पुढचा दिवस उजाडला. आज मामु चा दौरा होता. क्षणात अंतू बरवा आठवला. अक्षरशः भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था होती. चिपळूण मध्ये फक्त एक पेट्रोल पंप चालू होता. बाकी पेट्रोल पंप पाण्याखाली गेल्याने बंद होते. चिपळूण ला येणारे रस्ते , घाट बंद झाल्याने पेट्रोल चे टँकर पण 3 4 दिवस येत नव्हते. त्यामुळे 3 ते 4 तास रांगेत उभे राहून फक्त 50 रुपयाचे पेट्रोल मिळत होते. त्यातही चारचाकी साठी नाहीच. मदतीला शेजारील गावांतून गाड्या घेऊन यायचं तरी पंचाईत व्हाययाची वेळ यायची. मुख्य चिपळूण शहरात साफसफाई साठी पाणीच उपलब्ध नव्हते. पिण्यासाठी पॅक बाटल्या मदत म्हणून येत होत्या. अश्या वेळी आसपास च्या गावातून टाक्या भरून पाणी आणणे सहज शक्य होते. पण पेट्रोल मिळत नसल्याने फारच अडचण येत होती. त्यात मामुंचा दौरा. मामु येणार म्हणून एरवी न फिरकलेल्या नगरपालिकेने बाजरातले रस्ते धुतले. हायवे चे खड्डे एका रात्रीत बुजवले. अर्थात हे बघून नागरिकांना राग न आला तरच नवल. इथे घरं, दुकान साफ करायला आम्हाला पाणी नाही आणि मामु येणार म्हणून रस्ते धुतात. मामु आले आपला ताफा घेऊन. आम्हाला गरजेसाठी पेट्रोल नाही आणि मामु ताफा घेऊन पेट्रोल जाळतायत. कोणाचाही राग अनावर होईल. मामुची गाडी जवळसपास सगळ्या चौकात अडवली गेली. मामु ना प्रश्न विचाराले गेले , ज्यावर अर्थात त्यांच्याकडे उत्तरे नव्हती. त्याचा पाळीव कुत्रा लोकांवर भडकत , शिव्या घालत होता. अगदी आमच्या समोर एक प्रसंग झाला. एक तरुण मुलगा मामुंचा गाडीसमोर आला. मामुंना शिव्या घालू लागला. सगळा ताफा थांबला. गर्दी गोळा झाली. सगळ्यांनी मामुना घेरले. त्यांना गाडीतून बाहेर यावं लागलं. तो मुलगा मामुंच्या जवळपास पोहोचू दिला नाही पोलिसांनी पण अतिशय वाईट अश्या शिव्या तो देत होता. ते बघून तो पाळीव कुत्रा गुरगुर्ला आणि त्याने देखील या मुलाला शिव्या दिल्या. दोघांची अक्षरशः 'बाचाबाची' झाली. " तू माझ्या ऑफिस ला येऊन भेट" अशी धमकी त्या मुलाला मिळाली. पण ते आधीच चिडलेलं पोरग उलट त्याला म्हणाल," हिम्मत असेल तर तूच माझ्या घरी ये!" पोलिसांनी थोडक्यात सगळ्यांना आवरलं नि ताफा पुढे गेला. शेवटच्या पोलिसांनी त्या पोराला शांतपणे समजावलं, की जाऊन दे आम्ही पण ड्युटी करतोय, का जीव धोक्यात घालतो वगैरे. हे सगळं खरच असाच झालाय. दुर्दैवाने ठराविक लोकं घेराव घालायला पुढे झाली. अमच्यासारखी मध्यमवर्गीय पुढे व्हायची मनात इच्छा असूनही फक्त बघत राहिलो. त्या मुलाच तोंडभरून कौतुक केलं, त्याला शाबासकी दिली नि मोकळ्या मनाने हे कबुल केलं की बाबारे तू केलंस पण आमच्यात खरंच दम नाही. फक्त आता सांभाळून राहा. मनात स्वतःची लाज वाटली. मग एकदा राज्यपाल कोषारी, नारायण राणे,एकनाथ शिंदे असे सगळे दौरे करून गेले.त्यापायी रस्ते अडवून खोळंबा झाला तरी त्याच सोयरसुतक त्या सो कॉल्ड लोकप्रतिनिधी ना कुठलं असायला? एकदा तर ड्युटी वरच्या एका पोलिसाला म्हटलं पण मी की कशाला ट्रॅफिक अडवून हे दौरे करतायत? तो पोलीस पण म्हणतो, जाऊ द्या ना मॅडम, शेवटचा दौरा आहे नाही आणखी कोणी येत.
एकीकडे भावच दुकानातून तागे बाहेर येत होते. तर दुसरीकडे बायकांची झुंबड उडाली होती. ब्रोकेड चे तागे, प्रिंटेड कापडाचे, इक्कत चे तागे जे एरवी 180/200 रुपये मीटर ने असतात, आज भिजलेला माल उठला तर थोडे तरी पैसे सुटतील म्हणून भावाने विकायला काढला. 200 रुपये अख्खा तागा असा भाव लावला. 50 रुपये कॉटन चा गाऊन पीस, 50 रुपये परकर, असे कमी भाव लावल्यावर बायकांची अशी गर्दी झालेय की विचारता सोय नाही. दुकानातून चिखलातून काढलेला माल बाहेर पार्किंग मध्ये अक्षरशः टाकून देत होते आतली लोक, पार्किंग मध्ये पण चिखल च होता. पण त्यातही बायका शोधून शोधून काढत होत्या. शेवटी शेवटी शब्दशः उकिरडा उकरावा त्याप्रमाणे बायका त्यातून गाऊन ची कापडं आणि परकर शोधून काढत होत्या. 5/6 दिवस होऊन गेल्यावर त्या कपड्यांना भयंकर वास येत होता. आम्हाला सहन होत नव्हता पण स्वच्छता गरजेची होती म्हणून आम्ही माल बाहेर काढत होतो तर तोच दुर्गंधीत माल बायका हौसेने आणि त्यातही चॉईस करून घेत होत्या.प्रसंगी भांडत देखील होत्या. हा मि शोधून काढलाय, हा मी बाजूला ठेवलाय वगैरे. एका बाईने विचारलं, ड्रेस मटेरियल नाहीयेत का? म्हटलं नाही ती नाही भिजली ती आणखी वर होती, तर बाईने काय म्हणावं," शी मला पाहिजे तेच नाही काय उपयोग?" मी कपाळाला हात लावला. आता हिला हवं म्हणून काय पाण्यात भिजवून देऊ का? अरे समोरच्याच काय किती नुकसान झालाय हे दिसत असून असं कसं काय लोक बोलू शकतात?
माल सगळा बाहेर काढून काउंटर वर ठप्पी लावून ठेवला होता. भाऊ रोज चारचाकी तिथ लावून झोपायचा. सलग तीनही दिवस रात्रीचे लोक गाडी घेऊन कापड उचलून न्यायला आलेले होते. तो तिथेच असल्याने त्यांना काही करता आलं नाही. दिवसा होणाऱ्या बायकांच्या गर्दीत चोरी करून नेणाऱ्या बायका सुद्धा कमी नव्हत्या. 2/3 जणांनी अगदी प्लास्टिक पिशवीच बंडल सुद्धा उचलून न्यायचा प्रयत्न केला. कुठे आणि किती लक्ष ठेवणार? मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणारे म्हणजे कोण ते दिसून आलं. जिथे एकीकडे माणुसकी दाखवणारी माणसं दिसून आली तिथेच हे दुसरे प्रकार सुद्धा दिसून आले.
अजून 2 दिवसांनी एक आश्चर्य दिसून आलं. एका बोळातून माणसांची फौज येताना दिसली. 5 मिनिटे झाली, 10 मिनिटे झाली माणसं यायची थांबेचना. कुठल्यातरी संस्थेची ही माणसं मदतीला आली असावीत असा अंदाज होता. एक माणसाला हटकले आणि विचारले तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसला. नरेंद्र महाराजांची ती सगळी माणसं होती.त्या माणसाने सांगितलं, आदल्या दिवशी महाराजांचा आदेश आला की चिपळूण ला तुम्हाला मदतीला, श्रमदानाला जायचं आहे. तिथे स्वच्छता झाली नाही तर रोगराई पसरेल तेव्हा तिथे जायला तयार व्हा. आणि एका दिवसात पुण्याहून 2000 माणसं चिपळूण मध्ये हजर झाली. प्रत्येक जण स्वतःकडे झाडू, घमेल, फावड काही न काही घेऊन आला होता. कोणीही रिकाम्या हाताने, आलं नव्हतं. मास्क लावून, ग्लोव्हज घालून आणि स्वतःचे डबे घेऊन ही माणसं तयारीने आली होती. डोळे खरच भरून आले. एका माणसाच्या हाकेवर 2000 माणसांची फौज उभी राहते, अश्या कामासाठी ज्याबद्दल मोबदला काही नाही, नाव काही नाही फक्त सेवा म्हणून करायचं. सोपं काम नाही हे. नरेंद्र महाराजांची टिंगल बरेच जण करतात. पण आज मात्र मी देखील नतमस्तक झाले.त्या माणसांनी मिळून बाजारातील साधारण 30 टक्के कचरा उचलून टाकला.दुर्दैवाने नगरपालिकडे त्यांना कचरा उचलायला देण्यासाठी गाड्या देखील नव्हत्या. सुदैवाने मुंबईहून BMC च्या गाड्या आलेल्या त्याच दिवशी ज्यानि मोठा हातभार लावला. दुसऱ्या दिवशी देखील महाराजांची अशीच दीड दोन हजार माणसं आजूबाजूच्या गावातून आली होती. नगरपालिकडे हातात आलेल्या माणसांचा उपयोग सुद्धा करून घेता आला नाही. जशी मुंबई, पुणे वाटेल तस वाढतंय तेच आज चिपळूण च पण होतंय.वाटेल तस चिपळूण वाढतंय. पालिकेला काहीही पडलेलं नाहीये. त्यांना नगर विकास वगैरे काहीच करायचा नाही. चिपळूण ची प्रगती झालीच असेल तर आपली आपण झालेय त्यात प्रशासनाचा काहीही हात नाही.
दुकान स्वच्छ झालं. शेवटचे काही तागे तर फुकट देऊन टाकले. तेव्हासुद्धा बरीच गर्दी पाहायला मिळाली. थोडे तरी पैसे आले म्हणून भाऊ खुश. आणि माल उचलून टाकायला सुद्धा गाडी करायला लागली असती त्यापेक्षा झालं ते बरं अस वाटलं. अर्थात घेणारी लोक होती ती सुरक्षित आणि सुस्थितीत असणारी होती. कारण ज्यांची घरं/ व्यवसाय पुरात बुडाले ते गाळ काढत बसले होते. त्यांना खरेदीला यायला वेळच नव्हता. हे खरेदीदार त्यातही घासाघीस करीत होते. माणुसकीचे तसेच माणुसघाणीचे अनेक नमुने या काळात बघून झाले. माणसं खूप दमली. सलग 5 5 दिवस चिखलात पाय रोवून उभे राहिल्यावर, कातडी सोलाटवली होती. पायाचे पापुद्रे निघायला लागले. जास्तीत जास्त ऊन, क्वचित पाऊस अश्या वातावरणात त्वचा काळवंडली आणि त्वचेची साल निघायला लागली. त्या वासाने नकोस होऊन सर्दी, कफ झाला. दोन तीन दिवस तोच वास नाकात बसला होता. डोळ्यासमोर लोकांची गर्दी नि त्या गर्दीला आवरताना मी दिसायचे. नको तो पूर आणि नको ती नंतरची विल्हेवाट अस वाटलं. कधी कुणावर अस संकट येऊ नये हीच मनोमन प्रार्थना.
भावाचं किमान 30/35 लाखाचा नुकसान झालेलं आहे.विकलेल्या मालातून निदान इतके दिवसाचा स्वच्छतेसाठी माणसांचा, जनरेटर साठी लागलेल्या डिझेल चा, प्रेशर पंप साठी पेट्रोल इत्यादी साठी लागणारा खर्च फक्त निघाला. दुकान जुनं असल्याने, गुडविल असल्याने परत उधारीवर माल नक्की मिळेल. दुकान सुरू होईल. आम्ही सगळे आहोतच पाठीशी. जे सगळ्यांच झालाय त्यातच तो ही आहे. होईल परत सगळं सुरळीत, पूर्ववत आणि जोमाने चिपळूण परत उभं राहिलं.
प्रतिक्रिया
6 Aug 2021 - 11:03 pm | मदनबाण
काय बोलावं ! सगळ्या पूरग्रस्त लोकांना यथायोग्य आर्थिक मदत मिळो ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो._/\_
नरेंद्र महाराजांची टिंगल बरेच जण करतात.
जितक मला माहित आहे त्यानुसार धर्मांतरित झालेल्यांना हिंदू धर्मात परत घेण्याचे मौलिक कार्य देखील ते करतात.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Santana - Oye Como Va (Live HQ - Carlos Santana)
7 Aug 2021 - 4:29 pm | शानबा५१२
फेसबुकवरच्या एका पोस्टमध्ये, अगदी आकड्यांसहीत लिहले आहे की हा पुर थांबवता आला असता. तो लेखक तिथला स्थानिक आहे. फक्त पाऊसामुळे एवढे पाणे साठेल हे फोटोंवरुनही वाटत नाही. त्या लेखात त्या युवकाने नदींचे पाणे एकाच वेळे सोडले गेले, ते का? असा प्रश्न केला आहे.
7 Aug 2021 - 4:42 pm | सौंदाळा
खूपच बिकट परिस्थितीतुन गेले सर्व पूरग्रस्त.
हे लेख प्रशासनापर्यंत पोचलेच पाहिजेत.
अशा परिस्थितीत काय करायचे याची माहिती सरकारदरबारी व्यवस्थित डॉक्युमेंट केलेली असते पण प्रत्येक वेळी पहिले पाढे पंचावन्न.
8 Aug 2021 - 3:15 pm | गामा पैलवान
शानबा५१२,
मी सांगतो का ते.
कारण की हे राज्य इंग्रजी आहे. ते लोकांचं शत्रू असून त्याला लोकांचा नाश करायचा आहे.
आ.न.,
-गा.पै.
8 Aug 2021 - 3:18 pm | गॉडजिला
राज्य कसलेही असो, राजकारण कोणतेही असो लोकांचा नाश करायचा आहे हे विधान फारचं भयानक आहे हे सत्य असेल देवच आपले रक्षण करो :(
9 Aug 2021 - 9:32 am | विवेकपटाईत
आपल्या देशात खरी समाज सेवा करणाऱ्यांची नेहमीच टिंगल होते. त्यांच्या विरुद्ध केसेस टाकून त्यांना दोषी सिद्ध करून जेल मध्ये हि टाकले जाते. कारण मिडीया हा विदेशी आणि देश विरोधी तत्वांच्या अधीन आहे. मध्यम वर्ग मानसिक गुलाम. टाईम्स ते हिंदू. तमिळनाडूत सुनामीत डेरा सच्चा सौदा ने पूर्ण एक ट्रेन भरून राहत सामग्री पाठविली होती. त्यांचे हजारो शिष्य अंदमान आणी तमिळ नाडू मदतीसाठी होते. पण आज त्यांचे प्रमुख जेल मध्ये आहे. कारण आशाराम असो कि राम रहीम त्यांनी दलित समाजाचला धर्मांतणापासून वाचवून ठेवले होते. म्हणून त्यांच्या काटा काढायचा होता.
11 Aug 2021 - 3:38 pm | गॉडजिला
मनातल्या योग्य अयोग्य, विविध भाव भावनांना वाट तर करून द्यायलाच हवी..
पण उचित धाग्यांवर...
9 Aug 2021 - 11:34 am | सुक्या
धन्यवाद! तुमच्यामुळे पूरग्रस्थांची वेदना / हतबलता कळाली. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. तरीपण त्यांनी अनुभवलेली वेदना कमी करता येणार नाही.
चिपळूण परत उभं राहिल हे मात्र नक्की ...
11 Aug 2021 - 12:17 pm | नीलकंठ देशमुख
काय काय भोगावे सहन करावे लागले आहे. अस्वस्थ होते वाचून .काय करणार?
सहानुभूती फक्त. आणि जमेल ती मदत .ती पण दूरूनच.
11 Aug 2021 - 1:52 pm | Rajesh188
माझा मित्र महाड ल गेला होता त्यांच्या ग्रुप बरोबर मदती साठी .तिथे जावून त्यांनी रस्ते साफ केले .खूप लोक अशी मदतीला असली होती.
कपडे,अन्नधान्य,आणि बाकी वस्तू ची मदत पूर्ण राज्यातून आली होती.
अशा आपत्या टाळता येत नाहीत.ते माणसाच्या हातात नाही.
नदीत पाणी सोडणे हे चुकीचं ठरवता येणार नाही तसे पण सोडले नसते तसे धरण फुटण्याची शक्यता वाढली असती आणि तसे झाले असते तर अजुन जास्त नुकसान झाले असते.
11 Aug 2021 - 4:51 pm | ज्ञानोबाचे पैजार
कोकणातली लोकं खरच चिवट असतात, ह्या पुरावर बर्याच ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी लिहिले आहे, टिव्ही वर मुलाखती दिल्या आहेत, पण कोणाच्याही लिहिण्यातून, बोलण्यातून कधी निराशेचा सूर जाणवला नाही.
या आपत्तीमधुन सुध्दा सावरायला कोकणाला फारसा वेळ लागणार नाही याची खात्री आहे.
पैजारबुवा,
11 Aug 2021 - 9:20 pm | गॉडजिला
नक्कीच. फक्त कोकण चिवट आहे, मुंबईमधे चालू राहायचे स्पिरीट आहे, फलाना फलाना सहिष्णू आहेत याची अधिकार असणाऱ्या लोकांनी सतत परीक्षा घेउ नये इतकीच अपेक्षा असते
11 Aug 2021 - 9:42 pm | Rajesh188
एकदम बरोबर.