भाषा शिकण्याचा अनुभव कथन करताना मराठी आणि जर्मन संभाषणात इंग्रजी शब्दांचा वापर यावर एक निरीक्षण नोंदवले होते आणि तो विषय थोडक्यात आवरला होता. मात्र त्यानंतर अधिक शोध घेतला असता परिस्थिती जरा वेगळी असल्याचे जाणवले.
१) जगातील भाषांची आकडेवारी
एखादी भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या किमान १० करोड आहे अशा केवळ १३ भाषा जगात आहेत [१]. इंग्रजी १३४ करोड ते जपानी १२ करोड अशी एक ते तेरा क्रमवारी आहे. चिनी भाषा दुसऱ्या क्रमांकावर ११२ करोड आणि हिंदी ६० करोड तिसऱ्या क्रमांकावर आहे. चीनची लोकसंख्या शंभर करोडच्या पुढे असल्याने चिनी भाषा वगळता दुसरी कुठलीही भाषा इंग्रजीच्या जवळपासही येत नाही. या संख्या मातृभाषा आणि नंतर शिकलेली भाषा अशा दोन्हींच्या मिळून आहेत. केवळ मातृभाषेचा विचार केला तर चिनी, स्पॅनिश, आणि इंग्रजी असा क्रम लागेल पहिल्या तीन भाषांचा. मातृभाषा म्हणून स्पॅनिश आणि इंग्रजी शिकलेल्या व्यक्तींची संख्या जवळपास सारखी असली तरी एकूण संख्येत इंग्रजी सर्वांनाच मागे टाकते हे आपण वर पहिले आहे. तरीही स्पॅनिश, फ्रेंच, आणि पोर्तुगीज या भाषांचा प्रसार त्या त्या देशांच्या बाहेर बराच झालेला आहे.
फ्रान्स, स्पेन, आणि पोर्तुगाल हे देश जर अनुक्रमे फ्रेंच, स्पॅनिश, आणि पोर्तुगीज भाषांचे घर समजले, तर या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संख्या या देशांच्या आजच्या लोकसंख्येच्या ४ पट, १० पट, आणि २५ पट आहे. युरोपातील राज्यांचे वसाहतवादी धोरण या सर्वच भाषांच्या प्रसारास कारणीभूत आहे. त्या भाषा बोलणारे लोक मुळातले देश सोडून आणखी कुठे आहेत हे पाहिल्यास ते सहज लक्षात येईल. एकूणच इंग्रजीने जगभर आपले हातपाय पसरले आहेत हे खरेच. २०११च्या जनगणनेनुसार भारतात ०.०२५ करोड लोकांची इंग्रजी मातृभाषा आहे; आणि द्वितीय आणि तृतीय भाषा इंग्रजी असणारे एकूण लोक १३ करोड आहेत अधिक उत्पन्न आणि दहावी इयत्तेच्या पुढे शिक्षण असणाऱ्या लोकात इंग्रजी बोलण्याचे प्रमाण इतरांपेक्षा जास्त आहे [२].
२) एक प्रयोग
मराठी भाषेतील पुढील दोन मुलाखती ऐकून इंग्रजी शब्दांच्या वापराच्या नोंदी केल्या. यातील सहभागी लोकांवर वैयक्तिक टीका करण्याचा अजिबात उद्देश नाही. पहिल्या मुलाखतीत सहभागी झालेले कलाकार वृद्ध आहेत तर दुसऱ्यात तरुण कलाकार आहे.
https://www.youtube.com/watch?v=7owWiu-15vg&t=1264s
वर्ष - २००९ पूर्वी, सह्याद्री वाहिनी, पहिल्या २१ मिनिटात १५ इंग्रजी शब्द
https://www.youtube.com/watch?v=ANPR9bpjpZM&t=1002s
वर्ष - २०२०, कलर्स मराठी वाहिनी, पहिल्या १६ मिनिटात ५६ इंग्रजी शब्द
तरुण कलाकारांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत इंग्रजी शब्दांचे प्रमाण वाढले आहे. पहिली मुलाखत जरा गंभीर आहे, पण सामान्य विषय बोलताना मराठी शब्द वापरता येत नाहीत असे नाही. दुसऱ्या मुलाखतीत अनेक असे इंग्रजी शब्द वापरले ज्यांच्यासाठी मराठी पर्याय सहज उपलब्ध आहे.
Insecure, Jealous, Feeling, National level, experience, cockroaches, shopping, as usual, I’m proud of her, image, serial, wow, always, completely, singer, struggle.
पहिल्या मुलाखतीत कलाकार म्हणतो की अमुक ठिकाणी आमचं बिर्हाड होतं तर दुसर्या मुलाखतीत कलाकार हे Paying guests असतात किंवा त्यांचा rented place असतो.
अशा प्रकारे इंग्रजी शब्द गरज नसताना माझ्याही संभाषणात येत असतात हे मान्य करावे लागेल. खरोखरच इंग्रजी शब्द गरज नसताना वापरले जात आहेत का हे पाहण्यास आणखी मोठा अभ्यास करावा लागेल. पण माझा वैयक्तिक अनुभव मात्र इंग्रजी शब्दांचा वाढत वापर असाच आहे. अर्थात, गरज नसताना वापर (वरती उदाहरणे दिल्याप्रमाणे) हे पुन्हा अधोरेखित करू इच्छितो. Machine Learning, Additive Manufacturing या सारख्या संकल्पनांसाठी मराठी शब्द तयार करून त्यांचा वापर करावा असे अजिबात सुचवायचे नाही.
३) इंग्रजीचा अन्य भाषांवर प्रभाव
युनाइटेड किंग्डम, अमेरिका, आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील साधारण एकूण ४३ करोड लोक सोडले तर साधारण ९० करोड इंग्रजी बोलणारे लोक हे अन्य देशात (त्यातले पण किमान १० करोड फक्त भारतात) आहेत. त्यामुळे चांगल्या अगर वाईट प्रकारे दुसऱ्या भाषांवर प्रभाव टाकण्याचे सामर्थ्य इंग्रजीमध्ये सर्वाधिक असले पाहिजे. गार्डियन या इंग्रजी वृत्तपत्रात इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबद्दल एक दीर्घ लेख २०१८ मध्ये छापून आला [३]. त्यात इंग्रजी युरोपातील अन्य भाषांवर कसा प्रभाव टाकत आहे आणि जगात इंग्रजी शिकण्याकडे लोकांचा ओढा कसा आहे याचे अनेक दाखले दिले आहेत. अर्थात इंग्रजीनेही दुसऱ्या भाषांतील शब्द सामावून घेतले आहेतच मात्र सध्या इंग्रजी एकूण निर्यातदार झाली आहे. काही ठिकाणी शब्दांच्या पलीकडे थेट व्याकरणावर प्रभाव पडला आहे [४]. त्याचे उदाहरण पुढील प्रमाणे.
Erinnern - To remember हे जर्मन भाषेत आत्मवाचक क्रियापद (Reflexive Verb) आहे. त्यामुळे त्याला कर्त्याचे आत्मवाचक रूप गरजेचे आहे.
I don't remember - Ich erinnere mich nicht
इथे mich हे ich या कर्त्याचे आत्मवाचक रूप आहे. मात्र इंग्रजी भाषेत तसे काही आवश्यक नसल्याने जर्मन भाषक लोक ते विसरत असल्याचे म्हटले आहे.
Download या क्रियापदासाठी herunterladen असा नवीन शब्द काढूनही तो लोकप्रिय होत नाहीये आणि मग download यालाच व्याकरणाचे नियम कसे लावावे यावरून गोंधळ उडत आहे. जर्मनीच्या चॅन्सेलर आंगेला मर्केल यांनी इंग्रजीच्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केल्याची बातमी डॉइश वेल्ले या वाहिनीने दिली आहे [५].
४) मराठी भाषा
जगात अनेक भाषा लेखना अभावी किंवा बोलणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे लोप पावत चालल्या आहेत. मराठी भाषेस तसा काही धोका असल्याची भीती नाही. मात्र मराठी भाषेवरही इंग्रजीचा प्रभाव हा वाढतच जाणार आहे. या पूर्वी परकीय आक्रमणातून फारसी भाषेतून अनेक शब्द मराठीत आलेले आहेत. अन्य भाषांतूनही थोड्या फार प्रमाणात आलेले आहेत. त्यामुळे आता इंग्रजी शब्दांचा बाऊ करू नये, भाषा प्रवाही असते, असेही मत व्यक्त होऊ शकते. मात्र असा प्रवाह हा एकतर्फी इंग्रजीकडून अन्य अनेक भाषांकडे असणे हे आजचे विशेष आहे.
[१] https://en.wikipedia.org/wiki/List_of_languages_by_total_number_of_speakers
[२] https://www.livemint.com/news/india/in-india-who-speaks-in-english-and-where-1557814101428.html
[३] https://www.theguardian.com/news/2018/jul/27/english-language-global-dominance
[४] https://www.economist.com/prospero/2015/07/16/deep-impact
प्रतिक्रिया
10 Jul 2021 - 10:07 pm | तुषार काळभोर
इंग्रजीचे (आणि हिंदीचेही) मराठीवरील आक्रमण.
तुम्ही दिलेल्या अलीकडील उदाहरणाबाबत माझी दोन निरीक्षणे.
१. स्वतःच्या शिक्षण, ज्ञान, सामाजिक स्तराविषयी न्यूनगंड असताना गरज नसताना इंग्रजी शब्दांचा अथवा वाक्यांचा उपयोग केला जातो. यात मीसुद्धा काही कमी नाही, मलापण येतं हे दाखवणं समाविष्ट असतं.
ज्यांना त्याची गरज नसते, ते असा अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर टाळतात.
मी आधीही काही वेळा मिपावर उदाहरण दिले आहे. जयंत नारळीकर यांच्या विद्वत्तेविषयी सर्व परिचित आहेतच. युके मधील शिक्षण + संशोधन तेही अवकाश शास्त्रात असताना जेव्हा ते मराठी बोलतात तेव्हा त्यांच्या तोंडी इंग्रजी शब्द केवळ अनिवार्य असेल तिथेच येतात. त्यांचं शालेय शिक्षण सुद्धा बहुधा उत्तर भारतात झालं आहे.
हेच विजय भटकर, रघुनाथ माशेलकर यानादेखील लागू होईल.
(एक उपनिरीक्षण: मुली / महिलांकडून या कारणासाठी इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर जास्त होतो. तसेच कॉलेज अथवा कामाच्या ठिकाणी विरुद्ध लिंगी व्यक्तीशी बोलताना इंग्रजी शब्दांचा अतिरिक्त वापर जास्त होतो.)
२. आता जी पिढी माध्यमांत काम करते त्यांचा जन्म १९९० नंतर व शिक्षण २००० नंतर झाले आहे. तेव्हा त्यांचं शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले असण्याची शक्यता जास्त आहे. त्याचाही परिणाम बोलण्यातील इंग्रजी शब्दांचे परिणाम वाढण्यात होत असावा.
* डिस्क्लेमर - उपरोक्त निरीक्षणे माझी वैयक्तिक आहेत. ती परिपूर्ण तसेच अंतिम सत्य आहेत, असा दुरूनही दावा अथवा गैरसमज नाही. ती अपूर्ण नक्कीच असू शकतात. कदाचित चुकीची असू शकतात.
10 Jul 2021 - 11:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
योग्य निरी़क्षणे आहेत. गेल्या वीस वर्षात इंटरनेट(आंतरजाल्)चा मोठा प्रभाव कारणीभूत आहे का?जी माहिती पुर्वी 'धावते जग'(म.टा.चे सदर) मधुन मिळायची तीच माहिती आता स्व्तःला इंटरनेटवरुन मिळू शकते. ही माहिती बहुतांशी इंग्रजीतून असल्याने इंग्रजीचा प्रभाव वाढला आहे.
उर्दु/फारसीचा द्वेष करुन ते शब्द घालवण्यापेक्षा पर्यायी इंग्रजी शब्द सुचवले तर योग्य होईल. सर्वच भारतीय भाषाना हा प्रश्न भेडसावत आहे. हिंदी तरी आता कुठे हिंदी राहिली आहे? हिंदी भाषिक टी.व्हि.वर बोलतात त्यात ५०% इंग्रजीच असते.
11 Jul 2021 - 12:43 am | टर्मीनेटर
लेखातली आणि प्रतिसादातली तुका शेठ आणि माईसाहेबांची निरीक्षणे पटली!
मी कुठलीही हिंदी/मराठी टिव्ही सिरीयल गेल्या कैक वर्षांपासून बघत नसलो तरी काही वेळा मातोश्रींमुळे (इच्छा नसतानाही) त्यातले संवाद कानावर पडतात. पात्रांच्या तोंडची ती धेडगुजरी भाषा ऐकायला फार विचित्र वाटते. काही वेळा तर वाक्यामध्ये ६०-७०% शब्द इंग्रजी असतात.
वर्तमानपत्रांचीही तीच गत! त्यांतसुद्धा हल्ली इतके इंग्रजी शब्द घुसडलेले असतात जे खरंतर अनावश्यक वाटतात आणि हे सर्व मुद्दामहून केले जातंय की काय अशीही शंका येते.
१००% सहमत!
त्याच बरोबर युट्युबचे 'तूनळी', फेसबुकचे 'चेहरा पुस्तीका/पुस्तक', व्हॉट्सॲपचे 'कायप्पा' असे वृथाभिमानाने किंवा खोडसाळपणे केलेले मराठीकरणही वाचताना मला व्यक्तिगतरीत्या अत्यंत खटकते / चुकीचे वाटते!
इतका मराठीचा अभिमान असेल तर स्वतःची अशी एखादी लोकप्रिय साईट/ॲप निर्माण करून तीला 'तूनळी' किंवा 'सुरनळी', कायप्पा, चेहरा पुस्तिका / थोबाड पुस्तिका वगैरे नाव खुशाल द्यावे, परंतु इतर कोणाच्या निर्मितीची - ब्रँड नेमची अशी विटंबना करू नये असे माझे वैयक्तिक मत!
तसेच डेटा / डाटा साठी 'विदा' असा शब्द हल्ली बऱ्याचवेळा वाचनात येतो. थोडा शोध घेतला असता त्यासाठी 'सांख्य' असा मराठी प्रतिशब्द फार पूर्वीपासून वापरात होता असे समजले.
मग प्रश्न असा पडला की जर डेटा साठी सांख्य असा शब्द मराठीत उपलब्ध असताना ज्याच्या उत्पत्तीचा कुठलाही अधिकृत संदर्भ मिळत नाही असा 'विदा' हा शब्द वापरण्याचे नक्की प्रयोजन काय आहे?
ह्याबद्दल कोणाला माहिती असल्यास जरूर कळवावे, जाणून घेण्याची इच्छा आहे.
19 Jul 2021 - 8:50 pm | तुषार काळभोर
या विदा शब्दाविषयी अधिकाराने बोलू शकतात.
https://aisiakshare.com/comment/176150#comment-176150
दोन वर्षांपूर्वी त्यांनी लोकसत्ता मध्ये विदाभान हे साप्ताहिक सदर लिहिलं होतं. त्यात डेटा आणि सांख्यिकी दोन्ही विषयी माहिती देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्या सदरावर चर्चेसाठी त्यांनी ऐसी वर एक धागा काढला होता. त्यातील उपर निर्देशित प्रतिसादात त्यांनी विदा शब्दाविषयी लिहिलं आहे.
22 Jul 2021 - 9:13 am | पुष्कर
हा शब्द डेटासाठी पूर्वी वापरल्याचा काही संदर्भ मिळेल का? व्याकरण बघायचे झाल्यास सांख्य हे विशेषण आहे, तर डेटा/डाटा/डेटम (डेटा - हा खरं म्हणजे अनेकवचनी शब्द आहे; डेटम हे त्याचे एकवचन आहे) हे नाम आहे. सांख्यदर्शन किंवा सांख्ययोग ह्या अर्थाने तो पूर्वी वापरला जरी गेला असला, तरी, नुसतं 'सांख्य' वापरल्यास त्यापुढे दर्शन/योग अभिप्रेत असतात. त्याशिवाय नुसता सांख्य हा डेटा ह्या अर्थाने कुठे वापरला गेला असेल तर त्याची कारणमीमांसा जाणून घ्यायला आवडेल.
(नामरूप नसल्यामुळे 'भारतातीत चार लाख निवडक लोकांचा सांख्य गोळा केला' हे वाक्य कानाला विचित्र वाटते)
11 Jul 2021 - 9:31 am | सुनील
लेखातील मुद्द्यांबाबत तूर्तास रुमाल टाकून ठेवत आहे. तरीही, पहिल्या दुव्यात दिलेल्या भाषावार कोष्टकावरून थोडी आकडेमोड करून पाहिली. मनोरंजक वाटली.
कुठली भाषा कितपत प्रभावशाली आहे ते पाहण्यासाठी, ती भाषा ही ज्यांची मातृभाषा नाही अशांचे ती भाषा बोलणार्या एकूण लोकसंख्येशी असलेले गुणोत्तर किती आहे ते काढून पाहिले. कारण मातृभाषा नसतानादेखिल एखादी दुसरी भाषा शिकली जाते ते उगाच नव्हे! (हौसेखातर दुसरी भाषा शिकणारांची संख्या फार नसावी).
इंग्रजीत हे गुणोत्तर ७०% तर फ्रेंचमध्ये ७२% येते.
इंग्लंड आणि फ्रान्स यांचा वसाहतीचा इतिहास लक्षात घेतला तर यात आश्चर्य वाटू नये. तरीही, फ्रेंच ही मुख्यत्त्वेकरून अफ्रिकेपुरती मर्यादित दिसते तर इंग्रजीचे अस्तित्व मात्र जवळपास प्रत्येक खंडात दिसते.
इंडोनेशियनसाठी हे गुणोत्तर ७८% आणि उर्दूसाठी ७०% एवढे घसघशीत आहे तर हिंदीसाठी निम्म्याहून कमी म्हणजे ४३% आहे.
हेदेखिल अपेक्षितच आहे. बहासा इंडोनेशिया, उर्दू आणि हिंदी या प्रामुख्याने एकाच देशात एकवटलेल्या भाषा की जो देश वस्तुतः बहुभाषिक आहे.
इंडोनेशियाबद्दल फारसे ठाउक नाही. परंतु आकडेवारीवरून असे वाटते की, तेथिल अन्य भाषा फारशा प्रगत नसाव्यात आणि बहासा इंडोनेशिया ही भाषा शिकणे बहुदा त्यांच्यासाठी अपरिहार्य असावे.
अगदी अशीच परिस्थिती पाकिस्तानात आहे. पण भारतात अशी परिस्थिती नाही. म्हणून रस्त्यावरची बोली हिंदी शिकली तरी काम चालून जाते. म्हणून हे गुणोत्तर फारसे घसघशीत दिसत नाही.
मराठीत हे १६% पडते. ते बहुधा मुंबई-पुण्यात आलेल्या परप्रांतियांमुळेच असावे!
11 Jul 2021 - 10:49 am | टर्मीनेटर
अभ्यासपूर्ण प्रतिसाद आवडला 👍
19 Jul 2021 - 5:26 pm | सांरा
लेख आवडला. पण कोटी च्या जागी करोड वापरलेले खटकले. मला मराठी वाक्यात करोड वापरणे फार "चिप" वाटते. अर्थात हे माझे स्वत:चे मत आहे.
19 Jul 2021 - 11:55 pm | केदार भिडे
अगदी योग्य मुद्दा. 'कोटी' याच शब्दाचा उपयोग केला पाहिजे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
19 Jul 2021 - 8:31 pm | चौथा कोनाडा
मस्त लेख. इंग्रजीमुळे भाषांचा र्हास हा नेहमीचा विषय !
हिंदी इंग्लीश भाषा वापरणे हा ट्रेण्डच असेल तर काय करणार. ट्रेण्डच्या आहारी गेलेले लोक आपल्या मातॄभाषेचा वै फारसा विचार करत नसतात !
"क्या बात हैं" असे कौतुकपर शब्द गेली ४०-५० वर्षे ऐकतोय. हे शब्द ऐकले नाहीत तर जिंदादिल दाद मिळाल्यासारखीच वाटत नाही !
हे शब्द रु़जून किती दशके लोटली असतील ?
20 Jul 2021 - 12:28 am | Rajesh188
आता इंग्लिश बोलणारे जास्त आहेत ह्याचे कारण ब्रिटिश लोकांचे जगभर पसरलेले साम्राज्य.
इंग्लिश
ज्ञान भाषा आहे हे खूळ आहे.
जपान,कोरिया,रशिया चीन ह्यांची भाषा इंग्लिश नाही पण तंत्र ज्ञान मध्ये हे देश ब्रिटन , अमेरिके ला पण भारी आहेत.
मानवी इतिहासात भाषा ची उत्पत्ती आणि आताच्या भाषा ह्याच्या मधल्या काळात भाषे मध्ये खूप बदल होत गेले आहेत.
मूळ भाषा आता नष्ट झाल्या आहेत.
उत्तर हिंदुस्तान मध्ये मुघलांनी अनेक वर्ष राज्य केले.हिंदी ही भाषा उर्दू चे पिल्लू आहे.
मुस्लिम लोकांची भाषा आहे म्हणजे.
राज्य कर्त्याची भाषा आहे.
हिंदी राज्यकर्त्या ची भाषा.
आणि इंग्लिश पण राज्य करत्याची च भाषा.
उद्या भविष्यात आताच्या सर्व भाषा नष्ट होवून कोडिंग प्रकारची भाषा जगात वर्चस्व गाजवेल.
कारण पुढील जग हे तंत्र ज्ञान चे गुलाम असेल.
जे तंत्र ज्ञाना मध्ये पुढे त्यांचीच जगावर सत्ता असेल.
आणि सत्ता धारी लोकांची भाषा जगाला शिकावी लागेल.तेच किंग असतील.
20 Jul 2021 - 1:49 am | Rajesh188
पानिपत चे युद्ध मराठे हरले नसते प्रचंड विजय मिळवून जिंकले असते.दिली ची गादी मराठ्यांनी काबीज केली असती आणि देशभर राज्य केले असते तर आज मराठी हीच देशाची भाषा असती हिंदी पण नाही.
सत्ताधारी असणे हे भाषा टिकवण्यासाठी पण महत्वाचे आहे.
20 Jul 2021 - 2:10 am | सुक्या
हे लै भारी बरं का !! लै म्हणजे लै भारी ...
22 Jul 2021 - 9:15 am | पुष्कर
चांगला लेख! आवडला