निसर्गाचा न्याय

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जे न देखे रवी...
29 Jul 2021 - 2:30 pm

निसर्गाचा न्याय
हिवाळा उन्हाळा पुन्हा पावसाळा,
युगे युगे असे ऋतुचक्र फिरे,
निसर्ग देतो भरभरून सारे
मानवाची हाव तरिही ना सरे !!
मानवाचे अनाचार वाढले,
निसर्गचक्र सारेच बिघडले
अवघी सृष्टी धरूनी वेठीस
स्वार्थासाठी तीला लुबाडले !!
मग प्रलय बनूनी पाऊस आला
झोडपून टाके सर्व जगाला,
नदीच झाला सारा गाव ,
सर्वस्व सवे घेऊन गेला !!
डोंगर कुशीतलं टुमदार गाव
निसर्ग सौंदर्याने डोळे दिपले
पाऊस माराने पडली दरड
उभे गावच गाडले गेले !!
निसर्गाचे नुकसान केले
गोठल्या मानवाच्या संवेदना,
हिशोब त्याचा तो घेतोय करून,
मागे उरतेय. , फक्त वेदना !!
सावर आता तरी माणसा,
नवी झाडे लाव, थांबव जंगलतोड,
सिंमेंटची जंगलं पुरेत आता,
विश्वासाचं नातं निसर्गाशी जोड !!
निसर्गाचा आदर राख. फुल, पक्षी
पशु, झाडं यांचेही हक्क समजून घे,
विकास म्हणून फक्त स्वतःसाठी,
निसर्गाला ओरबाडणं सोडून दे !!
-वृंदा

कविता

प्रतिक्रिया

श्रीगुरुजी's picture

29 Jul 2021 - 7:49 pm | श्रीगुरुजी

चांगली कविता!

सौन्दर्य's picture

30 Jul 2021 - 6:56 pm | सौन्दर्य

कविता चांगली लिहिली आहे, पण हा समतोल साधायचा कसा हाच मोठा यक्ष प्रश्न आहे.

आपल्यापैकी बहुतांश मंडळी, वृक्षे, जंगले तोडून साफ केलेल्या जमिनीवर राहत असतील. शहरात नव्याने येणाऱ्या मंडळींना घर हवे असेल तर त्यासाठी नवीन घरे, इमारती बांधाव्या लागतीलच व त्यासाठी मोकळी जमीन मिळणे फारच दुरापास्त आहे. अशावेळी झाडे तोडूनच घरे बांधावी लागतात. आपण जे आधीच शहरात येऊन राहतोय ते ह्या नव्याने येऊ पाहणाऱ्या लोकांना झाडे पाडायला मज्जाव करतो मग त्यांची राहण्याची गरज कशी भागणार ? जगातल्या सर्वच संस्कृती ह्या नदीच्या काठावर वसल्या आहेत, त्यांनी नदीकाठची जंगले साफ करूनच शेती करायला घेतली, राहण्यासाठी घरे बांधली, मात्र आता नव्याने असे कोणी करायला घेतले तर त्याला आपण आक्षेप घेतो.
हे जर सर्व टाळायचे असेल तर मूलभूत सुख-सुविधा, नोकऱ्या सर्वत्र पोहोचल्या पाहिजेत तरच शहरांची अनिर्बंध वाढ थांबून निसर्गाचा समतोल राखला जाऊ शकेल.
सध्या मी राहत असलेल्या जागेवर काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते, ते सर्व कापून आमची कॉलोनी बनली. मात्र बिल्डर जेव्हा आजूबाजूची जंगले कापायला घेतात त्यावेळी मात्र मी हळहळतो.

मला वाटतं कालचक्र परत मागे फिरवावं..
आता या कोरोनामुळे आपल्याला खरं तर 'खरोखर आपल्या गरजा' किती आणि आपण 'किती जमा करतो'याचा एक अंदाज तर दिलाच आहे.
घरं साधं, साधं राहणीमान हे अंगीकारले तर?
प्रत्येकाने झाडं लावावीत, त्यांची काळजी घ्यावी. निदान पुढील पिढीला तरी फायदा होईल.
आपल्याशी सहमत आहे. शहरांवरचे बोजे कमी करण्यासाठी गावोगावी शेती आणि त्यावर आधारीत, तसेच छोटेमोठे उद्योगधंदे निर्माण झाले तर ? शहरात येणारे लोंढे थांबतील.
पूर्वीसारखंच सगळं.. थोड्यात गोडी तसं जीवनमान आलं तर... अर्थात हे घडणं म्हणजे कल्पनाविलासच. ..
विकास जसजसा झालाय त्याची फळं चाखतोय तर त्याबरोबर येणारे दुष्परिणाम भोगल्याशिवाय आपली सुटका नाही..
पण हे जे नियम धाब्यावर बसवून पूररेषेच्या आत वगैरे घरं बांधतात..किंवा डोंगरावर अवैधरित्या वस्ती करतात त्यांना कोण रोखणार ? असे अनेक प्रश्न आहेत..तोवर अशी संकटं आली कि आपल्यासारखी सह्रदयी माणसं दुःखी होतात, हळहळतात, पिडीतांना मदतही करतात.
अशी चांगली सह्दयी माणसं आहेत म्हणूनच जग चाललय.. अर्थात हे माझं मत आहे.

मदनबाण's picture

30 Jul 2021 - 9:21 pm | मदनबाण

छान कविता...
कोकणातल्या लोकांचे झालेले हाल पाहवत नाही, एक संकट करोना चे आणि दुसरे आसमानी. माझं नृसिंहवाडी आणि कोल्हापूर देखील पार जलमय झालयं. :(

आक्रोश जनमानसाचा...

लोकांच्या वेदना, हाल आणि परिस्थिती पाहुन माझं मन पार हेलावुन गेलं आहे... लोकांचे असे उघडे पडलेले संसार पाहुन फारच दु:ख झालं आहे. या लोकांना आर्थिक मदत करण्यासाठी कोणते ऑनलाईन पोर्टल आहे काय ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

चिपळूणचा दुसर्‍या विडीओमधल्या ताईंची कैफीयत पाहून मला तर अक्षरशः रडायला आले. घरी आजारी माणूस अन त्यात पुर आलेला. काय करेल ती माऊली?
अन अशी परिस्थिती थोड्याफार फरकाने सगळ्याच गावातल्या घरांची!

नैसर्गिक पुर आला असता तर ठिकच आहे, पण कोल्हापूर घ्या, चिपळूण घ्या, येथील सध्याचे पुर हे जास्त प्रमाणात मानवनिर्मीत किंवा प्रशासन निर्मीत आहेत हे नक्की.

चिपळूणचा दुसर्‍या विडीओमधल्या ताईंची कैफीयत पाहून मला तर अक्षरशः रडायला आले.
होय मी सुद्धा रडलो... तळीये मधील घटने ने तर लोकांनी अख्खे कुटुंबच गमवले आहे, त्यांचे दु:ख पाहिले आणि आसंव डोळ्यात थांबेनाशी झाली.

मदनबाण.....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा. अनुभवाला अजून 'कवितामय' करीत राहावे. ( ष्ट्रक्चर)

-दिलीप बिरुटे

बापूसाहेब's picture

1 Aug 2021 - 3:54 pm | बापूसाहेब

कवितेशी सहमत..
आत्ता जितका पाऊस पडतोय तेवढाच किंवा त्याच्या पेक्षा जास्त पाऊस मी लहानणापासून पहात आलोय.. कोल्हापूर सारख्या ठिकाणी कितीतरी दिवस आणि रात्र पाऊस पडला तरी नदीकाठी फक्त थोडफार पुर यायचा. पण आता पूर्ण शहर जलमय होत आहे.
माझ्यामते याच कारण म्हणजे सूज आल्याप्रमाणे वाढलेली शहर.. आणि ती वाढत असताना ड्रेनेज आणि सांडपाणी इ च केलेले अयोग्य नियोजन.
आम्ही लहानपणी आंबील ओढ्यात कपडे आणि अंथरूण धुवायला जायचो. बिंदास्त पाण्यात खेळता येईल इतके स्वच्छ पाणी.. कितीही पाऊस आला तरी काठावरील रेणुका मंदिर पाण्यात जात नव्हते. पण आता थोडा जरी पाऊस आला तरी पूर्ण परिसर जलमय होतो. पुलावरून पाणी वाहु लागते. आणि पावसाळा संपला की संपूर्ण काळे पानी.. गटारी सारखा वास..

हीच परिस्थिती इतर ओढे नाले आणि नद्या यांची आहे.
माझ्यामते इतर सर्व शहरे जिथे पूर परिस्थीती येत आहे तिथेही असावी..
याला जबाबदार स्वतः जनता आणि ढिम्म सरकार आणि नियोजनशून्य कारभार आहे. २० वर्षापूर्वी असणारी पूररेषा एकदा पाहून घ्यावी.आणि त्याच्या आत ज्या ज्या लोकांनी घर आणि अतिक्रमण केलेय त्यांना कोणतीही मदत देऊ नये.. एकतर स्वतः आगीत शिरायचं आणि नंतर भाजल म्हणून गळा काढायचा.. या लोकांनी स्वतःसोबत इतर लोकांचं देखिल नुकसान केलेय.