, रसकवी, अर्थकवी, मार्गकवी, अलंकारकवी, उक्तीकवी, शास्त्रार्थकवी असे कवींचे सात प्रकार सांगितले आहेत. या सर्व प्रकारांचे यथोचित मिश्रण कालिदासांच्या प्रत्येक रचनेत दिसून येते. बाणभट्टाने “हर्षचरितम्” या ग्रंथामध्ये कालिदासंबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. कर्नाटकमधील ऐहोळे येथील शिलालेखामध्ये कालीदासांची स्तुती केलेली आढळते. महाकवी कालिदासरचित काव्यनाट्यरत्नांनी व सुभाषित मौक्तिकांनी संस्कृतसाहीत्यसागर समृद्ध झाला आहे. भारतीय गीर्वाणवाणी साहित्य रचनेच्या मुकुटामध्ये कालिदासांच्या साहित्याने विविधरंगी मोरपीस खोवले गेले आहे. रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतुसंहारादी काव्ये म्हणजे जणू त्या मयूरपंखावरील मनोहारी रंगछटा !! आपल्या साहित्याद्वारा संपूर्ण भारताचा इतिहास उजळून टाकणाऱ्या दीपशिखा कालिदासांच्या काव्यप्रतिभाप्रकाशामध्ये आजही अखंड जग न्हाऊन निघत आहे!!

इतिहासलेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

26 Aug 2021 - 3:32 pm | प्रचेतस

काय सुरेख लिहिलंय.
महामहोपाध्याय वा. वि. मिराशींनी कालिदासावर उत्कृष्ट ग्रंथ रचला आहे जो मुळातूनच वाचण्यासारखा आहे.

ताम्रोदरेषु पतितं तरुपल्लवेषु निर्धौतहारगुलिकाविशदं हिमाम्भः|

आभाति लब्धपरभागतयाधरोष्ठे लीलास्मितं सदशनार्चिरिवत्वदीयम्॥

ज्यांचा आतील भाग ताम्रवर्णी आहे त्या तरुच्या कोमल पानांवर धुवून स्वच्छ केलेल्या मोत्यांप्रमाणे शुभ्र असे दंव पडले आहे त्यामुळे ते तुझ्या अधरोष्ठावर पडलेल्या दंतकांतीयुक्त मधुर स्मितासारखे खुलून दिसत आहे.

तुषार काळभोर's picture

26 Aug 2021 - 3:41 pm | तुषार काळभोर

ज्यांचा आतील भाग ताम्रवर्णी आहे त्या तरुच्या कोमल पानांवर धुवून स्वच्छ केलेल्या मोत्यांप्रमाणे शुभ्र असे दंव पडले आहे त्यामुळे ते तुझ्या अधरोष्ठावर पडलेल्या दंतकांतीयुक्त मधुर स्मितासारखे खुलून दिसत आहे.
>>
काय सुंदर उपमा आहे!

नागनिका's picture

30 Aug 2021 - 11:52 am | नागनिका

म्हणूनच "उपमा कालिदासस्य " असे म्हणतात.

प्रचेतस's picture

30 Aug 2021 - 12:09 pm | प्रचेतस

मूळ श्लोक असा आहे.

उपमा कालिदासस्य भारवेरर्थगौरवम् ।

दण्डिन: पदलालित्यं माघे सन्ति त्रयो गुणा: ।।

उपमा हे कालिदासाचा गुणविशेष, भारवी कवीचा अर्थ हा गुणविशेष आणि दण्डीचे पदलालित्य मात्र माघाच्या काव्यामध्ये ह्या तिन्ही गुणांचा समुच्चय आहे.

नागनिका's picture

30 Aug 2021 - 12:21 pm | नागनिका

__/\__

तुषार काळभोर's picture

26 Aug 2021 - 3:41 pm | तुषार काळभोर

सुंदर लेख!

Bhakti's picture

26 Aug 2021 - 5:23 pm | Bhakti

अगदी ओघवत्या लेखन शैलीत सुंदर लिहिलंय.महाकवी कालिदास समस्त साहित्याला एक वरदान आहे.कधीच साहित्य वाचले नाही पण त्याच्यावरचे लेख आनंद देतात.

Bhakti's picture

26 Aug 2021 - 5:24 pm | Bhakti

अगदी ओघवत्या लेखन शैलीत सुंदर लिहिलंय.महाकवी कालिदास समस्त साहित्याला एक वरदान आहे.कधीच साहित्य वाचले नाही पण त्याच्यावरचे लेख आनंद देतात.

Bhakti's picture

26 Aug 2021 - 5:24 pm | Bhakti

अगदी ओघवत्या लेखन शैलीत सुंदर लिहिलंय.महाकवी कालिदास समस्त साहित्याला एक वरदान आहे.कधीच साहित्य वाचले नाही पण त्याच्यावरचे लेख आनंद देतात.

लिहीत रहा _/\_

नागनिका's picture

30 Aug 2021 - 11:53 am | नागनिका

नक्कीच!

दिगोचि's picture

27 Aug 2021 - 6:31 am | दिगोचि

लेख छान आहे वाचुन आनन्द झाला. वाचत असताना दोन श्लोक आठवले. त्यातील एक असा: पुरा कवीनाम गणना प्रसन्गे अनिश्ठिकाधिश्ठीत कालिदासः. अद्यापि तत्तुल्य कवेरभावातनामिका सार्थवती बभूव. नागनिकानी उद्ध्रुत केलेल्या कुमारसम्भवातील एकोहि दोशो या श्लोकावरून एका किन्चित कवीने हा श्लोक लिहिला: एकोहि दोशो गुणसन्निपातेन निमज्जतीन्दोरिति यो बभाशे. नूनम न द्रुश्टम कवीनापितेन दारिद्र्यदोशो गुणराशीनाशि:. यात कविना अपि तेन किम्वा कवि-नापितेन यापैकी जे आवडेल तसे वाचावे. (मराठी फॉन्ट्मधील दोशमुळे काही चुका झाल्या अहेत त्यबद्दल क्षमा करावी.)

प्राची अश्विनी's picture

30 Aug 2021 - 9:57 am | प्राची अश्विनी

सुंदर लिहिलंय. अजून वाचायला आवडेल.

शांता शेळके यांनी अनुवाद केलेले मेघदुत वाचताना मात्र हरखुन गेलो होतो.
हा लेख वाचताना तसेच काहिसे झाले.
लिहित रहा
पैजारबुवा,

पॉपकॉर्न's picture

4 Sep 2021 - 12:01 pm | पॉपकॉर्न

आपण खुप सुंदर परीचय करून दिला आहे. मला कालीदासाची नाटके म्हणजे, ८वी ते १० वी त शिकलेली "तस्यां ही काव्यं मधुरम" सारखी सुभाषिते असतील असे वाटले होते. पण एकदा यु ट्यूब वर कालिदास व्याख्यानमालेचा एक भाग ऐकला आणि इतके समृध्द साहित्य आपल्याला माहिती नव्हते याची खंत वाटली.
कालिदास व्याख्यानमाला

टर्मीनेटर's picture

31 Dec 2021 - 3:55 pm | टर्मीनेटर

आत्ताच हा लेख वाचला! मला वाटतं शीर्षकावरून हे काव्य /पद्य / कविता ह्याच्याशी संबंधित लेखन असावे हा अंदाज आल्याने मी हा लेख स्किप केला असावा.
बापरे भरपूर व्यासंग दिसतोय तुमचा! मला तर संस्कृत आणि सगळीच काव्य / कविता पार डोक्यावरून जातात 😀
आधी प्रचेतस यांच्या लेखानातून अशा गहन गोष्टींचा सारांश समजत होता आता त्यात तुमचीही भर पडली हे भारीच झाले!
लेखनशैली छान आहे तुमची... खरंच लिहित्या रहा...

नागनिका's picture

31 Dec 2021 - 5:16 pm | नागनिका

व्यासंग असा काही नाही.. कालिदासांचे साहित्य आहेच तसे.. त्यातून मला जे समजले ते मांडले..

मुक्त विहारि's picture

31 Dec 2021 - 6:24 pm | मुक्त विहारि

सहमत आहे

नागनिका's picture

31 Dec 2021 - 9:53 pm | नागनिका

धन्यवाद मुक्त विहारीजी !

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

1 Jan 2022 - 11:52 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लेख.

प्रसाद गोडबोले's picture

2 Jan 2022 - 11:48 pm | प्रसाद गोडबोले

नृपं तं आवर्तमनोज्ञनाभिः सा व्यत्यगादन्यवधूर्भवित्री ।
महीधरं मार्गवशादुपेतं स्रोतोवहा सागरगामिनीव । । ६.५२ । ।

नागनिका's picture

3 Jan 2022 - 4:57 pm | नागनिका

सागरास मिळण्यास निघालेली नदी पर्वत मध्ये आल्यामुळे जसा मार्ग बदलते, त्याच प्रमाणे हि स्त्री राजा बोलावत असूनदेखील अडचणींमुळे परस्त्री प्रमाणे लाम्ब उभी आहे..

प्रसाद गोडबोले's picture

4 Jan 2022 - 10:00 am | प्रसाद गोडबोले

बारावी की अकरावीत असताना कालिदासाच्या रघुवंशातील हा भाग अभ्यासाला होता संस्कृतमध्ये ! पण तेव्हा आम्ही "मार्क्स"वादी अर्थात केवळ मार्क्स मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे विद्यार्थी असल्याने घोकंपट्टी करुन केवळ मार्क्स मिळवले.
पण नंतर ती मार्क्स मागे धावण्याची ओढाताण थांबल्यानंतर खर्‍या अर्थाने कविता कळायला लागली !
हे "आवर्तमनोज्ञनाभि:" हे कसलं लिहिलं आहे, पुढे प्रत्यक्ष पहाण्याचा ,अनुभवण्याचा, उपभोगण्याचा योग आला तेव्हा कालिदासाची आठवण झाली - "वाह कालिदास क्या बात है ! जियो ! साधु साधु !!"

आणि फक्त हेच नाही अनेक अनेक असे श्लोक आहेत जे घोकंपट्टी करत पाठ केले होते पण पुढे प्रत्क्ष अनुभवल्यावर जास्त चांगल्या अर्थाने कळाले . अभ्यासाला सुरुवात करताना कायम वार्थाविव्संपृक्तौ ह्या श्लोकाने करायचो. ११वी १२वीतल्या पोरसवा वयात काय कळणार ह्याचा अर्थ ? पुढे ज्ञानेश्वर माऊलींचे अमृतानुभव अन त्यातील शिवशक्ती समावेशन हे पहिले प्रकरण वाचले तेव्हा डोक्यात ट्युब पेटली !

पुढे आयुष्यात नक्की कसा प्रवास असायला पाहिजे असले गहन प्रश्न पडायला लागले तेव्हाही तिथे कालिदास भेटला : शैशवेsभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणाम्। वार्धके मुनिवृत्तिनां योगेनान्ते तनुत्यजाम्।।” रघुवंशम्–1.6

क्व सूर्यप्रभवो वंशः क्व चाल्पविषया मतिः।
तितीर्षुर्दुस्तरं मोहादुडुपेनास्मि सागरम्॥ १-२

कालिदासाने जे रघुवंषाविषयी म्हणलं आहे आपली तीच अवस्था आहे कालिदासाच्या साहित्याबाबत ! आपल्या अल्पमतीने आणि वेळेच्या अभावानेही ह्या सगळ्याचा अभ्यास करणे आनंद घेणे अवघड आहे आपल्याला , हे म्हणजे चिमणीने समुद्र उल्लंघुन जाण्याचा प्रयत्न करण्यासारखे आहे !

असो जमेल तितका आनंद घेऊ ! तुम्ही लेखन करत रहा त्या निमित्ताने आम्हालाही वेळ मिळेल हे सारे परत वाचण्याचा !

अवांतर : इथे रघुवंष सार्थ उपलब्ध्द आहे : https://sanskritdocuments.org/sites/giirvaani/giirvaani/rv/sargas/01_rv.htm

नागनिका's picture

4 Jan 2022 - 2:50 pm | नागनिका

https://sanskritdocuments.org/sites/giirvaani/giirvaani/rv/sargas/01_rv.htm

याबद्दल आभारी आहे.. वाचायला आवडेल पुन्हा..

कर्नलतपस्वी's picture

4 Jan 2022 - 6:03 am | कर्नलतपस्वी

खुपच छान लिहीलय. तुमचा कीती अभ्यास आसेल हे या लेखातून समजून आले. या जन्मी हे एक दालन बघू शकलो नाही याची खंत नेहमीच वाटते.
प्रचेतस सर हँटस् आँफ टु यू.
मार्कस तुम्ही तर एकदम यु टर्न मारला.
गेल्या दोन वर्षांपासून मिपा सदस्य म्हणून वावरताना माहीती, मनोरंजन टपल्या टिचक्या आणी टिवल्या बावल्या मुळे मिपा आणी सदस्यांचा जबरी फँन झालोय.

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2022 - 6:42 pm | चौथा कोनाडा

खुप सुंदर लेख !
या वर लेखमाला वाचायला आवडेल !